ऊद्यापासून ग्रेड परीक्षा असल्यामुळे तिन दिवस कॉलेजला सुट्टी होती. आम्ही सरांकडून लॅबमध्ये काम करायची परवानगी घेवून ठेवली होती, त्यामुळे कंटाळा यायचा फारसा प्रश्न नव्हता. कॉलेज सुटायच्या अगोदर दहा मिनिटे सखाराम सगळ्या वर्गांमधून सर्क्यूलर फिरवून गेला होता. ग्रेड परिक्षा झाल्यानंतर या वर्षीच्या वक्तृत्व स्पर्धा होणार होत्या. विषय होता ‘हुंडा-एक वाईट प्रथा’. त्यामुळे जोशीसर फार उत्साहात होते. विषय लक्षात घेता, मुलिंनी यात खासकरुन भाग घ्यावा अशी त्यांची ईच्छा होती. तरीसुध्दा याही वर्षी कप आमच्याच कॉलेजकडे रहावा म्हणून त्यांनी मला आणि शामला तयारी करायला घरी बोलावले होते. ही स्पर्धा तालुक्यात प्रतिष्ठेची मानली जायची. दहा बारा कॉलेजेस यात भाग घेत.
पण विषय ऐकल्यावर शामने नाक मुरडलेच “च्यायला, हा काय वक्तृत्वासाठीचा विषय झाला का? सावरकर, विवेकानंद यांचे साहित्य दिसत नाही कारे या परिक्षकांना? पोरांना बावळट समजतात का हे? उद्या ‘चॉकलेट खाने कसे वाईट’ आहे यावर चर्चा करायला लावतील. हाऽऽहंत! हाऽऽहंत!”
राम शाम्याच्या पाठीत दणका घालत म्हणाला “गप रे बामणा, तुला घ्यायचा तर घे हुंडा. येथे वाद घालायचाय फक्त. लिहुन नाही द्यायचे बाँड पेपरवर ‘घेणार नाही’ म्हणून. उगाच काहीही झालं की रडायचं आपलं.”
ईतक्यात बेल झाली आणि आम्ही वह्या घेवून बाहेर पडलो. इन्नीही मुलींचा घोळका सोडुन आम्हाला येवून मिळाली. शकील मला विचारतच होता “दत्त्या का आला नाही रे आज कॉलेजला?” इतक्यात दत्त्याच समोरुन सायकलवर येताना दिसला.
शाम म्हणाला “च्यायला, याला पास नापासचं काही टेंशन नाही, त्यामुळे पार टिंगल चालवलीये याने कॉलेजची.”
इतक्यात दत्ता पोहचला. इन्नीने त्याची सायकल घेतली आणि “मी जाते पुढे” म्हणत गेलीही.
शकील उचकला त्याच्यावर “दत्त्या, वैसेभी सुट्टीच होती तिन दिवस कॉलेजला उद्यापासून. कशाला दांड्या मारतोस यार.”
“ऐक तर मियाँभाऊ, उद्या पुनव हाय. तवा म्हनलं का इर्जीक घालू. एकदा का रान उलथून पडलं की मंग तान नाय टाळक्याला. त्याचीच जुपी करत हुतो ईळभर. नांगरटीसाठी राती आठाला पयली बैलजोड घालू रानात. पन तुमी सगळे दुपारपर्यंतच या. कसं शाम?”
शाम्या उडी मारत म्हणाला “इर्जीक! म्हणजे बकरु?”
“नाय रे, म्हतारी म्हनली की कोन खातं कोन नाय तवा मासवड्या करु” दत्त्याचं बोलणं ऐकून शकीलची कळी जरा खुलली. एक बकरु वाचल्याचा आनंद झाला कसायाला. एव्हाना आम्ही गप्पा मारत शामच्या घराजवळ पोहचलो होतो. ओट्याला टेकवलेली सायकल घेवून दत्ता निघनार इतक्यात काही तरी आठवून थांबला आणि “इन्ने” म्हणून त्याने हाक मारली. इन्नी माडीवर होती. तिने खिडकीतुनच “काय रे दत्तुदादा?” म्हणून विचारलं.
“अगं उद्या इर्जीके रानात, तवा दुपारीच ये तू. यांच्या नको नादाला लागू. म्हतारीपन सारखी आठवन काढतीय तुझी. नाय आली तर धोसरा काढील तुझ्या नावानं.” म्हणत दत्ताने सायकलवर टांग मारली.
मी दुपारी तिन साडेतिनला बाबांची स्कुटर घेवून शामकडे पोहचलो. राम, शकील आणि शाम वाटच पहात होते. पण इन्नीची मधेच काहीतरी गडबड निघाली. राम आणि शाम दोघेही शकीलच्या बुलेटवर पुढे गेले. अर्ध्या तासात इन्नीचे आवरल्यावर आम्हीही निघालो. नेहमीप्रमाणे गावाबाहेर आल्यावर स्कुटर थांबवली आणि इन्नीकडे दिली आणि जीव मुठीत धरुन मागे बसलो. सांगतो कोणाला! ही तिची नेहमीची दादागीरी असे.
“अगं तो दगड दिसला नाही का तुला बावळट?”
“मी मुद्दाम नेम धरुन दगडावरुन नेली गाडी.”
“बयो माझे, खड्डा बघ! खड्डा बघ!”
“कळतय मला. भित्रा कुठला”
असं करत करत, आदळत आपटत एकदाचा पोहचलो मळ्यात. शाम आणि दत्ता धोंडबाकडे गेले होते. शकील माझी वाट पहात थांबला होता.
इन्नीला गाडी चालवताना पाहून शकील हसला “काय अप्पा, एखादी हड्डी पडली नाही ना रस्त्यात?”
“माझी निम्मी हाडं तिच्याच नावावर केलीत मी. ते मरुदे. शाम्या कुठेय?” म्हणत मी अंगणातच पाय पसरुन बसलो.
शकील घोंगडी अंथरत म्हणाला “कुछ अंदाज, कुठं असणार? हा म्हसोबा काय मासवड्या खावून शांत होणारे का? गेलेत धोंडबाकडे मुर्गा पहायला” तोवर धोंडबासोबत दोघेही आले. शाम्या लहान पोरासारखा खुष होता. धोंडबाने भिंतीला टेकवलेली डाली घेवून कोंबडा डालला आणि मस्त ऐसपैस मांडी घालून भिंतीला टेकून बसला. आईने परत काही तरी काम सांगीतले म्हणून दत्ता “म्हतारीची कामं काय संपायची नाय जन्मात” म्हणत सायकल घेवून परत चाऱ्यामागे गेला. आम्ही घोंगडीवर गप्पा मारत बसलो. आईने इन्नीकडे शेंगा गुळाचे ताट पाठवले बाहेर. शेंगेची चोच जमीनीवर आपटून आम्ही दाने आणि गुळ खात होतो. पण शाम्याची चुळबूळ काही थांबेना. त्याने चार वेळा कोपराने ढोसल्यावर शेवटी शकील म्हणाला “धोंडबा सुन, तू जा गावात रामला घेवून. अप्पाची स्कुटर लेके जा. घरी जा पहले. अम्मीला सांग तंदूरचा मसाला बनवायला मग दुकानात जा. हुसैनको बोल तंदुरसाठी पाहीजे म्हणजे तो बराबर साफ करुन देईल. येताना घरुन या. अम्मी देईल मसाला लावून. थोडा मसाला डब्यातपण द्यायला सांग अम्मीला.”
धोंडबा कुरबुरतच उठला “च्यायला, कापायचं पाप शकीलनं करायचं, भाजायचं पाप दत्त्यानं करायचं, मदतीला धोंड्या हायेचे, आनी खानार हा बामन. शाम्या, भडव्या नर्कातपन जागा मिळायची नाय तुला. पघच तू” शाम नुसताच हसला फक्त.
“सुन धोंडबा, आतेवक्त ठोब्बाला घेऊन ये त्याच्या घरुन.” शकीलने सुचवले. धोंडबाने मान डोलवत स्कुटरला किक मारली.
धोंडबा गेला नाही तोवर दत्त्या हाशहुश करत आला. ‘हिरव्याची सोय’ झाल्यामुळे त्याचा तो एक वैताग कमी झाला होता. इर्जीकीला आलेल्या बैलांना वैरण घालायची त्याच्या जीवावर आले होते. “आपल्या रानात इर्जीक आन लोकाच्या बैलांना चघाळ? ह्या! असं कुठं असतय का कव्हा!” या मताचा तो आणि त्याची म्हातारी सुध्दा.
“सातपर्यंत येतील समदे बैलं घेवून” म्हणत दत्तानेही शकीलशेजारी बसत शेंगा चुरडायला सुरवात केली. शाम्याने मला बळेच उठवले. आम्ही धोंडबाच्या घरी निघालो. नानी अंगणातच ज्वारी पाखडत बसली होती. शाम्याने खुप मस्का मारला तेंव्हा कुठे नानीने सात-आठ अंडी दिली परडीतुन. शाम्या मागे जावून गोठ्यातुन गाईचे शेण घेवून आला आणि नानीशेजारीच बसला. नानीचे आपले चालले होते “गुर्जी बरं हायीत ना? मोठ्याईचं कसं चाल्लय? तुहा चुलता कव्हा आल्ता? जत्रलं तरी येनारे का?” वगैरे.
शाम्याचं काम मनापासुन चालले होते. एकेक अंडे हलक्या हाताने तो गाईच्या शेणात लपेटून गोळा करत होता. सगळं उरकल्यावर हात स्वच्छ धुवून नानीकडूनच लहान टोपली घेतली त्याने, त्यात लिंबाचा पाला घालून नाजूक हाताने सगळे गोळे त्याने हारीने मांडले.
नानीने विचारले “का रं शाम, दत्तूची इर्जीक हाय म्हणं?”
“हो नानी” शाम म्ह णाला.
“काय रांधलय ध्रुपदीनं?”
“केलं नाही अजून. मासवडी करणारे आई. पण नानी, तुला सकाळीच मिळेल मासवडी. जेवायलाच बारा एक वाजतील. मी देईन धोंडबाकडे पाठवून तुझ्यासाठी.” म्हणत शाम आणि मी निघालो. दत्त्याकडे आलो तर शकिल अंगणातच कांदा चिरत बसला होता.
शाम्या हसुन म्हणाला “कर इन्नीचे लाड अजुन. लावलं ना तिने कामाला तुला?”
“नही रे, ती कापत होती पण मीच घेतलं तिच्याकडून. कापतीये, रडतीये. कापतीये, रडतीये. म्हटलं राहूदे तू. तुझी झाली ना सोय?” म्हणत शकीलने टोपलीकडे पाहीले. शाम्याने टोपली आत नेवून ठेवली. आईने चहा केला होता, तो परत गरम करुन तिन कप घेवून बाहेर आला. तोवर धोंडबा आणि रामही विठोबाला घेऊन आले. सातपर्यंत एक एक करत सात नांगर येवून पोहचले. मेंबरने मात्र दांडी मारली. (हा कधी काळी ‘दुध सोसायटीचा’ मेंबर होता, तेंव्हापासुन तेच नाव पडले त्याला.) मी जनानानाबरोबर गप्पा मारत बसलो होतो.
सगळे आलेले पाहून आई म्हणाली. “समदे आलेतच तं उशिर कह्याला करायचा? निघा रानाकडं”
“मंग काय” म्हणत जनानानाने मान डोलावली. आईने इन्नीला हाक मारली. अंगणातल्या रांजनातून कळशीभर पाणी काढले. सगळ्यांनी बैलजोड्या अंगणासमोर उभ्या केल्या. आईने प्रत्येक बैलाच्या पायावर पाणी घातले. हळदी कुंकू लावले. इन्नीने आणलेल्या परातीतले कणकेचे गोळे प्रत्येक बैलाला हाताने खावू घातले, हात जोडले आणि म्हणाली “निघा आता. चांद डोक्यावर येवूस्तवर उरका. बांध कोरु नका कुणाचा. इतभर आतच चाला.”
डोंगराच्या पायथ्यालाच दत्त्याचा पंचविस एकराचा सलग तुकडा होता. अलीकडची सात आठ एकर बागायत होती. बाकीची डोंगराच्या पायथ्यापर्यंत सगळी जिरायत. हिच नांगरायची होती. चंद्राने नुकतेच डोंगराआडून डोके वर काढले होते. निम्म्या रानावर डोंगराची सावली पडली होती. हवा अल्हाददायक होती. काही बैलजोड्यांनी शेताचे एक टोक धरले तर बाकीच्यांनी दुसरे टोक धरले. आम्ही विहिरी शेजारी घोंगड्या अंथरल्या. विहीरीच्या पलीकडे काही भागात जनावरांसाठी घास होता. घासाच्या पलीकडे कांदा. आणि त्याही पलिकडे कलींगडाचे वेल पसरले होते एकरभर. बाकी सगळा ऊस. धोंडबाने शाम्याला लागणारे सरपण आणून दिले आणि तो त्याचा नांगर घेऊन बाकीच्यांना मिळाला. आता आम्हाला तिन तास तरी काही काम नव्हते. शाम्या शितनिद्रा संपलेल्या बेडकासारखा टुनकन जागा झाला. चटकन त्याने कामे सुरु केली. खाली मुठभर गवती चहा ठेऊन वर तुऱ्हाट्यांच्या काड्यांचा बेड बनऊन त्यावर तेल टाकले. प्रत्येकात अंतर ठेवत सगळे शेणगोळे व्यवस्थीत मांडले. शकील आणि ठ्ठोबाने गवती चहाच्या लहान पेंढीभोवती लाकडे रचून पेटवली. तुऱ्हाट्याही पेटवल्या. रामने रानातली कांदापात उपटून आणली होती. शाम्याने ही हाताने चुरडून मसाला लावलेल्या कोंबड्याच्या पोटात गच्च भरली आणि सळई आर पार केली. शेकोटीच्या अगदी जवळच सळई जमीनीत ठोकली आणि जाळाच्या दिशेने जरा तिरकी केली. ठ्ठोब्बाने दोन काळीशार कलींगडे निवडून आणली होती. शाम्याचे बहुतेक सगळे उरकले होते. आता तो शकीलच्या उपकारांची परतफेड करायच्या तयारीला लागला. इन्नीने मिळतील त्या भाज्या पिशवीत घालून दिल्या होत्या. मसाल्याचा डबा, मीठ आणि सुरीही दिली होती पिशवीत. कार्टी तशी हुषारे. शाम्याने केळीच्या पानांचे दोन तुकडे पसरले. त्यावर ढब्बु मिरच्यांचे तुकडे, बटाटे, पातीचे जरा थोराड कांदे, मुळा, ओंजळभर बारीक कापलेली कांदापात टाकून मिठ आणि तंदुरचा उरलेला मसाला टाकला. चमचाभर तेल टाकून चांगलं मिसळले आणि त्याच्या घट्ट पुड्या बांधून त्याही तुऱ्हाट्याच्या विस्तवावर ठेवल्या. डोणीत हात धुऊन तो “हुश्श!” करत एकदाचा घोंगड्यावर टेकला. या व्यापात चंद्र बराच वर आला होता. डोंगराची सावली आता दिसेनाशी झाली होती. एव्हाना दोन्ही बाजूच्या बैलजोड्या नांगरनी करत एकमेकांना शेताच्या मध्यावर भेटून माघारी वळल्या होत्या. शाम्याने तुरीच्या काडीला कापड बांधून ब्रश केला होता. त्याचे सळईचा कोंबडा थोडासा फिरवून अधून मधून वाटीतले तेल लावने सुरु होते. हवेत हलकासा गारवा होताच. आता त्यात तुरीच्या, गवती चहाच्या धुराचा उष्ण सुगंध भरला होता. तास उलटून गेला होता.
“मी जातो जनानानाकडे” म्हणत मी उठणारच होतो ईतक्यात “ठैर, इसे चखके जा” म्हणत शकीलने केळीच्या पानांचे एक पुडके दोन काड्यांच्या मदतीने बाहेर काढले. वरचे पान जवळ जवळ जळालेच होते. दुसऱ्या पानावर त्याने ते पुडके उघडले. खमंग वास सुटला. थोडेसे लिंबू पिळले आणि माझ्या समोर सरकवले. ठ्ठोबाने त्यात कलिंगडाचे दोन तिन तुकडे टाकले. मी काडीने बटाट्याचा आणि सिमला मिरचीचा तुकडा उचलून तोंडात टाकला. वर थोडी कांदापात तोंडी लावली. आहाऽहा! काय अप्रतिम चव होती. शकील कौतुकाने आणि शाम्या आशाळभूतपणे माझ्या तोंडाकडे पहात होते. मी तोंडातला घास संपायच्या आधीच अजुन एक घास खाल्ला आणि शकीलला टाळी दिली. आम्ही ते पुडके पाचच मिनिटात संपवले. “मुर्गा खा तुझा” म्हणत शाम्याला पुसायलासुध्दा पान दिले नाही शकीलने. मी बुड झटकून उठलो एकदाचा. ठोब्बाला सोबत घेतले आणि रानाकडे निघालो.
मी आणि ठ्ठोबाने जनानानाला गाठले. नाना चाबकाला लावलेली घुंगरं वाजवत बैलांना दापीत होता. चांगलं हात हातभर ढेकूळ उलथून पडत होतं. नांगराचा फाळ जणूकाही जमीनीची छाती चिरीत चालला होता. चंद्र चांगलाच लखलखीत झाला होता. पांढऱ्या बैलांचे पुठ्ठे चंद्रप्रकाशात चमकत होते.
“काय नाना, रान कडक जातय का?” म्हणत मी नानाच्या डाव्या बाजूने चालायला सुरवात केली. ठ्ठोबा माझ्या मागे मागे चालत होता.
“अप्पा व्हय? ये! रान कसलं कडाक, आपली बैलं लोखांड नागरत्यात. काळीचं काय घेवून बसला.” म्हणत नानाने घुंगरं वाजवत बैलाना हाकारलं. मग उगाच ईकडच्या तिकडच्या गप्पा मारत नानाबरोबर आम्ही चालायला लागलो.
दहा पंधरा मिनिटे चालल्यावर मी म्हणालो “नाना, बटवा दे. तुला तंबाखू मळून देतो.”
नानाने माझी मखलाशी ओळखली. हसत म्हणाला “नको. तु आला तव्हाच फक्की मारली हुती मी. धरतो का नांगर?”
मी त्याचीच वाट पहात होतो. नानाने एक हॅंडल हातात दिला मग सावकाश दुसराही हॅंडल हातात देत तो हळूवार बाजूला झाला. बैलांना फरक जाणवला असावा पण नाना नुसता हुंकारला आणि बैलं परत शिस्तीत चालायला लागली. माझ्या दोनच मिनिटात लक्षात आलं की कुळव हाकने आणि नांगर धरने यात जमीन अस्मानाचा फरक आहे. फाळ सांभाळता सांभाळता चार पावलातच माझी फे फे उडाली. मला नानासारखा चाबूक वाजवायचा होता पण एक हात सोडायचे धाडसच होत नव्हते. नांगरावरचा दाब जराही कमी झाला की ढेकळं लहान लहान निघायची. मग परत जोर देत नांगर जाग्यावर धरायचा.
माझी तारांबळ पाहून नाना हसत म्हणाला “मंग अप्पा, देवू काय तंबाकू मळून उलशीक?”
दहा मिनिटातच माझा जीव मेटाकुटीला आला होता. मी कळवळून म्हणालो “नाना, धर गड्या तुझा नांगर. हे काय झेपत नाही बुवा आपल्याला.” नानाला माझी किव आली एकदाची आणि त्याने माझ्या खांद्यावरचा चाबूक घेतला. मग एकामागोमाग दोन्ही हातातले हॅंडल घेतले. मी नानाच्या पोटाजवळून बाहेर येताना जरा बैलांच्या जवळ सरकलो. आणि काय होतय हे कळायच्या आत जनानानाच्या एका बैलाने विजेच्या वेगाने लाथ झाडली. पण तितक्याच तत्परतेने नानाने नांगर सोडला आणि माझे शर्ट धरुन मागे ओढले. मी नानाच्या हिसड्याने मागे ढेकळात धडपडत कोलमडलो. तरीही बैलाच्या पायाचा निसटता फटका माझ्या उजव्या मनगटावर हलकेच बसलाच. नानाला वाटले मी ‘थोडक्यात वाचलो’ तर ठ्ठोबाला वाटले मी ‘मोडलो’ तर मला वाटले ‘माझ्यामुळे’ यांच्या इर्जीकीचा फज्जा नको उडायला. त्यामुळे ‘काही झालेच नाही’ असं दाखवत मी पटकन उठायचा प्रयत्न केला. पण मी भोवळ आल्यामुळे परत खाली पडलो. मग मात्र नानाने नांगर उभा केला आणि धावला तर ठ्ठोबाने नावाप्रमाणेच ‘ठ्ठो’ करत शकीलला हाक मारली. बाकीचे नांगर दुर होते. कुणीतरी लांबूनच “कोण रे त्यो!” म्हणत हाळी घातली. शकील ढेकळांमधून धडपडत धावत आला. तोवर मी बराच सावरलो होतो. मला व्यवस्थीत पाहून त्याचा जीव भांड्यात पडला. मी नानाला परत नांगरावर पाठवलं आणि शकीलच्या गळ्यात हात घालून परत निघालो. ठ्ठोबाही शेपटाप्रमाणे मागे मागे निघाला. मी शकीलला सांगतच होतो की नानाच्या बैलाने कशी लाथ मारली एवढ्यात कडाडकन चाबकाचा आवाज घुमला, मागोमाग नानाने हासडलेली शिवी ऐकायला आली “आयच्या तुझ्या…”
शकील कळवळला “ये नाना अब उसको रातभर नही छोडेगा।”
शकीलचं सुरु झाले “मरुदे ती पंगत. डॉक्टरकडे जावू पहले. मी त्याला हवेतल्या हवेत चारदा हात फिरवून दाखवले तेंव्हा गडी जरा शांत झाला. या मित्राचा माझ्यावर एवढा का जीव आहे काही कळत नाही. लहानपणी आम्ही ऐकले होते की प्रेतयात्रेत ऊधळलेल्या फुलावर पाय पडला तर मानूस मरतो. एक दिवस शाळेतून येताना समोरुन प्रेतयात्रा येत होती. मी आणि शकील एका घरामागे लपलो. यात्रा पुढे गेल्यावर आम्ही सावधपणे घरी निघालो. पण माझा पाय पडलाच एका फुलावर. मला रडूच फुटले. शकीलने विचारले “काय झालं?” मी म्हणालो “मी मरणार आज. माझा पाय पडला त्या फुलावर.” शकीलही घाबरला. आता करावे हे त्यालाही कळेना. मित्राला तर वाचवलं पाहीजे. थोडा वेळ विचार करुन त्याने पटकन चार पाच फुलांवर पाय दिला. म्हणाला “आता नको घाबरु. मी पण मरीन तुझ्याबरोबर.” मला किती आधार वाटला त्यावेळी. रात्री झोपताना आम्ही कितीतरी वेळ जागेच होतो कोण अगोदर मरतो हे पहायला. सकाळी ऊठल्यावर दोघेही जिवंत आहोत हे पाहून आनंदाने म्हणाला “अल्लामियाचा नेम चुकला, आता आपण नाही मरणार.” असा हा शकील. असो.
आम्ही शेकोटीजवळ येवून बसलो. शाम्याचा कोंबडा भाजत आला होता. त्याला आम्ही काही सांगीतले नाही. त्याने गोळे फोडून अंडी बाजूला काढली होती. त्यातली दोन काढून बाकीची त्याने सोलली आणि केळीच्या पानावर ठेवली. मग शकील सोडून आम्ही सगळेच खरपुस भाजलेली अंडी खात गप्पा मारत बसलो. साडेनवू वाजता रामने सगळ्यांनाच नांगरट थांबवायला सांगीतली. मग सगळेच शेकोटीभोवती बसलो. शाम्याने कोंबड्याचे तुकडे केले. केळीच्या पानावर मांडले. लिंबू पिळले. पात टाकली. कांदे फोडले. कलिंगड कापले. नांगरवाल्यांपैकी तिघे खात नव्हते. नाना “नको, आता मासवड्याच खाईन राती” म्हणत बाजूला झाला. शकीलचा प्रश्नच नव्हता. मग सगळ्यांनी पानावरचे सगळे संपवले. शाम्याचे कौतुक करत करत तंबाखू मळल्या आणि ताजेतवाने होवून परत नांगरटीला भिडले. आता काम पुर्ण झाल्याशिवाय कुणी थांबणार नव्हते. शेकोटी विझून निखारे झाले होते. माझा हातही आता ठणकायला लागला होता जरा जरा. मी तिथेच शाम्याच्या अंगावर कलंडलो. शाम्याचा आणि माझा परवाच्या ‘वादविवाद’ स्पर्धेचा विषय निघाला होता. राम आमच्या मुद्द्यांची टिंगल करत हसत होता तर ठ्ठोबा आपली नेहमीप्रमाणे श्रवणभक्ती करत होता. शकील विहीरीच्या कट्याला टेकून काही तरी विचार करत लवंडला होता. दत्त्या मधेच एक चक्कर टाकून गेला. जाताना शेकोटीवर तुऱ्हाट्या टाकून गेला. आमच्या गप्पांमधली वक्तृत्व स्पर्धा मागे पडून चावटपणा सुरु झाला होता. शाम्या खो खो हसत होता. ठ्ठोबा पेंगला होता. बारा वाजत आले असावेत. घुंगरांचे आवाज ऐकून मी पाहीलं तर एक एक बैलजोडी परतत होती. तिकाटने लावून नांगर उलटे केले होते. शकीलने शेकोटीवर माती टाकली. रामने घोंगड्यांच्या घड्या घातल्या. मी उठायचा प्रयत्न केला पण जिवघेणी कळ मस्तकात गेली. मी चमकून हाताकडे पाहीले तर हात टम्म फुगला होता. पण तसेच कुणाला न सांगता मी सगळ्यांबरोबर घरी आलो.
सगळ्यांनी बैले जोखडातुन सोडून मांडवात बाधंली. दत्त्याने सगळ्यांपुढे हिरवा चारा घातला. आईने अंगण लख्ख झाडून सतरंज्या घातल्या होत्या. मोठा बल्ब लावला होता. सगळेच हातपाय धुवून पंगतीला बसले. दत्त्याने सगळ्यांपुढे ताटे, पाण्याने भरलेले तांबे ठेवले. शामने वाढायला घेतले. इन्नी चुलीपुढे बसुन भाकऱ्या करत होती ती मासवड्यांची परात बाहेर घेवून आली. माझ्या हाताकडे लक्ष जाताच “अयाई ग!” म्हणून ओरडली. तेंव्हा कुठे सगळ्यांच्या लक्षात माझ्या हाताची परिस्थिती आली. तोवर “का गं आराडली?” म्हणत आई लगबगीने बाहेर आली आणि हात पाहून कळवळली.
“कुठं धडपडायला गेल्ता मुडद्या. आत चाल पयला.” म्हणत आत घेवून गेली.
मी म्हणत होतो “अगं काही नाही फारसे. सगळ्यांना कशाला खोळंबा”
“जरा गप ऱ्हाशीन का आता” म्हणत तिने इन्नीला चंदनाची बाहूली उगळायला सांगीतली.
“कुणाचा बैल व्हता?”
“नानाचा”
“या जनाची बैलं द्वाडच हाईत पण जनाला कळायला नको काय? ध्यायी पांढरी झाली की आता. आन् तू कह्याला गेला त्याच्या बैलाच्या शेपटाचा मुका घ्यायला?” आईची तणतण सुरुच होती.
“मी पहाते आई, तू जा बरं बाहेर” म्हणत इन्नीने तिला बळेच बाहेर पाठवले. चंदन उगळून त्याचा लेप हातावर लावला. आईच्या जुन्या लुगड्याचे कापड हाताला गुंडाळले आणि म्हणाली “बाहेर गेल्यावर भाईशेजारी नको बसु जेवायला. तो स्वतःही जेवायचा नाही आणि बाकिच्यांनाही निट जेवू देणार नाही.”
मग हात तरंगत ठेवून हसऱ्या (?) चेहऱ्याने बाहेर आलो. शाम्याच्या शेजारी बसलो. वाढून झाले होते. नानाने ‘वदनी कवळ घेता’ म्हणून “हा, करा सुरवात” म्हणत हात जोडले.
शाम्याने त्याचे ताट स्वतःच वाढून घेतले होते. व्यवस्थित मोडून घेतलेल्या भाकरी, कांदा लिंबू, बाजूला मासवडी, रश्याच्या दोन वाट्या. एका वाटीत मासवडी बुडवलेली तर दुसऱ्या वाटीत भुजलेले अंडे. अन्नाचा आणि अन्नपुर्णेचाही आदर करावा तर शामनेच. शकील म्हणायचाही “शाम्या मुर्गीसुध्दा अशा नजाकतीने खातो की मुर्गीलाही वाटत असेल ‘आपली कुर्बानी सार्थकी लागली’ आणि ती खुशीने जन्नतमधे जात असेल.” कुठेही पंगत असेल तर पहिल्या वाढपानंतर यजमान हमखास शाम्याजवळ येवून विचारी “जमलय का शामराव?” मग शाम सांगे कशात ‘मिठ मागे’ आलेय आणि ‘तिखट पुढे’ गेले आहे ते. असो. शामजवळ बसुन मला अजुन अवघडल्यासारखे झाले होते. डाव्या हाताने भाकरीही मोडता येइना. मग इन्नीने भाकरी बारीक चुरुन दिली. रस्सा टाकून कुस्करुन दिले. मासवड्यांचे तुकडे करुन दिले. मी एकदा ताट निरखले, आमटीचा भरभरुन वास घेतला आणि पहिला घास घेतला. मासवडीची चव रश्यासोबत पार मेंदूपर्यंत जावून मग अलगद काळजातून पोटात उतरली. मी इतरांचा प्रतिसाद पहायला समोर नजर फिरवली पण…
सगळ्यांच्या माना खाली होत्या. पंगतीमधून फक्त ‘आमटी भुरकल्याचे’ आवाज येत होते आणि आई हाताचा मुटका गालावर टेकवून कौतुकाने पहात होती.
(क्रमशः)
सकाळ अगदी सार्थकी लागली.
सकाळ अगदी सार्थकी लागली. तुमच्याबरोबर मी ही इर्जिकची मजा अनुभवली. नेहमीप्रमाणेच नितांतसुंदर
छान जमलंय! अगदी प्रत्यक्ष
छान जमलंय! अगदी प्रत्यक्ष पाहत आहोत असं वाटलं!
मस्तच.
मस्तच.
काही 'टेक्नीकल' गोष्टी नाही समजल्या पण त्या न कळण्याने वाचण्यातली मजा जराही कमी झाली नाही.
पण इर्जीकमध्ये सागुती असतेच ना?
मस्तच झणझणीत
मस्तच झणझणीत
नेहमीप्रमाणेच मस्त.
नेहमीप्रमाणेच मस्त.
तो फुलांवर पाय पडायचा किस्सा वाचून गंमत वाटली.
खरच ! तुमचे लिखाण आले की
खरच ! तुमचे लिखाण आले की अधाशासारखे वाचुन एका दमात संपवते. सगळा नजारा ( अगदी डोंगर, शेत, बैल ) वाचतांना डोळ्यासमोर प्रकटला.
वाह.. छानच
वाह.. छानच
जन्मापासून पूर्ण आयुष्य शहरात
जन्मापासून पूर्ण आयुष्य शहरात गेलेल्या माझ्यासारख्या माणसाला या गोष्टी म्हणजे एक स्वप्नवत जीवनाभूती आहे.
कधीतरी २-४ वेळा सुट्टीत राहुरी सारख्या गावात राहिल्यामुळे शेत , शेतकरी , गावातले लोक , त्यांचे सहजीवन याची तोंडओळख असल्याने तुमच्या वर्णनात रमून जायला होते. त्यात महानोरांच्या कविता आवडत्या असल्याने हे सगळे त्या कवितांचे गद्य निरूपण आहे असेच वाटते. तोच मातीचा गंध आहे दोन्हीकडे...
मस्त नेहमीप्रमाणेच!!
मस्त नेहमीप्रमाणेच!!
खुप छान. चित्रदर्शी लेखन
खुप छान. चित्रदर्शी लेखन
धन्यवाद आसा आणि जुई!
धन्यवाद आसा आणि जुई!
काही 'टेक्नीकल' गोष्टी नाही समजल्या>>कोणत्या गोष्टी माधव?
निलुदा, प्राची, रश्मी, शकुन तुमचे खुप आभार प्रतिसादांसाठी!
भारीच!
भारीच!
पशुपत,बरेचजन म्हणतात 'आता ती
पशुपत,बरेचजन म्हणतात 'आता ती मजा राहीली नाही गावाकडे' पण साधनात झालेला बदल सोडला तर आजही तितकाच आनंद मिळतो गावी. बैल जावून ट्रॅक्टर आल्याने किंवा इर्जीक बंद झाल्याने काही तो आनंद कमी झाला नाही.
प्रतिसादासाठी खुप धन्यवाद!
वावे, सस्मित आवडल्याचे
वावे, सस्मित आवडल्याचे सांगीतल्याबद्दल धन्यवाद!
थॅंक्यू किल्ली.
सुन्दर लिखाण...प्रत्यक्ष
सुन्दर लिखाण...प्रत्यक्ष अनुभव घेतोय असे वाटले
चित्रदर्शी लेखन. असे
चित्रदर्शी लेखन. असे जीवाभावाचे दोस्त मिळालेत तुम्हाला की कोणीही हेवाच करावा !!!
फारच सुरेख लेखनशैली.... खिळवून ठेवणारी...
चघाळ म्हणजे ? something to
चघाळ म्हणजे ? something to chew? मग हिरवा म्हणजे ?
कुळव हाकणे आणि नांगर धरणे यात काय फरक आहे ?
चघाळ म्हणजे कोरडा चारा तोही
चघाळ म्हणजे कोरडा चारा तोही अस्ताव्यस्त झालेला. थोडक्यात जनावरांचे खरकटे म्हटले तरी चालेल. हिरवं म्हणजे मका किंवा ज्वारीची नुकतीच कापलेली ताटे (मोठी झालेली रोपटी.)
नांगरणी ही उन्हाळ्यात करावी लागते त्यामुळे जमीन तापुन तिचा कस वाढतो. नागंर जोर लावून धरावा लागतो त्यामुळे जमीन चांगली नांगरली जाते. हे फार कष्टाचे असते. पाऊस पडल्यानंतर जमीन भुसभूशीत होते. ती अजुन भुसभूशीत करुन सलग करायला कुळव फिरवावा लागतो. कुळव फिरवताना कुळवाच्याच फळीवर ऊभे राहून बैल हाकता येतात आणि कुळवावर ऊभे राहील्याने दाबही पडतो.
इतक्या लगेच उत्तर दिल्याबद्दल
इतक्या लगेच उत्तर दिल्याबद्दल धन्यवाद
आयला...हे फारच भारी आहे. कधी
आयला...हे फारच भारी आहे. कधी अनुभवयाला नाही मिळाल. खुप खुप हेवा वाटतोय तुमचा..
खूप मस्त लिहिलंय.
खूप मस्त लिहिलंय.
आप्पा अरे जुन्या आठवणी जाग्या
आप्पा अरे जुन्या आठवणी जाग्या झाल्या, इर्जीक आता राहिले नाही अन बैल जोड्याही राहिल्या नाहीत, पण तुझे लिखाण मनाला मस्त आनंद देऊन जाते. जितें रहो, लिखते रहो।
मस्त लिहिलंय. आमच्यासारख्या
मस्त लिहिलंय. आमच्यासारख्या शहरी लोकांना अगदीच माहित नसलेलं जग आहे हे.
आवडलं. काही ठिकाणी नानी तर
आवडलं. काही ठिकाणी नानी तर काही ठिकाणी आई असा उलले ख आहे.
नेहमीप्रमाणेच मस्तच.
नेहमीप्रमाणेच मस्तच.
अप्रतिम लिहीलय नेहमीप्रमाणे
अप्रतिम लिहीलय नेहमीप्रमाणे
खूपच छान लिहिलेय..
खूपच छान लिहिलेय..
मीठ मागे तिखट पुढे वाचून मजा वाटली.
मित्राचे निर्व्याज प्रेम मिळायला पण नशीबच लागतं.
धन्यवाद पुरंदरे शशांक.
धन्यवाद पुरंदरे शशांक. मित्रांच्या बाबतीत मी खरच खुप श्रीमंत आहे.
बब्बन, सायो, खुप आभार!
सातारी जर्दा, मला पहिल्यांदा कोणी 'अप्पा' म्हणून हाक मारली सोमी वर धन्यवाद!
थॅंक्यू मैत्रेयी!
मोद, वाचण्यात काही गोंधळ झालेला दिसतोय. दत्ताच्या आईला 'आई' म्हणतो आम्ही तर धोंडीबाच्या आईला नानी. धन्यवाद!
किट्टु, पंडीत आभारी आहे
किट्टु, पंडीत आभारी आहे प्रतिसाद दिल्याबद्दल!
मीठ मागे तिखट पुढे वाचून मजा
मीठ मागे तिखट पुढे वाचून मजा वाटली.>>> आभारी आहे अंजली.
आम्ही घरी अजुनही 'मिठ कमी झालय' ऐवजी 'मिठ मागे आलय जरा.' म्हणतो. काकूंमुळे सवय लागली. गम्मत म्हणजे त्या मिठाला साखर किंवा गोड म्हणायच्या. मिठ दे जरा म्हणन्या ऐवजी 'गोडाचे दे जरा.' छान वाटायचे ऐकायला.
प्रतिसादासाठी थॅंक्यू!
Pages