जीवनात येणार्या बर्याचशा छोट्या-मोठ्या किचकट समस्या सोडवण्यासाठी तर्क (logic) या विचारपध्दतीचा उपयोग होतो.पण प्रत्येक व्यक्ती याचा उत्तम प्रकारे उपयोग करुन घेण्याइतपत हुशार असेलच नाही.पण उत्तमपैकी तार्किक विचार करता येणं ही काही जन्मजात देणगी नव्हे.बर्यापैकी अचूक तर्क कसा करायचा हे व्यवस्थित समजल्यास,थोडा अभ्यास केल्यास,सराव केल्यास यात बर्यापैकी प्रगती होऊ शकेल.अनेक समस्या सहज सुटू शकतील.समस्यांनी चिंताग्रस्त होऊन हतबल होण्याऐवजी आणि भावनेच्या भरात काहीवेळा चुकीचा निर्णय घेऊन नुकसान होण्याऐवजी तर्काने समस्या सोडवण्याचा प्रयत्न करणं कधीही चांगलंच!
याच अनुषंगाने खालील प्रश्न समोर येतात.त्यांची उत्तरे मिळाल्यास तर्काचा अचूक वापर करण्यासंबंधाने विषय पुढे सरकू शकेल.
१. तर्क केव्हा चुकतो?त्यामागची कारणं कोणती?
२. तर्क आणि त्यातून निष्कर्ष यासाठी स्मरणशक्ती चांगली असणं ही मुख्य गरज आहे का?(असावी असं मला तरी वाटतं.चुकत असल्यास कृपया गैरसमज दूर करावा!)
कारण तर्कातून निष्कर्ष काढण्यापूर्वी समस्येसंबंधी सर्व मुद्दे,माहिती असणं आवश्यक असतं.आपण सर्व मुद्दे विचारात घेतलेत की काही मुद्दे विचारात घेतलेलेच नाहीत हे नेमकं कसं कळावं? यावर उपाय काय?
३. एखाद्या विषयातल्या आकलनसंबंधाने "मी ऐकतो आणि विसरुन जातो,मी पाहतो आणि माझ्या लक्षात राहतं,मी करतो आणि मला समजतं" ही चिनी म्हण पुढं केली जाते.यात कितपत तथ्य आहे? कारण शास्त्रज्ञांनी जेव्हा चंद्रावर जाण्यासाठी तयारी सुरु केली तेव्हा सर्व गोष्टी कागदावर मांडून किंवा चंद्रावरील वातावरणाचा तर्क करुन तशाच प्रकारचे वातावरण प्रयोगशाळेत निर्माण करुन तिथे सराव केला गेला असावा.पण तो काही प्रत्यक्ष चंद्रावरील वातावरणाचा अनुभव नव्हेच!
किंवा आईन्सटाईनने आपलं सारं संशोधन हे वहीत लिहून तर्क मांडूनंच केलंय.आईनस्टाईन सतत प्रयोगशाळेत जाऊन प्रयोग करुन मगच निष्कर्ष काढत असे असं काही वाचनात नाही.
मग हे अशाप्रकारे प्रत्यक्ष ती गोष्ट करुन,वापरुन न पाहताही केलेला तर्क बरोबर कसा येतो? अशा प्रकारे कागद,संगणक,कृत्रिम वातावरण अशी साधनं वापरुन केलेल्या तर्कामधे त्रुटी राहू शकतात का? समजा राहत असतील तर पर्यायाने त्या चिनी म्हणीत सांगितलेला तिसर्या क्रमांकाचा उपायच (शक्य असेल तर) आधी करुन पाहणं जास्त योग्य असावं का?
४. भावनिकता हे मानवी स्वभावाचे अंग आहे.पण भावनिकता ही तर्काची शत्रू सुध्दा आहे.भावनेच्या भरात घेतलेला निर्णय चुकण्याची शक्यता अधिक असते.याचा अर्थ एखादी व्यक्ती मनाने अगदी कोरडी असेल,भावनिकता अगदी कमी असेल तर ती उत्तम तर्क करु शकेल असं समजावं का? की भावनिकतेचा आणि तर्काचा संबंध नसतो? किंबहुना निष्कर्ष काढताना,निर्णय घेताना भावनांवर नियंत्रण कसं ठेवावं?
५. कॉमनसेन्स (शहाणपणा) हे तर्काचंच अपत्य की दोन्हीमधे काही फरक आहे? कॉमनसेन्स संबंधीचं एक परंपरागत उदाहरण म्हणजे "टोमॅटो हे फळ आहे ही माहिती झाली पण ते फ्रुट सॅलडमधे वापरु नये हा कॉमनसेन्स आहे." आता टॉमॅटो हे फळ असलं तरी तो चवीला आंबट-गोडसर नसतो. फ्रुट सॅलड हे आंबट-गोड फळांचंच बनवतात.म्हणून तो फ्रुट सॅलडमधे वापरत नाहीत.हे यामागचं तार्किक कारण आहे. म्हणजे इथं तर्क आला.
जर तर्क हाच कॉमनसेन्सचा मूळ असेल तर आणि उत्तमपैकी तर्क करणं शिकता येत असेल तर मग "Commonsense is not so common." असा प्रचार होण्याचं कारण काय? खरंच कॉमनसेन्स हा दुर्मिळ असतो का?
कॉमनसेन्स हा दुर्मिळ असेल तर तो विकसित करण्याचे उपाय कोणते?
६. तर्क कुठपर्यंत ताणावा? कुठे थांबावं? तर्काचा अतिरेक कसा अोळखावा?
७. केंद्रगामी (Convergent) आणि बहिर्गामी (Divergent) या विचारांच्या अजून दोन उपपध्दती.
केंद्रगामी म्हणजे रुढ पध्दतीने विचार करणे.ही पध्दत बर्याचदा उपयोगी पडते.पण काही वेळा ही पध्दत उपयोगी पडत नाही.अशा वेळी बहिर्गामी पध्दतीने विचार करावा लागतो.खालील उदाहरण पहा.
एकदा दोन हाडवैद्य असणारे मित्र रस्त्याकडेला गप्पा मारत उभे होते.एवढ्यात त्यांना दूरुन एक माणूस थोडासा लंगडत येताना दिसला.एक हाडवैद्य म्हणाला याला गुडघ्याशी संबंधित काहीतरी त्रास आहे.म्हणून हा लंगडत चालतोय.तर दुसरा म्हणाला नाही याच्या पायाच्या घोट्याला काहीतरी इजा झालेली आहे.म्हणून हा लंगडतोय.दोघेही आपापल्या मतांवर ठाम होते.शेवटी तो माणूस यांच्याजवळ आल्यावर यांनी त्यालाच विचारल्यावर तो म्हणाला "बाबांनो मला पायाला कोणताही आजार झालेला नाही.माझ्या चपलेचा अंगठा तुटलाय.म्हणून जरा सावरत चाललोय.इथं चांभार कुठं भेटेल तेवढं सांगा."
विनोद असला तरी बहिर्गामी विचार न केल्यानं अंदाज कसा चुकतो याचं हे उदाहरण!
एखादी गोष्ट घडण्यामागच्या शक्य तितक्या सर्व शक्यता शोधणे म्हणजे बहिर्गामी विचार करणे.केंद्रगामी पध्दत ही वेळ वाचवणारी आहे.परंतु जेव्हा ती वापरुनही उपयोग होत नाही त्यावेळी बहिर्गामी पध्दतच वापरावी लागते.
असा बहिर्गामी विचार करता येण्यासाठी समस्येकडे वेगळ्या दृष्टीने पाहण्याची गरज असते.नेमकं तेच काम या पध्दतीत अवघड आहे.काही लोकांना हे जमतं.हे वेगळ्या दृष्टीकोनातून पाहता येण्यासाठी,जमण्यासाठी काय बरं करता येईल?
८. स्पर्धा परीक्षांमधे विचारली जाणारी कोडी सोडवणं याचा किती उपयोग होऊ शकतो? ही कोडी सोडवण्याचा सराव व्यवहारातील समस्या सोडवण्यासाठी कसा काय उपयोगी पडू शकतो? की केवळ मनोरंजन,मेंदूला खुराक एवढ्याच दृष्टीने त्यांच्याकडे पहावं?
आपापल्या क्षेत्रात तज्ञ असणार्या व्यक्तींचं एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांचं त्या विषयासंबंधीचं तार्किक ज्ञान.माबोवर आपापल्या क्षेत्रात तज्ञ असणार्या बर्याच व्यक्ती आहेत.जीवनोपयोगी अशा या विषयावर विस्तृत चर्चा व्हावी ही अपेक्षा!