दोन महिन्यांपासून चाललेलं आजारपण, त्यातून ठरलेली सर्जरी, ती झाल्यावर औषधांच्या अंमलात असलेली गुंगी, मधूनच येणारं डिप्रेशन आणि इतक्या सर्वातून जाऊनही 'पुढे सर्व ठीक होईल की नाही' हा मोठा प्रश्न!!सर्जरीच्या आधी धुतलेले केस आणि त्यानंतर एकदोन वेळा जमेल तसं अंगावर घेतलेलं पाणी. औषधं, आजारपण यातून उतरलेला चेहरा. आज सकाळी उठल्यावर पाहिलं तर गळत असलेले केस, ओढून आलेला चेहरा,सगळं कसं नको वाटू लागलं. अजून किती दिवस, महिने, वर्षं हे असं चालणार या विचारांनी अजूनच वाईट वाटू लागलं. नवीन दिवस उजाडला, थोडं खाऊन घेतलं, औषध घेतलं तरी मन काही 'उंच भरारी' घेण्याच्या मूड मध्ये नव्हतंच. मध्ये तर नवऱ्याने टीव्ही बघ, फोन देऊ का वगैरे लहान मुलांना दाखवतात तशी खेळणीही दाखवून झाली होती.
शेवटी आज दुपारी हिम्मत केली, केसांना छान तेल लावलं, तेही आग्रहाने लिंबू, अंडं वगैरे लावून. केस धुतले. अंघोळ झाली, केस सुकवून अगदी छान सेटही केले. या सर्वात दोन तास आणि एरवी लागते त्यापेक्षा दहापट तरी शक्ती खर्च झाली. तोवर संध्याकाळ झाली. अंगातील त्राण संपल्याने पुन्हा एकदा औषध घेतलं. आता हे सर्व वाचून काडीचंही काही कुणाला कळणार नाही. पण खरं सांगू, गेल्या कित्येक दिवसांत इतकं छान वाटलं नव्हतं जे एका अंघोळीने वाटलं. अगदी असंच मुलांच्या बाळंतपणातही अनेकदा वाटलं होतं. सर्व शीण, थकवा, विचार, दुःख सर्व कसं पाण्यासोबत जणू वाहून जातं. आणि उरतो ते फक्त आपण.
ही आजचीच गोष्ट नाही. कॉलेजमध्ये असताना, अनेक दिवसांचा कंटाळवाळा अभ्यास, परिक्षेचं टेन्शन या सर्वानंतर संध्याकाळी घरी आल्यावर गरम पाण्य़ाने आंघोळ केली की कसं वाटायचं ना ते त्या परीक्षेच्या दिवसांतच लक्षात येतं. थकवा, मनातले विचार , होणारा त्रास सगळे पाण्याबरोबर जणू वाहून जातात. बरेचदा मला असा अनुभव आला आहे, रडून एखादी रात्र घालवावी आणि सकाळी आंघोळ झाल्यावर वाटावं जणू गेली रात्र गेली, आज नवा दिवस उगवलाय. एखाद्या मस्त ट्रेकवरून आल्यावर, निसर्गसौदर्याची, प्रवासाची, पावसाची आठवण काढत आलेला शीण एकदम पळून जातो. तर कधी आठवडाभर बाहेर हॉटेलवर राहून केवळ आपल्या घरी आलो म्हणूनही असंच वाटतं.
तर असे अंघोळीचे अनेक अनुभव मन प्रसन्न करणारे. आपल्याकडे मात्र त्याची कशाकशाशी सांगड घातली आहे हे सांगायला नकोच.भारतात 'अंघोळ' या प्रकारावरूनही लोकांचे अनेक प्रकार पडू शकतात आणि त्यावर हजारो चर्चा होऊ शकतात हे मला कळलं आहे. थंड पाणी, कोमट, उन्हाळा असूनही कढत पाणी असे पाण्याचे प्रकार. उठून डायरेकट बाथरूममध्ये घुसणारे, चहा वगैरे घेऊन जाणारे, अंघोळ करूनच पाणीही घेणारे, अंघोळ-पूजा करुन मग पाणी-अन्न घेणारे असे अनेक प्रकार. घराचा नियम अंगवळणी पडला म्हणून आयुष्यभर तेच करणारे, तर आधी हे सर्व सहन करावं लागलं म्हणून मोकळीक मिळाल्यावर एकदम उलट करणारे, फक्त ऑफिसला जायच्या दिवशीच अंघोळ करणारे, सुट्टीत/थंडीत, दांडी मारणारे, घरच्यांनी धक्के मारुन पाठवल्यावर करणारे तर फक्त गर्लफ्रेंडला भेटायला जाताना अंघोळ करणारे असे हजारो प्रकार-जाती-पोटजाती असू शकतात.
त्यामुळे मी सुरुवातीला जी कारणं सांगितली ती, 'आमच्याकडे आंघोळीशिवाय चहापाणी सुध्दा चालत नाही' अशा लोकांसाठी नव्हेच. उठलं की दारात सडा-रांगोळी, प्रातःविधी आणि आंघोळ, अशा लोकांशी माझं जमणं जरा अवघडंच. सोवळं वगैरे तर विसराच. अगदी सासरीही, लवकरच कळून गेलं की ही बाई काही ऐकणाऱ्यातली नाही. जेवायच्या आधी आंघोळ करा, आज पूजा आहे घरी म्हणून आंघोळ करा, पाहूणे येणार आहेत म्हणून आवरून घ्या ही अशी अनेक कारणं ऐकवली जातात. सुट्टी, विषेशत: रविवार हा या असल्या कामांसाठी नसतोच मुळी. अरे?? आंघोळीची स्वछता हा भाग सोडून बाकीची सगळी कारणं फक्त Logical च आहेत ना?: -) आता यावर मला अनेक कारणं ऐकवली जाऊ शकतात. पण खरं सांगायचं तर उलट अमेरिकेत आल्यापासून एक गोष्ट जाणवली ती म्हणजे सकाळी स्वयंपाक करून जायचा असेल तर नंतर अंघोळ केली पाहिजे, नाहीतर लोकांना मसाल्यांच्याच वास येत राहतो. असो.
जशी रोजची अंघोळ तशाच अनेक स्पेशलही. दिवाळीचं 'अभ्यंगस्नान'. पहाटे-पहाटे,कडक थंडीत, कुडकुडत, उटणं लावून घेवून गरम्म्म्म पाण्याने आंघोळ करणं म्हणजे दिवाळीची खरी सुरुवात. पूर्वी साधारण वर्षाच्या या काळात शेतकरी आपले धान्य घरी आणत त्यामुळे कष्टाने थकलेलं शरीर साफ करून मग आलेल्या धान्याचा, संपत्तीचा उपभोग घेण्यासाठी हा सण साजरा करत.हे झालं तेंव्हाचे कारण. परंतु आजही दिवाळीची पहाट अभ्यंगस्नानाशिवाय अधुरी वाटते. सोहळाच तो एक. तसेच अजून एक म्हणजे, गंगास्नान. मी आजपर्यंत गंगा नदी पाहीलेली नाहिये, तिथे जाऊन म्हणे आजपर्यंत केलेली सगळी पापं धुवून निघतात. केवळ त्या एका श्रद्धेमुळे अनेक वर्षांत दूषित झालेली गंगा साफ करण्यासाठी करोडो रुपये खर्च होऊनही अजूनही काही फरक दिसत नाहीये. आता तो वादाचा मुद्दा वेगळाच. पण खरंच अशी पापं धुवून निघाली तर?
आपल्याकडे एखादया मॄत व्यक्तीला अग्नी देऊन आल्यानंतर कशालाही न शिवता लोक आंघोळ करतात. मला कुणीतरी याचं शास्त्रीय कारण सांगितलं होतं. मॄतव्यक्ती एखाद्या आजारपणाने गेली असेल तर त्या व्यक्तीभोवती असलेल्या विषाणूची बाधा बाकी लोकांना होऊ नये म्हणून ही खबरदारी. पूर्वी ते योग्य असेलही, अजूनही योग्य आहे का? मुख्य म्हणजे, आपली प्रिय व्यक्ती कायमची दुरावल्यावर तिचे अंतिमसंस्कार करून झाल्यावर, त्या आंघोळीने तिच्या आठवणीही, ती गेल्याचं दु:ख, सगळं धुवून जात असेल काय?
आमच्या मुलांना लहानपणी मस्त मालिश करुन अंघोळी घातल्या. पहिल्याला तर जरा जास्तच. ते सर्व करणं म्हणजे एक सोहळाच असायचा. आजी-आजोबा, आई-बाबा सर्व त्यात गुंतलेले, मुलाचं हसणं, कधी पेंगण, कधी रडणं, भोकाड पसरुन रडणं, पुढे जरा मोठी झाल्यावर बाथटब मध्ये मजा करत अंघोळ करणं सर्व एंजॉय केलं. अगदी सुट्टीत भारतात आजीकडून आग्रहाने अंघोळ करुन घेतात. तेव्हाचं ते त्यांचं अंघोळीच्या वेळी मस्ती करणं, दोन्ही हातानी पाणी उडवण्य़ाचा त्याचा खेळ, तो निरागस चेहरा किती सुखकारक असतं ना? वाटतं, रोज आंघोळ करताना आपलं निरागसपण, तो आनंद आणि ते सुखद बालपण या पाण्याबरोबर हळूहळू धुवून जात असेल काय?
आज केवळ आंघोळीमुळे लिहिण्याची इच्छा झाली इतक्या दिवसांनी. पुन्हा कधी लिहिणं होईल माहित नाही, निदान तोवर हे तरी.
-विद्या भुतकर.
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/
उष्ण पाण्यानं स्नान करणे,
उष्ण पाण्यानं स्नान करणे, म्हणजे बिमारच तो समजणे ही ओळ तुकडोजी महाराजांची आहे ना/का? आता अचानकच आठवलं.
गेट वेल सून विद्या. काळजी
गेट वेल सून विद्या. काळजी घ्या.
धावत्या व्हा लवकर शुभेच्छा
धावत्या व्हा लवकर
शुभेच्छा
काळजी घ्या, लवकर बर्या व्हा
काळजी घ्या, लवकर बर्या व्हा आणि पटापट लेख टाका.
मलाही आंघोळ झाल्याशिवाय घराबाहेर पडायला आवडायचे नाही. आजारपण असले तरी आंघोळ लागायचीच. या वरून माझी आणि अज्जीची लटकी भांडण व्हायची. तापात आंघोळ करू नको म्हणून ति मला रागवायची आणि मी फक्त दोनच तांबे घेते म्हणून हट्टाने आंघोळ करायचे. पण आता ही सवय कधी कधी मोडावी लागते.
सकाळची अंघोळ म्हणजे
सकाळची अंघोळ म्हणजे माझ्यासाठी एक प्रकारचं मेडिटेशनच असतं. आंघोळीच्या शेवटी गरम पाणी हळूवार डोक्यावरून अंगावर सोडत सोडत येणाऱ्या दिवसासाठी मनाची खंबीर तयारीच जणू चालू असते. जोपर्यंत मनाची नेभळट अवस्था जाऊन एक प्रकारचा अक्टीवनेस आणि सकारात्मकता येत नाही तोपर्यंत मी पाणी अंगावरून घेतच राहतो. आणि एकदा का हवा तसा मूड सेट झाला, की मग अख्खा दिवस असा भन्नाट जातो की काही विचारूच नये. पण जर का ही अंघोळ बिघडली किंवा घाई गडबडीत झाली तर अख्ख्या दिवसाची वाट लागते.
बाकी नेहमीप्रमाणे तुमचा लेख आवडलाच, आजारातूनही लवकरच बरे व्हाल अशी अपेक्षा...
सुंदर लेख. विद्या, गेट वेल
सुंदर लेख. विद्या, गेट वेल सून.
गेट वेल सून..
गेट वेल सून..
विद्याताई लवकर बऱ्या व्हा, अन
विद्याताई लवकर बऱ्या व्हा, अन नवीन लेख/कथा लिहायला घ्या.
अंघोळ म्हणजे माझ्याही आवडीचा विषय
एर्वही २० - २५ मिनिटात उरकावी लागते, पण सुट्टीच्या दिवशी मस्त दुपारी १२ ते १ पर्यंत लोळत पडायचे, मग नाश्ता करून चांगले दीड दोन तास घालवायचे अंघोळीत
खूप छान अन रीफ्रेशींग वाटते
विद्या, टेक केअर.लिहीत रहा
विद्या, टेक केअर.लिहीत रहा.बाकी सर्जरी चा कंटेक्स्ट माहीत नाही पण लवकर पहिल्या सारखी चालती पळती हो.>> + १२३
काळजी घ्या.
काळजी घ्या.
छान लेख! तुम्हाला लवकर बरं
छान लेख! तुम्हाला लवकर बरं वाटावं यासाठी आणि हे नवं वर्ष आरोग्यपूर्ण जावे यासाठी मनापासून शुभेच्छा!
एर्वही २० - २५ मिनिटात उरकावी
एर्वही २० - २५ मिनिटात उरकावी लागते, पण सुट्टीच्या दिवशी मस्त दुपारी १२ ते १ पर्यंत लोळत पडायचे, मग नाश्ता करून चांगले दीड दोन तास घालवायचे अंघोळीत>>> माझी एरवीची अंघोळ ५ मि. आणि सुट्टीत १५-२० मी.
बाप रे ! इतक्या साऱ्या
बाप रे ! इतक्या साऱ्या शुभेच्छा, सदिच्छा पाहून खूप बरं वाटलं. ही पोस्ट लिहिली त्या दिवसापासून मनात, विचारात खूप फरक जाणवत आहे. याआधी अनेकदा जवळचे लोक म्हणतही होते, विचार करत बसू नकोस लिही. पण जमत नव्हतं. आता थोडं थोडं तेही सुरु करत आहे.
पूर्वीपेक्षा हालचाल आणि आजूबाजूचा अवेरनेस थोडी वाढली आहे (औषधे कमी झाल्याचा परिणाम असेल ) पण तुमच्या सर्वांच्या कमेंट आणि सदिच्छांबद्दल खूप खूप आभार.
बाकी आजाराबद्दल बरंच बोलायचं आहे, तेही येईलच हळूहळू.
विद्या.
काळजी घे.बाकी नेहमीसार्खे
काळजी घे.बाकी नेहमीसार्खे मस्त लिहिलंय.
छान लिहिलय. खरं आहे, प्रवास असो, वैताग असो की अजून काही डोक्याचा भुगा करणारी गोष्ट असो, अंघोळीनंतर फ्रेश स्टार्ट चं फिलींग येतं. >>>+१.
विद्या, टेक केअर.लिहीत रहा.
विद्या, टेक केअर.लिहीत रहा. >>> ++ १
ही आंघोळ वाचून, बऱ्याच आंघोळी
ही आंघोळ वाचून, बऱ्याच आंघोळी मनात जाग्या झाल्या.
खूप छान लिहिले आहे.
काळजी घ्या.
विद्याताई, तुम्हाला लवकरात
विद्याताई, तुम्हाला लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा. काळजी घ्या..
आजाराचा संदर्भ माहीत नाही पण
आजाराचा संदर्भ माहीत नाही पण get well soon!
Pages