कृपा अन्नपूर्णेची ...

Submitted by मनीमोहोर on 4 March, 2018 - 07:12

मी तुम्हाला आत्तापर्यंत आमचं खळं, आगर, माळा, माजघर सगळं दाखवलं पण कोणत्याही घराचं सैपाकघर हा त्या घराचा आत्मा असतो . आमचं कोकणातलं घर ही याला अपवाद नाही . चला, आज आपण तिथली सैर करू या.

मी जेव्हा लग्न होऊन पहिल्यांदा आमच्या कोकणातल्या घरी गेले तेव्हा आमच्याकडे चुली होत्या . स्टो ही होता पण तो फक्त इमर्जन्सी साठीच ठेवलेला असे. चुली जिथे होत्या तिथे वर धूर जाण्यासाठी दोन कौलांची धुरांडी होती. आता त्याचा उपयोग नाही चूल नसल्यामुळे पण ती धुरांडी अजून ही आहेत तशीच. चुलीच्या जवळ एक मोठं फडताळ होतं आणि सैपाकासाठी रोज लागणाऱ्या वस्तू, पातेली वैगेरे तिथे ठेवत असत. लाईट आले होते आमच्या कडे पण तो अगदीच बेभरवशाचा कारभार असल्याने चुलीच्या मागे चिमण्या, भुत्ये कधी ही लागले तर पट्कन हाताशी असावेत म्हणून कायम घासून पुसून ठेवलेले असत. एका कोपऱ्यात एक मोठा ओटा होता आणि त्यावर सोवळ्यातल्या पाण्याच्या हंडे कळश्या भरून ठेवलेल्या असत आणि खाली चुलीसाठी लागणारी लाकडं रचून ठेवलेली असत. चुलीचा धूर खाऊन खाऊन कौलांच्या खालच्या काळपट झालेल्या लाकडी पट्ट्या अजून ही तशाच आहेत. सैपाकघरात कपडे वाळत घालायच्या तीन चार दांड्या होत्या आणि त्यावर स्त्रियांची सोवळ्यातली लुगडी, मूकटे, हात पुसायची सोवळ्यातली फडकी वैगेरे वाळत घातलेली असत. एका बाजूच्या भिंतीत दूध तापवायचं थारळ होतं. आमचं सैपाकघर खूप मोठं आहे त्यामुळे छपराला आधार मिळावा म्हणून एक खांब आहे सैपाकघरात, तोच ताकमेढी साठी वापरात येत असे. त्या काळी जेवणं तर पाटावर बसुनच होत असतं पण अगदी चहा ही आम्ही सगळेच पाटावर बसून घेत असू. त्यामुळे एका कोपऱ्यात चांगले पंधरा वीस पाट उभे करून ठेवलेले असत. त्यातले काही पितळेच्या फुल्या ठोकलेले ही होते. आमच्या सैपाकघराची जमीन मात्र तेव्हा ही मातीची किंवा सारवणाची नव्हती . सिमेंटचा कोबा घातलेला होता. आता काळानुसार अनेक बदल होऊन अगदी आधुनिक सैपाकघरात असतात तशा पुष्कळ गोष्टी आमच्याकडे आल्या आहेत.

सैपाकघराला पश्चिमेकडे एकच खिडकी आहे. काचेच्या कौलांमुळे उजेड कमी नाही आणि मोठं असल्याने हवेशीर ही वाटत. त्या खिडकीशी रुक्मिणची आठवण कायमची जोडली गेली आहे. रुक्मिण म्हणजे रुक्मिणी म्हणजे आमची बुरडीण जी आम्हाला बांबूच्या टोपल्या, वेचण्या, सुपं, रोवळ्या, परड्या अशा वस्तू पुरवत असे. तेव्हा प्लास्टिक नसल्याने ह्या वस्तू लागत ही खूप असत. दर महिना दोन महिन्यांनी सकाळीच ती ऑर्डरच्या वस्तू खळ्यात आणून टाकी आणि ओटीवरून पैशाचा हिशोब झाला की आमच्या ह्या सैपाकघराच्या खिडकीत येऊन उभी राही. त्यावेळच्या प्रथे प्रमाणे ती घरात कधी आली नाही. बाहेरूनच सगळ्यांची चौकशी करत असे. ती बाहेर आणि आम्ही सैपाकघरात अश्या गप्पा रंगत. आम्ही मुंबईच्या कोणी आल्याचं ही तिला माहीत असे. ' माका ठावं हाय मुंबई वाली ईलय ते. बोलाव तिका ' म्हणून आमच्याशी ही ती गप्पा मारीत असे. जाताना मग चहा, न्यारी, जुने कपडे कधी लिंबाचं किंवा आंब्याचं लोणचं आणि थोडे पैसे असं सगळं घेऊनच जाई घरी.

पहाटे चहाच्या आधणात घातलेल्या आल्याच्या नाहीतर गवती चहाच्या वासाने सैपाकघर जागं होतं. आजकाल शहरात जनरली घरात एकच बाई असते. जास्तीत जास्त दोन. पण आमच्या घरी कोकणात कायम तिथे रहाणाऱ्या सहा जणी आहेत पण सैपाकघर मात्र एकच. सगळं कसं अगदी शिस्तीत आणि मजेत चाललेलं असतं. आगरात पिकून तयार असलेल्या भाज्या, मुलांच्या फर्माईशी, सणवार आणि इतर समारंभ , वाढदिवस, जेष्ठांचं पथ्यपाणी हे विचारात घेऊन काय सैपाक करायचा हे सगळ्या जणी मिळून आदल्या दिवशी रात्रीच ठरवतात. प्रत्येकीची कामं साधारण ठरलेली असली तरी त्याचा फार अट्टाहास धरला जात नाही. एखादीला तिचं काम करायला नाही जमलं तर त्याचा इश्यू न करता दुसरी कोणीतरी ते काम करून ही टाकते. मला वाटतं आमच्या यशस्वी एकत्र कुटुंबाच सगळं श्रेय सैपाकघरातील ह्या समंजसपणाला आहे. चहा, न्येरी, मुलांचे डबे, पोळ्या, इतर सैपाक ह्या आघाड्यांवर प्रत्येक जण आपापलं काम करत असते आणि जोडीला गप्पा, विनोद हे ही असतंच. सकाळच्या वेळी सैपाकघर म्हणजे सर्वात हॅपनिंग जागा असते घरातील. जेवायची वेळ झालीय आणि सैपाक तयार नाही असं कधी ही होत नाही आमच्याकडे. शेवटी आम्ही पडलो कोब्रा . आमची वेळेची बांधिलकी म्हणजे विचारू नका. घड्याळात साडे बाराचे टोले पडले की पहिली पंगत बसलीच म्हणून समजा. अगदी घड्याळ लावून घ्यावं.

दुपारचं आवरलं की सगळ्याजणी जरा आराम करतात पण सैपाकघराला मात्र तेव्हा ही आराम नाही मिळत. कारण घरातल्या एका मुलाला सैपाकाची खूप आवड आहे. त्याची शाळा सकाळची असते आणि तसं ही सकाळच्या घाईत त्याला कोणी एन्ट्री देत नाही सैपाकघरात. त्यामुळे दुपारच्या वेळी त्याची सत्ता असते सैपाकघरावर. आहे त्या साधनात आणि उपकरणात त्याचे रोज नवनवीन प्रयोग सुरू असतात. कधी नाचणीच्या कुकीज, कधी पॅन केक कधी भजी कधी चहा, कधी पेरुच सरबत अस काहीतरी रोज सरप्राईज असत आम्हाला. भविष्यात जर हा कोणी मोठा प्रसिद्ध शेफ झाला तर त्याच सगळं श्रेय आमच्या ह्या सैपाकघराला जाईल ( स्मित ). कधीतरी मुलांच्या फर्माईशी नुसार बटाटेवडे, पाणी पुरी, इडल्या असा काहीतरी चमचमीत बेत ठरतो. संध्याकाळी त्या खमंग वासाने सैपाकघर पण ताजतवानं होत.

आज कितीतरी वर्ष झाली पण आमच्या घरची एक अनोखी पद्धत म्हणजे रात्री आम्ही सगळ्या बायका पहिल्यांदा जेवतो आणि घरचे सगळे पुरुष आमच्या नंतर जेवतात. रात्री साडे नऊ दहाच्या मानानी सगळं आवरलं जातं दिवा घालवला जातो आणि सैपाकघर शांत होत, पण बिचारं सैपाकघर.. रात्री मांजरं कडमडत असतात सैपाकघरात कधी पातेली वैगेरे पण पाडवतात आणि सैपाकघराला नाहीच विश्रांती मिळत.

घरात काही कार्य असेल तर मात्र सैपाक घराला जरा आराम मिळतो कारण अश्या वेळी मागच्या अंगणात चुली मांडून अन्न रांधलं जातं आणि सैपकघरात फक्त कोणाचा बिन साखरेचा चहा किंवा लहान बाळाचा गुरगुट्या भात असे लिंबू टिम्बु आयटेमच शिजतात.

कोकणातल्या आमच्या घराला कुलूप कधी लागतच नाही. देवाला रोज नैवैद्य ही दाखवला जातोच त्यामुळे चूल थंड असा एक ही दिवस जात नाही. कोकणातली घर राहायला माणसं नाहीत म्हणून बंद पडतायत पण आज शंभर सव्व्वाशे वर्ष झाली इतकी स्थित्यंतरं पचवली सैपाकघराने पण ह्या आमच्या घरातली चूल मात्र पेटती आहे, घरातल्या सर्वाना जेवू खाऊ घालण्याचा घेतलेला वसा तिने इतकी वर्षे संभाळलाय ही अन्नपूर्णा देवीची कृपाच ...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

व्वा सुरेख लेख . अक्षरशः सैपाक घराची सफर घडवलीत. खूपच छान. लहानपणीच्या आठवणी ताज्या केल्याबद्दल मनापासून धन्यवाद

फार फार फार सुंदर ! मी तुमच्या इथल्या भागातीलच आहे त्यामुळे खूपच relate झालं, लेख वाचताना मी पण अशाच एक थोड्याश्या धुरकट , थोड्याश्या अंध्याऱ्या स्वंयपाकघरात बसून चहा पीत आहे असे वाटले. मी जिथे राहते तिथे दर शनिवारी सकाळी एका trail वरून जाताना एका घराच्या का चर्चच्या बॅकयार्ड मधून हमखास चुलीचा वास येतो , कोकणात सकाळी काळ्याकुट्ट झालेल्या हंड्यात चुलीवर अंघोळीचे पाणी गरम करताना येतो तस्सा , तो वास आला की आपण अशाच स्वंयपाकघराच्या सानिध्यात आहोत असे वाटते, आता तुमचा लेख पण आठवेल नेहमी.

नेहमीप्रमाणे छानच झालाय लेख! ओढ लावलीये तुझ्या घराने .....
ज कितीतरी वर्ष झाली पण आमच्या घरची एक अनोखी पद्धत म्हणजे रात्री आम्ही सगळ्या बायका पहिल्यांदा जेवतो आणि घरचे सगळे पुरुष आमच्या नंतर जेवतात.>>>> हे फारच आवडले.

ममो...इतकंच? थोडक्यात आटपून टाकल्यासारखं वाटतंय..पूर्ण पुरणावरणाच्या स्वयंपाकासारखा लेख लिहा ना...आम्हाला आवडतात तुम्चे लेख वाचायला Happy

कितीतरी वर्ष झाली पण आमच्या घरची एक अनोखी पद्धत म्हणजे रात्री आम्ही सगळ्या बायका पहिल्यांदा जेवतो आणि घरचे सगळे पुरुष आमच्या नंतर जेवतात.>>>> सो स्वीट Happy
आमच्या घरी एकदा दसर्‍याला, पुरुषांची जेवणं झाले आणि पुरणपोळी संपली. माझ्या टीनेजर भाचीने आम्हाला उपदेशाचे जे डोस पाजले ना..थांबतच नव्हती Lol स्त्री पुरूष समानतेवर तिने आमचं सॉलिड बौद्धिक घेतलं होतं. चांगलाच सात्विक संताप झाला होता तिचा Happy

सर्व प्रतिसादकांचे मनापासून आभार.

प्रज्ञा आणि वाट्टेल ते प्रतिसाद खूप आवडला आहे.

अनु मूकटा आणि कद ह्यातलं साम्य म्हणजे ही दोन्ही सोवळ्यातलेच प्रकार आहेत. मूकटा म्हणजे स्त्रियांची सोवळ्यातली साडी जी सैपाक करतानाच नेसली जाई. पुरुष पूजा करताना वापरतात तो कद. तसेच पूजा करताना नेसायचं स्त्रियांचं ही रेशमी लुगडं असे. पूजेला बसताना मूकटा नेसून बसत नसत.

पलिता माझ्यामते खूप मोठा असतो. भुत्या ची साईज म्हणजे बेनेड्रॉल ची वैगेरे बाटली . योकु, टेम्भा हा शब्द ऐकलाय पण तोच आमचा भुत्या हे नव्हतं माहीत.

एकत्र कुटुंबात ते ही कोकणात, बायकांनी रात्री आधी जेवायची पद्धत खरंच अनोखी आहे. म्हणूनच मुद्दाम मी ते लिहिलं होतं. त्याची तुम्ही सगळ्यानी दखल घेतलीत खूप खूप छान वाटतय. त्यासाठी ही धन्यवाद.

माझं हे लिखाण वाचून तुम्हाला प्रत्यक्ष बघायची ओढ वाटतेय , याहून आणखी सुंदर माझ्यासाठी काय असेल ? सगळ्याना आमच्याकडे येण्याचे आग्रहाचे आमंत्रण.

तुम्ही फोटो हवे म्हणताय पण आमचं सैपाकघर काही खूप पॉश, आधुनिक नाहीये की अगदी त्याचे फोटो दाखवावेत. पण तरी ही आता जाईन घरी तेव्हा काढते आणि दाखवते इथे.

हेमाताई खुपच छान लेख.
लेखात फोटो नसले तरी मी तुमच्या स्वयंपाक घरात फिरून आलो. मला खिडकीतुन रुक्मिणही दिसली, गवती चहा हे सगळंच दिसल. Happy
तुमच्या आणि जागुच्या लेखात मराठी मातीचा सुवास असतो. तुमच्या दोघींच्या लेखात कमालीचा आपलेपणा असतो>>>> जिप्सीचा प्रतीसाद माझ्या मनातले लिहुन गेला. मग मी काय आणिक लिहीणार? ममो, तुझ्या आठवणी आमच्यासाठी खमंग शिदोरी आहे.

तुम्ही फोटो हवे म्हणताय पण आमचं सैपाकघर काही खूप पॉश, आधुनिक नाहीये की अगदी त्याचे फोटो दाखवावेत. >>>>>>>>> फोटोतही येणार नाही असा जिव्हाळा, प्रेम जाणवतंय की या लेखातून.... Happy
____/\___

ममोताई , मस्तच आहे हे सगळं .
आमचं कुठल्याच गावी असं जुनं घर नाही Sad .
न माहेरी, ना आजोळी ना सासरी . चुलत मामांची , काकांची घरे आहेत पण तिकडे सगळीकडे आता गॅस आले .
फार लहानपणी आजोबांच्याआत्याचाणि मामाच्या गावी गेलेले , तिथल्या काही अंधूक आठवणी ताज्या झाल्या.
आत्याला किन्वा आजीला चुलीवर जेवण करताना पाहिलयं . फुन्कणीचा आवाज दूरून आल्यासारखा आठवतोय .
बाटलीचा वातीचा दिवा आठवतोय

कोकणात सकाळी काळ्याकुट्ट झालेल्या हंड्यात चुलीवर अंघोळीचे पाणी गरम करताना येतो तस्सा >>>>> येस्स्स्स्स्स्स , हा वास ईथे शहरात येतो कधी कधी .एक्दम नॉस्टाल्जिया !

कौलारु घरे म्हण्जे आमचा विक पॉईन्ट.
अतिशय सुरेख लेख! अगदी बोट धरुन फिरवुन आणलेस स्वयम्पाकघरात.
<<त्री आम्ही सगळ्या बायका पहिल्यांदा जेवतो आणि घरचे सगळे पुरुष आमच्या नंतर जेवतात. << हे वाचुन फार भारी वाटले. Happy

<<त्यामुळे एका कोपऱ्यात चांगले पंधरा वीस पाट उभे करून ठेवलेले असत. त्यातले काही पितळेच्या फुल्या ठोकलेले ही होते. << हे वाचुन आम्ही मागच्या वर्षी केलेली पावस, गणपतिपुळे,मालगुंड ट्रीप आठवली. मालगुंडला मुक्काम केला होता. केशवसुत यांच्या घराजवळ ३०० वर्ष जुना लिमये वाडा आहे. तिथे जवळजवळ ७६ असे पाट होते. म्हणजे एके काळी इतक्या लोकांचा राबता होता तिथे.
बाहेरची बैठकीची खोली, बंगळी , वाड्यात मध्ये ओपन स्पेस, आणि बाजूने रूम्स. प्रज्ञा म्हणते तशी एक स्पेशल बाळंतिणीची खोली पण होती.
परदेशी मंडळी या घराच्या अभ्यासासाठी येऊन गेलीत म्हणे. कुठल्याश्या आगामी मराठी सिरीयलचे शुटींग ही झालेय.

तुम्ही फोटो हवे म्हणताय पण आमचं सैपाकघर काही खूप पॉश, आधुनिक नाहीये की अगदी त्याचे फोटो दाखवावेत >>> पॉश, आधुनिक अपेक्षित नाहीच, ते तर कॉमन आहे इथे शहरात. त्यामुळे गावातल्या स्वयंपाकघराचे फोटोच हवेत. माझ्या माहेरीतर अजूनही प्रॉपर शेणाचं, चुलीचं आहे, गॅसपण आहे. सासरी मात्र आता शेणाचं नाही पण रोज चुलीवर स्वयंपाक असतो, गॅस असून. दोन्हीकडचे फोटो नाहीत मात्र माझ्याकडे.

मी अलीकडेच कोकणात जाऊन आलो .
अशाच स्वयंपाकघरात आठ दिवस जेवून खाऊन आलो.
आज हा लेख वाचला आणि परत कोकणात जाऊन आलो.

वर सगळ्यांनी सगळंकाही म्हणून ठेवलच आहे. त्यामुळे फक्त छान एवढच म्हणतो.
हेमाताई म्हटलं की माझ्या डोळ्यांसमोर फक्त नाजुक गव्हलेच येतात. असं का?
काहीतरी केलं पाहिजे यावर. Wink

Pages