आक्रोश

Submitted by क्षास on 25 March, 2018 - 06:02

दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महिला दिनी शुभेच्छांचा वर्षाव झाला होता ,whatsapp वर तर अशा मेसेजेसचा सुळसुळाट झाला होता. मी ही माझ्या जवळच्या लांबच्या अनेक मैत्रिणींना मेसेज पाठवले... अशा दिवशी मला हमखास तिची आठवण होते.
ती, तिचं नाव मेघा. माझ्याहून साधारण दोन वर्षांनी मोठी असेल ती. आमची ओळख कधी झाली ते आठवत नाही. तिचं घर आमच्या वाड्याच्या शेजारी होतं. जेव्हा मी गावी जायचे तेव्हा मी आमच्या घरात कमी त्यांच्याच घरात जास्त असायचे. त्यांच्या शेणाने सारवलेल्या अंगणात आम्ही दोघी खेळायचो. कधी मी तिच्यासोबत रानात जायचे तर कधी आम्ही पाणी भरायला जायचो. ती डोक्यावर ओढणी गुंडाळून ठेवून त्यावर दोन मोठे पाण्याचे हंडे घेऊन तरातरा चालायची.मी मात्र छोटीशी कळशी उचलून उचलून दमायचे. कधी मी तिला बॅडमिंटन खेळायला शिकवायचे. नदीवर कपडे धुवायला जाणं, भांडी घासणं, चुलीसाठी सर्पण तोडून आणणं, म्हशींचं दूध काढणं, भाकरी थापणं, घरातलं सगळं आवरून कॉलेजला जाणं हा तिचा दिनक्रम होता. मेघा तालुक्याच्या ज्युनिअर कॉलेजमध्ये शिकत होती. ती आल्यावर आम्ही सागरगोटे,काचापाणी असे खेळ खेळत असू. रात्री त्यांच्या ब्लॅक अँड व्हाईट टीव्हीवर छायागीत बघून झाल्यावर मी आमच्या घरी झोपायला जात असे. अशाप्रकारे माझी उन्हाळ्याची सुट्टी हा हा म्हणता संपत असे.
पुन्हा पुढच्या वर्षी गावाला जायची लगबग सुरु झाली की माझी आई आमचे जुने कपडे, जुनी दप्तरं एकत्र बांधायची, मेघा आणि तिच्या लहान भावंडाना दयायला. मी एकदा आईला विचारलं," आपण त्यांना जुनी पुस्तकंपण देऊया ना. मेघाला आवडतं वाचायला." त्यावर आई म्हणाली," तिला वेळ कुठे मिळतो वाचायला! ती आता काही महिन्यांत जाईल सासरी. मग तर बिलकुल वेळ मिळणार नाही तिला"
" सासरी? " मला धक्काच बसला. " ती तर आता बारावीतच आहे. इतक्या लवकर कसं लग्न होईल तिचं!" मी अस्वस्थ झाले.
मे महिना उजाडला. दरवर्षीप्रमाणे सुट्टी लागल्यावर आम्ही गावी गेलो. जेव्हा मला कळलं की मागच्याच महिन्यात मेघाला एक स्थळ आलं तेव्हा मी उडालेच. पुढची चक्र भराभर हलली. तालुक्यातल्या एका जमीनदाराच्या मुलाशी तिचा साखरपुडा झाला. दुप्पट वयाच्या, अनोळखी, आडदांड माणसाच्या बाजूला मेघा उभी राहिली आणि अगदीच कोवळं कोकरू भासली. तिच्या घरचे भलतेच खुश होते. त्यांच्यावरचं घरातल्या तरुण मुलीच्या लग्नाचं ओझं उतरत होतं. त्यांच्यामते मेघाचं नशीब थोर म्हणून तिला असं सासर मिळालं होतं. चांगला कर्तबगार नवरा, सोन्यासारखं कुटुंब,माणसांनी भरलेला दुमजली वाडा,कित्येक एकर शेतजमिनी,त्यात मुलीला पुढे शिकायचं स्वातंत्र्य! तिच्या आईवडिलांनी कुठुनकुठुन पैसे गोळा करून थाटामाटात तिचं लग्न लावून दिलं. लग्नाच्या दिवशी ती मला म्हणाली, " बारावीचा निकाल लागला तव्हापेक्षा जास्त खुश आहेत समदी! हे लग्न नाही हा सौदाच तर हाय! माझ्या फिया भरायला पैसं नसत आणि आता लग्नासाठी पैसं कुठून आलं!! " माझ्याकडे तिच्या प्रश्नांची उत्तरं नव्हती. तिच्या प्रश्नांची उत्तरं कोणाकडेच नव्हती... तिच्या अपुऱ्या इच्छाआकांक्षा, छोटीमोठी स्वप्नंही तिच्यासोबत घराबाहेर पडली. असहाय्य मेघाने त्यादिवशी नवीन घराचा उंबरठा ओलांडला.
दिवसांमागून दिवस गेले. दोनेक वर्षांनी आम्ही तिच्या सासरी गेलो. तिच्या मांडीवर एक वर्षाचं लहान बाळ रडत होतं.
का कोण जाणे, मला तर मेघाच्या घुसमटीचा, बळी गेलेल्या स्वप्नांचाच आक्रोश ऐकू येत होता.

Group content visibility: 
Public - accessible to all site users