ट्रेकची आवड आहे पण ट्रेकची आवड असणारा परिवार, नातेवाईक किंवा मित्र-मैत्रीणी नसल्यामुळे ट्रेकला जाऊ न शकणार्या अनेकांपैकी मी एक. ठकाला ठक भेटतोच या ऊक्तीप्रमाणे मलाही ट्रेकची आवड असणारी आमच्या ऑफिसमधील मिलन भेटल्यामुळे या वर्षी २ ट्रेक करता आले. इतकी वर्षं आम्ही दोघे एकाच ऑफिस मधे एकाच बसने जातो पण दोघांनाही ट्रेकची आवड आहे हे आम्हाला माहितच नव्हते. मिलनने जानेवारीत २६-२७-२८ चा लाँग वीकेंड बघुन एका ट्रेकिंग ग्रुप सोबत मला 'कळसुबाई'ला ट्रेकवुन आणले होते. त्यानंतर तिने आत्ता २७-२८ ऑक्टोबरच्या वीकेंडला "हरिश्चंद्रगड साठी नाईट ट्रेकला जायचं का?" विचारलं. अगदी तोंडावर आलेली दिवाळी आणि अंगी भरलेला आळस अशी दोन कारणे असल्यामुळे मी येऊ शकणार नाही हे मी तिला सांगु शकलो असतो पण असं थेट 'नाही' म्हणायला नको म्हणुन मी "घरी विचारुन सांगतो" असं बोलुन मध्यम मार्ग स्विकारला.
ऑफिस मधुन घरी आल्यावर जेवणं उरकल्यावर सर्वंसमक्ष "मी या वीकेंडला हरिश्चंद्रगड साठी नाईट ट्रेकला जाऊ का?" असं विचारलं तर आई-वडील-बहीण आणि बायकोनेही "जा ना... कोणकोण जाताय आणि कुठे आहे तो हरिश्चंद्रगड?" असं विचारुन मला 'ऑल लाईन क्लिअर' असा अनपेक्षित ग्रीन सिग्नल दिला. मग मीही जास्त विचार न करता मिलनला "ट्रेकला येतोय" असा मेसेज केला आणि झोपी गेलो.
सकाळी ऑफिस मधे गेल्यावर बस ग्रुप, लंच ग्रुप, टी-टाईम ग्रुप, प्रोजेक्ट टीम आणि एक्स-प्रोजेक्ट टीम सहीत क्लासमेटस व इतर फ्रेंड सर्कल मधे "ट्रेक ला येणार का..?" विचारुन झालं. फक्त आत्ताच्या टीम मधला नवीन जॉईन झालेला अमित तयार झाला आणि मी मिलनला आम्हा तिघांचे पेमेंट करायला सांगितले. तिने पेमेंट केल्यावर 'ट्रेकफिट' कडुन वॉटसप वर काही सुचना आल्या. त्याबरहुकुम १ ट्रेकसुट, ट्रेक शुज, २ वॉटर बॉटल्स, ग्लुकॉन डी, गळाबंद जॅकेट, मफलर, टॉर्च तसेच आईला वाटले म्हणुन १ गुळचपाती, बायकोला वाटले म्हणुन १ सफरचंद आणि मला वाटले म्हणुन १ आवळा (मीठ घ्यायचे मात्र विसरलो..!) असा जामानिमा करेपर्यंत शनिवारची संध्याकाळ झाली. मिलन आणि मी एकाच एरिया मधे रहायला असल्याने तिला आमच्या घराजवळील बस स्टॉपवर ७.०० वाजता भेटु आणि बसने एस.बी. रोडवरचं ट्रेकफिटनं सांगितलेलं ट्रॅव्हल कॅफे रात्री ८.०० वाजेपर्यंत गाठु असं कळवलं. अमित हिंजवडीतुन डायरेक्ट तिकडे कॅफेतच भेटणार होता. आम्हाला घरुन निघता-करता ७.१५ झाले आणि देवा-देवा करत मिळालेली डायरेक्ट बस नेमकी सारसबागेजवळ बंद पडली.. लगोलग मागे दुसरी बस आलीच आणि तिच्यातुन सुरु झालेला प्रवास दिवाळीच्या खरेदीसाठी रस्त्यावर उतरलेल्या गर्दीने चांगलाच रोखुन धरला.. तरीही आम्ही ८.३० पर्यंत कसंबसं एस.बी. रोडवरचं ट्रॅव्हल कॅफे गाठलं आणि आम्हाला आत घेतल्या घेतल्या आमची टेंपो ट्रॅव्हलर लगेच सुरुही झाली.
बस मधे ड्रायव्हर सोडुन १५ जण होते. मिलन व अमित सोडुन कोणीही माझ्या ओळखीचं नव्हतं. आम्ही तिघं शेवटुन दुसर्या रांगेतील सीट्सवर बसलो होतो. बस मधे १० मुली आणि ५ चच जंटलमन आहेत हेही दिसलं. बस सुरु झाल्यावर १ मिनिटाचिही उसंत न देता एक विशी-पंचवीशितील तरुण उठुन उभा राहीला आणि त्याने त्याचं नाव 'अभिजीत' असं सांगितलं (जे आम्हाला आधीच कळालं होतं कारण त्याने परिधान केलेल्या 'ट्रेकफिट'च्या टी-शर्टवर ते पाठीमागे छापलं होतं..! )
अभिजीतने आजच्या ट्रेक बद्दल थोडक्यात माहिती सांगितली. तोच आमचा ट्रेक लीडर होता. त्याने त्याचे २ साथीदार 'अनुजा' आणि 'मेहबुब' यांचाही इन्ट्रो दिला. आम्हा १२ ट्रेकर्सचे इन्ट्रो "लगेच देणार की अंताक्षरी झाल्यावर..?" असं त्याने विचारताच एका सुरात सर्वांनी "अंताक्षरी झाल्यावर" असा ओरडा केला. अनुजाने लगेच २ ग्रुप्स पाडले आणि हसी-मजाक करत अंताक्षरी सुरु केली. पुढचे १.५-२ तास धमाल गाणी गाऊन झाल्यावर सर्वांना भुकेची जाणीव झाली आणि मंचरच्या थोडे अलिकडेच ११ च्या आसपास एका रोडसाईड चहाच्या टपरीपाशी बस थांबली. अनुजाने पॅक करुन आणलेले चमचमीत सँडविचेस आणि त्यासोबत गरम-गरम चहा असा बेत पार पडला. इथेच अनुजाने अभिजीत तिचा सख्खा भाऊ आहे हे सांगुन सर्वांना अश्चर्याचा धक्का दिला. तिथुन निघेपर्यंत ११.३० वाजुन गेलेले. आता पोटात सँडविच-चहा गेल्यामुळे गुंगी यायला लागली होती आणि कोणीही अंताक्षरी खेळण्याच्या मनस्थितीत नव्हते. बसमधले लाईटस घालवुन सर्वजण पेंगु लागले. आळेफाट्याहुन बस डावीकडे वळाली आणि ओतुरपर्यंत कसलाही व्यत्यय न येता झोप झाली. ओतुर नंतर मात्र जेव्हा बस बामणवाडा मार्गे कोतुळला जाण्यासाठी उजवीकडे वळाली तसे खराब रस्त्यामुळे सर्वांच्या झोपा उडाल्या. अक्षरश: कॅमल राईड प्रमाणे टणाटण उडत, ठेचकळत, आपटत प्रवास सुरु झाला आणि मी मात्र झोपेतुन पुर्णपणे जागा होऊन खिडकीतुन बाहेर चंद्राच्या प्रकाशात परिसर न्याहळु लागलो.
बामणवाडा जाऊन कोतुळ येईपर्यंतचा रस्ता बरा म्हणण्याची वेळ कोतुळ गेल्यानंतर आली. गंभिरेवाडी, भांगरेवाडी, कोहने, शिंदे, विहीर, ताल आणि कोठळी अशी गावे मागे पडत गेली. त्यापैकी कोहने आणि कोठळी या गावांत अकोले डेपोच्या मुक्कामी एस.टी. बस थांबलेल्या दिसल्या. कोठळी नंतर आमच्या बस ड्रयव्हरने बस एकदम डावीकडे वळवली आणि तीव्र उताराच्या चिंचोळ्या रस्त्याने अतिशय सावधपणे नेऊ लागला तसे सगळेच उठुन खिडकीतुन बाहेर पाहु लागले. अतिशय अवघड चढ, उतार आणि वळणे घेत बस लव्हाळी गावात पोचली. तिथुन एका अवघड घाटातुन श्वास रोखुन आम्ही पहाटे ३ च्या सुमारास पानचई गावात पोचलो. बस आणि ड्रायव्हर इथेच उद्या संध्याकाळपर्यंत आमची वाट पाहत थांबणार होते.
पानचई मधुन रात्री ३.१५ वाजता टॉर्च घेउन आम्ही हरिश्चंद्रगडाकडे प्रस्थान केले. पानचई गावापासुन साधारण अर्धा किलोमीटर अंतरापर्यंत चांगल्या सपाटीच्या रस्त्याने गेल्यानंतर २ रस्ते फुटलेले दिसले. तिथे वनविभागाचा सुचनाफलक होता. त्या फलकाशेजारीच डावीकडील रस्ता हरिश्चंद्रगडाकडे आणि उजवीकडील रस्ता हपाट्याच्या कड्याकडे असा उल्लेख असलेला फलक होता.
इथेच उभा राहुन अभिजीतने मेहबुब सर्वांच्या पुढे राहील, अनुजा मधे राहील आणि तो स्वतः सर्वांच्या मागे राहील असे सांगुन डावीकडील पायवाटेने पुढे जाण्यास सांगितले. थोडे अंतर जाईपर्यंत आजुबाजुला भाताची शेते दिसत होती. अचानक चढ सुरु झाला आणि भाताची शेते जाऊन जंगल सुरु झाले. गच्च काळोखात टॉर्चच्या प्रकाशात आम्ही चढाने पुढे निघालो. वर पाहिले तर झाडांच्या पानाआडुन चंद्र आमची साथ देत होता. घाम काढणारा चढ अजुनच तीव्र होत गेला तसे आमच्यातल्या काही ट्रेकर्सचा ऊर धपापु लागला. ताज्या दमाचे ट्रेकर्स मेहबुब आणि अनुजा सोबत पुढे गेले आणि धपापलेल्या ट्रेकर्सना हात देत, साथ देत तर कधी त्यांच्या बॅग्ज स्वतःच्या पाठीवर घेत अभिजीत त्यांना वरती घेउन येऊ लागला. मेहबुब-अनुजा सोबतची गँग पुढे जाउन मागे राहिलेल्यांची वाट पाहत खडकांवर बसलेली असायाची आणि अभिजीत सोबतची गँग त्यांच्या पर्यंत पोचली रे पोचली की ते लगेच उठुन चालु पडायचे. त्यामुळे मागे पडलेले ट्रेकर्स अजुनच खचायचे आणि अभिजीत त्यांना धीर देत पुढे आणायचा असं बराच वेळ सुरु होतं. आता जंगल संपुन खडा दगडी पॅच आला. त्यावर लोखंडी रेलिंग्ज बसवले होते. एका हाताने दगडांना आणि एका हाताने रेलिंगला पकडुन तो अवघड पॅच संपला आणि एका डगरीला वळसा घालुन आम्ही सर्वजण कातळभिंतीपाशी आलो. एका बाजुला अतिशय उंच कातळभिंत आणि दुसर्या बाजुला किर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र् अंधार अशा ठिकाणाहुन आम्ही चालत पुढे निघालो. इथे आजिबात चढ नव्हता. त्यामुळे धपापलेल्या जिवांना थोडा आराम मिळाला. कातळभिंत खालुन पोखरल्यासारखी वाटत होती पण टॉर्चच्या प्रकाशात जेवढा अंदाज बांधु शकु तेवढाच बांधत आम्ही पुढे जात होतो. बराच वेळ चालल्यावर आमची कातळभिंतीला चिकटुन असणारी वाट आणि शेजारी वाळलेल्या गवताचा डोंगर दोन्ही जवळ येत येत एकमेकांना चिकटले तिथे निर्झरातील पाण्याची खळखळ ऐकु येत होती परंतु दिसत मात्र काहीच नव्हते.
कातळभिंतीचा टप्पा संपुन निर्झराच्या साथीने आम्ही पुढे निघालो. आता पुढे थोडीशीच चढण दिसत होती. घड्याळात पहाटेचे ४.३० वाजले होते. चांगलीच गार हवा सुटली होती. कोकणकडा जवळ आला की काय असे वाटुन मी अभिजीतला अजुन किती चढाई बाकी आहे असं विचारलं तर त्याने २५% असं सांगितलं. ते ऐकुन हुरुप आला आणि समोरच्या ओढ्यावरचा बाकदार लोखंडी पूल पार करुन आम्ही पुन्हा जंगलात शिरलो. १५-२० मिनिटे खडी चढण चढल्यावर मेहबुबला किती चढाई बाकी आहे असं विचारलं तर पठ्ठ्याने ३०% असं सांगितलं...! दोघांची टक्केवारी मिळुन ५०-५५% चढाई शिल्लक राहिली असणार हे मी चाणाक्षपणे हेरले . डोक्यावरील झाडांच्या पानतून दिसणार्या चंद्राच्या साथीने हेही जंगल संपले आणि आम्ही सर्वजण एका मोकळ्या जागी येऊन थांबलो. गार वार्यात थोडावेळ बसलो. चंद्रप्रकाशात अमितने टॉर्चच्या साथीने फोटो काढले.
या ठिकाणी पुन्हा एकदा अभिजीत, अनुजा आणि मेहबुबला नक्की किती चढाई राहिली असं विचारलं तेव्हा १० मिनीट चालायचं आहे असं अनुजा म्हणाली. दूर अंतरावर काही दिवे चमकत होते. बहुतेक तिथंच मंदिर असावं असं वाटलं. आम्ही उठुन मार्गक्रमण सुरु केलं. थंडगार वारा सुटलेला. आता मात्र चांगलीच भुक लागली होती. मी सॅकमधुन बायकोने बळेबळे पण प्रेमाने दिलेलं सफरचंद काढुन खाऊ लागलो. कधी नव्हे ते सफरचंद मला एवढं चविष्ट लागलं की काही विचारुच नका. ते खाऊन जरा तरतरी आली. अजुन एखादं सफरचंद आणलं असतं तर बरं झालं असतं असं वाटुन गेलं. गडावर पुढे पुढे जाताना पायवाटेवरील खडकाळ भागावर मार्ग दाखवणारे बाण '-->' रंगवलेले दिसत होते.
आता खरोखरच १० मिनिटांत आम्हाला टपरीवजा घर दिसलं. तिथुन कोणतरी हाका मारत होतं. अभिजीतने आम्हा सर्वांना तिथे नेलं आणि चहाची ऑर्डर दिली. आम्ही बाहेरच खडकावर चंद्रपकाशात बसुन चांदण्या मोजत चहाची वाट बघत बसलो. मला जाम भुक लागलेली. चहाने ती काही शमणार नाही हे ओळाखुन मी आईने प्रेमळ जबरदस्तीने दिलेल्या गुळचपातीचा डबा उघडुन भुक यशस्वीपणे शमवली. तोवर चहा आलाच. तो पिऊन आता आधी 'तारामती' की 'कोकणकडा' असा प्रश्न अनुजाला विचारायला गेलो तर बाईसाहेब शाल पांघरुन झोपलेल्या. लोकल गाईड रामदासने सांगितलं की आत्ताशी ५.४५ झालेत. एवढ्या लवकर तारामती शिखरावर जाऊन झोंबणार्या गार वार्यात सुर्योदय होईपर्यंत बसावं लागेल. त्यामुळे थोडावेळ इथेच थांबा.
मग कोणीतरी (नाव माहीत नाही कारण अजुनही ओळखपरेड झालीच नव्हती) आकाशात पाहुन हा ध्रुवतारा आहे असं सांगितलं. लगेच इतरांनी ध्रुवतारा क्षितीजापासुन असा कासराभर वर दिसत नाही तो उत्तरेला क्षीतिजावर टेकलेला दिसतो वगैरे-वगैरे माहिती दिली. मीही मला कुठेही गेलं तरी दिशा कशा कळतात हे सांगुन टपरीच्या समोर पूर्व असणार असं सांगितलं. समोर पूर्व म्हणजे टपरीच्या मागे पश्चिम असणार त्यामुळे टपरीच्या उजव्या बाजुला दक्षिण आणि डाव्या बाजुला उत्तर दिशा असणार असंही छातीठोकपणे सांगितलं. १०-१५ मिनिटे आमच्या गप्पा सुरुच होत्या. सकाळचे ६.१५ होत आले आणि १०-१५ मिनिटांपुर्वी जिनं ठामपणे ध्रुवतारा दाखवला होता आणि नेमकं त्याच दिशेला मी दक्षिण दिशा म्हणुन छातीठोकपणे सांगितलं होतं आता त्याच दिशेने झुंजुमुंजु होऊ लागलेलं दिसलं तसं मी आपली झाकली मूठ सव्वालाखाचीच राहु द्यावी म्हणुन लगबगीने लोकल गाईड रामदासला सुर्योदयाच्या आत तारामती गाठायचे आहे अशी आठवण करुन दिली. झोपलेल्या अनुजाला अभिजीतने अक्षरशः 'भाई'गिरी करुन उठवलं आणि आम्ही तारामती शिखराकडे कूच केलं.
यावेळेस मात्र मिलन, मी आणि अजुन एक मुलगी रामदासच्या साथीने झपाझप पावलं टाकत जंगल तुडवत वर निघालो. छातीपर्यंत वाढलेल्या झाडोरीने झाकलेल्या पायवाटेने आम्ही निघालो. तेवढ्यात १०-१५ जणांचं एक टोळकं आम्हाला ओलांडुन पुढे गेलं. टॉर्चच्या प्रकाशात पायवाट दिसतच नव्हती. अचानक समोरची मुलगी डोळ्यादेखत छातीपर्यंत वाढलेल्या झाडोरीत गडप झाली. मी आणि मिलनने दचकुन एकमेकांकडे पाहिलं आणि ताबडतोब हाताने झाडोरी बाजुला केली तर त्या मुलीने झाडाच्या मुळीत पाय अडकल्यामुळे भूमातेला साष्टांग दंडवत घातलेला दिसला. आम्ही दोघांनी तिला हाताला धरुन उठवलं आणि सावधपणे वर निघालो. मोठी झाडे संपुन गवत सुरु झालं. तिथं एका झाडाच्या खालुन पलीकडे दरी दिसत होती आणि दूरवर पसरलेलं पिंपळगाव जोगा धरण.
या झाडाखालुन २ पायवाटा फुटलेल्या. ते १०-१५ जणांचं टोळकं डावीकडील वाटेने पुढे सरकलं आणि रामदासने आम्हाला उजव्या बाजुच्या वाटेने या असं सांगुन पुढे गेला. आता २०-३० फुटांचा तिरपा कातळ नजरेत आला. हाच तारमती शिखराचा अखेरचा टप्पा. कारवीची झुडपे आणि त्यातुन जाणार्या पायवाटेने मी, मिलन आणि ती मुलगी रामदासच्या मागे कातळ चढु लागलो. खरेतर अजुन आमचा ट्रेक लीडर अभिजीत व त्याचे २ साथीदार अनुजा आणि मेहबुब यांपैकी कोणीच दिसत नव्हते. मागे वळुन पाहिलं तर १०-१५ जणांचं ते टोळकं एका धोकादायक अशा चिंचोळ्या दगडावर पोचलं होतं आणि तिथुन अतीधोकादायकपणे त्यांची फोटोग्राफी सुरु होती. रामदासने आम्हाला दुसर्या रस्त्याने का आणलं असावं या मागचं कारण आता मला कळालं होतं.
इकडे रामदास आणि त्याच्या मागोमाग ती मुलगी कातळावर चढले. मिलन सुद्धा एक टप्पा चढुन वर गेली. मी तो टपा पार करण्यासाठी कातळाच्या बाजुला आलो आणि अचानक पुढे एक्सपोजर आल्याने चांगलाच टरकलो. आल्यापावली मागे सरकलो. मी पुढे येत नाही हे पाहुन मिलन पण जागीच थबकली. तेवढ्यात आमची गँग पोचु लागली आणि मला वरती चढ असं म्हणु लागली. रामदास तर पुन्हा खाली येउन हाताला धरुन जवळ-जवळ ओढतच मला वर नेऊ लागला तसा पुन्हा एकदा एक्स्पोजर बघुन मला भितीचा अॅटॅक आला. काही झालं तरी मी वर येणारच नाही असं म्हणुन मी झप्पकन तिथुन खाली उतरलो. तेवढ्यात अभिजीत आणि मेहबुब तिथं आले आणि माझी टरकली आहे हे त्यांनी ओळखलं. चेहर्यावरची रेषही हलु न देता त्यांनी मला तो पॅच चढणं सहज जमेल असं पटवुन दिलं. मी इथुन सहज चढु शकेल हे मलाही माहीत आहे परंतु इथुन उतरणे केवळ अशक्य आहे असं म्हटल्यावर त्यांनी पुन्हा गुगली टाकला. ते म्हणे उतरताना दुसर्या रस्त्याने उतरणार आहोत आणि त्यामुळे मला त्यांच्यासोबत वर जावंच लागेल. दोनच तासापुर्वी या दोघांनी उरलेल्या चढाईबद्दलचे २५% - ३०% मी अजुन विसरलेलो नव्हतो त्यामुळे मी त्यांना तुम्ही सर्व पुढे जा आणि मी इथेच तुमची वाट पाहतो असं सांगितलं. पण मला वर न्यायचंच असा दोघांनीही चंग बांधला असावा. त्यांनी खुप समजुन सांगितल्यावर आणि इतर सहकारी माझी वर वाट पाहत आहेत हे दिसल्यावर मात्र मी तयार झालो. एक्स्पोजरकडे लक्ष देऊ नको ही त्यांची सुचना कशीबशी पाळुन मी त्यांच्या हाती हात दिला आणि जिवाच्या आकांताने मोठी ढ्यांग टाकुन तो अवघड पॅच चढुन वर आलो. समोर रेणुका उभी होती आणि तिने मला 'डर के आगे जीत है" म्हणुन थम्स-अप केलं..!
हाच तो अवघड पॅच जिथुन मी डर के आगे जीत केलं
तोवर सुर्यदेव पिंपळगाव जोगा धरणाच्या डावीकडील डोंगराच्या मागुन वर येताना दिसले आणि तो नजारा बघताच सर्वजण प्रफुल्लीत झाले.
हा अदभुत नजारा बघण्याची संधी मिळवुन दिल्याबद्दल मी अनुजा, अभिजीत आणि मेहबुब सोबत सेल्फी काढला नेमका तोच क्षण अमितने त्याच्या कॅमेर्यात टिपला.
तारामती शिखरावर भरारा वारा सुटला होता आणि त्या वार्याने आपण उडुन जाऊ की काय असे वाटुन मला कापरं भरलं होतं. एवढ्या वार्यात सर्वजण दरीच्या कडेला फोटो काढत होते. मिलनने पण मला तिचे काही फोटो काढायला सांगितले आणि थेट दरीच्या तोंडाला जाउन बसली. जरा मागे सरकुन बस नाहीतर हाच फोटो तुझ्या घरातील भिंतीवर लवावा लागेल असं म्हटल्यावरही तसुभर मागे न येता तिने माझ्याकडुन फोटोसेशन करवुन घेतलंच. मग मीही थोडा सावरल्यावर तिला माझे फोटो काढायला लावले. आता भीती बर्याच अंशी कमी झाली होती. आजुबाजुचे नजारे पाहुन मन हरकुन गेलं होतं. तारामती शिखर आणि तिथुन दिसणारा नजारा
तारमती शिखरावर आम्ही ग्रुप सोबत फोटो काढले. उजव्या बाजुला लोकल गाईड रामदास.
शिखराच्या परिसरात सुंदर रानफुले फुलली होती.
.
.
.
.
शिखराच्या काळ्याकभिन्न बसाल्ट खडकात दबली गेलेली स्फटिकासारखी शुभ्र गारगोटीची लांबच लांब रेघ दिसत होती.
तारामती शिखरावरुन आजुबाजुचा नजारा पाहुन झाल्यानंतर सर्वांच्याच पोटात कावळे ओरडु लागले तसे लीडरच्या सुचनेनुसार आम्ही टपरीवर परत जाण्यासाठी खरेच दुसर्या बाजुकडुन खाली उतरलो. वळासा मारुन पुन्हा पहिल्या चढाईच्या ठिकाणी आलो तर एक ६५-७० चे आजोबा आणि ६०-६५ च्या आज्जी मी ज्या पॅचवर टरकलो तिथुन खाली उतरत होत्या हे बघुन माझी मलाच टिंबटिंब वाटली.
टपरीवर आलो आणि बघतो तर काय तिथं आमच्यासाठी गरमगरम मॅगी आणि चहाचा बेत केला होता. पोटभर मॅगी खाउन चहा पिल्यावर पुन्हा सगळे ताजेतवाने झाले हरिश्चंद्र मंदिराकडे कूच केले.
काळ्या पाषाणात उभे केलेले हे हेमाडपंथी मंदिर स्थापत्यकलेचा एक उत्क्रूष्ट (हे कसं लिहायचं..? ) नमुनाच ठरावा.
हरिश्चंद्र मंदिरातील काही शिल्पे.
.
मंदिरात पाण्याचे टाके असुन यातील पाणी पिण्यायोग्य आहे.
मंदिराच्या डाव्या बाजुला विलोभनिय पुष्करणी आहे.
मंदिराच्या उजव्या बाजुला थोडेसे खाली झर्याच्याच बाजुला एका लेणीत केदारेश्वर मंदिर आहे. मंडपाच्या ४ आधारस्तंभांपैकी ३ तुटलेल्या अवस्थेत आणि केवळ १ खांब शाबुत आहे. त्याखाली चबुतर्यावर शिवलिंग कोरलेले आहे. विशेष म्हणजे हे केदारेश्वर शिवलिंग ४-५ फूट खोल थंडगार पाण्याने वेढलेले आहे.
जर तुम्हाला शिवलिंगाचे दर्शन घ्यायचे असेल तर या ४-५ फूट खोल अशा थंडगार पाण्यातुन जावे लागते. आमच्या ग्रुप मधिल ४ मुली आणि अमितने हे धाडस केले आणि शिवलिंगाचे दर्शन घेतले. अमितने तर त्या थंडगार पाण्यात डुबकी घेतली आणि वर आल्यावर सांगितले की पाणी खराब आहे.. त्याचा वास येतोय..
मंदिर परिसर पाहुन झाल्यावर आम्ही कोकणकडा पाहण्यासाठी निघालो. पायवाटेने चालताना गर्द झाडोरी संपून खडकाळ भाग सुरु झाला. अधेमधे काही ओहोळ आडवे येत होते. त्यात पाणी तसे कमीच होते पण एक अचंबित करणारी गोष्ट नजरेस पडली. प्रत्येक ओहळातील दगडी भागावर रांजण खळगे तयार झाले होते. काही मोठे खळगे होते तर काही लहान. काही खळग्यांचा तर गेल्या २-४ वर्षांपुर्वीच जन्म झालेला दिसत होता.
१०-१५ मिनीट या पायवाटेने चालल्यावर कोकणकड्यापाशी पोचलो. अक्राळ-विक्राळ सुळक्यांनी वेढलेल्या काळ्या दगडी पाषाणापाशी थरकाप उडवणारी दरी होती. इथे दरीपासुन योग्य अंतर राखुन फोटो काढण्याच्या सुचना आल्या तरी सर्वांनी झोपुन फोटोबाजी केलीच.
.
.
हे थोडं आणखी पुढं झुकुन
तळ दिसला पाहिजे म्हणुन आणखी थोडं पुढं..
रौद्र कोकणकड्यावरुन दिसणारा नजारा पाहुन आम्ही परत टपरीकडे निघालो. पोटात भुकेचा आगडोंब उसळला होता. जेवणाची वाट बघत आम्ही सर्वजण बस्करावर बसलो आणि त्या टपरीच्या मालकांनी आमच्यासाठी गरम-गरम बाजरीच्या भाकरी, बटाटयाचे कालवण, हिरव्या मिरचीचा ठेचा, भात आणि वरण सोबत कांदा आणि लिंबु असा झक्कास बेत समोर आणुन ठेवला. भुकेच्या तावडीत सापडल्याने ह्या सुग्रास ग्रामीण भोजनाचा एकतरी फोटो काढण्याचे भान कुणालाही राहिले नाही. यथेच्छ पेटपुजा झाल्यावर आम्ही बाहेर बसुन थोडावेळ आराम केला. अचानक आठवण झाली तसं इथुनच मी थोडंसं मीठ एका पुरचुंडीत बांधुन घेतलं.
साधारण १२.३० च्या आसपास आम्ही परतीच्या मार्गाला लागलो. एक उतार उतरुन खाली आलो आणि पायवाटेवरील छोट्या दगडांवरुन माझा पुढे टाकलेला पाय खर्रर्रर्रकन घसरुन अजुन तसाच फूटभर पुढे गेला तसा मागचा पाय आपोआप गुडघ्यात वाकुन गुडघा दणकन जमिनीवर आदळणार एवढ्यात मी ब्रेक लावण्यात यशस्वी झालो आणि गुडघा फ्रॅक्चर होण्यापासुन थोडक्यात बचावलो. सर्वजण मला 'हळु... हळु..' असं म्हणेपर्यंत अमितदेखिल घसरला. त्याला सावरेपर्यंत मयंक घसरला. मयंक तर त्या दगड-गोट्यांच्या टप्यात ५-६ वेळा घसरला.
तो निसरडा टप्पा कुठलीही इजा न होता पार पडल्यानंतर जंगल सुरु झालं. काल अंधारात न दिसलेल्या काही गोष्टी इथे आज दिसत होत्या.
जंगल संपुन तो बाकदार लोखंडी पूल आला.
पूल पार केल्यावर डाव्या बाजुने झर्याने साथ द्यायला सुरुवात केली. काल रात्री वर चढताना याच निर्झराचा खळखळाट आम्हाला साथसंगत करत होता.
पुढे गेल्यावर हा झरा कड्यावरुन खाली झेपावत होता आणि वारं आलं की त्याचा प्रवाह उलट्या दिशेने आकाशात उडत होता. त्या उलट्या प्रहावाचे काही थेंब वार्यामुळे आमच्याही अंगावर उडत होते.
इथुन पुढे कातळभिंतीचा इलाका सुरु झाला. मोठमोठ्या कातळ भिंती पाहुन डोळे विस्फारत होते त्याच वेळेस दुसर्या बाजुस खोल दरी पाहुन काळाजाचा ठोका चुकत होता. एका ऐसपैस जागी आम्ही थोडावेळ बसलो.
तिथुन पुढे चालत निघालो तेव्हा अधुन-मधुन वाटेवर कोसळलेल्या दरडींचे ढिगारे दिसले. कातळभिंतीकडे लक्षपुर्वक पाहिल्यावर काही ठिकाणी कमजोर दगडांचे ढलपे सुटल्यासारखे दिसत होते. एका ठिकाणी पायवाटेवर पडलेल्या दरडीमुळे दरीच्या बाजुने वळसा घालुन पुढे जावे लागले तेव्हा जिवाचा पुन्हा एकदा थरकाप झाला. रात्री इथुन कसा काय आलो हे कोडं सोडवत पुढे निघालो. कातळभिंत संपुन उतरण लागली आणि पायवाट पुढे दरीच्या तोंडालाच जाऊन थांबली की काय असंच वाटु लागलं. बाकीचे सर्वजण पुढे गेले फक्त मी, मयांक, अर्पिता आणि आमच्या मागे अभिजीत एवढेच राहिलो. भर उन्हात डोळ्यासमोर काजवेच चमकले. मी, मयांक आणि अर्पिता मागे वळुन अभिजीतला चांगलेच फैलावर घेत होतो की त्याने आम्हाला दुसर्याच अवघड रस्त्याने खाली उतरवलंय आणि रात्री आम्ही इथुन आलोच नाही. अभिजीत हसुन आम्हाला हेच सांगत राहिला की रात्री आपण याच रस्त्याने वर चढलो आहोत आणि आत्ताही बाकीचे सर्वजण याच मार्गाने खाली उतरत आहेत. आम्ही तिघेही जिवावर उदार होउन एक एक पाय सरकवत पुढे निघालो पण प्रत्येकाच्या तोंडी हेच शब्द "रात्री आम्ही इथुन आलोच नाही आणि अशा अवघड जागेवरुन चढणं आम्हाला शक्यच नाही..!"
अभिजीतने सर्वांना हात देऊन खड्या दगडी पॅच पर्यंत खाली आणले जिथे लोखंडी रेलिंग्ज बसवले होते. ते रेलिंग्ज बघुन आम्हाला पटले की खरेच आम्ही रात्री याच मार्गाने वर चढलो. रेलिंग्ज बघितल्यावर मात्र मी सुसाट उतरायला सुरुवात केली. अर्पिता आणि मयांक मात्र कष्टाने उतरत होते आणि अभिजीत अर्पिताची सॅक स्वतःच्या पाठीवर घेउन तिला आधार देत उतरवत होता. दगडी पॅच संपुन पुन्हा एकदा जंगल लागले आणि मी उतरण्याचा वेग वाढवला. एवढ्यात दुसर्या ट्रेकिंग ग्रुप चे ३-४ जण धपाधप पळत पुढे गेले. ते पाहुन मला काँप्लेक्सच आला. पुढे जाऊन भाताची शेतं लागली तेव्हा जरा हायसं वाटलं. एकवार मागे वळुन मी हरिश्चंद्रगडाकडे पाहिलं. हा ट्रेक करु शकलो याचं खूप समाधान वाटलं.
दुपारचे तीन वाजत आलेले. मोठा रस्ता लागला. काल रात्री वर चढताना अंधारात फलक वाचता आले नव्हते ते आता वाचले.
थोडं चालत पुढे गेल्यावर एक हापसा दिसला. पटकन तिथे जाउन हापसुन पाणी काढले आणि थंड पाण्याने हात-पाय-चेहरा धुवुन फ्रेश झालो. तेवढ्यात बस आली. सर्वजण खाली पोचल्यावर बस सुरु झाली आणि परतीच्या मार्गाला लागली. झाडीतुन सूर्य आमच्याशी शिवणापाणी खेळत होता.. मी चटकन चालत्या गाडीतुनच एक फोटो काढला..
ऊन मी म्हणत होतं आणि दमल्यामुळं कोणीच कोणाशी बोलत नव्हतं. बहुतेकजण निद्रादेवीच्या स्वाधीन झाले होते. अशा आयत्या चालुन आलेल्या संधीचा फायदा करुन घ्यायची वेळ झालेली . काल घरुन निघताना मी स्वतःहुन सोबत एक आवळा घेतला होता तो सॅक मधुन काढला.. मघाशी जेवण झाल्यावर तिथुन मीठ बांधुन घेतलेली पुरचुंडी उघडली आणि त्या रणरणात्या उन्हात मीठात आवळा टेकवुन चटक-मटक करत बाहेरचा मागे पडत असलेला परिसर बघत बसलो.
कधी झोप लागली ते कळलंच नाही. जाग आली तेव्हा आळेफाट्याच्या पुढे आलो होतो. एका ठिकाणी चहा-वडापाव खाऊन पुन्हा बस मधे बसलो आणि सर्वांचा इन्ट्रो सुरु झाला. कालची रात्र आणि आजचा संपूर्ण दिवस ज्या साथीदारांसोबत घालवला त्यांचं मूळ ठिकाण, ते घेत असलेलं शिक्षण, करत असलेला जॉब आणि त्यांच्या आवडी-निवडी ऐकुन मजा आली. पुण्यात पोचेपर्यंत रात्रीचे १०.२० झाले. इतर सर्वांना 'पुन्हा भेटु' असं सांगुन मी, मिलन आणि क्रांती संचेतीला उतरलो अन बस पकडुन आपापल्या घरी मार्गस्थ झालो आणि घरी पोचल्यावर आधी 'ट्रेकफिट'च्या वॉटसप ग्रुप वर 'पोचलो' असा मेसेज टाकला.
घरी आलो तेव्हा टी.व्ही. वर बातम्या सुरु होत्या आणि 'चंदेरी' किल्ल्याशेजारच्या अवघड सुळक्यावर एक ट्रेकर अडकला असुन रात्र पडल्यामुळे बचावकार्य उद्या सकाळी सुरु होईल अशी बातमी पाहिली. आपण तर बुवा तारामती वरुन सुखरुप सुटलो असे क्षणभर वाटुन गेले .
पुढचा ट्रेक कोणता असेल या विचारात अंथरुणावर पडलो आणि कळसुबाई नंतर अजुन एक भन्नाट ट्रेक झाल्याच्या आनंदात कधी झोप लागली कळलंच नाही.
छान लिहिलाय लेख। thrilling
छान लिहिलाय लेख। thrilling वाटलं वाचून।
थँक यु वेडोबा
थँक यु वेडोबा . पुढील ट्रेक ला येताय का मग..?
खिरेश्वरहून जुन्नर
खिरेश्वरहून जुन्नर दरवाजामार्गे चढून टोलार खिंडीतून चढलो आणि पाचनई मार्गे उतरलो , अप्रतिम अनुभव, आठवणी जागृत झाल्या , कोकण कडा अगदी अप्रतिम तारामती पॉईंट पण मस्त , अमाप वारे आणि पोवाडे
Pages