आंबा मोसमाच्या सुरवातीला लिहायला घेतलेला हा लेख काही कारणामुळे आता आंबा सिझन जवळ जवळ संपला आहे तेव्हा पूर्ण झाला आहे.
आंबा हा फळांचा आणि कोकणचा राजा आहे. एप्रिल मे महिना आला की सगळयांनाच आंब्याचे वेध लागतात. आंबा आवडत नाही असा माणूस विरळाच. आमच्याकडे तर सासऱ्यांनी लावलेल्या आंब्याच्या बागा, कळश्या - हांडे डोक्यावर घेऊन आडजागी असलेल्या झाडांना घातलेले पाणी, पोटच्या पोराप्रमाणे त्यांची केलेली निगराणी, जीवाचं रान करून वाढविलेली कलमं आणि आता पुढची पिढी ही त्याच प्रेमाने ही संपदा वाढवतेय, जोपासतेय म्हणून वाटणारा अभिमान ह्यामुळे आंबा ही आमच्या मर्मबंधातली ठेवच बनला आहे .
नोव्हेम्बर महिन्यात थंडीची चाहूल लागली की आमचे गावाला फोन जरा जास्तच होतात. कलमं मोहरली का हे विचारण्यासाठी. आमचा हा देवगड हापूस अतिशय हळवा आहे. अगदी लवंगेची उष्णता आणि वेलडोद्याची थंडी सहन न होणारा. ह्याला थंडी खूप जास्त ही चालत नाही आणि कमी ही चालत नाही. नोव्हेंबर, डिसेंम्बर मध्ये कधी मळभ आलं किंवा पाऊस आला तरी सोसत नाही. हे सगळं नीट जमून आलं तर थंडी सुरू झाली की एखाद दिवस गडी सड्यावरच अमुक कलम संपूर्ण मोहरलंय अशी गोड बातमी घेऊन येतो. घरातले उत्साही मेंबर संध्याकाळी हा महोत्सव याची देही याची डोळा पाहायला सड्यावर जातात. ते मोहरलेलं सोनपिवळं झाड फारच सुंदर दिसत. मोहोराच्या गोड वासाने जीव वेडावतो. मोहराची एक डिक्षी आवर्जून घरी आणली जाते. ती देवाला अर्पण करून यंदा खूप चांगला सिझन जाऊ दे अशी प्रार्थना ही केली जाते . मग हळू हळू सगळीच झाडं मोहरतात. झाडांची आणि मोहोराची निगराणी जास्तच वाढते.
आंबा दिसामासाने मोठा होतच असतो. मोहोरी एवढा वाटाण्या एवढा, आवळ्या एवढा अशा स्टेजेस पार करत त्याची तोरं म्हणजे आत छोटीसी कोय असलेली आंबट, तुरट, छोटी कैरी बनते. एखाद्या संध्याकाळी राखण्या अशी टोपलीभर तोरं घरात आणुन टाकतो. पोरं मीठ, मसाला लावून ती लगेच मटकावतात. दात आंबत असले तरी मोठयांना ही मोह आवरत नाहीच. मग दुसऱ्या दिवशी त्याच तात्पुरतं लोणचं घातलं जातं आणि अर्थात ते भाजी पेक्षाही जास्त वेगाने संपत ही. कधी कौतुकाने कैरीची चटणी, कैरीचा तक्कु, मेथांबा, पन्हं, आंबा डाळ असे पदार्थ आवर्जून केले जातात.
इकडे बागेतले झाडावरचे आंबे मोठे होत असतात. ती फळलेली झाडं बघायला मस्तच वाटतात. एखादं बाळ कलम ही फळलेलं असत आणि त्याचा आंबा जमिनीपासून अगदी सहा इंचावर डुलताना दिसतो. त्या गोडुल्याला कुरवाळल्या शिवाय पुढे जाणं अशक्यच असत. बागेत फेरफटका मारताना कधी कधी पाडाचा आंबा अगदी आपल्या पुढ्यात टपकन पडतो. तिथल्या तिथे सगळ्याना वाटून तो खाण्याची मजा काही औरच. उगवती कडच्या फळांना सकाळची कोवळी सूर्यकिरण स्नान घालत असतात. त्यांचा तेवढा भाग कोवळ्या किरणांसारखा केशरी होतो.
दिवस पुढे सरकतच असतात . फळं जून होतात आणि एक दिवस निष्णात गडी फळं उतरवायला झाडावर चढतात. कोयत्याने डेख तोडून फळ घळी मध्ये गोळा केलं जातं. दूर वरून कोणता आंबा तयार आहे आणि कोणता नाही हे ठरवण्यासाठी निष्णात नजरेचीच गरज असते. त्यामुळे आंबा उतरवण्याचं काम काही ठराविक गडीच करतात. संध्याकाळी ती ओझी मागच्या पडवीत आणली जातात. कैरीच्या वासाने घर भरून जात. घरातली सगळीजण त्या भोवती गोळा होतात. मोठ्या मानाने त्यांची रवानगी माळ्यावर होते आणि वर्षाची वहिली अढी माळ्यावर घातली जाते. आठ दहा दिवस गवताच्या उबेत घालवले की मगच त्या हिरव्या, आंबट, कैरीचं सोनेरी पिवळ्या, गोड रसाळ आंब्यात रूपांतर होतं. आंबा नीट पिकला की त्याचा स्वाद वाढतोच, रंग ही बदलतोच पण तो हाताला अगदी गार ही लागतो ही आंबा पूर्ण पिकल्याची खूण. अशा तऱ्हेने पूर्ण पिकलेला आंबा पंचेंद्रियाना सुखावतो. आणि मग सुरू होतो ... दरवर्षी त्याच उत्साहाने साजरा होणारा आंबा महोत्सव.
जनरली गुढी पाडव्याचं पक्वान म्हणजे श्रीखंड पण आमच्याकडे पहिला वहिला आमरस जनरली गुढीपाडव्याला होतो. कधी आंबे मागास असले तर पाडव्याला आम्रखंड करायचं पण काहीतरी आंब्याचंच करायचं ही आमची प्रथा. एकदा का पाडवा झाला की तिन्ही त्रिकाळ आंबे खाऊन हा महोत्सव साजरा केला जातो. सकाळी न्येरी झाली की मनसोक्त बिटक्या ,दुपारी रस आणि रात्री कापलेल्या आंब्याच्या फोडी असा आम्र महोत्सव दिवसेंदिवस बहरतच जातो. कधी कधी रात्री जेवण झाल्यावर आंबा आईस्क्रीम किंवा मँगो मिल्क शेकच सरप्राईज ही असतं. कधी दुपारी आंब्या - फणसाची सांदण केली जातात. आंब्याचा मोसम संपला तरी ही आंब्याची मजा चाखण्यासाठी रस आटवून ठेवला जातो , साटं घातली जातात. मुरांबा करून ठेवला जातो. आमरसाचे टिन भरून घेतले जातात.
आमच्या कडच्या बिटकयांबद्दल सांगते थोडं... जनरली बिटक्या म्हटलं की रायवळ येतो डोळ्यासमोर. पण आमच्या कडच्या बिटक्या रायवळच्या नसून हापूसच्याच असतात. आकाराने असतात साधारण चिकू एवढ्या. पण असतात अगदी गोड आणि रसाळ. त्याच असं होतं की कधी कधी अगदी जवळ जवळ फळधारणा झाली तर त्यातलं एक खूप वाढू शकत नाही अपुऱ्या जागेमुळे. मग त्याच्याच होतात या बिटक्या. आकाराने जरी लहान असल्या तरी त्या पूर्ण वाढ झालेल्या आणि म्हणूनच रसाळ गोड आणि अस्सल हापुसची चव असलेल्या असतात. ह्याची साल अगदी पात्तळ असते आणि कोय बारीक छोटीसी असते. न्येरी झाली की ह्या बिटक्या चोखुन खाताना मोठी माणसं ही रंगून गुंगून जातात तर लहानांची काय कथा. मुंबईची मुलं घरी जाताना स्वतः भरलेला बिटक्यांचा एखादा छोटा खोका आवर्जून घरी नेतातच. ह्या बिटक्या ही आमच्या घरची खासियत आहे . ह्या तुम्हाला कुठे ही विकत नाही मिळणार. कारण बाजारात जरी बिटक्या विकत मिळाल्या तरी त्या रायवळ च्या मिळतील. हापूस नाही. हापूस आणि पायरी सोडून केशर, रत्ना, रायवळ वैगेरे आंबे आहेत आमच्याकडे ही. साखऱ्या, भोपळी, केळांबा (जो केळ्या सारखा सोलून खाल्ला जातो), लोणच्याचा, तोतापुरी ही त्याच्या गुणांकरून पडलेली काही नाव. आणि वईतला, धारेवरचा, सड्यावरचा ,घाटीतला अमक्या बागेतला ही त्याच्या स्थाना वरून मिळालेली काही नाव.
सड्यावरच्या बागेत काढणी असली की घरी जाण्या येण्यात गड्यांचा वेळ जाऊ नये म्हणून तिथल्या मांगरातच त्यानां जेवण खाण दिलं जातं. ही मांगरात दिवस घालवण्याची संधी मी सोडत नाही. मुलं ही असतातच बरोबर. तिखट आमटी, भात , आणि घरून दिलेली एखादी म्हणजे बहुत करून फणसाची भाजी, लोणचं आणि ताक असा मस्त मेन्यू असतो . गडी माणसांबरोबर जेवताना खूपच मजा येते. दुपारी सड्यावर ऊन रणरणत् असत . त्यामुळे मांगरात येणाऱ्या उन्हाच्या झळा, गरम वारे यांची चांगलीच गुंगी येते आणि विना पंखा ही झोप कधी लागते ते कळत नाही. “वैनीनू च्या घेवा” अस कोणीतरी उठवल्या खेरीज जाग ही येत नाही. कधी कधी न झोपता मुलांबरोबर पत्त्याचे डाव रंगतात. उन्ह थोडी कालली की बागेत फेरफटका, पाडाचे आंबे खाणं, विहिरीवर जाऊन गार पाणी पिणे, कामवाल्यांबरोबर गप्पा , गाणी, उखाणे ह्यात दिवस कधी सरतो ते कळत ही नाही .
आंब्याच्या सीझन मध्ये आमचं सगळं घर आंब्या भोवती फिरत असत कारण आंबा बागायती हा आमचा प्रमुख व्यवसाय आहे. आदल्या दिवशीच उद्या काय काय करायचं ह्याचं प्लॅंनिंग केलं जातं म्हणजे सकाळी गडी कामावर आले की त्यानां कामाच्या सूचना देणं सोपं होतं. दिवसभर वेगवेगळ्या बागात काढणी होते. गड्यांबरोबर घरचे ही असतातच तिथे. आंब्याची ओझी पुढील कामासाठी खळ्यात आणून टाकली जातात. त्या खळ्यात एक अदृश्य रेषा आहे. चपला घालून जो ही रेषा ओलांडेल त्याने चहा आणि भजी याची पार्टी द्यायची असा अलिखित नियम आहे. रेषा अदृश्य , नियम अलिखित तरी अंमलबजावणी मात्र अगदी काटेकोर पणे होते ह्याची. मी जेव्हा अगदी पहिल्यांदा घरी गेले होते तेव्हा मला माझ्या यजमानांनी सांगितलं होतं ह्याबद्दल पण तरी ही मी ती रेषा ओलांडली होती आणि यजमानांना पार्टीचा भुर्दंड पडला होता. असो. खळ्यात आणलेल्या आंब्याचं वजनानुसार सॉर्टींग केलं जातं. खालती वरती आणि दोन थरांच्या मध्ये ही गवत घालून आंब्याच्या साईज नुसार ते पत्र्याच्या पेटीत, पुठ्ठ्याच्या बॉक्स मध्ये भरले जातात. मुंबई आंबा मार्केटमध्ये काम करणाऱ्या कामगारांना लिहिता वाचता येत नाही म्हणून माझ्या तिथे रहाणाऱ्या सासऱ्यांना लोगोची कल्पना सुचली. बॉक्सला बांधली जाणारी दोरी ही कामगारांना समजाव म्हणून विशिष्ट रंगाचीच असावी ही सुद्धा त्यांची कल्पना. त्यांनी मोठया कष्टाने, सचोटीने हा व्यवसाय करून आमच्या लोगोला आंब्याच्या मार्केट मध्ये मानाच स्थान प्राप्त करून दिलं आहे. तर पेटी भरून झाली की त्यावर आमचा लोगो उठवला जातो आणि ट्रकने रात्रीच पेट्या मुंबई मार्केट ला दलाला कडे रवाना होतात. हे सगळं होई पर्यंत रात्रीचे नऊ दहा सहज वाजतात. अशा तऱ्हेने सकाळी पाच साडेपाचला सुरू झालेला दिवस रात्री दहा च्या सुमारास संपतो. घरच्या लेकी सुनांच्या माहेरी आणि सासरी, इतर नातलगांना, आणि सुहृदांना ही भेट पेट्या रवाना होतात. पूर्वी गलबताने आंबे मुंबईला दलाला पर्यंत पोचायला आठ आठ दिवस लागत असत. आता ट्रक मुळे तो अवधी आठ तासांवर आलाय.
बदललेले हवामान, खतांचा आणि कीटकनाशकांचा वापर, वाढलेली स्पर्धा, दलालांची मार्केट मध्ये असलेली सत्ता, केमिकलने आंबे पिकवण्यामुळे ग्राहकांच्या मनात निर्माण झालेला गोंधळ, एकंदरच गोड कमी खाण्याकडे वाढलेला कल, निर्यातीसाठी असलेले काटेकोर नियम ह्या सगळ्या मुळे ह्या देवगडच्या राजाचा रुबाब हल्ली कमी झाला आहे पण सगळे दिवस सारखे नसतात ह्या न्यायाने हे ही दिवस जातील आणि पुन्हा ह्याला पहिल्या सारखे वैभव प्राप्त होईल याची मला खात्री वाटते.
आमच्या पुढच्या पिढीला त्यांच्या खापरपणजोबांनी लावलेल्या झाडाचे आंबे आजही खायला मिळतात हीच आनंदाची गोष्ट आहे. ही खापरपणजोबांपर्यंतची कडी अजून ही इतकी मजबूत आहे हेच खरं समाधान आहे.
मी पहिली! हा ही लेख मस्त च ..
मी पहिली! हा ही लेख मस्त च .... सर्व कसं डोळ्यासमोर उभं राहतं वाचताना.
मस्तच लेख...
मस्तच लेख...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
जरा आखूड झालाय का? की मलाच असं वाटतंय आधाश्यासारखा वाचल्यानी?
वर लेखांत दुसर्या परिच्छेदात 'वेलदोड्याची' असं कराल का कृपया?
खूप मस्त वाटलं वाचताना.
खूप मस्त वाटलं वाचताना. अगदी डोळ्यासमोर उभं राहिलं.
इथे अमेरिकेत बसून वाचत असताना
इथे अमेरिकेत बसून वाचत असताना पण मला माझ्या गावाची आणि आंब्याच्या सिझनची भयानक आठवण आली.
अप्रतिम लेख. आपल्या आजोबा पणजोबांनी लावलेल्या झाडाची फळ चाखताना खुप वेगळच अप्रूप असतं.
मनात कोकणातल्या घराच्या कितीतरी सुंदर आठवणी आहेत. आज खरंच रिफ्रेश झाल्यासारखं वाटलं.
>>खापरपणजोबांनी लावलेल्या
>>खापरपणजोबांनी लावलेल्या झाडाचे आंबे आजही खायला मिळतात हीच आनंदाची गोष्ट आहे.<<
खरं आहे. गावच्या अगदि रानातहि आंबा, फणस, काजु, जांभळं, रातांबे, साग याव्यतिरिक्त कुठलंहि फालतु झाडं सापडत नाहि. आणि तुम्ही वर लिहिल्याप्रमाणे प्रत्येक झाडांच नांव त्याच्या स्वतःच्याच कॅरेक्टर वरुन पडलेलं असतं. ते कोणी लावलं (आजी/आजोबा, काका/काकु...), त्याची चव (आंबट, गोड, खाजरी...), त्याचा आकार (बिटक्या, वाकड्या...), किंवा त्याचं एखादं युनिक कॅरेक्टरिस्टिक (कोइत भरपुर धागे असणारा - ##रा)![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
झाडावरंच चांगला पिकलेला आंबा ओळखायची अजुन एक खुण म्हणजे "चानखाजरा". गावच्या मुलांची नजर असे चानखाजरे बरोब्बर शोधुन काढायची...
नेहमीप्रमाणेच छान झालाय लेख.
नेहमीप्रमाणेच छान झालाय लेख.
यंदा २८ वर्षांनी पहिल्यांदाच एप्रिल आणि थोडा मे अशी भारतात गेले होते आणि आंबे खाल्ले. खूप जणांनी काय वाटलं एवढ्या वर्षांनी खाताना असा साहजिकपणे येणारा प्रश्न विचारला. मला अजूनही माझं नक्की उत्तर सापडलं नाहीये.
अप्रतीम लेख आहे, अगदी
अप्रतीम लेख आहे, अगदी आंब्याचा मधाळ, रसाळ गोडवा लेखात प्रत्येक ठिकाणी भरभरुन उतरलाय.
ममो, आंब्याचे साटे ( रस आटवुन केलेला मावा वगैरे) या विषयी पाककृती लिहीशील का दोन- तीन दिवसात, कारण बाजारात अजून हापुस आहे.
नेहमीप्रमाणेच अप्रतिम लेख!
नेहमीप्रमाणेच अप्रतिम लेख!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
तुमचे लेख वाचले की कोकणात एक छोटसं घरं हवचं असं वाटत
छान वाटलं वाचुन.
छान वाटलं वाचुन.
हेमाताई, किती सुरेख लिहिलंय
हेमाताई, किती सुरेख लिहिलंय तुम्ही.
तुमचे सगळे लेख अगदी चित्रदर्शी असतात आणि अतीव प्रेमाने लिहिलेले असतात. हा लेख वाचताना तुमचं नाडणातलं घर, घरातली प्रेमळ माणसं सगळं अगदी डोळ्यांसमोर उभं राहिलं.
मस्त आहे लेख
मस्त आहे लेख
हेमाताई, किती सुरेख लिहिलंय
हेमाताई, किती सुरेख लिहिलंय तुम्ही. >>> + १०००००
नेहमीप्रमाणेच सुन्दर !
अप्रतिम. तुमचे घर नाडणला आहे
अप्रतिम. तुमचे घर नाडणला आहे का? कारण माझे घर तुमच्यापासुन अगदी जवळ वाडे गावात आहे
सुरेख लिहिले आहे. तुमचे लेख
सुरेख लिहिले आहे. तुमचे लेख नेहमीच आवडतात. खूप प्रेमाने, आत्मीयतेने लिहिलेले असतात.
तुमचे लेख वाचले की कोकणात एक छोटसं घरं हवचं असं वाटत>> +१
खुप छान हेमाताई. अगदी बागेत
खुप छान हेमाताई. अगदी बागेत बागडून आणलत.
माझ्या माहेरच्या आठवणीही काहिश्या अशाच आहे. आमच्याकडे के बिटकी आंबा होता तोही चिकू एवढाच. त्याला आम्ही साखरबाठी आंबा म्हणायचो. तो विहिरीच्या होता. ,मी मागे विहिरीवर लेख लिहीला होता त्यात पहा आमच्या विहिरीला जिने होते. त्या जिन्यात हे साखरबाठी आंबे पडायचे आम्ही ते सकाळी गोळा करायचो. आंबा इतका गोड की जणू साखरच आणि तो पिवळा नाही व्हायचा आतून पन्ह्यासारखाच रंग दिसायचा.
सुरेख लिहिले आहे. तुमचे लेख
सुरेख लिहिले आहे. तुमचे लेख वाचले की कोकणात एक छोटसं घरं हवचं असं वाटत +१
नेहमीप्रमाणेच सुंदर लेख
नेहमीप्रमाणेच सुंदर लेख![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
हेमा ताई, अगदी हापुस आंब्या
हेमा ताई, अगदी हापुस आंब्या सारखा गोड आणि रसाळ लेख! तुमचे लेख फार म्हणजे फारच आवडतात.
तुमचे लेख वाचले की कोकणात एक छोटसं घरं हवचं असं वाटत>> +१
नेहेमीप्रमाणे खूपच सुंदर लेख
नेहेमीप्रमाणे खूपच सुंदर लेख !! मी हे खूपच रिलेट केले .. कित्येक मे महिने तुम्ही वर्णन केल्याप्रमाणे अगदी तंतोतंत घडले आहेत आयुष्यात !!
मस्त मस्त लेख.
मस्त मस्त लेख.
ते मोहरलेलं सोनपिवळं झाड फारच सुंदर दिसत.>>>> या मार्चमधे रानीखेतला जाताना हारीने आंब्याची झाडे अशा मोहराने डवरलेली पाहिली.खरंच मस्त दिसतं.
ह्या तुम्हाला कुठे ही विकत नाही मिळणार.>>>>> मला शेजारणीकडून भेट मिळाली.चिमुकले आंबे बघून मजा वाटली.
ममो, आंब्याचे साटे ( रस आटवुन केलेला मावा वगैरे) या विषयी पाककृती लिहीशील का दोन- तीन दिवसात, >>>>> +१.
नेहमीप्रमाणे जिव्हाळ्याने,
नेहमीप्रमाणे जिव्हाळ्याने, आपुलकीने ओतप्रोत भरलेला रसाळ, मधुर लेख!
एकदम मस्त!
एकदम मस्त!
आज खूप दिवसानी जुने लेख शोधत
आज खूप दिवसानी जुने लेख शोधत असताना हा अचानक लागला हाताला.
खूप सुंदर लिहीलय. कोकणात घालवलेल्या उन्हाळी सुट्ट्या आठवल्या.
हेमाताई, किती सुरेख लिहिलंय
हेमाताई, किती सुरेख लिहिलंय तुम्ही.
तुमचे सगळे लेख अगदी चित्रदर्शी असतात आणि अतीव प्रेमाने लिहिलेले असतात. हा लेख वाचताना तुमचं नाडणातलं घर, घरातली प्रेमळ माणसं सगळं अगदी डोळ्यांसमोर उभं राहिलं. >>> + 99999
अप्रतिम लेख. सहज, सरळ, ओघवती लेखनशैली.....
प्रतिसादासाठी सर्वांना
प्रतिसादासाठी सर्वांना धन्यवाद.