योगात् व्यसनमुक्ति: - आसन - भाग २ - डॉ. वैशाली दाबके

Submitted by अतुल ठाकुर on 16 June, 2018 - 20:36

yoga.jpg

योग आणि व्यसनमुक्ती यांचा विचार करताना सुरुवात आसनाने करावी असे डॉ. वैशाली दाबके यांनी सुचवले होते. त्याचे स्पष्टीकरण त्यांनी त्याबद्दल सविस्तर बोलताना केले. त्यावेळी त्यांनी आसनाचा संबंध शिस्त, तर्कसंगतपणा, स्थैर्य, शांतता, मनाला आत वळविणे यांच्याशी लावला. त्यांनी व्यसनमुक्तीच्या दृष्टीने आसनांचा काय उपयोग होऊ शकतो त्या संदर्भात जे सांगितले ते विशद करण्याआधी व्यसनामुळे नक्की काय घडते हे जर स्पष्ट झाले तर येथे आसनांची मदत कशी होते हे नीटपणे लक्षात येईल असे वाटते.

मुक्तांगणला जात असताना आणि ठाणे येथील पाठपुराव्याला हजर राहताना अनेक व्यसनी माणसांना पाहण्याचा योग आला. त्याहूनही जास्त व्यसनमुक्तीच्या पथावर चालणार्‍या अनेकांचे मनोगत ऐकता आले. बहुतेक मनोगतातून काही गोष्टी सारख्या आढळल्या. एक म्हणजे व्यसनाने जीवनाची शिस्त बिघडून जाते. दिनक्रम निश्चित नसतो. जेवणाची झोपण्याची वेळ बदलते. व्यसन वाढल्यावर तर अनेकांना जेवणच जात नाही. कामावर दांड्या होऊ लागतात. पुढे अनेकांचे कामही सुटते. सकाळ, दुपार, संध्याकाळ मनात फक्त व्यसनाचाच विचार असतो. आर्थिक परिस्थिती वाईट असेल तर आज व्यसनासाठी कुणाला फसवायचे हा विचार माणसे करु लागतात. घरी, शेजारी, कामावर भांडणे, वादविवाद विकोपाला गेलेले असतात. पत्नी, मुले बोलत नाहीत. वागणे हिंसक असल्यास घरचे घाबरून असतात. नातेसंबंध तुटतात, निर्व्यसनी मित्र दुरावलेले असतात. शारीरिक आजार जडु लागतात. तर संशयासारखे मानसिक आजारही दार ठोठावू लागतात. आर्थिक घडी विस्कटलेली असतेच. आता शारीरिक, मानसिक, भावनिक, सामाजिक सर्व स्तरावर संपूर्ण आयुष्याचीच घडी विस्कटून जाते. येथे योगातील आसने मदतीला येऊ शकतात.

दाबके मॅडमनी आसनांचे महत्त्व सांगताना प्रथम आसने करण्याची सर्वसाधारण पद्धत सांगितली. एखादे आसन लावणे म्हणजेच माणसाला एखादी सावकाश कृती करण्यास प्रवृत्त केल्यासारखे आहे. हळुवारपणे, पुढे जाताना, मागे येताना, शरीराला त्रास द्यायचा नाही, झटके द्यायचे नाहीत. वेदना होतील येथपर्यंत स्वतःला ताणायचे नाही. आपल्या क्षमतेप्रमाणे करायचे. हे करताना आसनाकडे लक्ष द्यावेच लागते. आणि त्यामुळे माणसाचे लक्ष स्वतःकडे वळते. मन आत वळविण्याची सुरुवात आसनामुळे होते. आसनातील शारीरिक क्रियेमुळे मन गुंतून राहण्यास मदत होते. व्यसनी माणसाच्या बिघडलेल्या दिनक्रमाला ताळ्यावर आणण्याची सुरुवात काही प्रमाणात आसने करु शकतात असे मॅडम म्हणाल्या. त्यांनी अतिशय मार्मिकपणे आसनात एक प्रकारची तर्क संगतता आहे हे देखिल दाखवून दिले. आसन कसे लावावे, कसे सोडावे याची काहीएक पद्धत असते. त्यावेळी आपले लक्ष कोठे असावे, श्वासाची स्थिती काय असावी हे ठरलेले असते. त्यानूसार सराव केल्यास व्यसनी माणसाच्या भिरभिरत्या मनाला काही प्रमाणात स्थिरता यावी यासाठी आसने ही पहिली पायरी ठरू शकते असे बाई म्हणाल्या.

अर्थातच त्यांनी ही साधना निरंतर करण्याची आवश्यकताही सांगितली. दाबकेमॅडमनी दुसरी गोष्ट शरीर आणि मनाच्या सुसंवादाची सांगून व्यसनाच्या गाभ्यालाच हात घातला असे म्हणता येईल. त्यांचे म्हणणे ऐकताना मला मुक्तांगणमधील कार्यक्रम आणि त्यावेळी ऐकलेल्या गोष्टी आठवल्या. अनेकदा असे होते की व्यसन वाईट आहे हे माणसाला कळत असते पण वळत नाही. शरीर व्यसनाची मागणी करते आणि माणूस अगतिक होतो. काहीवेळा शरीराने साथ सोडलेली असताना, आजार बळावलेले असताना देखिल मनाला व्यसन हवे असते आणि माणुस वाहवत जातो. थोडक्यात काय तर शरीर आणि मनात संवादच उरलेला नसतो. येथेही आसने मदतीला येऊ शकतात असे त्यांनी सांगितले.

आसने करताना प्राणधारणा म्हणजे श्वासप्रश्वासावर लक्ष द्यावे लागते. असे करताना मन आपोआप शांत होऊ लागते. मनातील विचार कमी झाले आणि आपले लक्ष आसनावर लागले की शरीर आणि मनाचा संवाद सुरु होतो. आसन क्रमाने लावणे, क्रमाने त्यातून बाहेर येणे, शरीराकडे लक्ष देणे, शरीरात कुठे ताण आहे का ते पाहणे, आसनातील सुखमयतेची जाणीव होणे यामुळे मन आत वळण्यास सुरुवात होते. दाबके मॅडमचे हे स्पष्टीकरण लक्षात घेता असे वाटले की मुक्तांगणमध्येही माणसाला तीस दिवस जेव्हा उपचारांसाठी ठेवून घेतात तेव्हा त्याने आत्मपरीक्षण करावे अशीच तर त्यांची अपेक्षा असते. मनातील व्यसनाचे विचार बाजूला सारून मन वेगळ्या गोष्टीत गुंतले की व्यसनाचा विचार दूर होतो. शरीर मनाची रस्सीखेच दूर होते. मनाची घालभेल थांबण्यास मदत होते. मनाला काही प्रमाणात शांतता प्राप्त होते.

दाबकेमॅडम योगाबद्दल सांगत असताना त्यांच्यातील संशोधक त्यांच्या बोलण्यात डोकावत होताच. त्यामुळे आसनाबद्दल बोलतानादेखील त्यांनी कसलेही दावे केले नाहीत. थोडं स्थैर्य, थोडी शांतता प्राप्त होते असेच शब्द त्यांनी वापरले. आणि याचीच सवय आसनांच्या दीर्घ सरावाने होऊ शकते हे अधोरेखित करण्यास त्या विसरल्या नाहीत. शिवाय अतिशय सौम्य शब्दात त्यांनी सुरुवात मनाच्या अभ्यासापासून करणे कठिण आहे हे देखिल सांगून टाकले. सत्य, अहिंसा यासारखे यम नियम पाळणे किंवा अगदी सुरुवातीलाच प्राणायामाचा अभ्यास हा त्यांना व्यावहारिक दृष्ट्या योग्य वाटला नाही. कारण व्यसनी माणसाची परिस्थिती इतकी बिघडलेली असते की सारे काही हळुहळु आणि दमानेच घ्यावे लागते. त्याची दमछाक करून चालत नाही आणि त्याला एकदम योगातील तत्त्वांचा उपदेशही करूनही चालत नाही. सुरुवात आसनाने करावी. तीही सुलभ आसनांनी करावी असे दाबके मॅडम म्हणाल्या.

दाबके मॅडमशी बोलताना योगाची व्याप्ति ध्यानात येऊ लागली. व्यसनमुक्तीच्या दृष्टीने ही एक महत्वाची उपचार पद्धती ठरु शकते असे वाटले. शरीर मनाचा संवाद जो व्यसनात पूर्णपणे नाहीसा झालेला असतो तो योगाने सुरु होऊ शकतो. शरीराला व्यसनामुळे जडलेले आजार, हे देखील आटोक्यात येण्यास योगाने मदत होऊ शकते. मानसिक, भावनिक स्थैर्य प्राप्त करून देण्यास आसने सहाय्यभूत होऊ शकतात हे मॅडमच्या बोलण्यातून जाणवले. त्यामुळे अर्थातच आता हे सारे फायदे पदरात पाडून घ्यायचे असतील तर आसने कुठली करावी हे विचारणे ओघाने आलेच. त्यावर आता मॅडम काय बोलताहेत हे जाणण्याची उत्सुकता लागून राहिली आहे.

अतुल ठाकुर

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अतुलजी , तुमची ओवघती चित्रदर्शी शैली खूप आवडते. फारच सुंदर लिहीलंय.
शिवाय अतिशय सौम्य शब्दात त्यांनी सुरुवात मनाच्या अभ्यासापासून करणे कठिण आहे हे देखिल सांगून टाकले. सत्य, अहिंसा यासारखे यम नियम पाळणे किंवा अगदी सुरुवातीलाच प्राणायामाचा अभ्यास हा त्यांना व्यावहारिक दृष्ट्या योग्य वाटला नाही.>>>> सह मत. नैराश्यग्रस्त व्यक्तीला प्राणायामाचा सल्ला दिला जातो। मनच थार्यावर नसताना प्राणायाम कसा होईल.
पुढचा भाग लवकर टाका...