उम्रने तलाशी ली तो जेबोंसे लम्हे बरामद हुए
कुछ गमके, कुछ नम थे, कुछ टूटे
बस कुछ सही सलामत मिले
जो बचपनके थे
त्या संध्याकाळी किती दिवसांनी संधिप्रकाश पाहिला. संधिप्रकाशच म्हणतात ना त्याला? सूर्यास्ताच्या आधी आकाशात भरून राहिलेला सोनेरी रंग असतो तो? काही काही शब्द फक्त कवितेत वाचले, प्रत्यक्ष पाहिले किंवा अनुभवले नाहीत. झुंजूमुंजू होणं म्हणजे काय असतं? हळदुली उन्हं काय असतात? आकाशात रंगांची उधळण होते म्हणजे नेमकं काय होतं? ऋतू बदलायची चाहूल कशी लागते? अश्या अनेक गोष्टी. आता तर जन्माची मोट शहराशी बांधलेय. गाव नेहमी स्वप्नातच राहिला. पण त्या संध्याकाळी मी तो संधिप्रकाश डोळे भरून पाहिला. बिछान्याला पाठ टेकवली की झोपेच्या अधीन व्हायच्या आधी हे असले क्षण न बोलावता डोळ्यांआड हजर होतात. फक्त जेव्हा ते पहिल्यांदा मिळतात तेव्हा त्यांची बेगमी करून ठेवायची असते.
कारण पदोपदी धडपडायला, ठेचकाळायला, चाचपडायला लावणाऱ्या जगण्याच्या रामरगाड्यात ते फार कमी वेळा मिळतात.
----
माझं त्याच्याकडे लक्ष जायचं काहीच कारण नव्हतं. सिद्धिविनायक मंदिरावरून रोज जायचं म्हणजे अनेक गोष्टींकडे दुर्लक्ष करावं लागतं - लोकांना इन्स्टंट पुण्यसंचय करता यावा म्हणून रस्त्यालगत बांधलेल्या गाईच्या शेणाचा वास, नर्दुल्ला टँक मैदानात मेट्रोचं काम सुरु होताच तिथनं गाशा गुंडाळलेल्या आणि सुरज बरजात्याला झीट आणेल एव्हढ्या मोठ्या संयुक्त कुटुंबाचा (ह्यात दर काही महिन्यांनी नवा मेंबर दिसतोच!) फुटपाथच्या दोन्ही बाजूंना पसरलेला संसार, सॅन्डवीच-'मेंदु'वडे-डोसा-इडली विकणाऱ्या स्टॉलवाल्यासमोरची बकाबका खाणारी फुटपाथभर सांडलेली गर्दी, ‘बोला हरिविठ्ठल पांडुरंग बोला' सारखा ‘बोला घरगुती नाश्ता बोला' चा पुकारा, आपण मंदिरात जातोय की नाही ह्याची तमा न बाळगता ‘इथे चप्पल काढून ठेवा' म्हणत पावलोपावली रस्ता अडवणारे दुकानदार, रहदारीचा अर्धा रस्ता व्यापून बांधलेल्या भिंतीलगतच्या दशांगुळे जागेतल्या वाटेवरची बाहेरगावाहून दर्शनाला आलेल्या लोकांची मुंग्यांसारखी रांग आणि ह्या सगळ्यांना पुरून उरलेली भिकार्यांची गर्दी. त्यातच तो कुठेतरी उभा असणार.
पण माझं त्याच्याकडे लक्ष गेलं. देवळावरून पुढे गेलं की शेअर टॅक्सींची जी जागा आहे तिथे इमानेइतबारे गाडी उभी करणाऱ्या काही मूठभर टॅक्सीवाल्यांपैकी एकाच्या टॅक्सीत शिरायला ती मुलगी येत होती तेव्हा नेमका विरुद्ध दिशेने हा भिकारी येत होता. अस्ताव्यस्त वाढलेले केस. अस्ताव्यस्त वाढलेली दाढी. अंगावर मळकट शर्ट. मध्यमवयीन. तिला बघून चटकन बाजूला होत त्याने वाट करून दिली. ती आत शिरल्यावरच तो आपल्या वाटेने गेला. ‘समझदार है बंदा. सयाने लोगोंसेभी ज्यादा समझदार' हे टॅक्सीवाल्याचं प्रशस्तिपत्रक त्याच्या गावीही नव्हतं. मग तिथनं जाताना जवळपास रोजच हा 'समझदार बंदा' मला दिसायचा. कधीकधी तो समोर दिसला नाही तर मी चालताचालता का होईना आसपास नजर टाकायची.
आणि असंच एक दिवस तो लंगडताना दिसला. पायाला फडकं गुंडाळलेलं होतं. काही लागलं होतं का कुत्रा चावला होता काय माहित. नाही म्हटलं तरी मला थोडी चुटपूट लागली. काय करावं? त्याला डॉक्टरकडे वगैरे घेऊन जायचा उत्साह म्हणा, इच्छाशक्ती म्हणा, नव्हती. २-३ दिवस त्याला पाहत होते. मग 'मुल्लाकी दौड मस्जिद तक' ह्या न्यायाने नेटवर सर्च केला कारण अस्मादिक 'शिवाजीमहाराज जन्माला यावेत पण ते दुसर्याच्या घरी' ह्या संप्रदायातले ना. फारसं काही हाती लागलं नाही. TISS तर्फे अश्या लोकांना मदत करायचा काही प्रोजेक्ट आहे एव्हढं कळलं. त्यांना मेल टाकली. उत्तराची अपेक्षा नव्हती. तरी ते यावं असं फार वाटत होतं. नाही आलं. पण ती मेल टाकल्याच्या दुसर्याच दिवशी तो भिकारी दिसला नाही. मग कितीतरी दिवस दिसला नाही. त्याला काही रोग झाला असावा म्हणून लोकांनी हाकलून लावलं असेल का? का कोणी दवाखान्यात दाखल केलं असेल? कळायला काही मार्ग नव्हता. काही दिवसांनंतर मीही त्याला विसरून गेले.
मग अचानक एक दिवस तो पुन्हा दिसला. मी लगेच त्याच्या पायाकडे पाहिलं. फडकं गायब. जखम वगैरे काही नाही. ठीकठाक होता. खूप बरं वाटलं. तसं वाटणं माणुसकीला धरूनच होतं म्हणा. पण आपण माणूस असल्याचा आनंद वगैरे नाही झाला मला. का माहित आहे?
कारण तो जेव्हा अचानक गायब झाला होता तेव्हा मला प्रचंड हायसं वाटलं होतं. आपल्या डोळ्यांदेखत एक माणूस त्रासात आहे आणि आपण त्याला मदत करायला काहीही करत नाही आहोत ही टोचणी त्याच्यासोबतच गायब झाली होती ना. हे कुठे माणुसकीला धरून होतं?
माझा असा टीचभर बुटका अर्धामुर्धा माणूस ह्याआधीही बऱ्याचदा झालाय. पण आता तो माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत तसाच राहणार आहे ही बोचरी जाणीव नवी आहे. आणि ती खूप त्रास देते. कधीकधी.
-----
ह्याआधीच्या पन्न्यांंत माझ्या सरांचा उल्लेख झालाय. माझ्या शाळकरी दिवसांत मी जो क्लास लावला होता तिथे ते गणित शिकवायचे. आता आम्ही Whatsapp वरून संपर्कात असतो. दोन वर्षांपूर्वी एकदा गणपतीच्या दिवसांत भेटलो होतो. तसे ते माझ्या घराच्या जवळच राहतात - चालत जायला जेमतेम अर्धा तास लागेल. पण माणसं जितक्या कमी अंतरावर राहतात तेव्हढी त्यांना जाऊन भेटण्यात जास्त चालढकल होते. तेच माझं झालंय सध्या. असो.
Whatsapp वरून संपर्क म्हणजे एकमेकांना आलेले informative मेसेजेस फॉरवर्ड करणं, त्यावर चर्चा असं चालतं. कधीकधी देशात काय चाललंय ह्यावर सरांची एखादी टिप्पणी असते. त्यावर ह्या विषयातल्या माझ्या त्रोटक ज्ञानाला झेपेल असं माझं उत्तर असतं. आम्ही वादही घालतो एकमेकांशी. म्हणजे मी वाद घालते. त्यांचा सूर शांत असतो. अनेक वर्षापूर्वी वर्गात असायचा तसा. काही महिन्यांपूर्वी अश्याच एका तेव्हाच्या (आपल्या देशात डेंग्यू, मलेरिया ह्यासारख्या ह्या साथीही येतात महिन्याच्या महिन्याला!) ज्वलंत विषयावर त्यांचे काही फॉरवर्डेड मेसेजेस आले. काही मी पाठवले. थोडीफार चर्चा झाली. अहो आश्चर्यम! कधी नव्हे ते एकमतही झालं. विषय कोणता ते इथे सांगत नाही. उगाच रणकंदन नको.
मग सर म्हणाले ह्या विषयावर त्यांच्याकडे अजून काही मेसेजेस आहेत पण ते मेसेजेस ते मला पाठवू शकत नाहीत कारण त्यात काही वाईट शब्द आहेत. त्यांचा हा मेसेज वाचून आधी मला हसायलाच आलं. सर अजून मला १४-१५ वर्षांचीच समजताहेत का काय? 'अहो सर, मी Adult होऊनही खूप वर्षं झाली आता' मी एक स्मायली टाकून म्हटलं. उत्तरादाखल स्मायली आला आणि सरांचं उत्तर 'माहित आहे ग मला. पण गुरू-शिष्यांत कसा संवाद असावा त्यालाही काही मर्यादा आहेत. हे असे शब्द त्यात येता कामा नयेत. ह्याला वाचिक तप म्हण हवं तर'.
वाचिक तप? हा असा काही प्रकार असतो ह्याचा मला पत्ताच नव्हता. माझ्या डोळ्यांसमोर नाक्यानाक्यावर उभ्या असलेल्या घोळक्यांत लाडाने एकदुसर्याला मा****, भें**, आई*** असल्या शिव्या सहज घालणारे आणि काहीही वाटून न घेता त्या ऐकून घेणारे अनेक जण आले. मी कितीतरी वेळा त्यांच्याकडे नाराजीने पाहिलं आहे. पण ते त्यांच्या गावीही नसतं. आपण काही बोलायला गेलो तर 'ओ बाई, तुमच्या आई-बहिणीला शिवी दिलीय का?' असंही विचारायला हे लोक कमी करणार नाहीत ह्याची खात्री आहे मला. आणि ह्या असल्या जगात माझे सर वाचिक तपाविषयी बोलताहेत? हायला!
ह्या 'हायला' भोवती जीभ अडखळली. Shit, F***, चायला हे शब्द लहानपणी नव्हते आपल्या तोंडी. पण आता किती सहजपणे येऊन बसलेत हेही जाणवलं. ही सवय घालवायला अक्षरश: भगिरथ प्रयत्न करावे लागणार आहेत. तेव्हढी चिकाटी आणि Will Power राहिली नसणार अशीही शंका आहे. But I am going to eat this elephant one bite at a time.
One...bite...at...a...time.
-----
'या ताई' तिने तोंडभरून स्वागत केलं.
गेल्या काही महिन्यांपासून रोज सकाळी ती भाजीवाली माझ्या रोजच्या यायच्या-जायच्या रस्त्यावर बसायला लागलेली होती. तिच्याकडची भाजी छान ताजी असते. एखादी भाजी फार नको असेल (माझ्या लेखी फरसबी, तोंडली, भेंडी, घेवडी, चवळी ह्या सगळ्या भाज्या ह्या सदरात मोडतात!) तर १० रुपयांचा वाटा पण देते. आणि बघावं तेव्हा हसतमुख. कधी कपाळावर आठ्या नाही बघितल्या मी तिच्या. पालघरवरून येते म्हणे. घरी परत गेल्यावर शेतावर काम करते असं तिनेच मला एकदा सांगितलं होतं. मनोमन मी तिला हात जोडले होते.
'बांबू नाही आणलेत?' मी कोवळ्या बांबूबद्दल विचारत होते. आम्ही त्याला कोंब म्हणतो. सारस्वतांत ह्याची भाजी आणि आमटी करतात. मला स्वत:ला दोन्ही अजिबात आवडत नाही. पण आईला आवडतात. १-२ वेळा ह्या भाजीवालीने आणूनही दिले होते. आईसाहेबांना अजून एकदा हवे होते. पावसाळा संपला की हे नाही मिळत.
'काल आणले होते ताई. तुम्ही नाही आलात. मग मी आणखी एक गिर्हाईक आलं होतं त्यांना देऊन टाकले' चुटपुटत्या आवाजात ती म्हणाली. माझा जळफळाट झाला. दानेदानेपे लिखा है खानेवालेका नाम.
'मला काय हो माहित तुम्ही बांबू आणणार म्हणून. काल मी एक काम होतं म्हणून दुसर्या रस्त्याने गेले' मी पडलेल्या आवाजात म्हटलं. मग मला एकदम आठवलं की एके दिवशी सकाळी हिला मोबाईलवर बोलताना पाहिलं होतं.
'तुमच्याकडे फोन आहे ना? मला नंबर द्या बघू तुमचा. तुम्हाला फोन करून विचारत जाईन.'
तिने पर्स उघडून आतून ट्रेनचा पास काढला. त्यासोबत एक कार्ड होतं. त्याच्या मागच्या भागावर तिचा नंबर लिहिला होता. मी तो मोबाईल मध्ये टिपून घेतला आणि ते कार्ड तिला परत केलं.
'बघा उद्या बांबू मिळाले तर. मी फोन करते सकाळी.'
'चालेल ताई. कविताताई नाव लिहा'
'काय?'
'फोनमध्ये माझं नाव कविताताई लिहा'
'ओह, हा, लिहिते'. मी काहीसं ओशाळून म्हटलं.
तिथून पुढे गेल्यावर मी फोनचं अॅड्रेस बुक उघडलं. त्यात 'भाजीवाली' असं टाईपलं होतं ते डिलीट करून तिथे 'कविताताई' हे नाव टाकलं.
शेक्सपियरचं चुकलंच बघा. नावात बरंच काही आहे.
-----
'घे' माझी मैत्रीण डबा पुढे करत म्हणाली.
'काय आहे?'
'एग भुर्जी'
'अगं पण.....आज मंगळवार आहे' मी नकळत बोलून गेले.
'मंगळवार? पण आता तुझा देवावर विश्वास नाही ना?' तिने आश्चर्याने विचारलं.
'हो ग.....पण......' मी पुढे बोलूच नाही शकले.
खरं आहे की आता माझा देवावर विश्वास नाही. कारणं बरीचशी खाजगी. काही सार्वजनिक. किंबहुना खाजगी कारणांनंतर अचानक दिसू लागलेली सार्वजनिक कारणं. त्याचा उहापोह करायचं हे स्थळ नव्हे, हा काळ नव्हे आणि ही वेळ नव्हे. उहापोह तरी कशाला करायचा म्हणा. मीही आधी 'देव आहे रे' कंपूत होतेच की. आता 'देव नाही रे' कंपूत आहे. एव्हढंच. भूतांवर विश्वास असणारे आणि नसणारे कसे हिरीरीने एकमेकांशी भांडतात पण स्वत:चा मुद्दा काही दुसर्याला पटवून देऊ शकत नाहीत तसंच हेही. तस्मात ज्याचा विश्वास आहे त्याला ठेवू द्यावा. ज्याचा नाही त्याचा नसू द्यावा.
पण मी खरंच ' देव आहे रे' कंपूत पूर्णपणे होते का कधी? 'अमुक एक पाहिजे म्हणून तमुक एक देईन' असे नवस केले खरे. 'तमुक एक' द्यायची वेळच कधी आली नाही कारण 'अमुक एक' मिळालंच नाही कधी. ते जाऊ द्या. पण असे नवस करूनही 'काही मिळावं म्हणून देवाला काही द्यावं का लागतं' हे कधी कळलं नाही. आपण मनापासून अथक प्रयत्न केले की तो देणारच हा विश्वास का नाही वाटला कधी? अमुक एक गणपती नवसाला पावणारा असतो. पण गणपती ह्या देवाचं तो केवळ एक रूप असतो मग त्याची बाकीची रूपं नवसाला पावत नाहीत? का? हेही कधी कळलं नाही. दर मंगळवारी, संकष्टी चतुर्थीला सिद्धीविनायकाच्या बाहेरच का उभं रहायचं? का गाभार्यातल्या पुजाऱ्याचा 'पुढे चला' चा ओरडा ऐकून घ्यायचा? घरच्या देव्हार्यातल्या गणपतीला नमस्कार केलेला नाही का चालणार? तुम्ही म्हणाल हे सगळं धर्माचं बाजारीकरण झालंय. मान्य आहे. पण मग देव का नाही थांबवत हे? का नाही त्याच्या भक्तांना सद्बुध्दी देत? ५ महिन्यांच्या निष्पाप बाळाला घेऊन जाणार्या देवाला मरायची वाट पाहणारे लोक का नाही दिसत? हे पूर्वजन्मीचं देणं असेल तर ही देणी देव त्याच जन्मात का नाही फेडून घेत? दोन भावंडांचं भांडण १०-१५ मिनिटांत मिटलं नाही तर आई मध्ये पडते. मग इथे शतकानुशतकं लोक न बघितलेल्या देवावरून भांडताहेत, खून पाडताहेत तर का नाही तो देव समोर येऊन त्यांना सांगत की बाबांनो भांडू नका रे, मी एकच आहे? देवाचं नाव घेऊन हा भवसागर वगैरे तरून जायचाय तर देवाने त्यात आपल्याला आधी लोटलंच का? बसलो असतो ना निवांत सगळे देव देव करत. हे प्रश्न देवळाबाहेरून जाताना नमस्कार करतानाही पडायचे. थोडक्यात काय तर तेव्हाही मी पूर्णपणे आस्तिक नव्हतेच. आणि आता पूर्णपणे नास्तिकही होऊ शकत नाहिये.
त्यामुळे गोची एव्हढीच झालेय की आता देवळासमोरून जाताना हातही जोडले जात नाहीत. आणि मंगळवारी एग भुर्जीही खाता येत नाही.
-----
पूर्वी खूप गोष्टी मुठीत सामावून घ्यायची धडपड असायची. उत्साह असायचा. आता बहुतेक वेळा मुठीत जे काही आहे निदान ते तरी निसटून जाऊ नये म्हणून केविलवाणी धडपड चालते. पण सूर तक्रारीचा किंवा निराशावादी नाही. 'आहे हे असं आहे' हे एकदा आपल्याशीच मान्य केलं की मग ते - अगदी कणभर का होईना पण - अधिक चांगलं कसं करता येईल हा विचार, अधेमध्ये का होईना, पण करता येतो ही काळ्या ढगाची सोनेरी किनार आहे. अन ती हलकीशी किनार आहे म्हणूनच ह्या जगण्याला 'आयुष्य' म्हणायला जीभ अजून तरी रेटतेय.
फक्त एका शायराने म्हटलंय तसं एकच मागणं आहे.
इतनी बदसलूकी ना कर ऐ जिंदगी
हम कौनसे यहा बार बार आनेवाले है
--
वि. सू. १. लेखातले दोन्ही शेर फॉरवर्डॅड आहेत.
वि. सू. २. ह्या लेखातलं काही नाही पटलं तर सोडून द्या. कृपया वाद घालू नका ही दोन्ही हात जोडून कळकळीची विनंती.
छान.
छान.
नेहमीप्रमाणे छान लिहिलंय
नेहमीप्रमाणे छान लिहिलंय
त्या संध्याकाळी किती दिवसांनी संधिप्रकाश पाहिला. संधिप्रकाशच म्हणतात ना त्याला?.......... कारण पदोपदी धडपडायला, ठेचकाळायला, चाचपडायला लावणाऱ्या जगण्याच्या रामरगाड्यात ते फार कमी वेळा मिळतात.>>> हे फारच आवडलं
वाचिक तप >> हि कल्पना खुप
वाचिक तप >> हि कल्पना खुप आवडली, पटली..
लेखन खुप हळवं आहे स्वप्ना, काय माहिती का, पण डोळ्यात पाणी आलं..
रीलेट झालं (मी देव आहे रे कम्पूमधली असले तरीही
पन्ना लिहिल्याबद्दल आणि कळवल्याब्द्दल तुझे आभार !!
ज्जे बात, वेलकम बॅक टू पन्ने
ज्जे बात, वेलकम बॅक टू पन्ने
>>>
>>>
पूर्वी खूप गोष्टी मुठीत सामावून घ्यायची धडपड असायची. उत्साह असायचा. आता बहुतेक वेळा मुठीत जे काही आहे निदान ते तरी निसटून जाऊ नये म्हणून केविलवाणी धडपड चालते.
<<<
छान लिहिलंय. आवडलं.
हे पान सुद्धा आवडलं
हे पान सुद्धा आवडलं
हा पन्नाही सुंदर. मी वाटच
हा पन्नाही सुंदर. मी वाटच पहात होते नवीन पन्न्याची.
वाचिक तप फारच आवडलं. माझी बहिण आहे या कॅटेगरीत.
भिकार्याची गोष्ट आणि स्वतःचा केलेला अॅनालिसीस एकदम प्रामाणिक वाटलं. तसंही तुझे पन्ने प्रामाणिक असतात. कदाचित म्हणूनच एकदम भावतात ते.
खूपच मस्त....
खूपच मस्त....
सगळेच प्रसंग / अनुभव वाचताना मनात अगदी अगदी उमटत होतं....
लेखनशैली अगदी जमलेलीच ....
सुंदर लिहिलयं!
सुंदर लिहिलयं!
स्वप्नाजी, तुमच्या लेखातील
स्वप्नाजी, तुमच्या लेखातील कित्येक भावनांशी पूर्ण पणे सहमत झाले. माझेच विचार वाचतेय असे वाटले.
सुंदर सुंदर सुंदर!!! इसके आगे
सुंदर सुंदर सुंदर!!! इसके आगे और क्या कहें. ... समझा करो!!!
तुझे पन्ने प्रामाणिक असतात.
तुझे पन्ने प्रामाणिक असतात. कदाचित म्हणूनच एकदम भावतात ते.>> +१.
खूप सुंदर लिहिलंयत स्वप्ना.
त्यामुळे गोची एव्हढीच झालेय की आता देवळासमोरून जाताना हातही जोडले जात नाहीत. आणि मंगळवारी एग भुर्जीही खाता येत नाही.>> हे वाचून खूप हसू आलं. आधीपासूनचे संस्कार पुसता येत नाहीत, हेही खरंच.
नेहमीप्रमाणे सुरेख पन्ना.
नेहमीप्रमाणे सुरेख पन्ना. प्रत्येकवेळी पन्ना वाचताना वाटते की हाच सगळ्यात बेस्ट असेल पण सगळेच पन्ने चढत्या क्रमाने सुंदर होत जात आहेत.
आताच बोकलत यान्चा प्रतिसाद
आताच बोकलत यान्चा प्रतिसाद वाचला "पुर्वीसारखी मायबोली राहिली नाही"
आणि लगेच तुझा पन्ना वाचला. खुप बरे वाटले.
कधी कधी आपणच प्रयत्न करावेत काही गोष्टी बदलण्यासाठी.
शेर पण बहोत खुब!
तुझ्या मनातले सर्व तमुक तुला मिळोत म्ह्णुन मी देवाकडे तुझ्यासाठी रदबदली करते!
सुंदर लिहिले आहे.
सुंदर लिहिले आहे.
खुप सुंदर लिहिलायस पन्ना.
खुप सुंदर लिहिलायस पन्ना. नेहमीसारखाच भिडला.
असा टीचभर बुटका अर्धामुर्धा माणूस > >>>>>>>>>> माझाही झालाय बरेचदा. मनोमन मान्य केलंय स्वतःचं खुजेपण.
वाचिक तप>>>>>> हे बाणवायला जे धैर्य लागेल तेच एक तप होईल खरं तर आता
भाजीवाली, इस्त्रीवाला असे बरेच आहेत कॉन्टॅक्ट लिस्ट मधे
देववाबद्दलचं जे द्वंद्व लिहिलयंस ते अगदी माझ्या मनातलं. सेम टू सेम.
आधी देव आहे रे फेज. देवा मला पाव. माला हे दे मी तुला ते देईन. आणि आता देव खरंच आहे का ही फेज. गोची खरंच.
छान लिहीलं आहेस स्वप्ना.
छान लिहीलं आहेस स्वप्ना. वाचिक तप फारचं आवडलं.
मी आधी देव आहे रे फेज. मग आहे की नाही डळमळीत आणि आता परत आहे रे फेज मध्ये. काही काही संकेत असे मिळून गेले की आहेच अशी खात्री पटली. असो. तो माझा वैयक्तिक अनुभव .
हा पन्ना खूप दिवसांनी आला. लिहीत रहा. येऊ देत पुढचे पन्ने लवकर.
सुरेख! दिलसे लिखी बात दिलतक
सुरेख! दिलसे लिखी बात दिलतक पहूँचही जाती है!
तुम्ही लिहिलेली पानं वाचायला
तुम्ही लिहिलेली पानं वाचायला आवडतात. आवर्जुन लिहित रहा.
देव नाही रे कंपूत स्वागत
छान लिहीले आहे.
छान लिहीले आहे.
भाजीवाली ते कविता ताई हे खुप आवडले.
(अवांतर आहे पण सांगावेसे वाटते.
एक प्रसंग आठवला. लहान असताना एकदा आईच्या हॉस्पिटल मधे गेले होते. आई ने एका मैत्रिणीला इंटर्कॉम वरून कॉल कर असे सांगीतले. त्य मावशीच्या सेक्शन चा नं माहीत नव्ह्ता, आई म्हणाली की ऑपरेटर ना विचार. मी नं डायल केला आणि त्या ऑपरेटर ना म्ह्णाले, 'ऑपरेटर या सेक्शन चा एक्सटेन्शन सांगा. ' फोन पुर्ण झाला. मग आईचा प्रेमाचा ओरडा मिळाला. 'ऑपरेटर ही त्यांची कामाची पोस्ट आहे. मवशी, मॅडम, ताई अस काहीही संबोधायचस. माणसाला आदरार्थी बोलावे. 'कामावरुन' हाक मारु नये.' अंजन घातले अगदी. आता कोणीही असले तरी दादा, ताई, मवशी, काकु अशी नाती जोडली जातात.)
सुरेख लेख आहे.बाकी ते
सुरेख लेख आहे.बाकी ते देवाबाबतच पटलं.
'आहे हे असं आहे' हे एकदा
'आहे हे असं आहे' हे एकदा आपल्याशीच मान्य केलं की मग ते - अगदी कणभर का होईना पण - अधिक चांगलं कसं करता येईल हा विचार, अधेमध्ये का होईना, पण करता येतो ही काळ्या ढगाची सोनेरी किनार आहे. >>>
+1
छान लिहिलय....
छान वाटलं। सवडीने वाचू म्हणून
छान वाटलं। सवडीने वाचू म्हणून मागे टाकले होते ते आता वाचले। चांगल लेखन घाईघाईत वाचावस नाही वाटत। बुटका माणूस उपमा खूप आवडली। संबोधन वापरायची सवय आईने कृतीतून च लावली आहे।
>>>५ महिन्यांच्या निष्पाप
>>>५ महिन्यांच्या निष्पाप बाळाला घेऊन जाणार्या देवाला मरायची वाट पाहणारे लोक का नाही दिसत? <<<<
अगदी “ह्याच” शब्दात मी भाण्डलेय एका आजीशी...
तर अंड खाण्यावरूनही अगदी असेच व्हायचे पुर्वी... आणि आठवते आजी, तिचा ओरडा खालेल्ला असेच मंगळवारीच अंड खावून आले मैत्रीणीच्या घरी. लहान होते म्हणून खरे तर समजलेच नाही का इतकी ओरडली पण इतका राग आला की मग तर मुद्दाम्हून तिला चिडवायला खोटच सांगायची.
मोठेपणी, हॉस्टेलात, अण्ड बुरजी हेच खायची पण खाण्याआधी सुरवातीला “उगीच” आजी आठवायची आणि तिचे शब्द,
“धर्म सोडलास का? आपण असला मांसाहार करत नाही, गणपतीचा वार आहे“. सगळं अगदी कंडिण्शनिंग केल्याने व्हायचे. नंतर काहीच वाटेनासे झाले. अगदी भाण्डून मुद्दाम्हून खायचे अंड तेही घरी आणून आजीच्य समोर. आजी म्हातारी झालेली म्हणून जोर नाही आणि मी तरुण मस्ती..
पण मध्येच कधीतरी वाटते खरे, जेव्हा कँलेडरावर नजर जाते आणि संकष्टी दिसते, उगाच एक मिनिटं वाटते? खरच आपण देवाला मानत नाही?
लालबागच्या गणपतीला जाणारे आणि लायनीत दहा तास उब्बे रहाणारे पाहिले की, असेच वाटते.. पण हेच खरे, ज्याची भक्ती आहे त्यालस करु द्यावे.. आपल्याला काय..
काही ओळी/अनुभव वाचून वाटले, अय्या इतकं सेम विचार करतात तर..
बाकी, मस्तच.
निलिमा, रदबदली करण्याबद्दल
निलिमा, रदबदली करण्याबद्दल धन्यवाद! तुमच्या शुभेच्छेने तरी काम होऊ देत. निरा, झंपी अनुभव, विचार शेअर केल्याबद्दल धन्यवाद!
प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप आभार
"वाचिक तप " खूप दिवसांनी
"वाचिक तप " खूप दिवसांनी ऐकले.. केवळ शिव्याच नाही, पण अपशब्द, नावे ठेवणे.. इ.इ. साठी करावे असे वाटले..
नेहेमीप्रमाणे हा पन्ना ही आवडला.. लिहीत रहा..
खूप छान लिहिलंय. बर्याचशा
खूप छान लिहिलंय. बर्याचशा गोष्टी मनापासून पटल्या.
सुंदर्,हळूवार
सुंदर्,हळूवार
Nehami pramanech g.sunder
Nehami pramanech g.sunder.dolyat pani antes
नेहमीप्रमाणेच मस्तं
नेहमीप्रमाणेच मस्तं
Pages