२. दुसरं प्रेमपत्र: सूर निरागस हो. . .
३. लव यू ज़िन्दगी: अदूचा तिसरा वाढदिवस!!!!
नमस्कार! मुलीच्या नुकत्याच झालेल्या चौथ्या वाढदिवसानिमित्त तिला लिहिलेलं चौथं पत्र. ह्यामध्ये असलेले विचार आपल्यापैकी अनेकांच्या मनात आले असतील व तसेच अनुभवही आले असतील म्हणून आपण सर्वांसोबत शेअर करत आहे. धन्यवाद!
दि. १९ सप्टेंबर २०१८
प्रिय गोष्ट!
तू चक्क चार वर्षांची झालीस!!! सगळ्याच अर्थांनी 'खूप मोठी' झालीस! तुझं वाढणं, मोठं होणं, बहरणं अनेक प्रकारे सतत जाणवतं! तुझा वाढदिवस हा त्या सगळ्या गोष्टींना आठवण्याचा सोहळा! मला आठवतं गेल्या वाढदिवसाच्या सुमारास आपण तिघं एकदा सोबत जेवत होतो, तेव्हा तू म्हणालीस की, हे पाहा- सेमी सर्कल! आपण तिघं जेवत होतो हे अर्ध- वर्तुळ आहे हे तू म्हणत होतीस. आणि ते किती खरं आहे! सोबतीला सगळे असायला हवे असं तुला वाटतं- आजी आजोबा, काका काकू व सगळे! तर मग ते पूर्ण सर्कल होईल ना. पण तुझी परत परत जाणवणारी गोष्ट म्हणजे एखादी गोष्ट तुला फार फार हवी असते, पण ती मिळत नसेल तर तू किंचितही नाराज होत नाहीस! त्या दिवशी म्हणत होतीस, मला वाटलं आजोबा इतके दिवस राहणार (दोन्ही हाताची बोटं पसरून)! पण ते तितके दिवस न थांबता गेले म्हणून रडली अजिबात नाहीस.
अदू, स्वरा, लाडू, बबलू, साखर, गोड, छकुली, टिंकूडी अशा अनेक नावांनंतर आता तुला गोष्ट, टमकडी अशी अनेक नवीन नावं मिळाली आहेत- ती तूच घेतली आहेस! आणि तुझ्या प्रत्येक नावामागे तुझी तशी तशी एक्स्प्रेशन्स आहेत! तुला गोष्टी इतक्या आवडतात की, त्यामुळे गोष्ट हे तुझं नवीन नाव बनलं आहे! तुला गोष्ट ऐकताना तुला जितकी मजा येते, तितकीच मजा ती सांगताना आम्हांला येते. कोणतीही गोष्ट सुरू करताना तू एकाग्र होतेस, अतिशय उत्तेजित होतेस आणि एक प्रकारची 'श्रावक' होतेस! अक्षरश: तन्मय होऊन ऐकतेस. आणि मग गोष्ट सुरू होते तुझ्याच 'लहानपणातल्या' एखाद्या प्रसंगापासून! आणि गोष्टीच्या दोन ओळी झाल्या की, तुला कळतं गोष्ट कशाची आहे! मग तू जे खिदळतेस की बस! आणि मग कधी कधी ती गोष्ट तूच सांगतेस!
गंमत म्हणून तुझी एक गोष्ट इथे सांगण्याचा मोह आवरत नाही. एकदा काय झालं, एक छोटं बाळ होतं. ते बाळ खेळण्यासोबत टूं टूं खेळत होतं. ते बाळ इतकं छोटं होतं की, त्याला चालताही येत नव्हतं. टूं टूं असं करत ते खेळत होतं. तेवढ्यात काय झालं, तिथे माझा हेडफोन होता. त्या बाळाला काय वाटलं माहित नाही, त्याने हेडफोन हातात घेतला आणि खेळता खेळता त्याची टोपी (कॅप) काढली! तितक्यात माझं व आईचं तुझ्याकडे लक्ष गेलं. हेडफोन तुझ्याकडून काढून घेतला. पण बघतो तो काय! हेडफोनची टोपी दिसत नव्हती. मला वाटलं बाजूला पडली असेल. पण आईने बघितलं व ओरडली, काढ बाहेर काढ! त्या बाळाने ती टोपी तोंडात घातली होती! आईने तोंडात हात घालून काढायचा प्रयत्न केला. पण ती टोपी तर बाळाने गट्ट केली होती! मी आईला म्हणालो की इथेच कुठे तरी पडली असेल. तिथे शोधलं तर एक टोपी दिसली. पण दुसरी टोपी बाळाने खरंच गट्ट केली होती! मग आम्ही लगेच डॉक्टर आजोबांना विचारलं, आता काय होईल, बाळाला काही त्रास होईल का? तर आजोबा म्हणाले काही त्रास होणार नाही, दुस-या दिवशी बाहेर येईल! तर मग काय झालं, त्या बाळाने टोपी गट्ट केली, ती अशी अशी गळ्यातून पोटात गेली आणि... आणि मग दुस-या दिवशी- दुस-या दिवशी शीमधून बाहेर आली! पण दुस-या दिवशी बाळाने शी केलीच नाही! आम्ही वाट बघत होतो! नंतर जेव्हा बाळाने शी केली, तेव्हा आईने शी धुतली (तेव्हा मी तुझी शी धुवायला शिकलो नव्हतो!) तेव्हा तिला त्यात टोपी सापडली! तिने ती मला दिली! आणि मी ती साबणाने नीट धुतली आणि... आणि धुवून परत हेडफोनला लावली! आता सांग बरं ते बाळ कोण होतं? (हा प्रश्न प्रत्येक गोष्टीच्या शेवटी येतोच) आणि मग तू हसत हसत चेकाळत सांगतेस- “मी!!!” पण तू ती टोपी का खाल्ली होतीस? मग तू सांगतेस की मी ना छोटी होते, मला कळतच नव्हतं. म्हणून मी खेळता खेळता खाल्ली होती आणि मग तुझ्या हसण्याचा गडगडाट होतो! तुला गोष्टी आवडत असल्यामुळे बाहेर फिरतानाही मनात विचार असतो की, गोष्टीमध्ये आजचा कोणता प्रसंग सांगता येईल? आज पळायला जाताना कुत्रा भूंकला किंवा सायकलीवर फिरताना माकड दिसलं तर त्याची गोष्ट बनते! आणि माझ्या लहानपणीच्या अनेक प्रसंगांच्या अशा गोष्टी बनल्या आहेत! तुला अगदी छोटी गोष्टसुद्धा चालते! आणि आता तुला सगळ्या गोष्टी पाठ झाल्या आहेत, त्यामुळे तूच हसत हसत ऐकतेस किंवा कधी स्वत:च सांगतेस! पण गोष्ट कोणती हे तुला कळेपर्यंतची तुझी उत्सुकता अक्षरश: मिलियन डॉलर्स एक्स्प्रेशन असते! आणि तुझ्या गोष्टीपण तू मस्त सांगतेस- एकदा काय झालं, एक म्हातारी जंगलातून जात होती. तेव्हा तिला एकदम एक वाघोबा भेटला. तो म्हणाला, ‘ए म्हातारे!’ आणि मग हावभाव करत गोष्ट सांगतेस! किंवा हातात पुस्तक ठेवतेस आणि ते पुस्तक 'वाचत वाचत' गोष्ट सांगतेस!!
अदू, तुझा हा चौथा वाढदिवस असला तरी प्रत्येक दिवस तुझा वाढ- दिवसच असतो! कारण तू प्रत्येक दिवशी वाढतेस! काही ना काही करतेस, काही शिकतेस! आणि म्हणून तुझ्यामुळे असे वाढीचे दिवस आम्हांलाही मिळतात! आणि सतत असे जीवंतपणे जगण्याचे प्रसंग मिळतात! आणि त्यातून आमचीही 'वाढ' होते. तुझं सगळीकडे बारीक लक्ष असतं. आणि सगळ्या गोष्टी तुला बारीक लक्षात राहतात. अनेक महिन्यांनंतरही तू मग सांगतेस- आपण अप्पूघरला गेलो होतो ना, तेव्हा ना, तू पांढरा शर्ट घातला होतास. त्यावर असं डिझाईन होतं! तुझ्या मेमरीसारखंच तुझं व्हिज्युअलायजेशन जबरदस्त आहे! तीन- चार वर्षाच्या मुलीने काढले आहेत, असं वाटणार नाही असे चित्र तू काढतेस. गुंग होऊन कलर करत बसतेस. आणि तुझं अक्षरही खूप मस्त आहे! तुझ्या बोटांमध्ये अशी एक जादू आत्तापासूनच दिसते आहे. त्याबरोबरच तुला डान्स करायलाही तितकंच आवडतं! मस्तपैकी नन्हा मुन्हा राही हूं देस का सिपाही हूं वर तू शाळेच्या गॅदरिंगमध्ये डान्स करतेस. पण फक्त डान्स किंवा कलरिंग नाही, तर तुला आवडत नाही असं काहीच नाही. फिरणं असेल, चालणं- खेळणं असेल, आरडा- ओरडा करणं असेल, भटकणं असेल तुला सगळंच आवडतं. आणि त्या बाबतीत तुझ्या काहीच अटी नसतात. एकटी बसली असलीस तर तशीच पेन्सिल- कागदासोबत खेळत बसतेस. किंवा स्वत:शीच हसत बोलतही बसतेस. किंवा भिंतीवर अ आ इ ई लावलं असेल तर तेही वाचतेस; तेही लिहितेस. शांत बसणं तुला माहित नाही, इतकी तुझी उद्योगी वृत्ती आहे. तुला शांत बसवून खेळवण्यासाठी समोरच्याची कसोटी लागते. तू जे खेळते आहेस, ते खेळावं लागतं; तू जे करत असते, ते करावं लागतं. त्यातही खूप मजा येते. तुझ्यासोबत खेळताना- मस्ती करताना तुफान मजा येते. पण मी तुला तितकंच घाबरतोसुद्धा! भिती वाटते मला! हे बाळ थोडं मोठं झालं असलं तरी कधी कधी एकदम लहान होतं आणि चावतं ना! आणि मला लाथा मारतं. शिवाय सटासट गालावर प्रसादही देतं! पण त्यातही मजाच येते! आणि कधी कधी तू वेगळ्या प्रकारे लढतेस- खोटं खोटं रडते आणि म्हणते, ऑई बघ ना हा मला मारतोय, हा मला त्रास देतोय, याने मला पाडवलं, बघ ना! चेकाळतेस तेव्हा टमकडी होतेस आणि मला फगड्या म्हणतेस! पण तू मला कितीही लाथा मारत असलीस किंवा गालावर प्रसाद देत असलीस तरी त्याच्यानंतर लगेचच तितकेच लाडही करतेस! माझे लाड करतेस म्हणूनच तर लाडू हेपण तुझं नाव झालं आहे ना! आणि तूसुद्धा मला अशी अनेक नावं ठेवलीच आहेत की- निरंज, निरज, नॉर्वे, फगड्या आणि 'तुझ्या लहानपणी' मला निन्जन व निन्ना म्हणायचीस!
... असे अनेक किस्से! तुला शाळेच्या बसवर सोडणं आणि बसवर रिसीव्ह करणं हेही खूप मोठे अनुभव! शाळेची बस दिसली की, तू नाचायला लागतेस! आणि बसमध्ये बसल्यावर खिडकीतून सतत हात हलवत बाय बाय करत राहतेस! कधी कधी खिडकीतूनच फर्माईश करतेस, लॉलीपॉप आण हं मला. आणि तुला बसवरून रिसीव्ह करतानाही तू सरळ दोन पाय-या उडी मारून 'डायरेक्ट' कडेवर येतेस! तुझी ऊर्जा व तुझा उत्साह कधीच कमी होत नाही. घरी कोणी येणार असेल तर तू आधीपासून तयार! उद्या की नाई, माझा काका येणार आहे म्हणून मी खूप खुश आहे असं म्हणतेस! प्रवासाला जायचं असेल तर आधी तुझी बॅग भरलेली असते! त्यात तुझ्या आवडीच्या गमतीच्या वस्तू तू भरून ठेवतेस! आणि जिथे कुठे फिरू तिथे हरखून जातेस! जे जे भेटतील त्यांच्याशी खेळतेस. अर्थात नवीन माणूस बघितला की पाच मिनिट तू माझ्या गळ्याशी चिकटून असतेस. डोंगर असेल की समुद्र तू सगळीकडे मस्त खेळतेस. इतरांसोबत मस्ती करतानाही स्वत:सोबत मस्ती करतेस. समुद्रावर गेली तर तिथे वाळूत शिंपले गोळा करून शिंपल्याने चित्र काढतेस. नंतर घरी आल्यावर शिंपल्याने फरशीवरही आकृत्या काढतेस. अक्षरं लिहितेस! अशा खूप खूप आठवणी गेल्या वर्षात आहेत.
सगळ्यांत जास्त मजा मात्र आपल्या नाईट- आउटला आली. आई जेव्हा चार दिवस दौ-यावर होती, तेव्हा पहिल्यांदाच रात्री आपण दोघंच सोबत होतो. तू नानीकडे थांबायचं नाही म्हणून रडून आलीस. आणि इतकी मस्त राहिलीस! सकाळीही मस्त राहिलीस. तुला शांतपणे एखादी गोष्ट सांगितली व तुला करायला काही दिलं की, तुझं तू खूपच सुंदर खेळत बसतेस. तुला एखादी गोष्ट कधी कधी फार जास्त हवी असते. पण ती नसेल, तर तक्रार मात्र नसते. तुला काही तरी खेळायला उद्योग हवा की झालं. आणि तुझे तसे खेळ अनेक आहेतच. चित्र काढ, ठोकळे जोड, पुस्तक वाच, पझलचे ब्लॉक्स जोड असं तू करत बसतेस. कधी कधी मात्र टिव्हीचा किंवा मोबाईलचा हट्ट करतेस. मोबाईल मागतेस आणि म्हणतेस "अगं, मला मॅसेज चेक करू दे! कळत नाही का तुला?"पण तेही जर तुला दुसरा उद्योग असेल, तर तुला टिव्हीची किंवा मोबाईलची आठवणही होत नाही.
तुला आता अनेक गोष्टी कळतात. बाहेरून किंवा शाळेतून अनेक गोष्टी तुझ्या कानावर येतात. मग तुला 'हे तुला कसं माहिती?’ असं विचारलं की, लगेच म्हणतेस 'हुशार आहे मी!’ आणि तुला आजूबाजूच्या लोकांचं आत्ता काय चालू आहे हे बरोबर माहित असतं. कधी कधी खेळातही तू मला म्हणते हा बघ तुझा लॅपटॉप. इथे काम करत बस. मी तुला काम करू देईन. कधी रनिंग करून आल्यानंतर म्हणतेस, अरे, तुझा चहा राहिला असेल! तुझ्या दुध पिण्याची मात्र मोठी गंमत आहे! जेव्हा तुझा मूड नसतो; तेव्हा कितीही मागे लागा, तू दुध पीतच नाहीस. थोडं थोडं पिते. पण कधी कधी मात्र माझ्या चहासोबत स्पर्धा करतेस आणि अक्षरश: एका मिनिटामध्ये दुध गट्ट करतेस! माझा फस्ट नंबर आला म्हणतेस! आणि तेच खातानाही! शांत बसून तू जेवतच नाहीस. जेवतानाही तुला उद्योग हवा. मग चित्र तरी पाहा नाही तर गोष्ट तरी ऐक! "तुझ्या लहानपणी" आजी तुला जेवताना एक गोष्ट सांगायची चिचिचिची (माकडाची)! आता तीसुद्धा एक गोष्ट झाली आहे! गोष्टीतली गोष्ट!
अदू, तुझ्याकडे जी दृष्टी आहे ना तिचा मला हेवा वाटतो. आजूबाजूला काहीही झालं तरी तुझी प्रसन्नता टिकून राहते. आणि मला वाटतं ह्याचं कारण लहान मुलांमध्ये असलेलं नैसर्गिक ध्यान हे आहे. लहान मुलं जे काही करतात ते पूर्णपणे करतात. रडत असलीस तर फक्त रडते. त्यावेळी बाकी काहीच करत नाही. चित्र कलर करताना तन्मय होऊन फक्त तितकंच करते. त्यामुळे मन सतत ताजं राहातं. त्याउलट आम्ही मोठी माणसं मात्र प्रत्येक गोष्ट अर्धवट करतो किंवा अनेक गोष्टी एकाच वेळी करतो- सतत अनेक गोष्टींची खिचडी सुरू असते. एक करत असतो आणि दुस-या कशाचा तरी विचारही चालू असतो. त्यामुळे आमचं ध्यान खंडीत असतं तर तुझं व तुझ्या मित्र- मैत्रिणींचं (लहान मुलांचं) ध्यान अखंड असतं! त्याचं दुसरं एक उदाहरण म्हणजे तुझी एक गोष्टच! जेव्हा बाळ खेळत असतं, तेव्हा अचानक खालून द ड द ड द ड असा आवाज येतं! लगेच बाळाचा श्वास मोठा होतो, हा हू करत बाळ कडेवर येतं, मीही काम सोडून लगेच हा हू करत उठतो, बाळाला घेऊन खिडकीत येतो. खिडकी उघडतो आणि बाळ खिडकीतून जाणा-या जेसीबीला बघून चेकाळतं! हसून त्याला बाय बाय करतं! तुझ्या एकाग्र चित्ताचंच हे उदाहरण! त्यामुळे पाच मिनिट रडली तरी सहाव्या मिनिटाला पुन: प्रसन्न असतेस. हे खूप खूप शिकण्यासारखं आहे तुझ्याकडून.
आणि अदू मला तुझ्यासोबत खेळताना व नुसतं सोबत असताना इतरही अनेक गोष्टी जाणवतात. पहिली गोष्ट म्हणजे तू लाड करतेस तशी मायाही करतेस. तुझ्यासोबत जे जे आहेत त्यांची तू तुझ्या स्वत:च्या पद्धतीने काळजीच घेत असतेस. प्रत्येक गोष्टीत लक्ष देतेस. मी प्रवास करून परभणीला गेलो असेन व आपण दोन दिवसांनी फोनवर बोलत असेन, तरी म्हणतेस, तू परवा जेवला होतास का? ही तर अगदी छोट्या आईची मायाच झाली! इतक्या बारीक बारीक गोष्टी तुझ्या लक्षात राहतात तरी कशा? बाहेरून आलो की तू ब-याचदा विचारायचीस, माझ्यासाठी काय आणलंस? पण मी तुला हळु हळु असं काही मी सारखं आणत नसतो, असं सांगत गेलो आणि चक्क तू ते विचारणं सोडून दिलंस!
आणि ह्या सगळ्या मस्ती- खेळाबरोबर तुझे प्रश्न व विचारही वाढतच आहेत. एका फोटोत तू विचारलं मी कुठे आहे? मग तुला सांगितलं तू आईच्या पोटात होतीस. नंतर एकदा तू विचारलंस की मी आईच्या पोटात कशी गेले? कधी तू सांगतेस, तुम्ही नवरा- नवरी आहात ना, कसं ओळखलं मी! कधी तू विचारते मम्मा, गल्स गाडी चालवतात का? कधी विचारते पोलिस आपल्याला पकडणार नाहीत ना? हे सगळं होताना अदू मला आता एक भिती मात्र नक्की वाटते. मोठ्या माणसांचं जग सगळीकडे पसरलेलं आहे. आणि कधी कधी तुलाही ते जग दिसतं. मग तू विचारतेस गाड्या का फोडलेल्या दाखवत आहेत? इतका मोठा आवाज का करत आहेत? किंवा तुला शाळेत बसने जाताना जळालेली गाडी दिसते. हे मोठ्या माणसांचं जग हळु हळु तुझ्यापर्यंतही येणार आहे. ते थांबवता येणार नाही. पण मी त्यातल्या त्यात एक गोष्ट नक्की करू शकतो. तुझं जे जग आहे- तुझं जे निरागस भावविश्व आहे- ते मात्र मी जपू शकतो. त्यामध्ये तुला सोबत करू शकतो. आणि तू त्यासाठी नेहमीच तत्पर असतेस. काहीही खेळत असलीस तरी मला त्यात घेतेस. मग तो खेळ अक्कड बक्कड बंबई असेल किंवा पिज्जा पिज्जा पिज्जा इझ द बेस्ट असेल किंवा कोणताही असेल. आणि मला खेळ येत नसेल तर तो शिकवतेस! आणि मी खेळताना तुझी खोडीही काढतो. कधी तुझ्या डोक्यावरच्या जंगलात शिरतो; ते चाटतो! मग तू ओरडतेस, ऑई, बघ ना, हा माझं जंगल खातोय! अशी गंमत होते (खूप गोष्टींचं शेवटून दुसरं वाक्य असतं तसं- अशी गंमत झाली)! तुझ्या गोष्टींची अजून एक गंमत म्हणजे माझ्या लहानपणीच्या गोष्टींमध्येही तुला तू हवी असते. तू म्हणतेस तुम्ही नाही, आपण खेळत होतो, असं म्हण. मीपण होते तुमच्यासोबत.
अशी ही एका वेगळ्याच आनंद निकेतनची चार वर्षं पूर्ण झाली! ह्या चार वर्षांमध्ये खूप काही शिकायला मिळालं. जे जे कधीच वाटलं नव्हतं जमेल ते ते तुझ्या सोबतीत जमलं. अगदी शी धुण्यापासून दिवसभर संभाळण्यापर्यंत (अर्थात् कोण कोणाला संभाळत आहे, हा विषय चर्चेचा आहे)! तुझ्या बाजूने तू प्रत्येक वेळी एक पाऊल पुढे असतेस. मला तुझं जंगल बांधता येत नाही, पण तू हाताने शेंडी करतेस आणि म्हणतेस रब्बर लाव! मला आनंद आहे की, आज चार वर्षं पूर्ण होऊनही मी तुझा स्टिरिओटाईप बाबा झालो नाही आहे आणि तुही स्टिरिओटाईप मुलगी झालेली नाहीस. तू टमकडी आणि मी फगड्या असे आपण मित्रच आहोत! आणि हेच बरोबर आहे. कारण वयाचे फरक, अनुभवाचे, शहाणपणाचे (?) किंवा शिक्षणाचे (?) फरक फार फार वरवरचे असतात. प्रत्येकामध्ये जी चेतना असते, तिचा प्रवास तर अथांग असतो. त्या अथांग प्रवासापुढे कोण लहान, कोण मोठा!
अदू, हे पत्र संपवताना एक गाणं मनात येतं आहे. एका चित्रपटात त्या गाण्यात बाबा मुलाला उद्देशून ते गाणं गातात. पण मला ते गाणं उलटं अभिप्रेत आहे. जणू ते गाणं तू म्हणत आम्हांला सोबत नेते आहेस, असं मला वाटतं (योगायोगाने हे गाणं माझ्या रिंगटोनचं असल्यामुळे तुझ्या ओळखीचं झालं आहे व तूसुद्धा ते फोन येऊन गेल्यावर थोडं थोडं गुणगुणतेस!) -
आ चल के तुझे मैं ले के चलूं
इक ऐसे गगन के तले
जहाँ ग़म भी न हो, आँसू भी न हो
बस प्यार ही प्यार पले
इक ऐसे गगन के तले
सूरज की पहली किरण से, आशा का सवेरा जागे
चंदा की किरण से धुल कर, घनघोर अंधेरा भागे
कभी धूप खिले कभी छाँव मिले
लम्बी सी डगर न खले
जहाँ ग़म भी नो हो, आँसू भी न हो…
जहाँ दूर नज़र दौड़ आए, आज़ाद गगन लहराए
जहाँ रंग बिरंगे पंछी, आशा का संदेसा लाएं
सपनो मे पली हँसती हो कली
जहाँ शाम सुहानी ढले
जहाँ ग़म भी न हो, आँसू भी न हो…
आ चल के तुझे मैं ले के चलूं…
- तुझा फगड्या
अशा इतर सर्व लेखांसाठी- माझा ब्लॉग
खूप सुंदर पत्र...
खूप सुंदर पत्र...
छान आहे पत्र!!
छान आहे पत्र!!
आमच्याकडेही असेच घडलेल्या गोष्टींच्या गोष्टी होतात
कित्ती गोड लिहीलंय.... आदू
कित्ती गोड लिहीलंय.... आदू खूप गोडुलीय!
आदूलीला एक गोड गोड चाॅकलेट द्या माझ्याकडून... 
तो शीचा किस्सा टू मच
तो शीचा किस्सा टू मच इन्फोर्मेशन टाइप आहे. वाचून कसेतरी झाले. वर डिस्क्लेमर लिहाल का? लंच वगैरे मध्ये वाचतात .
सीरीज छान आहे. नेहरूंचे कन्येस पत्रे सारखे बनव णार का?
>> - तुझा फगड्या <<
>> - तुझा फगड्या <<
सर्वांना वाचनाबद्दल व
सर्वांना वाचनाबद्दल व प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद!
@ अमा जी, मला खरंच वाटलं नाही, त्याचा असा परिणाम होईल. मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. पण डिस्क्लेमर कसा देता येणार...
गोड लिहीलंय
गोड लिहीलंय
खूप खूप गोड लिहिलेय. खूप
खूप खूप गोड लिहिलेय. खूप आवडले. नंतर कधीतरी मुलगी जेव्हा ही पस्त्रे परत परत काढून वाचेल तेव्हा किती बरे वाटत राहील तिला.
खुप गोड लिहिलेय. मी पण माझ्या
खुप गोड लिहिलेय. मी पण माझ्या वहीत लिहिले आहे. ती सध्या काय करते असे लेखाला नाव दिलय. टाकेन पुढे कधीतरी.