चलेज्जाव!

Submitted by Asu on 9 August, 2018 - 00:30

आज ऑगस्ट क्रांती दिन -
७६ वर्षांपूर्वी ९ आॅगस्टला, इंग्रजांना
ठणकावतांना परमपूज्य महात्मा गांधी
असेच म्हणाले असतील…...

चलेज्जाव!

चलेज्जाव आपुल्या देशी
रणशिंग आता फुंकले
अंगी जरी काटकुळा मी
कोटींचे बळ संचारले

पालखीचे भोई न आम्ही
मालक आम्ही इथले
परदेशी, कुठून आले
किडे मकोडे कुठले!

किडून, पिडून अवघा देश
पोखरून आम्हा लुटले
कडकडून घेतील चावा
मोहोळ आता उठले

सत्य अहिंसा शस्त्रे आमुची
वाजती शांतीचे चौघडे
चंबूगबाळे आवरा आता
ना तर, छिःथू चोहीकडे

काठी उचलता क्षणात वरती
आक्रमणाची होईल नांदी
उगी निघावे, निघण्याआधी
प्रणाम करतो मोहन गांधी

-प्रा.अरुण सु.पाटील(असु)
© सर्व हक्क स्वाधीन
https://www.facebook.com/AsuChyaKavita

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults