माझ्या समोरचा कागद कोराच राहतो,
भावनांचा गुंता सोडवता सोडवता
जेव्हा विचारांचा गुंता वाढतो,
विचारांचा गुंता सोडवता सोडवता
जेव्हा शब्दांचा गुंता वाढतो,
तेव्हा माझ्या समोरचा कागद कोराच राहतो.
विचारांच्या गर्दीत प्रत्येक चेहरा अनोळखीच भासतो,
किंबहुना आपल्या विचारांशी आपलाच गहिरा संबंध असतो,
कधीकधी मनातून कागदावर उतरता उतरता
तो विचार पुन्हा गर्दीत हरवून जातो,
तेव्हा माझ्या समोरचा कागद कोराच राहतो.
विचारांना शब्दांशिवाय अस्तित्वच नाही,
त्यांना शब्दांची शाल पांघरण्याशिवाय पर्यायच नसतो,
नाहीतर पुन्हा तो मेंदूच्या कोणत्यातरी कोपऱ्यात
गारठून जाण्याचा धोका असतो,
म्हणून कधीतरी माझ्या समोरचा कागद कोराच राहतो.
आपण लिहितो तेव्हा शब्द आणि विचारांचा संवाद घडतो,
कुठेतरी शब्द कमी पडतो आणि आपण अडतो,
तेव्हा विचार बोलत राहतो आणि शब्द का निशब्द होतो,
कारण तेव्हा दोघात तिसरा , आपला भूतकाळ त्यात डोकावतो,
म्हणून माझ्या समोरचा कागद कोराच राहतो.
काहीतरी नवीन लिहायला जातो आणि
नेहमीसारखी कागदावर वेदनाच मांडतो,
जेव्हा शब्दांना शोधता शोधता
आपण आपल्याशीच भांडतो
तेव्हा माझ्या समोरचा कागद कोराच राहतो.