मोठ्या मनाचा माणूस
१
सकाळची वेळ होती. अंबाबार्इच्या मंदीराबाहेर नेहमीप्रमाणेच आजही दर्शनासाठी भाविकांची लांबच लांब रांग होती. मंदीराच्या दारात उभे असलेले पोलीस हातात मेटल डिटेक्टर घेऊन भाविकांची तपासणी करण्यात मग्न होते. हारतुरे वाले, मिठार्इवाले, पूजेचं साहीत्य विकणारे तसेच शोभेच्या वस्तूंचे विक्रेते नुकतेच आपली दुकानं उघडून बसले होते. काही दुकानात सकाळपासूनच पर्यटकांची गर्दी झाली होती तर काही दुकानदार अजूनही भवानीच्या प्रतिक्षेत होते. आजूबाजूला बरीच चमकणारी तुळतुळीत डोकी दिसत होती. प्रथेप्रमाणे बरेच भाविक तिरूपती बालाजीचं दर्शन घेऊन मग अंबाबार्इच्या दर्शनासाठी कोल्हापूरात येत असत. त्यामुळे अंबाबार्इच्या देवळाभोवतीचा परिसर कायमच पर्यटकांनी गजबजलेला असे.
मंदीर म्हंटल की भिकारीही आलेच. मंदीरा बाहेरच एका ओळीत भिकारी बसले होते. वेगवेगळ्या वयाचे, वेगवेगळ्या आकाराचे, लुळे पांगळे, आंधळे तर काही चांगले धडधाकट सुद्धा होते. प्रत्येकजण मोठमोठ्याने ओरडत होता. रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या पर्यटकांकडे भीक मागत होता. त्यांच्यात जणू भिक मागायची स्पर्धाच सुरू होती. राजूही त्या भिकाऱ्यांपैकीच होता,पण तो भिकारी मुळीच वाटत नसे. बदकांच्या कळपात एखादा राजहंस कसा दिसेल तसा तो त्या भिकाऱ्यांमध्ये सुदधा वेगळा उठून दिसत होता. गोरा रंग, गोंडस चेहेरा आणि अंगावर फाटके कपडे असं त्याचं रूप होते.
तर एवढा गोंडस मुलगा या भिकाऱ्यांमध्ये काय करत होता हे जाणून घेण्यासाठी आपल्याला थोडं मागे जावं लागेल.
२
राजेंद्र भिडे आणि सरिता भिडे या जोडप्याला लग्न होऊन चार वर्ष झाली, तरी मुल होत नव्हतं म्हणून त्यांनी नरसोबाच्या वाडीत दत्ताला नवस बोलला होता. काही वर्षात त्यांना मुल झाल. नवसामुळे मुल झालं अस समजून हे जोडपं आपल्या बाळाला घेऊन नरसोबाच्या वाडीला नवस फेडण्यासाठी आले होते. बाळ जन्मल्यावर एक वर्ष पूर्ण झाल्यावर म्हणजेच बाळाच्या पहिल्या वाढदिवशी बाळाला घेऊन दर्शनाला येऊ असा नवस त्यांनी बोलला होता. त्यांच्याबरोबर सरिताची बहीण जया सुदधा आली होती.
डॉ. राजेंद्रने गाडी पार्क केली आणि ते दर्शन घेण्यासाठी निघाले. जवळजवळ तासभर उभे राहिल्यानंतर त्यांना दर्शन मिळाले. प्रदक्षिणा घालून ते घाटावर आले. बाळ एवढं गोंडस होत की समोरून येणारा प्रत्येक जण बाळाकडे कौतुकाने पाहून हासत होता. राजेंद्र आणि जया कृष्णा नदीच्या पाण्यात पाय बुडवून घाटावरचं वारं खात बसले होते. सरिताच्या कडेवर बाळ असल्याने ती थोडी लांब बसली होती.
घाटावर बराच वेळ घालवून ते आता तिथून निघाले. जेवणाची वेळ झाली होती. सर्वांना खूप भूक लागली होती. ते पार्किंगकडे जात असतांना सरिताला एक दागिन्यांचे दुकान दिसले. राजेंद्रला सागूंन सरिता आणि जया त्या दुकानांत शिरल्या. आता या दोघी एक तास तरी बाहेर येणार नाहीत हे राजेंद्रला माहीत होत. बाळाला कडेवर घेऊन तो पुढे चालू लागला. एका दुकानातून त्याने पेढे घेतले. वाडीच्या पेढयांबददल त्याने बऱ्याच जणांकडून ऐकले होते. राजेंद्रला आठवलं, एका महत्त्वाच्या कामासाठी त्याला एक फोन करावयाचा होता. तो आता STD बुथ शोधू लागला. जवळच एका दुकानदाराकडे STD फोन होता.राजेंद्रने बाळाला काउंटरवर ठेवले व त्या फोनवर ऑफीसचा नबंर डायल केला. कामाच बोलून झाल्यावर राजेंद्रने फोन ठेवला. आणि बाळाला घेण्यासाठी तो काउंटरकडे वळला पण काउंटरवर बाळ नव्हतं. समोर बसलेला दुकानदार वर्तमानपत्र वाचण्यात मग्न होता. त्याचं कुठे लक्षच नव्हतं. राजेंद्रने जवळपासच्या दुकानदारांना विचारलं, पण कुणीच बाळाला पाहील नव्हतं. राजेंद्रला काय करावं तेच कळत नव्हतं. तो वाटेत दिसेल त्याला, ‘माझं बाळ बघितलं का?’ असं विचारत सुटला. पण कुणाकडेच त्याच्या प्रश्नाचं होकारार्थी उत्तर नव्हतं.
आता तो सरिताला काय तोंड दाखवणार होता ? बाळ सापडल्याशिवाय राजेंद्र तिच्यासमोर उभाही राहू शकत नव्हता, कारण एवढं लहान बाळ आपणहून त्या काउंटरवरून खाली उतरणं शक्यच नव्हतं. नक्कीच बाळाला कोणीतरी पळवलं होतं, आणि कोणी पळवलं हे केवळ तिथले स्थानिक पोलिसच शोधू शकणार होते.
राजेंद्र पोलिस स्टेशन मध्ये गेला, आणि त्याने बाळ हरवल्याचे पोलिसांना सांगितले. त्याने तक्रार नोंदवली आणि एक फोटोही इन्स्पेक्टरकडे दिला. इन्स्पेक्टर राजेंद्रला म्हणाले, “तुम्ही काळजी करू नका. हे नक्कीच जवळच्याच झोपडपट्टीत राहणाऱ्या भिकाऱ्यांच काम असणार. आम्ही लवकरच तुमचं बाळ तुम्हाला मिळवून देऊ. मी आत्ताच आमची एक टीम झोपडपट्टीत पाठवतो.”
३
सबइन्स्पेक्टर सावंत आणि त्यांच्या बरोबर दोन कॉन्स्टेबल झोपडपट्टीपाशी आले. तिघांच्याही हातात बाळाच्या फोटोची एक एक कॉपी होती. ते तिघेही एकेका झोपडीत घुसून बाळ कुठे दिसते का हे पाहात होत. पण त्यांना बाळ मिळालं नाही. आता एकच झोपडी राहीली होती. राम्या भिकारी आणि त्याची बायको रखमा यांची झोपडी. राम्या आणि सबइंस्पेक्टर सावंत यांचे संबध तसे खूप जवळचे होते, कारण सावंतांनी राम्याला चोरीच्या आरोपाखाली बऱ्याचदा आत टाकलं होत. त्यामुळे सावंतांना राम्यावर दाट संशय होता. सावंत राम्याच्या झोपडीपाशी आले. राम्या आत बसून जेवत होता. सावंत आणि दोन कॉन्स्टेबल सरळ आत गेले. सावंतांची तीक्ष्ण नजर संपूर्ण झोपडीभर फिरली, पण त्यांना कुठेच बाळ दिसले नाही. सावंतांनी हाताने खूण करताच त्या कॉन्स्टेबलनी त्या झोपडीतील प्रत्येक वस्तू उचकायला सुरूवात केली. राम्याला या सर्व प्रकाराची सवय असल्याकारणाने तो अगदी शांतपणे जेवत होता. झोपडीचा कानाकोपरा शोधूनसुध्दा बाळ काही मिळालं नाही. सबइन्स्पेक्टर सावंत यांना अजूनही वाटत होतं की बाळ राम्या आणि रखमानीच पळवल आहे. त्यात रखमा कुठच दिसत नव्हती, त्यामुळे त्यांचा संशय अजूनच वाढला.
सावंत राम्याला म्हणाले, “ राम्या खरं सांग बाळाला कुठं लपवलयस ? रखमा कुठं घेऊन गेलीये बाळाला? आत्ताच्याआत्ता सांग.”
राम्या म्हणाला, “साब, तुमी काय बोलताय मला काइ कळना. कोणतं बाळ? आन मी कुठलंचं बाळ नाय लपवल.” अतिशय भोळा चेहरा करून राम्या म्हणाला.
“हे बघ राम्या, तुला बोलतं करायचे माझ्याकडे इतरही मार्ग आहेत. मी तुला आजून एक संधी देतो, जे काय मी विचारीन त्याची खरी उत्तरं द्यायची. देवळाजवळच्या दुकानातून हे बाळ तूच चोरलस ना ?” सावंतानी बाळाचा फोटो दाखवून राम्याला विचारंल.
राम्या चांगूलपणाचा आव आणून बोलू लागला, “साहेब तुमी मला यितकी वर्ष वळखता. भीक मागून पोट भरणारा मी एक क्षुल्लक जीव. कधी लई भिक मिळते कधी काहीच मिळत नाही. मग रिकामं पोट आनी पोटात ओरडणारे कावळे छोटी-मोठी चोरी करायला भाग पाडतात. खरच सागंतो साहेब मी चोर आहे पन येवढ्या लहान बाळाला पळवायला मी काय हैवान नाय. मी खरच नाय पळवलं बाळाला.” राम्या खरचं चांगला कलाकार होता. त्याच्या नौटंकीचा सावंतांवर खूपच परिणाम झाला होता. ते म्हणाले, “ठीक आहे. थोड्यावेळासाठी आपण असं समजू की ,तू बाळ पळवलं नाहीस पण मग रखमा कुठं गायब आहे ?”
राम्या म्हणाला, “तिच्या बहिणीला पोरगं झालं म्हणून ती काल रात्रिच बहिणीला भेटायला मिरजेला गेलीय. उद्या ती परत येईल, तवा तिची हवी तेवढी तपासनी करा.” उद्या परत येतो असे सांगून सावंत निघाले. त्यांनी कॉन्स्टेबलना राम्यावर लक्ष ठेवायला सांगितलं होतं.
राजेंद्र अजूनही पोलिस स्टेशन मध्येच थांबला होता. बाळाच्या काळजीने त्याचा चेहरा पार उतरला होता. “तुम्ही घरी परत जा. तुमचं बाळ मिळालं की मी लगेच कळवीन. काळजी करू नका. तुमचं बाळ सुखरूप असेल.” असे सांगून इन्स्पेक्टर कदमांनी राजेंद्रला समजवण्याचा प्रयत्न केला. पण तो काय तेथून हलायला तयार नव्हता. सरिता आणि जया आपल्याला शोधत असतील याचही भान त्याला नव्हतं.
सावंतांना येताना पाहून राजेंद्रचा चेहरा एकदम खुलला. पण त्यांचे रिकामे हात पाहून त्याचा उत्साह ओसरला. आपल्या बाळाला शोधण्यात सावंतांना अपशय आलंय हे राजेंद्रला समजलं, तरी पण आपलं बाळ सुखरूप असेल आणि लवकरच पोलिस बाळाला शोधून काढतील याबद्दल तो आशावादी होता. जेव्हा माणसाकडे काहीच उरत नाही तेव्हा आशारूपी खांबच त्याच्या मनाला आधार द्यायचं काम करतो आणि राजेंद्रच्या बाबतीत सुद्धा आता तेच होत होतं.
४
रखमा बाळाकडे कौतुकाने पाहात होती. एवढं गोंडस बाळ तिने या पूर्वी कधीच पाहीलं नव्हतं. तिच्या थोराड, रखरखीत हातात ते बाळ शांत झोपलं होत. बराच वेळ रडून ते शांत झालं होतं आणि आता ते गाढ झोपलं होतं. रखमानं कसबसं त्याला शांत करून झोपवलं होतं. बस मधला प्रत्येक जण त्यांच्याकडे पाहात होता. असल्या गावंढळ, भिकारी बाईच्या हातात एवढं सुंदर, गोंडस बाळ पाहून प्रत्येकालाच आश्चर्य आणि कुतुहल वाटत होतं. बस आता कोल्हापूरच्या एस.टी. स्टँडवर येऊन थांबली. रखमा बसमधून उतरली आणि शिंगणापूर गावाच्या बसमध्ये चढली. शिंगणापूर गावाजवळच एक झोपडपट्टी होती. त्या झोपडपट्टीमध्ये रखमाची सख्खी बहिण चंदा रहायची. चंदा आणि तिचा नवरा दोघेही शेतात काम करून आपलं पोट भरत होते.
चंदा झोपडी बाहेर कपडे धुवत होती. तिला रखमा हातात बाळ घेऊन येतांना दिसली. रखमाला पाहून चंदा एकदम ओरडलीच. कितीतरी दिवसांनी त्या एकमेकीला भेटत होत्या. चंदा रखमाला म्हणाली, “कित्येक दिसांनी तोंड दाखवत्येस ? माझ्याकडं काय काम काढलस ? आनी भाऊजी कसे हायेत ? आनी हे पोर कोनाचं उचलून आणलस ? तुझं तर नाय वाटत.” असा तिने रखमा वर प्रश्नांचा भडीमार केला.
रखमा चंदाला म्हणाली, “अगं हो. सांगते की सगळं, किती प्रश्न इचारतीस, पहीलं मला एक गीलास पानी दे. लई ऊन हाय भायेर.”
पाणी पिऊन रखमा बोलू लागली, “आज सकाळी भिक मागायसाठी देवळाकडं गेले तर रग्गड गर्दी व्हती. लई लोक दर्शनासाठी आले होते. त्यामुळे लई भीक मिळाली. मी पन लई खुशीत होते. मिळालेले दोनशे रूपये घेऊन मी घराकडं निघाले व्हते, तवा वाटेत एका दुकानापाशी हे पोर मला दिसलं. येवढं सुंदर पोर मी माझ्या जिंदगीत कधीच पाहीलं नव्हतं. मी त्याच्याकडं पाहातच राहीले. कोनाचच त्या पोराकडे लक्ष नव्हत. पोराचा बाप कोनाशी तरी फोनवर बोलत व्हता. अन त्यो दुकानदार बी प्येपर वाचत व्हता. म्हनून मी हळूच गेले आणि पोराला उचलंल. पोराला घेऊन डायरेक झोपडीवर आले. आता मी आनी राम्या या पोराला आपलं पोर समजून सांभाळनार हाय. त्योबी लई खूश हाय.”
यापूर्वी चंदानं रखमाला एवढं खुश कधीच पाहीलं नव्हतं. कारण खुश व्हायसाठी तसा प्रसंगच रखमाच्या आयुष्यात कधी आला नव्हता. रखमाचे वडील पोलीसांचा खबऱ्या म्हणून काम करायचे. तिची आई कायम आजारीच असायची. गुंडांच्या एका टोळीची माहीती काढण्यासाठी रखमाचे वडील त्या गुंडांच्या टोळीत सामिल झाले होते. पण एकदा त्या गुंडांच्या म्होरक्याला ते पोलीसांचा एजंट आहेत आणि ते आपली माहीती पोलीसांपर्यंत पोहोचवतात हे कळलं आणि त्याने रखमाच्या वडीलांना ठार केलं. घरातला एकुलता एक कमावता माणूस गेल्यामुळे आणि आईच्या आजारपणामुळे रखमाला आणि चंदाला शाळा सोडावी लागली. त्या घरोघरी जाऊन धुण्याभांड्याची कामं करू लागल्या. वडील गेल्यावर वर्षभरातच आईनेही जगाचा निरोप घेतला. आता रखमा आणि चंदाकडे पुरेशी कामं होती. दोघींचही लग्नाच वय झालं होत. एका श्रीमंत शेठजीच्या घरात रखमा धुण भांडीची काम करायची. तिथे राम्या माळी काम करायचा.तिथेच दोघांची भेट झाली. पहीली मैत्री झाली आणि थोड्याच दिवसांत मैत्रीच रूपांतर प्रेमात झालं आणि दोघांनीही लग्न करायचा निर्णय घेतला. लग्न झाल्यावर रखमा आणि राम्या एकत्र राहू लागले. सगळं चांगलं चालत होत. शेठजीही आता म्हातारे झाले होते. शेठजींची रखमा आणि राम्यावर चांगलीच मर्जी होती. राम्या आणि रखमाचा संसार चांगला चालला होता. दोघेही अगदी सुखात होते. पण हे सुख थोडेच दिवस टिकलं.
एक दीवस अचानक शेठजींची तब्येत बिघडली. राम्या आणि रखमाने त्यांना हॉस्पीटल मध्ये ऍडमिट केलं. थोड्याच दिवसात त्यांचा अमेरीकेत राहणारा एकुलता एक मुलगा त्यांना भेटायला आला. शेठजींची तब्येत सुधरायचं नावच घेत नव्हती. त्यांच्या मुलानं त्यांना आपल्याबरोबर अमेरीकेला आपल्या घरी नेण्याचा निर्णय घेतला. शेठजींचा अमेरीकेला जाऊन आता एक महीना झाला होता.
रखमाकडची इतर कामही आता कमी झाली होती. आणि राम्यालाही दुसरं कोणतच काम नव्हतं. शेठजींच्या मुलाने परत जातांना राम्याच्या हातात त्या दोघांचे एक महिन्याचे पगार दिले होते. एक दिवस काही लोक शेठजींच्या बंगल्यावर आले आणि त्यांनी मशिनने बंगला पाडायला सुरूवात केली. रखमा आणि राम्याला काय चालल आहे काहीच कळेना. राम्याने त्या माणसांपैकी एकाला विचारले तर त्याने शेठजी वारले व त्यांच्या मुलानेच आता आम्हाला हे घर पाडायला सांगितलं आहे असे राम्याला सांगितले. त्या जागी आता नवीन उंच इमरत बांधणार आहेत असेही त्याने सांगितले. म्हणजे राम्याला आता नवीन काम शोधणं भाग होत. शेठजींच्या मुलाने दिलेले पैसेही आता संपत आले होते.
बराच प्रयत्न केल्यावर सुद्धा राम्याला काम मिळत नव्हतं. राम्याला जेवढे पैसे मिळत होते त्यात त्यांच एक वेळचं जेवण कसंबसं निघत होत. शेवटी त्यांनी गाव सोडण्याचा निर्णय घेतला. राम्याचा बालपणीचा एक मित्र नरसोबाच्या वाडी जवळच्या झोपडपट्टीत राहात होता. तिथेच तो शेतात ऊस तोडणीची कामं करीत असे. त्याच्या ओळखीने राम्या आणि रखमाला शेतात काम मिळाले. शेताचा मालक कामगारांकडून कमी पैशांत खूप काम करून घ्यायचा. राम्या आणि रखमा दिवसभर काम करून दमून जायचे. मालक राम्या कडून घरची कामही करून घ्यायचा.
जमीन शेणाने सारवण्यापासून अगदी मालकाच्या मुलाला शाळेत पोहोचवण्यापर्यंत सगळी कामं राम्या करायचा. रखमाही त्याला मदत करायची. एकदा राम्या नेहमी प्रमाणे वरांडा शेणाने सारवत होता. त्याला सोन्याचं कडं खुर्चीवर पडलेलं दिसलं, जवळपास कोण नाही हे पाहून पटकन ते आपल्या खिशात ठेवलं. मालक पहाटे उठून तालमीत जात असे. तो नेहमी हातातलं कडं काढून ते आत कपाटात ठेवत असे व परत घरी आल्यावर हातात घालत असे. आज पहाटे नेहमी प्रमाणे निघाण्यापूर्वी मालकाने कडं हातातून काढलं तेवढ्यात त्याला आपल्या मुलाचा “आई गं” असा ओरडण्याचा आवाज आला. मालकाचा मुलगा जिन्यावरून खाली येत असतांना घसरून पडला होता. गुडघा आपटल्यामुळे गुडघ्यातून रक्त येत होतं. मुलाचा आवाज ऐकून मालकाने हातातले कडं घाईत तसंच खुर्चीवर टाकलं आणि धावतचं तो मुलाजवळ गेला. आज तो तालमीत न जाता मुलाला घेऊन दवाखान्यात गेला. डॉक्टरचं घर दवाखान्याला लागूनच असल्यामुळे एवढ्या सकाळी पण डॉक्टर उपलब्ध होता.
परत घरी आल्यावर कडं कुठंच दिसत नाही हे मालकाच्या लक्षात आलं. मुलाचा आवाज ऐकून आपण कडं खुर्चीवरच ठेवल्याचं त्याला आठवलं. रोज सकाळी सगळ्या घराची साफसफाई करून जमीन शेणाने सारवण्याचं कामं राम्याच करत असे. त्यामुळे राम्या आणि रखमा सोडले तर इतर कामगारांच घरात फारसं येणं जाणं नसे. मालकाने, शेतात काम करणाऱ्या राम्याला आत बोलावलं आणि दोन माणसांना त्याची पूर्ण तपासणी करायला सांगितली. आपलं आज काही खरं नाही हे राम्याला कळून चुकलं होतं. फाशीची शिक्षा जाहीर झालेला कैदी ज्याप्रमाणे फाशीच्या फंदासमोर असाहाय्यपणे उभा असतो तसा राम्या एका जागी स्तब्ध उभा होता. त्याची पहिली चोरी सापडली होती. राम्याची तपासणी करणाऱ्यांपैकी एकाला राम्याच्या खिशात सोन्याच कडं सापडलं. संतापलेल्या मालकाने राम्याच्या कानाखाली लगावली. मालकाने एवढ्या जोरात मारलं होतं की मालकाची बोटं राम्याच्या गालावर उमटली होती. मालकाने बोट करताच त्या दोन माणसांनी राम्याला धक्के मारून घराच्या बाहेर ढकललं. गाल चोळत राम्या बाहेर आला. परत एकदा राम्या आणि रखमा बेरोजगार झाले.
आता राम्या आणि रखमाकडे कुठलचं काम नव्हतं. रखमाला चंदाची आठवण झाली. चंदाच सुद्धा लग्न झालं होतं. ती तिच्या नवऱ्याबरोबर कोल्हापूर जवळच्या शिंगणापूर गावापासून काही अंतरावर वसलेल्या झोपडपटी्त राहात होती. दोघेही शेतात काम करून आपलं पोट भरत होते. त्यांना एक मुलगाही झाला होता. रखमा, चंदाला भेटण्यासाठी शिंगणापूरला आली. रखमाला पाहून चंदा खूपच खुश झाली. ती रखमाला म्हणाली, “काय गं रखमे, इतक्या वर्षांनी बहीणीची आठवन कशी काय आली?”“ चंदाच्या हातातलं बाळ पाहून रखमा क्षणभर आपलं दु:ख विसरली. रखमा तिला म्हणाली, “काय नाय गं चंदे, तुझं बाळ पहायला आले मी.” ती जरी असं म्हणत असली तरी तिचा चेहेरा वेगळचं सांगत होता. आणि चंदा तर तिची बहीण होती. रखमाच्या चेहरयाकडे पाहूनच ती काहीतरी लपवते आहे हे चंदाला कळलं होत. ती रखमाला म्हणाली, “हे बघ रखमे मी तुझी बहीण हाय, त्यामुळे माझ्यापासनं काय बी लपवू नगस. जे काय बी हाय ते सपश्ट सांग.” रखमाने तिला दीड-दोन वर्षात घडलेलं सर्व- काही सांगितलं. कसं शेठजींच्या घरचं काम गेलं. कसं त्यांना नरसोबा वाडीला जावं लागलं. तिथे मालकाने त्यांना कसं हाकललं. हे सर्वकाही तिने चंदाला सांगितलं. ती चंदाला म्हणाली, “चंदे आमची लई वाईट हालत झालीये. आम्ही दोघे पन बिनकामाचे झोपडीत बसून असतो. आमच्या जवळचे पैसे सुद्धा आता संपत आलेतं. कायतरी काम देना आमाला.” हे एकून चंदाला फार वाईट वाटलं. आपलं एवढं चांगल झालं. चांगला नवरा मिळाला, चांगलं काम मिळालं, मुलही झालं. मग रखमाच्याच बाबतीत असं का व्हावं? नवरा चोरटा निघाला, त्याच्यापायी हातातलं कामही गेलं, लग्नाला दोन वर्ष होउनही अजून मुल नाही. चंदाला रखमाबद्दल खूप वाईट वाटत होतं. पण ती तरी काय करणार होती? तिला स्वत:लाच कसंबसं काम मिळालं होतं. ती रखमाला म्हणाली, “रखमे, खरंतर तुझ्याबद्दल जे झालं त्यासाठी मला लई खराब वाटतयं. पन मलाच कसंबसं काम मिळालय. मी तुला कुठंन काम आनून देउ? तरी पन मी मालकास्नी इचारते अन काम असलं तर तुला सांगते.”
चंदाच्या बोलण्यावरून तरी ती काय काम दिल अस वाटत नव्हतं. रखमा हाताश होउन परत आली. राम्या आपली वाट बघत असणार असे तिला वाटले होते. पण झोपडीत राम्या नव्हता. तिने चहा करून घेतला आणि पुढे काय करायचं याचा विचार करत बसली. आता सगळ संपलं. आता जगण्यात काही अर्थ नाही. या जन्मात नाही तर पुढच्या जन्मात तरी आपल्याला चांगलं आयुष्य मिळेल. असे नको ते विचार तिच्या मनात येऊ लागले. तेवढ्यात राम्या आत आला. त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आंनद दिसत होता. त्याला खुश पाहून रखमालाही बरं वाटलं. ती काही विचारायच्या आत राम्याच तिला सांगू लागला, “रखमे, आज मी देवळाकडं गेलतो. तिथं देवळाबाहेर भिकारी बसले होते. देवळात दर्शनासाठी येणारे लोक त्या भिकाऱ्यांच्या झोळीत पैसे टाकत व्हते. मी दिवसभर तिथंच होतो. आगं तु इचार बी करू शकणार न्हाइस येवढे पैसे त्या भिकाऱ्याना मिळतात. मी ठरवलय, आपनबी उद्यापास्न देवळाबाहेर भिक मागायची.” खरं म्हणजे भिक मागण्यात आनंद व्हायचं काहीच कारणं नव्हतं. पण जिवंत राहण्यासाठी काहीही करायची राम्याची तयारी होती. त्याला झालेला आनंद हा काही भिक मागण्यासाठी नव्हता तर तो जिवंत राहण्यासाठी उपलब्ध झालेल्या पर्यायासाठीचा आनंद होता.
दुसऱ्या दिवशी सकाळीच राम्या आणि रखमा देवळाबाहेर भिक मगायला बसले. खरं तर रखमाला हे फारस पटलं नव्हतं. पण आता त्यांच्याजवळचे पैसेही संपत आले होते आणि सध्या तरी पैसे कमवण्याचा याहून सोपा मार्ग त्यांच्याजवळ नव्हता.
रोज स्वत:चं पोट भरण्यापुरते पैसे त्यांना भिक मागून मिळत होते. आता राम्या आणि रखमा सराईत भिकारी झाले होते. सुरूवातीला थोडे दिवस रखमाला भिक मागतांना लाज वाटायची. ओळखीचं कोणी आलं तर काय म्हणेल? जर कधी चंदा दर्शनासाठी आली आणि तिने आपल्याला असं पाहीलं तर तिला काय वाटेल? असले प्रश्न तिच्या मनात वारंवार यायचे. पण तिचं मन आता दगडाचं झाल होतं. आता पैसेही बऱ्यापैकी मिळू लागले होते. आता रखमाची एकच इच्छा पूर्ण व्हायची राहीली होती. आई होण्याची. लग्नाला तीन वर्ष पूर्ण होउन सुद्धा त्यांना मुल होत नव्हतं. दर्शनाच्या रांगेत हातात बाळ घेऊन उभ्या असलेल्या आयांचा तिला खूप हेवा वाटे.
चांगले पैसे मिळूनही राम्याची चोरीची सवय काही जात नव्हती. पोलिसांनी बऱ्याचदा त्याला चोरी करतांना पकडला होता. जेल त्याच्यासाठी दुसरं घरच झाल होत. जेव्हा रखमा एकटीच भिक मागायची तेव्हा इतर भिकारी ओळखायचे की राम्या तुरूंगात आहे.
असच एक दिवस दुपारी झोपडीकडे जात असतांना रखमाला ते गोंडस बाळ दिसले. कुणाचंच त्या बाळाकडे लक्ष नव्हतं हे पाहून आयत्या मिळालेल्या संधीचा फायदा घेऊन तिने ते बाळ उचललं आणि त्याला पदराखाली लपवून ती झोपडीवर आली. तिने ते बाळ राम्याला दाखवलं, आणि बाळाला ठेऊन घेण्याची इच्छा तिने राम्याला सांगितली.
खरं म्हणजे राम्या काही त्यासाठी तयार नव्हता. पण, रखमाच्या हट्टासमोर त्याचं काही चाललं नाही. ते बाळ कोणालाही लळा लागेल असेच होतं.
पोलिस बाळाला शोधत येतील याचा अंदाज राम्याला आला होता. म्हणूनच त्याने रखमाला बाळाला घेऊन चंदाकडे जायला सांगितले. ती बाळाला थोडे दिवस चंदाकडेच ठेवणार होती. वातावरण शांत झाल्यावर बाळाला परत घेऊन येणार होती.
५
भानावर आलेला राजेंद्र सरिता आणि जयाला शोधत पार्किंगपाशी आला. तिथे त्या त्याचीच वाट पाहात होत्या. त्यांच्या दोन्ही हातात पिशव्या होत्या. त्यांनी बरच शॉपिंग केलय हे हातातल्या पिशव्या पाहून कळत होतं. सरिता राजेंद्रवर चिडली होती. ती आणि जया एक तासापेक्षा जास्त वेळ राजेंद्रची वाट पाहत तिथे उभ्या होत्या. इतर वेळी राजेंद्र तिला शांत करू शकला असता. पण बाळ हरवले आहे हे तिला कळल्यावर ती काय करेल याचा विचार सुद्धा करू शकत नव्हता. ती काही बोलायच्या आतच त्याने सगळं सांगून टाकलं. सरिता पटकन खालीच बसली .तिच्या डोळयातुन अश्रू वाहू लागले. थोड्या वेळाने ती उभी राहीली आणि मला माझं बाळ पाहिजे, असं ओरडत राजेंद्रच्या छातीवर हात आपटू लागली. आपण कुठे आहोत, रस्त्यावरचे लोक आपल्याकडे पाहतायत याचही भान तिला नव्हतं. याक्षणी ती राजेंद्रची बायको आणि जयाची बहीण नव्हती. ती केवळ आपल्या बाळाच्या विरहामुळे व्याकुळ झालेली माता होती. जया आणि राजेंद्र ने कसंबसं तिला शांत केल. आता ते परतीच्या प्रवासासाठी निघाले. सरिता तिथून निघायला तयार नव्हती. पण जया आणि राजेंद्रने तिची खूप वेळ समजूत काढल्यावर ती कार मध्ये बसली.
ते मुंबईला घरी पोहोचले. तिघांनाही खुप चुकल्या चुकल्या सारखं वाटत होतं. गेल्या वर्षभरात सगळ्यांनाच बाळाचा लळा लागला होता. बाळाचा जन्म झाल्यापासून सरिताच पूर्ण आयुष्यच बदललं होत. बाळाला सांभाळण्यासाठी तिने नोकरी सोडली होती.
तरी आता कुणाशीच बोलत नव्हती. बाळाचा फोटो घेऊन खोलीत रडत बसायची. तिने जेवणही सोडलं होतं. राजेंद्रचं सुद्धा कामात लक्ष लागत नव्हतं. त्याला ही सारखी बाळाची आठवण येत होती. पण आता परिस्थीतीच अशी होती की त्याला कठोर राहणं भाग होतं. स्वत:ला सावरून सरिताला सांभाळण्याचं अवघड काम त्याला करायच होतं. जया सुद्धा थोडे दिवस त्यांच्या घरी राहीली होती. सरिता पूर्वपदावर येईपर्यँत जया तिथेच सरिता जवळ थांबणार होती.
सलग तीन दिवस सरिताने काहीच खाल्ल नव्हतं. तिची तब्येत खूपच खालावली होती. पण तरीसुद्धा ती अन्नाला हात लावायला तयार नव्हती. आता ती केवळ एकाच माणसाचं ऐकण्याची शक्यता होती.
राजेंद्र, जया आणि सरिता राघवेंद्र महाराजांच्या मठात आले. महाराज ध्यान लावून बसले होते. थोड्या वेळाने महाराजांनी डोळे उघडले आणि त्यांची दयाळू नजर राजेंद्र आणि सरिता वर स्थिरावली.
ते काही बोलण्याच्या आधीच सरिता त्यांच्या पायापाशी बसून रडायला लागली. महाराजांनी तिला शांत होण्यास सांगितले. थोड्यावेळाने ती शांत झाली आणि तिने बाळ कसं हरवलं ते सविस्तर सांगितलं. मुल होण्यासाठी नरसोबावाडीच्या दत्ताला नवस बोलण्याचा सल्ला स्वत: राघवेंद्र महाराजांनीच त्या दोघांना दिला होता.
महाराज त्यांच्या ठेवणीच्या शैलीत बोलू लागले. हे बघ, बाळ, या जगात घडणारी कोणतीही घटना ही या सॄष्टीच्या विधात्याच्या इच्छेनुसारच होते. आपण मनुष्य प्राणी जरी स्वत:ला या पॄथ्वीवरील सर्वात हुशार प्राणी समजत असलो तरी त्याच्यासमोर आपण फारच लहान, छोटे आहोत. तुमच्या नशीबात नसतांनाही तुम्ही केलेल्या याचनेमुळे तुम्हाला मातॄसुखाचा आणि पितॄसुखाचा आनंद घेता यावा यासाठी देवाने तुमच्या पदरात मुल टाकले. आता, एक वर्ष मातॄसुख आiण पितॄसुख अनुभवल्यावर त्याने ते मुल परत नेले. एवढे बोलून महाराजांनी एका सेवकाकडे पाहून हाताने खूण केली, तो सेवक आत गेला आणि महाराजांची काठी घेऊन बाहेर आला. सुंदर नक्षीकाम केलेला तो दंड टेकत टेकत महाराज आत निघून गेले.
हा महाराज कोणी संत महात्मा नव्हता तर साध्या भोळ्या, पीडीत लोकांच्या भावनांशी खेळून त्यांना लुबाडणारा राक्षस होता. तो कधीच फुकटात दर्शन द्यायचा नाही. त्याने त्याचा मठ सुद्धा राजेंद्र, सरिता सारख्यांकडून मिळालेल्या देणगीतून बांधला होता. त्याचा मठ बाहेरून जरी वाटत नसला तरी आतून सर्व सोयी सुविधांनी युक्त होता. त्याच्या काही खास सेवकांनाच त्याच्या कक्षात प्रवेश करण्याची अनुमती होती. बाहेर जरी तो आपल्या मधूर वाणीने लोकांवर मोहीनी घालत असला तरी त्याच्या कक्षात वेगळाच सत्संग चालत असे.
काहीच दिवसात सरिता पूर्वपदावर आली. ती आता स्वत:ला घरकामात रमवत होती. कधी कधी तिला बाळाची फार आठवण येई. अशावेळी मग तिला भरून येई. अशावेळी ती जयाशी बोलत असे. जया तिची समजूत काढायची. जयाशी बोलून आपलं मन मोकळं केल्यावर सरिताला बरं वाटत होतं.
राजेंद्र सुद्धा स्वत:ला ऑफीसच्या कामात गुंतवून दु:ख विसरण्याचा प्रयत्न करत होता. त्यालाही बाळाची आठवण येई. शेवटी तो एक बाप होता.
वेळ हेच औषध या नियमानुसार राजेंद्र आणि सरिता या दोघांनाही दु:ख पूर्णपणे विसरणं जरी शक्य नसलं तरी जसा वेळ जाईल तशी त्यांच्या दु:खाची तीव्रता कमी होणार होती. त्यामुळे एकमेकाला सांभाळणे हाच त्यांच्या पुढचा एकमेव पर्याय होता.
६
बरेच दिवस सब इन्स्पेक्टर सावंत राम्या आणि रखमाच्या झोपडीकडे फिरकले नव्हते. बाळाला चंदाकडे ठेवून एक महिना पूर्ण होत आला होता. आज सकाळीच रखमा बाळाला पाहण्यासाठी चंदाकडे जाण्यासाठी निघणार होती. तेवढ्यात चंदाच दारात उभी होती. रखमा चंदाकडे आश्चर्याने पाहत तिला म्हणाली, “आज येवढ्या सकाळी माझ्याकडे कशी काय आलीस?” “अगं सांगते की सगळं, पन मी येवढ्या लांबन आले, पैलं चहा तर पाज.” चंदा म्हणाली.
चहा पिऊन झाल्यावर चंदा बोलु लागली, “आमचा मालक देशी दारू बनवन्याचा धंदा चालू करतोय. त्याला कामगार पायजेत म्हनून तुला सांगायला आले. तू आणि भाओजी आता आमच्या इथच राहयला या. पैसेबी बरं भेटतील. आणि भीक मागन्यापेक्षा हे काम बरं नाई का?”
भीक मागायचं काम खरतर रखमाला आवडलं नव्हतं. आणि बाळाला इथे परत आणणं धोक्याचं होतं. त्यामुळे चंदाने सांगितलेलं तिला पटत होतं. ती चंदाला म्हणाली, “चंदे खरतर मला बी हे भिकाऱ्याचं आयुष्य नकोय. आनी बाळाला इथं आणणं बी लई धोक्याच हाय. पोलिसांना कळालं तर आम्हाला दोघांनाबी आत टाकतील. पन मी येकदा राम्याशी बोलते.”
चंदा गेल्यावर रखमाने राम्याला उठवलं आणि त्याला सर्व काही सांगितल. तो पण लगेच तयार झाला. दोनच दिवसात दोघांनी आपलं बाड बिस्तर गुंडाळलं, आणि आपला संसार चंदा जिथे रहात होती त्या शिंगणापूर जवळच्या झोपडपटटीत हालवला.
आता राम्या आणि रखमा रोज देशी दारूच्या कारखान्यात जाऊ लागले. सुरूवातीचे काही दिवस रखमाला दारूच्या उग्र वासाचा खूप त्रास व्हायचा. पण हळूहळू तिला सवय झाली. संध्याकाळी घरी परत आल्यावर ती पूर्ण वेळ बाळाबरोबरच घालवायची. त्यांच्या शेजारीच एक आज्जी रहायची. तिला लहान बाळं फार आवडायची. बाळाचे आई वडील कामावर गेले की ही आज्जीच बाळाला सांभाळायची. ती एकटीच राहायची. तिला कोणीच वारीस नव्हता. झोपडपटटीतली तीन चार बाळं तीच सांभाळायची. या बाळांचे पालक रोज तिची जेवणाची सोय करायचे. त्या झोपडपट्टीतील किती तरी मुलं तीनं वाढवली होती. तिच्यामुळे रखमासारख्या बायका कामाला जाऊ शकत होत्या. त्या आज्जीनेच बाळाचं नाव राजू ठेवलं होतं. राम्या आणि रखमालाही हे नाव खूप आवडलं.
झोपडपट्टीत राहणारी मुलं सुटी्च्या दिवशी या आज्जीच्या झोपडीत जमायची. ती त्यांना गोष्टी सांगायची.
राजु हळूहळू मोठा होत होता. रखमा आणि राम्याचाही आता कामात चांगला जम बसला होता. त्यांची परिस्थिती आता आधीपेक्षा बरी होती. मालक राम्याच्या कामावर जामच खुश होता. त्यामुळे राम्याच्या कामावर खुश होऊन त्याच प्रमोशन होऊन चार वर्ष केलेल्या कष्टाचं हे फळ होतं. तो आता सुपरवायजर झाला होता. रखमाच्या आयुष्यात पहिल्यांदाच चांगले दिवस आले होते. राजू सुद्धा आता सगळी अक्षर व्यवस्थित बोलू शकत होता. आख्या झोपडपट्टीत तो सगळ्यांचा लाडका होता. इतकं सुंदर मुल या रखमेच कसं असा सर्वांना प्रश्न पडे. पण तसं तिला कोणी कधी विचारल नाही.
एक दिवस राम्या, रखमा, चंदा आणि चंदाचा नवरा आणि त्यांचा मुलगा हनमंत आणि राजू कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनासाठी गेले. गर्दी कमी असल्यामुळे त्यांना थोडाच वेळ रांगेत उभ राहून अगदी आत देवीच्या गाभाऱ्यापर्यंत जाऊन दर्शन घेता आले. पण रखमाला हे माहित नव्हतं की एक दिवस याच मंदीराच्या बाहेर बसुन भिक मागायची वेळ आपल्यावर येणार आहे.
राम्या आपलं काम अगदी प्रामाणिकपणे करत होता. काही वर्षापूर्वी चोऱ्या करणारा राम्या आणि आत्ताचा राम्या यात जमीन आसमानाचा फरक होता. कदाचित राजू त्यांच्या आयुष्यात आल्यामुळे त्याच्यात हा बदल झाला असावा. एखादा कामगार जर नीट काम करत नसेल तर राम्या त्याला चांगलाच खडसावत असे आणि तरी देखील त्या कामगाराने कामचुकारपणा केला तर राम्या मालकाकडे त्या कामगाराविषयी तक्रार करत असे. राम्या सुपरवायजर झाल्यापासून कामगारांची उत्पादकता देखील वाढली होती. पण त्याच्या अशा वागण्यामुळे त्याचे अनेक शत्रू झाले होते. त्याच्या सांगण्यावरून मालकाने काही कामचुकार कामगारांना कामावरून काढले होते. जग्गुही त्यापैकी एक होता. जेव्हा मालकाने नवीन कारखाना चालु केला होता, तेव्हा जग्गुला सुपरवायजर पदी नियुक्त केलं होत. पण जग्गु मुळातच गुंड प्रवॄत्तीचा माणूस होता. त्यामुळे काही कामगारांनी जग्गुच्या त्रासाला कंटाळून मालकाकडे तक्रार देखील केली. मालकाने सर्व कामगारांचे हित लक्षात घेऊन जग्गुला सुपरवायजर पदावरून हटवून राम्याला सुपरवायजर केलं होतं. त्यामुळे जग्गुचा पहिल्यापासूनच राम्यावर राग होता. आतातर जग्गु काहीच काम करत नव्हता. इतर कामगारांची टींगल करणे, त्यांच्यावर दादागिरी करणे, महिला कामगारांवरती अश्लील टीप्पणी करणे ही कामं जग्गु आणि त्याचे साथीदार करत असत. पण त्याला बोलुन काहीही उपयोग होणार नाही हे राम्याला माहीत होतं. त्यामुळे तो जग्गु आणि त्याच्या गँगकडे दुर्लक्ष करत होता. एक दिवस जग्गुने रखमाबद्दल अश्लील टीप्पणी केली आणि राम्याने ते ऐकलं. आता मात्रा त्याचा संयम सुटला आणि तो जग्गुवर धावून गेला. राम्या जरी सर्व शक्ती वापरून जग्गुवर हमला करत होता तरी अडदांड शरीराच्या जग्गुवर त्याचा परिणाम होत नव्हता. आता जग्गुही चवताळला आणि त्याने एक गुद्दा राम्याच्या थोबाडावर मारला. राम्याचे दोन दात तुटुन पडले आणि राम्याच्या जबड्यातुन रक्त वाहू लागले. त्यावेळी जर मालक तिथे आले नसते तर जग्गुने राम्याचा जीवच घेतला असता. मालकांनी स्वत: जमीनीवर पडलेल्या राम्याला हात देऊन उभ केलं. जग्गुलाही दोन कामगारांनी धरून ठेवल होतं. त्याच्या चेहऱ्यावर अजूनही संताप दिसत होता. वातावरण थोड शांत झाल्यावर मालकाने जग्गुच्या हातावर शेवटच्या महिन्याचा पगार ठेवला आणि तू उद्यापासुन येवू नकोस असे सांगितले. जग्गुने मालकाकडे आणि राम्याकडे एक जळजळीत कटाक्ष टाकला आणि तो तेथून निघून गेला. आता सगळे कामगार परत आपआपल्या कामला लागले.
जग्गु गेल्यापासुन सगळे कामगार अगदी मनापासून काम करत होते. त्यांना त्रास देणारा माणूस आता तिथे नव्हता. महिला कामगारांनाही आता सुरक्षित वाटत होतं. जग्गुबरोबर दंगा मस्ती करणारी, त्याच्या दु:श्कर्माना साथ देणारी चार टाळकीही आपला म्होरक्या गेल्यामुळे नाईलाजाने कामाला लागली होती.
एक दिवस राम्याला फॅक्टरीतून निघायला उशीर लागला. कामच जास्त होतं. रखमा मात्र नेहमीच्या वेळीच घरी आली होती. नेमके त्याच दिवशी राम्याचे एक काका त्याच्याकडे आले होते. म्हणून रखमा राम्याला बोलवण्यासाठी फॅक्टरीच्या दिशेने निघाली. थोडं अंतर चालल्यावर तिला राम्या लांबून येतांना दिसला. आता आपल्याला जास्त चालायला लागणार नाही या विचाराने ती थोडी सुखावली व तिथेच एका झाडापाशी थांबली. इतक्यात एक मोटारसायकल राम्या जवळ येऊन थांबली. त्यावरून दोन माणसं उतरली. त्यातला एक चांगलाच दांडगा, धिप्पाड होता. काही कळायच्या आतच त्या माणसाने चाकू काढला आणि तो राम्यावर सपासप वार करू लागला. काही वेळातच तो माणूस परत गाडीवर बसून निघून गेला. राम्या जखमी होवून खाली कोसळला. हे पाहून रखमा पळतच राम्यापाशी आली. राम्याला अशा जखमी अवस्थेत पाहून तिला एकदम भोवळचं आली. पण तिने कसंबसं स्वत:ला सावरलं आणि रडवेल्या आवाजात ती राम्याला म्हणाली, “तुमाला कायबी होनार नाही. म्या लगीच डाक्टरास्नी बोलावते.” पण एक शब्द बोलायचाही राम्यात आता प्राण उरला नव्हता. “जग्गु” हा एकच शब्द कसाबसा उच्चारून रखमाच्या मांडीवर डोक टेकवून त्याने प्राण सोडले. कानाचे पडदे फाडणारी रखमाची किंचाळी ऐकून अख्खी झोपडपट्टी तिथे जमा झाली.
खेळण्या बागडण्याच्या कोवळया वयात पाच वर्षाच्या राजूवर स्वत:च्या वडीलांच्या पार्थीव देहाला अग्नी द्यायची वेळ आली. राजूचं नशीब पण पाहा. श्रीमंत घरात जन्माला येऊन देखील अगदी लहान वयात मातॄछत्रं, पितॄछत्रं हरवल, आणि तो एका भिकारणीच्या झोपडीत वाढला. आणि ज्याला तो आपले बाबा समजत होता तोही जग सोडून गेला.
राम्याला भेटायला आलेले काका राम्याचे दिवस कार्य अटोपून परत गावी गेले. या काळात रखमा आणि राजूची चंदाने खूप काळजी घेतली. राम्या जाऊन आता पंधरा दिवस होऊन गेले. रखमाला परत कामावर जाणं भाग होतं. नवरा मेला म्हणून तिला घरी बसून दु:ख करत बसणं परवडणारं नव्हतं. ती परत फॅक्टरीवर कामाला जाऊ लागली. पण आता पहिल्यासारखं तिचं कामात लक्ष लागेना. सारखी राम्याची आठवण येत होती. राम्या आणि जग्गु मध्ये झालेलं भांडण सारखं आठवायचं आणि अश्लील टीप्पणी करणाऱ्या जग्गुचा राक्षसासारखा क्रुर चेहरा डोळयासमोर आला की तिला कसतरीच व्हायचं. अशावेळी ती तिच्या आयुष्यात घडलेल्या ज्या काही चांगल्या घटना घडल्या होत्या त्या आठवायची. राम्या तिला ज्या दिवशी पहिल्यांदा भेटला तो दिवस, ज्या दिवशी राम्याने तिला लग्नासाठी मागणी घातली, ज्या दिवशी राम्या आनंदात घरी आला आणि आपण उद्यापासुन देवळाबाहेर भीक मागायची असे सांगितले, ज्या दिवशी राजू बाळ पहिल्यांदा दिसलं, त्याला पाहिल्यावर झालेला आनंद हे सारं आठवल्यावर तिला खूप बरं वाटत होतं.
आता त्या फॅक्टरीत तिचा जीव गुदमरत होता. त्यात एक नवरा नसलेली बाई, एक विधवा म्हणून काही पुरूष कामगारांच्या घाणेरड्या नजरांचा होणारा त्रास वेगळाच. शेवटी तिने फॅक्टरीचं काम सोडून परत भिक मागण्याचा निर्णय घेतला. मालकांनी आणि चंदानी समजावण्याचा खूप प्रयत्न केला. मालक तर तिला तुझा पगार वाढवतो असेही म्हणाले. पण रखमा आपल्या निर्णयावर ठाम होती. भिक मागायचं ठीकाणही तिनं ठरवलं होतं. काही महिन्यांपूर्वी जेव्हा ती अंबाबाईच्या दर्शनासाठी कोल्हापुरात गेली होती. तेव्हा तिने पाहीलं होतं की इथे खूप लांबून, देशभरातून भाविक येतात. त्यामुळे इथल्या भिकाऱ्यांनाही चांगले पैसे मिळत असणार. आता ती रोज सकाळी अंबाबाईच्या देवळासमोर भिक मागायला बसायची. राजूही तिच्या सोबत असायचा. फॅक्टरीत काम करून तिला जेवढे पैसे मिळायचे त्यापेक्षा भिक कमीच मिळायची. पण दोन वेळचं जेवण त्यातून निघायचं.
दिवस पटापट पळत होते. राजूही दिवसागणीक वाढत होता. त्याचे आता बरेच नवीन मित्र झाले होते. दिवसभर भिक मागून राजू संध्याकाळी त्याच्या मित्रांबरोबर वेगवेगळे खेळ खेळायचा. कधी क्रिकेट, कधी खो खो, कधी पतंग उडवणे. रखमाला राजूचं खूप कौतुक वाटायचं. जर आपण राजूला पळवून आणलं नसतं तर आज तो किती चांगलं, श्रीमंतीचं आयुष्य जगत असता. आपल्यामुळे आज राजूवर भिक मागायची वेळ आली, असं तिला वाटायचं पण बरेच लोग राजूच्या तोंडाकडे पाहूनच भिक द्यायचे.
तिनं ठरवलं होतं की आपल्याकडे थोडे पैसे जमले की राजूला शाळेत घालयचे. राजू सुद्धा खरच खूप समजुतदार मुलगा होता. तो रोज त्याच्याच वयाची कितीतरी मुलं पाहायचा. पण स्वत:च्या परिस्थीतीचं चांगलच भान त्याला असल्यामुळे त्याने रखमाकडे कधीही “मला हे पाहिजे मला ते पाहिजे” असा हट्ट केला नाही. उलट या परिस्थीतीवर मात करून आपल्या आईसाठी आपण काहीतरी केले पाहिजे, जेणेकरून तिला अशी रस्त्यावर भिक मागायला लागणार नाही असे त्याला वाटे.
७
आज राजूचा शाळेचा पहिला दिवस होता. आपल्या आठ वर्षाच्या आयुष्यात आज राजू पहील्यांदा शाळेत गेला होता. राजू इतर मुलांपेक्षा वयाने मोठा असल्यामुळे वर्गात उठून दिसत होता. रखमाही खुप खुश होती. त्या शाळेत शिकवणाऱ्या शिक्षिका चंदाच्या ओळखीच्या होत्या. त्यांच्या ओळखीमुळेच राजूला शाळेत प्रवेश मिळाला होता. राजू रोज न चुकता शाळेत जात होता. बाईंनी दिलेला गॄहपाठ देखील तो रोज करायचा. राजूला अभ्यास करतांना पाहून रखमाही सुखावून जायची. तिच्या आख्या घराण्यात कोणी कधी अभ्यास केला नव्हता. रखमा आणि चंदाला तर तशी संधीच मिळाली नव्हती. जे आपल्या बाबतीत घडलं ते राजूच्या बाबतीत घडू नये असे तिला वाटायचे. राजू मोठा ऑफिसर बनावा अशी तिची इच्छा होती. आजकाल रखमाला पैसे बरेच मिळत होते. जेवढं मिळतय तेवढ्यात ती समाधानी होती. पण रखमाचं भिक मागणं चंदाला काही आवडलं नव्हतं. ती अनेकदा रखमाला म्हणायची की आपणं तुझ्यासाठी एखादं काम बघू, हवंतर मी मालकांशी बोलते, पण रखमा काय तिचं ऐकायची नाही. रोज जे पैसे मिळायचे त्यातले थोडे ती राजूच्या शिक्षणासाठी बाजूला काढून ठेवायची.
राजूची परीक्षा आता जवळ आली होती. त्याचा आभ्यास चांगला झाला होता. आपल्याला चांगले मार्क मिळणार याची त्याला खात्री होती. पटापट दिवस पळत होते, आणि एकदाचा परीक्षेचा दिवस उजाडला. रखमाच्या पाया पडून राजू परीक्षेसाठी निघाला. त्याला पेपर खूप सोपा गेला. काही दिवसातच परीक्षा संपली. राजूला सगळेच पेपर चांगले गेले होते. महिनाभरात निकाल आला. राजू वर्गात पहिला आला होता. बाईही राजूवर खूप खुश होत्या. रखमाला तर प्रमाणाबाहेर आनंद झाला होता. इतका, की तिने तिच्याजवळ साठलेल्या पैशातून राजूसाठी स्वत: दुकानात जाऊन भारीतला शर्ट आणला होता. एक दिवस राजू झोपला असतांना तिने हळूच तो शर्ट बॉक्स सकट राजूच्या दप्तरात टाकला. सकाळी उठल्यावर वह्या ठेवण्यासाठी राजूने दप्तर उघडलं तर आत एक बॉक्स. त्या बॉक्सवर लिहीलं होतं, “माझ्या पोरा तुला जेवडे मार्क पडले तेवढे आपल्या खांदानात कदी कुनाला मिळाले न्हाइत तुज्या यशाबद्दल तुज्या या आडानी आईकडून तुला हा शर्ट गीप्ट. असाच अभ्यास करत रहा.”
हे वाचून राजूच्या डोळयात पाणी तरळलं, आपण रडतोय हे आईला कळू नये म्हणून त्याने दप्तर पाठीला लावलं आणि तो तिथून निघाला. रखमा आतून सगळं पाहात होती. तिचे ही डोळे पाणावले होते. तिला खात्री होती राजू मोठा झाल्यावर मोठा ऑफीसर बनेल आणि आपल्याला या परिस्थितीतून बाहेर काढेल. तिने ठरवलं काहीही झालं तरी राजूला काही पण कमी पडून द्यायच नाही. त्याच्या शिक्षणात कोणताही अडथळा येता कामा नये.
राजू केवळ आभ्यासात हुशार नव्हता तर, त्याला खेळायलाही आवडायचं. दर रविवारी तो झोपडपट्टीतल्या मुलांबरोबर क्रिकेट खेळायला कोल्हापुरात जायचा. आधी लहान म्हनूण त्याला ती मुलं खेळायला नेत नव्हती. पण वयाच्या मानानं तो खरच खूप चांगला खेळायचा. त्यामुळे त्याचा खेळ पाहून हळूहळू त्यालाही खेळायला घेऊन जायचे. वयाने जरी तो सर्वात लहान असला तरी त्याच्या टीममध्ये सर्वात चांगली बॅटींग राजूच करायचा.
शाळेत सुद्धा राजूचे बरेच मित्र झाले होते. राजूची शाळा उशीरा सुरू झाल्यामुळे वर्गातील इतर मुलं राजूपेक्षा वयान लहान होती. पण मोठा म्हणून राजूने कधीच दादागिरी केली नाही. प्रमोद हा राजूचा एकदम खास मित्र. पण प्रमोदची परिस्थिती राजूच्या एकदम विरूद्ध होती. त्याचे वडील गावचे सावकार होते. तशी प्रमोदला शिकण्याची काहीच गरज नव्हती. पुढच्या सात पिढ्या बसून खातील इतका पैसा प्रमोदच्या वडीलांनी कमावला होता. गावातला एक पेट्रोलपंपही त्यांच्याच मालकीचा होता. पण मुळात प्रमोदला अभ्यासाची आवड होती. राजू आणि प्रमोद मध्ये पहिल्या नंबरसाठी स्पर्धा असायची. पण चौथी पर्यंत राजूने पहिला नंबर सोडला नाही. त्यामुळे प्रमोदला दुसऱ्या नंबरवर समाधान मानावे लागले.
पाचवीत गेल्यावर राजूने कोल्हापुरच्या प्रायवेट हायस्कूलमध्ये ऍडमिशन घेतली. प्रमोदने पण तिथेच ऍडमिशन घेतली. प्रमोदच्या वडीलांनी राजूला एक जुनी सायकल दिली होती. राजू रोज सायकलने शाळेत जायचा. प्रमोद मात्र रिक्षाने यायचा. शनिवारी शाळा सकाळी लवकर चालू व्हायची. रस्त्यावरून राजूला बरेच लोक चालतांना दिसायचे. अशावेळी वेगवेगळया प्रकारचे लोक त्याला पहायला मिळायचे. काही स्थुल पुरूष आणि बायका वजन कमी करण्यासाठी रस्त्यावरून पळायचे, काही म्हातारी माणसं व्यायामाच्या नावाखाली घरातून बाहेर पडायचे आणि कट्यावर गप्पा मारत बसायचे हे पाहून राजूला गंमत वाटायची. काही माणसं कुत्र्याला घेऊन फिरायचे. त्या कुत्र्यांकडे बघून राजूला कधीकधी हेवा वाटायचा आणि रागही यायचा. लोक या कुत्र्यांचे किती लाड करतात. त्यांना कपडे काय घालतात. रोज फिरायला काय नेतात. त्यांना थंडी वारा लागू नये म्हणून त्यांच्यासाठी घर काय बांधतात. त्याला रोज न्हाऊ काय घालतात. कुत्र्याचा जन्म घेऊनही ही पाळलेली कुत्री किती ऐशआरामात राहतात, आयुष्य जगतात. आणि मनुष्याच्या जन्माला येऊनही आपण गरीबीत जगतो, असं त्याला वाटायचं.
पाचवीची सहामाही परीक्षा जवळ आली होती. राजूचा अभ्यास जोरात चालू होता. पण आता शाळेत पहिलं येणं आधी इतक सोप नव्हतं. कारण आधीची शाळा छोटी होती. आणि तिथ केवळ गावातलीच मुलं होती. पण आता संपूर्ण कोल्हापूर आणि जवळपासच्या खेड्यांमधली मुलं होती. त्यामुळे पहिला नंबर टीकवणं तितकं सोपं नव्हतं. प्रमोद सुद्धा खूप अभ्यास करत होता. शेवटी परीक्षेचा पहिला दिवस उजाडला. पहाटे उठूनच राजूने एक उजळणी केली. रखमाच्या पाया पडून तो घराबाहेर पडला.
थोड्याच दिवसांत परीक्षा संपली. नेहमीप्रमाणे यावेळीही राजूला सगळेच पेपर सोपे गेले होते. बाहेर फिरणे, प्रमोदच्या घरी कॅरम खेळणे आणि क्रिकेट यामुळे सुट्टी पण चांगली गेली आणि एकदाचा रिझल्टचा दिवस उजाडला. यावेळीही राजूने पहिला नंबर सोडला नाही. रखमालाही आता राजूच्या पहिल्या नंबरची सवय झाली होती. तिनं खास राजूसाठी तुपातला शिरा केला होता. गेली तीन वर्ष ती राजूच्या रिझल्टच्या दिवशी शिरा करत होती. राजूला केवळ रिझल्टच्या दिवशीच शिरा खायला मिळायचा. प्रमोदच्या आईने राजूला जेवायला बोलावलं होतं. प्रमोद सुद्धा शाळेत पाचवा आला होता. इतक्या गरीब परिस्थीतीत देखील हा मुलगा एवढा चांगला अभ्यास करून शाळेत पहिला येतो, याचं प्रमोदच्या आई वडीलांना फार कौतुक वाटायचं. राजूने त्यातल्या त्यात चांगला शर्ट घातला आणि तो प्रमोदकडे जेवायला गेला. तिथे आत्तापर्यंत न पाहिलेले वेगवेगळे पदार्थ तो पाहात होता. अर्थात हे सगळे पदार्थ प्रमोदच्या आईने बनवले नव्हते. त्यांच्याकडे स्वयंपाकासाठी गडी माणसं होती. जाताजाता प्रमोदची आई राजूला म्हणाली, “तू आणि प्रमोद असाच अभ्यास करत रहा, आणि पुढच्यावेळी येतांना बरोबर आईलाही आणं.” राजूने नुसतीच मान डोलावली आणि तिथून निघाला. त्याच्या मनात विचार चालू होते. प्रमोदची आई किती भारी साड्या घालते. तिच्या हाताखाली किती नोकर चाकर आहेत. आणि आपल्या आईने नवीन साडी घेऊन किती वर्ष झाले. त्याने आपली आई काय करते हे अजून प्रमोदला सुद्धा सांगितलं नव्हतं. आणि प्रमोदने सुद्धा आपणहून राजूला तसं कधी विचारलं नाही.
रिझल्ट नंतर शाळा आता परत सुरू झाली होती. एक हुशार विद्यार्थी अशी राजूची शाळेत ओळख झाली होती. शिक्षकांनी कोणताही प्रश्न विचारला की राजूचा हात पहिला वर जायचा. बहुतेक सर्व शिक्षक राजूवर खुश असायचे. गणित विषय शिकवणाऱ्या फडके सरांचा तर तो फारच लाडका होता. सरांनी एखादं गणित फळयावर सोडवण्याच्या आधी राजूच्या वहीत ते सोडवलेल असायच. मुळातच गणित हा राजूचा आवडता विषय होता.
वर्गात जशी हुशार मुल होती, तशीच काही टारगट, मवाली मुलही होती. पण राजू मात्र फारसा त्या मुलांमध्ये मिसळत नसे. कारण रखमाने आधीच राजूला सांगितलं होत, चांगल्या मुलांबरोबरच मैत्री कर. मवाली, गुंड मुलांपासून दूरच राहात जा असे तिने राजूला सांगितले होते. राजू जरी अशा मुलांबरोबर राहत नसायचा तरी प्रमोद मात्र सर्व मुलांमध्ये मिसळत असे. बबन रोकडे हा प्रमोदचा चांगला मित्र झाला होता. बबनच्या वडलांचे दोन बार होते आणि गावाकडे मजबूत शेती होती. बबनचे वडील आणि प्रमोदचे वडील लहानपणापासूनचे मित्र होते. बबनच्या वडीलांना प्रमोदच्या वडीलांनी अडचणीच्या काळात आर्थीक मदत देखील केली होती. बबन आणि प्रमोदचं एकमेकांच्या घरी कायम येणं जाणं असे. पण बबन आणि प्रमोदच्या घरची श्रीमंती हे केवळ एकच साम्य होत. प्रमोद जेवढा अभ्यासू होता बबन तेवढाच उनाडक्या करणारा आणि मवाली होता. गावातल्या मुलांबरोबर दादागीरी करणं, दमदाटी करणं, मागच्या बेंचवर बसून टींगल करणं आणि अभ्यासू शांत मुलांना त्रास देणं हे सारे उद्योग तो शाळेत करायचा. गावातील इतरही काही श्रीमंत बापाची मुलं या सगळ्यात सामील असायची. बऱ्याच वेळेस बबन शाळा चुकवून सायबर कॅफेत गेम खेळायला जायचा. शाळा चुकवून गेम खेळणे हा त्याचा छंद होता. बबन एकुलता एक असल्यामुळे घरच्यांनी त्याला फारच लाडावलं होतं. तो जे मागेल ते वडील त्याला आणून देत असत. बबन जेव्हा जेव्हा बाबांकडे पैसे मागायचा तेव्हा ते लगेच पाकिटातून पैसे काढून बबनच्या हातावर ठेवायचे. एवढे पैसे तुला कशासाठी लागतात असे एकदाही त्यांनी बबनला विचारलं नाही, त्यामुळे बबनलाही पैश्याची किंमत नव्हती. मनात आलं की तो मित्रांना घेऊन हॉटेलात जायचा आणि स्वतःच्या पैश्यानी त्यांना जेऊ घालायचा.
प्रमोदला खरतर बबनचं हे वागणं आवडत नव्हतं पण बबनचा स्वभाव त्याला चांगलाच माहित असल्यामुळे तो बबनला काहीच बोलायचा नाही. बबनमध्ये एक चांगला गुण पण होता. एखाद्या गरीब मित्राने मदत मागितली तर एक क्षण ही विचार न करता त्या मित्राला मदत करत असे. त्याच्या या गुणाचा बरेच मित्र गैरफायदा घ्यायचे. केवळ पैश्यासाठी सुद्धा बबनसमोर त्याचे कौतुक करायचे आणि पाठीमागून त्याला नावं ठेवायचे.
बबन गावतल्या हुशार मुलांना जरी त्रास देत असला तरी, राजू प्रमोदचा मित्र असल्यामुळे बबनने राजूला कधीच त्रास दिला नाही. उलट “तुझ्या मित्राला सुद्धा माझ्या घरी घेऊन ये” असं तो प्रमोदला बऱ्याच वेळा म्हणायचा, पण राजू काही यायचा नाही. खरतर राजूला आपल्या परिस्थितीची लाज वाटायची. जास्तीत जास्त अभ्यास करून नोकरी करायची आणि आपल्या आईचं स्वप्न पूर्ण करायचं असा निश्चय राजूने केला होता.
आता पाचवीच्या वार्षीक परीक्षेला थोडेच दिवस उरले होते. राजूचा अभ्यास जोरात सुरु होता. काहीही करून त्याला पहिला नंबर पटकवायचा होता. प्रमोद्चाही अभ्यास छान चालला होता. परीक्षा काही दिवसावर येऊन ठेपली असून देखील बबनच्या दिनचर्येत काहीच फरक नव्हता. मित्रांसोबत फिरणे, सायबर कॅफेमध्ये जाऊन दिवसभर गेम खेळणं, एखाद्या हुशार मुलाच्या घराजवळ जाऊन त्याला हाक मारून हैराण करणे हे सगळं त्याचं चालू होतं. परीक्षेला त्याचा नंबर प्रमोद मागेच असल्यामुळे तो जमेल तेवढं प्रमोदच्या पेपर मध्ये पाहूनच पेपर लिहित असे आणि कसाबसा पास होत असे. प्रमोद सुद्धा मित्र म्हणून शिक्षकांचं लक्ष नसतांना त्याला पेपर दाखवत असे.
वार्षिक परीक्षेत देखील अपेक्षेप्रमाणे राजू गावात पहिला आला. आता रखमालाही याची सवय झाली होती. तिला आता फारसं काही वाटलं नाही. मात्र तिला आपल्या मुलाबद्दल अभिमान आणि कौतुक वाटायचं. एखाद्या भिकाऱ्याला महिनाभर भिक मिळाली नाही आणि एक दिवस त्याच्या वाडक्यात सोन्याच नाणं पडावं तसं देवाने हे पोरगं आपल्या पदरात टाकलय असं तिला वाटायचं आणि तिचं उर भरून यायचं. तिच्या अंधारमय जीवनात एक कोपरा उजळून टाकणारा तोच एक दिवा होता.
८
सुट्टी संपून शाळा परत सुरु झाली. इतके दिवस मुलांशिवाय रिकामा पडलेला, भकास वाटणारा शाळेचा आवार मुलांच्या कलकलाटाने पुन्हा एकदा भरून गेला. पानझड झालेल्या वृक्षाला नवी पालवी फुटावी तशी शाळा चिरतरुण दिसू लागली. सहावी ब च्या वर्गात मुलं एक एक करून येत होती. काही मुलांचे चेहरे मरगळलेले होते. तर काहींच्या चेहऱ्यावर उत्साह साफ दिसत होता. राजू आणि प्रमोद नेहमीप्रमाणे पहिल्या बेंचवर बसले होते. बबन सुद्धा त्याच्या चांडाळ चौकडी बरोबर आत आला. त्याच्या कपाळावर कूंकू होतं तर केसात तांदळाचे दाणे दिसत होते. आज बबनचा वाढदिवस होता. त्याच्या आईने सकाळीच त्याला ओवाळलं होतं. बबनने जाड भिंगाचा चष्मा घातलेल्या एका मुलाच्या गालाचा चिमटा काढला आणि हळूच मागे निघून गेला. त्याच्या मागची चांडाळ चौकडी त्या मुलाकडे बघून हसली आणि मागच्या बेंचवर जाऊन बसली. तो ढापण्या मुलगा कळवळला. चिमटा बबननेच काढला आहे हे त्याला कळलं. पण तो काहीच बोलू शकला नाही. आज बबनने लाल रांगाचा झगमगीत शर्ट घातला होता. त्याच्या वडिलांनी तो खास त्याच्या वाढदिवसासाठी आणला होता. शाळा सुटल्यावर बबनने बसची वाट पाहत असलेल्या प्रमोदला हाक मारली. प्रमोद बबानपाशी आला आणि त्याने बबनला विचारले, “काय रे बबन आज नविन शर्ट? आज काय वाढदिवस आहे का तुझा?” बबन त्याला म्हणाला, “अरे म्हणून तर तुला हाक मारली. आज माझ्या घरी पार्टी आहे. तेव्हा तुझ्या त्या हुशार मित्राला काय बरं नाव त्याचं? हा, राजूला पण नक्की आण. बर जातो मी.” एवढे बोलून तो समोरच उभ्या असलेल्या कारमध्ये जाऊन बसला.
प्रमोदची बसही थोड्या वेळाने आली. प्रमोदने ठरवलं आज काहीही करून राजूला बबनच्या पार्टीला न्यायचं. बबन काही वाईट मुलगा नाही. तो फक्त अभ्यास करत नाही एवढचं.
नविन शर्ट आणि त्याच्या आत्यानी गिफ्ट दिलेली जीन्स घालून प्रमोद राजूच्या झोपडीच्या दिशेने निघाला. माझ्याकडे नवीन कपडे नाहीत हे कारण राजू सांगणार हे प्रमोदला माहित होतं म्हणूनच त्याने राजूसाठीही त्याचा एक चांगला शर्ट आणि जीन्स बरोबर घेतली होती. तो आज काहीही करून राजूला बरोबर नेणार होता. प्रमोद राजूच्या झोपडीपाशी आला आणि त्याने राजूला हाक मारली तशी रखमा बाहेर आली आणि तिने प्रमोदला विचारलं, “काय र प्रमोद काय झालं?” तेव्हा प्रमोद म्हणाला, “काही झालं नाही हो काकू. आमच्या एका मित्राचा आज वाढदिवस आहे. त्याने आम्हाला पार्टीसाठी त्याच्या घरी बोलावलं आहे. त्यासाठी मी राजूला घेऊन जायला आलो आहे.”
“तू ये ना आत. मी छानपैकी चा करते. चा प्या अन तुमी जा.” प्रमोद आत गेला आणि त्याने राजूला बबनच्या पार्टीबद्दल सांगितलं. राजू म्हणाला, “अरे तू जा मी नाही येत. असही माझ्याकडे घालायला चांगले कपडे नाहीत.” लगेच प्रमोद उत्साहात म्हणाला, “मित्रा मला माहित होतं तू हेच कारण देणार. म्हणूनच मी तुझ्यासाठी माझे शर्ट आणि जीन्स आणले आहेत. ते घाल आणि गपगुमान चाल.” राजूचा नाईलाज झाला आणि त्याने प्रमोदने आणलेले कपडे घातले. दोघांनीही चहा घेतला आणि ते निघाले. थोडा वेळ चालल्यावर त्यांना रिक्षा मिळाली आणि ते रिक्षाने बबनच्या घरापाशी आले. खरतर बबनचं घर एखाद्या महालापेक्षा कमी नव्हतं. समोर भव्य प्रवेशद्वार होतं. प्रवेशद्वारातून आत जाताच मधोमधच सिमेंटचा रस्ता होता व त्या रस्त्याच्या दुतर्फा मोठी बाग होती. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूना असलेल्या दिव्यांच्या प्रकाशात रात्रीदेखील बागेतील झाडांचा व गवताचा हिरवा रंग चमकत होता. बंगल्याच्या बाहेरच्या दगडी भिंतींवरील कोरीव काम अतिशय सुंदर होतं. समोरच बबन रोज ज्या गाडीने येत असे ती मर्सीडीज दारात उभी होती. प्रमोद आणि राजू आत आले. सगळीकडे मोठी झुंबर लटकत होती आणि त्यांच्या प्रकाशाने तो संपूर्ण हॉल उजळून निघाला होता. एका बाजूला डॉलबी स्पीकर ठेवले होते. मोठ्या आवाजात गाणी लागली होती. त्या गाण्यांच्या तालावर सगळी मुलं नाचत होती. बबनही त्यांच्यात नाचत होता. राजू आणि प्रमोद एका कोपऱ्यात उभे होते. थोड्यावेळाने बबनचं लक्ष प्रमोद आणि राजूकडे गेलं. तसा तो नाचायचा थांबला आमण प्रमोदपाशी आला. त्याने प्रमोदचा हात पकडला आणि त्याला ओढतच आत मध्ये नेलं. प्रमोदही जमेल तसा नाचू लागला. राजू मात्र अजूनही त्या कोपऱ्यातच उभा होता. प्रमोदने राजूला नाचायसाठी बोलावलं पण तो गेला नाही. तो आजूबाजूला पाहत होता. त्या भव्य हॉलच्या भिंतींवर अडकवलेली महागडी पेंटीग्ज, वरच्या मजल्यावर जाण्यासाठी उंच लाकडापासून बनवलेल्या पायऱ्या आणि त्या पायऱ्यांच्या दोन्ही बाजूांना ठेवलेली वेगवेगळ्या आकाराची शिल्पे, मूर्ती त्यांचे लक्ष वेधून घेत होती. हा सगळा डोळे दिपवणारा झगमगाट आणि थाटमाट तो पहिल्यांदाच पहात होता.
थोड्या वेळाने आतल्या खोलीतून शेरवानी घातलेले भव्य शरीरयष्टीचे एक गृहस्थ आणि त्यांच्यापाठोपाठ एक स्त्री हॉलमध्ये आले. ते दोघे बबनचे आईवडील होते. बबनच्या बाबांनी मिशी आणि लांब दाढी ठेवली होती. त्यांच्या हातात सोन्याचं मोठ कडं होत व गळ्यात सोन्याचीच साखळी होती. त्याचां व्यक्तिमत्व भारदस्त होतं. बबनची आई मात्र बबनच्या बाबांपुढे थोडी वयस्कर वाटत होती. तिने तरूण दिसण्यासाठी भरपूर मेकअप केला होता. पण तरीही ती वयस्कर वाटत होती. तिने काळ्या रांगाची साडी नेसली होती. साडीच्या कडावर सोन्याची जर होती. पण तिचा चेहरा मात्र आनंदी होता. तिने गाणे चालू असलेल्या सीडी प्लेयरचं बटण बंद केलं. सगळी मुलं नाचायची थांबली आणि काय झालं म्हणून इकडे तिकडे बघू लागली. तेव्हा बबनची आई म्हणाली, “मुलांनो जेवण तयार आहे. आधी गरम गरम जेऊन घ्या. आणि मग काय घालायचा तो गोंधळ घाला. चला बसा पटापट खाली.” मुलं खालीच जेवायला बसली. आतून दोन-तीन नोकर येऊन पटापट वाढू लागले. जेवणं झाली. बबन प्रमोद आणि राजूला त्याच्या वडिलांपाशी घेऊन आला. त्याने राजूकडे बोट केलं आणि तो त्याच्या बाबांना म्हणाला, “बाबा, हा राजू. हा आमच्या शाळेतला सर्वात हुशार मुलगा. हा शाळेत कायम पहिला येतो.” बबनच्या बाबांनी राजूकडे कौतुकाने पाहिलं आणि ते म्हणाले, “अरे वा फारच छान. जरा आमच्या पोराला पण शिकव अभ्यास. जरा बी अभ्यास करत नाही आमचा बबन. बघावं तेव्हा इकडे तिकडे फिरत असतो.” तसा बबन ओशाळला आणि म्हणाला, “काय हो बाबा, तुम्ही सारखां अभ्यास अभ्यास करता. आज माझ्या वाढदिवशी तरी जरा मजा करू द्या.” “कर बाबा मजा कर” बबनचे बाबा त्याला म्हणाले. राजू आणि प्रमोद परत हॉलमध्ये आले. बबनही बाहेर आला आणि त्याने परत गाणी सुरु केली. पण नुकतीच जेवलेली मुलं जागची हलेनात. जेवण अतिशय रुचकर झाल होतं. त्यामुळेच सगळे सुस्तावले होते. बबन एकेकाला नाचण्यासाठी उठवत होता. प्रमोदही आता कांटाळला होता. राजूच्या मनात वेगळेच विचार चालले होते. फाटक्या साडीतल्या त्याच्या आईबद्दल तो विचार करत होता. थोड्याच दिवसात त्याच्या आईचा वाढदिवस होता. कितीतरी महिने झाले रखामाने नवीन साडी घेतली नव्हती. काहीही करून आईला या वाढदिवसाला नविन साडी घ्यायची असं राजूने ठररवलं. पण कशी घेणार साडी, पैसे कुठून आणायचे? राजू विचार करू लागला. गावात राजू पहिला आला म्हणून त्याला सरांनी शंभर रुपये बक्षीस म्हणून दिले होते. पण शंभर रुपयात साडी कशी घेणार? तसे जर त्याने प्रमोदला किंवा बबनला मागितले असते तर लगेच त्यानी त्याला पैसे दिले असते. पण राजूला असं कुणाकडे पैसे मागण्यात कमीपणा वाटायचा. त्याचा स्वभाव मानी होता. त्याच्या डोक्यात एक विचार आला. दुसऱ्याच दिवशी शाळेत गेल्यावर त्याने तो विचार प्रमोदला बोलून दाखवला. प्रमोद त्याला म्हणाला, “खरतर मी आत्तापण तुला पैसे देऊ शकतो. पण तू घेणार नाहीस हे मला माहित आहे. तुझ्यामुळे जर बबन अभ्यासाला लागला तर चांगलच आहे.”
संध्याकाळी प्रमोद बबनच्या घरी गेला. सुदैवानं बबन घरी नव्हता. त्याने सेक्युरीटी गार्डला काकांना भेटायचां आहे असं सांगितलं. गार्डने आत फोन केला व राजूचं नाव सांगितल. फोन ठेवला आणि गार्डने राजूला आत सोडले. राजू आत आला बबनचे बाबा हॉलमध्येच टीव्ही बघत बसले होते. राजूला पहाताच ते म्हणाले, “अरे राजू बबन घरी नाही आहे. माझ्याकडे काय काम काढलस?” “काका मला जरा तुमच्याशी बोलायचंय. काल तुम्ही म्हणालात बबनला जरा अभ्यास करायला शिकव. त्यावर मी काल विचार केला आणि बबनची हरकत नसेल तर सुट्टीच्या दिवशी मी बबनची शिकवणी घेत जाईल. तुम्हाला जर वाटलच तर मला पैसे द्या.” बबनचे बाबा राजूकडे पाहून हसले. त्यांना राजूच फार कौतुक वाटलं.
किती प्रगल्भ विचार होते राजूचे. पण ही प्रगल्भता परिस्थितीमुळे आली होती. ते म्हणाले, “पोरा खरंतर मला तुझं कौतुक वाटतं. माझं पोरगं पण तुझ्याच वयाचं आहे. पण तो तुझ्यासारखा समजूतदार कधी होणार देवच जाणे. तू ये पुढच्या आठवड्यापासून शिकवणीसाठी. बबन काय सहजासहजी तयार नाही होणार पण त्याला मी तयार करेन.” राजू तिथून निघून गेला.
रात्री बबन घरी आला. बाबांनी त्याला आत बोलावलं. ते बबनला म्हणाले, “बबन, तुला कॉम्प्युटर हवा होता ना?” कॉम्प्युटरचे नाव ऐकताच बबन खुश झाला होता व बबनने मान डोलावली. “पण जर तुला कॉम्प्युटर हवा असेल तर माझं ऐकायला लागेल”. “काय?” बबनने विचारलं. “मी तुमच्या वर्गातल्या राजूला दर रविवारी तुझी शिकवणी घ्यायला सांगितलं आहे. तेव्हा तो पुढच्या आठवड्यात रविवार पासून घरी येऊन तुझी शिकवणी घेईल. जर तू त्याने सांगितल्या प्रमाणे अभ्यास केलास तरच तुला मी सांगितल्याप्रमाणे कॉम्प्युटर घेऊन देईन.” जर घरी कॉम्प्युटर आला तर बबनला गेम खेळण्यासाठी सारखं कॅफेत जावं लागणार नव्हतं. त्याने थोडा वेळ विचार केला व तो वडीलांना म्हणाला, ” “मी तयार आहे पण तुम्ही मला आधी कॉम्प्युटर घेऊन द्या.” बबनच्या बाबांना तो एवढ्या लवकर तयार होईल अशी अपेक्षा नव्हती. त्यांनी दुसऱ्याच दिवशी बबनसाठी नवा कॉम्प्युटर खरेदी केला. पण बबनचा प्लॅन वेगळाच होता. खरंतर हा प्रमोदचा प्लॅन होता. त्या दोघांनी मिळून ठरवलं होतं. काहीही करून राजूला बिघडवायचं म्हणजे त्याचं अभ्यासातलं लक्ष उडेल व प्रमोदला शाळेत पहिलं येण्याची संधी मिळेल.
रविवारी राजू ठरल्याप्रमाणे सकाळी लवकर बबनच्या घरी आला. बबन अजूनही झोपला होता. त्याच्या आईने त्याला उठवलं व राजू आल्याचं सांगितलं. बबन उठून आवरायला लागला. थोड्याच वेळात बबन व राजू बबनच्या खोलीत गेले. बबनचा कॉम्प्युटर ही तिथेच ठेवला होता. त्यात बबनने बऱ्याच गेम्स टाकल्या होत्या. राजूने दप्तरातून मराठीचं पुस्तक काढलं व तो बबनला म्हणाला , “बबन आता मी पहिला धडा वाचेन, तू लक्ष देऊन ऐक. आणि मग तू तोच धडा वाच. मग मी तुला प्रश्न विचारीन त्या प्रश्नांची उत्तर तू द्यायचीस.” बबन त्याला म्हणाला, “अरे आत्ता माझा मूड नाहीये. मी थोडा वेळ गेम खेळतो मग तू वाच.” राजू त्याला म्हणाला, “ठीक आहे पण थोडाच वेळ.” राजूचे शब्द बबनच्या कानापर्यंत पोहोचायच्या आत त्याने कॉम्पुटर चालू केला सुद्धा. तो रोडरॅश गेम खेळायला लागला. गेममध्ये मोटारसायकलची रेस चालू होती. बबनच्या खेळावरुन त्याला चांगलीच प्रॅक्टीस आहे असं दिसत होत. राजू सुद्धा पाहत होता. तो पहिल्यांदाच कॉम्प्युटर गेम पाहत होता. बबनने पहिली रेस अगदी सहज जिंकली, आता दुसरी रेस चालू झाली. बबन अगदी सराईतासारखा गाडी चालवत होता. राजूला पण गेम खेळावी वाटत होती. बघता बघता अर्धा तास झाला होता. आपण इथे कशासाठी आलो आहोत हे विसरून राजूही गेममध्ये बुडून गेला होता. अचानक त्याच लक्ष घड्याळाकडे गेलं आणि तो भानावर आला. राजू बबनला म्हणाला, “बबन आता खूप वेळ झाला आता आपण शिकवणी सुरु करूयात.” बबनने कॉम्प्युटर बंद केला आणि राजूने पहिला धडा वाचायला सुरुवात केली. बबनला नीट समजलं पाहिजे म्हणून तो मुद्दाम हळूहळू वाचत होता. राजूचा धडा वाचून झाला. त्याने बबनकडे पाहिले तर तो खुर्चीत गाढ झोपला होता. राजूने बबनचा खांदा पकडून त्याला हलवला पण बबन गाढ झोपला होता. नाईलाजाने राजूने पुस्तक दप्तरात ठेवलं आणि तो तिथून निघाला. बबनला शिकवणी व अभ्यासाची सवय लागणं हे काही वाटत तितकं सोप नाही हे राजूला आता कळल होतं.
घरी आल्यावर राजूला पण गाढ झोप आली व झोपेत त्याला एक स्वप्न पडलं. स्वप्नात तो त्या गेममधल्या गाड्यांसारख्याच एका गाडीवर बसून जात होता. रेस मधल्या इतर गाड्यांना त्याने मागे टाकले आणि शेवटी तो रेस जिंकला. तो गाडीवरुन उतरला. समोर त्याची आई नवीकोरी साडी घालून उभी होती. त्याने हेल्मेट काढून गाडीच्या हॅण्डलला लावले व पुढे होऊन आईच्या पायाला हात लावला. आईने त्याच्या डोक्यावर हात ठेवून त्याला आशिर्वाद दिला.
इतक्यात त्याला जाग आली. रखामाने त्याला उठवलं होतं. ती राजूला म्हणाली, “अर पोरा किती येळ झोपलावतास. चल मी तुझ्यासाठी चा केलाय तो चा पेऊन घे पटकन.”
राजूने घडाळ्यात पाहिले तो तब्बल चार तास झोपला होता. राजूने चहा प्यायला व तो अभ्यासाला बसला.
आता राजू आणि बबन मध्ये चांगलीच मैत्री झाली होती. बबनची आई राजूला बऱ्याच वेळा सकाळी नाष्ट्याला बोलवायची. तिथे त्याला यापूर्वी कधी न खाल्लेले वेगवेगळे पदार्थ खायला मिळायचे.
बघता बघता परत रविवार उजाडला. राजू सकाळी लवकर आवरुन बबनच्या घरी पोहोचला नेहमी प्रमाणेच बबन आताही अजून झोपला होता. बबनच्या आईने त्याला उठवलं व तो थोड्यावेळात आवरुन बाहेर हॉलमध्ये आला. दोघेही बबनच्या रुममध्ये गेले. राजू बबनला म्हणाला, “मागच्यावेळी प्रमाणे या वेळी झोपायच नाही आणि जो पर्यंत तू प्रश्नांची उत्तर बरोबर देत नाहीस तो पर्यंत मी तुला गेम पण खेळू देणार नाही. मी जरी तुझा मित्र असलो तरी आता मी तुझा शिक्षक आहे त्यामुळे तू माझं ऐकलच पाहिजेस.” आश्चर्य म्हणजे बबनही लगेच तयार झाला. राजूने पहिला धडा परत वाचून दाखवला. बबनने ही तो एकदा वाचला. राजूने धड्यामागे दिलेले काही प्रश्न बबनला विचारले. बबनने एक दोन प्रश्नांची अचूक उत्तर दिली. राजूसाठी हे सर्व खरचं अविश्वसनीय होतं. आजची शिकवणी संपली होती. राजूने दप्तर भरलं व तो तिथून निघणार तेवढ्यात बबन त्याला म्हणाला, “अरे एवढ्यात कुठे निघालास? तू गेम खेळणार नाहीस का?” राजू त्याला म्हणाला, “अरे नको, मला नाही आवडत गेम वगैरे. मी जातो. घरात काम पण आहे.” “खेळून तर बघ तुलापण आवडेल. मी आज तुझं एवढं ऐकलं. माझं ऐकणार नाहीस का? असही मला एकटयाला गेम खेळायला कंटाळा येतो.” बबन म्हणाला. राजूची इच्छा तर नव्हती पण तरीपण तो थांबला. बबन आज खरच शहाण्या मुलासारखा वागला होता.
बबनने गेम चालू केला. कुठली बटणं दाबायची ते राजूला सांगितल. राजू गेम खेळायला लागला. सुरुवातीला त्याची गाडी सारखी आदळत होती. पण थोड्यावेळ खेळल्यावर त्याला चांगलं जमायला लागलं. बऱ्याच वेळानांतर तो एक रेस जिंकला. त्याला तो गेम फारच आवडला होता. तो सलग एक तास गेम खेळला होता. शेवटी बबनच त्याला म्हणाला, “बघ आख्खा एक तास तू गेम खेळलास आणि म्हणे मला गेम वगैरे काही आवडत नाही.” राजू नुसता हसला आणि दप्तर घेऊन तेथून निघाला. सायकल चालवतानाही आपण आता गाडीच चालवत आहोत असं राजूला वाटलं. आपण दर रविवारी बबनकडे शिकवणीला जातो हे राजूने आईला सांगितलं नव्हतं. तिने विचारलं तर तो फक्त मित्राकडे जातो आहे एवढचं सांगायचा. त्याला तिला सरप्राईज द्यायचं होतं.
आता बबन खरच अभ्यासाला लागला होता. एरवी मित्रांना बरोबर घेऊन बाहेर टवाळक्या करणाऱ्या बबनला पुस्तकात डोक खुपसून बसलेलं पाहून बबनच्या बाबांनाही बरं वाटलं. हा सगळा राजूच्या संगतीचा परिणाम आहे हे त्यांना समजलं होतं.
या रविवारी राजू नेहमीप्रमाणे सकाळी लवकर बबनच्या घरी गेला. त्याला बबनच्या वडिलांनी आत बोलावलं व ते त्याला म्हणाले, “राजू तुझी शिकवणी सुरु झाल्यापासून बबन पूर्णपणे बदललाय. तुझ्या संगतीत राहून तो पण आता अभ्यासाला लागलाय. माझ्याकडून तुला हे छोटसं बक्षीस.” असं म्हणून बबनच्या बाबांनी राजूच्या हातात एक पाकीट दिलं. तेवढ्यात बबन तिथे आला आणि ते दोघं बबनच्या खोलीत आले. आज राजू बबनला गणित शिकवत होता. बबनही पूर्ण लक्ष देउन तो जे सांगेल ते ऐकत होता. त्याच्यात आमुलाग्र बदल झाला होता.
शिकवणी संपली. बबन राजूला म्हणाला, “राजू मला आज तुला काहीतरी सांगायचं आहे.” बबनचा चेहरा गंभीर झाला होता. “खरतर मला तुझी माफी मागायची आहे.” “अरे पण तू असं काय केलसं?” काही न समजल्यामुळे राजू म्हणाला. “सांगतो सगळं सांगतो. काही दिवसांपूर्वी जेव्हा परीक्षेचा रिझल्ट लागला व तू पहिला आलास त्याच दिवशी रात्री प्रमोद माझ्या घरी आला. तो खूप चिडला होता. तू शाळेत पहिला आल्यामुळे त्याला तुझा राग आला होता. प्रमोद आमच्या सर्व मित्रांमध्ये सर्वात हुशार मुलगा होता. पण तू आल्यापासून आपल्यापेक्षाही कोणीतरी हुशार आहे हे त्याला सहन झालं नाही. मग त्या रात्री आम्ही एक प्लॅन बनवला. तुला बिघडवायचा. तुला माझ्या वाढदिवशी पार्टीला बोलावणं हा त्या प्लानचाच भाग होता. खरतर मलाही आधी अभ्यासू मुलांचा फार राग यायचा. बघेल तेव्हा ही मुलं पुस्तकात दंग असतात हे बघून मला त्यांची कीव यायची. पण जेव्हा तू माझ्या घरी शिकवणी साठी आलास त्या दिवशी मी विचार केला की तुझ्यासारख्या मुलांना जगण्यासाठी किती धडपडायला लागतं. इतक्या प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा तू अभ्यास करून शाळेत पहिला आलास याचं मला फार कौतुक वाटलं. तू मला शिकवतांनाही किती मनापासून शिकवलस हे ही मला समजलं आणि तुझ्यासारख्याला बिघडवण्याच्या विचारानेच मला शिसारी आली. मला प्लीज माफ कर आणि मित्र म्हणून एक सल्ला देतो, प्रमोद खूप आतल्या गाठीचा मुलगा आहे. त्याच्या नादाला लागू नकोस.”
राजूसाठी हा फार मोठा धक्का होता. ज्याला तो सर्वात जवळचा मित्र मानत होता तोच त्याचा शत्रू होता. राजूचं डोकं सुन्न झालं होतं. काय बोलावं हेच त्याला कळेना. तो सरळ तिथून निघून घरी आला. खरंतर बबनकडून त्याला फारशी आशा अपेक्षा नव्हती. तो एवढ्या लवकर सुधारेल असं त्याला वाटलं नव्हतं. बबनला ओळखायला तो पूर्णपणे चुकला नव्हता. प्रमोद मात्र त्याच्या मनातून पूर्ण उतरला होता. इथून पुढे आता आपलं लक्ष फक्त अभ्यासाकडे द्यायचं ठरवलं आणि त्याने पुस्तक काढायला दप्तरात हात घातला. त्याच्या हाताला बबनच्या वडीलांनी दिलेलं पाकीट लागलं. त्याने पाकीट उघडलं. त्यात शंभर रुपयांच्या दोन नोटा होत्या. आता त्याच्याकडे एकूण तीनशे रुपये होते. तो आता एखादी चांगली साडी त्याच्या आईसाठी घेणार होता. पुढच्याच आठवड्यात रखमाचा वाढदिवस होता.
आज नेहमीप्रमाणे तो शाळेत गेला. प्रमोदशी एक शब्द देखील बोलायचा नाही अस त्याने ठरवलं होतं. प्रमोद राजूच्या शेजारी येऊन बसला. राजू आणि प्रमोद शाळेत आल्यावर रोज आदल्या दिवशीच्या होमवर्कबद्दल चर्चा करायचे. राजू मात्र आज काहीच बोलला नाही. त्याने प्रमोदकडे पाहिलेसुद्धा नाही. थोड्या वेळाने प्रमोदनेच विचारले, “काय राजू, काल सरांनी दिलेली सगळी गणितं जमली का तुला?” राजू काहीच बोलला नाही. ऐकून पण न ऐकल्यासारखं करत होता. प्रमोद पुन्हा म्हणाला, “लक्ष कुठे आहे राजू तुझं? मी काय विचारलं?” राजूने प्रमोदकडे बघितलं. पहिल्यांदाच प्रमोदला राजूच्या चेहऱ्यावर राग दिसला. राजू बोलला, “जाऊ दे ना काय फरक पडतो आता.” आज राजूचं काहीतरी बिनसलं आहे हे प्रमोदला कळलं. पण काय? तो विचार करू लागला. पण त्याला काही सुचेना म्हणून त्याने तो विचार सोडून दिला. पुढच्या दिवसापासून राजू मागच्या बेंचवर बबनच्या बाजूच्या बेंचवर बसायला लागला. राजू आपल्यावर नाराज आहे हे प्रमोदला समजलं होतं. बबनने त्याला सगळं सांगितल होतं. आपला प्लान फसल्यामुळे तो बबनवर चिडला होता. पण आपण आपल्याच मित्राला फसवायला निघालो होतो याचा त्याला काडीचाही पश्चाताप झाला नव्हता.
शाळा सुटल्यावर राजू आणि बबन एका साडीच्या दुकानात आले. बबनची आई त्याच दुकानातून साड्या घेत असे. राजूने एक हिरव्या रंगाची साडी घेतली. त्यावर रंगीत डिझाईन देखील होते. कधी एकदा आपण घरी जातो आणि आईला ही साडी देतो असे त्याला झाले होते. आईचा आनांदी झालेला चेहरा त्याला पाहायचा होता. राजू घरी पोहोचला. आपल्या पहिल्या कमाईतून आणलेली साडी आईला देण्याचा मोह त्याला आवरत नव्हता. पण वाढदिवसाचा दिवस उजाडायला अजून आवकाश होता. ती रात्र त्याने कशीबशी घालवली. सकाळी लवकर उठून आंघोळ करून त्याने आईच्या पाया पडल्या आणि ज्या दप्तरात काही रविवारापूर्वी रखमाने नवाकोरा शर्ट आपल्या रखरखीत हातांनी हळूच ठेवला होता. त्याच दप्तरातून राजूने नवीकोरी साडी काढली आणि आईच्या हातात ठेवली. आणि तो रखमेला म्हणाला, “तुझा वाढदिवस मी विसरलेलो नाही, आई.” साडी पाहून रखमेच्या चेहऱ्यावर उमटलेले अविस्मरणीय भाव पाहण्यासाठीच राजूने इतके दिवस एवढी खटपट केली होती. रखमाच्या डोळ्यातले अश्रू थांबतच नव्हते. तिने राजूला जवळ घेतले.
आणि ती त्याच्या डोक्यावरुन हात फिरवू लागली. ती काहीच नाही बोलली. काही बोलायची गरजच नव्हती. आई मुलातलं नातचं तितकं घट्ट होतं.
अजूनही राजू दर रविवारी बबनच्या घरी शिकवणीसाठी जात होता. बबनही नियमितपणे अभ्यास करत होता. आता परीक्षा जवळ आली होती. आठवडाभर अभ्यास करून ज्या ज्या शंका बबनला यायच्या त्या तो रविवारी राजूला विचारायचा. यावेळी पहिल्यांदाच बबनने मन लावून परीक्षा दिली होती. यावेळी आपल्याला चांगले मार्क मिळतील याची त्याला खात्री वाटत होती. परीक्षा संपली आणि निकाल आला. यावेळी देखील राजू पहिला आला होता. नेहमी काठावर पास होणाऱ्या बबनला देखील ६५ टकके् गुण मिळाले होते. त्याला स्वतःलाच विश्वास बसत नव्हता. राजूचे आभार कसे मानावेत हेच त्याला कळत नव्हतं. केवळ राजूमुळेच त्याला अभ्यासाची सवय लागली होती.
९
राजू आणि बबनच्या मैत्रीला आता तब्बल दोन वर्ष होऊन गेली होती. त्यांची मैत्री अजूनच घट्ट झाली होती. आता प्रमोद आणि बबन फारसे बोलत नसत. ते तिघेही आता नववीत होते.
एक दिवस राजू शाळेतून घराकडे यायला निघाला. घराकडे आल्यावर पाहतो तर सगळीकडे आग आणि धूर. राजूची झोपडी आणि आजूबाजूच्या इतर काही झोपड्या वीज पडून खाक झाल्या होत्या. त्या दिवशी दुपारी जोराचा पाउस झाला होता. जोरजोरात वीजाही कडकडत होत्या. एक वीज झोपडपट्टीवर कोसळली. रखमा नुकतीच जेवण्यासाठी झोपडीत आली होती. तिने जेवणाचं ताट हातात घेतलं आणि एका क्षणात त्या ताटासह तिची राख झाली होती. राजू तिथे आला. तिथे सगळचं सामसूम होतं. राजूला सगळं समजलं. त्याने आपल्या आयुष्यातला अत्यंत कठीण आणि शेवटचा निर्णय तत्क्षणी घेतला आणि त्याने सायकल वळवली. तो पंचगंगा नदीच्या दिशेने जाऊ लागला. त्याचा त्याच्या मनावर ताबाच राहिला नव्हता. तो बेफिकीरीने नुसता सायकलचे पॅडल मारत होता. एक दोनदा तर तो कारला धडकता धडकता वाचला. थोड्याच वेळात तो नदीच्या पुलापाशी येऊन पोहोचला. अजूनही जोरात पाऊस पडत होता. नदीचे पात्रही ओसंडून वाहत होते. राजूने सायकल तशीच सोडली आणि तो थेट पुलाच्या कड्यावर बसला. त्याचं मन सैरावैरा धावत होतं. आईच्या आठवणीने मध्येच त्याला भरून येत होतं. तो जेव्हा पहिल्यांदा वर्गात पहिला आला होता त्यावेळी आईच्या चेहऱ्यावरील आनंद त्याला आठवत होता. दोन दिवसांपूर्वी जेव्हा त्याने आईसाठी साडी घेतली होती, ती साडी पाहून आनंदित झालेली रखमा त्याला आठवली आणि त्याचं मन भरून आलं. आईच त्याच्यासाठी सर्वकाही होती. उन्हापावसाचं रस्त्यावर भिक मागून रखमाने त्याला वाढवलं होतं. तिच्या शिवाय जगणंच अशक्य होतं. त्याने दीर्घ श्वास घेतला व तो कड्यावर उभा राहिला. तो खाली नदीत उडी मारणार तेवढ्यात त्याला कोणीतरी मागे खेचलं. त्या माणसाने राजूला ओढतच मागे जीपपाशी आणलं आणि जीपच्या मागच्या सीटवर बसवलं. जीपमध्ये त्याच्या शेजारी एक माणूस बसला होता. त्याने राजूचा हात घट्ट पकडला. तो मगाचा माणूस चालकाच्या सीटवर जाऊन बसला व त्याने गाडी चालू केली. थोड्या वेळाने गाडी एका गावात आली आणि एका मोठ्या वाड्यासमोर येऊन थांबली. अजूनही त्या माणसाने राजूचा हात घट्ट धरला होता. इतक्या वेळ राजूने काहीच हालचाल केली नव्हती. त्याचा चेहराही आता निर्विकार झाला होता. राजूला वाचवणारा माणूस त्या गावचा सरपंच होता. तो चांगलाच उंच आणि धिप्पाड होता. सखाराम पाटील त्याचं नाव होतं. तो वयाने तरूण व चांगला शिकलेला होता. सखारामने अॅग्रीकल्चर मध्ये डिग्री मिळवली होती. त्याने आधुनिक तंत्रज्ञान वापरून शेती चांगलीच फुलवली होती. कुणाच्याही मदतीला धावून जाणारा असा गावात त्याचा लौकिक होता. सखारामने राजूला हाक मारली तसा राजू लगबगीने आला व तो राजूला घेऊन आत गेला. त्याने रुमालाने पुसून राजूला कोरडे केले. त्याचे ओले कपडे काढून त्याला कमरे भोवती गुंडाळायला पंचा दिला. राजूच्या चेहऱ्यावरची कळाच गेली होती. तो कुणाशीच अजून एक शब्द देखील बोलला नव्हता. थोड्या वेळाने रामूने चहाचा कप राजू समोर ठेवला. पण राजूने कपाकडे पाहिलं सुद्धा नाही. सखाराम तिथे आला व म्हणाला, “बाळ चहा घे, का असे स्वतःचे हाल करतोयस?” राजू काहीच बोलला नाही आणि त्याने चहाही घेतला नाही. जणू सखारामने बोललेला एकही शब्द त्याच्या कानापर्यंत पोहोचत नव्हता. सखाराम तिथून गेला. थोड्या वेळाने रामू जेवणाचं ताट घेऊन आला. पण राजूने अन्नाला स्पर्शही केला नाही. राजूला खूप मोठा धक्का बसला असणार हे सखारामला कळालं होतं. नाहीतर एवढ्या लहान वयात कोण आत्महत्येचा निर्णय घेईल. त्याने थोड्यावेळ राजूला एकटं सोडण्याचं ठरवलं. सकाळी उठल्यावर राजू सगळं सांगेल अस त्याला वाटत होतं.
सकाळी स्वतः सखाराम चहा घेऊन राजूच्या खोलीत आला. जागरणामुळे राजूचे डोळे तारवटल्यासारखे दिसत होते. सखाराम त्याला म्हणाला, “बाळा, पहिलं चहा घे. मग आपण बोलू.” राजूने चहाचा एक घोट घेतला. त्याला थोड बरं वाटलं. त्याच डोकं खूप दुखत होतं. चहा संपल्यावर कुठे त्याच्या जीवात जीव आला. “आता तू थोडी विश्रांती घे. मग आपण बोलूयात.” एवढे बोलून सखाराम तिथून निघाला. राजूला पण गाढ झोप लागली. काल झालेल्या सगळ्या प्रकारामुळे तो फार दमला होता. झोपून उठल्यावर तो तसाच भिंतीला टेकून बसून राहिला. त्याच्या मनात राहून राहून आईचे विचार येत होते व त्याचे डोळे अश्रूंनी भरत होते. एका क्षणात होत्याच नव्हत झालं होतं. रामू परत जेवणाचं ताट घेऊन आला व म्हणाला, “बाळा, चार घास खाऊन घे. म्हणजे तुला बरं वाटेल. काल पासून काही बी खाल्ल नाहीस तू.” राजूने दोन तीन घास खाल्ले पण जेवण जाईना. त्याने ताट तसच ठेवलं. सखाराम तिथे आला व म्हणाला, “बाळा, काय झाल आहे ते मला सगळं सांग. मन मोकळं कर. असं गप्प बसून कसं चालेल?” राजू हळूहळू बोलू लागला. त्याने घडलेलं सगळं सखारामला सांगितलं. मधेच तो रडत होता.
सगळं काही ऐकल्यावर सखारामला फार वाईट वाटलं. राजूला या क्षणी किती त्रास होत असेल याचा विचारही सखारामला करवत नव्हता. तो राजूला म्हणाला, “फार वाईट झाले तुझ्या बाबतीत. तुला हवे तेवढे दिवस तू इथे राहू शकतोस. नंतर काय करायचं ते पुढचं पुढं बघू. आणि काहीपण लागलं तर मला सांग. विश्रांती घे. आणि तुला जेव्हा वाटेल तेव्हा पोटभर जेव.” राजूने नुसती मान डोलावली. सखारामशी बोलून त्याचं मन थोडं मोकळं झालं होतं.
सखारामच्या वाड्यावर येऊन राजूला चार दिवस झाले होते. आता त्याचं डोकं थोडफार ताळ्यावर आलं होतं. पण आईची आठवण त्याला सारखी येत होती. त्याच्या मनावर झालेल्या आघातामुळे झालेली जखम भरून येण्यासाठी वेळ हेच एकमेव औषध होतं. अधूनमधून सखाराम त्याच्याशी बोलायचा. राजूही त्याला शाळेतल्या काही गमती जमती सांगायचा. बबन बद्दलही सखारामला राजूने बरच काही सांगितल होतं. राजूला बबनची आठवण येत होती. आपल्याला शोधण्यासाठी आख्खं शहर शोधलं असेल हेही त्याला माहित होतं. आणि झालही तसच. बबनने त्याच्या काही मित्रांबरोबर राजूचा खूप शोध घेतला. पण तो कुठेच न मिळाल्याने बबन खूप निराश झाला होता. राजू त्याचा सर्वात जवळचा मित्र होता.
काही केल्या राजूला परत जायची इच्छा होत नव्हती. त्याचं घर, त्याची झोपडी तर निसर्गाच्या कोपामुळे साफ नाहीशी झाली होती. बबनला भेटायची, इतर मित्रांना भेटायची त्याची इच्छा तर होती पण तो विचार केला की त्याला ती काळरात्र आठवायची व त्याच्या डोक्यात कळ यायची. या चार दिवसात सखाराम व रामूने त्याची अतिशय उत्तम सेवा केली होती. सखाराम खरंतर त्या गावचा सरपंच होता. तो त्या गावातला सर्वात श्रीमंत आणि सर्वात जास्त शिकलेला माणूस होता. पण आपल्या पदाचा आणि आपल्या श्रीमंतीचा त्याला बिलकुल गर्व नव्हता. तो राजूला सुद्धा अगदी मित्राप्रमाणे वागवत होता. राजूच्या दृष्टीने तर सखारामने त्याचा जीव वाचवून त्याच्यावर उपकारच केले होते. या उपकारांची परतफेड कशी करायची याचा तो विचार करत होता. त्याने ठरवलं, आता आपण सखारामला त्याच्या कामात मदत करायची. त्याच्या शेतात कामं करायची. सखारामचे उपकार फेडायचा हाच एकमेव मार्ग त्याच्याकडे होता. खरतर काहीही केलं तरी ते उपकार कधीच फेडता येणार नव्हते पण राजूच्या मनाला थोडं तरी समाधान मिळणार होतं. दुपारी सखाराम राजूच्या खोलीत आला व त्याला म्हणाला, “काय हिरो, बरा आहेस ना आता?” राजूने त्याच्याकडे हसून पाहिले व मान डोलावली. सखाराम राजूला म्हणाला, “तुला इथे राहून आता चार दिवस झाले. तुझ्यावर जी वेळ आली ती कोणाच्या शत्रूवरही यायला नको. आपल्या जवळची एखादी व्यक्ती जेव्हा आपल्याला सोडून जाते म्हणजे काय असतं याचा अनुभव मीही एकदा घेतलाय.” सखारामचा चेहरा गांभीर झाला व तो पुढे सांगू लागला, “माझा एक लहान भाऊ होता. तेव्हा साधारण तो तुझ्याच वयाचा असेल. काही वर्षांपूर्वी ती घडना घडली. ती आठवली की अजूनही माझ्या अंगावर काटा येतो. आम्ही सगळी मुलं रोज नदीवर पोहायला जायचो. मला पहिल्यापासूनच पोहायची आवड होती. माझ्या भावाला विकासला मात्र पाण्याची फार भीती वाटायची. त्यामुळे तो कधी पोहायला शिकला नाही. मी ठरवलं होतं काहीही झालं तरी विकासला पोहायला शिकवायचं. त्याची पाण्याची भीती घालवायची. मी एका कापडात थर्माकॉल बांधून तो त्याच्या पाठीवर बांधला. त्याला हात पाय कसे मारायचे हे दाखवलं. थर्माकॉलमुळे आपण बुडणार नाही हे त्याला माहित होतं त्यामुळे तो पण निर्धास्त झाला. तो पोहत पोहत थोडा पुढे गेला. त्याला फार मजा येत होती. थर्माकॉलमुळे तो न पोहताही पाण्यात एकाच जागी तरंगत होता व हसत माझ्याकडे पाहत होता. मीही त्याच्याकडे कौतुकाने पाहून हसत होतो. थोड्यावेळाने तो अजून पुढे पोहत गेला. मी अजूनही काठावरच होतो. इतरही काही मुले तिथे पोहत होती. आता विकास बराच पुढे गेला होता. तो तिथून परत यायला निघाला आणि त्याच्या पाठीवर बांधलेल्या थर्माकॉलची दोरी सुटली, त्याच्या पाठीवरचा थर्माकॉल सुटला व पाण्याबरोबर वाहून गेला. विकास हात पाय मारायचा प्रयत्न करत होता पण भीतीमुळे त्याचे पायच हलेनात. तो जोर जोरात दादा दादा वाचव असं ओरडू लागला तसं माझं त्याच्याकडे लक्ष गेलं. मी लगेच कपडे काढले व पाण्यात उडी मारली. तो माझ्या पासून फारच लांब होता. मी त्याच्यापर्यंत पोहोचण्याच्या आतच तो बुडून नदीच्या तळापाशी पोहोचला होता. मी काहीच नाही करू शकलो रे. माझा सख्खा भाऊ पाण्याला घाबरणारा विकास माझ्यावरच्या त्याच्या दादावरच्या विश्वासामुळेच पोहायला तयार झाला होता. आणि केवळ माझ्यामुळेच तो मला सोडून गेला. मी काहीच करू शकलो नाही.” हे सांगतांना त्याचा आवाज कापत होता. त्याचे डोळे देखील अश्रुंनी भरले होते. थोडा थांबून सखाराम पुन्हा बोलू लागला, “मी जेव्हा तुला पुलाच्या कठड्यावर उभे पाहिले तेव्हा मला क्षणभर वाटलं, देवानेच मला माझ्या भावाला परत एकदा वाचवायची सांधी दिलीये व मी तुला मागे ओढलं. तुला पाहून आता मला जणू विकासच परत आल्यासारखं वाटतय.” सखाराम थोडा थांबून पुन्हा म्हणाला, “राजू, तुला पाहिजे तेवढे दिवस तू इथे रहा. अगदी कायमचा राहिलास तरी चालेल. खरतर आता मी जे बोललो ते मी तुला सांगणार नव्हतो, पण मला राहवलं नाही. मन शांत झालं तुझ्याशी बोलून.”
आता राजू बोलू लागला, “दादा, हो मी तुम्हाला दादाच म्हणतो. दादा खरतर त्या दिवशी मला मरणाच्या दाढेतून बाहेर काढून तुम्ही माझ्यावर फार मोठे उपकार केलेत. या जन्मात तरी मला ते फेडता येणं केवळ अशक्यच आहे. माझं घरही आता राहीलं नाही आणि परत त्या शाळेत जाऊन माझं तिथे लक्ष लागेल असही मला आता वाटत नाही. तुम्ही मला इथं रहायला देऊन खरतर तुम्ही माझ्यावर परत एकदा उपकारच करताय. मी इथे राहून तुम्ही जे काम सांगाल ते मी करेन. शेतात राबेन, घरची कामे करेन. केवळ तुमच्याचमुळे मला माझा पु्र्नजन्म झाल्यासारखां वाटत आहे.” एवढे बोलून तो थांबला. आणि त्याने आदराने सखारामच्या पायाला हात लावला आणि सखारामच्या डोळ्यातून एक अश्रुचा थेंब राजूच्या केसांत पडला. सखाराम वेगळ्याच विचारात रमला होता. राजू जे काही बोलला त्याच्याकडे त्याचं लक्षचं नव्हतं. जेव्हा “दादा” हा शब्द त्याच्या कानावर पडला तेव्हाच तो भूतकाळात गेला होता. दादा, दादा म्हणत त्याच्या मागे पळणारा विकास त्याच्या डोळ्यांसमोर आला होता. विकासच्या आठवणी एकापाठोपाठ एक त्याच्या मनामध्ये येत होत्या व त्याचे डोळे पाणावत होते. थोड्यावेळाने सखाराम काहीच न बोलता तिथून निघून गेला.
आता राजू चांगलाच रमला होता. त्याने एक चिठ्ठी देखील लिहिली होती व रामूला ती हळूच बबनच्या घरी पोहचती करायला सांगितलं होतं. राजूनं त्यात आतापर्यंत घडलेलं सगळं लिहिलं होतं. सखाराम दादा कसा चांगला आहे, तो माझी किती काळजी घेतो तसेच मी सुखरूप आहे व आता तू माझा शोध घेऊ नकोस आणि माझी काळजी करू नकोस असं सगळं लिहिलं होतं. त्याने चिठ्ठीत शेवटी लिहिलं होतं, “नशिबात असेल तर परत केव्हातरी आपली भेट होईलच.” खरंतर बबनला भेटायची राजूची फार इच्छा होती. पण मग तो आपल्याला परत तिथे येण्याचा आग्रह करेल असं राजूला वाटत होतं.
राजू आता रोज सकाळी शेतात जाऊन काम करायचा. सखाराम शहरात जाताना काहीवेळा राजूलाही बरोबर घेऊन जायचा. कोणत्या सिजनला कुठलं पीक घ्यायचं, चांगलं बियाणं कसं निवडायचं, पीकाची काळजी कशी घ्यायची हे सगळं सखारामनं राजूला शिकवलं होतं. तसेच आधुनिक शेतीची काही पुस्तकही त्याने राजूला वाचायला दिली होती. फावल्या वेळात राजूचं वाचन चालू असायचं. गावातल्या इतर मुलांबरोबर राजूची आता मैत्री झाली होती. रोज सांध्यकाळी तो त्यांच्याबरोबर वेगवेगळे खेळ खेळायचा. कधी क्रिकेट तर कधी फुटबॉल तर कधी कबड्डी सुद्धा. त्या मुलांना शाळेला जातांना पाहून राजूला पण त्याच्या शाळेची आठवण यायची व शाळेत जायची त्याचीही इच्छा व्हायची. तो जर बोलला असता तर सखारामने लगेच त्याची शाळेत ऍडमिशन केली असती. पण मग शेतातली कामं पण त्याला करायची होती. राजू आल्यापासून सखारामचं शेतातलं बरचसं काम कमी झालं होतं. तसे शेतात काम करणारे बरेच कामगार होते, पण त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी एका जबाबदार व्यक्तीची गरज होती. राजू तेच काम करायचा. तो वयाने लहान असला तरी हुशार होता व त्याला जबाबदारीची जाणीव होती. सखारामचाही त्याच्यावर पूर्ण विश्वास होता.
एकदा सखारामच राजूला म्हणाला, “राजू, तू परत शाळेत जावस असं मला वाटतं.” तेव्हा राजू त्याला म्हणाला, “पण मी जर शाळेत गेलो तर मग शेतावर कोण लक्ष ठेवणार?. तुम्हालाही इतर कामं खूप असतात, आणि खरंतर मला हे काम आवडायला लागलं आहे.” “हे बघ राजू, तुला जर हे काम आवडत असेल तर तू नक्की कर. पण जर तुला शाळेत जायची इच्छा असेल तर मी शेताच्या कामासाठी दुसरा कोणीतरी पाहीन. त्यामुळे पुढे कधी जर तुला शाळेत जायची इच्छा झाली तर मला नक्की सांग. तू म्हणशील त्या शाळेत आपण प्रवेश घेऊ.” सखाराम राजूला म्हणाला. राजूला खरंतर आता परत शाळेत जाऊन पुढे शिकायची इच्छा होत होती. पण सखारामच्या उपकारांची जाणीवही त्याला होती. खरचं वयाच्या मानाने फारच समजूतदार होता राजू.
राजू रोज शेतात जाऊन स्वतः कामही करत असे व इतर कामगारांवर लक्षही ठेवत असे. एखाद्या कामगाराने जर नीट काम नाही केलं तर राजू त्याबद्दल सखारामला सांगत असे. मग सखाराम त्या कामगाराला जाब विचारायचा. तसेच सरपंच म्हणून काम करत असतांना गावातील बरेच लोक सखारामकडे तक्रार घेऊन येत असत. सखाराम राजूबरोबर लोकांच्या समस्यांबद्दल चर्चा करत असे. मग ते दोघे मिळून त्या समस्या सोडवत असत. काहीवेळा तर लोक आपापसातली भांडणं घेऊन सखारामकाडे यायचे. गावातल्या लोकांना सखारामबद्दल प्रचंड आदर वाटायचा. कोणत्याही समस्येकडे तो स्वतःचीच समस्या असल्याप्रमाणे पाहायचा. या दोन वर्षात राजू सखारामकडून खूप काही शिकला होता.
सखाराम मुळातच हुशार व समजूतदार होता. अगदी लहान असल्यापासून तो स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायला शिकला होता. आईची हुशारी आणि वडिलांचा चांगुलपणा, दिलदारपणा त्याच्यात आला होता. सखारामची आई जात्याच हुशार होती पण लहान वयातच तिला धनंजयराव पाटीलांसारखं मोठं आणि दमदार स्थळ आल्यामुळे वडिलांनी तिचं लग्न लावून दिलं. धनंजयराव पाटील हे अतिशय प्रामाणिक आणि दिलदार होते. गावात कोणालाही पैश्याची किंवा इतर कोणतीही मदत लागली तर ते पुढचा मागचा विचार न करता सढळ हातांनी मदत करायचे. त्यांचा जनसंपर्क सुद्धा दांडगा होता. आपल्यामुळे गाव नाही तर गावामुळे आज आपण जे काय आहोत ते आहोत अशी त्यांची धारणा होती. सलग २० वर्ष सरपंच पद सांभाळल्यावर एक दिवस अचानक हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचं निधन झालं होतं. त्यांच्या निधनानंतर गावानं एकमतानं केवळ २५ वर्शीय असलेल्या सखारामला सरपंच म्हणून निवडलं होतं. केवळ सहानुभूती म्हणून नाही तर धनांजयरावांवर असलेल्या विश्वासामुळेच गावकऱ्यांनी सखारामला निवडलं होतं. केवळ चारच वर्षाच्या कारकिर्दीत सखारामने स्वतःला सिद्ध केलं होतं. खरंतर पैशाच्या व लौकिकाच्या जोरावर आमदार होणं सखारामला सहज शक्य होतं, पण हे गाव सोडायची त्याची बिलकुल इच्छा नव्हती. या गावानं त्याच्या घराण्याला आणि त्याला खूप काही दिलं होतं. त्याचीच परतफेड करायची संधी त्याला मिळाली होती.
सखारामच्या आयुष्यात आता सगळंकाही होतं. पण आता वेगळ्याच विचारांनी त्याच्या मनात घर केल होतं. सखारामला आता लग्नाचे वेध लागले होते. तशी त्याच्या पहाण्यात एक मुलगी होती. रसिका शिंदे. सखाराम कॉलेज मध्ये असतांना रसिका त्याच्या गावात शिकायची. त्याला फार आवडायची ती. रसिकालाही सखाराम आवडायचा. पण कॉलेजात असतांना हाय हॅलो च्या पुढं कधी त्यांचं बोलणं झालं नाही. काही दिवसांपूर्वी सखाराम एका कामासाठी शहरात गेला असतांना त्याला रसिका भेटली. दोघांनीही एकमेकांना ओळखलं. थोडावेळ कुणीच एकमेकांशी बोलल नाही. शेवटी सखारामच रसिकाला म्हणाला, “इतकी वर्ष झाली, पण तू काही बदलली नाहीस. कॉलेजच्या दिवसात जशी होतीस अगदी तशीच आहेस अजून.” हे ऐकल्यावर रसिका चक्क लाजली. थोड्या वेळाने रसिका म्हणाली, “तू तरी कुठे बदलला आहेस फारसा.” आणि दोघेही हसले. आता त्यांच्या गप्पा सुरु झाल्या. त्या दिवशी ते इतके बोलले की ते इतक्या वर्षानी भेटले आहेत असं कुणालाही वाटलं नसतं. शेवटी त्यांनी एकमेकांचा मोबाईल नंबर घेतला व “परत भेटू” असं म्हणून निघाले.
आता सखाराम आणि रसिकाचं जवळजवळ रोजच फोनवरुन बोलणं व्हायचं आणि शहरात आल्यावर भेटणंही व्हायचं. शहरात जर काही काम नसलेच तर मुद्दाम एखादं काम काढून शहरात जाऊन सखाराम रसिकाला भेटायचा. आधी केवळ कामासाठी फोन करणाऱ्या सखारामला तासनतास फोनवर बोलतांना पाहून दादाचं काहीतरी चालू आहे हे राजूला कळलं होतं. वेळ आल्यावर दादा स्वतःहून आपल्याला सगळं सांगेल अशी राजूला खात्री असल्यामुळे त्याने कधी सखारामला विचारलं नाही. एक दिवस रसिका सखाराम सोबत त्याच्या घरी आली. त्याने सगळा वाडा तिला दाखवला तसेच रामूची व राजूची ओळख करून दिली. सखारामने आधीच राजूबद्दल सांगितलं होतं. त्याच दिवशी रसिका परत गेल्यावर सखारामने राजूला सगळं सांगितलं व पुढच्याच महिन्यात आम्ही लग्न करणार आहोत असही सांगितलं. हे ऐकून राजूला खूप आनंद झाला. कितीतरी वर्षानी त्या वाड्यात एखाद्या स्त्रीचा वावर होणार होता. सखारामची आई जाऊन कित्येक वर्ष झाली होती. त्यानंतर घरातली सर्व कामं रामूच करायचा. अगदी सकाळचा आणि संध्याकाळचा स्वयंपाक सुद्धा रामूच करायचा. त्याला स्वयंपाक फारसा जमायचा नाही पण त्याच्या परीने जमेल तसं तो करायचा. अन्नाला नावं ठेवायची नाही म्हणून सखारामने व राजूने सुद्धा कधी त्याच्या अन्नाला नावं ठेवली नाहीत. काहीच दिवसांत वहिनीच्या हातचं खायला मिळणार म्हणून राजू सुद्धा आता सुखावला होता.
आता लग्नाची तयारी जोरदार सुरु होती. सखाराम, रामू व राजू तिघेही लग्नाच्या तयारीत व्यस्त होते. लग्न आता काही दिवसांवर येऊन ठेपलं होतं. कार्यालय, जेवण व भटजी हे सगळं सखारामने आधीच ठरवलं होतं. गावोगावी जाऊन पत्रिका पोहोचवायचं काम राजू आणि त्याच्या गावातील मित्रांनी केलं. पूर्ण वाडा साफ करणं व आलेल्या पाहुण्यांची व्यवस्था करायचं काम रामुवर सोपवलं होतं. रसिकाच्या बाबांनी सखारामला हुंड्याबद्दल विचारलं तर तो म्हणाला, “हुंडा हा प्रकारच खरंतर मला पटत नाही. तुमच्या मुलीचा हात तुम्ही माझ्या हातात दिला हेच माझ्यासाठी खूप आहे.” रसिकाचे आई वडील सुद्धा खुश झाले. आपल्या मुलीला सखाराम सारखा कर्तबगार नवरा मिळाला हेच ते स्वतःचं भाग्य समजत होते.
शेवटी एकदाचा लग्नाचा दिवस उजाडला. सखारामचे गावोगावीचे नातेवाईक, त्याचे मित्र मैत्रिणी, काही राजकीय लोक तसेच जवळ जवळ सगळेच गावकरी लग्नाला आले होते. रसिकाच्या बाजूचेही बरेच लोक होते. लग्न छान झालं. राजूनेही खूप मेहनत घेतली होती. एकावेळी इतके लोक तो पहिल्यांदाच पाहत होता. बऱ्याच दिवसांनी तो सखारामच्या घोड्यापुढे बेभान होऊन नाचला. वरात वाडा्यापाशी आली. दारातला तांदळाने भरलेला पेला कलंडला व रसिकाने सखारामची धर्मपत्नी म्हणून पहिल्यांदाच वाड्यात प्रवेश केला. सखाराम आता संसारी माणूस झाला होता.
थोड्याच दिवसात सखाराम व रसिका हनिमूनसाठी गोव्याला निघाले. रसिकाला वाड्यात येऊन थोडेच दिवस झाले होते. पण राजूला तिचं वागणं थोडं तुटकचं वाटत होतं. भाऊजी आणि वहिनीमध्ये ज्याप्रमाणे भावा बहिणीसारखं नातं असायला हवं तसं नातं अजूनतरी राजू आणि रसिका मध्ये तयार झालं नव्हतं. इतक्या दिवसात रसिकाने केवळ एकदाच स्वयंपाक केला होता. तेव्हा सुद्धा ती राजूला म्हणाली होती, “राजू, मी जेवण बनवलय, आत कट्ट्यावर सगळं ठेवलं आहे वाढून घे.” तिच्या बोलण्यात जिव्हाळा तर नव्हताच उलट एक प्रकारचा तिरस्कार, उद्धटपणा राजूला तेव्हा जाणवला.
सखाराम व रसिका आता हनिमूनवरून परत आले होते. सखारामचे काही मित्र ज्यांना काही कारणाने लग्नाला यायला जमलं नव्हतं ते सखाराम व रसिकाला भेटून गेले. आता सखाराम परत कामाला लागला होता. बऱ्यावचवेळा तो कामासाठी बाहेर गावी जायचा. त्याने अजून काही व्यवसाय सुरु केले होते. तसेच काही जागाही घेतल्या होत्या. त्यामुळे सखाराम आता फारच व्यस्त असायचा. शेती आता पूर्णपणे राजूच सांभाळत होता. दिवसभर शेतात काम करून आल्यावर वहिनीने आपल्याला मस्तपैकी गरम गरम चहा किंवा शिरा करून द्यावा असं त्याला वाटायचं. पण वहिनीच्या अशा वागण्यामुळे त्याला दहा वेळा विचार करायला लागायचा. सखाराम घरी असतांना मात्र रसिका राजूशी फार छान वागायची. तिच्या वागण्यातला बदल राजूला लगेच जाणवायचा.
रसिकाला सखारामने राजूबद्द्ल पूर्वीच सगळं सांगितलं होतं. पण रसिकाचे विचार सखाराम इतके उदात्त नव्हते. एका भिकारणीच्या मुलाला सखाराम भाऊ कसा मानतो हेच रसिकाला पटत नव्हतं. त्यामुळे सखारामसाठी जरी राजू त्याचा भाऊ असला तरी रसिकासाठी तो केवळ एक भिकारणीचा मुलगा होता. त्याला भेटण्या आधीपासूनच रसिकाच्या मनात राजूबद्द्ल एक प्रकारचा तिरस्कार निर्माण झाला होता. वाड्यात येऊन आता तिला जवळ जवळ चार महिने झाले होते. राजूबद्दलचा तिचा तिरस्कार अजूनही कमी झाला नव्हता. उलट तो दिवसेंदिवस वाढतच होता. राजूचा अपमान करायची, त्याला कमीपणा दाखवायची एकही संधी रसिका सोडत नव्हती. राजूला तर याचा खूप त्रास होत होता. पण वहिनी म्हणून तो तिच्याशी चांगलचं वागायचा. ती त्याला काहीही बोलली तरी तो तिला उलटून काहीच बोलायचा नाही. मुकाट्याने ऐकून घ्यायचा.
एक दिवशी सकाळी एक भिकारी वाड्याच्या दारात आला व खायला मागू लागला. रसिका बाजूच्या झोपळ्यावर काहीतरी विणत बसली होती. सखाराम घरात नव्हता व राजू जवळच्या एका झाडाला आळं करत होता. भिकाऱ्याकडे पाहून रामू म्हणाला, “थांब इथच. भाकरी आणतो तुझ्यासाठी.” हे ऐकून राजूला ऐकू जाईल एवढ्या मोठ्या आवाजात रसिका रामूला म्हणाली, “काय नको रे रामू. या भिकाऱ्यांना सगळं आयतं हवं असतं. अजिबात काही देऊ नकोस त्याला.” तिचं बोलणं रामूला आवडलं नव्हतं. पण मालकिणीचं ऐकण्याशिवाय त्याच्याकडे पर्याय नव्हता. राजू तर रागाने लाल झाला होता. तिचं बोलणं आपल्याला उद्देशून आहे हे त्याला माहित होतं. त्याने हातातलं खुरपं खाली मातीत मारून मन शांत करण्याचा प्रयत्न केला. असा त्याचा अपमान कित्येकदा झाला होता. आपल्यामुळे सखाराम आणि वहिनीतलं नातं बिघडायला नको म्हणून तो हे सगळं सखारामला सांगत नव्हता. तो कसेबसे दिवस काढत होता.
आज तर रसिकाने दुष्टपणाचा कळस केला. सकाळीच चहा पिता पिता सखाराम तिला म्हणाला, “कोल्हापुरात एक आलिशान हॉटेल काढायचा मी विचार करतोय. त्या हॉटेलचं सगळं व्यवस्थापन मी आपल्या राजूला द्यायचं ठरवलंर आहे. राजू आता मोठा झालाय. तो हुशार व मेहनती आहे. तो नक्कीच हॉटेल चांगलं सांभाळेल असं मला वाटतं.” रसिका काहीच बोलली नाही. सखाराम जाईपर्यंत ती गप्प होती. पण सखाराम घराबाहेर पडल्यावर तिने जो तोंडाचा पट्टा सुरु केला तो बंद व्हायचं नावचं घेत नव्हता. दिवसभर तिने राजूला भिकारी म्हणून हिणवलं. खूप बोलली ती राजूला. त्याच्या मृत आईचाही तिने उद्धार केला. राजूची सहन शक्ती आता सांपली होती. पाणावलेल्या डोळ्यांसह तो त्याच्या खोलीत गेला व एक पेन कागद घेऊन त्याने चिठ्ठी लिहायला सुरुवात केली.
प्रिय सखाराम दादा,
आता मी एक क्षणही या घरात राहू शकणार नाही. म्हणून मी घर सोडून जात आहे. कारण मी सांगू शकणार नाही. खरंतर तुझ्या सारख्या महान माणसाचा भाऊ म्हणून या घरात रहायला मिळालं हे मी माझं भाग्यच समजतो. हे घर सोडतांना मला फार वेदना होतायेत. पण माझा नाईलाज आहे. माझी काळजी करू नकोस असं सांगणही खरंतर चुकीचं आहे. पण तरीपण माझी काळजी करू नकोस. आजपर्यंत तू मला खूप काही दिलंस. आता केवळ तुझा आशिर्वाद मला हवाय.
तुझा लाडका,
राजू
अश्रुंनी भरलेली ती चिठ्ठी राजूने टेबलवर ठेवली. बॅगेत थोडे कपडे घेऊन व कपाटातले स्वतःच्या कष्टाने कमावलेले थोडे फार पैसे घेऊन तो घराबाहेर पडला. रामूने त्याला अडवायचा प्रयत्न केला पण, रसिकाने नजरेने खुणावताच रामू मागे सरकला व त्याने राजूला जाऊ दिले. जे काय घडलं ते सखारामच्या कानावर जाता कामा नये अशी सक्त ताकीद रसिकाने रामूला दिली होती. तिच्या अपेक्षेप्रमाणेच सगळं घडलं होतं.
राजू घर सोडून जायला आता चार दिवस झाले होते. सखाराम गावात परत आला. त्याला सांगाण्यसाठी रसिकाने एक खोटी स्टोरी तयार केली होती. काही कामासाठी सांगून गेलेला राजू परत आलाच नाही. आम्ही त्याला खूप शोधलं पण तो कुठेच मिळाला नाही असं तिने सखारामला सांगितलं. चेहऱ्यावर खोटया काळजीचे भाव आणून ती सखारामशी बोलत होती. सखारामसाठी हा खूप मोठा धक्का होता. त्याने गावातील काही लोकांना बोलावून पूर्ण गावभर राजूला शोधायला सांगितलं व तो स्वतः रामूला बरोबर घेऊन शहराकडे निघाला. त्याने अख्खं कोल्हापूर शहर पालथं घातलं पण राजू कुठेच मिळाला नाही. गावातील मुलांनादेखील मागचे काही दिवस राजू भेटला नव्हता. राजूची झोपडी जिथे होती त्या शिंगणापूरच्या झोपडपट्टीत देखील सखाराम जाऊन आला. पण तिथेही कोणाला राजूचा पत्ता नव्हता. निराश मनाने व रिकाम्या हातांनी सखाराम परत वाड्यावर आला. राजूला भेटल्यापासून आपला भाऊच परत आला आहे असं सखारामला वाटत होतं. इतक्या वर्षात सखारामला राजूचा खूप लळा लागला होता. सखाराम वाड्यात आला व थेट राजूच्या खोलीत शिरला. तिथे त्याला टेबलावर ठेवलेली चिठ्ठी दिसली. सखारामने ती चिठ्ठी वाचली. सखारामच्या डोळ्यातून अश्रुंचे थेंब त्या चिठ्ठीवर पडले व पुन्हा एकदा ती चिठ्ठी ओली झाली.
१०
राजू कोल्हापूरच्या रेल्वेस्टेशनवर आला. समोरच्या टपरीवरून त्याने एक कप चहा घेतला आणि एका बाकावर बसून तो चहा पिऊ लागला. रेल्वेस्टेशनवर नेहमीप्रमाणेच गडबड गोंधळ चालू होता. आपली रेल्वे पकडण्यासाठी लोक मेंढरासारखी पळत होती. एखादी नवीन रेल्वे स्थानकात आल्यावर माईक वरून अनाउन्समेंट होत होती. त्यातच वेगवेगळ्या आवाजात आपल्या खास शैलीत ओरडणाऱ्या फेरीवाल्यांचा आवाज मिसळत होता. पानपट्टी पासून पेपर, मासिकांच्या दुकानापर्यंत सगळीकडे माणसच माणसं होती. बघेल तिथे ट्रेनची वाट पाहून कंटाळलेले तेलकट चेहरेच दिसत होते. या सगळ्या गोंधळात राजूच्या मनात वेगळाच गोंधळ सुरु होता. रसिकाने केलेला अपमान सहन न झाल्यामुळे तो तावातावात घरातून बाहेर पडला होता. पण सखाराम दादाला न सांगता घरातून निघून आपण चूक तर केली नाही नं? असं त्याला आता वाटत होतं. आज तो या जगात होता तो केवळ सखाराममुळेच होता. आत्महत्या करायला गेलेल्या राजूला सखारामने वाचवलं होतं. एवढचं नाही तर त्याने राजूला आपला भाऊ मानून स्वतःच्या घरात घेतलं होतं. सखारामचे राजूवर खूप मोठे उपकार होते आणि याची राजूलाही जाणीव होती. परत घरी जावं आणि सखाराम दादाला सगळं खरंखरं सांगावं असाही विचार त्याच्या मनात येऊन गेला. पण तसं केलं तर सखाराम दादा आणि रसिका वहिनीच्या नात्यावर त्याचा परिणाम होईल असं राजूला वाटलं आणि त्याने परत घरी न जाण्याचा निर्णय घेतला.
चहा पिऊन झाल्यावर राजूने चहावाल्याला पैसे दिले व तो परत बाकावर जाऊन बसला. विचार करून राजूचं डोकं दुखत होतं. थोड्यावेळाने त्याला बसल्या बसल्याच झोप लागली. राजूला जेव्हा परत जाग आली तेव्हा रात्र झाली होती. राजूला खूप भूक लागली होती. तो जवळच्याच एका हॉटेलात जाऊन जेवून आला. आजही रात्र त्याला इथेच स्टेशनवर काढावी लागणार होती. राजूने तिथेच एका बाकावर पाय पसरले, पण थंडीनं तो गारठला होता. व त्याला आता झोपही लागत नव्हती. राहून राहून त्याच्या मनात सखारामदादाचेच विचार येत होते. तो तसाच बाकावर पडून राहिला.
सकाळ झाली तशी स्टेशनवर माणसांची वर्दळ वाढू लागली. पहाटे केव्हा तरी राजूला झोप लागली होती. पण फेरीवाल्यांच्या आवाजामुळे त्याला जाग आली. प्रातर्विधी आटोपून त्याने चहा घेतला व पोहे घेऊन तो परत बाकावर येऊन बसला. त्याच्या समोरच्या बाकावर एक माणूस पेपर वाचत बसला होता. एक भिकारी बाई त्या माणसापाशी आली व खायला मागू लागली. त्या माणसाने हातानेच तिला जायची खूण केली. पण ती बाई काय तिथून हलली नाही व परत त्याच्याकडे खायला मागू लागली. आता तो माणूस चिडला आणि त्याने एक अश्लील शिवी त्या बाईला दिली. निराश होऊन ती बाई तेथून निघाली. हे सगळं पाहून राजूला रखमाची आठवण झाली आणि तो गहिवरला. त्याने हाताने डोळे पुसले आणि त्याने त्या भिकारी बाईला हाक मारली. तिने आश्चर्याने पाहिले पण ती संकोचून तिथेच उभी राहिली. राजू बाकावरुन उठला आणि त्या बाईपाशी जाऊन तिला म्हणाला, “काकी, चला काहीतरी खाऊन घ्या.” ते दोघेही जवळच्या टपरीपाशी आले. राजूने एक प्लेट पोहे आणि एक कप चहा मागवला. ती भिकारी बाई पोहे खात होती. तिच्या एका डोळ्यात अश्रू आणि एका डोळ्यात आनंद होता. इतक्या वर्षात तिला पहिल्यांदाच कोणीतरी काकी म्हणून हाक मारली होती व एवढ्या प्रेमाने खाऊ घातलं होतं. पोहे खाऊन झाल्यावर तिने चहा पिला व राजूच्या डोक्यावर हात ठेवून त्याला आशिर्वाद दिला आणि ती तिथून निघाली. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून राजूदेखील सुखावला.
आता पुढे काय करायचं? राजूच्या मनात विचार आला. स्टेशनवर तो जास्त दिवस राहू शकत नव्हता. त्याच्याकडचे पैसे देखील थोडे दिवसच पुरणार होते. त्याला लवकरात लवकर काही तरी काम शोधणं भाग होतं. गावातील काही लोकांकडून त्याने पुण्याबद्दल ऐकलं होतं. गावातले बरेच लोक कामासाठी पुण्यात गेले होते. त्यांना राजूने परत गावात आलेले पाहिलं नव्हतं. त्याने पुण्यात जाऊन काम शोधायचं ठरवलं. इथं राहणं त्याच्यासाठी फारसं ठीक नव्हतं. केव्हान् केव्हा सखाराम दादा आपल्याला शोधणार हे त्याला माहित होतं आणि पुन्हा वहिनीचे टोमणे ऐकत, अपमान सहन करत जगणं त्याच्यासाठी असह्य होतं.
राजूने पुण्याकडे जाणाऱ्या ट्रेनची चौकशी केली. दोन तासात गाडी येणार होती. राजूने इकडे तिकडे फिरून कसाबसा वेळ काढला. आणि गाडी येताच तो गाडीत चढला. पुण्यात गेल्यावर लगेच काम मिळेल अशी राजूला अपेक्षा होती. सुरुवातीचे काही दिवस तो मिळेल ते काम करायला तयार होता. गाडी पुणे स्टेशनला पोहोचली. राजू तिथे उतरला. त्याने स्टेशनवरच चहा घेतला व तो स्टेशन बाहेर पडला.
रस्त्यावर एवढी गर्दी तो पहिल्यांदाच बघत होता. रात्र झाली की गावातल्या रस्त्यावर चीटपाखरू सुद्धा दिसायचं नाही. इथे मात्र सगळीकडे माणसच माणसं. प्रत्येक जण कसल्या न कसल्या गडबडीत होता. थोडं फिरून राजू परत स्टेशनवर आला. आजची रात्र देखील त्याला स्टेशनवरच काढावी लागणार होती. सकाळी उठून तो काम शोधणार होता. जवळच्या हॉटेल मध्ये राजूने थोडसं खाल्लं आणि एका बाकावर येऊन त्याने पाय पसरले. सकाळी उठल्यावर चहा वगैरे पिऊन झाल्यावर त्याने एक वर्तमानपत्र विकत घेतलं व त्यातल्या जाहिराती पाहू लागला. एका जाहिरातीने त्याचं लक्ष वेधून घेतलं. चाकण मधल्या एका कंपनीत कामगार भरतीची जाहिरात होती. राजूने पत्ता लिहून घेतला. सकाळचा नाशता आटोपून त्याने चाकणची बस पकडली. जाहिरातीत दिलेल्या पत्त्यावर तो पोहोचला. तिथल्या वॉचमनला त्याने कामगार भरतीसाठी आल्याचं सांगितलं. वॉचमनने त्याला समोरच्या ऑफीसमध्ये जायला सांगितलं. केबिनमधल्या साहेबाने राजूला काही माहिती विचारली आणि कामाचं स्वरुप समजावून सांगितलं. राजूला प्रति दिन दोनशे रुपये भत्ता मिळणार होता. तसेच त्याची राहायची सोय देखील तेथेच होणार होती. राजू खुश झाला. दुसऱ्याच दिवसापासून त्याचं काम सुरु झालं. सुपरवायजरने राजूला वेगवेगळी मशीन्स कशी वापरायची ते दाखवलं. गाडीच्या इंजीनमध्ये वापरला जाणारा एक पार्ट त्या कंपनीत बनायचा. इतर कामगारांप्रमाणे राजूही आता कामाला लागला. खरंतर राजूला हे काम फारसं आवडलं नव्हतं. पण सध्या तरी राजूला गरज होती.
कंपनीजवळच कामगारांसाठी झोपायला खोल्या होत्या. त्यातल्याच एका खोलीत राजूची सोय केली होती. रात्री जेवण झाल्यावर राजू झोपण्यासाठी त्याच्या खोलीत आला. त्या खोलीत अगोदरच तीन जण होते. राजूने स्वतःची ओळख करून दिली. त्यांनीही राजूला आपआपली नावं सांगितली. चिनप्पा, बबलू आणि बाळू. चिनप्पा मुळचा कर्नाटकचा होता पण लहानपणापासून तो पुण्यातच होता. बबलू बिहार मधून आला होता तर बाळू लातूरचा होता. चिनप्पाचे वडील पूर्वी याच कंपनीत कामाला होते. एक दिवस त्यांचा हात मशीन मध्ये अडकला आणि कायमचाच निकामी झाला, त्यांच्याच जागी चिनप्पाला घेतला होता. अगदी लहानपणापासूनच चिनप्पा कांपनीत काम करत होता. आता कंपनीत काम मिळाल्यापासून एक महिना झाला होता. राजूची चिनप्पा, बबलू आणि बाळू यांच्याशी चांगलीच मैत्री झाली होती. आठवड्यातले दोन तीन दिवस रात्री त्यांचा दारूचा कार्क्रयम होत असे. राजू मात्र दारू घेत नसे. पण त्यांच्या गप्पांमध्ये मात्र तो सामील व्हायचा. त्या तिघांनाही दारू चढली की ते काहीही असंबद्ध बोलायचे आणि त्यांची बडबड ऐकून राजूला गंमत वाटायची. पण त्याला काही दारू प्यायची इच्छा झाली नाही. राजूचा पूर्ण दिवस कंपनीत कामातच जायचा. सुपरवायजर देखील त्याच्या कामावर खुश होता. त्याने राजूबद्दल मालकालाही सांगितलं होतं. काही महिन्यांतच मालकाने राजूचा पगार वाढवला. एक दिवस राजूला मालकाने कॅबीनमध्ये बोलावलं. मालकाच्या घरातला गडी पंधरा दिवस सुट्टीवर होता. त्याचे वडील आजारी असल्यामुळे तो गावी गेला होता. त्यामुळे मालक गडी परत येईपर्यंत घरची सगळी कामं राजूकडून करून घेणार होता. मालकाच्या मुलीला शाळेत पोहोचवण्यापासून त्याच्या कुत्र्याला फिरवून आणण्यापर्यंत सगळी कामं राजूला करावी लागणार होती. राजूला देखील फॅक्टरीच्या कामातून बदल हवाच होता. मालक आपल्यावर खुश आहे याचही त्याला समाधान होतं. गेले चार दिवस राजू मालकाने सांगितलेली सगळी कामं मनापासून करत होता. आज सकाळी उठल्यावर आवरुन तो मालकाच्या कुत्र्याला फिरवून आणण्यासाठी मालकाच्या बंगल्यापाशी आला. समोरचं दृशय पाहून राजूला धक्काच बसला. बंगल्याच्या गेटपाशी मालकाचं लॅब्राडोर जातीचं कुत्र मरून पडलं होतं. त्या कुत्र्याच्या मानेवर चाकूचे वार होते व त्या जखमेतून रक्त वाहत रस्त्यावर आलं होतं. त्या कुत्र्याची नक्कीच कोणीतरी निघृणपणे हत्या केली होती. खरंतर राजूला कुत्री फारशी आवडत नसत. कालंच तो चिनप्पाला बोलला देखील होता की त्याला मालकाच्या कुत्र्याला फिरवायची बिलकुल इच्छा होत नाही. ते कुत्र सारखं अंगाअंगाशी करतं आणि माझे पाय चाटतं. मला त्याची किळस येते. पण कुत्रं मालकाचं फारच लाडकं असल्याने मला तसं मालकाला सांगता पण येत नाही असही तो चिनप्पाला बोलला होता. पण आज पहिल्यांदा राजूला रक्ताच्या थारोळ्यात पडलेले ते कुत्रं पाहून त्याची कीव आली. कुत्रं मालकाचं लाडकं असल्याकारणाने मालकाला सांगायचही धाडस होत नव्हतं. राजूने थोडावेळ विचार करून तिथून निघण्याचा निर्णय घेतला. तो आजारी असल्याकारणाने आपण इथे आलोच नाही असं मालकाला सांगणार होता. तो तिथून निघाला तेवढ्यात त्याला मालकाचा आवाज आला. बालकनीत उभ्या असलेल्या मालकाने राजूला पाहिलं होतं व त्यानेच राजूला हाक मारली होती. आता मात्र भीतीने राजूच्या पोटात गोळा आला होता. तो तिथेच थांबला. मालक जोरजोरात पायऱ्या उतरत खाली आला. तो थेट त्याच्या लाडक्या रॉकीच्या प्रेतापाशी येऊन खाली बसला. रॉकीचं रक्ताळलेलं डोकं त्याने आपल्या हातात घेतलं आणि थोडावेळ त्याच्याकडे पाहू लागला. आता त्याच्या डोळ्यांच्या कडा अश्रुंनी ओलावल्या होत्या. आता त्याने समोरच उभ्या असलेल्या राजूकडे पाहिलं. मालकाची भेदक, क्रोधीत नजर आपल्याकडे रोखलेली पाहून राजू भीतीने कापत होता. त्याच्या हृदयाची धडधड त्याला स्पष्ट ऐकू येत होती. मालकाला राजूवर संशय होता. तो राजूकडे पाहून मोठ्याने ओरडला, “तूच मारलस ना माझ्या रॉकीला.” राजूचं मन सांगत होतं, “नाही साहेब मी काहीच नाही केलं.” पण भीतीमुळे त्याच्या तोंडातून शब्दच फुटत नव्हते. तो नुसता मालकाकडे पाहत होता. मालकाचा राग अजूनच वाढला. तो राजू जवळ आला आणि त्याच्या शर्टाची कॉलर पकडून म्हणाला, “का मारलस तू माझ्या लाडक्या रॉकीला?” आता मात्र राजूचा धीर सांपला. “मी नाही” असे दोनच शब्द तो उच्चारू शकला. आता मालकाची सहनशक्ती संपली. त्याने राजूला कॉलर पकडून तसेच फरफटत आत आणले. “थांब तुला पोलिसातच देतो.” असे म्हणून मालक आत जाऊन गाडीची चावी घेऊन आला. त्याने राजूला गाडीत बसवला आणि गाडी त्याने स्वतः चालवत पोलीस स्टेशनपाशी आणली. मालकाने राजूला हाताला धरूनच आत नेलं. समोर इन्स्पेक्टर मुजुमदार पेपर वाचत बसले होते. ते मालकाचे चांगले मित्र होते. मालकाचा म्हणजेच प्रकाशचा रागीट चेहरा पाहून मामला गंभीर असल्याची जाणीव इन्स्पेक्टर मुजुमदारांना झाली. मालक मुजुमदारांना म्हणाला, “विकास याला आत्ताच्या आत्ता कोठडीत घे आणि चांगले फटके दे”. मालकाचा आवाज चढला होता आणि अजूनही त्याचे डोळे आग ओकत होते. “अरे प्रकाश आधी शांत हो, आणि याने केलंय काय ते तरी सांग.” इन्स्पेक्टर मुजुमदार म्हणाले. मालक थोडा शांत झाला आणि म्हणाला, “याने माझ्या लाडक्या रॉकीची निघृण हत्या केलीय. कष्टाळू, हुशार कामगार म्हणून मी याच्यावर विश्वास दाखवला आणि याने माझा विश्वासघात केला.” मुजुमदारांनी राजूकडे पाहिलं. तो मालकाच्या मागे अंग चोरून उभा होता. मुजुमदारांनी कॉनस्टेबल डोंगरेंना खूण करताच कॉनस्टेबल डोंगरेंनी राजूला मुजुमादारांसमोर उभं केलं. मान वर करून मुजुमादारांकडे पाहण्याचं देखील धाडस राजूचं होत नव्हतं. तो मान खाली घालून उभा होता. मुजुमादारांना माणसांची चांगली पारख होती. गुन्हेगार आणि सामान्य माणसातला फरक त्यांना चांगलाच माहित होता. आतापर्यंत त्यांनी बरेच गुन्हेगार पकडले होते. ते राजूला शांतपणे म्हणाले, “काय रे, का मारलस तू त्यांच्या कुत्र्याला?” “कुत्रा म्हणू नकोस. रॉकी मला मुलासारखा होता आणि इतका शांतपणे काय बोलतोस त्याच्याशी, चार फटके दिल्याशिवाय नाही बोलणार हा नालायक.” “मागून मालक बोलला. मुजुमदार मालकाला म्हणाले, “हे बघ कुणाला कसं बोलतं करायचं हे मला चांगलच कळतं. ही काय तुझी कंपनी नाही आहे. तुला जर इथं थांबून त्रास होत असेल तर तू जाऊ शकतोस.” मालक रागातच बाहेर गेला. मुजुमदार राजूला म्हणाले, “हे बघ, जे काय झालं ते सगळं खरं सांग. जर तू खरचं काही केल नसशील आणि जर तू हे सगळं काही खरं सांगितलस तर तुला काहीही त्रास होणार नाही. याची ग्वाही मी तुला देतो.” मालक तिथून गेल्यामुळे राजूच्या मनावरचा ताण आता कमी झाला होता. त्याने सगळं काही सांगितलं. मुजुमादारांना राजूने सांगितलेलं पटत होतं पण सध्यातरी ते त्याच्यावर पूर्णपणे विश्वास ठेऊ शकत नव्हते. पण जर राजूने रॉकीला नाही मारलं तर मग कोणी मारलं हा प्रश्न अजूनही अनुत्तरीतच होता आणि मारणाऱ्याचा हेतू तरी काय असावा? माणसं माणसाला मारतात. माणसा माणसात शत्रुत्व असत. पण त्या निष्पाप मुक्या प्राण्याशी कुणाचं शत्रुत्व असाणार. मुजुमादारांना काहीच सुचत नव्हतं. त्यांनी डोंगरेंना राजूला परत त्याच्या खोलीवर सोडायला सांगितलं. आता त्यांनी मालकाला परत आत बोलावलं. ते म्हणाले, “प्रकाश मी राजूची चौकशी केली. सध्यातरी मी त्याच्याबद्दल काहीच सांगू शकणार नाही आणि कायद्यानुसार पुराव्या अभावी त्याला अटकही करू शकणार नाही. रीतसर चौकशी होईल. पण तुझ्या रॉकीच्या गुन्हेगाराला मी लवकरात लवकर शोधीन असं मी तुला वचन देतो.” आता मालकाकडे अजून काही दिवस थांबण्या शिवाय काही पर्याय नव्हता. तो मुजुमदारांना म्हणाला, “ठीक आहे, पण मलातरी असचं वाटतय की खून राजूनेच केलाय. तू तुझ्या पद्धतीने चौकशी कर पण मी त्याला आत्ताच नोकरी वरुन काढून टाकतो आणि हाकलून लावतो.” “माझं मत असं आहे की तू तसं करू नयेस. उलट तू त्याच्याशी चांगल वाग, त्याला गाफील ठेव. मी माझे दोन विश्वासू सहकारी त्याच्या पाळतीवर ठेवतो. मला हे काम एखाद्या माथेफिरूचचं वाटतय आणि तो जर राजूच असेल तर फार दिवस शांत राहणार नाही. पुढच्या शिकारी साठी तो नक्की बाहेर पडेल आणि आपण त्याला रंगेहात पकडू.” इन्स्पेक्टर मुजुमदारांनी आपलं मत सांगितलं. मालकाला मुजुमदारांचं बोलणं पटलं.
राजूला खरंतर आता तिथं काम करायची बिलकुल इच्छा नव्हती. पण आपण जर इथून गेलो तर पोलिसांचा आपल्यावरचा संशय अजून वाढेल हे त्याला माहित होतं. आता त्याला परत कंपनीतलं काम दिलं गेल. कंपनीतला प्रत्येक जण आपल्याकडे संशयाने पाहतोय असं राजूला वाटायचं व त्यांच्या नजरा त्याला असह्य व्हायच्या.
इन्स्पेक्टर मुजुमदारांनी कॉनस्टेबल डोंगरे आणि कॉनस्टेबल साबळेंना राजूच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवायला सांगितलं होतं. सकाळपासून रात्रीपर्यंत तो काय करतो, कुठे जातो, तसेच रात्री तो काय करतो यावर बारीक लक्ष ते ठेवणार होते.
सकाळीच कॉनस्टेबल डोंगरे आणि साबळे कंपनीत आले. ते प्रत्येक कामगाराकडे राजूची चौकशी करत होते. पण बहुतेक कामगारांचं आणि सुपरवायजरच सुद्धा राजूबद्दलच मत चांगलच होतं. राजू चिनप्पा, बबलू आणि बाळू यांच्यासोबत एका खोलीत रहात असल्यामुळे या तिघांकडे ते जास्त डीटेलमध्ये चौकशी करणार होते. चौकशी आता सांपली होती. चिनप्पाकडून मिळालेल्या माहितीमुळे त्यांचा राजूवरचा संशय आणखीनच वाढला होता. मालकाच्या कुत्र्याची किळस येते आणि त्याचं अंगाशी करणं, लोचटपणा मला आवडत नाही असं तो मला एकदा बोलला होता असं चिनप्पाने पोलिसांना सांगितल होतं.
आता कॉनस्टेबल डोंगरेंनी नाईट ड्युटीवर असलेल्या दोन शिपायांना राजूच्या खोलीबाहेर थोड्या अंतरावर लपून रात्रभर त्याच्या खोलीवर नजर ठेवण्याची व तो रात्री अपरात्री खोलीतून बाहेर आल्यास लगेच कळवण्याची व त्याचा पाठलाग करण्याची सूचना दिली होती.
सलग चार दिवस त्या शिपायांनी एका झाडामागे बसून राजूच्या खोलीवर पहारा दिला होता. पण त्यांना कोणतीच संशयास्पद हालचाल आढळली नाही. पुढच्या दिवशी कॉनस्टेबल डोंगरे स्वतः त्यांच्या बरोबर आख्खी रात्र तिथे थांबले. पण अजूनही काहीच हालचाल झाली नव्हती. शेवटी त्यांनी इन्स्पेक्टर मुजुमदारांना कळवलं. मुजुमदारांनी त्यांना अधून मधून राजूवर लक्ष ठेवायला सांगितलं.
रॉकीची हत्या होऊन आता दहा दिवस झाले होते. पण अजूनही मारेकरी सापडला नव्हता. मालकाचा राग आता बऱ्यापैकी कमी झाला होता. राजूवर आपण उगीचच संशय घेतला असं वाटत होतं. पण त्याचं दुसरं मन राजूला निर्दोष मानायला अजूनही तयार नव्हतं. राजूच्या विरुद्ध जरी पुरावे सापडले नसले तरी तो पूर्णपणे निर्दोष सिद्ध झाला नव्हता.
इन्स्पेक्टर मुजुमदार चहा पीत होते. चहा पीत पीत ते समोर ठेवलेल्या वर्तमानपत्रातल्या बातम्या वाचत होते. पोलीस स्टेशनच्या दारातून राजूला आत येतांना पाहून ते अचंबित झाले. राजू आत येऊन उभा राहिला. “काय रे राजू आज इकडे कसा?” मुजुमदारांनी राजूला विचारलं. “साहेब रॉकीचा खुनी कोण आहे हे मला कळलय.” “काय?” मुजुमदार खुर्चीवरून ताडकन उभे राहिले. हातातला कप त्यांनी खाली ठेवला. “काय म्हणतोस तू? कोण आहे खुनी? ” त्यांनी विचारलं. त्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि कुतुहल एकाच वेळी दिसत होतं. “होय साहेब, चिनप्पा खुनी आहे.” “चिनप्पा म्हणजे तो तुमच्या कंपनीत काम करतो. तुझ्याबरोबर रूम मध्ये राहतो तो चिनप्पा?” “होय साहेब. ” “अरे पण कशाच्या आधारावर तू हे बोलतोयेस? तुझ्याकडे काही सबुत आहे का? ” “सर आज मी माझ्या डोळ्यांनी त्याला एका कुत्र्याचा खून करताना पाहिलं आहे.” “बरं सविस्तर सांग.” मुजुमदार म्हणाले. राजू सांगू लागला, “ज्या दिवशी प्रकाश साहेबांच्या कुत्र्याची हत्या झाली आणि मला साहेबांनी तुमच्यासमोर आणलं त्या दिवशी जेव्हा तुमच्या लोकांनी मला खोलीवर सोडलं. मी पाहिलं की चिनप्पाचे घरी घालायचे कपडे दोरीवर वाळत टाकले होते. ते थोडं विचित्रच होतं, कारण कालच सकाळी त्याने कपडे धुतले होते आणि आज परत त्याने ते कपडे धुवून वाळत टाकले होते. तो जेव्हा त्या रात्री खोलीवर आला तेव्हा त्याच्या बुटावर एक रक्ताचा डाग मला दिसला. मला तेव्हाच त्याच्यावर संशय आला. मी तुम्हाला सांगू की नको या विचारात होतो कारण आधीच तुमचा माझ्यावर संशय होता. मी दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर हे सगळं बाळूला सांगितलं. पण त्याने जेव्हा चिनप्पाचे बूट पाहिले तेव्हा त्यावर रक्ताचे डाग नव्हते. पुढचे काही दिवस मी झोपायचं नाटक केलं व चिनप्पावर लक्ष ठेवलं पण त्याने कोणतीच हालचाल केली नाही. काल रात्री मी झोपलो होतो, पण मला नीट झोप येत नव्हती. तरीही मी तसाच पडून राहिलो. थोड्यावेळाने मला दार उघडण्याचा आवाज आला. मी डोळे उघडून पाहिलं तर मला चिनप्पाची पाठमोरी आकृती बाहेर जातांना दिसली. मी उठलो, टॉर्च घेतली आणि खोली बाहेर आलो. चिनप्पा पुढे चालला होता. मीही त्याच्या मागे मागे जात होतो. तो पुढे डाव्या बाजूला वळला आणि एका झाडापाशी येऊन थांबला. त्याने त्या मोठ्या झाडाच्या ढोलीत हात घालून एक चाकू बाहेर काढला. आता मला खात्री झाली की हाच खुनी आहे. तो परत पुढे चालू लागला. मीही परत त्याच्या मागे चालू लागलो. त्याने एकदा मागे वळून पाहिले. मी लगेच एका गाडीमागे लपलो. बहुतेक त्याला संशय आला असावा कारण तो खूप जोरात चालू लागला. आता मी लपतछपत कसाबसा त्याच्या मागे जात होतो. पण त्याच्या पुढे माझा वेग कमी पडत होता. थोडा पुढे जाऊन तो उजव्या बाजूला वळला. मी ही त्या वळणापर्यंत आलो पण तो मला कुठेच दिसत नव्हता. मी थोडा निराश झालो आणि एका झाडामागे लपून बसलो. मी बराच वेळ तिथे थांबलो आणि कंटाळून शेवटी मी तिथून निघणार होतो तेवढ्यात एक आकृती मला समोरून येतांना दिसली. ती आकृती चिनप्पाचीच होती. चिनप्पा झपाझप पावले टाकत चालला होता. त्याच्या हातात रक्ताळलेला चाकू होता. त्याच्या चेहऱ्यावर असुरी, कू्र हास्य होतं. चेहरा घामाने डबडबला होता. थोडा वेळाने चिनप्पा दिसेनासा झाला. मी पुढे चालू लागलो. थोडा पुढे गेल्यावर मी डाव्या बाजूला वळलो. एका बंगल्यापाशी आल्यावर समोरचं दृष्य पाहून मला धडकी भरली. समोर एक दांडगं कुत्र मरून पडलं होतं. रॉकीच्या मानेवर जशी जखम होती तशीच जखम त्या कुत्र्याच्या मानेवर होती. त्यातून रक्त वाहत होत. मी थेट खोलीवर परत गेलो. पण तिथे चिनप्पा अजूनही आला नव्हता. मला जेव्हा सकाळी जाग आली तेव्हा मला चिनप्पा झोपलेला दिसला पण त्याच्या अंगावरचे कपडे वेगळे होते.”
राजू पुढे काही बोलायच्या आत एक स्थूल माणूस धावतच पोलीस स्टेशनमध्ये शिरला. त्याचे केस पांढरे होते व तो साधारण पन्नास ते साठ वयाचा असणार असे त्याच्याकडे बघून वाटत होतं. तो खूप चिडलेला दिसत होता. तो म्हणाला, “इन्स्पेक्टर मला एफ आय आर नोंदवायचा आहे.” “तुमच्या केसचे डीटेल्स सांगा.” “आज मी सकाळी उठून बाहेर बागेत आलो तर गेटपाशी माझं कुत्रं मरून पडलेले दिसलं. त्याच्या मानेवर जखम होती. कोणीतरी धारधार शस्त्राने त्याचा खून केलाय. मला खात्री आहे हे काम समोरच्या रस्त्यावर बसणाऱ्या भिकाऱ्याचं आहे.” “भिकारी” शब्द ऐकताच राजूला खूप राग आला. पण त्याने स्वतःला कसंबसं सावरलं. तो माणूस पुढे बोलू लागतो, “आम्ही एवढी महागडी कुत्री आणायची आणि हे भिकारडे, भुरटे, चोर साले, बघून घेईन मी एकेकाला.” या माणसाला कुत्र मेलं यापेक्षा ते महागडं होतं आणि आपले पैसे वाया गेले याचं दुःख जास्त होतं. इन्स्पेक्टर मुजुमदार त्या माणसाला म्हणाले, “तुमच्या कुत्र्याचा खुनी आम्हाला लवकरच सापडेल. थोड्याच वेळात मी तुमच्या बंगल्यापाशी येतो.” मुजुमदार कॉनस्टेबल डोंगरेंना बरोबर घेऊन निघाले. ते त्या बंगल्यापाशी आले. बंगल्याच्या गेट समोरच ते कुत्र मरून पडलं होतं. राजू सांगत होता त्याप्रमाणेच ही जखम देखील रॉकीच्या मानेवरील जखमेप्रमाणेच दिसत होती. ते परत पोलीस स्टेशनमध्ये आले. त्यांनी फोटोज राजूला दाखवले. राजूनेही ते फोटो ओळखले. त्याने रात्री पाहिलेलचं ते कुत्र होतं.
इन्स्पेक्टर मुजूमदारांनी चिनप्पाला रंगेहात पकडायंच ठरवलं. त्यांनी एक प्लॅन बनवला. काही दिवस दोन शिपायी राजूच्या खोलीजवळ लपून रात्री लक्ष ठेवणार होते. राजू देखील पुढचे काही दिवस रात्री झोपायचं नाटक करून चिनप्पावर लक्ष ठेवणार होता. चिनप्पा घरातून बाहेर पडताच राजू आणि स्वत: इन्स्पेक्टर मुजुमदार त्याचा पाठलाग करून त्याला रंगेहात पकडणार होते.
पहिले तीन चार दिवस काहीच हालचाल झाली नाही. मात्र पाचव्या दिवशी रात्री दोन वाजायच्या दरम्यान राजूला दार वाजल्याचा आवाज आला. त्याने समोर पहिले तर त्याला चिनप्पा बाहेर पडतांना दिसला. त्याने लगेच इन्स्पेक्टर मुजुमदाराला फोन लावला व चिनप्पा खोलीतून बाहेर पडल्याचं सांगितल. तसेच चिनप्पा बाहेर येताच समोरच्या झाडामागे लपलेल्या दोन शिपायांनाही तो दिसला. ते हळूहळू लपत छपत त्याच्या मागे जाऊ लागले. तो पुढे जात होता. दोन खून करून देखील पोलीस आपल्याला पकडू शकले नाहीत या प्रकाराने त्याच्यात एक बिनधास्तपणा आला होता. तो आपल्याच तंद्रीत पुढे जात होता. मुजुमदार आता राजूच्या खोलीपाशी आले होते. ते आणि राजू आता गाडीतून निघाले. तिकडे ते दोन शिपाई अजूनही चिनप्पाच्या मागावर होते. तो मोठ्या झाडापाशी आला आणि त्याने झाडाच्या ढोलीतून चाकू बाहेर काढला. एका गाडीमागे लपलेल्या शिपायाने मुजुमदारांना फोन लावला आणि चिनप्पाच्या लोकेशनची माहिती दिली. चिनप्पा एका हातात चाकू घेऊन पुढे पुढे चालला होता. दोन तीन वेळा त्याने रस्ते बदलले आणि एका कॉलनीपाशी येऊन तो थांबला. दोघे शिपाई सुद्धा त्याच्यापासून थोड्या अंतरावर एका गाडीच्या मागे लपले होते. त्यातील एकाने फोन करून लोकेशन कळवलं. थोडा वेळ चिनप्पा तिथेच थांबला होता. तो काहीतरी विचार करत होता. त्या कॉलनीत बरेच मोठेमोठे बंगले होते. काही बंगल्यांच्या गेटपाशी वॉचमन होते तर काही बंगल्यात फक्त कुत्री बांधली होती. बराच वेळ विचार केल्यावर चिनप्पा एका बंगल्याच्या दिशेने चालू लागला. त्या बंगल्याच्या गेटपाशी वॉचमन नव्हता. एक मोठ कुत्र दारात झोपलं होतं. त्या बंगल्याच्या आजूबाजूच्या बंगल्यांमध्ये सुद्धा एकही वॉचमन नव्हता. म्हणूनच चिनप्पाने तो बंगला निवडला होता. तो बंगल्याच्या गेटपाशी येऊन थांबला. आता मुजुमदार आणि राजू देखील तिथे पोहोचले. ते त्या बंगल्या जवळच्याच एका झाडाच्या मागे उभे राहून चिनप्पाकडे पाहत होते. चिनप्पाने त्याच्या खांद्यावरच्या पिशवीतून एक स्प्रेची बाटली काढली. आणि तो गेटजवळ गेला. त्याच्या पायाचा धक्का गेटला लागला आणि आवाज झाला. आवाजाने आत झोपलेल्या कुत्र्याला जाग आली आणि त्याने समोर उभ्या असलेल्या चिनप्पाला पाहून भुंकायला तोंड उघडलं तेवढ्यात चिनप्पाने तो स्प्रे त्या कुत्र्याच्या नाकावर मारला. तत्क्षणी कुत्र बेशुद्ध झालं. चिनप्पा गेटवर चढणार होता तेवढ्यात मुजुमदार त्याच्यासमोर आले. चिनप्पाने पळायचा प्रयत्न केला पण दुसऱ्या बाजूला गाडीमागे लपलेले शिपाई धावून आले आणि त्यांनी चिनप्पाला पकडले. चिनप्पाने स्वतःला सोडवून घ्यायचा खूप प्रयत्न केला पण शिपायांच्या मजबूत पकडीमुळे त्याचा प्रयत्न निष्फळ ठरला आणि शेवटी त्याने शरणागती पत्करली.
शिपायांनी त्याला गाडीत ढकललं व त्याच्या दोन बाजूला दोन शिपाई त्याला धरून बसले. गाडी पोलीस स्टेशनपाशी आली. चिनप्पा रंगेहात पकडला गेला होता. त्यामुळे आता लपवण्यात काहीच अर्थ नव्हता. आत आल्यावर मुजुमदारांनी त्याला प्रश्न विचारायला सुरुवात केली. त्यांनी चिनप्पाला विचारलं, “बोल, प्रकाशच्या कुत्र्याला का मारलंस?” चिनप्पा सांगू लागला, “साहेब खरं तर माझा सगळ्याच कुत्र्यांवर राग आहे. काही वर्षांपूर्वी माझ्या आयुष्यात एक दुर्दैवी घटना घडली, तेव्हापासून माझ्या मनात कुत्र्यांबद्दल राग आहे. माझा भाऊ जवळच्या एका घरात घरगडी म्हणून काम करायचा. मालक खूप श्रीमंत होता. त्याच्याकडे दोन तीन महागड्या गाड्या होत्या. तसेच चार कुत्री त्याने पाळली होती. सर्वच कुत्री चांगली उंच आणि दांडगी होती व तितकीच रागीट होती. माझा भाऊ तिथे ड्रायव्हर, माळी म्हणून काम करायचा तसेच कुत्र्यांना फिरवून आणणे, त्यांच्या खाण्यापिण्याचं पाहणं ही कामं सुद्धा तो करायचा. एक दिवस माझ्या दोन वर्षाच्या मुलाला तो आपल्या बरोबर घेऊन गेला. त्याने कुत्र्यांना मोकळं केलं आणि त्यांच्या समोर डॉगफूड ठेवलं. माझा मुलगा पायरीवर बसला होता. त्याचे लक्ष त्या कुत्र्यांकडे गेलं. भूभू भूभू म्हणत तो त्या कुत्र्यांकडे गेला. पाणी आणायला माझा भाऊ आत गेला होता. कुत्री खाण्यात मग्न होती. माझ्या मुलाने एका कुत्र्याच्या डोक्यावरून हात फिरवला तेव्हा ते कुत्रं चिडलं आणि त्याने माझ्या मुलाचा हात तोंडात पकडला. माझा मुलगा जोरात ओरडला. त्याचा आवाज ऐकून माझा भाऊ बाहेर आला पण तो काहीच करू शकला नाही. तो तिथे पोहचेपर्यंत त्या क्रूर, रानटी कुत्र्यांनी माझ्या कोवळ्या बाळाचे हाल केले होते. त्याच्या इवल्याश्या शरीरातून जीव केव्हाच निघून गेला होता.” चिनप्पा भावनाविवश झाला होता. तो पुढे बोलू लागला, “आम्ही पोलिसांकडे गेलो पण पोलिसांनी आम्हाला दारात उभं देखील केलं नाही. कुत्रा हा प्राणीच माझ्या मनातून उतरला होता. खासकरून श्रीमंतांच्या घरातील कुत्री. मी बदला घ्यायचं ठरवलं. थोड्याच दिवसांत मी एक प्लान केला आणि ज्या कुत्र्यांनी माझ्या मुलाला हालहाल करून मारलं होतं त्या कुत्र्यांना मारायचं मी ठरवलं. पण मी काही करायच्या आतच घरमालकाने ती कुत्री विकली होती. पण माझं मन शांत होत नव्हतं. बदल्याच्या आगीत मी पेटून उठलो होतो. बाहेर एखाद्या बंगल्याच्या बाहेर कुत्रं बांधलेलं पाहिलं की रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या माझ्या मुलाचं कोवळं शरीर आठवायचं आणि माझं रक्त उसळायचं. माझे हात शिवशिवायचे. अस वाटायचं की जावं आणि त्या कुत्र्याचा गळा चिरावा. मी खूप वेळा प्लान बनवायचो पण सापडले जाऊ अशी भीती वाटायची. खूप वर्षानंतर मला तो चान्स मिळाला. जेव्हा मालकाने राजूला घरकाम करायला सांगितलं आणि राजूने मला मालकाच्या कुत्र्याबद्दल सांगितलं व कसं त्याला मालकाच्या कुत्र्याची कीळस येते हे पण सांगितलं. मालक राजूवर संशय घेणार हे मला माहित होतं कारण त्याच दिवशी मी राजू जे काही कुत्र्याबद्दल बोलला होता ते मालकाच्या कानावर घातलं होतं. तेव्हा मालकानं मला फारसं सिरीयसली नाही घेतलं. पण सगळं काही प्लानप्रमाणे झालं. आज मी त्याच पद्धतीने त्या कुत्र्याला संपवलं असतं ज्याप्रमाणे मी त्यादिवशी मालकाच्या कुत्र्यालाही मारलं होतं. पण आज तुम्ही तिथे असाल असं स्वप्नातदेखील मला वाटलं नव्हतं. मालकाच्या कुत्र्याला मारल्यावर एक प्रकारचा आनंद मला झाला होता जो यापूर्वी मला कधीच झाला नव्हता. माझा मुलगा जणू काही वरून पाहतोय आणि आनंदाने हसतोय असं मला वाटलं होतं. त्याचे चिमुकले हसरे ओठ मला दिसत होते.” हे सगळ बोलतांना चिनप्पा वेगळ्याच जगात असल्या सारखा वाटत होता. त्याने त्याचा गुन्हा कोर्टात देखील कबूल केला. आय पी सी च्या कलम ४२८ अंतर्गत दोन पाळीव कुत्र्यांची हत्त्या केल्याच्या प्रकरणी चिनप्पाला पाच वर्ष तुरुंगवासाची शिक्षा देण्यात आली.
११
डॉ. राजेंद्र भिडे आपल्या केबिन मध्ये बसले होते. थोड्याच वेळात ते एक ऑपरेशन करणार होते. आज मुंबई मध्ये त्यांचं स्वत:च एक हॉस्पीटल होतं. मुंबई, पुणे, बँगलोर सारख्या शहरांमध्ये त्यांचे कित्त्येक बंगले आणि जमिनी होत्या. नोकर चाकर सर्वकाही होते. तरीसुद्धा एकटेपणा त्यांना त्रस्त करत होता. वीस वर्षांपूर्वी घडलेल्या त्या दुर्दैवी घटनेमुळे त्यांचं आयुष्य बदललं होतं. हो हे तेच राजेंद्र भिडे जे नरसोबाच्या वाडीला दत्ताच्या दर्शनाला गेले असता त्यांचा एक वर्षाचा मुलगा हरवला आणि परत मिळालाच नाही. तेव्हा डॉक्टर आणि त्यांची पत्नी सरिता भिडे या दोघांनाही नैराश्याने ग्रासलं. डॉक्टरांनी कसं बसं स्वतःला सावरलं पण सरिता भिडे मात्र नैराश्यातून बाहेर येऊ शकल्या नाहीत. जसे जसे दिवस जात होते तसे तसे त्यांचं मानसिक संतुलन बिघडत होतं. तशा त्या नीट वागायच्या पण मधूनच डॉ. राजेंद्रकडे जाऊन “मला माझा मुलगा पाहिजे, माझा मुलगा परत आणून द्या” असा हट्ट करायच्या. एखाद्या लहान मुलाप्रमाणे हट्ट करायच्या. अख्खं घर डोक्यावर घ्यायच्या. रस्त्यावर एखादं लहान मुल दिसताच जणू आपलंच मुल असल्याप्रमाणे कडेवर घ्यायच्या. बायकोच्या अशा या वागण्यामुळे डॉक्टरांना खूपच त्रास होत होता. मानसोपचार तज्ञाचे उपचार चालू होते. पण त्याचा फारसा परिणाम सरितावर होताना दिसत नव्हता. शेवटी सरिताला मेंटल हॉस्पिटल मध्ये भरती केलं गेलं. डॉ. राजेंद्रना फार वाईट वाटत होतं. आधीच त्यांनी मुलालाही गमावलं होतं आणि आता बायकोही दूर गेली. त्यांना आता खूप एकटं एकटं वाटत होतं. आता ते स्वतःचं मन कामात रमवत होते. दिवसातले सोळा तास ते कामात व्यस्त असत. एक प्रथीतयश सर्जन असा त्यांचा लौकीक पूर्ण मुंबईत झाला होता. हॉस्पिटलची नोकरी सोडून त्यांनी स्वतःचं हॉस्पिटल काढायचं ठरवलं. स्वतःच्या मुलाचं नाव त्यांनी हॉस्पिटलला दिलं, अमर्त्य हॉस्पिटल. थोड्याच वर्षात अमर्त्य हॉस्पिटल मुंबईतल्या टॉप हॉस्पिटल पैकी एक बनलं. डॉक्टर अधूनमधून मेंटल हॉस्पिटलमध्ये जाऊन सरिताला भेटत असत. अजूनही तिच्या वागण्यात काही बदल झाला नव्हता. अमर्त्यची आठवण आली की ती त्याचे जुने फोटो पाहत असे. आपला मुलगा परत कधीतरी आपल्याला भेटेल अशी वेडी आशा त्यांना अजूनही होती. आज तब्बल वीस वर्षानंतर त्यांचं वय जरी पन्नासच्या आसपास असलं तरी ते साठच्या पुढचे वाटत. आता त्यांच्या डोक्यावर थोडेच केस उरले होते. तेही पांढरे झाले होते. चेहऱ्यावर सुरकुत्या दिसत होत्या.
डॉक्टरांनी ऑपरेशनची तयारी केली आणि ऑपरेशनरूम कडे निघाले. तब्बल तीन तास ऑपरेशन चाललं. ऑपरेशन संपून ते परत केबिनमध्ये आले व त्यांनी कंपाउंडरला विचारले, “कुणाचा फोन वगैरे आला होता का?” “जी सर, इन्स्पेक्टर मुजुमदारांचा आला होता.” “काय म्हणाला विकास?” “अर्जंट काम आहे असं म्हणाले.” “ठीक आहे. तू जा” एवढे बोलून त्यांनी मुजुमदारांना फोन लावला. इन्स्पेक्टर मुजुमदार आणि डॉ राजेंद्र अगदी शाळेपासूनचे मित्र. मुजुमदारांनी फोन उचलला. “डॉक्टर साहेब किती वेळा फोन केला तुम्हाला.” डॉक्टर म्हणाले, “साहेब कधीपासून म्हणायला लागला मला.” “बर बाबा राजूच म्हणीन.” “अरे तुझ्याकडे एक काम होतं. एका फॅक्टरीत काम करणाऱ्या कामगाराने एका गुन्हेगाराला जो त्याचाच सहकारी होता त्याला पकडून दिलंय. त्याचा सत्कार आम्ही करणार आहोत, तर त्याचा सत्कार तुझ्याहातून व्हावा अशी माझी इच्छा आहे आणि विशेष म्हणजे त्या कामगाराचे नाव सुद्धा राजूच आहे. त्यामुळे जर तू त्याचा सत्कार केला तर राजूचा सत्कार राजूच्या हातून होईल.” आपल्याकडून झालेल्या शाब्दीक कोटीचं डॉक्टरांनाही कौतुक वाटलं आणि ते हसले. “अरे मलाही आवडले असते पण पुढचा पूर्ण आठवडा मी खूप बिझी आहे” डॉ. राजेंद्र म्हणाले. “आपल्याला काही गडबड नाही. तुला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा सांग. त्या दिवशी आपण सत्कार समारंभ घेऊ.”
“ठीक आहे पुढच्या आठवड्यात बुधवारी मी फ्री आहे”. “बरं मग मी ती तारीख ठरवून टाकतो.” “चालेल फक्त एकदा मला आठवण कर.” एवढे बोलून डॉक्टरांनी फोन ठेवला आणि परत ते आपल्या कामाला लागले.
एकदाचा बुधवार उजाडला. मुजुमदारांनी सत्कार समारंभाची सगळी सोय अगदी चोख केली होती. समारंभ सुरु होण्याची वेळ झाली. व्यासपीठावर पोलीस कमिशनर, जिल्ह्याचे कलेक्टर, असिस्टंट कमिशनर तसेच महापालिकेतील काही माननीय व्यक्ती असे उच्च पदस्थ बसले होते. खाली मुंबई पोलीसचे इतर कर्मचारी तसेच काही सामान्य नागरिक बसले होते. पुढच्या रांगेत राजू, बबलू, बाळू तसेच इतर काही कामगार बसले होते. फॅक्टरीचा मालक प्रकाश ही तिथे होता. समोर काही पत्रकार हातात कॅमेरा घेऊन उभे होते. डॉक्टरांची खुर्ची अजूनही रिकामीच होती. थोड्याच वेळात डॉक्टरांची मर्सीडीज तिथे आली. गाडीतून डॉक्टर उतरले आणि थेट व्यासपीठावर आले. व्यासपीठावरील मान्यवरांसोबत हस्तांदोलन करून ते आपल्या जागेवर बसले. इन्स्पेक्टर मुजुमदार व्यासपीठावरच उभे होते. ते आता माईकवरून बोलू लागले, “आदरणीय कलेक्टर साहेब जगदीश मेहंदळे, मुख्य पोलीस निरीक्षक जयसिंघ यादव, अमर्त्य हॉस्पिटलचे सर्वेसर्वा डॉक्टर राजेंद्र भिडे साहेब यांनी त्यांच्या कामातून वेळ काढून आजच्या कार्यक्रमाला उपस्थिती दिल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. तसेच इतर मान्यवरांचे ही आभार. तर आज आपण इथे अशा एका व्यक्तीच्या सन्मानासाठी जमलो आहोत, ज्याच्या चाणाक्ष बुद्धीमुळे आणि त्याने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे आज आम्हाला एका अतिशय धोकादायक गुन्हेगाराला पकडण्यात यश आले. राजूने जी कामगिरी केली ती खरच अविस्मरणीय आहे. पोलीस खात्याला राजूसारख्या धाडसी तरुणांची गरज आहे. त्याच्या या कामगिरीबद्दल सगळ्या पोलीस डिपार्टमेंटच्या वतीने त्याचे आभार मानतो आणि त्याला स्टेजवर येण्याची विनंती करतो.”
राजू उठला आणि स्टेजवर आला. तो खूप खुश होता, पण थोडासा संकोच त्याच्या चेहऱ्यावर दिसत होता. एवढ्या लोकांसमोर बोलण्याची त्याची पहिलीच वेळ होती.
इन्स्पेक्टर मुजुमदार पुढे बोलू लागले, “डॉक्टर राजेंद्र भिडे साहेबांना मी विनंती करतो की त्यांनी श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन राजूचा सत्कार करावा.” डॉक्टर उठले. डॉक्टरांनी आधी नारळ आणि नंतर पुष्पगुच्छ राजूच्या हाती दिला. राजूने नारळ आणि पुष्पगुच्छ समोरच्या टेबलावर ठेवला आणि खाली वाकून डॉक्टरांच्या पाया पडल्या. त्याने टेबलावरचे नारळ व पुष्पगुच्छ उचलले व तो पाठमोरा झाला. डॉक्टरांनी त्याच्याकडे पाहिले आणि एखादी हरवलेली गोष्ट परत मिळाल्यासारखा त्यांचा चेहरा प्रफुल्लित झाला. डॉक्टर घरी आले. त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक आली होती. त्यांच्या घरातील गडी माणसांना आणि नोकरांनाही हा त्यांच्यात झालेला बदल दिसत होता. त्यांनी कित्येक दिवसांनंतर डॉक्टरांना असं हसताना पाहिलं होतं. घरी येताच ते थेट आपल्या खोलीत गेले. त्यांनी जुन्या फोटोचे अल्बम काढले आणि अमर्त्यचे फोटो पाहू लागले आणि एका फोटोवर डॉक्टरांची नजर स्थिरावली. त्या फोटोत सरिताने अमर्त्यला कडेवर घेतले होते. अमर्त्यच्या मानेवरच्या त्या ठळक उठावदार तीळाने त्यांचे लक्ष वेधून घेतले. तसाच तीळ त्यांना राजू पाया पडत असताना त्याच्या मानेवर दिसला होता. राजूच्या मानेवर उजव्या बाजूला थोडसं खाली तीळ होता अगदी तसाच. जसा त्या फोटोत अमर्त्यच्या मानेवर दिसत होत. त्यांच्यातली आशा आता जागी झाली होती. जणू काही आपला हरवलेला मुलगा अमर्त्य परत मिळाल्याच्या आनंदात त्यांनी इन्स्पेक्टर मुजुमदारांना फोन लावला. इन्स्पेक्टरनी फोन उचलला आणि थोडं चिडून म्हणाले, “अरे राजू ही काय वेळ आहे का फोन करायची. रात्रीचे बारा वाजलेत, झोपू तरी दे मला.” “अरे, मला माझा मुलगा मिळालाय.” “काय बोलतोयस राजू? तुझं तुला तरी कळतंय का?” “अरे मी खरंच सांगतोय. माझा मुलगा म्हणजे राजूच ज्याचा मी आज सत्कार केला.” “डॉ राजेंद्र हे ऐकण्याची माझ्यात ताकद नाही आणि मला खूप झोप येतेय. हवंतर आपण उद्या बोलू. मी झोपतो आता.” “कृपा करून फोन नको ठेवूस. माझं ऐकून तरी घे.” “बर बोल बाबा”, मुजुमदार चिडलेल्या सुरात म्हणाले. डॉक्टर सांगू लागले, “काल जेव्हा मी राजूला नारळ व पुष्पगुच्छ दिला तेव्हा राजू माझ्या पाया पडला व जाण्यासाठी वळला तेव्हा मला त्याच्या मानेवरचा तीळ दिसला, अगदी तसाच तीळ अमर्त्यच्या मानेवर सुद्धा होता. तेवढंच नाही राजूचा चेहरा सुद्धा मला सरिताच्या चेहऱ्यासारखा वाटला आणि तू जर नीट पाहिलंस तर तुझ्यापण लक्ष्यात येईल की तो बऱ्यापैकी माझ्यासारखाच चालतो.” “मुलाच्या विरहामुळे तुला धक्का बसलाय आणि इतकी वर्ष होऊन देखील तू अजून या धक्क्यातून सावरलेला नाहीस, म्हणून तुला असे भास होतात.” “भास नाही मी खरच पाहिलाय राजूच्या मानेवर तीळ. डीएनए टेस्ट करायला देखील मी तयार आहे.” “आतापर्यंत तू चार मुलांच्या डीएनए टेस्ट करायला लावल्यास आणि चारीही चुकीचे निघाले. तुझ्या पदाला, तुझ्या सारख्या सर्जनला असं वागणं शोभत नाही. काढून टाक हा विचार मनातून.” “कृपा करून असं बोलू नकोस. बापाचं मन आहे माझं, ही शेवटची संधी दे मला. मला खात्री आहे यावेळी टेस्टचा रिझल्ट पॅासीटीव्ह येईल.” “बरं. तू काही ऐकायचा नाहीस. मी आधी राजूची चौकशी करतो. आपल्याला डीएनए टेस्टसाठी राजूचीही परवानगी घ्यावी लागेल. मग आपण टेस्ट करू. आतातरी झालं का तुझं समाधान?” “हो रे बाबा झालं माझं समाधान. पण जे काही आहे ते लवकरच कळव मला म्हणजे झालं.” एवढं बोलून डॉक्टरांनी फोन ठेवला. आता त्यांना शांत झोप लागली.
दुसऱ्या दिवशी इन्स्पेक्टर मुजुमदारांनी राजूला पोलीस स्टेशन मध्ये बोलावलं. राजू थोड्याच वेळात स्टेशनमध्ये हजर झाला. आपल्याला इन्स्पेक्टर साहेबांनी का बोलावलं हे राजूला कळत नव्हतं. मुजुमदार राजूला म्हणाले, “मला तुझ्याकडून काही माहिती हवी आहे.” “विचाराना साहेब” राजू म्हणाला. “तुझ्या आई वडीलांच नाव काय?” राजू म्हणाला, “आईच नाव रखमा आणि वडीलांचं नाव राम्या. पण आता ते दोघेही नाहीत. आई काही वर्षांपूर्वी वारली आणि वडील मी लहान असतानाच वारले.” “तू लहान असताना तुम्ही कुठे राहायचा आणि तुझे आईवडील काय काम करायचे?” मुजुमदारांनी विचारले. “आम्ही कोल्हापूरच्या जवळच शिंगणापूर नावाच्या गावात झोपडपट्टीत राहायचो. माझे आईवडील आधी देशी दारूच्या दुकानात काम करायचे. सगळं व्यवस्थित चालू असताना एका गुंडाने माझ्या बापाचा खून केला. माझ्या आईने पुढचे काही दिवस दारूच्या दुकानातच काम केलं पण तिथे तिचं मन रमेना शेवटी तिने भिक मागण्याचा निर्णय घेतला. ती रोज अंबाबाईच्या देवळाबाहेर बसून भिक मागायची. थोडे दिवस मी पण तिच्या बरोबर जायचो. पण काही दिवसातच तिने मला शाळेत घातले. खूप कष्टानं तिने मला वाढवलंय.” राजूच्या डोळ्यात पाणी होतं.
इन्स्पेक्टर मुजुमदारांनी सगळं ऐकून घेतलं. थोडा वेळ शांततेत गेला. आता मुजुमदार राजूला म्हणाले, “जर तुला कोणी सांगितलं रखमा आणि रामू तुझे खरे आईवडील नाहीत तर तुला काय वाटेल?” राजू ताडकन खुर्चीवरून उठला आणि म्हणाला, “तुम्ही हे काय बोलताय इन्स्पेक्टर साहेब?” “आधी तू शांत हो. तुला सगळं सांगतो.” इन्स्पेक्टर मुजुमदार शांतपणे राजूला म्हणाले. राजू खाली बसला. मुजुमदार बोलू लागले, “काल रात्री मला डॉ राजेंद्र भिडेंचा फोन आला होता. त्याचं असं म्हणणं आहे की तू त्यांचा मुलगा आहेस.” राजूचा आपल्या कानांवर विश्वासच बसत नव्हता. तो म्हणाला, “हे कसं काय शक्य आहे? रखमा आणि रामूच माझे आईवडील आहेत.” “मला माहित आहे तुझा यावर विश्वास बसणं अवघड आहे. पण मी तुला डॉक्टरांची गोष्ट सांगतो.” राजू ऐकत होता. मुजुमदार पुढे बोलू लागले. त्यांनी डॉक्टरांना कसं मुल होत नव्हतं, मुल होण्यासाठी केलेला नवस, मुल झाल्यावर नवस फेडण्यासाठी बाळाला घेऊन नरसोबाच्या वाडीला आले, तेव्हा त्यांचं बाळ हरवलं तिथपासून काल डॉक्टरांनी त्याच्या मानेवरचा तीळ पाहिला व कसा त्यांच्या बाळाच्या मानेवरचा तीळ तसाच होता हे सगळं मुजुमदारांनी राजूला सांगितलं. तसेच डॉक्टरांची डीएनए टेस्ट करायची इच्छा आहे, हे देखील सांगितलं. राजू हे सगळ ऐकून सुन्न झाला होता. त्याला काहीच सुचत नव्हतं. साहेब मला थोडा वेळ द्या एवढं बोलून राजू तिथून निघाला.
राजू खोलीवर पोहचला. त्याला मोठं कोडं पडलं होतं. जर मी रखमा आणि रामूचा मुलगा नाही तर मी लहानपणापासून त्यांच्या घरात कसा वाढलो? रखमाने स्वतः भिक मागून आपल्याला वाढवलं. आपल्याला कशाचीच कमी पडू दिली नाही. मग ती आपली आई नाही हे कसं शक्य आहे. आपल्या मानेवर जसा तीळ आहे तसाच तीळ डॉक्टरांच्या बाळाच्या मानेवर होता. पण कित्येक लोकांच्या मानेवर तीळ असतो. पण एवढे मोठे डॉक्टर साहेब उगाच कशाला असं म्हणतील. कदाचित त्यांच्या मुलाच्या विरहामुळे त्यांच्या मनावर परिणाम झाला असेल. अशा अनेक विचारांनी त्याच्या मनात काहूर माजलं होतं. पण शेवटी त्याने डीएनए टेस्ट करण्याचा निर्णय घेतला. राजूने मुजुमदारांना डीएनए टेस्ट करण्याचा निर्णय कळवला.
राजूशी झालेलं बोलणं मुजुमदारांनी डॉक्टरांना सांगितलं होतं. तसेच तो डीएनए टेस्ट करण्यासाठी तयार असल्याचं सांगितलं. डॉक्टर खूप खुश झाले. डॉक्टरांचं बाळ नरसोबाच्या वाडीलाच हरवलं होतं व राजूने सांगितल्याप्रमाणे तो लहानपणी कोल्हापुरलाच राहायचा. कोल्हापूर नरसोबाच्या वाडीपासून फार लांब नाही. त्यामुळे डॉक्टरांचा विश्वास जास्तीच दृढ झाला होता.
डीएनए टेस्ट झाली. रिपोर्ट पॅासीटीव्ह आले होते. डॉक्टर राजेंद्र भिडे आणि राजू म्हणजेच अमर्त्य त्यावेळी मुजुमदारांच्या केबिन मध्ये होते. डीएनए टेस्ट अचूक आलीये हे कळताच डॉक्टरांच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. ते आता केवळ उभे राहून नाचायचे बाकी होते. राजू मात्र अजूनही आपल्या विचारातच गुंतला होता. रखमा आणि रामू आपले खरे आईवडील नाही ही गोष्ट त्याला सहन होत नव्हती. थोड्या वेळाने डॉक्टर भानावर आले. केवळ आपल्या निष्काळजीपणामुळे राजू आपल्यापासून दुरावला हे त्यांच्या लक्षात आलं होतं. डॉक्टरांची मुद्रा आता गंभीर झाली होती. ते राजूकडे पाहून म्हणाले, “केवळ माझ्या निष्काळजीपणामुळे तुला खूप भोगायला लागलं, खरंतर मी तुझा गुन्हेगार आहे. मला माफ कर बाळा”. डॉक्टर राजू समोर हात जोडून उभे होते. थोड्यावेळाने राजू बोलू लागला, “तुम्ही माफी मागायची काही आवश्यकता नाही. खरंतर तुमच्या निष्काळजीपणामुळेच मला गरिबी अनुभवता आली. गरिबी किती भयानक गोष्ट आहे हे मला समजलं.” “मग मला तुझा वडील म्हणून स्विकार करशील?” या प्रश्नाचं राजू काय आणि कसं उत्तर देतो हे पाहण्यासाठी मुजुमदारही उत्सुक होते. “माझी एक अट आहे” राजू म्हणाला. “बोल, तुझी एक काय हजार अटी मान्य आहेत मला.” “जर तुम्ही तुमच्या संपत्तीतील ९० टक्के भाग गोरगरिबांसाठी खर्च करण्यास तयार असाल तर मी तुमचा वडील म्हणून स्विकार करेन” हे ऐकून डॉक्टरांनी राजूला एकदम मिठी मारली. इतक्या मोठ्या मनाचा मुलगा आपल्याला दिल्याबद्दल त्यांनी मनोमन देवाचे आभार मानले. थोडयावेळात भावनावेग ओसरला. “चल आता आपण तुझ्या आईला भेटूयात. कदाचित तुला तिची अवस्था पहावणार नाही. पण देवाच्या मनात असेल तर तुला पाहून ती कदाचित बरी देखील होईल.” डॉक्टर राजूला म्हणाले आणि ते तिथून निघाले. त्यांच्या पाठोपाठ राजूही निघाला. मुजुमदारांनी बाप लेकाच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहिले आणि ते गालातल्या गालात हसले. राजूची म्हणजेच अमर्त्यची चालायची पद्धत अगदी डॉक्टरांसारखीच होती.
निरंजन कुलकर्णी
*** समाप्त ***
छान लिहिलंय. अगदी एखाद्या
छान लिहिलंय. अगदी एखाद्या चित्रपटाप्रमाणे उलगडत गेलं. चित्रदर्शी, भावस्पर्शी आहे कथा. खूपच आवडली.
छान आहे कथा .
छान आहे कथा .
Thanks
Thanks
साने गुरुजींच्या गोष्टीसारखी
साने गुरुजींच्या गोष्टीसारखी आहे गोष्ट.
एखाद्या राजेंद्र कुमार च्या चित्रपटाप्रमाणे.
कथा लिहिली खूप छान आहे. पण
कथा लिहिली खूप छान आहे. पण मोठ्या मनाचा माणूस कोण?