दुपारी ३ वाजता दारावर टकटक झाली आणि नियतीने दार उघडून एका मध्यमवयीन माणसाला आत घेतलं.
'नमस्कार! मी ठोकताळे साहेबांना भेटायला आलोय.' आपल्या समोर एका अत्यंत सुंदर ६ फुटी उंच सोनेरी केसाच्या स्त्रीला पाहून त्या गृहस्थाचे डोळे चमकले. नियती होतीच तितकी सुंदर.. रेखीव शेलाटा बांधा, गोरीपान अंगकांती, गोड चेहरा, मानेवर रुळणारे सोनेरी केस, कोलगेटच्या जाहिरातीतल्या बाईसारखी शुभ्र व मोत्यासारखी दंतपंक्ती, खुलून दिसणारं नकटं नाक आणि मादक भुरे डोळे. तिनं जीनची निळी पँट आणि वर गुलाबी टीशर्ट घातला होता.
'आपलं नाव?' नियतीने तिच्या गंगुबाई हनगळी आवाजात विचारणा करताच त्याच्या डोळ्यातली चमक मावळली. ते न लक्षात येण्याइतकी नियती आंधळी नव्हती पण त्याची तिला आता सवय झाली होती. तिला स्वतःलाही तिचा आवाज आवडत नसे, पण तिचा नाईलाज होता.
'दीपक इंगवले'
'या! या! मी नियती डोईफोडे, ठोकताळेंची असिस्टंट, बसा ना!' नियतीने उत्तम ठोकताळे समोरच्या एका खुर्चीकडे निर्देश केला. ते ऑफिस एका 1 BHK फ्लॅट मधे थाटलेलं होतं. हॉलमधे पुस्तकांनी भरलेली ४/५ कपाटं होती. टीपॉय आणि स्टडी टेबलवर अनेक पुस्तकं, कागद, वर्तमानपत्रं इतस्ततः पडलेली होती. दीपक कोचावर बसत असताना नियतीने पटापट 'किती पसारा करून ठेवतोस रे?' असं पुटपुटत जमेल तेव्हढा पसारा आवरला.
दीपक इंगवले हा सुमारे ४४/४५ वर्षांचा साधारण साडेपाच फुटांचा माणूस! काळसर वर्ण, गरीब चेहरा, गुळगुळीत दाढी, मिशा सफाचट, काळेभोर केस वार्यामुळे विखुरलेले! केसांना कलप केलेला असावा कारण काही पांढरे केस अर्धवट वाळलेल्या गवताच्या टोकांसारखे डोकावत होते! त्याने सुंदर नक्षीकाम केलेला सिल्कचा सलवार कुडता घातलेला होता व भारीतलं मंद वासाचं पर्फ्युम फवारलेलं होतं. सुटलेलं पोट, गळ्यातली सोन्याची जाड चेन, हातावरचं रोलेक्स घड्याळ त्याची चांगली परिस्थिती सुचवत होत्या. कपाळावर गंध होतं व डोळ्यांच्या कडा ओलावलेल्या होत्या!
'नमस्कार! मी उत्तम ठोकताळे' उत्तमने स्वतःची ओळख करून दिली. उत्तमचा सावळा रंग, पांढरे होऊ घातलेले केस, चौकोनी फ्रेमचा चष्मा, साधारण साडे पाच फूट उंची, थोडेसे पुढे आलेले दात, काळे डोळे इ. गोष्टींची दीपकने नोंद केली. उत्तमने एकेकाळी चांगलं शरीर कमावलेलं होतं हे त्याच्या स्थूल अंगकाठीतून पण त्याच्या लक्षात आलं.
'नमस्कार! मी दीपक इंगवले! तुमच्याबद्दल खूप ऐकलं आहे. पेपरात पण आलं होतं की तुम्ही लंडनच्या शेरलॉक होम्स इन्स्टिट्युट मधून खास शिक्षण घेऊन आला आहात म्हणून!' बसता बसता दीपक म्हणाला.
'हां ती जाहिरात होती, आम्हीच दिली होती.' नियतीने भाबडेपणाने खरं काय ते सांगितलं आणि उत्तमने एक नाराजीचा कटाक्ष टाकला.
'चहा घेणार?'.. नियतीने मधेच विचारलं.
'नको आत्ता नको.'.. दीपक
'म्हणजे फक्त उत्तमच घेईल मग!'.. नियतीने खिडकीतून डोकावलं, तोंडात बोटं घालून एक जोरदार शिट्टी मारली आणि तर्जनी उंचावत एका चहाची ऑर्डर खालच्या टपरीवाल्याला दिली.
'आम्ही आता शेरलॉक होम्स इन्स्टिट्युटचे सर्टिफाईड प्रॅक्टिशनर आहोत! प्रॅक्टिशनर होण्यासाठी २ वर्षांचं ट्रेनिंग घ्यावं लागतं इंग्लंडमधे. ते शिक्षण ज्याला शेरलॉक बनायचंय आणि ज्याला वॉटसन व्हायचंय त्यांनी एकत्रित पणे घ्यायचं असतं. मी आणि नियतीने ते घेतलंय.'.. उत्तम अभिमानाने म्हणाला.
'वा! वा! फार छान! मी आणि माझी बायको.. आम्ही दोघेही शेरलॉक होम्सचे जबरदस्त फॅन!'... हा हा हा हा हा! नियती मधेच गडगडाटी हास्य केलं आणि दीपकने चमकून तिच्याकडे पाहीलं.
'ती हास्यक्लबला जाते त्याचा परिणाम आहे हा! तुम्हाला नाही हसली ती! शेरलॉक म्हणजे मला गुरुच्या जागी हो!'.. असं म्हणत उत्तमने आपले कान पकडले.
'माफ करा हं! पण तुमचं आडनाव तसं फारसं ऐकण्यातलं नाही!!'.. दीपक हसू दाबत म्हणाला.
'हं! तुम्ही एकटेच नाही त्यातले. आमच्या पूर्वजांच्याकडे पेशव्यांच्या कारकीर्दीत घरांवर जप्त्या आणून वसुली करायचं काम होतं. म्हणजे घरांवर ताळं ठोकायचं काम! म्हणून ठोकताळे! माझे वडील उत्तमोत्तम गोष्टींचे चाहते! त्यांनी माझ्या बहिणीचं नाव ठेवलं तिलोत्तमा, माझं उत्तम! त्यांचं नाव आहे सर्वोत्तम. त्यांनी आईचं नाव बदलून केलं सर्वोत्तमा! बरं, इंगवले साहेब! तुम्ही तुमच्या कामाचं बोला नाही तर तुम्हाला कोहीनूर मंगल कार्यालयातल्या शिंदेंच्या मुलीच्या रिसेप्शनला जायला उशीर होईल. तुम्ही आत्ताच एका जवळच्या नात्यातल्या मुलीच्या लग्नाचं जेवून आला आहात, बरोबर?.'.. उत्तमने शेरलॉकी चुणुक दाखवली.
'आँ! तुम्हाला कसं कळलं?'.. स्वतःवर खूष होऊन उत्तमने नियतीकडे नजर फेकली. ती त्याच्याचकडे कौतुकाने पहात होती.
'सोप्पं आहे! तुमच्या हाताला येणार्या अत्तराच्या वासावरून तुम्ही नक्कीच एका लग्नाला जाऊन आला असणार. विड्यानं रंगलेले ओठ तुमचं जेवण झाल्याचं दर्शवतात.'
'बरोबर! पण जवळच्या नात्यातल्या मुलीच्याच लग्नाला कशावरुन?'.. दीपक
'तुमच्या भारीतल्या कपड्यांवरून व हातावरच्या रोलेक्स घड्याळवरून! सहसा जवळच्या लग्नातच लोकं जास्त नटतात, विशेषतः पुरुष! आणि तुमच्या डोळ्याच्या कडा ओलावलेल्या आहेत. म्हणजे मुलीचंच लग्न असणार. मुलाच्या लग्नात वरपक्षाकडची मंडळी नक्कीच रडणार नाहीत. म्हणजे मानपान नीट झालं नाही म्हणून तशी रडतील पण अशी नाही रडणार! काय?'.. उत्तमचे उत्तम स्पष्टिकरण.
'आणि मला रिसेप्शनला जायचं आहे ते कशावरून काढलंत?'.. दीपकच्या डोळ्यात आता कौतुक दिसत होतं. ही ही ही ही ही ही! नियतीचा हास्यालाप नंबर २.
'हां! तुमच्या सिल्कच्या झुळझुळीत कुडत्याच्या खिशातल्या पत्रिकेतलं थोड फार वाचता येतंय. त्यातलं शिंदे, रिसेप्शन आणि कोहीनूर मंगल कार्यालय इतकंच दिसलं मला.'
'वा! वा! तुमची अनुमानं अगदी बरोबर आहेत! काही म्हणा, अगदी २२१ ब, बेकर स्ट्रीट मधे प्रत्यक्ष शेरलॉक समोर बसल्याचा अनुभव दिलात तुम्ही! बरं, मी माझं काम सांगतो, मला वाटतंय ते तुम्हाला नक्की आवडेल.'.. दीपकचं काम ऐकण्यासाठी उत्तम कान टवकारून सरसावून बसला. टेबलावरचा रिकामा पाईप तोंडात घेऊन त्याने नुसत्या हवेचे झुरके मारले. त्याला विडीकाडीचं व्यसन नव्हतं तरीही! पाईप तोंडात ठेवल्यावर लक्ष चांगलं केंद्रित होतं अशी त्याची धारणा होती पण खरं तर ते त्याच्या दैवताचं अंधानुकरण होतं!
'मध्यंतरी चॅटिंग करताना माझी एका मुलीची ओळख झाली. तिचं नाव तिनं अनुजा देशमाने सांगितलं. वय २६. तिनं मला जे काही सांगितलंय आत्तापर्यंत त्यामुळे मला तिच्याबद्दल फारच सहानुभूति वाटायला लागली आहे बघा! बिचारीचा काळ फार वाईट आहे. मला तिला मदत करायची इच्छा आहे.'
'काय आहे तिची कहाणी?'.. नियतीने न रहावून विचारलं.
'तिचे वडील अकाली अचानक गेले, घराचं प्रचंड कर्ज ठेवून. आई घर संभाळायची, नोकरी करीत नव्हती. आणि या वयात अनुभव नसताना कोण नोकरी देणार? अनुजाचा तुटपुंजा पगार हप्ता फेडायला पुरेसा नव्हता. तेव्हा बापाच्या मित्राने कर्जाच्या हप्त्याचे पैसे देऊ केले पण हरामखोराने अट अशी घातली की तिनं त्याच्या बरोबर रहायचं. तो लग्न झालेला ४८ वर्षांचा माणूस आहे बरं का! नाशिकला बायका-पोरांबरोबर रहातो. त्याची पुण्यामधे स्वतःची कंपनी आहे. तिथे त्याने तिला नोकरी देऊ केलेली. ती मूळची मुंबईची आहे. हे डील त्या दोघांशिवाय कुणालाच माहीत नाही. पुण्यामधे त्याचा फ्लॅट आहे. तिथे ती रहाते. त्याची बायको जेव्हा येणार असते त्या आधी ती आपल्या गोष्टी बेडरूम मधून हलवते. त्याची बायको तिला मुलीसारखी वागवते. तिलाही काही कल्पना नाही. त्याची एक मुलगी साधारण तिच्याच वयाची आहे. ऑफिसात ते दोघे वेगवेगळ्या वेळेला जातात, लोकांना संशय येऊ नये म्हणून. तिला भावंडं नाहीत.' दीप़क थांबला, त्याचा चेहरा रागाने लालबुंद झाला होता. हाताच्या मुठी वळलेल्या होत्या.
'त्या xxxचं बिंग फोडून जगणं मुश्कील करायला पाहीजे'.. इतक्या सुंदर मुलीच्या तोंडातून असली गलिच्छ शिवी ऐकून दीपकला कससंच झालं.
'ठोकताळे साहेब तुम्हीच तिला शोधू शकाल!' दीपक अजिजीने म्हणाला.
'आँ! म्हणजे ती हरवली आहे का?'.. उत्तम.
'नाही! पण तिचा काही ठावठिकाणा नाही माझ्याकडे! मी विचारलं तिला, पण तिनं काही सांगितलं नाही! फार मानी आहे हो ती!'
'म्हणजे? तुमच्याकडे तिची काहीच माहिती नाही? तुम्हाला माहिती आहे ना की पुण्यात पत्ता माहिती असला तरी घर सापडत नाहीत ते?'.. उत्तमने शेरलॉकी खडूसपणा दाखवला.
'ठोकताळे साहेब म्हणून तर मी तुमच्याकडे आलो. तुमच्यासारखा हुशार माणूसच तिला शोधू शकेल. पोलिसांच काम नाही हो ते. हां, नाही म्हणायला तिच्या फेसबुकची लिंक आहे माझ्याकडे!'
'पण तुम्हाला का तिला इतकी मदत कराविशी वाटतेय?'.. उत्तम.
'हम्म ती एक लांबडी गोष्ट आहे.'.. दीपक गंभीर झाला.. 'माझ्या मूर्खपणाची फळं भोगतोय. माझ्या मुलीनं आत्महत्या केली माझ्यामुळे. तिला मेडिकलला जायचं होतं पण मार्क कमी पडले. मग प्रचंड डोनेशन शिवाय अॅडमिशन मिळेना. तितके पैसे द्यायला मी काचकुच केली. आता अशा अडिअडचणीतल्या मुलींना मदत करून मनःशांती मिळवायचं बघतो.'.. खोलीतलं वातावरण गंभीर झालं.
'इंगवले साहेब माफ करा, पण ही केस मी नाही घेऊ शकत! इतक्या तुटपुंज्या माहितीवर तर नाहीच नाही.'.. उत्तमने खोडा घातला.
'का? मी खूप आशेने आलो होतो हो.'.. दीपक हताशपणे म्हणाला.
'सागितलं ना? त्रोटक माहिती आहे आणि आणखी मिळण्याची शक्यता दिसत नाही. तुमचा पैसा नुसता खर्च होईल पण हाती काही लागणार नाही.'
'ठोकताळे साहेब तुमचा प्रामाणिकपणा आवडला मला! तुम्ही हवं तर विचार करा १/२ दिवस मग मला सांगा. हा माझा नंबर. ठीक आहे?'
'हो हो जरूर!'.. नियतीने उत्तमला कसलीही संधी न देता परस्पर उत्तर दिलं आणि दीपक इंगवले गेला.
------***-----------***---------
'मग काय करायचं आता?'.. उत्तमने ओट्यावरचा चहा हातात घेऊन कोचावर जाऊन बसेपर्यंत नियतीचा प्रश्न हजर झाला आणि नेहमीचाच प्रतिप्रश्न पण आला.
'कशाचं?'
'अरे कशाचं काय आता? त्या इंगवलेच्या केसचं?'
'सांगितलं ना मी त्याला, जमणार नाही म्हणून!'
'काय रड्या आहेस रे तू? हॅट!'.. नियतीचं वर्मावर बोट.
'आयला, मी काय रड्या? इथं बोंबलायला काय केस आहे? सांग ना सांग!'.. उत्तमचा आवाज चढला.
'का? आहे ना त्या मुलीचं रहस्य!'
'हे बघ नियती! आपल्याला काय शिकवलंय? कशी निरीक्षणं करायची आणि कशी योग्य अनुमानं काढायची! इथे निरीक्षणं करायला काय आहे? एक मृगजळासारखं भ्रामक इंटरनेट, एक बनावट फेसबुक पेज आणि इंगवलेला कुणीतरी मारलेल्या थापा!'
'तू ना परीक्षेत सिलॅबसच्या बाहेरचं विचारलं म्हणून रडणार्यातला आहेस. अरे जरा चाकोरी बाहेरची नवी आव्हानं घे की! आयुष्यात जवळपास सगळंच सिलॅबसच्या बाहेरचं असतं!'.. हु हु हु हु हु हु! नियतीचा हास्यालाप.
'अगं पण मला तर त्यामधे आपल्या डोक्याचे केस जाण्यापलीकडे काही केस दिसत नाही! कुण्या पोरीने किंवा पोरानेच असेल, त्याला उल्लू बनवलाय असं नाही तुला वाटत? '
'अरे होऊ शकते एखाद्याची परिस्थिती वाईट!'
'हे बघ! घराचं कर्ज फेडता येत नसेल, समजा, तर घर विकता पण येतं ना? कुठली शहाणी मुलगी असलं डील घेईल, सांग? तू घेतलं असतंस?'
'मी? शक्यच नाही. मी थोबाड फोडलं असतं त्याचं असलं काही सुचवल्या सुचवल्या! पण मी काय म्हणतेय ते ऐक! आता ८ महिने होतील आपल्याला ऑफिस उघडून पण एकही केस आत आलेली नाही. मालकानं तंबी दिली आहे. महिन्याच्या आत भाडं दिलं नाही तर इथून गच्छंती! येईल ती केस घ्यावीच लागणार आहे आता. माज करून नाही चालणार, समजलं?'.. त्याच्या डोक्यावर टप्पल मारत नियती म्हणाली. नियतीने रिअॅलिटी चेक दिल्यावर उत्तरादाखल थोडा वेळ उत्तमने शून्यात नजर लावली.
'पण मला तो माणूस आवडला नाहीये. जरा जादाच शहाणा वाटला. आपल्यावर गेम टाकायचा प्लॅन असावा त्याचा!'
'हॅ! तो काय गेम टाकणारे? अगदी गरीब वाटला मला तर! आणि हो! तू त्याला स्वच्छ सांगितलं आहेसच की ती सापडण्याची शक्यता नाही म्हणून. तरीही तो केस घ्या म्हणतोय म्हणजे आपण काही फसवत नाही आहोत त्याला. आपण माहिती काढू ना त्याची व्यवस्थित आधी, मग केस घेऊ. काय?'
'हम्म! म्हणजे आयुर्विम्याला पर्याय नाही तर! तू माहिती काढच त्याची. आपण ती केस एनीवे घेऊच. मी त्याला त्याचा कंप्युटर पाठवायला सांगतो. नंतर एखाद्या कंप्युटरच्या गड्ड्याला घेऊन त्याच्या कंप्युटरची उलटतपासणी करता येईल.'
'चल, तो पर्यंत आपण तिचं फेसबुक पेज बघू. अरे वा! नाक काय छान सरळ धारदार आहे हिचं!'.. नियती अनुजाच्या फेसबुकाचे फोटो निरखत म्हणाली. फेसबुकावर मोजून ३ फोटो होते, म्हणजे वेडीवाकडी तोंडं करून काढलेल्या सेल्फ्या होत्या.
'हॅ! हे फोटो काही नीट दिसत नाहीयेत.'.. शेरलॉक होम्स इन्स्टिट्युट कडून भेट मिळालेल्या टूलबॉक्स मधले भिंग डोळ्याशी लावून फोटो निरखत उत्तम म्हणाला.
'अरे हे डिजिटल फोटो झूम करता येतात त्याला भिंगाची गरज नाही येड्या.'.. नियतीने खिंकाळत फोटो झूम केला.
'च्यायला! उगीच आपलं थोडं फार काहीतरी माहिती आहे म्हणून लगेच शेखी मिरवू नकोस हां!'.. उत्तमने चिडचिड करत फोटोंमधे डोकं घातलं आणि थोड्यावेळाने जाहीर केलं.. 'ही तर ड्रग अॅडिक्ट आहे.'
'आँ! तुला कसं समजलं?'
'Elementary my dear नियती! अगं तिच्या तोंडावर मुरमं किती आहेत बघ. कातडी तजेलदार नाहीये, डोळे निर्जीव दिसताहेत. केस गळताहेत, तिच्या खांद्यावर बघ किती पडले आहेत ते. हे सगळे ड्रगचे परिणाम. या कागदावर इथे रातराणी खरडलंय, तिकडे मॅव लिहीलंय. ही ड्रगची नाव आहेत.'
'पण नाक किती छान सरळ आहे ना?'
'तुला सगळ्यांचीच नाकं आवडतात. मला तुझं आवडतं पण! छान मुमताज सारखं बटण नोज!'
'एss खरंच? फक्त नोजच? बाकी काही नाही?'
'अंssss! उगा लाडात येऊ नकोस!'.. उत्तम गोरामोरा झाला. त्याला नियती मनापासून आवडायची पण ते कबूल केलं तर आपण शेरलॉक होम्स सारखं वागण्यात कमी पडू असं त्याला वाटायचं.
'आणि तू तिची आणि तुझी तुलना करत बसू नकोस, त्या फोटोतून अजून काही माहिती मिळू शकतेय का ते बघ. तिच्या फेसबुकवर तशी काही उपयुक्त माहिती नाहीच्चे. इतके कमी फोटो फेसबुकावर ठेवणं हे तिच्या सारख्या तरुण मुलीला शोभत नाही!'
'हो ना! फेसबुकवर यायच्या पिअर प्रेशरखाली घाईघाईत काहीतरी टाकलंय आणि नंतर दुर्लक्ष केलंय. या फोटोंमधे काहीतरी खटकतंय मला! काय ते लक्षात येत नाहीये पण!'
'हां! बाकी तिच्या उजव्या हाताच्या मनगटावर एक तीळ आहे. या फोटोत मागे काहीतरी दिसतंय. असं वाटतंय की हा फोटो एका कंपनीच्या ऑफिसात काढलाय. हे बघ! इथं रिसेप्शन आणि त्यामागे कंपनीचं नाव दिसतंय का तुला?'
'हो हो दिसतंय की! काहीतरी अँड सन्स आहे ना? ले वा र किंवा ल वा र.. तलवार वाटतंय ना?'
'मला वाटतंय ते तालेवार असावं. पुढे अँड नक्की आहे पण सन्स असेल की नाही कळत नाही. नुसता स दिसतोय मला. तलवार अँड सलवार? नुसतं लवार अँड असं गुगल कर, बघू काय मिळतंय ते!'
गुगलवर काहीही शोधलं तरी ढीगभर रिझल्ट येतातच. तसे आत्ताही आले. फेसबुक सारख्या इंटरनेटच्या भंगारात अनेक तलवार होते. एका तलवारीचा खून झाल्याची बातमी होती. पण एक तालेवार अँड सन्स आणि एक तलवार अँड सलवार अशा दोन कंपन्या पहिल्या दोन पानात दिसल्या.
'नियती तू तालेवार अँड सन्सकडे चाचपणी कर, मी तलवार अँड सलवारकडे मोर्चा नेतो.'
'अरे तलवार अँड सलवार नाव तुला गोंडस वाटलं तरी मला धोकादायक वाटतंय. मारामारी झालीच तर ते तुला उत्तम ठोकतील. त्यापेक्षा मी जाते तिथे आणि तू जा तालेवारकडे.'.. नियतीला काळजी वाटणं स्वाभाविक होतं.
'तू ब्लॅकबेल्ट होल्डर असल्याची टिमकी माझ्यासमोर वाजवू नकोस बरं का? मी माझी काळजी घ्यायला अगदी समर्थ आहे!'.. उत्तम वैतागून म्हणाला.
'मग निदान माझं पिस्तुल तरी घेऊन जा'
'काय करायचंय पिस्तुल? काही नको'.. उत्तम हट्टीपणे म्हणाला.
------***-----------***---------
'गुड आफ्टरनून! काय पाहिजे आपल्याला?'.. एका जाड भिंगाच्या चष्मेवाल्या काळ्या रिसेप्शनिस्ट बाईने पांढरे शुभ्र दात दाखवत नियतीला विचारलं.
'मला अनुजा देशमानेंना भेटायचंय.'.. नियतीने बेधडकपणे सांगितलं.
'थांबा हं एक मिनिट! मी त्यांना बोलावते.'.. रिसेप्शनिस्ट इंटरकॉमवर कुजबुजत असताना नियतीनं तोंडावर आश्चर्य न दाखवण्याचा आटोकाट प्रयत्न केला... 'आपण बसा, त्या येताहेत इकडे'.
सुमारे ५ मिनिटांनी एक पन्नाशीतली बाई आली आणि नियतीकडे पाहून म्हणाली.. 'आपण समोरच्या कॅफेत जाऊ म्हणजे शांतपणे बोलता येईल.' २६ वर्षाच्या मुली ऐवजी एक पोक्त बाई समोर आली तरी नियती ती विसंगती गिळून मुकाटपणे तिच्या मागे गेली.
'नमस्कार! मी अनुराधा देशमाने. अनुजाची बहीण! मी वाटच पहात होते. तिला जमलं नाही थांबायला! तुला इंगवले साहेबांनी पाठवलं ना?'
'आँ!'... आयला भारी आहे हा दीपक! आम्ही इथे पोचणार हे त्यानं आधीच हेरलं होतं म्हणजे!.. नियतीने स्वतःच्या मनाशी विचार केला.
'तू अगदी नक्षत्रासारखी सुंदर आहेस हं! तुझे केस सोनेरी कसे गं?'
'रंगवलेत!'.. नियतीचं रोखठोक उत्तर.
'तू काय करतेस?'
'मी बिझनेस करते आहे सध्या'.. नियतीने सांगितलं.
'आधी काय करत होतीस?'
'मी मिलिटरी मधे नर्स होते, जवळ जवळ ६ वर्ष. आता सोडून ३ वर्ष होतील.'
'हो का? वा! लग्न कधी झालं?'
'लग्न ५ वर्षांपूर्वी झालं, दोन वर्षांनी घटस्फोट.'
'का?'
'त्यानं माझ्यावर हात टाकायला सुरुवात केली. मी एक दोन वेळा सहन केलं. मग चांगला बदडून पोलिसात दिला त्या xxxxला!. आता तुरुंगाची हवा खातोय.'.. नियतीच्या तोंडून असली जळजळीत शिवी ऐकून अनुराधा देशमानेंना थेट झोपडपट्टीच्या नळावर उभं राहिल्याचा भास झाला.
'तू त्याला मारलंस?'.. देशमाने बाईंच्या चेहर्यावर कौतुक, आदर आणि आश्चर्य होतं.
'अहो, मला उत्तम कराटे येतात. ब्लॅकबेल्ट होल्डर आहे मी.'
'वा! चांगली धीराची आणि तडफदार आहेस की तू! आता सांग तुझ्या मुलाकडून काय अपेक्षा आहेत?'
'आँ! मुलाकडून अपेक्षा? म्हणजे?'
'तू माझ्या मुलाच्या स्थळासाठी आली आहेस ना?'
'कोण म्हणालं असं?'... हे हे हे हे हे हे! नियतीचा हास्यालाप.
'इंगवले साहेब!'
'च्यामारी, त्याना कुणी या नस्त्या भानगडी करायला सांगितलं होतं?'.... नियतीचा पारा चढला. पण 'राग आला की आधी हसा' या हास्यक्लबाच्या शिकवणीनुसार तिनं चढत्या भांजणीचं हास्य खदखदवलं..
'तुम्ही इंगवले बिल्डरांबद्दल बोलताय का?'
'नाही म्युनिसिपाल्टीमधे कामाला आहेत ते.'
'थांब हं, नक्कीच काही तरी घोटाळा झालाय. नाव काय तुझं?'
'नियती डोईफोडे'
'आता आलं लक्षात! अलका सरपोतदार नावाच्या मुलीला ते पाठवणार होते. सॉरी हं! माझा घोटाळा झाला.'
'असो, तुम्हाला या मुलीबद्दल काही माहिती आहे का?'.. हातातला फोटो पुढे करत नियती सरसावली.
'ही पण लग्नाची आहे का?'
'नाही हो, हिला शोधायची आहे. या फोटोतली मुलगी ओळखीची आहे का?'
'अंsssss! नाही!'
'बरं या फोटोत तुम्हाला काही ओळखीचं दिसतंय का?'
'अंsssss! नाही!'
'अहो हे तुमच्या ऑफिसचं रिसेप्शन आहे. आणि ही मुलगी तिचं नाव अनुजा देशमाने सांगते.'
'शक्यच नाही! माझी बहीण अशी दिसत नाही आणि ती इतकी तरुण पण नाही.'
------***-----------***---------
उत्तमने बुधवार पेठेतले गल्लीबोळ कोळपून तलवार अँड सलवार नामक दुकानाचा शोध लावला. एका जुन्या वाड्यात ते दुकान थाटलेलं होतं. दुकानाच्या रंग उडालेल्या दरवाजातून उत्तमने आत डोकावलं, आत अंधाराशिवाय फारसं काही दिसत नव्हतं. दरवाजावरील 'तलवार अँड सलवार' या बारक्या पाटीपलिकडे ते दुकान आहे हे समजायला काही मार्ग नव्हता. उत्तमने इकडं तिकडं पाहीलं, त्याला दोन माणसं त्याच्याचकडे निरखून पहात असलेली दिसली. त्यांच्याकडे दुर्लक्ष करून उत्तम आत घुसला. आत मधे बरेच पेटारे आणि मोठमोठाल्या कापडाच्या गुंडाळ्या दिसत होत्या.
'नमस्कार! काय प्रकारचं नाटक आहे?'.. एका साठीच्या माणसाने चष्मा आणि भुवयांच्या फटीतून पहात विचारलं. त्यानं तपकिरी रंगाचा झब्बा घातला होता.
'नाटक?'.. उत्तम गडबडला.
'आमच्याकडे सर्व प्रकारच्या नाटकांना लागणारं साहित्य आहे.. अगदी पौराणिक, ऐतिहासिक नाटकांपासून ते साय-फाय पर्यंत! तलवारीपासून सलवारीपर्यंत सर्व काही उपलब्ध आहे!'
'मग रातराणी नक्की असेल.'.. उत्तमने एक फीलर टाकला.
'साहेब! इथे बसचं रिझर्व्हेशन होत नाही. दुसरीकडे पहा'.. दुकानदाराने उत्तमच्या नकळत टेबलाखालचं एक बटन दाबलं.
'बरं मॅवमॅव तरी?'
'ओके ओके! आता मला समजलं तुम्हाला काय पाहिजे आहे ते! प्रताप, बघ यांना काय पाहिजे आहे ते!'.. खोलीत आलेल्या एका काटकुळ्या माणसाकडे बघत दुकानदार म्हणाला.
'या साहेब! आत मधे या!.. प्रतापने उत्तमला आत बोलावलं. उत्तम मुकाट्याने त्याच्या मागे गेला. दारातून आत जाताच दोन माणसांनी उत्तमच्या मुसक्या बांधल्या, त्याला ढकलून पाडलं आणि लाथाबुक्क्यांनी चांगलं तुडवलं.
'बोल भोसडिच्या! कुणी पाठवलं तुला?'.. एकाने उत्तमचा गळा दाबत दरडावणीच्या सुरात विचारलं.
'आssss! नियतीssss! कुणी नाही! कुणी नाही! आईशप्पत कुणी नाही!'.. उत्तम काकुळतीने सुरात म्हणाला.
'नियतीच्या मनात असल्यामुळे आपोआप इथे आलास काय मग?'.. एक जोरदार लाथ पोटात बसली आणि उत्तम केकाटला.
'ओय! आssss! एका मुलीच्या शोधात आलो इथे'
'मुलगी पाहीजे काय रे तुला XXX? तुला हा कुंटणखाना वाटला काय रे XXXXX?'.. अजून दोन लाथा पेकाटात बसल्या.
'ओय! आssss! नियतीssss!' उत्तम विव्हळला, तेव्हढ्यात बाहेर गडबड झाली. पोलीस! पोलीस! असे आवाज ऐकू आले आणि त्या माणसांना काही सुचायच्या आत पोलिसांनी गराडा घालून उत्तमसहित सगळ्यांना पकडून ठाण्यावर नेलं.
दुसर्या दिवशी पेपरमधे पोलिसांनी नोकरी लावण्याच्या आमिषाखाली किंवा विवाहाच्या नावाखाली तरुणींची विक्री करणारी टोळी पकडल्याची बातमी आली. त्यांनी तब्बल २२ असहाय तरुणींची सुटका केली. उत्तमला पोलिसांनी टोळीतलाच ठरवल्यामुळे त्याला पण खास खाकी पाहुणचार मिळाला. नियतीने तिची मैत्रीण आणि पोलीस महानिरीक्षक रंजना जाधव हिला फोन केल्यामुळे उत्तम सुटला. पोलिसांना, अर्थात, आधीपासूनच त्या टोळीचा संशय होताच, आणि त्यांनी नेमकी त्याच दिवशी तिथे धाड घालायचं ठरवल्यामुळे उत्तम वाचला. नाहीतर उत्तम कुठे आणि कुठल्या अवस्थेत सापडला असता ते सांगणं कठीण होतं. पण मुक्या मारामुळे कळवळत असला तरी उत्तमला त्या २२ जणींची सुटका त्याच्याच मुळे झाल्याचा आनंद होता.
'ते मला मारत होते तेव्हा मी तुझंच नाव घेत होतो'.. क्षणभर शेरलॉकी बुरखा गमावलेल्या उत्तमच्या बोलण्यात नियतीबद्दलच्या त्याच्या खर्या भावना डोकावल्या.
'तू एक मूर्ख आहेस! माझं नाव घेऊन काय उपयोग होता? त्यापेक्षा माझं पिस्तुक घ्यायचं होतंस'.. नियतीनं सात्विक संतापाने त्याला झटकला.
'नेऊन काय उपयोग होता? मला काही समजायच्या आत त्यांनी मला धरला, हातपाय बांधले आणि धुतला. हातपाय बांधल्यावर फक्त पिक्वरचे हिरोच पिस्तुल चालवू शकतात. म्या पामराला काही ते जमलं नसतं. आsssssss'.. उत्तम बरगड्या चाचपत कळवळला.
'श्या! मीच जायला पाहीजे होतं.' नियती मुंडी हलवत हळहळली.
------***-----------***---------
उत्तम तलवार अँड सलवारीचा पाहुणचार स्वीकारत असताना तनुजा इंगवले उत्तमला भेटायला त्याच्या ऑफिसात आल्या.
'नमस्कार! या ना! मी नियती डोईफोडे. काय काम होतं आपलं?' .. नियतीनं गोड हसून स्वागत केलं. तिच्यासमोर पांढर्या रंगाची सलवार खमीस घातलेली सुमारे चाळिशीतली बाई उभी होती. गव्हाळी रंग, डोळ्यावर चष्मा, पांढरे होऊ घातलेले केस, अरुंद कपाळ, नकटं नाक, पातळ ओठ, हातात काळ्या रंगाची पर्स अशा काही गोष्टी नियतीने टिपल्या.
'नमस्कार! तुम्ही हेरगिरीची कामं घेता ना म्हणून तुमच्याकडे आलेय. '
'अं... आमची डिटेक्टिव्ह एजन्सी आहे. त्याला हेरगिरी नाही म्हणता येणार. तरी तुमचं काम सांगा.'
'मला माझ्या नवर्यावर पाळत ठेवायची आहे. मला त्याचा संशय येतोय.'
'ओ ओके! आपलं नाव?'
'मी तनुजा इंगवले!'
'आणि तुमच्या नवर्याचं नाव?'.. ते इंगवले आडनाव ऐकताच नियती चमकली पण खात्री करण्यासाठी तिनं नवर्याचं नाव पण विचारून घेतलं.
'दीपक इंगवले.'
'काय करतात ते?'.. नियतीचा तिच्या कानावर विश्वास बसत नव्हता.. तीन दिवसांपूर्वी येऊन गेलेल्या माणसाची बायको त्याच्यावर पाळत ठेवायला सांगते आहे यावर! पण फारसं न करता थोडे पैसे मिळवायची संधी आयती चालून आली होती.
'म्युनिसिपाल्टी मधे आहेत. मी मधे सहा महीने अमेरिकेला गेले होते बहिणीच्या मुलीच्या डिलिव्हरीसाठी.. तेव्हा स्वारी भरकटली असा मला संशय आहे. आणि अजूनही भरकटलेलीच आहे असं मला वाटतंय.'
'का आला संशय?'
'अहो, त्यानं मला थापा मारल्या. पार्टी आहे एका मित्राची म्हणून गेला. काही दिवसांनी तो मित्रच मला भेटला. मी विचारलं काय कशी झाली पार्टी? तर म्हणाला कुठली पार्टी? असं १/२ वेळा झालं. त्याच्या कपड्यांना कसल्या कसल्या पर्फ्युमचे वास येतात जे आम्ही कधी वापरत नाही. फोनवर कुजबुजत असतो सतत. मी जवळ आले की बरं नंतर बोलू म्हणून ठेवून देतो. शिवाय, आपल्याला एक सिक्स्थ सेन्स असतो ना?'
'ओके! मला त्यांचा फोटो, तुमचा पत्ता, त्यांच्या ऑफिसचा पत्ता अशा काही गोष्टी लागतील. एकूण साधारणपणे १५,००० रू पर्यंत खर्च येईल. आणि हो, एक ५,००० रू अॅडव्हान्स पण लागेल.'
'बरं! आत्ता नाहीयेत तेव्हढे! मी परत येईन घेऊन. पण हे फक्त आपल्या दोघीत रहायला पाहीजे बरं!'
''मी फक्त माझ्या पार्टनरला सांगेन.'.. तनुजा निघून गेली तरी तिची पाठमोरी आकृती बराच वेळ नियतीच्या डोळ्यासमोर भिरभिरत राहिली.
------***-----------***---------
दीपक कंप्युटर घेऊन उत्तमच्या ऑफिसात आला आणि उत्तमला देता देता म्हणाला..
'मला एक कुतुहल होतं. मला सांगा उत्तमराव! तुम्हाला हे शेरलॉक होम्समधे कसा काय इंटरेस्ट निर्माण झाला?'
'त्याचं असं झालं दीपकसाहेब! मी ८वीत असतानाची गोष्ट आहे. तेव्हा मी 'क' तुकडीत होतो. मला अभ्यासात फार काही गती नव्हती. पण मी माझ्या तुकडीत पहीला आलो वार्षिक परीक्षेत! घरी आल्यावर वडिलांना माझा निकाल सांगितला आणि पुढे माझं अनुमान सांगितलं की मी ८वी मधे शाळेत तिसरा आलो आहे. वडिलांनी विचारलं .. ते कसं काय? तेव्हा मी म्हंटलं.. 'अ' तुकडीतला पहीला, 'ब' तला दुसरा आणि 'क' तला म्हणजे मी तिसरा. वडीलांनी तेव्हाच माझ्यातला तो गुण ओळखला. ते म्हणाले.. शाब्बास! अगदी शेरलॉक होम्स शोभतोस तू! तेव्हा मला शेरलॉक होम्सबद्दल काहीच माहिती नव्हतं. मग मी हळूहळू त्याचा अभ्यास करायला लागलो आणि मग Rest is history!'.. उत्तम भाव खात म्हणाला.
'वा! वा! इतक्या लहान वयात म्हणजे फारच कौतुकास्पद हो!'.. दीपकने मनातल्या मनात कपाळाला हात लावला पण आता तो केस त्याला देऊन चुकला होता.
'धन्यवाद दीपक! पासवर्ड देणार का मला तुमचा?'.. उत्तमला हे विचारायचं आठवल्याबद्दल स्वतःचाच अभिमान वाटला.
दीपक एका कागदावर पासवर्ड लिहीत असतानाच बेल वाजली. नियतीने दार उघडलं आणि तिला धडकी भरली. दारात तनुजा उभी होती.
'मी तो अॅडव्हान्स.....' म्हणत म्हणत तनुजा आत आली आणि तिला खुद्द दीपक तिथे दिसला. 'आँ! तुम्ही कसे काय इथे?' तिचा चेहरा चोरी पकडली गेल्यासारखा झाला.
'आँ! तू कशी काय इथे?'.. दीपकचाही चेहरा चिंताक्रांत झाला.
'आम्ही दोघी हास्यक्लबात भेटलो. हा हा हा हा हा हा!'.. नियतीची सारवासारव!
'अंss! हास्यक्लबात ना? हो हो! हा हा हा हा हा हा!'.. तनुजाला हायसं वाटलं.
'असं होय! मला माहिती नव्हतं तू पण जातेस ते. पण मग इथे काय करते आहेस?'.. दीपक
अंss! इथे? अंss! काय माहित! काय करते आहे मी इथे?'.. तनुजाने नियतीकडे केविलवाणेपणे बघितलं.
'त्या वर्गणी द्यायला आल्या आहेत. हो ना?'.. नियतीनं तनुजाकडे तोंड करून विचारलं.
'हो हो हो! वर्गणी द्यायला! आणि तुम्ही?'.. तनुजाला आता खूपच मोकळं वाटायला लागलं होतं.
'मी? अंssss! हां आम्ही दोघे रडारड क्लबचे मेंबर आहोत. हाँ हाँ हाँ हाँ हाँ हाँ'.. दीपकने उत्तमकडे बोट करून एक पहाडी आक्रोश लावला.
'अंssss! मी? कधी? कुठल्या? अंssss! हो हो हो! हाँ हाँ हाँ हाँ हाँ हाँ'.. उत्तम भंजाळला पण नियतीचे इशारे पाहून त्यानं दीपकचा आक्रोश ओढला.
'हॅ! असा कधी क्लब असतो काय? काहीतरी बंडला मारू नका.'.. तनुजा खवळली.
'अगं खरंच असतो. साने गुरुजींची गादी पुढे चालविण्यासाठी रडके गुरुजींनी तो चालू केलाय नुकताच.'
'हो का? मलाही येऊन बघायचाय तो मग!'.. तनुजाने गेम टाकली.
'अंssssss! अगं तो फक्त पुरुषांसाठीच आहे. पुरुष मंडळी सहसा रडत नाहीत, सगळं दु:ख आतल्या आत दाबतात म्हणून खास त्यांच्यासाठीच आहे तो!'.. दीपकची एक पुडी.
असं? कुठे आहे तुमचा क्लब?'.. तनुजाला चांगलाच संशय आला होता.
'मॉडेल कॉलनीत'..
'एसपी कॉलेजवर'.. दीपकने आणि उत्तमने एकाचवेळी तोंड उघडलं.
'सोमवार बुधवार शुक्रवार मॉडेल कॉलनीत आणि मंगळवार गुरुवार शनीवार एसपी कॉलेज'.. दीपकने सारवासारव केली आणि नियतीने तनुजाला आतल्या खोलीत नेल्यामुळे पुढची उलटतपासणी टळली.
त्या दोघी आत गेल्या गेल्या दीपक 'आपण नंतर बोलू' असं उत्तमला सांगून घाईघाईने निघून गेला. थोड्यावेळाने तनुजा हसत हसत बाय करून निघून गेली.
'नियती, हा काय चावटपणा आहे, हां?'.. उत्तम चांगलाच चिडलेला होता.
'काय चावटपणा? मी कधी चावटपणा करत नाही, आणि तुझ्याबरोबर तर नाहीच नाही.'.. नियती त्याला खिजवायची संधी कधी सोडायची नाही.
'आयला, तू नेहमी भलभलते अर्थ काढ, काय? तू त्या बाई बरोबर काय डील केलं आहेस, मला न विचारता? आँ?'
'मला काय गरज आहे तुला विचारायची? या धंद्यातली ८०% पार्टनर मी आहे म्हंटलं.'
'बरं! बरं! जरा ४ पैसे जास्त टाकलेत म्हणून टेंभा नकोय मिरवायला. ती दीपकची बायको आहे इतकं मला समजलंय. तिला काय पाहिजे होतं ते सांग'
'अरे तिला दीपकवर नजर ठेवून हवी आहे. १५,००० रू खर्च सांगितला तिला, तिने ५,००० रू. अॅडव्हान्स पण दिलाय. म्हंटलं, काही न करता पैसे मिळत असतील तर का सोडा?'
'नजर ठेवून? म्हणजे त्याचं काही लफडं आहे?'
'ती अमेरिकेला गेली होती तेव्हा दीपकचे कुणा बाईबरोबर संबंध होते, अजूनही आहेत असं तिला वाटतंय.'
'पण तिची केस घेणं मला नैतिकतेला धरून आहे असं वाटत नाही.'
'त्यात कसली आली आहे नैतिकता?'
'अगं म्हणजे काय? नवराबायकोच्या केसेस त्यांच्या नकळत घ्यायच्या आणि दोघांकडून पैसे उकळायचे हे काही बरोबर नाही. आपल्याला काही व्यावसायिक सचोटी, प्रामाणिकपणा काही आहे की नाही?'
'अरे कसली व्यावसायिक सचोटी? दीपकने कुठे दाखवली आहे काही? त्यानं मारल्याच ना बंडला आपल्याला?'
'दीपकच्या लफड्याचा आणि त्यानं आपल्याला दिलेल्या केसचा काही संबंध आहे की नाही ते आपल्याला माहीत नाही. समजा, असला! तरीही तो स्वतःहून त्याचं लफडं आपल्याला सांगेल असं मला वाटत नाही. आपल्यालाच ते काढून घेतलं पाहीजे त्याच्याकडून. पण कसं काढणार?'
'माझ्याकडे त्याला एक खास झाँसा द्यायचा प्लॅन आहे.'
------***-----------***---------
'माफ करा इंगवले साहेब पण फोनवर मी मुद्दामच फारसं काही सांगितलं नाही.'.. नियतीने दीपकला डेक्कनवरच्या एका हॉटेलात महत्वाची माहिती देण्याच्या निमित्ताने बोलवून घेतलं होतं.
'असं होय! मग काय महत्वाची माहिती मिळवली आहे तुम्ही?'.. दीपक दोघांकडे बघत म्हणाला.
'आम्हाला अनुजा देशमाने सापडली आहे.'.. नियतीने थंडपणे सांगितलं आणि ती दीपककडे निरखून पाहू लागली.
'आँ! कशी? कुठे?'.. दीपकला धक्का बसल्याचं अगदी स्पष्टपणे कळत होतं.
'तुम्ही दिलेल्या फेसबुकच्या लिंकवरून! तिथल्या एका फोटोत एका गाडीच्या नंबर प्लेटचं रिफ्लेक्शन दिसलं एका खिडकीच्या काचेत. मग त्यावरून तो भाग कुठला आहे ते शोधलं आणि तिथल्या सर्व रहिवाश्यांच्या माहितीची छाननी केल्यावर तुम्ही दिलेल्या बाबी फक्त एकाशीच जुळल्या. आम्ही तिला भेटलो देखील. अजून सुमारे ५० लाखांचं कर्ज शिल्लक आहे म्हणत होती. तितके तुम्ही देऊ शकलात तर तिची लगेच सुटका होईल.'
दीपक अचानक खोखो हसायला लागलेला बघून ते दोघं भंजाळले.
'हा हा हा हा हा तुम्ही तिला भेटलात पण?'.. दीपकला जाम हसू आवरत नव्हतं.
'हे हे हे हे हे हो मग! त्यात आश्चर्य वाटण्यासारखं काय आहे?'.. नियतीने हास्यक्लबी री ओढली.
'ही ही ही अहो कारण अशी मुलगी अस्तित्वातच नाही! हु हु हु हु!'
'ते आमच्या लक्षात आलंच होतं! म्हणूनच आम्ही तुम्हाला थाप मारली. Truth by Deception असा एक चॅप्टर होता आम्हाला! असो. तुम्ही अशी बनावट केस घेऊन आमच्याकडे का आलात आणि निष्कारण आमचा वेळ का घालवलात ते सांगा आता!'.. उत्तम काहीसा वैतागून म्हणाला.
'प्रथम मी तुम्हा दोघांची माफी मागतो! मी जी केस तुम्हाला दिली होती ती तुमची परीक्षा होती असं समजा! मला बघायचं होतं की घेतलेली केस तुम्ही किती गंभीरपणे घेता आणि ती सोडविण्यासाठी तुम्ही किती परिश्रम घेता ते! त्यात तुम्ही यशस्वीरित्या पास झाला आहात, अभिनंदन! शिवाय तुम्ही जिवाची पर्वा न करता बुधवार पेठेत गेलात आणि त्या २२ मुलींची सुटका करवलीत हे खरंच कौतुकास्पद आहे.'.. दीपकने मनापासून कौतुक केल्यामुळे दोघांची मान ताठ झाली.
'बरं पण मग खरी केस देणार ना?'.. नियतीने खुंटा हलवला.
'हो हो देणार तर! मी तुमचा फोन यायच्या आधी तुमच्याचकडे यायला निघालो होतो. माझी बायको मधे सहा महीने अमेरिकेला गेली होती तिच्या बहिणीच्या मुलीच्या डिलिव्हरीसाठी. तेव्हा अनुजा देशमाने माझ्याकडे आली. ती पूर्वी केतन बिल्डर्सकडे कामाला होती. तेव्हा ती माझ्या ऑफिसात कामानिमित्त येत असे. केतन बिल्डर्सचं दिवाळं निघाल्यानंतर तिचा जॉब गेला. तिला नवीन जॉब मिळवण्यासाठी माझी मदत हवी होती. माझ्या बर्याच बिल्डर्सशी ओळखी असतात म्हणून मी तिला सांगितलं मी शब्द टाकेन म्हणून. त्या निमित्ताने ती येत राहिली. मीही एकटेपणाला कंटाळलो होतो. त्यामुळे आमची जवळीक वाढली. मला काही त्याचा अभिमान नाही. पण जे झालं ते झालं.'.. दीपक गंभीरपणे म्हणाला. त्या आधी नियती आणि उत्तमची 'त्याच्या बायकोचा संशय बरोबर होता' या अर्थाची झालेली नजरानजर त्याला दिसली नव्हती.
'तर ती तुमचे पैसे घेऊन पळून गेली आहे, बरोबर?'.. उत्तमने रिकाम्या पाईपचा झुरका घेत विचारलं.
'तुम्हाला पोलिसांकडे जाता येत नाहीये कारण तुमच्या बायकोला समजेल.'... इति नियती.
'ऑं! तुम्हाला कसं समजलं?'.. दीपकला हे सगळं अजिबात अपेक्षित नव्हतं.
'ती एक तर तुम्हाला ब्लॅकमेल करू शकते किंवा तुमचे पैसे घेऊन पळून जाऊ शकते! पण तुमच्या लग्नाला इतकी वर्ष झाल्यावर तुम्ही ब्लॅकमेलला भीक घालाल असं वाटत नाही. मेलेलं कोंबडं आगीला भीत नाही म्हणतात ना!'.. उत्तमचा एक ठोकताळा.. 'तर आता सांगा किती पैसे गेलेत आणि कसे?'
'त्याचं काय झालं, तिला कुठुन तरी भारी टिप्स मिळायच्या. २२ जुलै २०१७ तारखेला अविनाश भोसले आणि त्यांचे जावई विश्वजीत कदम यांच्या घरांवर धाडी पडणार असल्याचं मला आधीच तिच्याकडून समजलं होतं. आमच्या ३ रजिस्ट्रेशन ऑफिस वर धाडी पडणार असल्याचं मला २ दिवस आधी तिच्याकडून समजलं. यामुळे माझा तिच्यावर विश्वास बसत गेला. एके दिवशी तिने मला माझ्यावरच धाड पडणार असल्याचं सांगितलं.'
'हम्म्म स्टँडर्ड ट्रॅप! पण तुमच्या घरात होते का इतके पैसे? ओ येस राईट! मधे मी पेपर मधे वाचलं होतं की मेगा बिल्डर्सच्या २५० कोटींचं प्रोजेक्टला मान्यता देण्यासाठी बरीच लाच दिली गेली. त्यातली किती तुमच्याकडे होती?'.. नियतीच्या रोखठोक प्रश्नामुळे दीपक चमकला.
'रक्कम बरीच आहे! पण त्यात भागीदारही आहेत. सगळी रक्कम माझ्याकडे होती एका ब्रीफकेसमधे. ती ब्रीफकेस मी तिला दिली'
'पण होते किती पैसे?'
'जवळ जवळ एक कोटी!'
'एक कोटी? बापरे! हा हा हा हा हा'.. नियतीचे बटाट्या एवढे डोळे करीत खिंकाळली.. 'इतके मावतील तरी का ब्रीफकेसमधे?'
'नियती! टिपीकल ब्रीफकेसची लांबी १६.५ इंच, रुंदी १३ इंच आणि उंची ४ इंच असते साधारण! २००० रू नोटेची लांबी ६.५ इंच, रुंदी २.५७ इंच आणि जाडी ०.००५८ इंच असते. समजा एकावर एक १००० नोटा ठेवल्या तर जाडी ५.८ इंच होते. २००० च्या ५००० नोटा घेतल्या तर एक कोटी रुपये होतात. ब्रीफकेसच्या रुंदीमधे १३/२.५७ म्हणजे ५ नोटा शेजारी शेजारी सहज बसतात. आणि लांबी मधे १६.५/ ६.५ म्हणजे २ नोटा आरामात. म्हणजे १० नोटांचा एक थर होतो आणि ५००० नोटांचे ५०० थर होतात आणि ते सगळे ४ इंचात सहजपणे बसतात.'.. उत्तमने परीक्षेसाठी पाठ केलेलं ओकलं.
'वा! अगदी बरोबर! अगदी थक्क केलंत तुम्ही उत्तमराव! हे पैसे ज्या दिवशी माझ्याकडे आले त्याच दिवशी संध्याकाळी धाड पडणार असल्याची टिप तिने दिली. मग नाईलाजाने मी ब्रीफकेस तिच्याकडे तात्पुरती ठेवायला दिली. संध्याकाळी धाड पडली पण त्यांना काही मिळालं नाही अर्थात. दुसर्या दिवशी मी तिच्या फ्लॅटवर ब्रीफकेस घ्यायला गेलो तर ती लंपास! फोन ती फ्लॅटवरच टाकून गेल्यामुळे काँटॅक्ट करता येत नाहीये. आता सगळे भागिदार आता माझ्या मागे लागले आहेत. आता तुम्ही तिला शोधून पैसे मिळवले नाहीत तर माझं काही खरं नाही.'.. दीपक हताशपणे म्हणाला.
'म्हणजे फेसबुकचं पेज खरं होतं पण ष्टोरी बनावट होती. बरोबर?'.. उत्तम
'हो!'
'बरं किती तारखेला झालं हे सगळं?'
'७ नोव्हेंबरला दुपारी ४/४:३० च्या सुमारास मी तिला ब्रीफकेस दिली. त्या नंतर माझं तिची भेट किंवा बोलणं झालेलं नाही!'
'चला आपण तिच्या फ्लॅटवर जाऊन बघू'.. उत्तम असं म्हणाल्यावर सगळी वरात तिच्या फ्लॅटवर गेली. दीपककडे एक किल्ली होतीच. एक बेडचा छोटाच फ्लॅट होता. बर्याच वस्तू इतस्ततः पडल्या होत्या, त्यात काही कागदाचे बोळे होते. टेबलावर बराच कचरा होता, त्यात एक बॅटरी संपलेला मोबाईल पण होता. एक अर्धवट भरलेली सुटकेस बेडवर पडलेली होती. काही कपडे कपाटात होते. एकंदरीत घाईघाईने गाशा गुंडाळलेला दिसत होता. उत्तमने बारकाईने सगळ्याचं निरीक्षण केलं, पडलेले बोळेही उघडून वाचले. मोबाईलला चार्जर लावून त्याचा अभ्यास केला.
'मेगा बिल्डर्सची कतारमधे प्रोजेक्टं असतात का?'.. उत्तमने अचानक विचारलं.
'हो, सगळ्या आखातात आहेत त्यांची!'.. दीपक म्हणाला.
'तिनं दोह्याला जाण्याबद्दल काही सांगितलं होतं?'
'नाही'
'ही बाई नक्कीच त्या मेगा बिल्डर्ससाठी काम करते आणि ती दोह्याला गेलेली आहे.'
'आँ! कशावरून?'
'तुम्हाला टिप्स देणं, दोह्याचं तिकीट आधीच घेऊन ठेवणं, आणि नेमकं धाड पडायच्या दिवशीच लाच देणं हे काही योगायोग वाटत नाहीयेत. या सगळ्यावरून हे नक्की की ही बाई नक्कीच त्या मेगा बिल्डर्ससाठी काम करते आणि ती दोह्याला गेलेली आहे. तिने मिलेनियम ट्रॅव्हल्स कडून घेतलेल्या दोह्याचं तिकीट घेतलंय १२ ऑगस्टला, एका बोळ्यात ती रिसीट मिळाली. जेट एअरवेजची फ्लाईट आहे, पुणे ते दिल्ली आणि दिल्ली ते दोहा. तिचा मोबाईल दीपकचेच ७ मिस्डकॉल्स दाखवतोय. त्यातला सगळ्यात पहिला ८ नोव्हेंबरचा ११:३५ वाजताचा होता. त्यावरच्या ऊबर अॅपवरून त्याच दिवशी सकाळी ९ वाजता एअरपोर्टसाठी टॅक्सी मागविलेली होती दुपारी १च्या विमानासाठी. शिवाय घेतलेली लाच चोरीला गेली म्हणून कुणी पोलिसात जाणार नाही हे शेंबड्या पोरालाही समजतं त्यामुळे ती तशी बिनधास्त असणार. '
'आयला असं होय? मग मी दोह्याला जाते आणि बघते ती सापडतीये का ते. माझे काही कॉन्टॅक्ट्स आहेत तिथे.'.. नियतीनं दीपककडे बघत जाहीर केलं.
'नियतीचे कुठेही कॉन्टॅक्ट्स असतात. नसतील तर ती निर्माण करू शकते कधीही'.. उत्तम मिष्किलपणे म्हणाला.
------***-----------***---------
'तू मला उगीचच पाठवलंस कतारला! मला माहिती होतं तिकडे ती सापडणार नाही म्हणून!'.. नियतीने दोह्याहून आल्या आल्या आपल्या खड्या आवाजात युद्धाचं शिंग फुंकलं.
'मी पाठवलं? तूच गेलीस तुझी तुझी! नेहमीच आहे तुझं हे म्हणा! काही लक्षात नसतं तुझ्या!'.. उत्तम वैतागून म्हणाला.
'आरे तूच निष्कर्ष काढलास ना? की ती तिकडे गेली आहे म्हणून!'
'हो! मग?'
'मग तूच सांगितलंस की जाऊन बघून ये, तुझे कॉन्टॅक्ट्स असतीलच तिकडे म्हणून!'.. नियती तावातावाने म्हणाली.
'आयला काय त्रास आहे!'.. उत्तमने सत्रांदा कपाळावर हात मारला.. 'तू दीपकला विचार हवं तर!'
'तो काय तुझीच बाजू घेणार!'
'पुढच्या वेळेला मी रेकॉर्ड करून ठेवणार आहे आपलं बोलणं, मग तुला समजेल! मग तिकडे काय झालं ते सांगणारेस की भांडत बसणारेस?'.. उत्तम तणतणला.
'अरे तिकडे एक गंमत झाली. माझं फोनचं बिल चुकलंय असं वाटलं म्हणून मी एअरटेलला फोन केला तिकडून. तर त्यांनी काय सांगावं?.. आप कतारमें हैं! कृपया प्रतीक्षा कीजीये!.. त्यांना कसं कळलं मी तिकडे आहे ते?'.. नियतीने डोळे विस्फारत विचारलं.
'अगं फोन कंपनीला सगळं कळतं! मला तुझ्या शोधाचं काय झालं ते सांग!'
'काय नाही! ती तिकडे कुठे गेली त्याचा काही पत्ता नाही. हां! मी जेट एअरवेज मधे जाऊन आले, पुण्यात आल्यावर! पण अनुजा देशमाने त्या फ्लाईटमधे नव्हती. ती दुसर्या कुठल्या नावाने गेली असेल म्हणून मी एअरपोर्टवर जाऊन CCTV ची त्या दिवशीची रेकॉर्डिंग पाहिली. ती टॅक्सीतून एअरपोर्टला येताना दिसते, नंतर एअरपोर्टच्या आत पण जाताना दिसते. नंतर आतल्या कुठल्याच CCTV मधे दिसत नाही. ही ही ही ही ही ही!'
'आयला! हा तर फार महत्वाचा शोध लावलास तू नियती! वेल डन! पण हे आधी सांगायचं सोडून तू भलतंच सांगत बसलीस!'
'हो मग? गंमत वाटली मला, टेक्नॉलॉजी किती पुढे गेलीये त्याची, म्हणून सांगितलं!'
'बरं! आपण आता परत जाऊन ती रेकॉर्डिंग नीट बघू. मला काही गोष्टींची खातरजमा करायची आहे.'
------***-----------***---------
'आपल्याला शेरलॉकने आयरीन अॅडलरच्या घरी जाऊन काय केलं ते दीपकच्या घरी जाऊन करायचंय. लक्षात आलं ना?'.. रेकॉर्डिंग बघून आल्यावर उत्तमने नियतीला विचारलं.
'हो हो, त्या स्कँडल इन बोहेमिया मधे ना?'
'कर्रेक्ट! एक स्मोक बॉम्ब पण लागेल.'
'बरं! मला एक दुकान माहिती आहे. तिथे पोलिसांच्या आणि सैन्याच्या भांडारातून चोरलेल्या गोष्टी मिळतात.'
'च्यायला तुला बरं हे असलं सगळं माहिती असतं.'
'मग? मी काय साधीसुधी वाटले काय तुला?'
'बरं, आपण रात्री ८ च्या सुमारास जाऊ म्हणजे तो घरी सापडेल. दुसरं म्हणजे आपण दोघेही त्याच्या घरात जाऊ. कारण त्याचा फ्लॅट दुसर्या मजल्यावर आहे, तुला तो बॉम्ब बाहेरून आत टाकणं जमणार नाही. मी माझ्या पँटीच्या उजव्या खिशात हात घातला की तू तो बाँब टाकायचा. समजलं?'
'अगदी!'
बरोब्बर रात्री ८ वाजता उत्तमने दीपकच्या घराची बेल मारली. दिपकने दार उघडलं आणि समोर दोघांना बघून चकित झाला तरी नाईलाजाने त्याने त्यांचे स्वागत केलं..
'आँ? तुम्ही कसे इथे? या! या!'
'कोण आलंय?'.. उत्तम काहीतरी उत्तर देणार तितक्यात तनुजा ओढणीला हात पुसत बाहेर आली आणि तीही त्या दोघांना बघून उडाली. मग थोड्यावेळाने एकदम तिला हास्यक्लब आठवला व नियतीकडे बघून एक हास्यविलाप केला.. 'हे हे हे हे हे हे!'
'हॉ हॉ हॉ हॉ हॉ हॉ'.. नियतीने तिच्याकडे बघत लगेच प्रतिसाद दिला पण त्याच वेळेला उत्तमने त्याच्या उजव्या खिशात हात घातल्याचं तिला दिसलं नाही. उत्तमची चिडचिड झाली, त्याने मनातल्या मनात तिला शिव्या हासडल्या. त्यांचं हसणं चालूच होतं. दीपक व तो त्यांच्याकडे हतबुद्ध होऊन बघत होते तितक्यात नियतीने उत्तमकडे कटाक्ष टाकला. ते बघून उत्तमने परत खिशात हात घातला पण तेव्हढ्यात तिने परत मान फिरवली. मग न राहवून उत्तम ओरडला... 'नियतीss!' तिने चमकून त्याच्याकडे बघितलं तशी त्याने परत खिशात हात घातला.
'माझं लक्ष आहे तुझ्याकडे, पण मी ते स्कूटरच्या डिकीत विसरलेय'
'काय विसरलंय?'.. दीपकला संशय आला.
'काही नाही! एक गोष्ट आणली होती खास तुमच्यासाठी! लगेच घेऊन येते!'.. नियतीनं निर्विकारपणे सांगितलं.
'जा पळ मग!'.. उत्तम भिंतीवर डोकं आपटायचा बाकी राहिला होता. नियती पळत पळत खाली गेली आणि एक पिशवी घेऊन पळत पळत वर आली.
'आणला'.. हाशहुश करत करत नियती म्हणाली.
'मग टाक ना!'
'तू खूण केल्यावर ना?'.. ती भाबडेपणाने म्हणाली. त्यावर उत्तमने चडफडत परत खिशात हात घातला आणि तिने तो पिशवीतून काढून टाकला. तो पडल्या पडल्या सगळेच दोन पावलं मागे सरकले. पण तो निरुपद्रवी निघाला.
'च्यायला! फुसका आहे. XXXXX च्यानं गंडवला वाटतं आपल्याला!'.. नियतीने एक खणखणीत शिवी हासडली.
'तू पेटवलास का तो?'
'अरे माठ्या! तो पेटवायचा नसतो! फटाका आहे काय तो?'.. नियती भणकली तोपर्यंत इंगवले दांपत्य सावध झालं होतं. तनुजाने तिथल्या ड्रॉवरमधून एक पिस्तुल काढून त्या दोघांवर रोखलं आणि दरडावलं..
'खबरदार काही हालचाल केलीत तर! अगदी सावकाशपणे दोन्ही हात वर करा!'.. दोघांनी एकमेकांना भुवया उडवत 'आता काय होणार?' अशी नजर फेकत हात वर केले.
'शाब्बास! मला सांगा उत्तमराव, तुमचं इथं येण्यामागं नक्की काय प्रयोजन होतं?'.. दीपकने उलटतपासणी चालू केली.
'Elementary my dear Deepak! मला माहिती आहे की ते पैसे तुमच्याच घरात आहेत. बाकीच्या भागिदारांना टांगून सगळे पैसे स्वतःच्या घशात घालायचा डाव आहे तुमचा!'.. उत्तमने त्याचं भांडं फोडलं.
'ओ हो! म्हणून तुम्ही आमच्यावर आयरीन अॅडलर सारखा डाव टाकायचा प्रयत्न केलात तर. शेरलॉकने स्मोक बाँब फोडून आग लागल्याचं भासवलं आणि त्या गोंधळात तिची नजर कुठे जाते आहे ते पाहून किमती गोष्ट कुठे लपवली असेल ते ताडलं! पण तुमचा बाँब फुटलाच नाही. हा हा हा हा हा हा!.. दीपक खराखुरा गडगडाटी हसला.
'ही ही ही ही ही ही!'.. नियतीला खो बसला.
'हे हे हे हे हे हे!'.. उत्तम हसला आणि हॉलच्या आतल्या दरवाजाकडे बोट दाखवत म्हणाला.. 'बाँब फुटला नसला तरी तुमच्या बायकोने पटकन त्या दरवाज्यातून दिसणार्या माळ्याकडे नजर टाकली ती मी टिपली. त्यामुळे पैशांनी भरलेली ती ब्राऊन ब्रीफकेस तिथेच असणार.'
'अरे वा! मानलं तुम्हाला उत्तमराव! पण तुम्हाला हे कसं समजलं?'
'सांगतो! सांगतो! जरा हात खाली ठेवू का टेबलावर? दुखायला लागलेत!'
'शटाप! चुपचाप हात वर करा'.. तनुजा पिस्तुल नाचवत ओरडली.
'अनुजा देशमाने एक कपोलकल्पित पात्र तुम्ही निर्माण केलंत आम्हाला गंडवायला! बरोबर? आम्हाला ते समजायचं कारण तनुजा बाईंच्या उजव्या हाताच्या मनगटावर एक तीळ आहे आणि फेसबुकवरच्या फोटोत देखील तो बरोबर तिथेच आहे. फेसबुकचे फोटो तनुजा बाईंचेच आहेत पण मेकप व फोटोशॉप करून वय लपवलेलं आहे. म्हणून पटकन ते त्यांचेच आहेत हे कळत नाही.'
'बाई नका म्हणू हो प्लीज'!.. तनुजा कळवळली.
'हो तनुजा एका प्रायोगिक रंगभूमीत वेशभूषेचं काम बघते. पण ती तर अमेरिकेत होती ६ महिने!'
'त्या फक्त साडेपाच महीने तिकडे होत्या! त्यानंतर इथेच त्या अनुजाचं पात्र रंगवीत होत्या. त्या ८ नोव्हेंबरला ९ वाजता टॅक्सीने एअरपोर्टला अनुजा देशमाने या नावाने ब्राउन ब्रीफकेस घेऊन गेल्या आणि दुपारी ४ वाजता तनुजा इंगवले या नावाने तीच ब्रीफकेस घेऊन तुम्हाला भेटल्या. CCTV मधे हे स्वच्छ दिसतं. अनुजा कुठल्याच फ्लाईटवर गेली नाही. त्या ऐवजी तिने टॉयलेटमधे जाऊन पूर्ण मेकप बदलला आणि तनुजा म्हणून बाहेर आली. '.. नियतीने खुलासा केला.
'तुम्हाला हे समजेल असं वाटलंच नव्हतं आम्हाला, अगदी थक्क केलंत बघा!'.. दीपक हताशपणे म्हणाला.
'आँ? म्हणजे?'
'आपल्या पहिल्या भेटीत तुम्ही काढलेली अनुमानं आठवतात?'
'हो! तुम्ही भारीतले कपडे आणि रोलेक्स घड्याळ घालून जवळच्या मुलीच्या लग्नाला जाऊन आला होतात. जवळच्या कारण तुमचे डोळे ओलावलेले होते.'.. उत्तम अभिमानाने म्हणाला.
'हा हा हा! ते कपडे भाड्याने घेतलेले होते आणि रोलेक्स बनावट होतं. मी महापालिकेच्या बांधकाम विभागामधला एक साधा अधिकारी! मला कुठलं रोलेक्स परवडतंय? पण तेव्हा मुद्दाम काही लोकांवर इंप्रेशन मारायला घातलं होतं. माझ्या डोळ्यातलं पाणी स्कूटरवरून येताना धूळ गेल्यामुळं आलं होतं. असो. मला पैसे घेऊन परदेशी पळून जायला काही दिवसांची मुदत हवी होती. त्यामुळे माझ्या इतर भागिदारांच्या डोळ्यात धूळफेक करण्यासाठी मी अनुजाने पैसे पळविल्याचं सांगितलं. तिचा शोध घेण्यासाठी एक बिनडोक डिटेक्टिव्ह हवा होता. तुमच्या त्या तद्दन चुकीच्या अनुमानांमुळे मला हवा तसा माणूस मिळाल्याचा आनंद झाला.'.. दीपक गर्वाने म्हणाला.
'पण अजून तुम्ही पसार कुठे झाला आहात?'
'आता काय बाकी राहीलंय? आम्ही तुम्हाला इथे बांधून ठेवणार आणि पळून जाणार. जाताना पैसे हवाला तर्फे तिकडे पाठवणार.'.. दीपक निर्वाणीच्या सुरात म्हणाला.
'म्हणजे आता सगळं नियतीच्या हातात आहे तर!'.. उत्तम जोरजोरात कंबर हलवत म्हणाला. त्यामुळे त्याच्या पँटच्या आत मांडीला चिकटलेली रबरी पाल सटकून पायावर घसरली. ती त्याने तनुजाच्या अंगावर उडवली. कुठलीही बाई पालीला घाबरतेच तशी तनुजाही घाबरली आणि किंचाळली. नियतीने त्याच वेळेस तिच्यावर झडप घेऊन पिस्तुल हस्तगत केलं आणि कराटेचे तडाखे मारत दोघांना जायबंदी केलं. मग त्या दोघांना यथावकाश पैशासकट लाचलुचपत अधिकार्यांच्या हवाली केलं.
------***-----------***---------
एक मोठा मासा पकडून दिल्याबद्दल लाचलुचपत खात्याकडून त्या दोघांना एक घवघवीत बक्षीस मिळालं.
'चला थोडे फार पैसे तरी सुटले, नाही का?'.. उत्तम खुशीत नियतीला म्हणाला.
'तसे मी थोडे फार त्या ब्रीफकेस मधून ढापले होते. म्हणजे आपली फी ठरली होती तितकेच हं!'.. नियती निर्विकारपणे पेपर वाचीत म्हणाली.. 'आयला! हे बघ काय!'
'काय?'
'अनुजा देशमाने नावाच्या मुलीची सुटका केल्याची बातमी आहे. अगदी दीपकने सांगितलेली सेम ष्टोरी!'
आणि दोघांनी एकमेकांकडे पहात आ वासला.
-- समाप्त --
छान लिहिलय.. आवडलं. सस्पेन्स
छान लिहिलय.. आवडलं. सस्पेन्स टिकून होता शेवटपर्यंत. अंदाज नाही आला.
कथा आवडली. पुलेशु
कथा आवडली. पुलेशु
मस्त!
मस्त!
मस्त सस्पेन्स ष्टोरी!ट्वीस्ट
मस्त सस्पेन्स ष्टोरी!ट्वीस्ट भारीय.
जबरी गोष्ट चिमण...
जबरी गोष्ट चिमण...
मस्त मस्त!! चिमण इज बॅक
मस्त मस्त!! चिमण इज बॅक
आवडली
आवडली
छान लिहीलेय
छान लिहीलेय
नियतीच्या तोंडून असली जळजळीत शिवी ऐकून अनुजा देशमानेंना थेट झोपडपट्टीच्या नळावर उभं राहिल्याचा भास झाला. >> इथे अनुराधा देशमाने हवे.
धन्यवाद सर्वांना!
धन्यवाद सर्वांना!
विनिता चूक सांगितल्याबद्दल डबल धन्यवाद! आता चूक सुधारली आहे
खूप मस्त लिहिली आहे. या
खूप मस्त लिहिली आहे. या जोडगोळी चे आणखी कथा वाचायला आवडेल.
छान जमलीय कथा.
छान जमलीय कथा.
सस्पेन्स टिकून होता शेवटपर्यंत. अंदाज नाही आला.>>>
+१
मस्त!
मस्त!
आप कतारमें हैं! कृपया प्रतीक्षा कीजीये!.>> हा जोक लईच आवडला.
आवडली.थोडी पसरट वाटली
आवडली.थोडी पसरट वाटली
मस्त् लिहीलय
मस्त् लिहीलय
मस्तच...
मस्तच...
छान आवडली.
छान आवडली. करमचंद आणि किटी डोळ्यासमोर येत होते..
जोर दार आहे कथा !!!
जोर दार आहे कथा !!!
<< तोन्डात बोटे घातलेली बाहूली >>
चिमण खुप दिवसांनी आलास रे!!
चिमण खुप दिवसांनी आलास रे!!
एक नंबर लिहिलस...
मस्त आवडली कथा
मस्त
आवडली कथा
चूक सांगितल्याबद्दल डबल
चूक सांगितल्याबद्दल डबल धन्यवाद! >> धन्यवादची गरज नाहीये
सुरुवातीपासून मला नियती रोबो असावी का काय असेच वाटत होते. का? काय माहित
कथा आवडल्याबद्दल सर्वांना
कथा आवडल्याबद्दल सर्वांना धन्यवाद!
>> सुरुवातीपासून मला नियती रोबो असावी का काय असेच वाटत होते
आवडली
आवडली
मस्त! शेवटपर्यंत खिळवून ठेवलं
मस्त! शेवटपर्यंत खिळवून ठेवलं कथेने.
नियती फारच आवडली मला. भारी.
चिमण असंच लिहित राहा.
छान आहे की.. मजा आली वाचायला
छान आहे की.. मजा आली वाचायला चिमण.
मस्त! शेवटचा ट्विस्ट भारीच.
मस्त! शेवटचा ट्विस्ट भारीच.
भारी झालीये गोष्ट !!
भारी झालीये गोष्ट !!
मस्त कथा.
मस्त कथा.
या जोडगोळीच्या आणखी कथा वाचायला आवडेल. >> +१
मस्त आहे गोष्ट . वाचायला
मस्त आहे गोष्ट . वाचायला मज्जा आली .
एकदम भारी झाली आहे कथा. आवडली
एकदम भारी झाली आहे कथा. आवडली.
मयुरी, निधी, अनघा, मॅगी, धनि,
मयुरी, निधी, अनघा, मॅगी, धनि, सुमुक्ता, जाई आणि rmd वाचून प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद!
Pages