बघता मानस होते दंग ३: सातारा- कराड- मलकापूर (११४ किमी)
बघता मानस होते दंग (सायकलीवर पुणे- सातारा- कराड- मलकापूर- आंबा घाट- लांजा- राजापूर- देवगड- कुणकेश्वर) १: प्रस्तावना
८ सप्टेंबरची पहाट. बाहेर बघितलं तेव्हा पूर्ण आकाशात ढग आहेत. लवकरच पाऊस सुरू झाला. आज नक्कीच पाऊस असणार. पण थोड्या वेळाने जेव्हा तयार होऊन सायकल घेऊन निघालो, तेव्हा आकाश अगदी निरभ्र! श्रावण सरींची गंमत आहे ही. सातारा! गावातून निघताना समोर पहा-यासाठी उंच उभा असलेला विराट अजिंक्यतारा दिसतो! मागच्या वेळच्या सातारा प्रवासाच्या आठवणी जाग्या झाल्या! त्या आठवत अजिंक्यता-याच्या जवळून निघालो. सातारा शहराचं सौंदर्य परत एकदा बघायला मिळालं. अजिंक्यता-याच्या मागच्या बाजूने हायवेकडे जाताना काय सुंदर नजारे दिसत आहेत! सातारा जिल्ह्याबरोबरच सातारा शहरही भटक्या व फिटनेस प्रेमींसाठी मस्तच डेस्टीनेशन आहे! अनेक जण मॉर्निंग वॉक करत आहेत, काही जण सायकलीवर आहेत व कोणी पळतानाही दिसतोय! सगळीकडे हिरवागार परिसर आणि निर्जन रस्ता! ह्यावेळी नुसतं साता-यातून जातानाही मस्त सातारा बघायला मिळतंय! दहा वर्षांपूर्वी इथेच जकातवाडी गावात एका मीटींगसाठी आलो होतो, तीही आठवण जागी झाली. गावाच्या इतक्या जवळ असूनही इतकं मस्त निसर्ग सौंदर्य! अजिंक्यता-याला मागच्या बाजूने बघत लवकरच हायवेला आलो. आता कराडपर्यंत हायवे आहे.
हायवेवर सायकल चालवताना खूप दूरवरचे नजारे दिसत आहेत! दूर पवन चक्क्या दिसल्या; मागच्या वेळी गेलो होतो तो सज्जनगडचा परिसरही दूरवरून ओळखू आला. त्या वेळी भेटलेली उरमोडी नदी हायवेजवळ येऊन भेटली. आणि लगेचच आता चढ लागणार, हे कळालं. पण हायवे असल्यामुळे चढ तीव्र नाही आहे. नंतर चढ- उतार सुरू राहिले. आणि पुढे मात्र जाणवलं की, काल दुपारी जेवण न घेतल्यामुळे पडलेला खड्डा आता त्रास देणार. कारण आता ऊर्जा कमी वाटतेय. लवकरच नाश्त्यासाठी उंब्रजला ब्रेक घेतला. पुढे निघतानाही थोडी काळजी वाटतेय. पण मग स्वत:ला समजावलं की, आत्ता संपूर्ण प्रवास- सर्व अंतराचा विचार करायाचाच नाही. आत्ता फक्त पुढचे पंधरा- वीस किलोमीटर इतकाच विचार करायचा. मग थोडं ठीक वाटलं आणि आत्ता सुरू असलेल्या नजा-यांचा आनंद घेता यायला लागला. साता-याच्या पुढे ह्या रोडवर कधीच सायकल चालवली नाहीय, त्यामुळे माझ्यासाठी सायकलिंगचा अगदी नवीन रस्ता आहे. कराड क्रॉस केल्यावर मलकापूर फाट्याजवळ दुस-यांदा नास्था केला. आत्तापर्यंत ६० किमी झाले आहेत. इथे चिक्की बार्स व बिस्किटंही घेतली. कारण इथून मलकापूर सुमारे ५० किमी असेल आणि मध्ये बहुतेक चांगलं हॉटेल लागणार नाही.
आता छोटा रस्ता आहे आणि हळु हळु त्याचाही दर्जा घसरत जाईल. कराडपासून काही अंतरापर्यंत रस्ता चांगला होता व मोठी गावंही होती. पण हळु हळु परिसर अगदी कमी वस्तीचा होत जातोय. लागणारी गावंही वाड्यांसारखी आहेत. इथून मलकापूरपर्यंतच्या रस्त्याचं एक वैशिष्ट्य म्हणजे हा एकच असा मार्ग नाहीय. अनेक रस्त्यांनी जोडून हा रस्ता बनलेला आहे. त्यामुळे मैलाच्या दगडावर फक्त समोरच्या मुख्य गावाचं नाव दिसतंय. म्हणून मध्ये मध्ये मॅपवर रस्ता तपासत राहावं लागतंय. आता सातारा जिल्हा संपत येतोय. रस्ता आता अतिशय दुर्गम भागातून जातोय. कोल्हापूर, सातारा व सांगली जिल्ह्यांच्या सीमा इथे जवळ आहेत. सकाळनंतर अजिबात पाऊस नाहीय. किंबहुना आता फार गरम होतंय. त्यामुळे परत थकवाही येतो आहे. ह्या टप्प्यामध्ये चहाचं हॉटेलही मिळालं नाही. सोबत घेतलेलंच मधून मधून खात पुढे जातोय. पण परत एकदा ऊर्जा स्तर घसरतोय. आणि रस्ताही साधारण असल्यामुळे मलकापूर अजूनही खूप दूर आहे.
पुढे जाताना एका वेळी परत एकदा डिहायड्रेशनची भिती वाटायला लागली. आणि अशा वेळेला अचानक शेडगेवाडी गांव आलं व इथे चक्क मेडीकल स्टोअर मिळालं! तिथे दोन लिक्विड एनर्जालही मिळाले! ते लगेचच पिऊन टाकले. पण हॉटेल नाहीच मिळालं. तरीही दोन एनर्जाल मिळाल्यामुळे थोडं रिलॅक्स झालो. मलकापूर जवळ येतंय, पण मध्ये मध्ये चढ सुरू आहेत. चांदोली राष्ट्रीय उद्यानाच्या जवळ आलो आहे. इथे हा रस्ता सांगली जिल्ह्यामध्ये जातो आहे. अगदीच विरळ वस्तीचा परिसर आहे. आणि आता नजारे मात्र खूप सुंदर दिसत आहेत. दूर पवनचक्क्या दिसत आहेत. पावसाळा संपत आल्यामुळे सर्व निसर्ग हिरवा झालेला आहे. इथे अपेक्षेनुसर एक घाट लागला. पण चढ फार तीव्र नाही. त्यामुळे आरामात तरंगत तरंगत पार केला. पवनचक्क्या रस्त्याच्या अगदी जवळ येत गेल्या. घाट चढल्यावर खाली दूर मलकापूरही दिसतंय आता. लवकरच मलकापूरला पोहचलो. तिस-या दिवसाचा टप्पाही योजनेनुसार पूर्ण झाला. पण वेळ मात्र फार जास्त लागला. आज ११४ किमी झाले (आणि तीन दिवसांमध्ये सुमारे २६८). पण पोहचायला दुपारचे सव्वा तीन वाजले. एकूण सुमारे नऊ तास लागले; त्यातले ब्रेक सोडून सुमारे सात तास सायकल चालवली. आणि आजच्या ११४ किमीमध्ये एकूण १२४७ मीटर चढही होता.
पोहचल्यावर लगेचच चांगला लॉज मिळाला. आज शनिवार आहे व त्यामुळे काही अर्जंट सबमिशन्स आल्या नाहीत, त्यामुळे थोडं बरं वाटलं. पण बाकी बरं वाटत नाहीय. किंचित ताप आल्यासारखं वाटतंय. पूर्ण चेहरा आणि हातावरही क्षार निघाले आहेत. शरीरात डिहायड्रेशनची पूर्ण लक्षणं आहेत. काही वेळ तर वाटलंही की, उद्याचा दिवस ब्रेक घ्यावा. कारण तब्येत ठीक नसेल तर पुढे जाणं आणखी त्रासदायक ठरेल. आणि कोंकणातही सतत चढ- उतारांचे रस्ते लागणार आहेत. संध्याकाळपर्यंत चांगला आराम झाला आणि पाणी पीत राहिल्यामुळे व नाश्ता केल्यामुळे परत थोडी ऊर्जा मिळाली. रात्री चांगलं जेवण केलं आणि तेव्हा मात्र बरं वाटलं. उद्याच्या योजनेत थोडा बदल करून पुढे जाईन. आधी विचार केला होता की, मलकापूरवरून सरळ देवगडला जाईन व तसे १४६ किलोमीटर झाले असते. पण सतत चढ- उताराचे व साधारण दर्जाचे रस्ते असल्यामुळे थोडा बदल करेन. उद्या रविवारी मलकापूरवरून फक्त राजापूरला जाईन- ९२ किलोमीटर होतील आणि सोमवारी देवगड फक्त ५२- ५३ किलोमीटरवर असेल व ते आरामात होईल. आणि उद्या राजापूरला लवकर पोहचलो तर उद्याही देवगडला जाऊ शकतो. संध्याकाळी काही सायकल मित्रांसोबत बोललो. उद्या घाट उतरल्यानंतर साखरप्याला मला एक सायकल मित्र भेटेल. उद्या मी राजापूरला अर्थात् कोंकणात पोहचेन! संध्याकाळपर्यंत मी उद्या पुढे जाऊ शकतो, असा विश्वास व उत्साह परत मिळाला. आज आयुष्यात पहिल्यांदाच सलग दोन दिवसांमध्ये दोन शतकं केली! मेरीडावर चौथं शतक आणि तेही पंक्चर न होता! आणि नजारे तर अद्भुत होतेच!
आजचा लेखाजोखा!
आजचा रूट आणि चढ
अशा इतर सर्व लेखांसाठी- माझा ब्लॉग
सर्व फोटो मस्तं!!!
सर्व फोटो मस्तं!!!
प्रवासवर्णनासाठी मिपावर
प्रवासवर्णनासाठी मिपावर 'भटकंती' ग्रुप आहे तसा काही ग्रुप नाही का माबोवर?
वाचनाबद्दल व प्रतिक्रियेबद्दल
वाचनाबद्दल व प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद! तशा ग्रूपबद्दल मला तरी माहिती नाही.
https://www.maayboli.com/node
https://www.maayboli.com/node/2240 हा ग्रुप आहे बघा. दुसऱ्या एका धाग्यावरील प्रतिसादातून मिळाला.
जुने धागे संपादन करून त्या गटात नेऊ शकता आणि यापुढचे धागे तिथेच काढायचे.
ओके! धन्यवाद!
ओके! धन्यवाद!