शहरात निवडणुकांचे वारे वाहायला सुरवात होईल.राजकीय पक्षांना लोकहिताचा कळवळा यायला ला्गेलहे. झालेल्या कामांचे श्रेय घेण्याची रस्सीखेच चालू होईल. न झालेल्या कामांचे अपश्रेय हे पालिका प्रशासन वा अन्य राजकीय पक्षांना ढकलायला सुरुवात होईल. झालेली कामे सातत्याने लोकांपुढे करत रहायच आणि न झालेल्या कामाविषयी चकार शब्द काढायचा नाही. जनसामान्याची स्मृतीत कुठलीही गोष्ट फार काळ टिकत नाही.नुकतीच घडलेली गोष्ट मात्र स्मृतीत राहते. ही नाडी सर्वच पक्षांना माहित आहे. पुण्यातल्या विकास कामात जनसामान्यांना फारसा रस नसतो. विकासकामातील अडथळ्यांचे खापर कधी नोकरशाहीवर तर कधी प्रबळ इच्छाशक्तीच्या अभावावर फोडता येते. जनसामान्यांच्या निष्क्रियतेवर ही फोडता येते.अनेक बुद्धीदांडगे या कामी उपयोगाला येतात.नागरी हक्कांसाठी झगडावे लागते आणि सवलतींसाठी कधी पाय धरावे लागतात तर कधी तर कधी हात ओले करावे लागतात. निवडणुक पुर्व काळात आश्वासनांची खैरात होते. इतर वेळी ताठरपणे वागणारे राज्यकर्ते या काळात नम्रपणे हसु लागतात.मग मतदाराला आपण राजा झाल्याचे भास होउ लागतात. आता राजा म्हणल कि उदार होण आलच. त्याला ती सुखाउन नेणारी बाब असते.
"एवढा मोठा अध्यक्ष पण आपल्याला फोन केला" "आठवणीने कार्यक्रमाचे निमंत्रण पत्र पाठवल""केलेल्या कामाचा 'न चुकता' 'न मागता' हिशोब दिला. आपणहुन परिक्षेला बसला. स्वत:हुन प्रगतिपुस्तक दिल. चुकतय जरा माणुस म्हणुन माफ करायची संधी सोडण्याचा करंटेपणा मतदार राजाने करावा काय? अहो अशी संधी पाच वर्षांनी एकदा येते.अहो पेपर मधे रोज येतय की पुणे शहराचा विकास हाच आमचा श्वास. बघा आमचा हात हातात घेउन. विकासाची नाडी लागणारच. कुणी म्हणतय कि आम्ही कोकाटे इंग्लिश पेक्षा फाडफाड विकास करु. .कुणी म्हणतय कि आजच्या राजकारण्यांकडे दुरदृष्टीचा अभाव आहे. आम्हाला संधी देउन बघा. गरिबीत पिचलेल्या बहुजनांचे काटकुळे पाय जर एकत्र आले तर हत्तीच बळ आमच्या पायात येईल. मराठी माणसाच्या हृदयात डोकावुन पहा विकासाच्या इंजिनाची धडधड ऐकायला येईल.ऐकायला येत नसेल तर आम्ही कानाखाली आवाज काढून कान साफ करुन देउ.
काय म्हणताय? अतिक्रमणे वाढलीय , वाहतुक वाढलीय, रस्ते कमी पडताहेत. विकास आराखड्यातले नियोजित रस्ते इतकी वर्षे रखडलेत. अहो आत्त्ताशी कुठ स्वातंत्र्य मिळुन ७० वर्ष होताहेत. वीस पंचवीस वर्षांच काय घेउन बसलात.होतील हळु ह्ळु सुधारणा. आपल्या पुण्याला समाजसुधारकांची कमी नाही. महर्षी कर्व्यांच उदाहरण घ्या. फार मोठा माणुस. शिक्षणक्षेत्रात महिलांसाठी अगदी सेवाभावी वृत्तीन काम केल. त्यांचे पुत्र र. धो. कर्वे.पण फार द्रष्टा माणुस हो. संततीनियमनाच काम जर त्यांनी केलं नसत ना तर ही पुण्यभुमी लोकसंख्येच्या भाराने केव्हाच पातळात विलिन होउन गेली असती. महर्षी कर्व्यांच नाव राखल बुवा. म्हणुन तर कर्व्यांची स्त्री शिक्षण संस्था ज्या भागात आहे त्या परिसरालाच आम्ही आता कर्वेनगर नाव दिलय.पुणे शहराच्या विकास आराखड्यात कर्वेनगर पुर्वीपासुन आहे बर का? काय आहे कि इथला विकास आम्ही मुद्दामुनच राखुन ठेवलाय. एकदम बकाबका जेउ नये.आणि चार घास कमीच खावेत माणसाने. रवंथ करायला वेळ नको का? एकदम पचत नाही. आन विकास काय कुठे पळुन जातो का? आपल्याच खिशात आहे तो. तंगी लागली कि बाहेर काढायचा थोडा थोडा. पुरवुन पुरवुन खायला लागतो. काय आहे कि खाणारी तोंड आता वाढलीत. वरुन आलेली शिदोरी पुरत नाही आता. महागाई किती वाढलीय बघताय ना? आपल्याला ढेकर आल्याशिवाय बाकीच्यांना देता येत नाही. वरुन शिदोरी आली कि ही मोकळी करु. आहे काय आन नाही काय?
येणार येणार मतदार राजाचे दिवस येणार!
Submitted by प्रकाश घाटपांडे on 30 April, 2018 - 00:41
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
नुकतेच वाचलेले ढकलपत्र बोलके
नुकतेच वाचलेले ढकलपत्र बोलके आहे.
*नागरीक मी भारत देशाचा*
*हातात सगळं आयतं पाहिजे !*
वीज कधी वाचवणार नाही
बील मात्र माफ पाहिजे !
झाड एकही लावणार नाही
पाऊस मात्र चांगला पाहिजे !
तक्रार कधी करणार नाही
कारवाई मात्र लगेच पाहिजे !
लाचेशिवाय काम करणार नाही
भ्रष्टाचाराचा मात्र अंत पाहिजे !
कचरा खिडकीतून बाहेर टाकीन
शहरात मात्र स्वच्छता पाहिजे !
कामात भले टाईमपास करीन
दर वर्षी नवा वेतन आयोग पाहिजे !
धर्माच्या नावाने भले काहीही करीन
देश मात्र धर्मनिरपेक्ष पाहिजे !
मतदान करताना जात पाहीन
म्हणेल, जातीयता बंद झाली पाहिजे !
कर भरताना पळवाटा शोधीन
विकास मात्र जोरात पाहिजे !
नागरीक मी भारत देशाचा
हातात सगळं आयतं पाहिजे !
मस्त ढकलपत्र आहे. वास्तव आहे
मस्त ढकलपत्र आहे. वास्तव आहे.मग लोकशाहीत सर्वांनी प्रगल्भ होण्याची वाट पाहावी लागेल. किती काळ लागेल माहित नाही.
गरीब के थाली मी पुलाव आया है.
गरीब के थाली मी पुलाव आया है.. लागता है शहर मी फिर से चुनाव आया है!