![kudrat1.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u5588/kudrat1.jpg)
माझ्या लहानपणी आमच्या घरी एक स्टिरिओ होता. त्यावर वाजवायच्या गोल रेकॉर्डस मिळायच्या. स्टिरिओ निकामी झाल्यावर कॅसेटसच्या जमान्यातही त्या आमच्या घरी जपून ठेवल्या होत्या. पुढे घर renovate केलं तेव्हा जागेअभावी त्या कोणालातरी देऊन टाकल्या. त्या स्टिरिओचं काय झालं माहित नाही. तर ह्या रेकॉर्डसमध्ये शोलेच्या नुसत्या संवादांची रेकॉर्ड होती, शान, कुर्बानी, मुकद्दरका सिकंदर ह्या चित्रपटांची गाणी होती. काही इंग्रजी गाण्यांच्या रेकॉर्डस सोबतच जगजीत आणि चित्रा सिंगचा फोटो असलेली गझलची रेकॉर्ड होती. ह्या साऱ्यात शोलेचे संवाद आणि जगजीतची गाणी ह्या माझ्या फार लाडक्या रेकॉर्ड्स होत्या. पण आणखी एका चित्रपटाची गाणी माझी खूप आवडती होती. तो चित्रपट होता चेतन आनंदचा कुदरत. कुदरतच्या रेकॉर्डच्या कव्हरवर हेमाच्या एकामागे एक दोन छबी असलेलं चित्र होतं - पुढची हेमा शहरी पोशाखातली आणि मागची ग्रामीण. तसंच शहरी वेषातली हेमा राजेशला दूर असलेलं काहीतरी दाखवतेय असंही चित्र होतं. ह्या दोन्ही चित्रांचं एक गूढ आकर्षण तेव्हा मला होतं. बहुतेक घरात रेकॉर्ड आधी आली असावी कारण नंतर जेव्हा मी तो चित्रपट पाहिला तेव्हा ह्या दोन्ही चित्रांचा अर्थ लागला. तोवर मी ह्या चित्रपटाची फॅन झाले होते. कारण विचारलं तर मला नक्की सांगता नाही येणार. पुनर्जन्माच्या कल्पनेचं जबरदस्त आकर्षण असल्याने असेल किंवा चित्रपटाची कथा (तेव्हा नवी वाटल्याने!) भावली म्हणून असेल किंवा तिचं सादरीकरण आवडलं म्हणून असेल. टेक्निकली आपली ही मालिका गोल्डन एरामधल्या चित्रपटांवर आहे तेव्हा '८१ सालचा कुदरत ह्यात बसत नाही. पण नुकताच पुन्हा पाहिला (पण इतर चित्रपटांच्या फाईलसारखा हार्डडिस्कवरून डिलीट केला नाही) म्हणून तुम्हाला त्याबद्दल सांगावंसं वाटलं इतकंच.
![kudrat2.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u5588/kudrat2.jpg)
चित्रपटाला सुरुवात होते तेव्हा आपल्याला ट्रेनचा आवाज येतो. फार दूरचा शॉट असल्याने अगदी नीट पाहिल्यावर एक ट्रेन घाटातून वाट काढत जाताना दिसते. ह्या ट्रेनमध्ये बसून २० वर्षांची चंद्रमुखी आणि तिचे आई-वडील सिमल्याला जात असतात. खरं तर तिची आई मूळची सिमल्याचीच असते पण चंद्रमुखी दोन महिन्याची असताना ते सगळे मुंबईला शिफ्ट झालेले असतात. इतक्या वर्षांनी मुलीच्या आग्रहाखातर तिला सिमला दाखवायला घेऊन जात असतात. एका बोगद्यातून गाडी बाहेर पडते तेव्हा तिची आई सरला दूरवरून दिसणारं सिमला लेकीला दाखवते. पण जेव्हा ते पाहून चंद्रमुखी 'इथे तर मी आधी आलेय' असं म्हणते तेव्हा तिचे आईवडिल थोडे बुचकळ्यात पडतात. अर्थात ही फक्त सुरुवात आहे ह्याची त्यांना पुसटशीही कल्पना नसते.
सिमल्याला पोचल्यावर तिघे मॉलरोड वर फिरायला जातात तेव्हा तिथे त्यांना सरलाची मैत्रीण कांता भेटते. ती दरवर्षी सिमल्याला येत असते. ह्या वर्षी अमेरिकेहून वैद्यकीय शिक्षण घेऊन आलेला तिचा psychiatrist मुलगा नरेशही तिथे आलेला असतो. कांता त्यांना दुसर्या दिवशी चहाला घरी बोलावते. जेव्हा चंद्रमुखी आणि तिचे आईवडील कांताने भाड्याने घेतलेल्या कॉटेजमध्ये पोचतात तेव्हा चंद्रमुखी ते कॉटेज भूतकाळात कसं होतं त्याचं अचूक वर्णन करते. एव्हढंच काय तर एकदा नरेशसोबत फिरायला बाहेर पडलेली असताना अचानक एक झाड बघून एव्हढी अस्वस्थ होते की नरेशला तिला परत घरी आणावं लागतं. मात्र तिच्या ह्या विचित्र वागण्याचा कोणालाच अर्थ लागत नाही. नरेश बघताक्षणी तिच्या प्रेमात पडलेला असतो. तेव्हा दोघांच्या आया त्यांच्या लग्नाचे बेत करू लागतात.
सिमल्यातलं एक बडं प्रस्थ म्हणजे चौधरी जनकसिंग. हे आपली मुलगी करुणा हिच्यासह रहात असतात. करुणा तिथल्या हायकोर्टात वकील असते. चंदिगढमध्ये वकिली करणारा जनकसिंगांच्या दिवंगत मित्राचा मुलगा मोहन त्यांना भेटायला सिमल्याला येतो. त्याच्या वडिलांच्या मृत्यूनंतर जनकसिंगानीच त्याच्या शिक्षणाचा सर्व खर्च उचललेला असतो. मोहनवर त्यांचे फार उपकार असतात आणि त्याला त्याची जाणीवही असते. तो सिमल्याला आल्यावर जनकसिंग त्याला तुझी सिमल्याचा सरकारी वकील म्हणून नेमणूक करून घेतली आहे हे सांगतात. तसंच करुणा आणि त्याच्या लग्नाचा विषयही काढतात कारण आपली मुलगी मनोमन मोहनवर प्रेम करतेय हे जसं त्यांना ठाऊक असतं तसंच मोहन नकार देणार नाही ह्याचीही खात्री असते.
मोहनला सिमल्याला येताना ट्रेनमध्ये त्याला त्याचा जुना मित्र प्यारे भेटलेला असतो. तो सिमल्याच्या गेईटी थिएटरचा मॅनेजर असतो. एके दिवशी सकाळी तो मोहन, करुणा आणि चौधरी जनकसिंगना सरस्वतीदेवी ह्या प्रसिध्द गायिकेच्या कार्यक्रमाचं निमंत्रण द्यायला येतो. ह्याच कार्यक्रमाला चंद्रमुखी आणि नरेशही आलेले असतात. तेव्हा गर्दीत प्रथम चंद्रमुखी आणि मोहनची नजरानजर होते. प्यारे जेव्हा मोहन आणि करुणाची सरस्वतीदेवीशी ओळख करायला घेऊन जातो तेव्हा त्या मोहनकडे टक लावून पाहत राहतात. मोहनला हे जाणवत नाही पण करुणाला मात्र ते विचित्र वाटतं. कार्यक्रमादरम्यान चंद्रमुखी पुन्हापुन्हा मोहनकडे बघत असल्याचं नरेशच्या लक्षात येतं. पण काही वेळाने तिला अस्वस्थ वाटू लागतं म्हणून ते मध्येच उठून निघून जातात.
त्या रात्री चंद्रमुखीला एक विचित्र स्वप्न पडतं. एक हवेली दिसते. मग एक तरुण धावताना दिसतो. त्याच्यामागून एक तरुणी धावत असते. धावताधावता ती वाटेच्या मधोमध आलेल्या वडाच्या पारंब्यात अडकते. त्यातून सुटका करून घेऊन ती त्या तरुणापर्यंत पोचणार तोवर तो कड्याच्या अगदी टोकाला पोचलेला असतो. ‘मरणार, तो आता मरणार' असं किंचाळत ती घामाघूम होऊन जागी होते. ‘वाईट स्वप्न पडलं असेल' अशी आईवडील तिची समजूत काढतात.
सकाळी 'तुला सरस्वतीदेवीने भेटायला बोलावलं आहे' असा निरोप घेऊन प्यारे मोहनकडे येतो. करुणाही सोबत निघते. वाटेत प्यारे त्यांना एका झाडाकडे घेऊन जातो. ‘माधो-पारो' हे शब्द बुंध्यावर कोरलेलं ते झाड पुऱ्या सिमल्यात प्रसिद्ध असतं. अशी बोलवा असते की एकमेकांवर खरं प्रेम असलेले प्रेमी तिथे गेले तर त्यांच्यावर फुलांचा वर्षाव होतो. नेमके त्याच वेळी चंद्रमुखी आणि नरेशही फिरत फिरत तिथे येतात. कालच्या कार्यक्रमात ऐकलेलं सरस्वतीदेवीचं गाणं करुणाला गुणगुणताना ऐकून चंद्रमुखी अचानक संतापते आणि 'तुला हे गाणं गायचा काही हक्क नाही' असं तिला सुनावते. आणि मग मोहनजवळ जाऊन म्हणते की आपण खूप पूर्वी कधीतरी भेटलोय. अर्थात ती कधी चंदिगढला आलेली नसते किंवा तोही मुंबईला आलेला नसतो. तिचं हे वागणं पाहून मोहन आणि करुणा पार गोंधळून जातात. त्यांना कसं रिएक्ट व्हावं तेच कळत नाही. त्या रात्री चंद्रमुखीला तेच स्वप्न पुन्हा पडतं. मात्र ह्या वेळी तो तरुण कड्यावरून कोसळलेला असतो. ती जागी होते तेच ’माधो' अशी हाक मारत.
मोहनला पाहून तिचं वारंवार अस्वस्थ होणं नरेशच्या नजरेतून सुटत नाही. तो तिच्या मानसिक स्थितीचं निदान करण्यासाठी हिप्नोटाईज करून पाहावं असं सुचवतो. चंद्रमुखी तयार होते. पण ह्या सेशनमध्ये जेव्हा ती थेट आपल्या मागच्या जन्मात जाऊन पोचते तेव्हा आश्चर्यचकित व्हायची पाळी नरेशवर येते. ती आपलं नाव 'पारो' तर आपल्या नियोजित वराचं नाव 'माधो' सांगते. पार अवाक झालेला नरेश तिला साल कुठलं आहे म्हणून विचारतो तेव्हा ती सांगते १९४५ म्हणजेच ती तब्बल ३० वर्षं मागे गेलेली असते. नरेश ही गोष्ट तिच्या आईवडिलांना सांगतो. तिच्या बोलण्यात कुठल्यातरी हवेलीचा आणि माधो राहत असलेल्या 'बडेगाव' नामक खेड्याचा उल्लेख आलेला असतो. ही भानगड काय आहे त्याचा मुळातून तपास केल्याखेरीज चंद्रमुखीवर उपचार करणं अशक्य आहे हे लक्षात येताच नरेश आणि तिची आई तिला घेऊन सिमल्यानजीक असलेल्या बडेगाव नावाच्या त्या खेड्यात त्या हवेलीच्या शोधात जातात. तिथे गेल्यावर चंद्रमुखी माधोचं घर बरोबर ओळखते. गावकऱ्यांच्या बोलण्यातून माधो नावाचा कोणी तरुण आणि त्याची सत्तो नावाची बहिण २५-३० वर्षांपूर्वी तिथे राहत होते हेही कळतं. काल कोणी एक बाई येऊन घराची साफसफाई करून गेली असं काही मुलं नरेशला सांगतात पण ती बाई कोण होती हे काही त्यांना माहित नसतं.
![kudrat3.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u5588/kudrat3.jpg)
चंद्रमुखीला आणखी काही आठवतं का ते पाहत ते तिथे फिरत असताना तिला समोरच एक चर्च दिसतं, तिथे उभ्या असलेल्या मोहनला बघून तिच्या गतजन्मीच्या आणखी काही स्मृती जाग्या होतात. त्या स्मृतीत मोहनही असतो पण तो माधो म्हणून. आणि ती स्वत: असते पारो. मात्र ती हवेली कुठे आहे हे काही तिला आठवत नाही. नरेश मोहनला घरी बोलावून हे सगळं सांगतो आणि चंद्रमुखीचा इलाज करण्यासाठी त्याची मदत मागतो. आधी तर मोहन साफ नकार देतो. पण चंद्रमुखी जेव्हा त्याला 'मला भेटायला याल ना' असं विचारते तेव्हा मात्र तो होकार देतो. का ते त्याचं त्यालाच कळत नाही.
सरस्वतीदेवीच्या विनंतीला मान देऊन मोहन आणि करुणा गावच्या जत्रेत जातात. तिथे नरेशसोबत आलेली चंद्रमुखी मोहनला 'माधो-पारो' लिहिलेल्या त्या झाडाखाली पुन्हा भेटते. ती जीव तोडून त्याला आपण आधीच्या जन्मात भेटलोय म्हणून सांगते पण त्याला काहीच आठवत नसतं. पुरावा म्हणून मागच्या जन्मी पारोने त्या झाडाच्या बुंध्याखाली पुरलेले 'माधो-पारो' हे शब्द असलेले तिच्या हाराचे तुकडेसुध्दा उकरून काढून दाखवते. मोहनला हे सगळं काय चाललंय ते कळत नसतं. एकीकडे त्याला स्वत:ला काही आठवत नसतं पण चंद्रमुखी जवळ असल्यावर तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवावासा वाटतो. तिच्याबद्दल एक अनामिक ओढ वाटते. परिणामी तो करुणाशी साखरपुडा करायला नकार देतो आणि त्याचं कारणही तिला सांगतो. त्याने लग्नाला नकार दिलाय हे ऐकून चौधरी जनकसिंग भडकतात. एक पार्टी आयोजित करून त्यात मोहन आणि करुणाच्या लग्नाची अनाउन्समेंट करायचं पक्कं करतात. करुणा मात्र त्याच पार्टीत चंद्रमुखी आणि मोहनच्या लग्नाची अनाउन्समेंट करता यावी म्हणून तिला घेऊन त्याला यायला सांगते. ठरल्याप्रमाणे नरेश चंद्रमुखीला घेऊन पार्टीत येतो. पण जेव्हा ती जनकसिंगना पाहते तेव्हा किंचाळत हवेलीच्या बाहेर पळून जाते. तिची अवस्था पाहून मोहन तिला पुन्हा हिप्नोटाईझ करायला नरेशला भाग पाडतो. ह्या सेशनमध्ये मात्र ती मागच्या जन्मातल्या घटनांबद्दल जे सांगते त्याने त्या दोघांच्या पायांखालची जमीन सरकते.
असं काय सांगते चंद्रमुखी? तिला खरंच मागचा जन्म आठवत असतो का हा सगळा तिच्या मनाचा भ्रम असतो? तिला स्वप्नात कुठली हवेली दिसत असते? जनकसिंगना पाहून ती एव्हढी का घाबरते? सरस्वतीदेवींना मोहनविषयी एव्हढा जिव्हाळा का वाटत असतो? काय असते माधो-पारोची कहाणी? ह्या प्रश्नांच्या उत्तरांचा कयास बांधणं अजिबात अवघड नाही पण ती चित्रपट पाहून मिळवणं अधिक मनोरंजक आहे. खास करून तुमचा पुनर्जन्मावर विश्वास असेल तर. पण माणूस आणि जन्म ह्यांचं गुणोत्तर १:१ आहे असं तुमचं मत असेल तर ह्या चित्रपटाच्या वाटेला जाण्यात अर्थ नाही. अर्थात चित्रपट पाहणार असाल तर पुढला लेख वाचू नका हे सांगायला नकोच.
ह्या मालिकेच्या निमित्ताने चित्रपट पाहताना माझ्या लक्षात येतंय की सर्वसामान्य चित्रपटांत काही खास अभिनयकौशल्य वगैरे दाखवायची संधी फार कमी वेळा असते. बहुतेक व्यक्तिरेखा सरधोपट आणि इमोशनल सीन्स चावून चोथा झालेले ह्या सदरात मोडतात. एखाद-दुसरा अपवाद सोडला तर संवाद प्रेक्षकांना ऐकू जातील एव्हढ्या स्पष्ट सुरात म्हटले आणि त्यांना साजेसे भाव चेहेर्यावर आणले म्हणजे गंगेत घोडं न्हालं. फक्त नट-नटीचं वय व्यक्तिरेखेच्या वयाशी सुसंगत असलं पाहिजे. नाहीतर पोरांना शाळेत सोडून आई-बाप मिळालेल्या फावल्या वेळात बागेत गाणी म्हणत बागडताहेत असं वाटू शकतं (विश्वास बसत नसेल तर 'साजन बिना सुहागन' मधलं ‘मधुबन खुशबू देता है’ म्हणणारे नूतन आणि राजेंद्रकुमार पाहा. परिणामांना मी जबाबदार नाही.). बहुतेक नट-नटयांना हे जमलेलं असतं. काही अपवाद असतात. ह्या अपवादात राजकुमार आणि प्रिया राजवंश येतात. ७० सालच्या 'हीर-रांझा' मध्ये ह्या दोघांना नायक-नायिकेच्या भूमिकेत कास्ट केल्यानंतर ह्या चित्रपटात जनकसिंग आणि करुणा ह्या वडील-मुलीच्या भूमिकेत कास्ट करण्यामागे चेतन आनंदने काय विचार केला असेल ते एक तोच जाणे. 'चेहेऱ्यावर कुठल्याही भावांचा अभाव' हे पु.लं.चे शब्द इथे चपखल बसतात. राजकुमारला सोडून देऊ पण लंडनच्या प्रसिद्ध RADA मध्ये प्रवेश घेतलेली प्रिया राजवंश असा ठोकळ्यासारखा अभिनय कसा करू शकते ते मला काही केल्या समजत नाही.
आता ही वाफ काढून झाल्यावर नायक-नायिकेकडे वळते. राजेश खन्ना (मोहन आणि माधो) आणि हेमामालिनी (चंद्रमुखी आणि पारो) दोघांना 'महबूबा' नंतर पुन्हा एकदा डबलरोल करायची संधी मिळालेली आहे. राजेश मोहनच्या भूमिकेत convincing वाटतो पण खेडवळ माधो म्हणून पटत नाही. मोहन खेडवळ माणसाचं सोंग काढून आलाय असं वाटत राहतं. ह्या दोन्ही भूमिकांच्या मानाने तो थोराडही दिसतो. हेमा चंद्रमुखी म्हणून सुरेख दिसलेय पण पारोच्या गेटअपमध्ये वयाने थोडी मोठी वाटते. का ते कळत नाही. पारोच्या भूमिकेसाठी तिने हेल काढून बोलायचा प्रयत्न केलाय खरा पण तो अपुरा असल्याने फसलाय असंच म्हणावं लागतं. त्यामानाने डॉक्टर नरेश म्हणून विनोद खन्ना शोभलाय. खरं तर असला चिकणा डॉक्टर समोर असताना चंद्रमुखी मोहनचा विचार करूच कसा शकते ते मला हा चित्रपट अनेक वेळा पाहूनही कळलेलं नाहीये. नया जनम नया मॉडेल! हाकानाका.
चंद्रमुखीचे आईवडिल झालेत नेहमी खलनायकी भूमिका साकारणारे पिंचू कपूर आणि शम्मी. किमान एका तरी व्यक्तिरेखेचे आईवडिल दोघेही धडधाकट पृथ्वीतलावर पाहून बरं वाटतं. कारण करुणाची आई नाही तर नरेशचे वडिल. पारोचे फक्त वडिल असतात तर माधोची फक्त बहिण. मोहनला तर कोणीच नसतं. असो. २० वर्षाच्या मुलीच्या आईवडिलांच्या मानाने हे दोघे थोडे अधिक वयस्कर वाटले तरी अजिबात उपरे वाटत नाहीत हे विशेष. खरं तर त्यांना ह्या भूमिकेत पाहून मस्तच वाटतं. चरित्र कलाकार साचेबध्द भूमिकांत कास्ट होणं हा त्यांच्यावर अन्याय असतो. आणि त्यांना त्याच त्याच भूमिकांत पाहणं त्रासदायकही वाटतं. उदा. केष्टो मुखर्जी आधी पोलीस शिपाई जगतराम असतो असा नुसता उल्लेख आहे पण तो दिसतो ते मात्र त्याच्या नेहमीच्या बेवड्या रुपात. अरुणा इराणीने पूर्वीची सत्तो आणि ३० वर्ष उलटून गेल्यावरची पोक्त सरस्वतीदेवी ह्या दोन्ही भूमिका चांगल्या वठवल्या आहेत. ह्या अभिनेत्रीला अधिक चांगलं काम मिळायला हवं होतं असं मला नेहमी वाटतं.
बाकी छोट्या भूमिकांत देवेन वर्मा (मोहनचा मित्र प्यारे), ए.के. हंगल (मिस्त्री बिल्लीराम), ओम शिवपुरी (न्यायाधीश), सत्येन कप्पू (पारोचे वडील), सप्रू (जनकसिंगचे वडील), टॉम ऑल्टर (मेजर टॉम वॉल्टर्स), मुक्री आणि कल्पना अय्यर आदि मंडळी दिसतात. हा चित्रपट पाहताना मला जाणवलं की प्रमुख अभिनेत्यांबद्दल आपल्याला बरीच माहिती असली तरी ह्या चरित्र अभिनेते-अभिनेत्रीबद्दल एक नाव सोडलं तर बाकी फारसं काही माहित नसतं. कधी कधी तर त्यांचं नावही माहित नसतं. आपण ते कधी जाणून घ्यायचा प्रयत्नही करत नाही. उदा. मोहन सिमल्याला येत असतो तेव्हा त्याच्या ट्रेनच्या डब्यात प्यारेशेजारी एक जोडपं बसलेलं दाखवलंय. त्यातल्या नवऱ्याला मी अनेक चित्रपटांत पाहिलंय पण त्याचं नाव काय आहे कोणास ठाऊक.
लेखाच्या सुरुवातीला उल्लेख केल्याप्रमाणे ह्या चित्रपटातली जवळजवळ सगळीच गाणी माझी लाडकी आहेत. पहिला उल्लेख अर्थातच 'हमे तुमसे प्यार कितना' चा. हे गाणं दोन रुपांत येतं - परवीन सुलतानाच्या आवाजातलं सरस्वतीदेवी गाते ते. आणि किशोरच्या आवाजातलं माधोच्या तोंडी आहे ते. दोन्ही माझी अतिशय आवडती. पहिल्यात माधो-पारोचं असफल प्रेम पाहिलेल्या सरस्वतीदेवीच्या आवाजातली वेदना आहे. तर दुसर्यात पारोच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या माधोचं अधीरपण आहे. माझं नंतरचं आवडतं गाणं 'दुखसुखकी हर एक माला'. हेही दोन रुपांत आहे. एक मोहम्मद रफीच्या आवाजात आहे. दुसरा आवाज गायक चंचलचा आहे असं का कोण जाणे पण मला आत्तापर्यंत वाटत होतं. पण चित्रपट पाहताना कळलं की चंद्रशेखर गाडगीळ नावाच्या गायकाने ते गायलं आहे. मला हा गायक कोण ते माहित नाही. ह्या गाण्याचे लिरिक्स haunting आहेत. तिसरं लाडकं गाणं 'छोडो सनम काहेका गम' किशोरसोबत अॅनेट पिंटो नावाच्या गायिकेने म्हटलंय. लताचं 'तूने ओ रंगीले कैसा जादू किया' आणि आशाचं 'सजती है यूही महफिल' आवडतात पण त्यांचा नंबर माझ्या लिस्टमध्ये नंतरचा आहे. आशा आणि सुरेश वाडकरचं 'सावन नही भादो नही' मात्र मला फारसं आवडत नाही.
पण चित्रपट खूप आवडता असला तरी त्यातल्या उणिवा जाणवत नाहीत असं थोडीच आहे? इथे तर अगदी 'प्रथमग्रासे मक्षिकापात:’ तश्यातला प्रकार. अगदी सुरुवातीला 'असतो मा सद्गमय' ह्या श्लोकाचं इतकं सदोष उच्चारण आहे की कानात बोटं घालावीशी वाटतात. ह्या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन चेतन आनंदने केलं आहे असं श्रेयनामावलीमध्ये नमूद केलंय. प्रिया राजवंशला पाहून हे खरं असावंसंही वाटतं. पण मग चित्रपटभर दिसणाऱ्या त्रुटींची टोटल लागत नाही. उदा. चंद्रमुखी जर चौधरी जनकसिंगला ओळखते तर तो तिला पार्टीत बघून कसा ओळखत नाही? आपल्याच घरात काम करणारया मुलीला 'त्या' रात्रीआधी त्याने कधीच पाहिलं नसेल? चंद्रमुखीला सरस्वतीदेवीची ओळख आधी का पटत नाही? एक नामांकित वकील असलेला मोहन फक्त जगतरामच्या साक्षीवर अवलंबून राहून पूर्वजन्मीतल्या स्मृतींवर आधारलेली केस कोर्टात कशी उभी करतो? जगतराम कसला कागदी पुरावा नष्ट करतो? मोहन तो आधीच ताब्यात का घेत नाही? हवेलीत भक्कम पुरावा मिळूनही तिथे रात्री संरक्षणासाठी एकाच शिपाई का ठेवला जातो? करुणाला तिथे राहण्याची परवानगी कशी दिली जाते? पारोला त्या खोलीत नंतर गेल्यावर तो हार मिळत नाही तर तिचा शोध घेणाऱ्या जगतरामला तो हवेलीत नंतर कुठून मिळतो? कोर्टात साक्षीदारांची लिस्ट आधी सादर करावी लागत नाही का? तसं असेल तर करुणा ऐनवेळी नरेशला साक्ष द्यायला कशी बोलावू शकते? गुन्हा घडतो तेव्हा जनकसिंगचे वडील हयात असतात. मग हवेलीत मिस्त्रीला का बोलावलं आहेस हे ते विचारत नाहीत का? २-४ वर्षांत एखादा परिसर ओळखू न येण्याइतका बदलतो तर ३० वर्षांत सिमला तसंच कसं राहतं की चंद्रमुखीला जुन्या खुणा लगेच सापडतात? पारो आणि माधो दोघे आधीच्या जन्माचाच चेहेरा घेऊन पुन्हा कसा जन्म घेतात? आत्मा अमर आहे तर चेहेरा कुठलाही असला तरी आत्म्याला आत्म्याची ओळख पटायला नको? (इथे मला पु.लं.च्या 'आत्मू डांबिस आहे' ची तीव्रतेने आठवण होतेय!) माधो आत्महत्या करतो का त्याचा मृत्यू अपघाती असतो तेही नीट स्पष्ट होत नाही. तसंच मोहनला आपला पूर्वजन्म स्पष्टपणे कधीच आठवलेला दाखवलं नाहीये. मग तो हे सगळं सव्यापसव्य का करतो? पारोला हवेलीत 'त्या' रात्रीआधीही जनकसिंगचा काही अनुभव आलेला असतो का? कारण ती माधोला मला हवेली आवडत नाही म्हणते तसंच 'तूने ओ रंगीले' गाण्याच्या वेळीही त्याला पाहून लपते. काही प्रसंग तर प्रचंड विनोदी वाटतात उदा. नरेशने केलेलं हिप्नॉसिसचं सेशन आणि भृगुशास्त्राच्या पोथीच्या मदतीने पारोच्या हत्येची उकल करायचा मोहन आणि सरस्वतीचा प्रयत्न. 'प' का पुनर्जन्म होगा और इस जनममे उसका नाम 'च' से शुरू होगा. कैच्या कै. इंग्रज अधिकाऱ्याचा आणि त्याच्या बायकोचा प्रणय पाहून चक्क घराच्या पडवीत बसून माधोने पारोला (ओष्ठ्य!) किस करण्याचा प्रसंग तर 'अ आणि अ' चा कळस आहे. चेतन आनंदसारख्या दिग्दर्शकाकडून ही अपेक्षा नक्कीच नाही.
पण आधी म्हटलं त्याप्रमाणे माधो-पारोची ही कथा बऱ्यापैकी मनोरंजक पध्दतीने सादर करण्यात तो यशस्वी झालाय. चंद्रमुखीला पूर्वजन्माच्या घटना आठवतात तेव्हा झिरझिरीत पडद्यासारखी फिल्म पाडून आणि उचलून आधीचा जन्म दाखवायची क्लृप्ती मला हा चित्रपट प्रथम पाहिला तेव्हाही आवडली होती आणि आताही आवडली. एकातून एक निघणारी वर्तुळं दाखवायच्या जुन्या पध्दतीपेक्षा नक्कीच उजवी. पूर्ण चित्रपटभर ८०च्या दशकातल्या सिमल्याचं मनोरम दर्शन घडतं आणि आता असं सिमला आपल्याला पाहायला मिळणार नाही ही चुटपूट लागते.
‘कुदरत' ह्या शब्दाचा 'निसर्ग' असा अर्थ आहे हे मला माहित होतं. हा चित्रपट पाहून 'नियती' ह्या अर्थानेही तो वापरला जात असावा असं वाटतं. तसं असेल तर न्याय मिळविण्यासाठी लोकांना पुनर्जन्म घ्यायला लावणारी नियती थोडी inefficient वाटते, नाही का? एखाद्या व्यक्तीचे आणि आपले पटकन सूर जुळले किंवा पहिल्यांदा पाहताच एखाद्याबद्दल नकारात्मक भावना निर्माण झाली तर कधीकधी आपण ह्याचा कुठल्यातरी पूर्वजन्माशी संबंध लावतो. अर्थात ह्या व्यक्ती आपण (ह्याच जन्मात!) ओळखत असलेल्या दुसर्याच कुठल्यातरी व्यक्तीशी थोडंफार साम्य असणाऱ्या असतात म्हणून हे होतं अशी थिअरी आहे. Deja Vu म्हणजे एखादा क्षण किंवा घटना पूर्वी घडून गेल्यासारखी वाटणं ह्याही गोष्टीचा पूर्वजन्माशी संबंध असेल असं वाटतं पण ते आपल्या मेंदूचे खेळ असतात अशी थिअरी आहे.
थोडक्यात काय, जितके 'आहे रे' वाले तितकेच 'नाही रे' वाले. पण पुनर्जन्माच्या ह्या खेळाबाबत असं म्हणता येईल की 'दिलके बहलानेके लिये गालिब ये खयाल अच्छा है'. किंवा मजरूह सुलतानपुरीच्या शब्दांत सांगायचं झालं तर......
सामना करे जो इसका
किसीमे ये दम है कहा
इसका खिलौना बनके
हम सब जीते है यहा
जिस राहसे हम गुजरे
ये सामने होती है
दुख सुखकी हर एक माला
कुदरतही पिरोती है
हाथोंकी लकीरोमे
ये जागती सोती है
----
अवांतर - नुकतीच धरमशालेला जाऊन आले तेव्हा St. John in the Wilderness नावाच्या चर्चच्या आवारात 'प्रिया राजवंश' ह्या नावाची memorial plaque पाहून चक्रावले होते. कदाचित ही त्याच नावाची दुसरी महिला असेल असं वाटलं होतं पण ही अभिनेत्री प्रिया राजवंशचीच memorial plaque आहे. विकीवर ती पाहू शकता.
तसंच प्रीतम हॉटेलच्या मालकाने आपल्या 'ये है मुंबई मेरी जान' ह्या सदराअंतर्गत लोकसत्ताच्या लोकरंग पुरवणीत लिहिलेला अभिनेता राजकुमारवरचा लेख इथे वाचा. ह्या सदरातले इतर लेखही वाचनीय आहेत.
वा डिटेल लिहिलंय अगदी, गाणी
वा डिटेल लिहिलंय अगदी, गाणी मस्तच आहेत सगळी आणि राजेश हेमा फ्रेश दिसलेत या पिक्चरमधे।
पण चित्रपट पाहताना कळलं की
पण चित्रपट पाहताना कळलं की चंद्रशेखर गाडगीळ नावाच्या गायकाने ते गायलं आहे. मला हा गायक कोण ते माहित नाही.
>>
हे गाडगीळ मेलडी मेकर्स की कुठल्याशा पुण्याच्याच ओर्केस्ट्रा मध्ये गायचे. त्या काळात जेव्हा बॉलीवूड मध्ये चंचुप्रवेश होणे मुश्किल होते तेव्हा आर डीने त्याला ब्रेक दिला ही मराठी विश्वात फार मोठी न्यूज होती. तेही कोरस वगैरे नाही तर चक्क टयटल साँग. बघा अनुप जलोटाचा सिने संगितात प्रवेश झाला तो एक दूजेके लिये मधल्या गाण्याच्य एका सुरुवातीच्या कप्लेट मधून. अनुराधा पौडवालला एस डी कडे एक श्लोक गायला मिळला. त्या तुलनेत पूर्ण गाणे आणि तेही आर डी कडे म्हणजे मोठीच संधी होती. त्यामुळे आता चंद्रशेखर गाडगीळच्या दारात संगीत कारांची रांग लागेल असे मराठी मनाला वाटले होते पण तसे काही झाले नाही. ते बहुधा त्यांचे शेवटचेच गाणे असावे....
(बहुधा गाडगीळांनी नंतर स्वतःचाही ऑर्केस्ट्रा काढाला होता असे वाटते...)
छान लिहलंय.
छान लिहलंय.
लेख खूप मोठा आहे, संपूर्ण
लेख खूप मोठा आहे, संपूर्ण वाचला नाही अजून.
चंद्रशेखर गाडगीळ - झुंज या रंजना- रवींद्र महाजनींच्या चित्रपटांतली दोन गाणी यांच्या आवाजात आहेत.
निसर्गराजा आणि कोण होतास तू..
वा! वा! स्वप्ना, एकदम
वा! वा! स्वप्ना, एकदम नॉस्टॅल्जिक केलंस.
हा सिनेमा पाहिला तेव्हा मी ५वी-६वीत असेन; पण अजूनही लख्ख आठवतोय.
पुनर्जन्म ही गोष्ट सिनेमात दाखवण्यासाठी म्हणून मानतात, असं मला तेव्हा वाटायचं.
पहिल्याच सीनमध्ये हेमा मालिनी `यहां मैं पहले आ चुकी हूं' म्हणते ते मला भारी वाटायचं; आणि ती त्या झाडाखाली पुरलेला हार काढून दाखवते तो तर माझ्या दृष्टीने कळसाध्यायच! तो हार पाहिल्यावर आता तिच्या आसपासच्या सर्वांचा विश्वास बसेल याची खात्री वाटायची.
माधो पारोला विचारतो, तुझं माझ्यावर किती प्रेम आहे? तेव्हा ती म्हणते, `आसमान के इस किनारे से उस किनारे तक, उससे भी आगे, इतना' - हा आमचा फेव्ह. संवाद बनला होता. `भरपूर' या अर्थी आम्ही तो कुठेही वापरायचो. आज खूप अभ्यास आहे - आसमान के इस किनारे से... ; इत्यादी![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
आणि त्या किसिंग सीनमधलं माधोचं वाक्य - अंग्रेज साहब कहते हैं ये बहोत मीठ्ठा होता है (पारोच्या ओठांवर बोट टेकवत) - त्याचं आम्ही आमच्यापुरतं स्पष्टीकरण शोधलं होतं - तिच्या ओठांना लिपस्टीक लावलेलं असतं, त्यामुळे तसं असेल
माझ्या आठवणीप्रमाणे माधो सैरभैर होऊन एकटाच धावत सुटतो आणि त्यात कड्यावरून कोसळून मरण पावतो.
राजेश खन्ना-हेमा मालिनी थोराड दिसतात ते तेव्हाही जाणवलं होतं. विनोद खन्नाची दया यायची; बिचारा स्वत:ची प्रेमकथा हातातून निसटून चाललेली असतानाही हेमा मालिनीसाठी किती आटापिटा करतो, असं वाटायचं.
प्रिया राजवंश नेहमीप्रमाणे भयंकर वावरली आहे.
प्रिया राजवंश ला कोण द्यायचं
प्रिया राजवंश ला कोण द्यायचं रोल? आणि का?![Rofl](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/rofl.gif)
अगं काय हे स्वप्ना.. किती
अगं काय हे स्वप्ना.. किती लिहिशील.. खरंच कौतुक आहे तुझं.. टाळ्यान्चा कड्कडाट झालाच पाहिजे..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आता पाहवयाच्या चित्रपटान्ची लिस्ट वाढत चाललीये माझी, तुझे लेख वाचुन...
मस्त लिहितेस... लिहित राहा...
टाळ्यान्चा कड्कडाट झालाच
टाळ्यान्चा कड्कडाट झालाच पाहिजे>> +10000
नेहमीप्रमाणेच आवडलं.
प्रचंड कौतुक. बाकी सवडीने लिहीन
बघीतला बा.. सहन केला अतिअति
बघीतला बा.. सहन केला अतिअति अभिनय..
सर्वात झेलेबल त्यातल्यात्यात राकु आणि विनोद वाटला मला..
हेमाचा आवाज या जन्मात तरी आवडणे अशक्य आहे.. ती प्रिया राजवंश अन तिचे उच्चार म्हणजे तौबा तौबा.. कानातून रक्त यायच बाकी राहिलं बस..
ललिता-प्रिती, मस्तच प्रतिसाद..खीखी
गुन्हा घडतो तेव्हा जनकसिंगचे वडील हयात असतात. मग हवेलीत मिस्त्रीला का बोलावलं आहेस हे ते विचारत नाहीत का? >>
जनकसिंगचे वडिल कुठेतरी जाणार असतात.. ते गेल्यावर मग मिस्त्री येतो..
कुणाच्या हवेलीत असे कपडे काढून अंग सुकवणारी अन गाद्यांवर लोळणारी पोरगी काय येडी आहे अस वाटलेल मला त्या पारोला बघुन..
कुणाच्या हवेलीत असे कपडे
कुणाच्या हवेलीत असे कपडे काढून अंग सुकवणारी अन गाद्यांवर लोळणारी पोरगी काय येडी आहे अस वाटलेल मला त्या पारोला बघुन..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
>>
ते तुमच्या साठी नव्हतं , पुरुष प्रेक्षकांसाठी होतं.....
"प्रिया राजवंश ला कोण द्यायचं
"प्रिया राजवंश ला कोण द्यायचं रोल? आणि का?" - चेतन आनंद. का? - गेस?? बिंगो - प्यार अंधा होता है.
{{{ लंडनच्या प्रसिद्ध RADA
{{{ लंडनच्या प्रसिद्ध RADA मध्ये प्रवेश घेतलेली प्रिया राजवंश असा ठोकळ्यासारखा अभिनय कसा करू शकते ते मला काही केल्या समजत नाही. }}}
तिथे प्रवेश घेतल्यावर या चार अक्षरांचा मराठी उच्चारानुसार अर्थ आपल्या अभिनयात ती ओतायची.
प्रिया राज वंश म्हणजे कच्ची
प्रिया राज वंश म्हणजे कच्ची तळलेली मैद्याच्या पारीची करंजी. फिकट सपाट चेहरा. पण पंजाब्यांना असल्याच डंब सोहणी कुडी वाटतात.
हमे तुमसे प्यार कितना किशोरचे गाणे फार आवडते ह्या पलिकडे ह्या पिक्चरशी काही कनेक्षन जमले नाही. तेव्हा अश्या पद्धतीने कंपोज केलेले पहिलेच गाणे होते ते. ह्या बरोबरच मेरे संग संग आया ते री यादों का मेला हे पण राजेश हेमा का धरम हेमा चे गाणे आहे तो तिच्या घरून जेवुन निघतो घोड्यावर व गाणे गातो ते. तो पिक्चर कोनता आठवत नाही. पण दोन्ही गाणी आवळी जावळी गोड आहेत.
हेमा विशीची दिसत नाही.
मी अॅक्चुअली १९८६ मध्ये सिमला चंदिग ड कुफ्री गेलेली आहे. मस्त जागा होती तेव्हा. माल रोड वर गर्दी नसे. मी तिथे तीन प्लेट पाणीपुरी खाल्ली(एका वेळी!!! जब हम जवां थे) ह्या पलिकडे काही आठवत नाही आता. बाकी पहाडांचे काहीही प्रेम नाही मला. असल्या सर्व कथा गोव्यात का नाही घडत?! माझा गोव्यात पुनर्जनम झाला तर मी " अरे यार पिछले जनम में वो कोलवा में मस्त प्रॉन्स खाया था चलो अब भी है क्या देखते है म्हणेन. प्रायोरिटी अगदी क्लीअर कधीपण.
हमे तुमसे लेडीज व्हरजन उगीच वाटते.
मेरे संग संग आया ते री यादों
मेरे संग संग आया ते री यादों का मेला = राजेश + हेमा >>> राजपुत सिनेमातले आहे हे गाणे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
बाबा कामदेव, भरत मस्त माहिती
बाबा कामदेव, भरत मस्त माहिती
ललिता-प्रीति, मलाही तो 'यहा तो मै पहले आ चुकी हू' सीन भारी आवडतो. हेमा आईवडीलांबरोबर मॉलरोडला जायला निघते तेव्हा त्यांच्यातला संवादही मस्त आहे. कुठल्याही नॉर्मल कुटुंबात होईल तसा. मला गाजर का हलवा-मूलीके पराठे टाईप्स आया कधीच पटल्या नाहीत. तसे ह्यातले बरेचसे सीन्स आवडतात. उदा. चंद्रमुखीला माधोचं घर मिळतो तो. आणि शेवटचा कोर्टातला जेव्हा बाहेर पडलेला जनकसिंग चंद्रमुखीला बघून आकाशाकडे पाहतो तोही मला भारी वाटतो नेहमी. विनोद खन्नाचं खूप वाईट वाटतं. मोहनपेक्षा तोच चंद्रमुखीवर जास्त प्रेम करत असतो असं वाटतं.
किल्ली, गुगु धन्स
टीना, हो तसंच असेल ते मिस्त्रीबाबतचं.
विनिता.झक्कास बरोबर. राजपुतच तो पिक्चर. त्यातही कलाकारांची बरीच गर्दी होती. मला वाटतं विनोद खन्नापण होता त्यात आणि रंजीता.
बाकी मी जन्माने आणि कर्माने पक्की मुंबईकर असले आणि गेल्या सात पिढ्यात कोणीही उत्तरेकडे राहिले नसले तरी उत्तरेच्या हिल स्टेशन्सचं आणि बर्फाच्छादित पहाडांचं जाम आकर्षण आहे. ते मागच्या जन्मातलं असावं अशी मी मनाची समजूत घातलेय.
धरमशालाला हॉटेलच्या बाल्कनीतून दिसणारे पहाड पाहून मस्त वाटलं होतं. मुंबैला येऊच नये असे विचार येत होते. ![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
सर्वांचे प्रतिसादाबद्दल आभार!!!
आणि शेवटचा कोर्टातला जेव्हा
आणि शेवटचा कोर्टातला जेव्हा बाहेर पडलेला जनकसिंग चंद्रमुखीला बघून आकाशाकडे पाहतो तोही मला भारी वाटतो नेहमी. >> त्याचा अभिनय बराच चांगला वाटतो हं त्याची पोरगी, हेमा अन राजेश खन्नापेक्षा (मी रा ख फॅन असुनही.. हालाकी मी राकुचीपन डाय हार्ड फॅन आहे
)..
हमे तुमसे प्यार कितना किशोरचे
हमे तुमसे प्यार कितना किशोरचे गाणे फार आवडते ह्या पलिकडे ह्या पिक्चरशी काही कनेक्षन जमले नाही. तेव्हा अश्या पद्धतीने कंपोज केलेले पहिलेच गाणे होते ते.>> म्हणजे? मला यामागची स्टोरी नाही माहिती. थोड खुलवून लिहि ना.. कुठेतरी काहीतरी वाचल्यासारख आठ्वतय पण धुसर..
पण मी म्हणते असेल काही
पण मी म्हणते असेल काही आधीच्या जन्माचं कनेक्शन. ते आठवत पण असेल ह्या जन्मात. आधीच्या जन्मातला पार्टनर पण भेटलाच असेल अचानक.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
तरी ह्या जन्मातही तोच पार्टनर व्हायला हवा असं का बरं? अगदी डॉ.विनोद खन्ना सोडुन फक्त पुर्वीच्या जन्मातला प्रेमी आहे म्हणुन राजेश खन्नाच हवा असं का? त्याच तर प्रेमही नाहीये ह्या जन्मात तिच्यावर.
उगीच काहीतरी आठवतंय म्हणुन ह्याही जन्मात दोघांनी जोडी जमवलीच पाहिजे असं काही जरुरी नव्हतं.
हो बाबा आठवतोय मला पुजन्म. त्यात तु होतास. अशी त्रॅजेडी होती. कोर्ट केस खटला निकाल. ओके. ह्या जन्मात मी माझ्या रस्त्याअने जायला मोकळी तु तुझ्या रस्त्याने जायला मोकळा. असा आहे का सिनेमा कुठला?
कैच्याकै लिहिलंय माहित आहे मला
{{{ तरी ह्या जन्मातही तोच
{{{ तरी ह्या जन्मातही तोच पार्टनर व्हायला हवा असं का बरं? अगदी डॉ.विनोद खन्ना सोडुन फक्त पुर्वीच्या जन्मातला प्रेमी आहे म्हणुन राजेश खन्नाच हवा असं का? त्याच तर प्रेमही नाहीये ह्या जन्मात तिच्यावर.
उगीच काहीतरी आठवतंय म्हणुन ह्याही जन्मात दोघांनी जोडी जमवलीच पाहिजे असं काही जरुरी नव्हतं. }}}
मागच्या जन्मीची उत्कट इच्छा अपूर्ण राहिली म्हणून तर पुनर्जन्म घेतात ना? आता तीच पुर्ण झाली नाही याही जन्मी तर मग पुन्हा पुनर्जन्म घ्यायचा का? तुम्हाला राजेश + हेमाची तिसरी जोडी पाहावी लागली असती अशाने.
चंद्रशेखर गाडगीळ आणी रश्मी
चंद्रशेखर गाडगीळ आणी रश्मी गाडगीळ हे कपल ऑर्केस्ट्रा मध्ये गात होते. माझ्या लहानपणी मी, रश्मी गाडगीळ च्या ऑर्केस्ट्राच्या बर्याच वेळा जाहीराती बघीतल्या होत्या. काही काळाने हे कपल विभक्त झाले म्हणतात. एक किस्सा खुद्द गाडगीळ यांच्या मुलाखतीत सकाळ की लोकसत्ता मध्ये मध्यंतरी वाचला होता. एका चित्रपटात चंद्रशेखर यांनी एक गाणे गायले. नंतर तेच गाणे मोहम्मद रफी साहेब यांच्या आवाजात चित्रीत होणार होते. जेव्हा रफी साहेबांनी, गाडगीळांनी म्हणलेले गाणे ऐकले तेव्हा त्यांना भेटायला बोलावले, व कौतुक केले. नंतर विनम्र पणे स्वतः ते गाणे परत गायला नकार दिला. ते गाणे चंद्रशेखर यांच्याच आवाजात सिनेमात ठेवा असे सांगीतले. किती मोठ्या मनाचे होते रफीसाहेब. चंद्रशेखर गाडगीळ व्यसनांच्या आहारी गेले होते म्हणतात, खरे खोटे देव जाणे !!
https://www.saregama.com
https://www.saregama.com/artist/chandrashekhar-gadgil_1619/songs
मागच्या जन्मीची उत्कट इच्छा
मागच्या जन्मीची उत्कट इच्छा अपूर्ण राहिली म्हणून तर पुनर्जन्म घेतात ना?>>> असेल ब्वा.
पण ह्यात राजेश खन्नाची तर उत्कट इच्छा दिसत नाही काही. केवळ एकाच्या उत्कट इच्छेमुळे दुसर्यावर जबर्दस्ती का?
हा चित्रपट केव्हातरी बघितला
हा चित्रपट केव्हातरी बघितला होता.
ट्रेन मध्ये जेव्हा चंद्रमुखीचे म्हातारे आईवडील म्हणतात मुलीच्या अग्रहाखातर सिमल्याला आलो तेव्हा वाटतं की चंद्रमुखी किमान चाळीशीतली तरी असावी. आणि ती कॅमेरा समोर येते तेव्हा वाटतं आपलं बरोबर आहे, हिची मुलगी सिमल्याला शिकायला असेल तिला भेटायला आई, आजी आजोबा जात असावेत. पण नंतर कळतं की हिचं लग्न व्हायचंय. पुढे कळतं की चाळीशी ओलांडलेल्या राजेश खन्नाचं पण लग्न व्हायचंय.
अशा चित्रपटांवरून लक्षात येतं की त्याकाळी शिक्षण आणि लग्न किती उशिरा होत असत, बालविवाह वगैरे नुसत्या अफवा होत्या.
हा भाग वगळला तरीही हा चित्रपट मला आवडला नव्हता.
परीक्षण मस्त लिहिलेय.
परीक्षण मस्त लिहिलेय.
80 च्या दशकात कॉलेज, शिक्षण, नोकरी वगैरे भानगडीमुळे माझा टिव्हीशी संपर्क तुटत गेला व त्यामुळे त्या दशकातील कित्येक चित्रपट मी पाहिले नाही. लाम्बकेशा राजेश तसाही बिग नो नो. तरीही इथले वाचून मी पर्वा चित्रपट पाहिला. नव्या जागी फिरायला गेल्यागेल्या लेकीला असला त्रास सुरू झाला असता तर माझी पहिली प्रतिक्रिया लेकिसकट तिथून पोबारा करणे हे असली असती. पण असो.
विनोद खन्ना चित्रपटातील एकमेव लग्नायोग्य माणूस असूनही त्याला डावलले गेल्याचे दुःख त्याच्यासोबत आपल्यालाही होत राहते. राजेश व हेमा, टीनेज पोरांना घेऊन हिलस्टेशन फिरायला आलेल्या पालकांसारखे दिसतात. आधीच्या जन्मातील राजेश सोंग काढून आल्यासारखा वाटतो या मताशी प्रचंड सहमत. 1945 मध्ये दुर्गम खेड्यात असे घोडनवरे/नवऱ्या असायच्या यावर विश्वास ठेवणे कठीण जाते.
प्रिया राजवंश अधून मधून तिच्या RADA पदवीला जागायचा प्रयत्न करते पण ते तेवढेच. तसेही RADA सीलॅबसमध्ये भारतीय सिनेमात केला जाणारा अभिनय शिकवत नसणार, त्याच्यामुळे मख्ख चेहरा ठेऊन वावरल्याचा दोष तिच्याकडे जात नाही.
अरुणा इराणीला अजून चांगले रोल्स मिळायला हवे होते याच्याशीही सहमत. तिने दोन्ही भूमिका समजून केल्यात.
बाकी इतर अ व आ बाबींबद्दल बोलून उपयोग नाही. हिंदी चित्रपटांत इतके तर चालतेच.
पण ह्यात राजेश खन्नाची तर उत्कट इच्छा दिसत नाही काही. केवळ एकाच्या उत्कट इच्छेमुळे दुसर्यावर जबर्दस्ती का?>>>>>
त्याला प्रिया व हेमा असे दोनच चॉईस असतात. उपकाराच्या ओझ्याखाली आधी प्रियाला हो म्हणतो पण हेमा स्वतःहून गळ्यात पडायला लागल्यावर तो शाना बनून हेमाला निवडतो. हेमाला स्वतःचा काही चॉईस नसतोच. विनोद समोर आल्यावर त्याच्या गळ्यात पडते. मग आदल्या जन्मी राजेशबरोबर कसमे वादे केले असल्याचे लक्षात आल्यावर त्याला सोडून राजेशच्या गळ्यात पडते. त्या आधीचा जन्मही आठवला असता तर पंचाईत झाली असती बापडीची.
तुम्ही इतके छान लिहिता
तुम्ही इतके छान लिहिता स्वप्ना की हे भिकार दर्जा चित्रपट पण छान वाटतात. तुमची परीक्षणे वाचून मी एक दोन चित्रपट बघायला सुरुवात केली होती पण मग नंतर बंद करून तुमचे लेखच वाचले स्पोईलर सह.
खरच छान लिहिता !!
मेहबूबा वर लिहील्यानंतर तू हा
मेहबूबा वर लिहील्यानंतर तू हा चित्रपट घेशील अस वाटलं नव्हतं.
मी थिएटर मध्ये पाहीला होता. आई कधीतरी अचानक सिनेमाला नेऊन आश्चर्यचकीत करायची.
मी प्रोजेक्टर रूमध्ये जाऊन स्टूलावर उभ राहून तो खिडकीतून जाणारा फोकस ती रीळं वगैरे पाहील होतं ते याच सिनेमाच्यावेळी.
सिनेमासंपल्यावर आई पुष्पा मावशीबरोबर बोलत होती. भैरवी आधिच कशी घेतली वगैरे. मी आणि ताई अगदीच लहान होतो त्यामुळे क्लासिकल मधलं काही कळत नव्हतं. आईने हमे तुमसे प्यार कितना बद्दल विचारलं. किशोर कुमारच गाणं कानावर सतत पडत होतं तरीही आम्ही दोघेही बोललो अरूणा ईराणीच गाण आवडलं. मावशी म्हणाली "पोरांचे कान तयार झालेत हं."
मी बरेचदा परवीन सुल्तानाच गाण ऐकतो. तिच ते "भुल गए सैयांsss" निवळ्ळ कातिलाना .
अरूणा ईराणी काय ताकदीची अभिनेत्री आहे हे या गाण्यात कळतं. कधी क्लासिकल शिकली नसेल पण तुकडा performance.
सस्मित अनुमोदन.
सस्मित अनुमोदन.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
रश्मी.. छान माहिती. धन्यवाद!
साधना, मला वाटतं त्या ठिकाणाहून निघून जाऊन काही फायदा होणार नाही. जर पूर्वजन्म असलाच आणि त्यातलं काही आठवायला लागलंच तर ते आठवत रहाणार ना. मग तुम्ही तिथे असा वा नसा. त्यापेक्षा तिथे राहून एकदाच काय तो सोक्षमोक्ष लावलेला बरा नाही का? विनोद खन्नाचं जाम वाईट वाटलं मलाही. राजेश खन्नापेक्षा तोच बरा दिसलाय. पण राजेशला शेवटी जनकसिंगची सगळी प्रॉपर्टी मिळते की
भारतीय सिनेमात केला जाणारा अभिनय म्हणजे काय ते मात्र कळलं नाही. बाकी लोकांनी RADA न जाताही चांगला अभिनय केलाय की.
च्रप्स
मला अहो, जाहो करू नका प्लीज. इथे सगळे एकेरीत हाक मारतात मला. कशाला वाढत्या वयाची आठवण करून देताय? ![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
गुगु, हा माझ्या आवडत्या चित्रपटातला एक आहे रे. लेखात म्हटल्याप्रमाणे पुनर्जन्माचं जबरदस्त आकर्षण आहे मला. सो एक मुव्हीसे मेरा क्या होगा? ऋषी कपूरच्या कर्जवरही लिहिणार आहे.
बाकी क्लासिकल म्युझिकमधलं काही कळत नसल्याने तुझा बाकीचा प्रतिसाद बंपर गेला मला.
अग सुरवातीला 2 रात्री सलग ती
अग सुरवातीला 2 रात्री सलग ती झोपेतून किंचाळून उठते ना, मी त्या दुसऱ्या रात्रीनंतर गाशा गुंडाळला असता, जागाच बाधित आहे असे ठरवून.
.
दुसऱ्या रात्रीनंतर विनोद तिला हिप्नॉटाईज करायचा निर्णय घेतो व त्या दरम्यान ती आधीच्या जन्मात गेल्यावर त्याना कळते ना की हे लफडे आधीच्या जन्मातील आहे.
प्रिया राजवंशचे या चित्रपटातील काही सीन्स पाहून तिला अभिनयाची जाण आहे असे वाटते. काही सीन्स अज्जिबात जमले नाहीत पण जे जमलेत ते चांगले जमलेत. कोर्टातले सीन्स व शेवटचे हवेलीतील प्रसंग खूप चांगले केलेत, राजेश सोबत सुरवातीचे प्रसंग अगदीच सो सो झालेत. सो,मेबी तिला जिथे इतर लाऊड अभिनय करतात ते प्रकरण झेपत नसेल. हेमा व राजेशचे आधीच्या जन्मातील बहुतेक सगळे सीन्स लाऊड, संत्रे सोलल्यासारखे आहेत.
साधना मी पहिल्यांदा प्रिया
साधना मी पहिल्यांदा प्रिया राजवंश पाहिली ती हीर रांझात . यात चेतन आनन्द ने नवीन प्रयोग केला होता . सगळे डायलॉग लिरिकल आहेत. ते कृत्रिम वाटतात. त्यामुळे ते नीट डिलिव्हर न करता आल्याने प्रिया जास्तच मठ्ठ वाटली.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
नंतर तिचे काही सीनेमे आले ते यथतथाच होते नन्तर मला जाणवले एव्ढीही प्रिया डंब नव्हती . काही डेलिकसी होती तिच्यात . चेतन आनदने अगदीच कोरड्या विहिरीत जीव दिला नव्ह्ता
पण प्रियाचा शेवट फारच दुर्दैवी झाला आणि खुनी सुटले ते सुटलेच...
तिचे दिसणे यथातथा व
तिचे दिसणे यथातथा व शब्दोच्चार परदेशी. कदाचित दिसायला सुंदर असेलही पण फोटोजिनिक नसेल.
हंसते जख्मचा चुथडा केला तिने. 'आज सोचा तो आंसू भर आये' गाण्यात तिला पाहताना आपले आंसू भरून येतात. याची फ्रेम बाय फ्रेम कॉपी असलेल्या चित्रपटात तिच्या जागी सोनमने जे काही केलेय ते तुलनेत प्रचंड उच्च वाटते.
पण असे असतानाही कुद्रत मध्ये तिचे कोर्टसीन्स राजेश पेक्षा चांगले झालेत.
Pages