पुस्तक आणि साडी

Submitted by क्षास on 5 July, 2018 - 06:54

कित्येक दिवसांनी शेवटी आज मॅजेस्टिकला जायचा योग आलाच. पुस्तक-खरेदी इतकी दुसरी कोणतीही गोष्ट मला प्रिय नाही. पण पुस्तकखरेदीसाठी माझ्या घरून हल्ली तुटपुंजे पैसे मिळतात. आणलेलं पुस्तक दोन दिवसांत वाचून संपलं की ते इतर पुस्तकांच्या पंगतीत बसायला मोकळं होतं! आईला नेमका यावरच आक्षेप आहे. घरात पडलेल्या पुस्तकांना पुन्हा कोणी हातही लावत नाही या कारणामुळे आई नवीन पुस्तकांना पैसे देताना काही ना काही ऐकवतेच. तिचा लायब्ररी लावण्याचा सल्ला मला पटला पण त्यासोबतच घरात हक्काची, मालकीची पुस्तकं असावीत असा माझा नेहमी हट्ट असतो. आजही मी काय घ्यायचं हे ठरवून निघाले. आईने चारशे रुपये दिले. फक्त चारशे! चारशे रुपयात येतील तेवढी पुस्तकं आणायला मी आणि आजी मॅजेस्टिकला रवाना झालो. चारशे रुपयात काय होणारे हे नाराजीच्या सूरात मी बोलणारही होते पण चारशे रुपयात चार पाच येतील असा 'अचूक' हिशोब करून तिने मला पिटाळलं असतं. आता चारशे रुपयात चार पाच यायला कथाकादंबऱ्या काय सटरफटर गोष्ट आहे का!
चारशे रुपयात दोन तीन काव्यसंग्रह घ्यायचे की कादंबऱ्या घ्यायच्या असं गणित मांडत मांडत मी आणि आजी रिक्षात बसलो. मी रिक्षावाल्याला कोण जाणे कसं राम मारुती रोड ऐवजी गोखले रोड सांगितलं. माझी चूक माझ्या आजीच्या लक्षात यायचं कारणच नव्हतं कारण ती आजतागायत कधीच मॅजेस्टिकला गेली नव्हती. मी चुकीचं ठिकाण सांगितलंय हे माझ्या गावीही नव्हतं. माझ्या डोक्यात अजूनही कशी पुस्तकं घ्यायची याचा हिशोब सुरु होता. रिक्षा दुसऱ्या दिशेला वळल्यावर आजीने इधरसे क्यू उधरसे लेना चाहिये था वगैरे विचारायला सुरवात केली. अनेक वळसे घेत, हुज्जत घालत शेवटी रिक्षावाल्याने आम्हाला राम मारुती रोडवर आणून सोडलं.आधी रिक्षावाल्याने आम्हाला ऐकवलं मग गोखले रोड आणि राम मारुती रोड मधला फरक कसा कळला नाही म्हणून आजीने मला ऐकवलं. ( आता ठाण्यात एवढी वर्ष राहून मला हे कन्फ्युझन कसं झालं हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. पण होतं असं कधी कधी. कृपया वाचकांनी मला 'जज' करू नये. ) शेवटी मॅजेस्टिकमध्ये पोहचलो हे महत्त्वाचं, भले अर्धा ठाणा फिरावा लागला पण पोहचलो. तोवर आजीचा 'लवथवती विक्राळ' झालेला. मी काही 'जस्टीफिकेशन' नको म्हणून गप्पच बसले.
मी मुकाट्याने आत जाऊन पुस्तकं बघू लागले. आजवर जेव्हा जेव्हा मी बुक्स्टोअरमध्ये गेले आहे तेव्हा तेव्हा मला एका प्रश्नाने हमखास छळलंय. बॅग जमा करून आत जा असं कधीच काउंटरवर बसलेले लोक सांगत नाहीत. सिसिटीव्हीची देखरेखही नाही. तीन चार जण मस्तपैकी काउंटरवर गप्पा मारत बसतात. कोणी बॅगेत नेलीच भरून पुस्तकं तर? मला नेहमी हा प्रश्न पडायचा. नंतर मी कुठेतरी वाचलं. वाचणारे कधी चोरत नाहीत आणि चोरणारे कधीच वाचत नाही. हे वाक्य वाचल्यावर वाटलं की काऊंटरवरच्या माणसांचं निर्धास्त असण्यामागचं हेच गुपित असावं. (तरीही मला तो प्रश्न छळतोच)
नेहमीप्रमाणे मी त्यांना वपु कुठे ? म्हणजे वपुंची पुस्तकं कुठे अशा अर्थाने विचारलं. त्यांनी वपुंची पुस्तकं नाहीयेत हे ऐकल्यावर माझा हिरमोड झाला. मग दोन कवितासंग्रह आणि नेमाडेंची कादंबरी घेऊन मी काऊंटरवर आले. बिल बरोबर बनवतायेत की नाही हे मी सहज डोकावून बघत होते. नेहमीप्रमाणे डिस्काउंट किती मिळतो याची मला उत्सुकता. एकूण 450 झाले आणि सूट म्हणून त्यांनी 50 वजा करून 400 लिहिले तेव्हा माझा आनंद गगनात मावेनासा झाला. बरोबर चारशे रुपयात हवी ती पुस्तकं आली याचं समाधान वाटलं. मी खुश होऊन बाहेर पडले. बाहेर पडल्यावर आजीची रिक्षात बसायची चिन्ह दिसेना. आजी सरळ चालू लागली. साड्यांच्या दुकानाबाहेर ती थांबली. कधीपासून मला पांढरी साडी घ्यायची आहे, आलोय तर आता बघू जरा हे ऐकल्यावर माझा चेहरा बघण्यासारखा झाला. बरोबर आलेल्या माणसासाठी साडी विकत घेणं म्हणजे अग्निदिव्यच असतं हे कोणालाही वेगळं सांगायची गरज नाही. आत्ता मला तिचा माझ्यासोबत येण्यामागचं कारण उमगलं. येताना मी गोखले आणि राम मारुती मध्ये गफलत केली त्यामुळे आता या अग्निदिव्याला सामोरं जाण्याशिवाय काही पर्याय नव्हता. मी गुपचूप तिच्या साडी घेण्याच्या सोहळ्यात सामील झाले.
शेवटी हवी तशी पांढरीसाडी मिळाली तेव्हा तिचा आणि साडी दाखवणाऱ्या सेल्समनचा जीव भांड्यात पडला. आठशे रुपयाची साडी घेऊन आजी खुश होऊन बाहेर पडली. साड्या विकत घेणं ही आजीची जुनी हौस, नेसल्यावर होणारा आनंद अवर्णनीय असतो पण त्यापेक्षा ती चार दुकानं फिरून, तासभर सेल्समनला वेठीस धरून हवी तशी साडी घेण्यात तिला जास्त समाधान वाटत असावं.
वर्षानुवर्षं तिचं साड्यांचे ढीग लावणं आणि माझं पुस्तकांचे ढीग लावणं चालू आहे. पण या ढिगाऱ्यातच आमचं सुख दडलेलं आहे. आजही तिने 800 रुपयाची साडी नाही तर समाधानच विकत घेतलं. सुख विकत घेता येतं की नाही माहित नाही, पण क्षणिक समाधान तरी नक्कीच विकत घेता येतं असं मला वाटतं. हेच समाधान तिचं टॉनिक आहे! या वयात कशाला हव्यात एवढ्या साड्या, ते पैसे खाण्यापिण्यावर घालवावेत असं बोलणं निव्वळ फोल ठरेल. हवं ते करण्याचं स्वातंत्र्य आणि अधिकार वयाच्या या टप्प्यावरही मिळतो या भावनेनेच प्रत्येक साडीनिशी तिच्या अंगावर मूठभर मांस वाढत असेल. शेवटी छंद तो छंदच! मग तो पुस्तकं वाचण्याचा असो वा साडीखरेदीचा, जगणं सुखकर आणि समृद्ध होणं सगळ्यात महत्वाचं!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लहान मुलं खेळण्यांच्या दुकानात गेल्यावर जसं तोंड करतात तसं माझं पुस्तकांच्या दुकानात किंवा प्रदर्शनात होतं. लाळगळ्या टाइप्स..:) पोट ( मन) भरत नाही कितीही वेळ काढला तरी.

शेवटी छंद तो छंदच! मग तो पुस्तकं वाचण्याचा असो वा साडीखरेदीचा, जगणं सुखकर आणि समृद्ध होणं सगळ्यात महत्वाचं!+१११११११११११११११११११११११११११११११११११
लहान मुलं खेळण्यांच्या दुकानात गेल्यावर जसं तोंड करतात तसं माझं पुस्तकांच्या दुकानात किंवा प्रदर्शनात होतं. लाळगळ्या टाइप्स..:) पोट ( मन) भरत नाही कितीही वेळ काढला तरी.+१११११११११११११११११११११११११

तोवर आजीचा 'लवलवथी विक्राळ' झालेला. >>> Lol

छान लिहिलंय. खालील वाक्ये विशेष आवडली.

सुख विकत घेता येतं की नाही माहित नाही, पण क्षणिक समाधान तरी नक्कीच विकत घेता येतं असं मला वाटतं.  >>> +१११

हवं ते करण्याचं स्वातंत्र्य आणि अधिकार वयाच्या या टप्प्यावरही मिळतो या भावनेनेच प्रत्येक साडीनिशी तिच्या अंगावर मूठभर मांस वाढत असेल. >>> + १११

छान Happy

मी पण पुस्तकाच्या दुकानात गेले की अधाशासारखीच करत असते Happy

बरेच वर्षात ठाण्याला जाणे झाले नाहीये पण मॅजेस्टीकशी जुने नाते आहे. राम मारुती रस्त्यावरचे ते पानाचे दुकान अजूनही आहे का?
सिगरेट पित उभी असलेली माणसे बाजूला सारून जायला लागायचे तळघरातल्या दुकानात.

पुस्तक खरेदीच्या बाबतीत सेम पिंच. काय घेऊ नी काय ठेवू असं झालेलं असतं. आणि तो प्रश्न माझ्या देखील मनात बरेचदा आलाय आणि मलाही तेच उत्तर वाटलेलं.

2018 वर्षातलीच गोष्ट आहे. लेखात लिहिल्याप्रमाणे 450 चे डिस्काउंट देऊन 400 झाले आणि त्यात एल्गार, भटके पक्षी आणि बिढार ही पुस्तकं आली.

पूर्वी हा लेख वाचलेला होता. तेव्हाही फार आवडला होता. बरं झालं सापडला परत.
>>>> वाचणारे कधी चोरत नाहीत आणि चोरणारे कधीच वाचत नाही. >>>>> करेक्ट!!