चाळीतील गमती-जमती (१४)

Submitted by राजेश्री on 15 May, 2018 - 02:27

चाळीतल्या गमती-जमती(१५)

आमच्या पलीकडे इंदू आज्जी राहत असल्याने आमच्या घरी शेजारची लहान मूल जमून त्यांच्या हसण्या खिदळण्यावर बंधने आली होती.पाण्याबद्दलच तीच धोरणही जाचक असच होत.या ना त्या कारणाने तिच्या तोंडाचा पट्टा अखंड चालू असायचा.मला जे निमित्त मिळेल तिथे म्हातारीला धडा शिकवावा असे विचार मनात येत राहायचे.पण घरात मम्मीचा धाक होताच.माझे नाव कुठेही पिक्चर मध्ये न येता मला म्हातारीला सळो की पळो करून सोडायचं होत.एक दिवस तसे निमित्त मिळाले.
झालं हे की,गणेशचतुर्थी असली आणि आकाशात चंद्र उगवू लागला की मम्मी म्हणायची आत चला,चंद्राचे तोंड नका बघू.मी का विचारल्यावर मम्मीने ती मला चंद्र आणि गणपतीची कथा सांगितली होती..गणपती पृथ्वीकडे उंदरावर बसून जात असताना पडले आणि चंद्र हासू लागला,मग गणपती क्रोधीत होऊन चंद्राला शाप देतात की आज पासून तुझं तोंड कुणीच बघणार नाही.मग चंद्र रडू लागतो, गणपतीची करुणा भाकतो मग गणपती उ:शाप देतात, दर महिन्याच्या संकष्टीला तुझं तोंड बघूनच माझा उपवास पृथ्वीवासी सोडतील तेंव्हा तुला मान मिळेल.पण गणेशचतुर्थीला तुझं तोंड कुणी बघणार नाही.नाहीतर त्यावर चोरीचा आळ येईल. मग हा असा चोरीचा आळ आपल्या पोरांवर येऊ नये म्हणून मम्मी आम्हाला घरात गणपती आले की, त्या दिवशी आकाशात बघू नका म्हणायची.मग मी एकदा चंद्राचे तोंड चुकून पाहिलं.आणि अपराधी भाव मनात ठेवून मम्मीला सांगत गेले की मी चुकून आकाशाकडे बघितलं आणि चंद्राचे तोंड पाहिलं.मग मम्मीला माझा तीव्र राग आला.आपल्या मुलीवर येणारा संभाव्य चोरीचा आळ टाळण्यासाठी तिच्याकडेही गणपती सारखा उ:शाप होता.मम्मी मला म्हणाली जा आता कुणाच्या तरी घरावर एक दोन दगड मारून ये मग ते शिव्या देतील आणि हा असा संभाव्य चोरीचा आळ येणार नाही.मग काय आमच्या गल्लीत सणावाराच शिव्या देणारी एकमेव व्यक्ती होती ती म्हणजे इंदू आज्जी.मी दोन दगड तिच्या घरावर भिरकावले आणि ती एक रोजची तिच्या आवडीची शिवी...कुणाला पटकी आली हा....म्हणतच बाहेर आली...मग कुणाला फोड उठला.....कोण उलथून चाललंय अश्या एका दगडावर असंख्य शिव्यांचा भडीमार सुरू झाला.अश्या शिव्यांचा लाखोंल्या खाऊन मी कसा धडा शिकवला म्हणून तृप्त मनाने मनातल्या मनात हासत होते पण चेहेऱ्यावर गंभीर भाव होते कारण मम्मी पूढे उभी होती...आणि तिच्या चेहेऱ्यावर आपल्या पोरीला शिव्या मिळाल्या बर झालं तिची संभाव्य चोरीचा आळ येण्यावरून सुटका झाली असे कृत्यकृत्य वाटणारे भाव होते...कुणाचं काय तर कुणाचं काय....

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users