भांडण

Submitted by जित on 26 January, 2018 - 15:24

बायकोशी कधीतरी खूप भांडावं
काढून टाकावं किल्मिष मनातलं
नंतर मात्र घेऊन अलवार मुका
समजवावं प्रेम स्पर्शातलं

कधीतरी भांडावं खूप मित्राशी
जमलं तर, द्याव्यात शिव्या मनापासून चार
ग्लासांची मग करत किणकिण
प्यावी बिअर त्याच्याचसोबत गारगार

खूप भांडावं कधीतरी आईशी
का एवढी धडपडतेस विचारावं
सोडून मग शिदोरी आठवणींची
तीचं प्रेम चाखत राहावं

खूप कधीतरी भांडावं देवाशी
का निर्माण केला भेदभाव
भांडून झालं की मग आठवावं
हा त्याचा नाही आपलाच डाव

भांडावं कधीतरी खूप स्वतःशी
विचारावं मनाला, कसला वैताग राव
विसरावं कवटाळलेल्या दुःखाला
द्यावा फक्त सुखाला वाव

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users