*लोहपुरुष, भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आणि ‘ऐक्याचा पुतळा’च्या (Statue of Unity) उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने -*
*सरदार पटेलांचा पोवाडा*
वल्लभभाई पटेल कर्तबगार, जन म्हणती तया सरदार
लोहपुरुष असा भारतात, पुन्हा ना होणार, जीऽऽजी जी जी
पुन्हा ना होणार, जीऽऽजी जी जी ||धृ||
एकतीस ऑक्टोबर अठराशे पंच्याहत्तर सालात, गुजर प्रांतात
खेडा जिल्हा नडियाद गावात, शेतकरी कुटुंबात
लाडबा-झवेरभाईंच्या घरकुलात, बाळ ओरडून सांगे गगनात
पारतंत्र्याच्या जुलमी जंगलात, लेवांचा छावा गर्जणार
वल्लभ भाई पटेल कर्तबगार, जन म्हणती तया सरदार
लोह पुरुष असा भारतात, पुन्हा ना होणार, जीऽऽजी जी जी
पुन्हा ना होणार, जीऽऽजी जी जी ||धृ||
वडिलांच्या शिस्त संगतीत, बालपण गेले शेतात
अठराव्या कुमार वयात, झवेरबांशी लग्न बंधनात
दोन फुले फुलली संसारात, मणी-डाह्या खेळे अंगणात
कष्ट करुनि यश शिक्षणात, अव्वल नंबराने बॅरिस्टर
वल्लभ भाई पटेल कर्तबगार, जन म्हणती तया सरदार
लोह पुरुष असा भारतात, पुन्हा ना होणार, जीऽऽजी जी जी
पुन्हा ना होणार, जीऽऽजी जी जी ||धृ||
वकिली अहमदाबादेत, उडी घेती राजकारणात
विकास नगराचा करीत, अध्यक्षपद आले पदरात
शेतकरी केला संघटित, बारडोलीच्या सत्याग्रहात
म. गांधींच्या सावलीत, लढले स्वातंत्र्या रणांगणावर,
वल्लभ भाई पटेल कर्तबगार, जन म्हणती तया सरदार
लोह पुरुष असा भारतात, पुन्हा ना होणार, जीऽऽजी जी जी
पुन्हा ना होणार, जीऽऽजी जी जी ||धृ||
पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस सालात,
सरदार उपपंतप्रधान, नेहरूंच्या मंत्रीमंडळात
नेहरूंशी जरी मतभेद, नाही केला विश्वासघात
गृहमंत्र्यांचा जादा भार, खंबीर प्रशासक कणखर
वल्लभ भाई पटेल कर्तबगार, जन म्हणती तया सरदार
लोह पुरुष असा भारतात, पुन्हा ना होणार, जीऽऽजी जी जी
पुन्हा ना होणार, जीऽऽजी जी जी ||धृ||
चर्चिल गुंग तुकडे करण्यात, सरदार दंग देश जोडण्यात
बधले नाही इंग्रजांस, केली संस्थाने विलीन झटक्यात
चुकले नाही सैन्य वापरण्यात, ठेवण्या अखंड महान भारत
भारतरत्ना तुझे उपकार, देश नाही कधी विसरणार
वल्लभ भाई पटेल कर्तबगार, जन म्हणती तया सरदार
लोह पुरुष असा भारतात, पुन्हा ना होणार, जीऽऽजी जी जी
पुन्हा ना होणार, जीऽऽजी जी जी ||धृ||
गोळ्या जाता बापू हृदयात, आबा थरारले अंतरात
स्नेह संपला आयुष्यात, नाही राहिला राम जगण्यात
दिवा विझला पंधरा डिसेंबर, एकोणीसशे पन्नास सालात
बापू भेटण्या गेले सरदार, करुनि सकलांना निराधार
वल्लभ भाई पटेल कर्तबगार, जन म्हणती तया सरदार
लोह पुरुष असा भारतात, पुन्हा ना होणार, जीऽऽजी जी जी
पुन्हा ना होणार, जीऽऽजी जी जी ||धृ||
- प्रा. अरुण सु. पाटील (असु)
© सर्व हक्क स्वाधीन
https://www.facebook.com/AsuChyaKavita
वाह खुप दिवसांनी पोवाडा
वाह खुप दिवसांनी पोवाडा प्रकार वाचनात आला. छानच जमला आहे.