कोणता चक्रम इथे

Submitted by बेफ़िकीर on 7 February, 2018 - 07:54

गझल -

का, कसे, केव्हा, कुणी हे आजही संभ्रम इथे
विश्व गेला थाटुनी हे, कोणता चक्रम इथे

झाड होण्याचे बघावे स्वप्न आयुष्या कधी
चांगला माणूस होतानाच लागे दम इथे

घेतली की अंतरे मिटतात आपोआप ही
ती कुठेही का असेना, घाल थोडी रम इथे

मानला कामात मी आनंद जेव्हापासुनी
तेवढा आराम केला जेवढे मी श्रम इथे

ह्यापुढे देऊ नको त्यांना मनाचे स्टेज तू
रोज कोणाचे न कोणाचे अरंगेत्रम इथे

नाहिली आहेस ना नुकतीच पूर्वीसारखी
की उगा चिडवायला आली तुझी घमघम इथे

हे अनाथालय बिचारे वाटते तुमच्यापरी
खिन्न ज्येष्ठांनो चला काढूच वृद्धाश्रम इथे

एक ताटातूट झाली आपली तेव्हा इथे
एकदा होईल नक्की आपला संगम इथे

स्थान आहे वेगळे हा भाग आहे वेगळा
ती तुझी कायम तिथे अन तू तिचा कायम इथे

वेगळी देहाहुनी आहे मनाची मागणी
की न कारावास लाभो ह्यापुढे सश्रम इथे

त्या बिचाऱ्या पाखरांनी शिस्त थोडी मोडली
सोंगट्या घेऊन गेले, ठेवला कॅरम इथे

स्पष्ट मुद्दे मांडण्याची वेळ नाही राहिली
तुच्छ साडेतीन टक्क्या बोल तू मोघम इथे

वागणे नावाप्रमाणे सोड तू आतातरी
जो तुला ना झेपतो तो 'बेफिकिर' आलम इथे

-'बेफिकीर'!

(भ्र आणि क्र ही वेगळी अक्षरे आहेत)

Group content visibility: 
Public - accessible to all site users