बक्षीस (२)

Submitted by राजेश्री on 26 May, 2018 - 12:53

बक्षीस (२)

चित्तरकथा....

माझी कोणत्यातरी स्पर्धेत बक्षीस मिळावं ही अपेक्षा त्यापेक्षा कितीतरी जास्त अभिलाषा ही मी कोणत्या स्पर्धेत भाग घेतेय,माझी काय तयारी सुरू आहे आणि मी कशी बक्षिसाची योग्य अशी दावेदार आहे हे आजूबाजूला चाळीतही कळावं आणि त्यांनी मला येता जाता काय , स्पर्धेची तयारी कुठपर्यंत आली ? अस विचारावं ही होती.हे म्हणजे येता जाता पाठीवर शाबासकीची थाप पडून पडून पाठ कामातून गेली तरी चालेल पण प्रोत्साहन मात्र मिळालं पाहिजे असं होत.
मी चित्रकला स्पर्धेचा ध्यास घेतला तेंव्हा पप्पांनी मला कोरे जाड पुट्याचे कागद ज्याला कॅनव्हास म्हणता येईल की नाही मला माहित नाही.शिवाय तीन प्रकारचे रंग ,एक म्हणजे स्केचपेन,दुसरे रंगीत जलरंगाचे खडू आणि तिसरे छोट्या छोट्या रंगाच्या बाटल्या. झालंस तर ते रंग ओतण्यासाठी रंगाचा सप्तरंगी ट्रे आणि वेगवेगळ्या साईज चे ब्रश अशी सर्व साग्रसंगीत तयारी करून दिली.तायडीचे काही नाही बिट्या येता जाता माझे हे रंगांचे साहित्य बघायला मागायचा.मी त्याला हे कसं माझ्या स्पर्धेसाठीच महत्वाचं साहित्य आहे आणि कसं महाग आहे हे साऱ्या चाळीत ऐकू जाईल एवढ्या मोठ्या आवाजात ओरडून सांगायचे.या ओरडण्याने चाळीतले बाकीचे बाळ गोपाळ मंडळ माझ्याभोवती गोळा व्हावे हाच एकमेव हेतू असायचा.स्पर्धेसाठीचे रंगांचे अत्यंत महाग साहित्य,मी चित्रकार आहे अश्या शब्दांचा योग्य तो परिणाम साधला जायचा आणि चाळीतली सगळी चिल्ली पिल्ली माझ्याभोवती ते साहित्य बघायला जमायची.मी त्यांना ते साहित्य दाखवताना एक अट हळू आवाजात घालायचे ते म्हणजे तुम्ही सगळे मला आजपासून चित्रकार म्हणत जावा.काही बोबड बोलणारे मग चितलकाल म्हणायचा प्रयत्न करायचे मग मी त्यांना या टास्क मधून वगळून हा शब्द पेलणाऱ्या मंडळींना मला चित्रकार म्हणण्याचा परवाना देऊ करायचे.दोन रंग मिक्स होऊन कसा तिसरा रंग तयार होतो हे मी स्वतःच काहीतरी जादू किंवा अशक्य असे संशोधन किंवा साधना करून शोधून काढलेला प्रयोग असल्याच्या थाटात सर्वांना Iदाखवायचे.काही अतिहुशार मंडळींचा दावा हा पांढऱ्यात काळा रंग मिक्स केला तर गडद पांढरा रंग तयार होईल असा दावा असायचा.मी त्यांना मग खूप रंगांचे प्रात्यक्षिक करून काळ्या रंगात तुम्ही काहीही मिक्स केलं तर तो रंग काळाच कसा राहील हे सप्रमाण सारे रंग काळ्या रंगात मिक्स करून दाखवायचे.तोपर्यंत माझ्यासह बाकीचे चिल्ली पिल्ली मंडळ त्या वेगवेगळ्या रंगात न्हाहून निघालेलं असायचं.फरशीवर रंग पडून फरशी रंगीत झाल्यामुळं तायडी मला ओरडायची. मग मी सर्वाना मला स्पर्धेची तयारी करायची आहे तुम्ही जावा मला बक्षीस मिळालं की ते बघायला या म्हणून त्यांना तिथून घालवायचे.
मग मी कोणते चित्र सर्वप्रथम चितारावे या विचारात आमच्या हॉल मध्ये चोहोबाजुनी लावलेल्या देवांच्या फोटोपुढे ऊभा राहून सर्व देवांची निवड चाचणी घ्यायचे.दत्ताला वगळूया मनात म्हणायचे ते तीन चेहरे नेमके एकत्र करून एक मान येणं हे खूप अवघड काम आहे हे जाणवायचं.मग एका हाताने पैसे पाडणाऱ्या लक्ष्मीचे चित्र चितारावे का हा विचार करताना मला ते पैसे काढता येईल पण लक्ष्मीच्या अंगावरील दागिने चितारणे हे खूप अवघड काम आहे आणि सर्व दागिने मानेच्या मागच्या बाजूला कुठे संपून गेलेत हे काही केल्या मला न उकललेले कोडे होते.दागिने मानेवर बांधता आले नाहीत तर ते पडतील की काय अशी भीती होतीच.मग हवेत उंच उडून सूर्याला पकडायला गेलेला बाल हनुमान होता मोठ्या हनुमानाच्या एका हातावर पर्वत होता.तो आकाशात उडतोय पण आपण कागदावर रेखाटताना तो कागदावर सपशेल झोपल्यासारखा वाटणार तो उडतोय पण नेमका कसा हे देखील माझ्यासाठी अगम्य होत.पुढं कालीमातेसाठी लागणारा काळा रंग मघाशी त्या पोरासनी जादू दाखवायच्या नादात फार कमी राहिल्याचे लक्षात आले होते.शिवाय कालिमातेच्या पायाखाली असलेल्या वाघाचे आव्हान मला पेलवले नसतेच.विठ्ठल रखुमाई एकत्र काढावे लागणार एक काढायची पंचाईत दोन कसे काढणार या मुद्यात मी पुढं सरकले.सरस्वती च्या विणेबद्दल प्रश्न निर्माण झाला.अन्नपूर्णा हातात जेवणाचे ताट पकडण्याचा वाद निर्माण झाला.मग मी सर्व देवांना निवड चाचणीत उपस्थित राहिल्याबद्दल आणि निवड का होऊ शकत नाहीत याची मनातल्या मनात कारणे सांगून,त्यांची काय चुकलं असेल तर माफ करा अशी क्षमा मागून विद्येचा अधिपती म्हणजे गणपती बाप्पा चित्र काढणेसाठी निवड केली .
गणपती बाप्पांसमोर तासनतास ठिय्या मारून मी गणराज रंगी रंगतो म्हणत त्याला कागदावर चितारत राहू लागले.सुरवातीला साचा काढून घ्यायचे ठरले.मोठे कान किती मोठे याचा अंदाज येत नव्हता,तुटलेला दात नेमका तोंडात हवा तर सोंडेत येत होता.सोंडेची गुंडाळी होत नव्हती.डोक्यावरील मुकुट की मुकुटावर डोके अशी परिस्थिती निर्माण झाली.खाली आलो तर कधी प्रमाणाबाहेर पोट सुटलेला गणपती तर कधी पोट खणपटीला गेलेला गणपती व्हायचा.माझ्या या चित्रसाधनेत मम्मी येऊन मला म्हणायची,कलाकार चला आधी जेऊन घ्या .मग मला कलाकार ही उपाधी आवडल्याने तिचे लगेच ऐकून जेवून घ्यायचे.आकखा दिवस खर्ची पाडून मी जे चित्र काढले आहे ते गणपतीचे आहे हे केवळ मी सांगू शकायचे दुसऱ्यांचे गणपती किंवा आणि इतर कोण अस काही म्हणायची हिम्मत व्हायची नाही.गणपतीचे पितांबर पिवळे असते पण माझ्या चित्रात ते काळपट कलर चे व्हायचे.मनात म्हणायचे कधी कधी ते मळूही शकतेच ना.नाहीतर मम्मी मलाही सगळी कपडे मळखाऊच घेते ना.मम्मीला चित्र दाखवले की ती मला म्हणायची तुझ्या मानाने ते चांगलं आहे.मग मला माझा मान नेमका किती ते कळायचं नाहीच. त्यामुळे पप्पांना ते चित्र दाखवलं जायचं नाही.पप्पा विचारायचे अधे मध्ये चित्रकला स्पर्धा जवळ आली,तयारी झाली का राजा? मी हो म्हणायचे.मग विचारायचे कोणते चित्र काढणार स्पर्धेत मी म्हणायचे निसर्गचित्र.
स्पर्धेला जाताना मी घरी,चाळीत सर्वांच्या पाया पडून जाणार ,सुट्टी दिवशी स्पर्धा तायडीवर मला स्पर्धेच्या ठिकाणी पोहोचवायची जबाबदारी मग ती रागाने मला सायकल वरून तिथे नेऊन सोडायची आणि येताना चालत ये मी घरी जाते म्हणायची. ऐन स्पर्धेवेळी मला निसर्गचित्र मधील डोंगर किती ठिकाणी मुडपायचा कळायचं नाही.सूर्य बरोबर मध्ये काढायचा तर नेमका डोंगराचा उंचवटा तिथे यायचा. बिचारा सूर्य वर्गातून बाहेर काढलेल्या मुलासारखा डोंगराच्या कडेला काढावा लागायचा. पक्षी उडतायत हे दाखवताना काही पक्ष्यांची संख्या फार व्हायची. मी मनात म्हणायचे,असुदे मला पक्षी आवडतात.नदी वाहताना दाखवताना मी नदीत दगड गोटे दाखवण्याचा प्रयत्न करायचे पण दगडासहित माझा तो बापूडवाणा प्रयत्न हाणून पडायचा.नदीतील दगड डोंगरावर चढाई साठी जातायत अस वाटायचे.कौलारू घर जमायचं पण घराची कौले डोंगरापर्यंत उंच व्हायची."लिंगोबाचा डोंगर आभाळी गेला,ठाकर गडी तिथं कधी नाय गेला"हे गाणं आठवायचं मधेच मग वाटायच माझ्या या कौलारू घरावर ठाकर गडी पोचेल तर तो त्या डोंगरावर सहज पोहचू शकेल.

येनकेन प्रकारे निसर्गचित्र म्हणून मी जे काही काढलं ते तिथे हवाली करून दुःखी कष्टी मनाने घरी निघून यायचे .कारण मी मध्ये अधे इतरांची चित्रकला बघितली होती.ती माझ्यापेक्षा कैकपटीने उजवी अशीच होती.आता आपल्याला चमत्कारच बक्षीस मिळवून देऊ शकतो अस वाटायच.चमत्कार हा व्हायला पाहिजे होता की,इतर सर्वांची चित्रे मी काढलेल्या नदीतून दगड गोट्या बरोबर वाहून गेली तर मला नंबर मिळण्याचा चान्स होता.मग मी उदास मनाने घरी यायचे.रंगाचं साहित्य हे रंगाऱ्याच साहित्य असल्यासारख कोपऱ्यात टाकले जायचे.आल्यावर मम्मीला रागात बोलले माझे रंग चांगले नव्हते लगेच वाळत होते.आणि पाणी टाकून पातळ केले की जास्त पातळ होत होते.मग ते चित्रावर पळत होते.मम्मी म्हणाली असुदे कलाकार जेवायला चला, मग मी रागाने मला कलाकार म्हणूं नकोस अस मम्मीवर वैतागले होते.पप्पा कामावरून आले त्यांना माझी चित्तरकथा नेहेमीप्रमाने मम्मीकडून समजली.पप्पा म्हणाले जाऊ दे राजा तुला चित्रकलेत बक्षीस मिळणार नसेल तरी ,कारण मिळालेला अनुभव हा देखील एकप्रकारचा बक्षीसच असतो....(क्रमशः..)

Group content visibility: 
Public - accessible to all site users