वलय (कादंबरी) - प्रकरण १९ ते २३

Submitted by निमिष_सोनार on 28 February, 2018 - 21:55

भाग १७ आणि १८ ची लिंक: https://www.maayboli.com/node/65437

(आज पाच प्रकरणे १९ ते २३ एकदम टाकतो आहे. मग २४ वे प्रकरण ६ मार्चला प्रसिद्ध होईल!)

प्रकरण 19

बस ड्राइवरने अचानक जोरात ब्रेक दाबल्याने राजेशची तंद्री भंग पावली. बसमध्ये बाजूच्या सीटवरचा रा. म. मालवणकर यांचे “जीवनाचे शिल्पवृक्ष” हे पुस्तक वाचणारा आधीच्या स्टँडवर केव्हाच उतरून गेला होता. धर्मापूरला जाऊन तो जे करणार होता त्याद्वारे त्याच्या प्रतिशोधाच्या शोधार्थ एक पाऊल तो टाकणार होता.

धर्मापूरच्या “धर्म वार्ता" या वृत्तपत्र कार्यालयात तो पोहोचला. तेथील संपादक त्याचे मित्रच झाले होते. धर्मापूरच्या समस्यांवर संवादात्मक पद्धतीने लिखाणातून भाष्य करून त्याने जनतेच्या अनेक प्रश्नांना वाचा फोडली होती. त्यानंतर कालांतराने त्याने चित्रपट परीक्षण लिहायला सुरुवात केली होती.

के. के. सुमनचे चित्रपट आले की त्याबद्दल तो मानधन न घेता आवर्जून आणि हटकून परीक्षण लिहायचा आणि त्याच्या चित्रपटाला फक्त अर्धा किंवा एकच स्टार रेटिंग द्यायचा. त्याच्या ब्लॉगवर सुद्धा त्याने के के सुमनच्या चित्रपटांची लिहून लिहून वाट लावली होती.

त्या वृत्तपत्राच्या संपादकाना भेटून त्याने खाली दिलेली विशेष जाहिरात छापायला दिली आणि त्यांचा निरोप घेऊन तो निघाला. संपादकांनी ती जाहिरात तो म्हणेल तितके दिवस आणि तेही विनामूल्य छापायचे ठरवले. त्यामागची राजेशची काय भावना आणि उद्देश्य आहे हे पूर्णपणे नाही तरी थोडीफार कल्पना त्याना आली होती. राजेशला बेस्ट लक देऊन त्यांनी गप्पा मारल्या आणि त्याला निरोप दिला. ते संपादक कलेची कदर करणारे होते.

ती जाहिरात अशी होती: “संसार संभाळून पार्ट टाईम मनोरंजन क्षेत्रात काम करू इच्छिणारे हौशी छंदिष्ट, सृजनशील, आणि कलाप्रेमींनी (स्त्री पुरुष) यांनी खालील पत्त्यावर भेटावे. एका अभिनव मोहिमेसाठी काम करण्याची सुवर्णसंधी! मोबदल्यात जास्त पैसे मिळणार नाहीत (आधीच सांगून ठेवतो) पण कलेच्या अभिव्यक्तीचे मानसिक समाधान जरूर मिळेल आणि आपण एका महत्वाच्या मोहिमेत आजीवन सहभागी झालो आहोत याचा गर्व आणि अभिमान वाटल्याशिवाय रहाणार नाही. तुमच्यात कोणतीही कला असो - लेखनकला, चित्रकला, संवादकला, टीका करण्याचे कसब, वाईट गोष्टी चांगल्या कामांसाठी वापरण्याची कला या प्रकारे काहीही असो, तुमचे येथे स्वागत आहे! पुढे नंतर मनायोग्य व्यासपीठ मिळू शकते त्यानंतर मात्र तुम्हाला अमाप पैसा आणि प्रसिद्धी मिळण्याची शक्यता नाकारता नाही! मला प्रथम कॉल करा आणि मग भेटायची वेळ ठरवू! तुमचा बायोडटा माझ्या ईमेल आयडीवर पाठवा. मोहिमेसाठी तुमच्या सृजनशील कल्पनांच्या प्रतीक्षेत! तुम्ही माझी मोहीम यशस्वी करा, मी तुमची स्वप्ने पूर्ण करीन! प्रॉमिस!”

त्यानंतर चार पाच दिवस असेच गेले. गोडंबे काका आणि सुनंदा यांचे येणेसुद्धा लांबले. तसा त्याच्या आईला फोन आला होता. तेवढा सुटकेचा निश्वास राजेशने टाकला. जाहिरात देऊन आठ दिवस झाले होते पण अजून एकही फोन आला नव्हता. दोन कॉल्स आले खरे पण राजेशने उचलले नाहीत. ते जितेंद्र करमरकरचे कॉल्स होते. पण जितेंद्रने सहज कॉल केला असेल म्हणून राजेशने दुर्लक्ष केले. जितेंद्रनेही पुन्हा त्याला कॉल केला नाही. राजेशला कल्पना नव्हती की सुप्रियाने ती सिरीयल सोडली. कळले असते तरी तो तिला थांबवू शकला असता का? त्याचा कॉल तिने घेतला असता का?

बरोबर दहा दिवसानंतर तो फोन आला, “तुमची जाहिरात वाचली मी. तुम्हाला भेटायचे आहे. कुठे भेटायचे?”

ह्या एका बहुप्रतीक्षित फोन कॉल नंतर मग एकसारखे फोन कॉल्स सुरु झाले. साधारण दहा जणांचा कॉल आल्यानंतर त्याने सगळ्यांच्या सोयीनुसार एक दिवस आणि वेळ ठरवली. भेटायचे ठिकाण राजेशने निवडले होते ते म्हणजे - शाळेतली टीचर्स रूम, जेथे त्याने लिहिलेले लहानपणी त्याचे नाटक त्याच्या शिक्षकांकडे सुपूर्त केले होते. त्याला मिळालेल्या पहिल्या विश्वासघाताची खूण होती ते ठिकाण म्हणजे! शाळेतल्या ओळखीमुळे त्याला ती रूम शाळा सुटल्यानंतर पर्सनल वापरासाठी मिळाली कारण आज सकाळची शाळा होती. मात्र तेथे आता टीचर्स रूम नसून स्पोर्ट्स साहित्य ठेवण्याची ती खोली बनली होती आणि तिला बाहेरून वेगळा प्रवेश होता. त्याचे नाटक चोरून स्वतःच्या नावावर खपवणारे ते शिक्षक मात्र आता त्या शाळेत नव्हते. त्यांची बदली झाल्याचे त्याने नंतर ऐकले होते. मात्र कोणत्या गावाला हे त्याला कळले नाही.

संध्याकाळी चार वाजेपासून तर सात वाजेपर्यंत त्यांच्यातील चर्चा चालली. राजेशचे समजावून सांगण्याचे कसब जबरदस्त होते. कथेत तो जशी संवादातून योग्य शब्दयोजना करीत असे तसेच प्रत्यक्ष जीवनात संवाद कौशल्यात सुद्धा तो योग्य शब्दयोजना करे आणि समोरच्यावर प्रभाव टाके. त्याला अपेक्षित असलेले असे ते सगळे जण होते. त्यापैकी चारजण (दोन पुरुष दोन महिला) विवाहित तर इतर सहाजण (सगळे पुरुष) अविवाहित होते. त्यांना राजेशने व्यवस्थित मोहीम समजावून सांगितली. काहींना सुरुवातीला शंका आली पण नंतर त्यांना विश्वास बसला.

राजेशने मोहिमेचे सगळेच पत्ते सुरुवातीला त्यांच्यासमोर उघड केले नाहीत. त्या टीम मधला एक लीडर त्याने नेमला - सारंग सोमय्या.
रात्रीचे डिनर राजेशतर्फे हॉटेलमध्ये केल्यावर ते सगळे आपापल्या गावी निघाले. घरी गेल्यावर घरच्यांना तोंड कसे द्यायचे तो त्यांचा प्रश्न होता. मोहिमेतले किती आणि काय कोणाकोणाला सांगायचे किंवा नाही याबद्दल राजेशने नियम आखून दिले होते. ते सगळ्यांना पाळायचे होते. सगळ्यांचे मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी राजेशने घेतले. काहींचा बायोडाटा आधीच राजेशला ईमेलने मिळाला होता, ज्यांचा मिळाला नाही त्यांचा त्याने आता मागून घेतला किंवा नंतर इमेलवर पाठवायला सांगितला. प्रत्येकाचे मनोरंजन क्षेत्रातील पॅशन, इच्छा आणि स्वप्न काय काय आहेत ते त्याने जाणून घेतले. सगळे लिहून घेतले. आता ते सगळेजण वेळोवेळी राजेशच्या आदेशाची वाट बघणार होते. मुद्रेवर एक विजयी भाव ठेऊन तो घरी परतला. कामानिमित्त बाहेर गेलो होतो एवढेच त्याने आईला सांगितले होते. कारण सांगितले असते तरी तिला त्यातले जास्त काही कळलेच नसते.

त्यानंतर दोन दिवस गेले आणि गोडंबे काकांचा शेतातील विहिरीत पडून मृत्यू झाल्याचा राजेशच्या आईला फोन आला. घडलेली घटना अकस्मात आणि दुर्दैवी होती. कुठलाही घातपात नव्हता. जे घडले ते सगळे अचानक योगायोगाने घडले याबद्दल सगळीकडे हळहळ व्यक्त होत होती. राजेश आणि त्याची आई तातडीने ‘धोरणा’ या गावाला गेले. सुनंदाला भाऊ नव्हता. सुनंदा पुरती कोलमडली होती. शोकाकुल वातावरणात आठ दिवस गेले. सगळे अंतिम संस्कार पार पडल्यानंतर गोडंबे काकूंनी राजेशच्या आईला वचनाची आठवण करून दिली. राजेशच्या आईने सुनंदासाठी फिल्डिंग रचलेली होती पण ही एक घटना राजेशला अचानक क्लीन बोल्ड करून गेली. महिनाभरातच साखरपुडा आणि लग्न करायचे ठरले. तशी गोडंबे काकांचीच इच्छा होती म्हणे! सुनंदाच्या वडिलांचा बंगला आणि इतर बरीच संपत्ती तिच्या आणि राजेशच्या नावावर झाली होती. राजेशच्या आईचे सुनंदाचा तगादा मागे लावण्याचे हे सुद्धा एक सबळ कारण होते.

लहानपणापासून ओळखत असलेल्या परंतु एकमेकांचा “त्या” अर्थाने पूर्ण परिचय नसलेल्या अशा दोन जीवांचे लग्न झाले. राजेशचा मुक्काम दोन महिने लांबला. पहिली रात्र काय आणि दुसरी तिसरी काय त्या दोघांनी अजून अनुभवलीच नव्हती कारण सुनंदा सतत वडिलांच्या जाण्याच्या दु:खात बुडालेली आणि दडपणाखाली होती. लग्नानंतरचे बहुतेक दिवस ती माहेरीच होती. आता शहरात गेल्यावरच जो काय त्यांचा संसार होता तो सुरु होणार होता! काही नाती जपली जातात तर काही जपावी लागतात, तसेच काही नाती जोडावी लागतात तर काही जोडली जातात. आता जे जोडलं गेलेलं नातं टिकेल की टिकवावं लागेल हे काळच ठरवणार होता!!

प्रकरण 20

राजेश मुंबईला जायला निघाला तेव्हा सुनंदा सुरुवातीला राजेशच्या आईसोबत गावातच थांबली कारण राजेशने बोरीवलीची रूम सोडून गोरेगांवला फिल्म सिटी जवळच घर शोधण्याचा निर्णय घेतला. सगळी व्यवस्था लावल्यानंतर तो मग तिला पुन्हा घ्यायला येणार होता. दरम्यान त्याने कोणतेही मेसेज चेक केले नाहीत कारण गावाकडे घडले ते सगळे त्याच्या मनाविरुद्ध होत होते आणि त्याचे मन त्याच्या ताब्यात नसल्यासारखे होते. त्याने जितेंद्रला तसेच इतर ज्यांच्यासाठी तो लिखाण करत होता त्यानाही थोडक्यात कॉल करून त्याला परत यायला उशीर होईल असे कळवले, मात्र लग्न झाल्याचे त्याने अजून कुणाला सांगितले नव्हते. नंतर त्याने एके दिवशी मुंबईची ट्रेन पकडली आणि निघाला - पुन्हा स्वप्ननगरी मुंबईत!

राजेश स्टेशनवर उतरला तेव्हा मुंबई तीच होती. तीच लोकलची जीवघेणी गर्दी आणि तेच ते एकामागून एक येणारे स्टेशन्स. समुद्रही तोच आणि तसाच ! कधी शांत तर कधी खवळलेला! दिवसरात्र धावणारे रस्ते. सगळे तेच होते. बदलले होते फक्त राजेशने आयुष्य! मुंबई सोडतांना सुप्रियाशी जाणूनबुजून केलेली ताटातूट आणि मग येतांना नको असलेल्या एका सोबतीचे ओझे. प्रत्यक्ष ती सोबत सोबतीला नव्हती पण मनावर असलेले ओझे होतेच!

राजेश चे दुसरे मन त्याला म्हणू लागले , "नाही राजेश! सुनंदाला तू हे जे ओझे मानतोस, ते चूक आहे. तू तुझी संमती दिली आहेस लग्नाला. मग तिला दोष देता कामा नये. काही गोष्टी आयुष्यात मनासारख्या होतात आणि काही मनासारख्या होत नाहीत. तू तर लेखक आहेस. तुला पूर्ण शक्य असूनही तुझ्या कथेतल्या पात्रांना तू त्यांच्या आणि तुझ्या मनासारखं भाग्य देतोस का? म्हणजे कल्पनेत सुद्धा तू तसे करत नाहीस मग हे खरे वास्तविक जग तर कल्पनेपेक्षा जास्त निर्दयी आहे."

बोरिवलीला रूमवर गेल्यावर दोन दिवस उदासवाणे गेले. मधूनच सुप्रियाची आठवण त्याच्या मन:पटलावरून तरळून गेली. ती कामानिमित्ताने सतत सोबत आणि जवळ होती. ती भेटायची तेव्हा त्याला असे काही प्रकर्षाने जाणवले नव्हते, पण आता ती अनेक दिवस भेटली नाही तेव्हा मात्र तीची आठवण येण्याचे प्रमाण वाढले. विशेषत: ब्रेकप झाल्यानंतर प्रथमच तो आतां मुंबईत आला होता त्यामुळे सुप्रियाची आठवण तीव्र व्हायला लागली.

तेव्हा राजेशने स्वत:ला बजावले, “नाही, राजेश. तुझे आता लग्न झाले आहे. सोड ते विचार!”
बोरिवलीची रूम सोडण्याआधी त्याने प्रथम जितेंद्र करमरकरची भेट घायचे ठरवले, मग इतर काही जणांना ज्यांच्यासाठी सुद्धा तो लिहित होता त्यांना तो भेटणार होता. पण जितेंद्र आठ दिवसांसाठी सुट्टीवर गेला होता. रोशन रोकडे पण भेटला नाही. मग आधी गोरेगांवला रूमची सेटलमेंट करून मगच आता सगळ्यांना भेटण्याचे त्याने ठरवले.

चार दिवसांत रूम शोधून झाली. पुढच्या काही दिवसांत सामान शिफ्ट झाला. त्याचे लेखन त्याने त्याच्या रेग्युलर सिरियल्सच्या निर्मात्यांकडे अगोदरच पाठवून ठेवल्याने ते लोक तसे निश्चिन्त होते. पण आता पुढच्या लेखनासाठी मात्र जास्त दिरंगाई झालेलीही चालणार नव्हती.

दरम्यान त्याच्या सिरियलच्या कामाने प्रभावित होऊन एका मराठी मालिका निर्मात्याकडून त्याला कथा, पटकथा आणि संवाद लेखनाची ऑफर आली पण ती मालिकेसाठी नसून मराठी चित्रपटासाठी होती. तो निर्माता सिरीयलनंतर आता आपले नशीब चित्रपट निर्मितीत आजमावून बघणार होता. त्यांनी चित्रपटाच्या विषयाबद्दल राजेशला कल्पना दिली होती आणि सविस्तर चर्चेसाठी प्रत्यक्ष भेटायला बोलावले होते. राजेशच्या आनंदाला पारावार राहिला नाही. अधून मधून घरी कॉल करून तो आई आणि सुनंदाशी जुजबी बोलत होता. सुनंदाला मुंबईला आणायला थोडा उशीरच होणार होता. कारण आधी या निर्मात्याला भेटणे आवश्यक होते कारण अशी संधी पुन्हा येणार नव्हती.

निर्मात्याचे नाव होते - समीरण देवधर! आतापर्यंत चार यशस्वी मालिका टीव्ही जगताला देणारे! चारही मालिकांवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं होतं. टिपिकल गल्लाभरू सासू सुनेच्या ड्रामेबाजीपासून ते नेहमी दूरच राहिले होते. त्यांच्या चारही मालिका अगदी वेगवेगळ्या विषयांवर आधारित होत्या. त्यांच्या सगळ्यात पहिल्या मालिकेसाठी राजेशने संवाद लेखन केले होते.

समीरणने त्याला घरी भेटायला बोलावले होते. प्रथमच तो समीरणला घरी भेटायला जाणार होता. समीरण आरे रोड जवळ, आरे गार्डन रेस्टॉरंट जवळ असलेल्या “सुरभी” हौसिंग सोसायटीत रहात होता. आसपास अनेक मराठी आणि गुजराती व्यावसायिक रहात असत. त्याच्या घरी पोहोचतांना राजेशच्या मनात सारखी एक कल्पना घोळत होती. समीरणला ती कल्पना मान्य होईल की नाही याबद्दल तो साशंक होता. पण त्याला पटवून सांगण्याची त्याने पूर्णपणे पूर्वतयारी केली होती. समीरणने मान्य केले तर दोघांचा फायदा होणार होता आणि….?

बेल वाजली. समीरण घरी एकटा होता. त्याची पत्नी जॉबनिमित्ताने बाहेर आणि मुलगा शाळेत गेलेला होता.

दरवाजा उघडत समीरण म्हणाला, “अरे ये ये राजेश. काय म्हणतोस? ये बैस!”

राजेश एका सोफ्यावर बसला. टीव्ही सुरु होता. थोड्या वेळाने किचन मधून दोन कॉफी कप हातात घेऊन समोरच्या सोफ्यावर समीरण बसला.

एक कप राजेशला देत समीरण म्हणाला, “घे कॉफी! बोल राजेश. कसा आहेस?”

राजेश कॉफी घेत कम्फर्टेबल झाला आणि म्हणाला, “हो समीरण! आणि मी ठीक आहे. फार कमी वेळेत बराच काही घडून गेलंय माझ्या आयुष्यात!

समीरण, “म्हणजे? कसे? काय घडले ते?”

राजेश, “लग्न करून आलोय मी गावाकडून येतांना!”

समीरण कॉफी कप बाजूला ठेवत म्हणाला, “ओह माय गॉड! इट्स अ गुड न्यूज! अभिनंदन!”, आणि त्याने हात पुढे केला. राजेशने अभिनंदन स्वीकारले व म्हणाला, “धन्यवाद!”

मग जुजबी विचारपूस झाल्यावर समीरण मूळ मुद्द्यावर आला.

समीरण, “हे बघ राजेश. आज मराठी इंडस्ट्रीत नवनवीन विषय हाताळले जात आहेत. हरहुन्नरी कलाकार, लेखक दिग्दर्शक उदयाला येत आहेत. विशेष म्हणजे प्रेक्षकांचा आश्रय जो कधी काळी मराठी चित्रपटांसाठी दुर्मिळ होता तोही आता मिळतोय. मल्टीप्लेक्स मध्येही मराठी चित्रपट हाउसफुल होत आहेत. अशा उमेदीच्या काळात अनेक निर्मात्यांना आणि दिग्दर्शकाना हुरूप न आला तर नवल!”

राजेश, “होय समीरण! बरोबर आहे तुमचे! भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके आज असते तर त्यांना खचितच खूप आनंद झाला असता. मध्यंतरी मराठी चित्रपट हळद, कुंकू, सासू सून, घरगुती भावनिक विषय अशा प्रकारच्या एकसूरी साच्यात अडकला होता. त्यातून आता तो समर्थपणे बाहेर पडलाय!”
समीरण, “आता कसे बरोबर बोललास! आज मराठी चित्रपट सगळ्या प्रकारचे आणि अगदी आजपर्यंत कधीही कुणीही स्पर्श न केलेल्या विषयांवर सुद्धा समर्थपणे चित्रपट काढतोय. अगदी अलीकडील काळापर्यंत मराठी टीव्ही जगतात सुद्धा फारसे आश्वासक चित्र नव्हते. पण आज इतके मराठी चॅनेल निघाले आहेत आणि ते यशस्वीपणे वाटचाल करत आहेत”

राजेश, “हो ना. खरे आहे! पण अजूनही काही मराठी सिरीयल मात्र सासू सुनेच्या घरगुती दळणात अडकून पडलीय! उलट पूर्वी दूरदर्शन वर २३ भागांच्या मालिकेचा ट्रेंड होता तो बरा होता. त्यावेळेस पण मालिकेत विविध विषय हाताळले जात असत! पण असे जरी असले तरी या इंडस्ट्रीत लेखक आणि पटकथा लेखक म्हणून टिकून राहाण्यासाठी अशा प्रकारच्या काही मालिकांसाठी मीही तेच करतोय. तेच ते सासू सुनेचे दळण! पण तसं पाहिलं तर तेही लिहिणं म्हणजे वाटतं तेवढं सोप काम नाहीये. रोज रोज प्रेक्षकांना कथेमध्ये काहीतरी वेगळं देऊन सिरीयलच्या पुढच्या भागाकरता गुंतवून ठेवणं तितकसं सोपं काम नाही. मोठ्या प्रमाणावर ज्या प्रकारच्या सिरीयल बनतात त्यांच्यासाठी लेखन करणं आवश्यक आहे, त्याशिवाय आमच्यासारख्या लेखकाचं पोट कसं भरणार?”

एव्हाना कॉफी संपली होती. समीरणने घरातील बाईला ताजा स्वादिष्ट स्वयंपाक बनवायच्या सुचना दिल्या.

समीरण हसत म्हणाला, “होय! तेही खरेच आहे. मलाही ते घरगुती विषयाचं जरा वावडंच आहे! बाकी काहीही असो पण पटकथा लेखनासोबतच तुझे संवाद लेखन फारच मस्त आहे बुवा! आपल्याला अगदी आवडलंय ते! आणि आता मी चित्रपट निर्मितीत उतरायचे म्हटल्यावर विषय तसे मुळीच नसणार आहेत. तर मला म्हणायचं आहे की माझेकडे दोन तीन विषय आहेत. दोन वर्षांच्या अंतरानंतर दोनेक चित्रपट काढायचा माझा विचार आहे. विषय मी सुचवणार. निर्मिती मी करणार. दिग्दर्शन सुद्धा मीच करणार आणि कथा, पटकथा आणि संवाद लेखनाची धुरा तू सांभाळायची. त्याचबरोबर चित्रपटाचे काही हक्क आणि नफ्यात हिस्सा सुद्धा देईन म्हणतो ते!”

राजेश, “धन्यवाद माझ्यावर एवढा विश्वास टाकल्याबद्दल. मी नक्कीच माझं सृजनशील लेखन सर्वस्व यात ओतणार यात वाद नाही! आजकाल अजूनही बरेच नवोदित लेखक या फिल्म इंडस्ट्रीत येण्यात धडपडत आहेत. बरेचदा त्यांच्या कथांची सपशेल चोरी होते आणी त्याचे क्रेडीट सुद्धा त्यांना दिले जात नाही! ”

येतांना राजेशने मनात योजून ठेवलेली गोष्ट हळूहळू आता समीरण जवळ काढायची वेळ आली आहे हे राजेशच्या लक्षात आले.

समीरण, “होय अगदी खरे आहे. मराठीत सुद्धा हा प्रकार आहेच पण हिंदीत तर हे प्रकार फार वाढलेत. कायदे धाब्यावर बसवून काही लेखकांच्या कादंबऱ्या किंवा कथा संहिता डायरेक्टर लोक वाचतात, ऐकून घेतात, रिजेक्ट करतात आणि मग काही वर्षांनी त्यात थोडा फेरफार करून त्यावर चित्रपट काढतात आणि पुन्हा त्या मूळ लेखकांना धुडकावून लावत त्यांचे क्रेडीट स्वत:कडे घेतात!”

राजेश मनात म्हणाला, “समीरण अगदी मूळ मुद्द्यापर्यंत पोहोचलाय पण मी अजून माझ्यासोबत भूतकाळात घडलेले याला सांगणार नाही. त्याऐवजी मला भविष्यात काय करायचेय त्याबाबत एक पाऊल टाकायला समीरणची मला मदत घायची आहे. वेळ आली की समीरणला त्याबद्दल सांगता येईलच!”

समीरण, “कसल्या विचारांत गढून गेलास राजेश?”

राजेश, “नाही समीरण! तू जे आता म्हणालास ते अगदी योग्य आहे त्यावरच मी विचार करत होतो. बरं मी काय म्हणतो की माझी एक विनंती आहे”

समीरण, “काय विनंती आहे तुझी?”

राजेश, “सांगू की नको असे होत आहे!”

समीरण, “अरे बिनधास्त सांग. मला तुझा जवळचा मित्र समजून बिनधास्त सांग!”

राजेश, “ मला असे सुचवावेसे वाटते की समीरण तू चित्रपट हिंदीत बनव! किंवा मी म्हणेन की पहिली चित्रपट निर्मिती तू हिंदीत करावीस. तू सुचवलेल्या विषयांपैकी एक विषय हिंदीत नवीन आहे. तेव्हा हिंदीत चित्रपट बनव!”

समीरण आश्चर्याने म्हणाला, “अरे काय सांगतोस राजेश हे? तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती..”
राजेश, “तू मला मित्र मनात असशील तर मी असा सल्ला देईन की जरी तू मराठीत अनेक मालिका यशस्वीरीत्या हाताळल्या आहेस तरी पहिली चित्रपट निर्मिती हिंदीत करावीस असे मला वाटते. अनेक हिंदी चित्रपट निर्माते दिग्दर्शक हे मराठी आहेत. त्यांनी सकस आणि दर्जेदार कथा असलेले हिट चित्रपट हिंदीत दिले आहेत. नंतर त्यांनी मराठीत सुद्धा यशस्वी चित्रपट निर्मिती केली आहे. आणि हिंदीतल्या काही चांगल्या लोकांशी तुझ्या ओळखी सुद्धा आहेत, त्या उपयोगी पडतील. आपण तुझ्या हिंदी चित्रपटात मराठी संगीतकराला आणी मराठी कलाकारांना संधी देऊ. त्यांना मोठं व्यासपीठ मिळेल. हिंदीत लोकांना आपण दाखवून देऊ की कथा चांगली आणि अभिनव असेल तर चित्रपट नक्की चालतो. त्याद्वारे सशक्त कथाकारांना आपण समोर आणू शकतो!”

समीरण बराच विचार करून म्हणाला, “हम्म! तुझा सल्ला आहे तसा मुद्द्याला धरूनच, पण मला थोडा वेळ दे! मी नक्की विचार करून सांगतो पण ....”

राजेश, “अगदी हवा तेवढा वेळ घे तू समीरण! शेवटी तुझा कोणताही निर्णय मला मान्य असेलच! मी लेखनासाठी सदैव तयार असेन!”

मग अवांतर गप्पा झाल्यानंतर जेवण तयार झाले होते. स्वादिष्ट जेवण खाल्ल्यानंतर समीरण कडून राजेश निघाला. त्याच्या मनात थोडी साशंकता होतीच की समीरण त्याचा हा प्रस्ताव स्वीकारेल की नाही त्याची! हरकत नाही पण अगदीच नकाराच्या भीतीपोटी प्रयत्नच न करण्यापेक्षा थोडा प्रयत्न त्याने करून बघितला होता. ही संधी तो स्वत: निर्माण करत होता. जर कदाचित संधीने हुलकावणी दिलीच तरी हरकत नव्हती. पुढे आणखी संधी नक्कीच येतील याबद्दल त्याला विश्वास होता. "नाहीतर मी संधी निर्माण करण्याचा पुन्हा प्रयत्न करेन!" राजेश मनात म्हणाला.

प्रकरण 21

काही दिवसांनी गोरेगांच्या राजेशच्या रुमवर -

राजेश फोनवर बोलत होता -“जितेंद्र करमरकर साहेब कुठे गेला होतात? आम्ही आपली वाट बघत होतो. आतुरतेने!”

जितेंद्र - “वा वा वा! चोराच्या उलट्या बोंबा म्हणतात ते हेच का? आपण गावाकडे गेलात आणि गायब झालात. कॉल केले होते तेव्हा काही उत्तर नाही मिळाले. इकडे काय काय संकटे आली आम्हाला, काही कानावरून हवा गेली की नाही अजून?”

राजेश - “संकटं? कसली संकटं? तुझ्यासारखा माणसावर संकटं येण्याआधीच ती स्वत:च घाबरून पळून जाणार! अन म्हणे संकटं आली!”

जितेंद्र - “ आरे मित्रा! एक तर त्या तुमच्या सुप्रिया मॅडम सिरीया सोडून गेल्या आणि ….”

राजेश - “काय ? काय? काय बोललास? परत बोल एकदा? सुप्रियाने सिरीयल सोडली??”

जितेंद्र - "असा अंगावर पाल पडल्यासारखा काय दचकून बोलतो आहेस? जसे काही तुला माहितीच नाही?"

राजेश - "अरे नाही मित्रा! खरंच मला माहिती नाही. ए पण एक सांग! तू माझी खेचत तर नाही आहेस ना?"

जितेंद्र - "मित्रा! आता बास झाले. आता प्रत्यक्ष भेट, तेव्हाच बोलू. अनेक नवी कामे द्यायची आहेत तुला. त्याबद्द्ल सुद्धा सविस्तर बोलता येईल!"

फोन बंद झाल्यावर क्षणभर राजेशच्या पोटात धस्स झाले. सुप्रियाने सिरीयल सोडली? अशक्य!
ती तर म्हणाली होती की --
".... हे बघ राजेश. आपण एकाच क्षेत्रात आहोत. कामानिमित्त आपली भेट होतच राहाणार. सो लेट्स बी प्रोफेशनल! आपल्या वैयक्तिक गोष्टी कामाच्या आड येऊ द्यायच्या नाहीत. नाहीतर त्यामुळे दोघांचेही नुकसान होईल...."

राजेश विचार करता करता अस्वस्थ झाला. अचानक त्याला सुप्रियाबरोबरचे सोबत घालवलेले क्षण भले ते कमी काळाकरता का होईना ते आठवायला लागले.

आणि ती सोबत होती तेव्हा मात्र ....?

राजेशला तीला भेटावेसे वाटायला लागले. कुठे असेल ती? फोन करु का? होय! फोनच करतो तीला आता!

सुप्रियाला फोन करताच, “हा नंबर स्विच्ड ऑफ म्हणजेच बंद आहे." असा संदेश एक मंजूळ स्त्री आवाज राजेशला सांगू लागला.

"सुप्रियाने नंबर बदलला असावा बहुतेक!" राजेशचे हृदय त्याला सुचवू लागले.

"राजेश! अरे तू आता ब्रेकअप केले आहेस! आता तूला काय अधिकार आहे तीला कॉल करण्याचा?" राजेशची बुद्धी त्याला सांगू लागली.

“पण ती असे कसे करू शकते? मला तिला एकदा भेटायलाच हवे !” पुन्हा हृदय म्हणू लागले.

दोघांचे द्वंद्व असतांना राजेशच्या मोबाईलची रिंगटोन वाजली.

“सुनंदा कॉलिंग … “ अशी अक्षरे स्क्रीन वर उमटू लागली.

“हा सुनंदा ब.. ब.. बोल!”
“तुमचा स्वर असा चिंतीत कसा वाटतो आहे? काही काळजी आहे का? मला सांगा?”

“न .. न .. नाही! सगळं ठीक आहे. व्यवस्थित आहे. पुढच्या आठवड्यात तुला आणि आईला घ्यायला येतोय मी!”

“मला किती किती आनंद झालाय म्हणून सांगू?,” तिच्या स्वरातून आनंद ओसंडून वाहात होता.

जुजबी बोलून त्याने फोन ठेवला. सुप्रियाच्या बातमीमुळे त्याचे पुढचे प्लॅन तो विसरत चालला होता.

त्याचे हृदय गप्प बसले आणि बुद्धी सांगू लागली, “राजेश ! जितेंद्रला भेटायचे आहे. समीरणला भेटायचे आहे. स्क्रिप्ट लिहायच्या आहेत. तुझी महत्वाकांक्षा तुझ्याकडे मोठ्या अपेक्षेने बघते आहे की तू तिला नक्की न्याय देशील आणि तू अजूनही सुप्रियाच्या आठवणी काढतो आहेस? अरे सुनंदाला घेऊन ये, आई काही दिवस शहरात राहून गावी परत जाणार आहेच! मग आईची नेहेमीकरता यायची इच्छा असेल तर तिलाही नेहेमीकरता बोलावून घे. मग तुझी स्वप्ने पूर्ण कर! चल लाग कामाला! सोड त्या सुप्रियाची आठवण!”

काही काळ लोटला.

अधून मधून तो सारंग सोमैय्या सोबत फोन करून टच मध्ये होताच. सारंग आणि त्याची टिम सुद्धा अगदी राजेशच्या फ्रिक्वेन्सीशी जुळवून घेणारी होती. त्या टिमकडून राजेशला सामान्य नागरिकांची, फॅमिलिज्ची चित्रपटांविषयीची अनेक मतं आणि मतांतरं मिळण्यास मदत होत होती. त्याचा फायदा राजेशला चित्रपटांच्या कथा आणि परीक्षण लिहायला व्हायचा. ही टीम त्याचे पर्सनल ध्येय साध्य करायला त्याला मदत करणार होतीच पण या इंडस्ट्रीत त्या टिममधील अनेकांना त्यांच्या कुवतीप्रमाणे आणि लायकीप्रमाणे ब्रेक देऊन शक्य तेवढी परतफेड सुद्धा त्याला करायची होतीच.

प्रकरण 22

या सगळ्या घटनांदरम्यान सुप्रिया आणि रागिणी रूम सोडून गेल्यानंतर सोनीच्या दोन नवीन रुम पार्टनर्स झाल्या होत्या - एलेना एडवर्ड आणि नताशा दत्ता. सुप्रियाचा नंतर ठावठिकाणा न लागल्याने सोनीने तिला कॉल करणे सोडून दिले होते. सोशल साईटसवर सुद्धा सुप्रियाचे जुनेच अपडेट्स दिसत होते. पुण्याला जाणे झालेच तर मात्र तिने सुप्रियाला धावती भेट देण्याचे मनाशी ठरवले होतेच. रागिणी मात्र सोनीच्या संपर्कात होती. रागिणी तिच्या बॉयफ्रेंड सोबत हॅप्पी लाईफ जगत होती आणि सोनी “त्या” फोटो प्रकरणातून सावरली होती. तसे तिच्या दृष्टीकोनातून त्यामुळे तिचे फार काही फारसे नुकसान झाले नव्हते. पण नंतर तिला काही काळ कोणत्या डान्स कार्यक्रमाच्या ऑफर आल्या नाहीत, त्यामुळे निराश होती.

मग एके दिवशी अचानक आणि अनपेक्षितपणे “बिग आय बिग क्वेस्ट (Big Eye Big Quest)- मुझसे बचके कहां जाओगे?” नावाच्या मेगा रियालिटी शोची तिला ऑफर मिळाली. त्या शोच्या कास्टिंग डायरेक्टरने तिला त्याच्या ऑफिसमध्ये जेव्हा बोलावले होते तेव्हा त्याने तिला स्पष्टपणे संगितले होते:

“तुला मी एकाच कारणाकरता बेबक्यू (BEBQ) ची ऑफर देत आहे. ते कारण सांगण्याआधी ह्या शोबद्दल तुला सांगतो. या रियालिटी शोचा कॉन्सेप्ट वेगळा आहे. यात दहा अगदी वेगवेगळ्या क्षेत्रातील लोक एका प्रायव्हेट रिसॉर्टवर वीस दिवसांकरता सोडले जातील. बाहेरच्या जगाशी संपर्क करण्याची कोणतीच साधने त्यांना दिली जाणार नाहीत, अनलेस देयर इज एनी इमरजेंसी! त्यांना एकमेकांशी जुळवून घ्यायचे आहे. त्यांना एक मिशन दिले जाईल. त्याचे नियम सांगण्यात येतील. त्यानुसार काही पॉईंट्स देण्यात येतील. शेवटच्या दिवशी फक्त तीन जण उरतील. एक विनर, दुसरा आणि तिसरा रनर्स अप!”

आयती संधी चालून आली होती. पण तिच्या मनात विचारचक्र सुरु झाले, "मला डान्सच्या क्षेत्रात पुढे जायचे आहे. पण गेल्या काही महिन्यांपासून माझ्याकडे एकही काम नाही. आता हा शो आहे पण यात डान्स नाही, पण पैसा मिळेल. प्रसिद्धी मिळेल. एरवी मी मॅडम अॅकॅडमी आणि इतर संस्थांमध्ये डान्स शिकत राहाणारच आहे. या शोनंतर बघूया, एखादी डान्स संबंधित दुसरी ऑफर नक्की मिळेल. आता फक्त मिळेल ते काम आणि पैसा महत्वाचा आहे!"

"काय विचारात पडलाय मॅडम? "

"अं, काही नाही. सॉरी, सांगा तुम्ही! मी ऎकतेय!"

"तर मी सांगत होतो की तुम्हाला या शोमध्ये घेण्याचे मूळ कारण मी तुम्हाला सांगतो. या शोमध्ये डान्स क्षेत्रातली तूच एक व्यक्ती असणार आहे. यात तुला डान्सचा वापर करून क्रिएटिव्ह अंगप्रदर्शन करावे लागेल. क्रिएटिव्ह अंगप्रदर्शन म्हणजे माझ्या मते असे की, तू जाणूनबुजून तुझे शरीर दाखवत आहेस असे लोकांना आणि प्रेक्षकांना वाटता कामा नये, त्याऐवजी रियालिटी शोच्या फ्लो मध्ये किंवा ओघात आपोआप असे प्रसंग येतील (जे आपण मुद्दाम टाकू) त्यातून अपरिहार्यपणे तुझी बॉडी तू एक्स्पोज करायची जी कृत्रिम वाटायला नको! तुझी सेल्फी अजून काही लोकांच्या नक्की लक्षात आहे! अजूनही तुझ्या त्या चित्राला रोज गुगलवर सर्च केलं जातं! कळलं का तुला मला काय म्हणायचे आहे ते? सरळ हिशेब आहे! मान्य असेल तर अॅग्रीमेंट आणि सायनिंग अमाऊंटचा एक लाखाचा चेक आणलाय सोबत!"

विचारात गढून सोनी मनाशी म्हणाली, "सेल्फीमुळे जे नुकसान व्हायचं ते झालंय! मला सतत माझे “वलय” टिकवायचे असले तर तडजोड करावी लागेलच! चला सोनी मॅडम स्वीकारा ही ऑफर!"

मग ती निर्मात्याला म्हणाली, "तयार आहे. अट मान्य आहे!"

अंधेरीच्या ऑफिस मध्ये “बिग आय” शोच्या त्या कास्टिंग डायरेक्टरने (के. सचदेवा) तिची एग्रीमेंटवर सही घेतली. तिला सायनिंग अमाऊंटचा चेक दिला आणि त्याच्या ऑफिस मधून सोनी निघाली.

प्रकरण 23

"लुप्थांसा एयर्लाइन्स" च्या विमानात रात्री बारा वाजता मुंबईहून ते दोघे बसले होते. सुबोध केतगावकर आणि सुप्रिया सोंगाटे! अर्थात आता तीही केतगावकर झाली होती! सुबोध पुण्याचा पण इटलीच्या रोम शहरात त्याला परमानंट जॉब होता. रोम जवळ असलेल्या पोमेझीया शहरात एका कंपनीत तो "टेक्निकल कोऑर्डीनेटर" होता. आता रात्रीचे नऊ वाजत आले होते. विमान "दा व्हिन्सी" विमानतळावर उतरायला सज्ज झाले होते. तशी अनाउन्समेंट झाली होती.

सुप्रिया सुबोधसोबत इटलीला स्थायिक होणार होती. विमानतळावर नऊ वाजता उतरल्यानंतर त्यांनी सगळ्या सिक्योरिटी आणि डॉक्युमेंट संबंधित फॉरमॅलिटिज पूर्ण केल्या, बॅग्ज कलेक्ट केल्या आणि दोघे विमानतळाबाहेर पडले. मग थर्मल वियर घालून ते रोम शहरातून पोमेझीया पर्यंत प्रायव्हेट कॅबने गेले. नवा देश, नवे शहर! तिला रूळायला वेळ लागणार होता. पोमेझिया मध्ये “ला एशीयाना” नावाच्या एका एशियन हॉटेल मध्ये ते गेले. टेबलावर बसल्यानंतर प्रथम भारतात दोघांच्या पेरेंट्सना कॉन्फरन्स मध्ये घेऊन त्यांनी सुखरूप पोचल्याचे कळवले. मग त्यांनी सँडविच, कॉकटेल आणि पिझा मागवला. सततचा प्रवास आणि जेट लॅगमुळे दोघांनाही थकवा वाटत होता.

“काय मॅडम, कसं वाटलं आमचं रोम शहर?”, सुबोध म्हणाला.

“अगदी छानच! आवडलं. निदान प्रथमदर्शनी तरी आवडलंच!”, सुप्रिया म्हणाली.

“थंडी मात्र थोडी जास्तच आहे नाही का?”, सुबोध ने विचारले.

“हो. एवढी बोचरी थंडी मी माझ्या आयुष्यात प्रथमच अनुभवते आहे!”

“बियर घेणार का थोडी? थंडीत आवश्यक असते म्हणून म्हटलं!”

“तू घे तुला हवी असेल तर! मी तर कधी घेतली नाहीए पण कधीतरी गरज वाटली तर घेईन सुद्धा, पण आता नको!"

“ठीक! नो प्रॉब्लेम! आय विल टेक वन! यु एंजॉय युर पिझ्झा विथ कॉकटेल!"

त्यांनतर बराच वेळ ते दोघे न बोलता खाण्यापिण्यात मग्न होते. कारण दोघांनाही चांगलीच भूक लागली होती.

अचानक काहीतरी आठवून सुबोध म्हणाला, “अगं हो! मी मागे तुला बोललो होतो ना, तो 'प्राईम प्रॉस्पेक्ट' या इंग्रजी टीव्ही सिरीयलमधला तुझा फेवरीट टेलिव्हिजन अॅक्टर ‘फ्रांको बोनुकी’ रोम मध्ये म्हणजे आपल्या येथून जवळच राहातो. लवकरच आपण जाऊ त्याचेकडे! माझा एक ऑफिसमधला सहकारी ओळखतो त्याला.”

“सो नाईस ऑफ यू सुबोध फॉर रिमेंबरींग इट!” असे म्हणून तिने त्याच्या ओठांवर एक छोटासा किस केला.

मग ते दोघेजण “सांता प्रोक्युला” येथे असलेल्या सुबोधच्या स्टुडिओ अपार्टमेंट मध्ये आले. आतमध्ये हिटर्सची गरमी दोघांना सुखावून गेली. लग्नानंतरचा हा दहावा दिवस होता. इटलीत जाऊनच मग पहिल्यांदा “हनीमून” साजरा करायचा म्हणजेच पहिला सेक्स इटलीत घरी पोहोचल्यावर करायचा असे दोघांनी ठरवले होते व त्यांनी ते पाळले होते. दोघेजण फ्रेश झाले आणि बेडवर पहुडले. लग्नाआधीचे काही दिवस आणि लग्नानंतरचे दहा दिवस जाणूनबुजून ते एकमेकांपासून दूर होते. स्पर्श सुद्धा टाळत होते. जेवढे टाळत होते तेवढी मिलनाची ओढ जास्त वाढत होती. पण एवढा लांबचा प्रवास झाल्यानंतर त्यांना एकमेकांच्या बाहुपाशात लगेच झोप लागली..

आणि सकाळी पाच वाजता दोघांना एकाच वेळेस अचानक जाग आली. सुबोधला एक जाणीव झाली - एक अर्ध अनावृत्त स्त्री शरीर आपल्याला चिटकून झोपलं आहे! आणि अचानक झालेल्या त्या जाणीवेने त्याचं सर्वांग शहारलं आणि उत्तेजित झालं. सुप्रियाही जागी झाली होतीच पण ती मुद्दाम झोपेच सोंग घेऊन वाट बघू लागली की, सुबोध आता स्वतःवर किती नियंत्रण करू शकतो ते?

आता तो प्रसंग आला होता जो त्यांनी ठरवून टाळला होता! त्याने तिला आवेगाने जवळ ओढले आणि तिच्या सर्वांगावर ओठांनी तो किस घेत राहिला आणि मग दोघांची शरीरे एकमेकांना जाणून घेण्यास एवढी अधीर झाली की जणू काही दोन अतिशक्तीशाली इलेक्ट्रोमॅग्नेट एकमेकांच्या सान्निध्यात आलेत! मग वस्त्रांनी बंधने गाळून पडली.

स्त्री पुरुषाना एकमेकांवरचे मानसिक आणि शारीरिक प्रेम व्यक्त करता करता सगळ्यात शेवटी मिळणारी अत्युच्च अनुभूती काय असते ते दोघांनी आता प्रथमच अनुभवलं. मग त्यातून मिळालेल्या आत्यंतिक समाधानाने मंद पिवळ्या रंगाच्या प्रकाशात एकमेकांच्या वस्त्रविरहित शरीरांकडे, न्याहाळत आणि एकमेकांना कुरवाळत ते बराच वेळ पडून राहिले तेव्हा नुकतेच सहा वाजले होते.

तिच्या अंगावरून तसूभरही न बाजूला होता तो म्हणाला, “मॅडम! आज दिवसभर मी कुठेच जाणार नाही!”

“हो का? आणि मग ऑफिसात कोण जाणार? मी?” लटक्या रागाने ती म्हणाली.

“ना तू, ना मी! फक्त माझा बॉस आणि माझे कलिग्ज जातील ऑफिसला!”

सुप्रिया हसायला लागली.

“उठा. पहाट झाली. झोप संपली. स्वप्नांतून जागे व्हा. जीवनाचा रियालिटी शो सुरु झालाय! ऑफिसला जायची तयारी करा. सुट्टी संपली आहे,” असे म्हणून तिने त्याला हळूच बाजूला ढकलले. अगदी अनिच्छेने तो उठला...

...काही वेळानंतर मध्येच बाथरूम मधून आंघोळ करतांना बाहेर येऊन तो म्हणाला, "आपला पहिला सेक्स होईल त्या दिवसापासून मी तुला प्रिया म्हणणार असं मी मनात ठरवलं होतं. आजपासून तू माझी प्रिया! आज की ताजा खबर, आज की ताजा खबर! सुप्रिया बनी प्रिया! जेव्हा जेव्हा मी तुला प्रिया म्हणून हाक मारेन तेव्हा तेव्हा तू आणि मी हा पहिला सेक्स आठवून ताजेतवाने होऊ!"

असे म्हणून त्याने तिला ही बाथरूम मध्ये ओढले. बराच वेळ बाथरूम मधून आनंद आणि हास्याचे आवाज येत राहिले...

सुबोध ऑफिसला गेल्यानंतर दिवसभर ती रिकामीच होती. आज लगेच तिला स्वयंपाक बनवायचा नव्हता. या आठवड्यात सगळ्या गोष्टी सेट करायच्या होत्या. एशियन शॉप मधून आणलेली काही फूड पॅकेट्स फ्रिज मध्ये होती, त्यात तिचे दुपारचे जेवणाचे काम भागणार होते. मग तिने आवरसावर सुरु केली. ते घर अगदी मनापासून तिला आवडलं. दरम्याम तिने आई वडिलांना आणि सुबोधच्या आईला भारतात फोन केला (सुबोधला वडील नव्हते) आणि खुशाली कळवली.

हॉलमध्ये एक फायरप्लेस होतं. बाजूला एक मोठी खिडकी आणि त्याबाजूला एक छोटंसं काचेचं कपाट होतं. त्यात अनेक इंग्रजी आणि मराठी पुस्तके ठेवलेली होती. सुबोधासारखीच तिलाही वाचनाची आवड होतीच.

त्या घराची ओळख करून घेता घेता तिला बाजूला टेबलावर ठेवलेला एफ एम रेडिओ दिसला तो तिने ऑन केला. कोणतं तरी इटालियन गाणं सुरु होतं. त्यातले शब्द नीट कळत नव्हते पण ऐकायला वेगळाच आनंद यायला लागला आणि कोणत्यातरी अद्भुत दुनियेत गेल्यासारखं वाटत होतं ते गाणं ऐकून! त्या गाण्याने भारावून जाऊन आणि मंत्रमुग्ध होऊन तिच्या हातून भराभर कामं होऊ लागली. मराठी आणि इंग्रजी गाणे ती नेहमी ऐकायची पण इटालियन म्युझिक ती प्रथमच ऐकत होती.

ती त्या दिवशी बाहेर कुठेच गेली नाही कारण शहर, माणसं आणि तो देश हे सगळं तिच्यासाठी नवीन होतं. दुपारी फ्रिजमधील भाज्यांचे सॅन्डविच करून सॉस सोबत खाल्ल्यानंतर तिने सुबोधला कॉल केला. त्याला लवकर घरी यायला सांगून तिने फोन ठेवला. मग थोडा आराम करावा म्हणून ती बेडवर आडवी झाली. गेल्या काही महिन्यातल्या वेगवान घटना तिला आठवायला लागल्या...

(क्रमशः)

सूचना: पाच प्रकरणे एकदम आज टाकल्याने आता पुढील प्रकरण ६ मार्च या तारखेला प्रसिद्ध होईल!!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

निमिष, गेले काही दिवस ही कादंबरी वाचतेय. फारच उत्कंठावर्धक सुरू आहे. मजा येतेय वाचायला. छानच लिहिताय.