डाग

Submitted by क्षास on 2 April, 2018 - 10:15

रोज कितीतरी वेळा
मी आरशात स्वतःला पाहते.
माझा चेहरा वेगवेगळ्या कोनांतून न्याहाळते.
प्रत्येक डाग ,मुरूम मी बारकाईने बघते.
पुन्हा तीच ती नाराजी, पुन्हा तीच ती हळहळ
पुन्हा तेच ते प्रयोग, पुन्हा क्रीम्स,फेसपॅक,क्लीनअप्स
किती काय थापतो आपण चेहऱ्यावर
किती काय फासतो आपण चेहऱ्यावरच्या डागांवर
एके दिवशी वाटलं,
मनावरच्या चिवट आठवणींचे डाग निरखून बघण्यासाठी
कोणता आरसा असता तर...?
ते ही डाग घालवायला कोणते मलम असते तर...?
दहा दिवसांत लख्ख उजळपणा देणारी क्रीम
मनाचं सावळेपण घेऊन गेली असती.
आजूबाजूची माणसं देवो ना देवो निदान
क्रीमतरी मनाला एक कोमल एहसास देऊन गेली असती.
दुर्दैवाने मनावरच्या डागांसाठी कोणती नैसर्गिक ट्रीटमेंटही नाही!
आपण आपल्या मनावरचे डाग पुसायला
इतरांच्या शब्दांचा सहारा मागतो
आपल्याच मनाचं प्रतिबिंब बघायला
इतरांच्या डोळ्यांचा आरसा का लागतो?
खरंतर मनाला निरखून बघण्यासाठी ना डोळे लागत ना आरसा
आपलंच आपल्याला सगळं जाणवत असतं सहसा
नक्की करावं काय मग?क्षणभर डोळे मिटून शांत बसावं
काळ हेच औषध हे ध्यानी असावं
शेवटी डाग चेहऱ्यावर असो वा मनावर, ते विसरून मुक्तपणे हसावं

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users