थेंब बावरा
आला मातीला सुगंध, पाणे पाणे ओलावली
थंड झाली उष्ण काया, धरणी माय सुखावली
मेघ काळे सावळे, दुडू दुडू ते धावत
जणू खेळी शिवाशिवी, खेळ आलाय रंगात
काळ्या ढगामध्ये एक, होता थेंब हहंदोळत
कुठे पडेन मी आता, होता सतत चिंतेत
वीज कडाडली भारी, थेंब हादरे जिव्हारी
वारा फिरे गर गर, घाली भीतीत तो भर
बांध मेघाचा फुटला , थेंब धावत सुटला
खाली वसुंधरा शांत , गोल फिरते निवांत
ठायी ठायी तु ईश्वरा, मदतीस ये सत्वरा
कीती करावी ही चिंता, वाट दावी तु अनंता
काय झाले अवचित, थेंब झाला अचंभित
होई कसे हे अगम्य, व्रुक्ष वेली नयनरम्य
चित्तवृत्ती ती फुलली , तनु अवघी शहारली
अवघे सुंदर ते बन, पाहे डोळे विस्फारून
थेंब पुरता वीसावे , स्पर्श भासे तो सुखद
एका चाफ्याने जेव्हा, त्याला झेलले अलगद
जीव भांड्यात पडला, थेंब गालात हसला
मग फुलात पिवळ्या, सोन चाफ्याच्या निजला
------ सो भी या