'चित्रा'तली यमुना - [Nude (Chitraa) - Marathi Movie - न्यूड (चित्रा)] - स्पॉयलर अलर्ट

Submitted by रसप on 30 April, 2018 - 07:35

आपण आपल्या स्वत:समोर नेहमी नागडे असतो. स्वत:पासून काहीही लपवणं शक्य नसतं. दुनियेच्या, जवळच्या लोकांच्या, अगदी जिवलगांच्यापासूनही आपण लपवाछपवी करू शकतो. पण शेवटी स्वत:समोर नागडेच.
एम एफ हुसेनवरून प्रेरित वाटणारं 'न्यूड' मधलं नसिरुद्दीन शाहने साकारलेलं 'मलिक' हे पात्रसुद्धा साधारण ह्याच अंगाने जाणारं भाष्य करतं. 'कपडे हे शरीराला झाकण्यासाठी असतात. आत्म्याला नाही. मी माझ्या चित्रांद्वारे आत्म्यापर्यंत पोहोचायचा प्रयत्न करत असतो म्हणून मी नग्न चित्रं काढतो.'

स्वत:ला स्वत:ची माहित असलेली नग्नता अनेक प्रकारची असते. आर्थिक, कौटुंबिक, सामाजिक, वैचारिक इ.
'न्यूड'च्या कथानकात प्रेक्षकाला स्वत:ची वैचारिक नग्नता आठवून देण्याची कुवत आहे. पण सिनेमात ती ताकद जाणवत नाही. हा सिनेमा 'यमुना'ची कहाणी म्हणूनच दिसतो आणि तेव्हढाच राहतो. अनेक प्रसंगात अपेक्षित तीव्रता येत नाही आणि प्रभाव कमी पडतो, असं वाटलं.

'यमुना' (कल्याणी मुळे) बाहेरख्याली पतीच्या जाचाला कंटाळून घर आणि गाव सोडून मुलासह मुंबईत तिच्या मावशीकडे (आक्का - छाया कदम) कडे येते. परिस्थितीच्या रेट्यामुळे आक्का 'जे जे स्कूल ऑफ आर्ट्स'मध्ये सफाई कर्मचारी असल्याच्या नोकरीआड प्रत्यक्षात तिथेच चित्रकला, शिल्पकला वर्गांसाठीची 'न्यूड मॉडेल' म्हणून काम करत असते. परिस्थितीच्याच रेट्यामुळे यमुनासुद्धा तिथे तेच काम करायला लागते. आपल्या मुलाने शिकून सवरून कुणी तरी मोठं माणूस बनावं, ह्या एकमेव आकांक्षेपोटी यमुना मनापासून स्वत:चं काम करत असते.

ही व्यावसायिक पातळीवर एक खूप वेगळी आणि आव्हानात्मक कहाणी आहे. असा चित्रपट झी आणि रवी जाधव हे अस्सल व्यावसायिक समीकरण जुळवणारी दोन नावं करतात, हे खूपच आनंदाचं आहे. अर्धशिक्षित किंवा अशिक्षित असली, तरी नवऱ्याच्या आधाराला लाथ मारून निघून जाणारी आणि 'मुलाला शिकवीन, मोठं करीन' ह्या जिद्दीने झगडणारी यमुना नुसती डोळ्यांसमोर आणून पाहा. अंगावर रोमांच उभे राहतात !
मात्र, 'यमुना'ची ही कहाणी कोणत्या वळणावर संपणार ह्याचा आपल्याला आधीच साधारण अंदाज येतो. ती तिथेच संपते.
यमुनाच्या आयुष्याचा सहा-सात वर्षांचा प्रवास 'न्यूड'मधून दिसतो. प्रत्येक प्रवासातले काही महत्वाचे मुक्काम ठराविक असतात. इथे ते मुक्काम रंजकतेत नव्हे, तर परिणामकारकतेत कमी पडतात. उदाहरणार्थ (स्पॉयलर अलर्ट) -

१. यमुना नवऱ्याचं लफडं पकडते तो प्रसंग. पहाटे उठून घाटावर कपडे धुवायला जाणं आणि एकदम मिश्कील भाव चेहऱ्यावर आणून पाण्यात सूर मारणं, त्यावर आजूबाजूच्या बायकांनी शून्य प्रतिक्रिया - जणू काही घडलेलंच नाहीय - देणं. पुढे पोहत पोहत जाताना दुसऱ्या किनाऱ्याच्या फांदीवर माणिक (नेहा जोशी) पाण्यात पाय सोडून बसलेली असणं आणि पाण्यातून यमुनेचा नवरा (श्रीकांत यादव) बाहेर येऊन तिच्याशी लगट करणं. हे सगळं चित्रण स्वप्नातलं वाटतं. प्रत्यक्षात ते वास्तवच असतं !
२. आक्का न्यूड मॉडेलचं काम करते आहे. हे समजल्यावर यमुना तिला उलटसुलट बोलते. त्यानंतर आक्काची प्रतिक्रिया आणि अखेरीस स्वत: यमुनालाच तिने ह्या कामासाठी तयार करणं, हा सगळा प्रसंग अपेक्षित तीव्रता साधत नाही.
३. कट्टरवाद्यांनी कॉलेजवर 'नग्न चित्रांवर बंदी आणा' चे फलक घेऊन हल्ला चढवणं. त्यांना प्रोफेसर आणि विद्यार्थ्यांनी सामोरं जाणं, हा सगळा प्रसंग नाट्यमयतेत फारच कमी पडला. त्यांचं आपसातलं झगडणं लुटुपुटूचं दिसतं.
४. धो धो कोसळणाऱ्या पावसात समुद्रकिनाऱ्यावर चहा घेऊन येणं. कसं शक्य आहे हे ? चहा फ्लेवरचं पावसाचं पाणी प्यायचं असतं का ?
५. शेवट खूप सुंदर लिहिला आहे. पण चित्रीकरण पुन्हा एकदा सपक वाटतं. नंतरचा आक्रोश वगैरे अगदीच वरवरचं दिसतं.
६. आर्ट गॅलरीतल्या चित्रासमोर तो पच्चकन् थुंकतो. आजूबाजूला असलेले १५-२० लोक चित्रं पाहण्यात दंग असतील त्यामुळे कुणाला कळलं नसेल, असं मानू. पण पुढच्याच फ्रेममध्ये त्याच चित्रासमोर तो तिथेच उभा असताना त्याच्या आजूबाजूला लोक फिरतायत, पण कुणाला पायाखाली घाण दिसत नाही. नक्की थुंकला होता की नाही ? असा प्रश्न पडतो.
७. शेवटानंतरचा अजून एक शेवट असला की सिनेमा ३-४ पायऱ्या खाली उतरूनच थांबतो, असं एक वैयक्तिक मत.

nude-int.jpg

लोकगीतं, अभंगांचा खूप सुंदर वापर सिनेमात केला आहे. 'दिस येती' मनात रेंगाळणारं आहे. पार्श्वसंगीतही प्रभावी आहे. शेवटाच्या वेळचं पार्श्वसंगीत कल्पक आहे.

झाडून सगळ्यांची कामं ताकदीची झाली आहेत. कल्याणी मुळेचं काम सुरुवातीला जरा काही तरी कमी किंवा जास्त झाल्यासारखं वाटलं. पण नंतर मात्र कमालच आहे. छाया कदमनी साकारलेली खमकी आक्कासुद्धा जबरदस्तच ! सहाय्यक कलाकारांत ओम भूतकर आणि मदन देवधर खरोखर दोघा मुख्य अभिनेत्रींना ताकदीचं सहाय्य करतात. श्रीकांत यादव, नेहा जोशी, किशोर कदम आणि नसिरुद्दीन शाह अगदीच छोट्या भूमिकांत आहेत. एकूणच अख्खा सिनेमा उत्कृष्ट अभिनयाचं एक अप्रतिम दर्शन आहे.

सारांश सांगायचा झाल्यास, नाविन्यपूर्ण प्रभावी कथानक जोडीला सशक्त अभिनय आहे पण अनेक जागी सिनेमाची पकड काही न काही कारणाने ढिली पडते. असं असलं तरी 'न्यूड' एकदा तरी पाहावाच असा सिनेमा नक्कीच आहे.

जाता जाता - सिनेमाचं शीर्षक 'न्यूड' ऐवजी काही दुसरं असतं तर ? 'न्यूड' हे खूपच सरळसोट वाटतं आणि त्या नावातून काही विशेष वेगळं पोहोचवायचं आहे, असंही वाटलं नाही. 'चित्रा'सुद्धा चाललं असतं की ! पण मग कदाचित सिनेमा वरून वादंग झालं नसतं. सगळीकडे सहज प्रवेश मिळाला असता आणि प्रदर्शनही कुणाही इतर सिनेमाप्रमाणे नेहमीसारखं झालं असतं.

रेटिंग - * * * १/२

- रणजित पराडकर
http://www.ranjeetparadkar.com/2018/04/nude-chitraa-marathi-movie.html

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लिहिलेय परीक्षण.

याचा ट्रेलर युट्युबवर पाहिला त्यावरून चित्रपट जबरदस्त असणार असे वाटले होते. तेव्हा यावरून झालेला वादंग विस्मरणात गेला होता, आता परत आठवला. नावावरून कथा न्यूड करणाऱ्या कलाकारांच्या मानसिकतेवर असावा असे वाटले होते.

मुद्दाम थेटरात जाऊन पाहीन का? माहीत नाही, चित्रपटाचे नाव हा एक अडसर वाटतो.

आपल्याकडे नग्नता नव्हतीच, कला म्हणूनही नव्हतीच म्हणणे म्हणजे डोळ्यांवर पट्टी बांधून खजुराहो, कोणारक (कोणार्क), पद्मनाभ इत्यादी मंदीरे पाहण्यासारखं आहे. ममलापुरम खोदवून घेणारे राजाराणीही नग्नच कोरले आहेत. तेव्हा शिल्पकाराने त्यांंचे शिल्प काल्पनिक केले असेल का? इजिप्तमधल्या पिरामिडच्या आतमध्ये भित्तिचित्रे आहेत त्यात राजाराणी सुंदर रेशमी वस्त्रांत तर दासी पूर्ण नग्न आहेत. केवळ नग्न स्त्रीचे शरीर पाहायची उत्सुकता नसून नग्न पुरुषही पाहायचे आहेत. चेन्नई तल्या एका आर्ट स्कूलच्या एका सितारामन मुलीने पुरुष मॉडलला सिटिंगला बोलवून चित्र काढून प्रसिद्ध केलेले. (९०-).
आता विरोध होत आहे, सेन्सरकडूनही.
असा चित्रपट बनवणे कुणा नटनट्यांना घेऊन हे आव्हान आहेच. ते थोडेफार गंडले असेलही. प्रयत्नांना सलाम.

आता विरोध होत आहे, सेन्सरकडूनही>>>

सेन्सॉर सर्टिफिकेट मिळाल्यावरच चित्रपट प्रदर्शित होऊ शकतो, एकदा सर्टिफिकेट दिल्यावर कसला विरोध?

माझ्या आठवणी प्रमाणे हा चित्रपट आधी कुठल्यातरी शासकीय महोत्सवासाठी निवडला गेला व आयत्या वेळी प्रदर्शनाची परवानगी नाकारली गेली. नकार बहुतेक नावामुळे मिळाला, चित्रपटात आक्षेपार्ह काही नसावे. परवानगी नाकारली गेली म्हणून वादंग उठला.

'प्रयत्नाला सलाम' हे आर्ग्युमेंट आता फार बुळबुळीत वाटायला लागलं आहे. प्रयत्न केला आहे, ह्या एका कारणासाठी एखाद्या चांगल्या विषयाशी पूर्णपणे न्याय न करता येणं कसं काय जस्टीफाय होऊ शकतं, हे मला कळत नाही.

आत्ताच पाहून आली..
मला खुप सुपर्ब कलाकृती वाटली नाही आणि त्यातले जाणवलेले फ्लॉज लिहायला आली तर डिट्टो तुम्हाला न पटलेलेच मुद्दे माझ्यापन डॉक्याट आलेले..
स्पॉयलर
तरी माझे आणखी काही पैसे..

१. पहिल्या सीन मधे जेव्हा ती नेहा जोशीला बघायला जाते तेव्हाचे म्हणजे कपडे धुत पाण्यात सुर मारते तिथुन तिला बघते तोवरचे एक्प्रेशनच मला कळले नाही.. ती नेमकी नवर्‍याचा माग काढत येते कि तिला त्या बाईबद्दल आकर्षण असतं अन आपणही असं असावं म्हणुन ती बघायला येते तर तिचा नवरा तिथे सापडतो?

२. पार्श्वसंगित मधे जी गाणी घेतली आहे ती मला आवडली पण हुरहुर लावेल काळजाला अस वाटलं नाही अज्जिब्बात.. शेवट खरतर त्या संगिताने तारून वर न्यायला हवा होता असं वाटल..

३. चहाचा प्रश्न मलापन पडला.. बरं चहाची टपरी जवळ्पास वा किनार्‍यावरच असेल ना तर हिरोचं लक्ष कसं नाही गेलं ती इतक अंतर चालुन गेली तरीही?

४. नग्न चित्रांना विरोध करण्यासाठी जो मोर्चा येतो तेव्हा ती काळं फासलेल्या फोटोला जर्रास्सं पुसुन वर घेऊन जायला लागते तेव्हा हे लोकं जे तिला टाळ्यांनी गौरवतात तेपन खुपच खोटं खोटं वाटलं.. हसु आलं तेव्हा खरतर..

भारतात थेटरात अथवा महोत्सवात चित्रपट प्रदर्शित करायच्या आधी सेन्सॉर सर्टिफिकेट आवश्यक आहे का?
सेन्सॉर सर्टिफिकेट मिळाल्यावर भारतात सेन्सोर्ड प्रतच प्रदर्शित करणे आवश्यक आहे का?

या दोन प्रश्नांची उत्तरे एस दुर्गा आणि न्युड वरून झालेल्या वादंगास उत्तर देऊ शकतील.

काल पाहिला. रसप, तुमच्या परीक्षणाशी अगदी सहमत !
इथे ते मुक्काम रंजकतेत नव्हे, तर परिणामकारकतेत कमी पडतात. >>> हे परफेक्ट लिहिलंय.

चित्रपट काल पाहिला. अतिशय प्रभावी आहे. परिणामकारक आहे.

सौंदर्यासाठी नग्नतेचा वापर आजवर अनेक चित्रपटांत झालेला आहे. पण खूप कमी चित्रपट आहेत कि ज्यामध्ये नग्नता भीषण वास्तव मांडते वा प्रेक्षकाला विचार करायला लावते. न्यूड हा त्यापैकीच एक आणि त्यातही मराठीमध्ये माझ्या माहितीनुसार पहिलाच चित्रपट असेल. त्यातूनही इथे काही फार व्यापक अशा सामाजिक किंवा ज्वलंत वगैरे प्रश्नाला हात घातलेला नाही. त्यामुळे हा विषय दिग्दर्शकाने घेऊन नक्कीच खूप मोठे आव्हान स्वीकारलेय (कारण विषय व्यापक सामाजिक असेल तर सर्वाना पटकन भिडू शकतो. प्रेक्षक लगेच कनेक्ट होऊ शकतात. पण इथे तसे नाही). असे असूनही अखेर चित्रपट प्रेक्षकांना अंतर्मुख करून जातो यातच ते आव्हान त्यांनी समर्थपणे पेलले आहे हे दिसून येते.

संगीताचा वापर सुद्धा खूप परिणामकारक आहे. विशेषतः सुरवातीला नवरा तोंडावर थुंकून यमुनेचा घृणास्पद अपमान करतो तो प्रसंग असो किंवा ती जेंव्हा पहिल्यांदाच मॉडेल म्हणून बसणार असते तो प्रसंग केवळ असो. असे काही प्रसंग पार्श्वभूमीवर जे गीत/संगीत आहे केवळ आणि केवळ त्यामुळे अतिशय अप्रतिम झाले आहेत.

परीक्षणात मांडलेले अनेक मुद्दे "किरकोळ तांत्रिक त्रुटी" या अंतर्गत येतील. पण त्याचा चित्रपटाच्या प्रभावावर अजिबात परिणाम झालेला नाही. किंबहुना यातले अनेक मुद्दे चित्रपट पाहताना जाणवलेही नाहीत. दंगल करत येणार टोळके आणि त्यानंतरचा सीन खूप चांगले झाले आहेत. नॉट बॅड रियली. अगदी हिंदी किंवा हॉलीवूड सारखे नाहीत. तशी अपेक्षा करणेही चुकीचे आहे. मराठी चित्रपट आणि त्यांचे बजेट या मानाने या तांत्रिक बाबी खूपच प्रभावी झाल्या आहेत. मला जाणवलेला मुद्दा एकच होता तो म्हणजे कला महाविद्यालयात वर्षानुवर्षे एकच व्यक्ती मॉडेल म्हणून काम करते. ते वस्तुस्थितीला धरून आहे कि चित्रपटाच्या कथानकासाठी तसे दाखवलेय माहित नाही. कारण वर्षानुवर्षे एकाच व्यक्तीला मॉडेल म्हणून वापरायचे वास्तविक काही कारण नाही. पण असो. एकंदरीत खूप सुंदर व प्रभावी सादरीकरण झाले आहे.

त्यामुळे मी तर म्हणेन खरेच अगदी आवर्जून पाहण्यासारखा चित्रपट आहे.

त्यातल ती पहिल्यावेळी मॉडेल म्हणुन बसते त्यावेळच्या गायाचे बोल लिहा ना कुणीतरी..मला ते गाणं परत ऐकायच आहे पण मला फार तुकड्यात शब्द आठवताहेत..

atuldpatil यांच्याशी सहमत.
चित्रपट अतिशय आवडला. शेवट सुन्न करणारा आहे.
फार तरलपणे आणि कलात्मकतेने घेतला आहे. हे अवघड होतं खरंतर.
संवाद आवश्यक तिथेच आहेत आणि हवे तितकेच आहेत. बाकी ठिकाणी चित्रभाषेचा वापर प्रभावीपणे केलेला आहे. एरवी आपल्याकडचे चित्रपट किती वाचाळ असतात!
यमुना आणि जयराममधलं नातं किती सुरेख टिपलं आहे!
यमुनेच्या मनातले सगळे भावतरंग पाण्याच्या साक्षीने टिपले आहेत. ती तिचा आनंद पाण्याबरोवर वाटून घेते, तिचे अपमान, दु:ख, विफलता पाण्यात बुडवते. शेवटीही पाण्याच्याच कुशीत शिरते.
चित्रपटाच्या शेवटाबद्दल माझ्या एका मैत्रिणीने अगदी नेमकी प्रतिक्रिया दिली : इथे आवाज करणारे आहेत ते मुर्ख आहेत आणि संवेदनशील आहेत ते मात्र थपडा खाताहेत!
खरं आहे.
बघायलाच हवा असा चित्रपट आहे.

>> मुद्दाम थेटरात जाऊन पाहीन का? माहीत नाही, चित्रपटाचे नाव हा एक अडसर वाटतो.>>
साधना, थिएटरमधे जाऊन जरूर पाहा. मी वर लिहिलं आहे तसं, इत्क्या तरलपणे चित्रप्ट चित्रित केलेला आहे, की कधीही पहाताना अवघडलेपण येत नाही.
सौंदर्य आणि अश्लीलता यातल्या पुसट सीमारेषेचं दिग्दर्शकाला भान आहे.

>> संवाद आवश्यक तिथेच आहेत आणि हवे तितकेच आहेत. बाकी ठिकाणी चित्रभाषेचा वापर प्रभावीपणे केलेला आहे.

+११११ माझ्या प्रतिसादात उल्लेख करायचा राहून गेलला मुद्दा. धन्यवाद Happy

अप्रतिम सिनेमा आहे.
मुळीच चुकवू नये असा...
थेट्रात जाऊनच बघा; थेट्रात जाऊन बघाच.

यमुना पहिल्यांदाच जेव्हा पोझिंगला बसते, तेव्हा बॅकग्राउंडचं गीत या प्रसंगाची उंची वाढवतं. नग्नता असूनही अश्लिलतेचा लवलेशही नसलेला सिनेमा. छाया कदम यांची आक्का जबरदस्त. कल्याणी मुळेने साकारलेली यमुना उत्तम. मात्र, यमुनाचा मुलगा कधी कधी भडक वाटतो. शेवट आणखी वेगळा करता आला असता, तर अधिक परिणामकारक झाला असता, असे मला वाटते.

साधना, थिएटरमधे जाऊन जरूर पाहा. मी वर लिहिलं आहे तसं, इत्क्या तरलपणे चित्रप्ट चित्रित केलेला आहे, की कधीही पहाताना अवघडलेपण येत नाही.
सौंदर्य आणि अश्लीलता यातल्या पुसट सीमारेषेचं दिग्दर्शकाला भान आहे.>>>

नक्कीच पाहते.

शेवटानंतरचा अजून एक शेवट असला की सिनेमा ३-४ पायऱ्या खाली उतरूनच थांबतो, असं एक वैयक्तिक मत.

>>>>>मग कदाचित सिनेमा वरून वादंग झालं नसतं. सगळीकडे सहज प्रवेश मिळाला असता आणि प्रदर्शनही कुणाही इतर सिनेमाप्रमाणे नेहमीसारखं झालं असतं.

शेवटच्या परिच्छेद वाचला आणि तुमचं शेवटबद्दल वाक्य त्याला चपखल बसते . परीक्षण 3-4 पायऱ्या खाली उतरले.

>>ती पहिल्यावेळी मॉडेल म्हणुन बसते त्यावेळच्या गायाचे बोल लिहा ना कुणीतरी..मला ते गाणं परत ऐकायच आहे पण मला फार तुकड्यात शब्द आठवताहेत..>>

टीना, ती विद्या रावने गायलेली कबिराची रचना आहे:

रे साधो , अब ये तन ठाठ तम्बूरे का
पांच तत्त्व का बना है तम्बूरा
तार लगा नव तुरे का
ऐंचत तार मरोरत खूंटी
निकसत राग हजुरे का
ये तन ठाठ तम्बूरे का
टुटा तार बिखर गयी खूंटी
हो गया धूर मधूरे का
या देहि का गर्व न कीजे
उड़ गया हंस तम्बूरे का
ये तन ठाठ तम्बूरे का
कहे कबीर सुन भाई साधो
अगम पंथ इक सुरे का
ते तन ठाठ तम्बूरे का

(गूगल वरून)

मला जाणवलेला मुद्दा एकच होता तो म्हणजे कला महाविद्यालयात वर्षानुवर्षे एकच व्यक्ती मॉडेल म्हणून काम करते. >>>>>
मागे कोणाचा तरी लेख वाचलेला (बहुतेक अनिल अवचट, नक्की आठवत नाही) त्यात त्यांनी स्त्री आणि तिची मुलगी एकाच काळात मॉडेल म्हणून बसायच्या असा उल्लेख केलेला आहे,

शेवटी मॉडेल ची उपलब्धता हा सुद्धा इस्स्यु आहेच, त्यामुले एकच मॉडेल खूप वर्ष काम करते यात अविश्वसनीय वाटण्यासारखे काही नाही.

मी याच शीर्षकाची कथा २०१६/१७ च्या मेनका का माहेर च्या दिवाळी अन्कात वाचली होती. कथा, पात्ररचना वेगळी होती. पण आशय तोच होता. सुरुवातीला नायिका Nude model होण्यास नकार देते, पन नन्तर तिच्यात आत्मविश्वास येतो. कुणी वाचलीय का ती कथा?

Thanks भरत,
न्यूड बद्दल च्या चर्चा वाचून त्या लेखातील काही जागा नव्याने कळल्या.
युट्युब वर न्यूड मॉडेल म्हणून बसणाऱ्या स्त्रियांचे 2 3 व्हिडीओ पाहण्यात आले. ज्यात त्या आपले काम, कुटुंबियांची रिऍक्शन वगैरे बाबत बोलतात.

आज बघितला. रसप आणि टिना दोघांच्या स्पॉयलर मुद्द्यांशी सहमत.

चित्रपटात नग्नता असूनही तो कुठेही अश्लील होत नाही याच्याशी सहमत. त्यासाठी अभिनंदन !!!

शेवट आवडला नाही. तिला एवढे वर्षाच्या या धाडसी प्रवासाने तितकी खमकी करायला हरकत नव्हती. शेवटी नुसतीच शांतता आहे तिथे त्याऐवजी एखादे गाणे चटका लावून गेले असते. (उदा. हरामखोर).