मुक्तांगण संशोधनासाठी केसस्टडी म्हणून निवडले आणि दर महिन्याला माधवसरांच्या ठाणे येथिल फॉलोअप ग्रुपला जायला लागलो. डॉ. माधवी साळुंखे यांना सर्वप्रथम तेथेच पाहिल्याचं आठवतंय. त्या दिवशी त्या डॉ. आनंद नाडकर्णी यांची मुलाखत घेत होत्या. त्यानंतर दुसर्यावेळी त्या स्वतःच फॉलोअप ग्रुपमध्ये बोलण्यासाठी येणार होत्या. त्यादिवशी बसमधून उतरताना त्यांना अपघात झाला होता आणि हाताला खुप खरचटलं होतं. मिटींगच्या जागीच त्या औषध लावून घेत होत्या. त्या दिवशी कुठल्यातरी देवाचा सण असावा. आपसूकच त्या देवाला लोटांगण घातले गेले असे त्या विनोदाने म्हणाल्या. तेव्हाच त्यांच्या सकारात्मक दृष्टीकोणाचे दर्शन घडले होते. त्यानंतर त्यांचे मिटींगमधील बोलणेही प्रभावी वाटल्याचे आठवते आहे. त्यानंतर त्यांच्या प्रत्यक्ष गाठीभेटी अनेकदा झाल्या. त्यांना माझ्या संशोधनात खुप रस होता. त्याबद्दल त्यांनी अनेकदा मला काही प्रश्नही विचारले होते. त्यांच्याशी होणार्या प्रत्येक भेटीत त्यांची बुद्धीमत्ता, अभ्यास, समोरच्याला आपले म्हणणे पटवून देण्याची हातोटी, कठिण विषय सोपा करून सांगण्याची त्यांची पद्धत याच गोष्टी समोर येत गेल्या. त्या हाडाच्या समुपदेशक आहेत असे मला नेहेमी वाटते. त्यांच्या वागण्या बोलण्यात, सौम्य स्वरात हा समुपदेशक नेहेमी दिसतो. आनंदयात्रीसाठी डॉक्टरांच्या मुलाखती घ्यायच्या असं जेव्हा ठरलं तेव्हा त्यांचे नाव मनात लगेच आले. आणि त्यांना कुठल्या विषयाबद्दल विचारायचे हे देखिल पटकन ठरले. कारण माझ्या आठवणीप्रमाणे "स्वभावावर काम करावे लागते" हे वाक्य सर्वप्रथम मी त्यांच्याकडूनच ऐकले होते. त्यामुळे "स्वभावदोष" याच विषयावर त्यांची मुलाखत घेतली. ही मुलाखत घेताना देखिल तोच नेहेमीचा सौम्यपणा आणि बुद्धीमत्ता त्यांच्या उत्तरांमध्ये झळकत होती. स्वभावदोष म्हणजे काय हे विचारले असता माधवी मॅडमनी अगदी सविस्तर उत्तर दिले.
त्या म्हणाल्या,"एखादी गोष्ट माणसकडून सवय म्हणून केली जाते. उदाहरणार्थ जेव्हा व्यसनी व्यक्तीच्या हे लक्षात येते की आपण चिडलो की आपल्याला घरचे पैसे देतात. आदळाआपट केली की पैसे मिळतात. मग तो या गोष्टी व्यसन मिळण्यासाठी करु लागतो. व्यसनाचा आजार हा माणसाला सर्वस्वी परावलंबी करणारा असल्याने व्यसन मिळविण्यासाठी चिडणे, आदळाआपट करणे हा त्या व्यसनी माणसाच्या स्वभावाचा भागच बनून जातो. यालाच स्वभावदोष म्हणतात." व्यसनाच्या बाबतीत प्रामुख्याने हे दोष सहा प्रकारचे म्हणता येतील. १) राग २) खोटे बोलणे ३) गृहीत धरणे ४) स्वार्थी वृत्ती ५) कृतघ्नपणा ६) मॅन्युप्युलेशन या दोषांची उदाहरणेही माधवी मॅडमनी दिली. रागाच्या बाबतीत तर व्यसनी माणसाचे वर्तन कसे असते हे बहुतेकांना माहित असते. माझ्या संशोधनाच्या दरम्यान एका उदाहरणात उच्च शिक्षण घेतलेल्या एका माणसाचे उदाहरण मला आठवले. कधीही शिव्या न देणारा हा माणुस व्यसनात असताना शिव्या देत असे. खोटे बोलून व्यसनासाठी पैसे मिळवण्याची असंख्य उदाहरणे आपल्याला माहित असतात. माणसे निरनिराळे बहाणे करून कर्ज काढतात आणि व्यसन करतात. गृहीत धरण्याचे उदाहरण म्हणजे व्यसनी माणुस व्यसन करून रात्री अपरात्री घरी आला तरी त्याला घरच्यांनी उठून गरम जेवण वाढलेच पाहिजे अशी त्याची अपेक्षा असते. त्याने घरच्यांना, आपल्या पत्नीला या बाबतीत गृहीत धरलेलं असतं. हे मिळालेच पाहिजे, झालेच पाहिजे, दिलेच पाहिजे, केलेच पाहिजे यातील जो "च" आहे त्यावर माधवी मॅडमनी बोलताना खुप भर दिला. हा हट्टीपणा व्यसनी व्यक्तींमध्ये दिसून येतो. व्यसनीव्यक्तींच्या स्वार्थीपणावर बोलता येईल तितकं कमीच आहे. व्यसन मिळवणे हाच एक कलमी कार्यक्रम त्यांच्या आयुष्यात असल्याने व्यसनाच्या कालावधीत ही मंडळी घरातील वृद्ध माणसे, आपली पत्नी, मुले यांच्याकडे दुर्लक्ष करु शकतात. व्यसनी व्यक्तीतली कृतज्ञता पूर्णपणे निघून जाते. याचा अर्थ आपल्याला ज्यांनी मदत केली आहे त्यांचीही यांना पर्वा राहात नाही.
याचं महत्त्वाचं कारण व्यसनावर सर्वस्वी अवलंबून राहणे हेच या आजाराचे प्रमुख लक्षण आहे. त्यामुळे ज्यांनी मदत केली, जे मदत करीत आहेत त्यांनी व्यसन सोडण्याबद्दल चार कळकळीचे शब्द सांगितले तर ही मंडळी दुर्लक्ष करु शकतात. शिवाय व्यसन मिळणार असेल तर आपल्याला मदत केलेल्या माणसांशी भांडणे, त्यांचा अपमान करणे, त्यांच्याशी खोटे बोलणे, त्यांच्या विरुद्ध जाणे, त्यांच्याशी हिंसक वर्तन करणे हे देखिल व्यसनी व्यक्तीकडून घडू शकते. त्यानंतर एखाद्याला पार गुंडाळून टाकणे हा मॅन्युप्युलेशनचा भागही व्यसनी माणसाच्या स्वभावात दिसतो. मग त्यात गोड बोलून विश्वास संपादन करणे, भावनांचे खोटे प्रदर्शन करून सहानुभूती मिळविणे यासारखे प्रकार येतात. हा सारा खटाटोप व्यसन मिळविण्यासाठी, व्यसन लपवण्यासाठीदेखिल केला जातो. व्यसनी माणसाच्या भावना बोथट झालेल्या असतात. त्यामुळे इतरांच्या दु:खाची, त्यांना आपल्या व्यसनामुळे होणार्या त्रासाची यांना फारशी जाणीव होत नाही. हे सारे स्वभावदोष व्यसन जस जसं वाढतं तसे सवयीत परिवर्तीत होतात. या एकंदरीत विषयावर टिप्पणी करताना माधवी मॅडम म्हणाल्या की अशा तर्हेची एखादा दोष स्वभावात दिसला तर सूज्ञ माणुस त्या दोषाचा स्विकार करून त्यावर काम करुन तो दोष दूर करण्याचा प्रयत्न करतो. हा प्रयत्न व्यसनाच्या दरम्यान व्यसनी व्यक्तीकडून घडताना दिसत नाही. अनेकदा असे दिसून आले आहे की माझ्या मनाप्रमाणे झालेच पाहिजे असे ज्यांना नेहेमी वाटते ती मंडळी व्यसनाच्या अधीन जाण्याची शक्यता जास्त असते. कारण ही माणसे अपयश सहन करू शकत नाहीत. यांच्या भावना टोकाला जाताना दिसतात. स्वभावदोषांबद्दल स्पष्टीकरण केल्यावर माधवी मॅडम उपचारांकडे वळल्या.
उपचारांबद्दल बोलताना त्यांनी सांगितले की त्यांच्यामते व्यसनमुक्तीचा ८०% उपचार म्हणजे स्वभावावर काम करणे हाच असतो. हे अतिशय महत्त्वाचे वाक्य होते. त्या पुढे म्हणाल्या माणसे व्यसनमुक्त होतात. दारु सुटते पण स्वभावदोषांवर काम करणे आवश्यक असते. व्यसनादरम्यान निर्माण झालेले काही स्वभावदोष जातात तर काही तसेच राहतात. काही स्वभावदोषांमुळे माणुस व्यसनाकडे वळलेला असतो. या सर्वांवरच काम करणे भाग असते. याचा विचार उपचारांच्या दरम्यान करावा लागतो. व्यसनी माणुस समोर बसल्यावर त्याला प्रश्न विचारले जातात. त्यावेळी त्याने दिलेली उत्तरे, त्याची देहबोली, त्याच बरोबर कुटूंबासोबत झालेले बोलणे यावरून माणसाचा स्वभाव लक्षात येतो. व्यसनाकडे वळण्यामागे आणि वारंवार व्यसन करण्यामागे काही "ट्रिगर्स" असतात. ते लक्षात येतात. अनेकदा आपला स्वभाव हाच सर्वात मोठा ट्रिगर असु शकतो. शिवाय व्यसनावरील उपचार पद्धती ही रेडीमेड नसून टेलरमेड असावी लागते हे माधवीमॅडमनी अधोरेखित केले. प्रत्येकाच्या समस्या आणि स्वभाव वेगळा असु शकतो. ते ओळखून उपाय योजना करणे गरजेचे असते. काहीवेळा मानसोपचारतज्ञाची मदत घेऊन रुग्णाला काही मानसिक आजार आहे का ते ही जाणुन घ्यावे लागते. कारण असा आजार असल्यास त्यावर उपाय केल्याशिवाय स्वभावदोषांवर काम करता येत नाही. उपचारांबद्दल बोलल्यानंतर मी उपचार झाल्यावर जेव्हा रुग्णमित्र हा व्यसनमुक्तीच्या पथावर चालु लागतो तेव्हा त्याने स्वभावदोषांवर कसे काम करावे याकडे वळलो. अनेकदा समाजात शरीरातून व्यसन जाणे म्हणजेच व्यसनमुक्त होणे अशी समजूत असते. जी घातक ठरते. माणसे स्वभावातील दोषांवर काम करीत नाहीत आणि ते दोष निघाल्याशिवाय रिकव्हरीची प्रक्रिया पूर्ण झाली असे म्हणता येत नाही. माधवीमॅडमनी हा मुद्दा आपल्या बोलण्यात स्पष्ट केला.
अनेकजण आपली दारु सुटली म्हणून समाधन मानतात. कदाचित सुरुवातीला घरच्यांनादेखिल बरे वाटते. पण यातील काही व्यक्तींना मोबाईलचे व्यसन लागते. तर काहीजण तासनतास टिव्ही पाहात बसतात. पूर्वी दारुवर अवलंबून असायचे तर आता मोबाईलवर किंवा टिव्हीवर अवलंबून राहू लागतात. शेवटी व्यसन हे कुठलेही वाईटच. दारूच्या आणि मोबाईलच्या व्यसनाच्या परिणामांमध्ये फारसा फरक नसतो. म्हणूनच स्वभावदोषांना कधीही कॅज्युअली घेऊ नये. स्वभावदोष हे समजून उमजून काड्।आवे लागतात. स्वभावदोषांवर काम करणे ही जाणीवपूर्वक करावी लागणारी गोष्ट आहे यावर माधवीमॅडमचा भर दिला. अनेक वर्षे व्यसन केलेले असते. त्यामुळे स्वभावदोषही हाडीमांसी खिळलेले असतात. ते प्रयत्नपूर्वक "अनलर्न" करावे लागतात. यासाठी व्यक्तीने सजग राहणे आवश्यक असते. आपल्या स्वभावदोषांची आपल्याला जाणीव असणे आवश्यक असते. या स्वभावदोषांचे परिणाम काय होतात याचीही माहिती असणे महत्त्वाचे असते. स्वतःच्या वागण्याचं स्वतःच निरिक्षण करणे आवश्यक आहे. त्यातून अनेक गोष्टी कळू शकतात. या सार्या प्रक्रियेमध्ये कुटुंबाची, सहचरीची भूमिकाही महत्त्वाची आहे. मूळात व्यसन हा कुटूंबाचा आजार असल्याने व्यसनी व्यक्तीमुळे कुटुंबातील व्यक्तींमध्ये आणि सहचरींमध्येही स्वभावदोष निर्माण होऊ शकतात हा अतिशय वेगळा मुद्दा मॅडमनी मांडला. दारु ही व्यसनी व्यक्तीच्या पोटात असते तर कुटुंबियांच्या डोक्यात असते. सतत व्यसनी व्यक्तीची चिंता आणि समाजात होत असलेली हेटाळणी, नाती तुटणं त्यामुळे येणारा एकटेपणा, विस्कटलेली आर्थिक घडी याचे विपरीत परिणाम कुटूम्बियांच्या स्वभावावर होतात. त्यातून व्यसनीव्यक्ती व्यसन सोडण्याचा प्रयत्न करीत असतानादेखिल त्याला कुटूंबिय क्षमा करु शकत नाहीत इतका त्यांना व्यसनाच्या दरम्यान त्रास झालेला असतो. यामुळे व्यसनमुक्तीच्या प्रक्रियेत अडथळा येऊ शकतो.
त्यासाठी सर्वप्रथम म्हणजे व्यसन हा आजार आहे. आपल्या व्यक्तीला तो आजार झाला आहे. या आजारामुळे व्यक्तीच्या वर्तनात समस्या येत आहेत. ती व्यक्ती वाईट नाही हे कुटुंबियांनी समजून घेणे गरजेचे आहे. त्या व्यक्तीला तो आहे तसे स्विकारणे महत्त्वाचे आहे. व्यसनीव्यक्तीचे स्वभावदोष त्याला नीट समजवून देणे महत्त्वाचे आहे. स्वभावदोष घालवणे ही चिकाटीने चालणारी प्रक्रिया आहे. त्यासाठी मानसोपचारतज्ञ, समुपदेशक, सहचरी, इतर कुटूंबिय या सर्वांचाच सहभाग असतो. सोबराईटी म्हणजे निव्वळ व्यसन करण्याचे थांबणे इतकेच नसून सोबराईटीचा दर्जा किंवा ज्याला सोबराईटीची "क्वालिटी" म्हणतात ती क्वालिटी काय आहे त्यावर व्यसनमुक्तीनंतरच्या आयुष्याचा दर्जा अवलंबून असतो. आणि हा दर्जा उंचावण्याची इच्छा असेल तर स्वभावदोष घालवण्याला पर्याय नाही असेच माधवीमॅडमचे म्हणणे दिसले. एखादी गोळी, एखादे औषध स्वभावदोषांवर लागु होत नाही. फार तर स्वभावदोषांवर काम करण्याआधी गरज भासेल तेव्हा टोकाला गेलेले मूड स्विंग्ज संतूलित करण्यासाठी औषधोपचारांची योजना केली जाते. माधवीमॅडमची मुलाखत संपत आली होती. त्यांच्या बोलण्याचे सार जेव्हा मी काढले तेव्हा मला असे लक्षात आले की "मी म्हणतो तेच खरं" अशी वृत्ती बाळगणे हा व्यसनमुक्तीतील मोठा अडथळा आहे. किंबहूना हा एक मोठा स्वभावदोष आहे. यावर काम केले पाहिजे. माधवीमॅडमशी माझे जेव्हा जेव्हा बोलणे झाले तेव्हा तेव्हा त्यांचा सौम्य स्वभावच मला जास्त लक्षात राहिला. आता त्या स्वभावामागचे रहस्य मला समजले. मी म्हणतो तेच खरं याच्या बरोबर उलट असा नम्र स्वभाव त्यांचा आहे. या नम्र स्वभावामुळेच त्या आपले म्हणणे अतिशय परिणामकारकरित्या मांडू शकतात, समोरच्याला पटवून देऊ शकतात आणि तेच त्यांच्या समुपदेशक म्हणून यशाचे गमकही आहे असे मला वाटते.
अतुल ठाकुर
(आनंदयात्री मध्ये पूर्वप्रकाशित)
छान, हा ही लेख आवडला
छान, हा ही लेख आवडला
धन्यवाद
धन्यवाद
वा:! फारच छान, संग्रही ठेवावा
वा:! फारच छान, संग्रही ठेवावा असा लेख आहे. माधवीमॅडम यांचा आपल्या क्षेत्रातील गाढा अभ्यास जाणवतो. आणि अतुलजी, आपणही सर्व मुद्दे अगदी सुंदररित्या आपल्या लिखाणात उतरवले आहेत. फारच छान लिहिलं आहे. आपले अभिनंदन!
खूप सुंदर
खूप सुंदर
interesting read! Thanks!
interesting read! Thanks!
त्यांच्या कामाचे कौतुक आहेच
त्यांच्या कामाचे कौतुक आहेच परंतू एक सर्वात महत्त्वाच्या मुद्याकडे दुर्लक्ष केले आहे. समाजाला घाबरून तो मुद्दा सांगितला जात नाही. तो म्हणजे व्यसनी तरुणास आइवडिलांकडून सतत पाठीशी घातले जाते. त्यांनीच खंबिरपणे दाखवून मुलास घराबाहेर काढले पाहिजे. तेच इतर चांगल्या वागणाय्रा मुलांवरही अन्याय करतात. भांडणं लावतात. व्यसनी मुलावर पैसे सतत खर्च करून आसरा मात्र इतराकडे.
हा मुद्दा डॅाक्टर बाईंनी पटवला पाहिजे. उगाच व्यसनी बाब्यांचे लाड थांबवा. "तू मला छान म्हण आणि मी तुझी पाठ थोपटीन" ही वृत्ती जाहिर कार्क्रमांतून बंद झाली पाहिजे.
प्रतिसादाबद्दल आभार. कुटुंब
प्रतिसादाबद्दल आभार. कुटुंब आणि व्यसन हा विषय घेईन तेव्हा तुम्ही सांगितलेला मुद्दा घ्यावा लागणारच आहे.
व्यसनी व्यक्तिला स्वतःला
व्यसनी व्यक्तिला स्वतःला जोपर्यंत जाणवत नाही की आपल्याला व्यसन लागले आहे, तोपर्यंत हे समुपदेशन वगैरे सगळे व्यर्थ आहे, मग ते व्यसन सिगरेटचे असो किंवा गुटख्याचे किंवा दारुचे किंवा अमली पदार्थाचे किंवा इंटरनेटचे.
इच्छुकांनी तुषार नातू यांचे "नशायात्रा" हे पुस्तक जरूर वाचावे.
तुम्ही म्हणताय ते एका
तुम्ही म्हणताय ते एका मर्यादेपर्यंत बरोबर आहे. पण काहीवेळा इच्छा नसताना दाखल झाले आणि तेथिल काही कार्यक्रमांमुळे उपचार मनापासून घ्यावेसे वाटले असे घडू शकते. अर्थातच १००% नाही तरी काही टक्के रुग्णाची स्वतःची उपचार घेण्याची इच्छा असणे आवश्यक आहे.