खोपा
अरे खोप्या मंदी खोपा..कसा झाडले टांगला..मनात गाणे गुणगुणत मी खिडकीतून बाहेर बघत होते..त्याची सकाळपासून धडपड.. एक चिमणा जीव , समोरच्या बंगल्यासमोर असलेल्या प्राजक्ताच्या झाडाभोवती सतत घिरट्या घालत होता. काहीतरी शोधत, इकडून तिकडे तिकडून इकडे..अखेर त्याला गवसलं..एक निमुळत्या फांदीचं टोक..बऱ्यापैकी सवलीकडे झुकणारं.. वाऱ्यासोबत झोके घेणारं.. त्यावर त्याला घरटं करायचं होतं..मग हळू हळू त्याची त्या फांदीवर ये-जा सुरू झाली. त्याच्या चोची मधून घरट्या साठी लागणारं समान येऊ लागलं.. मी दिवसभरात अधूनमधून खिडकीतून डोकवायचे, तर याची धडपड चालूच असायची..अविश्रांत..
दुसऱ्या दिवशी सकाळी मी नेहमीप्रमाणे पुन्हा खिडकीतून डोकावले तर घरटे तयार..अविश्रांत मेहनत घेऊन त्याने बनवलेला तो खोपा वाऱ्याबरोबर मस्त डुलत होता. पण अजूनही तो काहीतरी करतच होता..मग समजले ,हो सगळी धडपड होती त्याच्या येणाऱ्या चिमण्या जीवनासाठी..चोचीतून दोरे आणणे, पिसे आणणे.. कुठूतरी कापूस आणणे..आणि वाटलं तर आपणही त्या खोप्यासोबत दोन झोके घ्यायचा आणि कुणाची चाहूल लागताच पसार व्हायचा..
दोन दिवस चालू असलेला हा कारभार तिसऱ्या दिवशी अचानक शांत झाला आणि काही दिवस मला तो दिसला नाही..आणि एक दिवस अचानक चोचीतून पिलांना खाऊ भरवताना दिसला..मलाच इतका आनंद झाला होता की काय सांगाव..म्हटलं चला सगळं व्यवस्थित पार पडलय याचं..आणि येता जाता त्या खोप्याकडे बघण्याचा उद्योग च चालू झाला माझा..
पण..एके दिवशी मात्र बंगल्याच्या मालकाने कंपाउंड बांधण्यासाठी ते प्रजक्ताचं झाडं तोडलेलं दिसलं..तो पक्षी इकडून तिकडून घिरट्या घालताना दिसला..बिचारा..कुणास ठाऊक त्याची पिलं मेली होती की जिवंत होती..ते पाखरू दोन दिवस घिरट्या घालून घालून शेवटी निघून गेलं.. वाटलं ,त्याच्याकडं कुठं होता इन्शुरन्स, त्याच्याकडं कुठं होते पोलीस तक्रार करायला..त्याच्याकडे कुठं होती देवाची मूर्ती, समोर बसून दु:ख करायला.. होता फक्त नवा दिवस, नवा निश्चय.. सगळे बळ पुन्हा एकवटून नवे घरटे बांधण्याचा..
© हर्षा स्वामी
(No subject)