एक पलंग, एक कपाट आणि एक बेसिन. एवढंच मावतं माझ्या इथल्या खोलीत. खोलीतली खिडकी इथली सगळ्यात मोठी गोष्ट आहे (हो, माझ्यापेक्षाही मोठी)! अंथरुणावर पडल्या पडल्या सप्तर्षी दिसतात. शुक्र आणि मंगळ असतात जवळपास. जितकं टक लावून बघावं तितक्या जास्त चांदण्या उमटत जातात रात्रभर. कुठेतरी आकाश पृथ्वीला मिळाल्यासारखं वाटतं तिथून समुद्र सुरू होतो, तो थेट माझ्या खोलीच्या पायथ्याशी येऊन थडकतो. त्यांचं आपापसात सगळं अगदी क्लिअर आहे -- आकाशाचा रंग तो आणि तोच समुद्राचा. ढग असताना पाण्यावर लाटा असतात आणि बोटी असताना वरच्या आरशात पक्षी उडतात. जगातले सगळे गजर बंद करून झोपता येतं रात्री. पावणेसातला सूर्योदयामुळे जाग आली नाही, तर माझं नाव हिमेश रेशमिया. चंद्र तर गेल्या महिन्याभरात मोजून अठ्ठावीस दिवस दिसतोय, पण त्याची कौतुकं मला एका वाक्यात आटोपता यायची नाहीत. येत्या पौर्णिमेला साग्रसंगीत लिहीन.
तर मी सध्या ग्रीसमध्ये आहे. अॅथेन्सपासून दीड तासावर असलेल्या ‘सिक्या’ नावाच्या गावात दोन महिन्यांसाठी आल्ये. काही महिन्यांपूर्वी एखादी नवीन नोकरी शोधावी म्हणून सीव्ही दुरुस्त करत होते आणि त्यातली माहिती वाचून माझा मला कंटाळा आला. हात-पाय चालू असताना दिवसाचे तीन तास गाडीत उभं राहून उरलेले आठ तास स्क्रीनसमोर जातात या गणिताने झोप उडाली, आणि आपण विशीचं शेवटचं वर्ष लंडनच्या रेल्वेचा महिन्याचा बावीस हजार रुपयांचा पास काढून उभं राहाण्यात किंवा बसण्यात घालवू अशा भीतीने मी सीव्ही हा प्रकारच मिटून ठेवला. ग्रीसमधलं तात्पुरतं काम कसं शोधलं ते मुद्देसूद लिहीन कधीतरी, पण अत्ता एवढंच सांगते की सिक्या मध्ये होटेल चालवणाऱ्या एका कुटुंबाला लागेल ती मदत करायला म्हणून मी महिन्याभरापूर्वी इथे पोचले. लहान मुलं सांभाळायची, त्यांना इंग्लिश शिकवायचं, स्वयंपाक करायचा, इथल्या भाडेकरूंना काही हवं-नको असेल ते बघायचं, आणि त्याबदल्यात या गावात राहायचं आणि मालक कुटुंबाबरोबर फिरायचं.
महिनाभर काही लिहिण्याआधी शांतपणे बघत होते सगळं. कारण समुद्राला निळाशार, झाडांना हिरवीगार आणि माणसांना हुशार म्हणण्याआधी थोडा वेळ जायला हवा एवढं मला आजपर्यंतच्या प्रवासातून नक्की कळलंय. आता खारं पाणी-खारा वारा आंगवळणी पडलेत; रस्त्यातल्या अंजिराच्या झाडाचा बहर संपला तरी गावातल्या वाटा आवडतायत; रुसव्या-फुगव्यांसकट रोजच्या माणसांची सवय झाल्ये; गावाची वेस ओलांडली तरी मला ओळखणारे चार चेहरे दिसतात असं वाटायला लागलंय; सुट्टीच्या दिवशी शहरात जाऊन आले की संध्याकाळी लाटांच्या तालात पुन्हा सिक्यामध्ये यावंसं वाटायला लागलंय... थोडक्यात महिनाभर खरडून ठेवलेल्या गोष्टी आता सांगायला हरकत नाही!
आठ वर्षांपूर्वी मी पहिल्यांदा ग्रीस पाहिलं. त्यांचे वाईट दिवस नुकतेच सुरू होत होते आणि ती माझी पहिलीच फेरी होती त्यामुळे मी ग्रीसच्या प्रेमात होते. अॅथेन्स गजबजलेलं वाटायचं. जिवंत वाटायचं. बरं, शहराचं खरं नाव अथीना आहे -- अथिना नावाच्या देवीचं देऊळ असलेली नगरी ती अथीना (-हस्व दीर्घ मानतात यांच्यात, त्यामुळे नावं मराठीत लिहितानाही मला ग्रीक् शुद्धलेखन पाळायला हवं). तर, आपल्याकडचे पैसे संपत आलेत हे २०१० साली लोकांना समजायचं होतं, त्यामुळे मोठ्या रस्त्यांवर जत्रा भरावी तशी गर्दी असायची. दुकानं मध्यरात्रीपर्यंत उघडी असायची आणि चांगल्या माणसांचा वावर असायचा. शहराला जाग असायची. त्या गर्दीच्या मधेमधेच कितीतरी जुनी देवळं नि डोंगर नांदत होते. गेल्या वर्षी फक्त तीन दिवसांसाठी आले तर त्याच शहराची आजारी अवृत्ती बघितल्यासारखं वाटलं मला. माणसंही काहीशी माना पाडून चालत असल्यासारखी वाटली. तरीही अथीना सुंदर आहेच, पण आता देशाची गुजराण पर्यटनावर होत असल्याने बरेच जण शहर सोडून आपापल्या गावात गेलेत. यंदा मला अशा एखाद्या गावात राहायचं होतं म्हणून सिक्याला आले. फोटोपुरता का होईना, समुद्राचा तुकडा असला की लोक पैसे देऊन राहायला येतात. मग उन्हाळ्यात गावांमध्ये भरपूर काम असतं. खाण्या-पिण्याची गंमत असते.
आल्या आल्या पहिली गोष्ट काय कळली, तर इथे हवं तेव्हा हवं ते खायला-प्यायला मिळत नसतं. शेतात आणि झाडांवर जे लगडलेलं असेल, समुद्रात जे पोहत असेल तेच ताटात दिसेल. उगाच आपल्याला हुक्की आली म्हणून अंजिराच्या हंगामात रास्बेरी आइस्क्रीम आणि कोलंबीच्या भरतीला मटणाचा रस्सा असलं काही मिळत नाही इकडे. आठवडा बाजार चुकला तर चार दिवस वाट बघावी लागते. प्यायचं पाणी लांबून भरून आणायला लागतं… निसर्गाला आपल्या तालावर फार नाचवता येत नाही हा पहिला धडा!
गेल्या वर्षी उन्हाळ्यात पर्यटक येणार म्हणून सगळी आखाती गावं तयार होती आणि नेमके ऐन सुट्टीच्या वेळी भरतीच्या लाटांबरोबर हजारोंनी जेलीफिश आले किनाऱ्यावर. पोहायचं म्हणून एवढाले पैसे खर्च करून आलेली माणसं आल्या पावली परत गेली. गावकऱ्यांचं फार नुकसान झालं... यंदा तसं व्हायला नको म्हणून कित्येकांनी वारेमाप खर्च करून समुद्रात जाळ्या घातल्या नि आकडे लावले नि काय नि काय. मासे म्हणाले करा काय करायचंय ते, आम्हाला तसंही यायचंच नाहीये यावर्षी आखातात. एकूण काय, जायचे होते ते पैसे कुठूनतरी गेले.
हळुहळू बाकीचं सांगेनच. आता पुन्हा कामाला लागायचं आहे. नवीन आलेल्या दहा पाहुण्यांचा उद्याचा स्वयंपाक मला करायचाय. या दोन महिन्यांत मला बाकी काही जमो न जमो, ग्रीक लोकांना घरी कढवलेल्या तुपाची चटक लावून झालेली आहे...
हा भाग आणि पुढचा भाग मी
हा भाग आणि पुढचा भाग मी फेसबुकवर कुणीतरी शेअर केला होता तेव्हा वाचला. मस्त आहे. अनुभवांची शिदोरी जमा होते आहे ती आयुष्यभर पुरेल.
>> अनुभवांची शिदोरी जमा होते
>> अनुभवांची शिदोरी जमा होते आहे
खरंय अगदी.
अर्निका, तू फार सुरेख लिहीतेस मात्र हा भाग तोकडा वाटला.
<<<महिनाभर काही लिहिण्याआधी
<<<महिनाभर काही लिहिण्याआधी शांतपणे बघत होते सगळं. कारण समुद्राला निळाशार, झाडांना हिरवीगार आणि माणसांना हुशार म्हणण्याआधी थोडा वेळ जायला हवा एवढं मला आजपर्यंतच्या प्रवासातून नक्की कळलंय. >>>
सुंदर... आणि प्रगल्भ लेखन..
किती गं सुरेख वर्णन . एक
किती गं सुरेख वर्णन . एक वेगळाच अनुभव घेत आहेस, त्यामुळे वाचायची उत्सुकता आहेच.
Mast lihites tu.
Mast lihites tu.
अर्निका, तू फार सुरेख लिहीतेस
अर्निका, तू फार सुरेख लिहीतेस मात्र हा भाग तोकडा वाटला. >>> + १२३
मस्त नेहमीप्रमाणे. किती काय
मस्त नेहमीप्रमाणे. किती काय काय करत असतेस ग सतत. आधी हत्तीचे पार्क, आता हे. कुठून आणतेस इतकी एनर्जी __/\__
ग्रीसमधलं तात्पुरतं काम कसं शोधलं ते मुद्देसूद लिहीन कधीतरी>>>>> हे लिहीच नक्की.
छान झालाय लेख.. अजुन सविस्तर
छान झालाय लेख.. अजुन सविस्तर येउ द्या
अर्निका, ग्रीस डायरी खूप खूप
अर्निका, ग्रीस डायरी खूप खूप मस्त आहे तुझी. लिहीत रहा, आम्हाला सांगत रहा.
छान सुरुवात झाली आहे. पण लहान
छान सुरुवात झाली आहे. पण लहान वाटला हा भाग.
समुद्राला निळाशार, झाडांना हिरवीगार आणि माणसांना हुशार म्हणण्याआधी थोडा वेळ जायला हवा एवढं मला आजपर्यंतच्या प्रवासातून नक्की कळलंय. >> मस्त.
पावणेसातला सूर्योदयामुळे जाग आली नाही, तर माझं नाव हिमेश रेशमिया>> याला काही संदर्भ आहे का?
अर्निका, ग्रीस डायरी खूप खूप
अर्निका, ग्रीस डायरी खूप खूप मस्त आहे तुझी. लिहीत रहा, आम्हाला सांगत रहा. >>>
+१
सुरेख लिहिता तुम्ही
सुरेख लिहिता तुम्ही
झक्कास!!! वाट बघतेय पुढची.
झक्कास!!! वाट बघतेय पुढची.
पुढल्या भागांची वाट बघायला
पुढल्या भागांची वाट बघायला लावणारं लेखन.
पु भा प्र
मस्त लिहत आहेस.थोडे अजुन
मस्त लिहत आहेस.थोडे अजुन विस्ताराने लिहा.
उत्सुकता वाढवणारं लेखन...
उत्सुकता वाढवणारं लेखन... शक्य असतील तितके फोटोही टाकत जा...
मस्त लिहिले आहे खूपच आवडलं
मस्त लिहिले आहे खूपच आवडलं मला ! पु भा प्र
वा! सुरेख लिहिले आहे. मला तर
वा! सुरेख लिहिले आहे.
मला तर अगदी स्वप्नांच्या दुनियेत गेल्यासारखे वाटले. ग्रीस मुळे नाही, पण अगदी वेगळाच विचार, नोकरी, जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन, ह्यामुळे. तशी युरोपात 5-6 वर्ष काढल्यामुळे तिथल्या छोट्या छोट्या गावांचे प्रचंड आकर्षण तर आहेच मला. खूप छान!!!
मस्त लिहिले आहे.
मस्त लिहिले आहे.
एवढी सगळी कामं करता!!
सुरेख. पुभाप्र.
सुरेख. पुभाप्र.
वाचते आहे, लिहायची शैली खूप
वाचते आहे, लिहायची शैली खूप आवडली.
मस्त सुरुवात. पुढील भागांची
मस्त सुरुवात. पुढील भागांची वाट पाहते.
खूप छान! पुभाप्र....
खूप छान! पुभाप्र....
मला तर अगदी स्वप्नांच्या
मला तर अगदी स्वप्नांच्या दुनियेत गेल्यासारखे वाटले. ग्रीस मुळे नाही, पण अगदी वेगळाच विचार, नोकरी, जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन, ह्यामुळे.>> +१
अनुभवांची शिदोरी जमा होते आहे ती आयुष्यभर पुरेल.>>> +१
मी पण विकेंडला फेसबुकवर आणि तुझ्या ब्लॉगवर राहिलेला बराच बॅकलॉग भरून काढला.
सुरेखच लिहितेस तू आणि खूप फ्रेश!
मस्त लिहिलं आहेस. वाचतोय.
मस्त लिहिलं आहेस. वाचतोय.
सुरेख.
सुरेख.
जगावेगळी जीवनशैली निवडण्याचं
जगावेगळी जीवनशैली निवडण्याचं कौतुक वाटलं. शीर्षकामुळे गोंधळ झाल्याने इतका वेळ टाळलं होतं. पण आता उघडून वाचल्यानंतर सार्थक झालं..
मस्त
मस्त
जगावेगळी जीवनशैली निवडण्याचं
जगावेगळी जीवनशैली निवडण्याचं कौतुक वाटलं. >>> +१ लेखनशैली आवडली. पुभाप्र....
हा भाग फक्त 'लिहिती व्हावे'
हा भाग फक्त 'लिहिती व्हावे' म्हणून नांदीसारखा लिहिला होता. तुटक वाटला तर समजू शकते मी... पण धन्यवाद माबो, पुन्हा एकदा! शिवाय बाकी लेखांना अजून छान नावं द्यायचा मी प्रयत्न करेनच. मायबोलीवर फोटो आणि व्हिडिओ अपलोड होताना इथल्या इंटरनेटच्या नाकी दम येतो अक्षरश:, त्यामुळे जमेल तसे फोटो टाकेन, नाहीतर ते blog वर तरी टाकेन.
किरणुद्दीन, मी आय टी क्षेत्रात नाहीये. मी सायन्स जर्नल्समध्ये एडिटर म्हणून काम करत होते. सायन्स कम्यूनिकेशनमध्ये आहे मी तरी शेवटी बसायचं स्क्रीनसमोरच असतं म्हणा!
Pages