रातराणीचे सुगंधी फूल आहे ती!

Submitted by सत्यजित... on 11 April, 2018 - 19:18

चांदण्या रात्रीस पडली..'भूल' आहे ती...
रातराणीचे सुगंधी फूल आहे ती!

वाढत्या पाऱ्यासवे तीही फुलत जाते...
मोगऱ्याची मल्मली चाहूल आहे ती!

आजही,प्राजक्त आला हातघाईवर!
मंद वाऱ्याने दिलेली हूल आहे ती!

आणखी श्वासांत आहे चांदणे बाकी...
केस सावरण्यातही मश्गूल आहे ती!

ती म्हणाली..शेवटी,निर्माल्य होवू दे...
मी विठूला वाहिलेले फूल आहे ती!

================================

ती निखारेही तिच्या पोटात घेते,अन्
लेकरांना रांधते..ती,चूल आहे ती!

येथल्या प्रत्येक स्त्रीचे कर्ज जाणूया...
की,जिवांना सांधणारा पूल आहे ती!

—सत्यजित

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुरेख...

शेवटचे दोन विशेष आवडले.... Happy

वाह..मस्त लिहिलय...
ती निखारेही तिच्या पोटात घेते,अन्
लेकरांना रांधते..ती,चूल आहे ती!>>> मस्त!

आणखी श्वासांत आहे चांदणे बाकी...
केस सावरण्यातही मश्गूल आहे ती!>> पहिली ओळ वाचताना काहीतरी खटकतेय...

चू. भू. द्या. घ्या.

सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद!

>>>पहिली ओळ वाचताना काहीतरी खटकतेय...>>>पुन्हा तपासून पाहिले,ओळ वृत्ता बरहुकुम आहे. राबताही सहज लक्षात यावा,असाच वाटतो आहे!