लहानपणापासून खाण्यापिण्याच्या सवयी नीट असतील, भाजीपाला कडधान्ये आहारात भरपूर असतील, कोल्ड्रिंक ज्यूस वगैरे कधीही प्यायले नसेल, भेळ फरसाण आईस्क्रीम असले गाड्यावरचे किंवा तत्सम जंकफूड कधीही खाल्ले नसेल तर मोठेपणी आपल्याला " कद्धी म्हंजे कद्धी" कसले आजार होत नाहीत. ब्लडप्रेशर डायबेटीस अर्थ्रायटीस असलं काहीही होत नाही. अशी तुमची पण लहानपणी समजूत होती ना? माझी पण अगदी अशीच समजूत होती अगदी कालपरवापर्यंत पण कसले काय अन कसले काय. परवा कधी नव्हे ते मला "लहानपणी हे सगळे केले असते तर बरे झाले असते" असे उगीचच वाटून गेले
त्याला कारणच तसे घडले. या सगळ्याची सुरवात सहा-आठ महिन्यांपूर्वी झाली. झाले असे कि किरकोळ सर्दी पडसे वगैरे झाले म्हणून तपासून घ्यायला आमच्या डॉक्टरांकडे गेलो. आमचे डॉक्टरसाहेब आलेल्या पेशंटला "काय होतेय? कधीपासून?" वगैरे न विचारता आल्या आल्या थेट त्याला आधी पडद्याच्या मागे नेतात. तिथे बेडवर आडवे करतात. (नंतर बिल बघून पेशंट अजून एकदा 'आडवा होतो' हा भाग वेगळा. असो.) आणि त्याचे ब्लड प्रेशर, नाडी वगैरे सगळे चेक करून मग विचारतात, "ह्म्म्म काय होतंय?". आता काही किरकोळ आजार असेल तर उगीच हे सगळे सोपस्कार करायची काय गरज? असा मला नेहमी प्रश्न पडायचा. पण विचारणार कसे? पूर्वी एकदा मी असेच त्यांना सांगायला गेलो कि अहो गरज नाही मला आडवे होण्याची. पण डॉक्टर कसले ऐकतात. मला पडद्याच्या आत पाठवलेच. आत बेडवर बसल्या बसल्या मी त्यांच्या असिस्टंटला म्हणालो सुद्धा "अहो असे काय करता, ऐकून तर घ्या". तर त्याने माझे काही एक ऐकून घेतले नाही. बळेबळेच मला आडवे केले, सगळे चेक केले आणि विचारले,
"ह्म्मम्म्म काय होतंय?"
"काही नाही, केमिस्टने गोळ्या तुमच्याकडून चेक करून घ्यायला सांगितल्यात. त्यासाठी आलो होतो" मी शांतपणे सांगितले
डॉक्टरांनी चष्म्यातून तिरक्या नजरेने एकवार माझ्याकडे पहिले, मग गोळ्या तपासल्या. आणि पुन्हा माझ्याकडे कटाक्ष टाकून म्हणाले,
"अहो हे आधी नाही का सांगायचं? उगाच वेळ घेतला पहा तुम्ही माझा"
"अहो पण मी... "
"ओके. चला नेक्स्ट"... डिंगडॉंग... डॉक्टरसाहेबांनी अजिबात ऐकून न घेण्याची आपली परंपरा कायम राखत पुढच्या पेशंटला आत येण्यासाठी बेल दाबलीसुद्धा.
तर यावेळी पण असेच काहीसे घडत होते. बेडवर पडल्या पडल्या मी आर्त स्वरात म्हणालो,
"डॉक्टरसाहेब, सर्दीपडश्याचा आणि ब्लडप्रेशरचा काय संबंध"
"तुम्ही एमडी आहात का?", ब्लडप्रेशरच्या पंपाने हवा भरत असताना डॉक्टरनी माझी हवाच काढली. कुस्तीत पैलवानाने चड्डीला हात घालावा तसे यांनी थेट माझ्या पदवीलाच हात घातला,
"ठराविक वयानंतर या सगळ्या गोष्टी चेक कराव्या लागतात" डॉक्टर बारीक नजरेने ब्लडप्रेशरच्या काट्याकडे बघत म्हणाले.
आता डिग्री वय अशी एकेक वस्त्रे निघायला लागल्यावरतरी निदान मी गप्प बसावे कि नाही? उलट वयाला हात घातल्यावर तर मला स्फुरणच चढले.
"डॉक्टरसाहेब लहानपणापासून पहा मी अतिशय आपलं हे फूड घेत आलोय", वर छताकडे बघत हेल्दी फूड ला मराठीत काय म्हणतात ते आठवत मी बोललो.
"व्हे फूड? अहो ते तर रेसलिंगचे बॉडी बिल्डर घेतात" डॉक्टरांनी मला जराही सिरीयसली न घेता माझ्या वीस टक्के इंग्रजी वाक्याचे शंभर टक्के इंग्रजीत रुपांतर केले
"व्हे म्हणजे ते इंग्रजीमधलं नव्हे हो. मला म्हणायचं होतं आपलं..."
मी काय म्हणतोय तिकडे साफ दुर्लक्ष करत डॉक्टर बिपीच्या काट्याकडे निरखून पाहत होते. बघता बघता ते अचानक उद्गारले,
"ओ माय गॉड" असे म्हणून त्यांनी कपाळावर हात मारून घेतला. पण माझा आत्मविश्वास तरी किती पहा. माझे बिपी नॉर्मल असल्याचे पाहून त्यांचे बिपी वाढले कि काय असा एकदम कुजकट (माझ्या "कॉलेज डेज" च्या भाषेत "कोजक्याट") विचार माझ्या डोक्यात आला.
"आश्चर्य वाटले ना डॉक्टरसाहेब माझा बिपी जराही वर किंवा खाली नसलेले पाहून? अहो, लहानपणापासूनच खाणेपिणे सांभाळून आहे मी. उगीच नाही काय...." त्यातल्या त्यात संयम राखून माझा अतिआत्मविश्वास बरळू लागला
"काय खाता आणि काय काय पिता?" डॉक्टरनी हवा काढत (बिपीच्या पंपातली) आणि त्या नळ्या त्या मशीनला गुंडाळत विचारणा केली.
आता इथे पिता च्या आधी विनाकारण 'काय काय' जोडायची काय गरज होती? आम्हाला काय समजलात तुम्ही? अशी वादग्रस्त विधाने करून आमच्या भावना दुखवायचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? वगैरे वगैरे मनातल्या मनातच मी शिवाजी पार्कवर वाघासारखे भाषण करून घेतले. आणि नंतर मांजराच्या आवाजात म्हणालो,
"अहो, काय काय म्हणजे बघा... लहानपणापासून अगदी सात्विक पौष्टिक... म्हणजे रोज सकाळी उठून मी आधी..." बेडवरून उठून बसत मी शब्दांची जुळवाजुळव करू लागलो.
"तुमचे ब्लडप्रेशर वाढलेले आहे" माझ्या आत्मविश्वासाच्या पेकाटात जोरदार लाथ घालत डॉक्टर शांतपणे बोलले.
पाठीत जोरात बुक्का घातल्यावर हूक भरावी आणि तोंडातून शब्दच निघू नये तसा मी तोंडाचा नुसताच आ वासून "काय? कसे?" अशा अर्थाचे हातवारे करत डॉक्टरांकडे पाहू लागलो. जुन्या काळातल्या व्ही. शांतारामांच्या 'पिंजरा' मधली शेवटच्या सीन मधली ती संध्या.
"दोन चार दिवसांनी या. पुन्हा चेक करू" कोर्टाने तारीख द्यावी अशा थाटात डॉक्टरांनी मला 'पुढची तारीख' दिली आणि पुढच्या पेशंट साठी बेल दाबली
'ओके ठीक आहे. दोन दिवसानी पुन्हा येऊ. नक्कीच यांच्या काट्यात काहीतरी घोळ असणार. हवे तर सेंकड किंवा थर्ड ओपिनियन घेऊ.' असे काहीबाही मनाशी चरफडत पायतान चढवून तिथून बाहेर पडत मी तरातरा घर गाठले.
दोन चार दिवसांनी पुन्हा गेलो. फिर वही शाम. वही डॉक्टर. वही हाय बिपी है. पुन्हा तोच प्रकार. पुन्हा पुढची तारीख. यावेळी मात्र मला डॉक्टर परत पुढची तारीख का देत आहेत ते कळेना. डॉक्टरना आत्मविश्वास नाही कि काय? न राहवून खुर्चीतून उठून उभे राहत त्या 'दामिनी' मधल्या सनी देवलच्या थाटात म्हणायची इच्छा झाली,
"डॉक्टरसाब, अगली तारिक देने से पहले, मै कुछ अरज करना चाहूँगा"
पण डॉक्टरनी माझ्या चेहऱ्यावरचे भाव आधीच ओळखले आणि म्हणाले,
"चिंता करू नका. मेडिकल डिसीप्लिन नुसार ठराविक काळाने तीन चार वेळा चेक करून कन्फर्म करावे लागते. मगच कळेल तुमचा बिपी नेहमीच हाय असतो कि फ्लक्च्यूएशन आहे ते"
"ओके डॉक्टर. अच्छा. ठीक आहे. येतो मी दोन तीन दिवसांनी" माझ्यातल्या सनी देवलचा एकदम अमोल पालेकर झाला.
तीन दिवसांनी सुद्धा पुन्हा तेच. हाय बिपी. हाय हाय रे बिपी. बिपी ने कशाची हाय खाल्ली काय माहीत. डॉक्टरांनी प्रिस्क्रिप्शन वर एक गोळी खरडून दिली. म्हणे रोज सकाळी घ्या. आता हे रोज सकाळी उठून एक गोळी वगैरे म्हणजे मला "कंफ्लेट अनझेप" प्रकरण होते. म्हातारा वगैरे झालोय असे वाटू लागले. तब्येतीची इतकी काळजी घेऊनही बिपीची काजळी आता आयुष्याला चिकटते कि काय?
पहिल्या दिवशी सकाळी गोळी घेतली. ऑफिसला जायला म्हणून निघालो. कार ड्रायविंग करत होतो पण थोड्याच वेळात कारचे विमान आणि मी त्याचा पायलट झालो. हवेतून जात आहोत असे वाटू लागले. समोरच्या गाड्या पण वेड्यावाकड्या तरंगत येऊ लागल्या. मला कळेना मेडिकल वाल्याने चुकून अफू किंवा भांगेची वगैरे गोळी तर दिली नाही? असा विचार करतोय तेवढ्यात गरगरून झोकांड्या खात माझे विमान समोरच्या कार समोर येऊन थांबले. मी गच्चकन ब्रेक मारला. समोरच्याकार मधून तावातावाने एकजण उतरला आणि माझ्याकडे येऊ लागला. मी पण उतरलो. पण माझी मात्र काही उतरायला तयार नाही. एक गिरकी खाल्ली आणि जो समोरून तावातावाने आला होता त्याचाच आधार घेत उभा राहिलो. अब तेराही सहारा.
"धन्यवाद, वेळेला धावून आलात" मी त्या म्हणालो
"काय राव... सकासकाळी टाकून आलाय का? का रात्रीची उतरली नाही?"
"अहो मी रात्री तसले काय घेत नाही. पण सकाळी मात्र घेतली आहे" मी नको इतका प्रामाणिक होऊन अर्धवट बोललो.
"..." समोरच्याला शब्द फुटेना.
"अहो म्हणजे... ब्लडप्रेशरची गोळी घेतली आहे. आज पहिलाच दिवस आहे. म्हणून चक्कर येत असेल"
"अहो मग येडेबिडे हाय का? आमचा जीव कशाला धोक्यात घालता? ड्रायविंग करू नका ना असे असेल तर" असा मौलिक सल्ला देऊन तो महात्मा अंतर्धान पावला.
मी कसेबसे स्वत:ला पुन्हा कार मध्ये ढकलले. पुन्हा घरी आलो आणि डॉक्टरना फोन केला. काय काय झाले ते सांगितले.
डॉक्टर थंडपणे म्हणाले, "सुरवातीला होते असे. गोळी सूट व्हायला वेळ लागतो. मी तुम्हाला सांगितले होते लगेच ड्रायविंग करू नका"
कधी सांगितले होते काय माहित. पण मी काही बोललो नाही. पहिल्या दिवशी ऑफिसला कार नेली नाही. पण दुसऱ्या दिवशी पुन्हा तेच. आता मात्र मला राहवले नाही. किरकोळ सर्दी झाल्यावर चेक करायला म्हणून डॉक्टरांकडे मी गेलो काय आणि हे बिपीचे नसते झेंगट माझ्या मागे लागले काय. अन्यथा मला बाकी तसा कसला त्रास नव्हता. पण आता पुन्हा कुठे डॉक्टरकडे जा. मग ते पुन्हा काहीतरी बोलणार. त्यापेक्षा जाऊ दे. ती गोळीच नको घ्यायला. काय होईल ते पुढेचे पुढे बघू. असा विचार करून गोळी घेणेच बंद केले.
एक दोन महिन्यांनी पुन्हा असेच काही किरकोळ निमित्त झाले म्हणून आम्ही पुन्हा डॉक्टरांकडे. त्यांनी आपल्या शिरस्त्याप्रमाणे पडद्याआड नेऊन अस्मादिकांना आडवे केले. बिपी चेक केले. मी चोरासारखे पाहू लागलो. फासफुस टाकटुक वगैरे करून दोन वेळा रीडिंग घेऊन त्यांनी शांतपणे मशीनला नळ्या गुंडाळल्या. म्हणजे बिपी नक्क्कीच नॉर्मल असणार, असा विचार करतोय तेवढ्यात बॉम्ब पडला,
"तुम्ही बिपीच्या रोज गोळ्या घेता?"
बिपीच्या नावे शिव्यांची लाखोली वाहात मी हल्ला परतवून लावू लागलो,
"नाही. बंद केल्या. ते दुसरे एक डॉक्टर आहेत. त्यांनी बिपी चेक केले. तेंव्हा नॉर्मल आले होते. म्हणून बंद केल्या" धाड धाड मनाला येईल ते मी 'फेकू' लागलो.
डॉक्टर माझ्या शब्दांकडे दुर्लक्ष करून चेहऱ्याकडे निरखून पाहत होते. कुठूनतरी ते गाणे उगीचच मनात तीव्रतेने उगवले. 'दिल कि बात बता देता है असली नकली चेहरा'. ते काय मनातून जाईच ना. आता नाचू का काय हे गाणे म्हणत यांच्यासमोर?
"कुठल्या डॉक्टरनी सांगितले?"
"अं.. आपले... हे... ते... आपले... ते हो... पलीकडच्या गल्लीतले... ? नाहीत का ते..." माझा अशोक सराफ झाला होता.
"हे पहा मी तुम्हाला पुन्हा सांगणार नाही. पण ब्लड प्रेशर कडे दुर्लक्ष केलेत तर भविष्यात त्याचे वाईट परिणाम होतील. सध्या फार वाढलेले नाही तोवरच नियंत्रण केलेत तर बरे" एफबीआयने वॉर्निंग द्यावी अशा थाटात डॉक्टर गंभीरपणे बोलले, "तुम्हाला त्या गोळीचा त्रास होतोय तर गोळी बदलून देतोय. हि नवीन आलेली आहे. रिफाइंड आहे. त्रास होणार नाही. थोडा झाला तरी गोळी स्वत:हून बंद करू नका. आठ दिवसांनी पुन्हा या" वगैरे वगैरे उपदेश देत त्यांनी प्रिस्क्रिप्शनवर वेगळी गोळी खरडली.
मेडिकल मधून ती गोळी घेऊन घरी आलो. दुसऱ्या दिवशी घेतल्यानंतर त्रास नाही झाला. कारचे विमान वगैरे नाही झाले. तिसऱ्या दिवशी सुद्धा नॉर्मल. आठ दिवसांनी डॉक्टरांकडे गेलो. बिपी नॉर्मल. पंधरा दिवसांनी चेक केले. नॉर्मल. म्हणजे गोळी सूट झाली म्हणायची एकदाची.
पण तिच्यापासून आता कायमची सुटका कधी? का आयुष्यभर घेत राहायचे? पुढच्या वेळी एकदा डॉक्टरांकडे गेलो तेंव्हा त्यांना हे विचारले.
"बहुतेक पेशंट आयुष्यभर घेत राहतात. कॉमन आहे. जास्त विचार नका करू. तसेही तुमचे बिपी खूप जास्त नाही. फक्त अधूनमधून चेक करत राहा" त्यांनी नेहमीप्रमाणे दोन तीन वाक्यात मला गारद करून पुढच्या पेशंटसाठी बेल दाबली.
मग आम्ही हताश होऊन गुगलमामाला (हा माझ्या मुलाचा शब्द) विचारले. हा गुगलमामा भारीच आहे. याला काहीही विचारा. सांगतो. गुगलमामाने सांगितले,
"लाइफस्टाइलवर अवलंबून आहे. ब्लडप्रेशर कमी किंवा जास्त याचा थेट अर्थ तुमची लाइफस्टाइल बदलणे गरजेचे. हेल्दी आहार घ्या. जिम वगैरे जॉईन करा. गोळी सुटू शकते"
झाले. तसेही मी पूर्वी योगा करत होतो. काहीच महिन्यापूर्वीच जिम सुद्धा लावली होती. ते गांभीर्याने घेऊन आता रोज न चुकता जाणे सुरु केले. जोडीला डायट पण सुरु केले. स्विमिंग तर नुकतेच शिकलो होतो. रोज नियमाने जाऊ लागलो. काही महिन्यांनी वजन पण बरेच घटले. शरीराला आकार आणि मनाला आत्मविश्वास आला. आणि आता गुगलमामाच्या सांगण्यानुसार बघता बघता हि गोळी पण सुटेल
आरोग्यम् धनसंपदा!
मस्त लिहीलंय !
मस्त लिहीलंय !
मला पहिले वाटले बालकपालक की
मला पहिले वाटले बालकपालक की काय...
हा बीपी पण छान आहे
भारी लिहीलय..
भारी लिहीलय..
छान लिहिलंय..
छान लिहिलंय..
मस्तं लिहिलंय.
मस्तं लिहिलंय.
पंचेस भारी मारलेत.
नक्की किती होता बीपी?
नक्की किती होता बीपी?
मस्त लिहिलंय....finally
मस्त लिहिलंय....finally सर्दीसाठी औषध दिल का नाही डॉक्टरनी?..Lol
omg but you are not supposed
omg but you are not supposed to speak while you get bp checked. reading will be wrong. article is funny but check ecg stress test and sugar also. caring advice.
मस्त लिहिलंय
मस्त लिहिलंय
हे आजार "शेजारी किंवा नातेवाईकांना" होतात असा प्रत्येकाचा स्वतःला ते डिटेक्ट होईपर्यंत समज असतो. ☺️☺️
धन्यवाद सर्वांना
धन्यवाद सर्वांना
>> मला पहिले वाटले बालकपालक की काय...
ऋन्मेऽऽष या बिपिचा वेगळा अर्थ निघण्याचा पण एक किस्सा झाला होता पण विषयांतर होईल म्हणून आवरता घेतला लेख
>> नक्की किती होता बीपी?
अगदी च्रप्स स्टाईल प्रश्न हा हा हा... ओके जास्त नाही. ग्रीन मधून यलो मध्ये गेला होता पण आता पुन्हा ग्रीन मध्ये आहे.
>> finally सर्दीसाठी औषध दिल का नाही डॉक्टरनी?..Lol
ज्वाला, Spot on हा हा हा. दिले दिले. पण नेमेची येते मग सर्दी या नियमाने ती वर्षातून एक दोनदा येतेच. यावरून एक जोक आठवला. माझ्या एका मित्राला सर्दीचा खूप त्रास होतो. म्हणजे झाली सर्दी कि आठवडेच्या आठवडे मुक्कामाला असते. एकदा त्याला भेटायला गेलो. हा एकदम प्याक. मी विचारले "अरे अजून गेली नाही तुझी सर्दी?" तर मिश्किलपणे हा म्हणतो, "नाही रे, हाऊसफुल्ल सर्दीचा दुसरा आठवडा"
@अमा: नाही हो. बिपी घेताना न बोलताच पडून होतो सुदैवाने शुगर किंवा बाकी काही नाहीये. पण हो एकदा ती फुल्ल बॉडी स्कॅन टेस्ट करायची आहे. त्यात हे सगळे कव्हर होते म्हणे. तुमची चिंता योग्यच आहे. अनेकदा आपल्याला वरवर सगळे ओके वाटत असते. कसला त्रासही नसतो. पण आतल्या आत बिपी शुगर किंवा अन्य गोष्टी हळूहळू कुरतडत असतात.
>> हे आजार "शेजारी किंवा नातेवाईकांना" होतात असा प्रत्येकाचा स्वतःला ते डिटेक्ट होईपर्यंत समज असतो.
mi_anu, अगदी अगदी पण बिपी शुगर आजकाल खूप कॉमन झालेय.
ग्रीन मधून यलो मध्ये गेला
ग्रीन मधून यलो मध्ये गेला होता पण आता पुन्हा ग्रीन मध्ये आहे.
>>> गोळ्या घ्यायची गरज नाही येल्लो मध्ये, मीठ कमी करून परिणाम साधला गेला असता.
अभिनंदन ग्रीन मध्ये आल्याबद्धल.. आता डायट नीट ठेवा ☺️
गोळी कायमचीच मानगुटीवर बसेल.
गोळी कायमचीच मानगुटीवर बसेल. सहा महिन्यांनी पुन्हा बीपी वाढेल. मग वारंवार.
बीपीवर कायमचे आणि खरे रोग दूर करणारे औषध त्यांच्याकडे नाही हे कोणताही डॅाक्टर कबूल करणार नाही. प्रत्येकवेळी बीपी वाढले की 'लाइफस्टाइल बदला,व्यायाम करा ,*,*,*, हे खाऊ नका'चे अस्त्र फेकतील. गुगलबाबा/मामाचेही ऐकू नका.
वयाप्रमाणे नसा जाडजाड होऊ लागतात ते प्रत्येकाचे प्रमाण वेगवेगळे असते. त्रिफळा चूर्ण चिमुटभर प्रत्येक खाण्याबरोबर घ्या. दुसरे काहीही नको. स्वस्त अन परिणामकारक. शिवाय बीपीची गोळी चुकवल्याने प्रेशर सटाककन वाढते तसलं काहीही होत नाही चूर्ण घेण्याचं थांब त्याने. ( बीपीच्या गोळ्या अधिक चूर्ण असला उद्योग करू नये.)
@Srd
@Srd
तुम्ही स्वतः डॉक्टर आहात का? तुम्हाला त्या दुसऱ्या डॉक्टरांपेक्षा जास्त माहीत आहे अशा थाटात बोलताय म्हणून शंकानिरसनासाठी विचारले. लाइफस्टाइलवर लक्ष द्या हा सल्ला सुयोग्य आहे.
खूप छान लिहिलेय. प्रत्येक ओळन
खूप छान लिहिलेय. प्रत्येक ओळन ओळ आवडली.
मस्त लिहिलेय
मस्त लिहिलेय
काही गोष्टी प्रचलित करण्यात
काही गोष्टी प्रचलित करण्यात चूक म्हणायचे नाही का? (लेखाचा विषय नाही पण सिझेअरिअन पद्धतीने बाळंतपण प्रकार कसा काय वाढला?)
@गोल्डफिश, सुमुक्ता: धन्यवाद
@गोल्डफिश, सुमुक्ता: धन्यवाद
@च्रप्स: धन्यवाद. हो माझा तोच प्रयत्न आहे
@Srd: मी डॉक्टर नाही पण आपला मुद्दा योग्य आहे असे वाटते. माझ्या माहितीनुसार दोन प्रकारचे रक्तदाब असतात. एक जो तात्कालिक कारण किंवा लाइफस्टाइलचा परिणाम म्हणून होणारा आणि दुसरा कशाचा परिणाम म्हणून न येता वयपरत्वे आपसूकच येतो अनुवांशिक कारणांमुळे वगैरे. तर हा दुसरा प्रकार कायमचा चिकटतो. आपण सांगितलेला उपाय आयुर्वेदिक आहे. नारळपाणी पिणे किंवा जवस बियांचा आहारात समावेश करणे (Magnesium supplementation) हे पण उपाय आहेत. असो. हा धागा विनोदी अंगाने लिहिला आहे. मायबोलीवर अलीकडेच एक दोन धागे केवळ या विषयावर निघाल्याचे वाचले. लिहिणारे डॉक्टर होते. मला वाटते तिथे आपल्याला हि चर्चा सविस्तरपणे करता येईल.
भारी लिहिलंय....
भारी लिहिलंय....
मस्त लिहिले आहे.
मस्त लिहिले आहे.
हे आयुष्यासाठी शुभेच्छा!!
(No subject)
धन्यवाद मेघा., अॅमी, अदिति
धन्यवाद मेघा., अॅमी, अदिति