बघता मानस होते दंग १: प्रस्तावना
नमस्कार! कोंकणात सायकलीवर फिरणं माझं अनेक वर्षांचं स्वप्न होतं. एकदा त्याचा अयशस्वी प्रयत्नही केला होता. हे स्वप्न नुकतंच पूर्ण झालं. सायकलीवर कोंकणात फिरू शकलो- सोलो सायकलिंग करू शकलो. त्यासंदर्भात आता सविस्तर लिहिणार आहे. पहिली गोष्ट म्हणजे ही मोहीम माझ्या नवीन हायब्रिड सायकलवर- मेरीडा स्पीडर 100 वर केलेली पहिली मोहीम आहे. ह्या सायकलीवर दोन शतकही केले होते. पण प्रत्येक वेळी पंक्चर झालं. माझी जुनी एमटीबी सायकल व ही हायब्रिड सायकल ह्यांच्यातला फरक जुन्या काळातील नोकिया शुद्ध फोन- 3315 आणि आत्ताच्या जनरेशनमधला आय फोन सेव्हन सारखा वाटत होता! त्यामुळे ही सायकल अक्षरश: शिकण्यामध्ये, समजून घेण्यामध्ये व तिच्यासोबत जुळवून घेण्यात ब-याच अडचणी आल्या. सायकलच असली तरी अतिशय आधुनिक व वेगळ्या प्रकारची सायकल असल्यामुळे अनेक गोष्टी शिकाव्या लागल्या- जसं टायर प्रेशर, एक्सेसरीजचा ताळमेळ, रस्त्यावरची ग्रिप इ. हळु हळु हे शिकत गेलो. आणि ह्या पूर्ण प्रक्रियेमध्ये माझे सायकल मित्र आशिष फडणीस अर्थात् आशुचँप ह्यांनी खूप मार्गदर्शन केलं आणि सोबत केली! माझ्या सर्व प्रश्नांना व शंकांना त्यांनी खूपच पेशन्स ठेवून निरसन होण्यास मदत केली! मला फार जास्त प्रश्न पडत होते व समस्याही अनेक येत होत्या! अनेकदा तर वाटायचं की इतक्या नाजुक व नखरे करणा-या सायकलीपेक्षा माझी जुनी एमटीबी काय वाईट होती! तिच्या तर प्रत्येक समस्येवर कोणत्याही दुकानात इलाज मिळत होता आणि ह्या सायकलीला जर काहीही झालं तरी थेट शोरूमकडे जावं लागतंय. त्यामुळे मानसिक दृष्टीनेही बरेच सायास पडले व ह्या सायकलीचे बेसिक्स शिकावे लागले. पण हे करताना आशूचँपजींनी खूप मार्गदर्शन दिलं! ही पहिली मोहीम त्यांनाच अर्पण करतो आहे! असं करता करता हळु हळु सायकलीसोबत मैत्री झाली! ह्या सायकलीला 'मेरी' हे नाव दिलं!
मेरी सायकलीवर अनेक छोट्या राईडस केल्या व दोन शतकही केले. जेव्हा सायकलीशी चांगला ताळमेळ जुळला व मैत्री झाली, तेव्हा एका मोहीमेची इच्छा झाली. त्याच काळात जुन्या पद्धतीच्या ओल्ड इज गोल्ड एटलस सायकलीवरसुद्धा एक नितांत रमणीय प्रवास झाला. त्यामुळे ह्या सायकलीच्या मोहीमेसाठी थोडी वाट बघावी लागली. लहानपणापासून मी कोंकणातल्या देवगडला जात राहिलो आहे. आजही आठवतं लहान असताना खेळण्यातली बस घेऊन घरी बसल्या बसल्या परभणी- कोल्हापूर- देवगड असा प्रवास करायचो! घरातच बस चालवून देवगडला जाण्याची कल्पना करायचो. माझ्यासाठी हे स्वप्नवत् स्थान आहे! समुद्र किनारा व निसर्ग सौंदर्याची पखरण असलेलं देवगड! त्यामुळे नवीन सायकलीची पहिली मोहीम इथे करावीशी वाटली. आणि गणपतीच्या दिवसांमध्ये हा योग आला! सायकलीवर पुणे- देवगड जाण्यासाठी तयार झालो. गेल्या वर्षी केलेला सातारा प्रवास व ह्या वर्षीचा एटलस सायकलीवर केलेला योग- प्रसार प्रवास खूप काही शिकवून गेला. त्यामुळे जास्त चिंता नाही आहे. आरामात तयारी झाली. तसेच, हाफ मॅरेथॉन स्तरापर्यंतच्या रनिंगच्या सवयीने स्टॅमिना व उत्साहसुद्धा वाढला आहे. आता पाहिजे तेव्हा २५ किंवा ३० किमी पळू शकतो. त्यामुळे मानसिक तयारीही चांगली झाली आहे. इतकं रनिंग करता येत असल्यामुळे सायकलिंग सोपं होतं. मानसिक दृष्टीनेही अजिबात कठिण वाटत नाही. त्यामुळे काहीच अडचण नाही. ह्यावेळीही नेहमीचाच फॉर्म्युला ठेवेन- रोज सकाळी साडेपाच ते अकरा वाजेपर्यंत पाच- सहा तास सायकल चालवेन व नंतर एखाद्या ठिकाणी थांबून लॅपटॉपवर माझं कामही करेन. तशी ही मोहीम छोटीच असेल- सात आठ दिवसांची. गणपतीच्या दिवसांमध्येच कोंकणात पोचेन!
६ सप्टेंबरला सकाळी चाकणवरून निघालो. आज फक्त धायरी डिएसकेमध्ये भावाकडे ५० किलोमीटर अंतर जायचं आहे. पुढचे टप्पे बघता हा फक्त वॉर्म अपच आहे. छोटा टप्पा असला तरी मानसिक दृष्टीने कोणत्याही मोहीमेचा पहिला दिवस खूप महत्त्वाचा असतो. शरीर व मन मोहीमेच्या लयीत येत असतात. मोहीमेचा पाया उभा राहतो. अगदी आरामात अडीच तासांमध्ये हा टप्पा पूर्ण केला. वाटेत माझ्या मित्रालाही भेटलो. सायकलिंगचा चांगला सराव असल्याने चांगला वेग मिळाला.
पोहचल्यावर थोडा आराम केला व लॅपटॉपवरचं रूटीन कामही केलं. संध्याकाळी सायकलीवर एक चक्कर मारली, तेव्हा हवा थोडी कमी वाटली. ह्या मोहीमेत मी छोटा पंप घेतला आहे. त्याने हवा भरली, तर नीट भरली जात नाहीय. मला त्याचा तितका चांगला सराव नाहीय. हायब्रिड सायकलीशी मैत्री अजून नवी आहे, इंडक्शनही पूर्ण झालेलं नाहीय. प्रयत्न करत राहिलो. एकदा वाटलं की, इथे मॅकेनिक आहे, त्याच्याकडूनच भरून घेतो. पण थोडा प्रयत्न केला व मग हवा भरता आली. हळु हळु सॉफ्ट हँडसनी हवा भरू शकलो. टायर प्रेशरचं जजमेंट आलं आहे, त्यामुळे तितकी हवा भरून हुश्श केलं! आता उद्याचा पहिला मोठा टप्पा असेल. पुण्यातून साता-याला जाईन आणि माझं ह्या सायकलीवरचं तिसरं शतकही होईल. बघूया कसं होतंय!
आज फक्त वॉर्म अप- ५० किमी
अशा इतर सर्व लेखांसाठी- माझा ब्लॉग
Wow, अमेझिंग,
Wow, अमेझिंग,
नुकतेच सायकलिंग विश्वात पावले टाकायला सुरवात केली आहे, त्यामुळे हे सगळे प्रवास सध्या "आ" वासून पाहतो आहे
मस्त. संपूर्ण प्रवास वाचायची
मस्त. संपूर्ण प्रवास वाचायची उत्सुकता आहे.
छायाचित्रांमुळे तुमच्यासोबत सफर करण्याची मजा येणार हे नक्की!
मस्तच...
मस्तच...
तो सायकलचा फोटो बघून अरे काय
तो सायकलचा फोटो बघून अरे काय केलेस रे सायकलचे असे झाले. नंतर लक्षात आले कोकणातली लाल माती लागलीये
मस्तच रे, उशिराने का होईना
मस्तच रे, उशिराने का होईना वाचतोय
खुप छान मार्गी जी...पुढील
खुप छान मार्गी जी...पुढील भागाच्या प्रतीक्षेत
वा.. मस्त..
वा.. मस्त..
मस्तं!! आमचीसुद्धा कोकणसफर
मस्तं!! आमचीसुद्धा कोकणसफर होतेय.
माझं ह्या सायकलीवरचं तिसरं शतकही होईल. >>> म्हणजे काय? कश्याविषयी म्हणताय? नाही समजले.
वाचनाबद्दल व
वाचनाबद्दल व प्रतिक्रियांबद्दल सर्वांना खूप खूप धन्यवाद!
@ सचिन काळे जी, तिसरं शतक म्हणजे ह्या सायकलीवर तिस-यांना १०० किमी + करेन.
@ मार्गी, ohh!! अस्सं होय!
@ मार्गी, ohh!! अस्सं होय! छान!!
भन्नाट !
भन्नाट !
एकट्याने असा प्रवास करण्यासाठी मोठ्या धीराची , चिकाटीची गरज असते.
निसर्गाशी मनसोक्त हितगूज करणे आणि स्वतःची नव्याने ओळख करून घेणे ... दोन्हीही आनंददायी!
आणि शिवाय रोज एक स्पर्धा जिंकल्याचा आनंद !!!
पुधच्या भागांच्या प्रतीक्षेत !
एकट्याने असा प्रवास
एकट्याने असा प्रवास करण्यासाठी मोठ्या धीराची , चिकाटीची गरज असते. >>> एकट्याने प्रवासाचा निर्णय घेण्याचं कारण, त्याचे फायदे तोटे, आपणांस एकटेपणाचे आलेले बरेवाईट अनुभव यांविषयी लिहा ना!!
एकट्याने असा प्रवास
एकट्याने असा प्रवास करण्यासाठी मोठ्या धीराची , चिकाटीची गरज असते. >> +११११११११११११११११११११११११
खूप आवडते तुमचे कार्य आणि ही लेखमाला.
अतिशय सुंदर उतरला आहे हा पहिला भाग... तुमच्या बरोबर प्रवास करत आहे असे वाटते... प्रकाशचित्र ही अप्रतिम.
आता पुढचे सगळे भाग वाचायला घेतो.