पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त – २३. अ‍ॅन इव्हिनिंग इन पॅरीस (१९६७)

Submitted by स्वप्ना_राज on 4 November, 2018 - 03:46

index_1.jpg

१९९५ साली आलेल्या ‘हमसे है मुकाबला' नावाच्या अद्वितीय चित्रपटातल्या 'उर्वशी उर्वशी' ह्या तेव्ह्ढ्याच अद्वितीय गाण्यात काही अजरामर शब्द आहेत. ते येणेप्रमाणे - बीसकी उमरका जो है खेल साठमे खेलके होगा क्या? आता तुम्ही म्हणाल की ह्या शब्दांचा आणि शीर्षकातल्या चित्रपटाचा काय संबंध? सांगते. आता रुढार्थाने माझं वय साठ नसलं तरी गद्धेपंचविशीच्या आत पाहायचा रोमँटिक चित्रपट गद्धेपंचविशी उलटून बरीच वर्षं झाल्यावर पाहिला की जी रिअ‍ॅक्शन होईल तीच माझी हा चित्रपट पाहून झालेली आहे. त्यामुळे अजून तुम्ही गद्धेपंचविशीच्या अलीकडेच असाल तर कृपा करून हा लेख पुढे वाचू नका.

ह्या ठेचा बसायला चित्रपटाच्या अगदी पहिल्या क्षणापासूनच सुरुवात झाली असं म्हणायला काही हरकत नाही. आता हेच बघा ना. चित्रपटाची नायिका दीपा मलिक एयर इंडियाच्या फ्लाईटमध्ये बसून दिल्लीवरून पॅरीसला चाललेय. तुम्ही म्हणाल ठीक आहे, ह्यात ठेच बसण्यासारखं काय आहे? थांबा. आधी ती का चाललीय ते तर ऐकून घ्या. तर म्हणे वय वर्षं उणीपुरी २३ ची ही श्रीमंत तरुणी आजवर ३ वेळा प्रेमात पडूनही तिला खरं प्रेम काही मिळालं नाही. ते मिळवायला ती फ्रांसच्या राजधानीला चालली आहे. आं? हे म्हणजे पिझ्झा हट, डॉमिनोज, स्मोकिंग जोज कोणाचाच पिझ्झा आवडला नाही म्हणून थेट इटली गाठण्यासारखं आहे. जावो बापडी. पैसे तिचे (किंवा तिच्या बापाचे!). घेऊन जाणार एयर इंडिया (व्हिसा कसा मिळाला काय माहित पण दिला असेल फ्रेंचांनी). आपण कशाला डोळे फोडून घ्या. असं म्हणून पुढे पाहायला सुरुवात केली. पण तरी ३ वेळा पडून धडपडून पुन्हा नव्याने डाव मांडायची चिकाटी आणि विजिगिषु का काय म्हणतात ती वृत्ती दोन्हीचं कौतुक वाटलं हो. नाहीतर इथे आम्ही. एकदा नाही जमलं बटर चिकन घरी करायला म्हणून लगेच हॉटेलातून मागवायला लागतो. पॅरीसला एयरपोर्टवर तिला उतरवून घ्यायला दोन लोक हजर असतात - एक बघताक्षणी 'हा मॅनेजर' हे डायपर लावलेलं पोरही ओळखेल असा दिसणारा, तिचा पॅरिसमधला बिझनेस सांभाळणारा मॅनेजर दामोदर दयाल आणि दुसरा ज्याचा फक्त आणि फक्त कॉमिक रिलीफसाठीच उपेग होऊ शकेल असा ड्रायव्हर मख्खन सिंग. मॅनेजर अंकल दीपाला तिच्यासाठी घेऊन ठेवलेल्या फ्लॅटमध्ये ड्रॉप करतात. तिथे तिला सोबत म्हणून पॅरीसमध्ये शिकणारी एक भारतीय तरुणी हनी आणलेली असते. ह्या हनीला नंतर पूर्ण चित्रपटभर मी एकदाही पुस्तक उघडून बसताना किंवा कॉलेजमध्ये जाताना पाहिलं नाही. काय शिकत असते आणि कुठे शिकत असते देव जाणे. बहुतेक प्रोफेसर्स टेलीपथीने शिकवत असावेत. तर असो.

दीपाला आतापर्यंत भेटलेले सर्व भारतीय नरपुंगव केवळ तिच्या संपत्तीकडे पाहून तिच्यापुढे हांजी हांजी करत होते ही दर्दनाक कहाणी ऐकून हनीचं हृदय पिळवटून उठतं आणि ती दीपाला 'तू आता इथे एका गरीब तरुणीचा वेष करून फिर. म्हणजे तुझ्या पैश्यासाठी कोणी तुझ्या मागे लागणार नाही' असा मौलिक सल्ला देते. आता मला सांगा पॅरीसमध्ये राहत असताना फ्रेंच गरीब तरुणीचा वेष करायला हवा की नको? पण आपल्या दीपाबाई थेट 'बीस साल बाद' मधली वहिदा किंवा 'हिमालयकी गोदमे' मधली माला सिन्हा जे कपडे घालून फिरतात तसले कपडे घालून पॅरीसच्या गल्लीबोळातून फिरू लागतात. समस्त फ्रेंच जनता त्यांचा तो प्रसिद्ध baguetteआणि वाईन दोन्ही विसरून 'मान वेळावुनी' ही देसी गावकी गोरी पाहत राहते.

हा 'वेश बावळा' करण्याआधी दीपा आपले यच्चयावत दागिने तिजोरीत ठेवायला दयाल अंकलकडे देते. पण हाय रे दैवा! 'सूर्यापोटी शनैश्वर' ह्या न्यायाने सालस, प्रामाणिक, सचोटीचा वगैरे असलेल्या दयालचा मुलगा शेखर मात्र निखालस वाह्यात असतो. तो ते दागिने तिजोरीत ठेवताना नेमका बघतो आणि बापाकडे लगेच दोन लाख रुपयांची मागणी करतो. हे पैसे त्याला जुगारात हरल्यामुळे द्यायचे असतात. तो अट्टल दारुडा, लंपट वगैरे असतो हे वेगळं सांगायला नकोच.

इथे पॅरीसच्या रस्त्यातून फिरणाऱ्या दीपाला लुई नावाचा कोणी फ्रेंच माणूस भेटतो. आणि त्याच्या ओळखीतून पुढे भेटतो सॅम. दीपाला भारतीय पुरूषांविषयी फारसं ममत्त्व नसल्याचं ध्यानी येताच तो आपण फ्रेंच असून पॅरीसमध्ये २० वर्षं राहत असल्याची बतावणी करतो. दीपा त्याला सांगते की मी गरीब बिचारी मोलकरीण आहे आणि मालकिणीसोबत इथे आलेय. पण हे सांगताना तिने अतिमॉडर्न ड्रेस घातलेला असल्याने सॅम तीच मालकीण आहे हे बरोबर ओळखतो. एव्हाना तो मुंबईतल्या जागोजागी उखडलेल्या फुटपाथवरून पडावं तश्या सहजतेने तिच्या प्रेमात पडलेला असतो. फक्त तो नायक असल्याने आपण त्याचं प्रेम सच्चं आहे हे समजून घ्यायचं. दीपाबाई काही त्याला दाद देत नाहीत आणि लवकरच पॅरीसमध्ये बोअर होतात. मॅनेजर सुचवतो की बिझनेसमध्ये लक्ष घाल तर म्हणतात की मला बिझनेस करून पैसे कमवायचे नाहीत तर काही सोशल वर्क करायचं आहे. आता बघा. बिझनेसमधून पैसे आले नाहीत तर ह्या बाईला सोशल वर्क करायची चैन परवडेल का? पण मॅनेजर डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवून असतो. तो लगेच स्वित्झर्लंडला असलेल्या युथ फेस्टिव्हलमध्ये रेड क्रॉस सोबत तिची नर्स म्हणून जायची व्यवस्था करतो. आता युथ फेस्टिव्हलमध्ये रेड क्रॉस काय करत असतं? दीपाला स्वित्झर्लंडचा व्हिसा लगेच कसा मिळतो? नर्सिंगचा काडीचा अनुभव नसताना रेड क्रॉस तिला कसं आपल्यासोबत नेतं? असे अनेक प्रश्न मला पडले. तरी 'आगे आगे देखते है होता है क्या' म्हणून मी पाहत राहिले. दीपासोबत मख्खनसिंग आणि हनीसुध्दा स्वित्झर्लंडला जातात. शेखरही येतो. पाठोपाठ हनीने दीपा तिथे असल्याची माहिती दिल्याने सॅमही येऊन पोचतो. मेट्रोचं काम सुरू होण्यापूर्वी शिवाजीपार्क वरून रानडे रोडला जाता यायचं तेव्ह्ढ्या सहजतेने खर्चाचा काहीएक विचार न करता ही सगळी मंडळी युरोपभर बागडताना पाहून माझा उर भरून आला. गेले ते दिन गेले!

स्वित्झर्लंडमध्ये शेखर आणि सॅमचं दीपावरून वाजतं. दोघेही एकमेकांना 'दीपापासून दूर राहा' असं बजावतात. दीपा शेखरला महत्त्व देते आणि सॅमकडे दुर्लक्ष करते. ही संधी साधून एक दिवस शेखर दीपाला दारू पाजून तिच्यावर अतिप्रसंग करायचा प्रयत्न करतो पण ऐनवेळी मख्खनसिंग आणि सॅम तिला वाचवतात. तेव्हा तिला सॅमच्या खर्‍या पवित्र प्रेमाची महती वगैरे कळते. इकडे शेखर ज्याचं देणं लागत असतो तो जॅक नावाचा खतरनाक गँगस्टर पैश्यासाठी त्याच्यामागे तगादा लावत असतो म्हणून शेखर त्याला आपलं एका श्रीमंत मुलीशी लग्न होणार आहे असं सांगतो. जेव्हा तो जॅकला दीपा दाखवतो तेव्हा जॅक हैराण होतो कारण दीपा हुबेहूब त्याच्या कॅसिनोमधल्या डान्सर सुझीसारखी दिसत असते. ह्या डान्सर बायांची नावं मोना, सुझी, रिटा, रोझी अशीच का असतात काय माहित? एकाही बाईचं नाव शांती, कुमुद किंवा सुधा असल्याचं पाहिलंय कोणी कधी? Uhoh पुन्हा असो. दीपाला पाहून जॅक तिचं अपहरण करून तिच्या बापाकडून खंडणी उकळायचं ठरवतो. पण त्याच्यापेक्षा अधिक सुपीक डोकं लाभलेला शेखर सुझीला पटवून दीपाचं अपहरण झालं की तिच्या जागी दीपा म्हणून जायची आयडिया तिच्या गळी उतरवण्यात यशस्वी होतो. ह्या बदल्यात १० लाख डॉलर्समधले अर्धे सुझीला द्यायचं तो कबूल करतो. हलवायाच्या घरावर तु़ळशीपत्र!

ही झाली ह्या चित्रपटाची कथा. आता दीपासारखी दिसणारी ही सुझी कोण असते? तिचा आणि शेखरचा डाव यशस्वी होतो का? सॅम आणि दीपाला त्यांचं प्रेम मिळतं का? एकही हिंदी चित्रपट न पाहिलेला एखादा एलियनच ह्या प्रश्नांची उत्तरं मिळवायला पुढला चित्रपट पाहू शकतो. तुम्ही भारतीय असल्याने सर्व उत्तरं तुम्हाला माहित असणार. त्यामुळे तुम्ही ह्या भानगडीत पडू नका.

ह्या चित्रपटाची गाणी एव्हढी प्रसिध्द आहेत की निदान नायक-नायिका तरी कोण आहेत हे सांगायची खरं तर गरज नाही. But for the sake of completeness, सॅमची भूमिका शम्मी कपूरने अदा केली आहे. मी शम्मीची फॅन नाही. दीपा झालेल्या शर्मिला टागोरच्या मानाने तो खूप मोठा दिसतो. तसंच त्याच्या जरा स्थूलतेकडे झुकणाऱ्या अंगकाठीमुळे रोमँटिक चित्रपटाचा नायक म्हणून जी एक साचेबध्द प्रतिमा असते त्यात तो बसत नाही. मात्र अभिनयाच्या बाबतीत तो कुठेही कमी पडत नाही. त्याच्या करियरच्या सुरुवातीच्या चित्रपटांमध्ये होती तशी सडपातळ शरीरयष्टी त्याने कायम ठेवली असती तर तो रोमँटिक नायक म्हणून अधिक उठून दिसला असता हेमावैम. दीपा/सुझी झालेल्या शर्मिलाने आपली नाटकी अभिनयाची उज्ज्वल परंपरा इथेही कायम ठेवली आहे. मध्यंतरी सैफ अली खानने मी अभिनयातल्या सर्व बेसिक गोष्टी आईकडून शिकलो असं म्हटल्याचं वाचनात आलं तेव्हा 'म्हणजे काय रे भाऊ' असं अपार करुणेने विचारावंसं वाटलं होतं. प्राणने शेखरची भूमिका वठवली आहे. त्याला तो भयाण सोनेरी केसांचा विग का दिलाय कोण जाणे. त्याच्या वडिलांकडे (डेव्हिड) पाहता त्यांनी कोणी फ्रेंच बायको केली असल्याची शक्यता जवळपास शून्य भरते. कदाचित हा लहानपणी डोक्यावर पडताना त्याचं डोकं सोनेरी रंगाच्या डब्यात गेलं असावं एव्हढं एकमात्र संयुक्तिक (!) कारण निदान मला तरी दिसलं. ज्येष्ठ अभिनेते के. एन. सिंग ह्यांच्या वाट्याला जॅकची छोटी भूमिका आलेली आहे. हे दोन व्हिलन कमी म्हणून की काय शेट्टीलासुध्दा जग्गू म्हणून आणलंय. मख्खन सिंग झालाय अर्थात राजेंद्रनाथ. प्रेमनाथचा भाऊ असूनही ह्या अभिनेत्याला किमान धड चरित्रभूमिकाही कधीच का मिळाल्या नाहीत हे कोडं मला आजतागायत उलगडलेलं नाहीये.

चित्रपटात एकूण ९ गाणी आहेत. पैकी टायटल साँगसहित अकेले अकेले कहां जा रहे हो, रातके हमसफर, आणि दिवानेका नाम तो पूछो ही माझ्या खास आवडीची आहेत. ‘आसमानसे आया फरिश्ता' ऐकायला छान वाटलं तरी मला अजिबात बघवत नाही. बाथरोबसारख्या ड्रेसमध्ये स्वत:ला गुंडाळून घेऊन हेलिकॉप्टरला लटकलेल्या शम्मीकडे शर्मिलाने जमिनीवरून मान वर करून अजिबात पाहू नये असंच सारखं वाटत राहतं. Happy बिकिनी घालायचा ट्रेंड शर्मिलाने भारतीय चित्रपटात ह्या गाण्यातून सुरु केला आणि त्यामुळे ती हिंदी चित्रपटसृष्टीतल्या 10 hottest actresses मधली एक गणली जाऊ लागली असं विकीपिडिया सांगतो. मला न आवडलेल्या बाकीच्या चार गाण्यात किनरया आवाजाच्या शारदाने म्हटलेलं 'ले जा ले जा' हेसुद्धा आहे. ९ पैकी ६ गाणी मोहम्मद रफीची सोलो आहेत हे विशेष.

राहता राहिल्या चित्रपटातल्या कैच्या कै गोष्टी. कुठून सुरुवात करू? चेहरे ‘हुबहू' जुळण्याची एव्हढी महान परंपरा हिंदी चित्रपटात आहे की कुंभमेळा म्हटला की नाशिक, साधू, पवित्र स्नान, आखाडा ह्यापैकी काहीही न आठवता आधी 'मेलेमे बिछडे हुये भाई किंवा बहने' आठवतात. अर्थात इथे अगदी कुंभमेळा नसला तरी बाकीचा संदर्भ जवळपास तोच आहे. दीपाचे वडील हयात आहेत हे ते शेखरने आपलं दीपाशी लग्न ठरतंय हे कळवल्यावर अचानक पॅरीसमध्ये येऊन थडकतात तेव्हा आपल्याला कळतं. इथे माझी प्रतिक्रिया थोडीशी सिंड्रेला नामक कुत्री अजून जिवंत आहे हे कळल्यावर पुलं.ची झाली तशी झाली - ‘आहे?’. बाकी लाखांच्या डॉलर्सची खंडणी चुटकीसरशी अ‍ॅरेंज करता येईल एव्हढा पैसा देणारा नक्की कोणता बिझनेस ते करतात ह्याचा मात्र शेवटपर्यंत आपल्याला थांगपत्ता लागत नाही. तसं पाहायला गेलं तर सॅमसुध्दा उदरनिर्वाहासाठी काय करतो असतो तेही पुरेसं स्पष्ट झालेलं नाही. पण ही चिंता आपल्यासारख्या सामान्यांना असते. चित्रपटाचे पटकथालेखक, दिग्दर्शक वगैरे निवांत असतात. आपादमस्तक १००% 'देसी' दिसणाऱ्या सॅमला दीपा फ्रेंच का समजते हेही आपल्याला कळत नाही. तो देसी आहे पण २० वर्ष फ्रांसमध्ये आहे म्हणून तो nationality ने फ्रेंच हे गृहीत धरलं तरी त्यामुळे तो बाकी भारतीय तरुणांपेक्षा वेगळा कसा ठरतो? Uhoh

ही सर्व जनता पॅरीसमध्ये सुखेनैव नांदत असताना जॅक दीपाच्या वडिलांना खंडणी घेऊन थेट नायगारा फॉल्सला का बोलावतो ते तोच जाणे. आपल्याला तो युरोपातला सगळ्यात खतरनाक गँगस्टर असल्याचं सांगितलं जातं. पण तो एव्हढा माठ दाखवलाय की सुझी आणि दीपाची अदलाबदल करून जन्मभर ऐश करायची कल्पना आपल्याला सुचते पण त्याला अजिबात सुचत नाही. वेडपट दीपाचं अपहरण करून खंडणी मागत बसतो. दैव देतं आणि कर्म नेतं ते असं. महत्त्वाकांक्षा म्हणून कशी ती नाहीच. त्यातून त्याचा तो अड्डा काय वर्णावा म्हाराजा! भिंती कमी, दरवाजे जास्त. कुठे दिवा फिरवला की दरवाजा उघडतो. कुठे टेबलाच्या खणात टेलिफोन ठेवलेला. तर कुठून रामसेच्या चित्रपटांत रात्री भयाण हवेल्यांत अचानक निघतो तसा धूर निघत असलेला. इथे तो मयसभा बनवणारा मय पण भांबावला असता. सिगारेटी फुंकणारे, अड्ड्यातल्या अड्ड्यात हॅट्स घालून फिरणारे, बॉसला 'बॉस' अशीच हाक मारणारे असंख्य चमचे दहा दरवाज्यांतून कडेकोट बंदोबस्तातून शेखरला नेतात आणि एकदाही त्याची बॅग तपासत नाहीत. शेखरने बॅगची उघडलेली बाजू आपल्याकडे ठेवली आहे हे पाहून एवढा नामचीन गँगस्टर असलेल्या जॅकला काहीही संशय येत नाही. गोळीचा आवाज येऊनही आपला बॉस जिवंत आहे का खपला हे बघायला एकही चमचा तिथे फिरकत नाही. पिस्तुलातल्या गोळ्या संपलेल्या असतानाही शेखर शेवटी सॅमच्या हेलिकॉप्टरवर गोळीबार करतो. आणि रुपा जिवंत राहते का मरते हेही आपल्याला कोणी शेवटी सांगत नाही.

नाही म्हणायला चित्रपट स्वित्झर्लंड, पॅरिस आणि नायगारा फॉल्सचं अप्रतिम दर्शन घडवतो. ही तेव्हाच्या काळात नक्कीच नवलाई असणार. त्या काळच्या परिप्रेक्षातून विचार करता सुमधुर गाणी, बिकीनीतली शर्मिला आणि थेटरात बसलया बसल्या परदेशवारी असा तिहेरी मिलाफ साधणारा शक्ती सामंतचा हा चित्रपट हिट झाला ह्यात नवल ते काय?

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रात के हमसफर आवडतं.

एक शर्मिला झेपत नाही तिथे दोन कोण पहाणार.

आसमान से आया फरीश्ता गाणच पटत नाही.
एव्हढ्या आवाजाच्या हेलिकॉप्टरमधून गाताना किती कंठशोष करावा लागेल आणि त्यात या शर्मिच जाsss जाsss कसं ऐकू जाणार.

{{{ कुठून सुरुवात करू? चेहरे ‘हुबहू' जुळण्याची एव्हढी महान परंपरा हिंदी चित्रपटात आहे }}}

आसमान से आया फरिश्ता या गाण्यापासूनच सुरुवात करा. त्यात हेलिकॉप्टरमधून उतरल्यावर शम्मी ज्या बोटीवर नाचत बागडत असतो त्या बोटीचा बोटमन पाहा आणि सांगा नक्की कोणासारखा दिसतोय ते?

भयंकर लिहिलं आहे.माझा हा पिक्चर आणि राज कपूर चा अराउंड द वर्ल्ड मध्ये गोंधळ होतो, सर्व वेगळं असूनही परदेशातली स्टोरी म्हणून.
या पिक्चर ची गाणी ऐकेन.पाहायची एनर्जी नाही.
स्वप्ना, कत्तल कर ना (संजीव कुमार चा). या पिक्चर चं तुझ्याकडून प्रमोशन खूप गरजेचं आहे.

मस्त लिहिलंस ग, चित्रपटापेक्षा तुझे लिखाण जास्त मनोरंजक आहे.

कित्येक दशकांपूर्वी चित्रपट पाहिलेला, आता भेजातून पार उतरून गेलाय.

शम्मी तेव्हा भारी आचरटपणा करायचा. कसले एकेक भारी चित्रपट होते त्याचे.. त्याचा आचरटपणा कमी पडला तर .. ह्या भीतीने सोबत आचरटोत्तम राजेंद्रनाथ असायचा. आम्ही त्याला पोपटलाल ह्या नावाने ओळ्खयचो.

आता विचार करता वाटते काय चित्रपट बनायचे तेव्हा. मूळ एकच गोल्डन ग्रेव्ही.... मुलगी मुलगा भेटतात, थोड्या चकमकीनंतर प्रेम व प्रेमानंतर लग्न झाले की गंगेत घोडे न्हाले. बाकी आयुष्यात काही करायचे नसतेच. ह्या गोल्डन ग्रेव्हीत कधी नायिकेच्या पुर्वायुष्याची गडबड ही भाजी टाका, कधी नायकाच्या, कधी सामाजिक गडबड तर कधी आर्थिक... बस वरून घालायच्या भाज्या बदलत. बाकी बेसिक कथा तीच. पण किती आवडीने बघितले जात हे चित्रपट. दोन ओळींच्या कथेत नाच गाणी भरून तीन तास साजरे होत.

सगळे ठराविक साचेबंद होते. विविधभारतीची व नंतर दूरदर्शनची कृपा म्हणून हे वारंवार बघायला मिळाले, त्यातली गाणी ऐकली गेली व डोक्यात कायमची बसली. गाणी immortal झाली, कथा विसरल्या गेल्या.

आज वेगवेगळ्या विषयांवरील चित्रपट येताहेत, वेगवेगळ्या माध्यमातून ते लोकांच्या कानांवर व डोळ्यांवर आदळताहेत. पण त्यातले कितपत टिकतेय कळत नाही. आमच्या पिढीच्या मनावर जशी जुनी गाणी कायमची कोरली गेली तशी नव्या पिढीच्या मनावर आजची गाणी कोरली जाताहेत का? माहीत नाही. मला तरी आजच्या पिढीतले लोक स्वतःच्या स्टाईलमध्ये जुनी गाणीच पेश करताना दिसतात. आजच्या गाण्यांचा नंबर तिथे लागत नाही.

बोटीवर नाचत बागडत असतो त्या बोटीचा बोटमन पाहा आणि सांगा नक्की कोणासारखा दिसतोय ते?> >>

अय्या, सैफ अलीचा आधीचा जन्म तर नाही ना...

आपादमस्तक १००% 'देसी' दिसणाऱ्या सॅमला दीपा फ्रेंच का समजते हेही आपल्याला कळत नाही.>>>>>>>>>>>>
गोरा चिट्टा रंग असला आणि काळे आणि ब्राउन सोडून इतर कुठल्याही रंगाचे डोळे असले की त्या व्यक्तीला फिरंग समजायचा बॉलिवूड चा नियम आहे. एक उदाहरण म्हण्जे, "आ अब लौट चले" मधे अक्षय खन्ना पहिल्या भेटीत ऐश्वर्याला फिरंग समजतो.

दीपा/सुझी झालेल्या शर्मिलाने आपली नाटकी अभिनयाची उज्ज्वल परंपरा इथेही कायम ठेवली आहे. मध्यंतरी सैफ अली खानने मी अभिनयातल्या सर्व बेसिक गोष्टी आईकडून शिकलो असं म्हटल्याचं वाचनात आलं तेव्हा 'म्हणजे काय रे भाऊ' असं अपार करुणेने विचारावंसं वाटलं होतं. प्राणने शेखरची भूमिका वठवली आहे. त्याला तो भयाण सोनेरी केसांचा विग का दिलाय कोण जाणे. त्याच्या वडिलांकडे (डेव्हिड) पाहता त्यांनी कोणी फ्रेंच बायको केली असल्याची शक्यता जवळपास शून्य भरते. कदाचित हा लहानपणी डोक्यावर पडताना त्याचं डोकं सोनेरी रंगाच्या डब्यात गेलं असावं एव्हढं एकमात्र संयुक्तिक (!) कारण निदान मला तरी दिसलं. ज्येष्ठ अभिनेते के. एन. सिंग ह्यांच्या वाट्याला जॅकची छोटी भूमिका आलेली आहे. हे दोन व्हिलन कमी म्हणून की काय शेट्टीलासुध्दा जग्गू म्हणून आणलंय. >>>>>> तुफान पॅरा आहे. Rofl एकुणच परीक्षण वाचुन जाम हसले. सॉल्लिड लिहीतेस स्वप्ना तू.

मस्त लिहिलंय Lol

सिनेमा अ आणि अ आहेच... पण गाणी झकास आहेत!

बोटीवर नाचत बागडत असतो त्या बोटीचा बोटमन पाहा आणि सांगा नक्की कोणासारखा दिसतोय ते?> >>

अय्या, सैफ अलीचा आधीचा जन्म तर नाही ना...
नवीन Submitted by साधना on 4 November, 2018 - 17:53

तुम्ही ओळखलं दिसतंय...

आधी सिनेमा आणि मग हे पद्मश्रीमहाशय जन्मलेत.

अरेच्चा! शम्मी त्या बोटीच्या पुढल्या भागावर लो़ळणफुगडी घालताना अगदीच बघवेना म्हणून त्या बोटवाल्याकडेच पाहत होते मी. तुम्ही म्हणताय तसं सैफशी साम्य आता लक्षात आलं. मला तर तो कॅप्टन अमेरिका उर्फ Chris Evans सारखा दिसला. मनी वसे ते......

mi_anu, तुमचं 'कत्तल कर ना' वाचून आधी दचकलेच Proud मग लक्षात आलं की सिनेमाबद्दल बोलताय. सध्या डाउनलोड करून ठेवलेले ४-५ चित्रपट पहायचेत. ते झाले की कत्ल बघेनच.

शर्मिला मलाही विनोदीच वाटली बिकिनीत. अजिबात हॉट वगैरे दिसली नाही. पण ते हॉट तेव्हाच्या काळानुसार वाटलं असेल त्यांना.

साधना, त्या देव आनंद-आशा पारेखच्या पिक्चरमध्ये (जिया ओ जिया ओ जिया गाणं वाला) राजेंद्रनाथचं नाव पोपटलाल होतं ना?

प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार Happy

ला तर तो कॅप्टन अमेरिका उर्फ Chris Evans सारखा दिसला. मनी वसे ते......>>>>>:हाहा: मी तर कॅप्टन अमेरिका आणि थॉर मधे कंफ्युज असते Wink Lol

धम्माल लिहिल आहेस स्वप्ना Lol
हसू नियन्त्रित करत मख्ख चेहेर्याने स्क्रीनकडे पाहत मनात हसणॅ जमत असेल तरच असे लेख हापिसात वाचावेत ग बया!!

स्वप्ना कसलं भारी लिहिलंयस Lol
मी सिनेमा पाहिलेला नाहिये पण गाणी प्रचंड आवडतात मला. आणि शम्मी माझा अत्यंत आवडता असल्याने तो दिसतो कसा, सिनेमे करतो किंवा कसे केलेत (चांगले वाईट) याकडे माझं मुळी लक्ष जात नाही. तो आहे म्हणजे भारीच हे एक समीकरण माझ्या मनात झालेले आहे.

बाकी आसमानसे... गाण्यात हिरो तंगड्या दाखवतोय आणि हिरवीन वर मान केली तर डोक्यावरचे टोपले पडेल की काय या विवंचनेत वाटते.

बिपीन, तुम्ही म्हणताय त्यात तथ्य असू शकेल. सैफची जन्मतारीख पाहिली, तो pre mature बेबी आहे.

पण हा चित्रपट 1967 ला आलाय व शर्मिलाचे लग्न 1969 ला झाले.

तुम्ही ओळखलं दिसतंय...

आधी सिनेमा आणि मग हे पद्मश्रीमहाशय जन्मलेत.>> डिसगस्टिंग कमेंट !

आधी सिनेमा आणि मग हे पद्मश्रीमहाशय जन्मलेत.>> डिसगस्टिंग कमेंट !
नवीन Submitted by मॅगी on 5 November, 2018 - 14:58

प्लीज एक्स्प्लेन. व्हाय?

खरंतर नायगाराचा उल्लेख का केलाय देवजाणे, खरंतर तो आहे र्‍हाईन फॉल्स Proud
तू लिहिलेले सर्व मुद्दे मान्य आणि माहित आहेत, तरीही मला अतिशय आवडतो सिनेमा, अजूनही पुन्हा पुन्हा पाहू शकते मी Happy

छान परीक्षण!

<<ह्या डान्सर बायांची नावं मोना, सुझी, रिटा, रोझी अशीच का असतात काय माहित? एकाही बाईचं नाव शांती, कुमुद किंवा सुधा असल्याचं पाहिलंय कोणी कधी? पुन्हा असो.>>

तुम्ही बहुदा रामदेव बाबा च्या वर्ताण आणि त्याच्यापेक्षाही कमी कपडे घालून कमानी टाकणारी " डिस्को शांती" पाहिली नसावी. Wink

मस्त लिहीले आहे Happy हा पिक्चर केवळ त्या गाण्यांतूनच माहीत असल्याने इतका मसाला ठासून भरला असेल असे कधीच वाटले नव्हते.

आणि बाय द वे यातले एकही गाणे मला कधीच आवडलेले नाही. काहीतरी मिसिंग आहे या गाण्यांमधे. शंकर जयकिशन वजा लता म्हणजे काहीच अर्थ नाही असेच नेहमी वाटते.

शंकर जयकिशन वजा लता म्हणजे काहीच अर्थ नाही असेच नेहमी वाटते.
नवीन Submitted by फारएण्ड on 6 November, 2018 - 00:53

यावरुन आठवलं.

शंकर जयकिशन + लता + राज कपूर = एकदाही बेस्ट म्युजिक फिल्मफेअर अ‍ॅवॉर्ड नाही.
शंकर जयकिशन - लता + राज कपूर = मेरा नाम जोकर = बेस्ट म्युजिक फिल्मफेअर अ‍ॅवॉर्ड

मला स्वतःला शंकर जयकिशन - लता हे कॉम्बिनेशन जास्त आवडलं..

उदा.

चले जाना जरा ठहरो, किसी का दम निकलता है, यह मंजर देख कर जाना - अराऊंड द वर्ल्ड - मुकेश + शारदा
जब भी यह दिल उदास होता है, जाने कौन आसपास होता है - सीमा - मोहम्मद रफी + शारदा
बातोंमें न टालों जी दिल दे डालो जी अच्छी नही प्यार में देर सनम - कांच की दीवार = मोहम्मद रफी + आशा भोसले.
जिंदगी एक सफर है सुहाना यहा कल क्या हो किसने जाना - अंदाज - किशोर कुमार / आशा भोसले

Pages