आपणा सर्वांना शब्दरुपी तिळगूळ देउन सादर करीत आहे या लेखमालेतील ८वा लेख...
* * *
पहाटेचे पाच वाजलेत. तुम्ही मस्तपैकी साखरझोपेत आहात. नित्यनेमाने तुमच्या मोबाईलमधील गजर सकाळी साडेसहाला वाजणार आहे. पण आज अचानक फोनच्या रिंगने तुम्ही दचकून जागे होता. गजर झालाय की फोन वाजलाय या संभ्रमात तुम्ही फोन उचलता. पलिकडून एकजण घाईघाईत उत्तेजित स्वरात तुम्हाला सांगतो, “अरे, काकांना आत्ताच अॅडमिट केलंय, आयसीयूत ठेवलंय, तू लगेच निघ”. तुम्हाला त्याच्या परिस्थितीची जाणीव होते आणि तुम्ही तडक तिथे जायला निघता.
मग त्या हॉस्पिटलात घाईत शिरून आयसीयूच्या बाहेरच्या खोलीत पोचता. तिथे ‘काकां’चे काही आप्तेष्ट आधीच पोचलेत. त्यातला एकजण तुम्हाला त्याने आताच खालच्या फार्मसीतून ‘ते’ पाच अंकी रुपयेवाले भारी इंजेक्शन आणून नर्सला दिल्याचे कौतुकाने सांगतो. बाकी एक-दोघे मोबाईलवरून नातेवाइकांना खबर देत आहेत. दरम्यान काकांच्या मुलाने ‘भारत विमा कं’ च्या एजंटला फोन लावलाय आणि तो त्याला “काय ते तुमचे बघा, सर्व काही कॅशलेस व्हायला पाहिजे”, असे खडसावून सांगतोय.
तिकडे आयसीयूच्या आत ते काका बेडवर पहुडले आहेत. त्यांच्या हातात सलाईनच्या नळ्या आणि छातीवर जेलीचा ओलावा या अवस्थेत अनेक वायरींच्या जंजाळात आणि मॉनिटर्सच्या गराड्यात ते झोपलेले दिसताहेत. हॉस्पिटल स्टाफची आत-बाहेर धावपळ चालू आहे.........
मित्रहो, हा वरचा प्रसंग काय तुम्हाला चित्रपटातला वाटतोय का? अंहं ! हा तर तुमच्या-माझ्या घरीदारी, शेजारीपाजारी कधीना कधी हमखास घडणारा प्रसंग आहे. कदाचित आपल्यातील कुणाच्या वाट्याला त्यातल्या रुग्णाची भूमिकासुद्धा वाट्याला आली असू शकेल. या प्रसंगातल्या रुग्णाला हृदयविकाराचा झटका आलेला आहे. या आजाराचे शास्त्रीय नाव आहे Myocardial Infarction (MI). Myocardium = हृदयाचे स्नायू आणि Infarct = मृत पेशींचा समूह. एखाद्या करोनरी रक्तवाहिनीत झालेल्या गुठळीने होणारा हा आजार.
MI चे निदान डॉक्टरला अत्यंत जबाबदारीने करावे लागते. रुग्णाच्या बाजूने त्याला भावनिक आणि आर्थिक पैलू असतात. या घटनेपूर्वीचा आणि नंतरचा ‘तो’ यात बऱ्यापैकी गुणात्मक फरक पडणार असतो. एकूणच त्याच्या कुटुंबातली ही मोठी घडामोड असते. तर एखाद्याच्या बाबतीत अशा पहिल्याच तीव्र झटक्यात त्याचे आयुष्यही संपू शकते.
तर हे महत्वाचे निदान करताना रुग्णतपासणी बरोबर रक्तचाचण्या, इसीजी आणि इतर काही चाचण्या तातडीने केल्या जातात. त्यापैकी ‘ट्रोपोनिन’ या प्रथिनाची रक्तपातळी मोजणे ही अत्यंत महत्त्वाची चाचणी होय. तिच्या रिपोर्टवर तुम्ही रुग्णावर MI चे शिक्कामोर्तब करणे हे बरेचसे अवलंबून असते.
मग काय आहे हे ‘ट्रोपोनिन’ प्रकरण? नादमधुर नाव असलेले हे प्रथिन नक्की कुठे असते व काय करते? पुढचा सर्व लेख त्यासाठीच समर्पित आहे.
या विषयाचे चार भागात विभाजन करतो:
१. ट्रोपोनिन : स्नायूंमधले एक प्रथिन
२. ट्रोपोनिनची रक्तपातळी आणि MI चे निदान
३. ट्रोपोनिनच्या मर्यादा आणि
४. MI च्या रक्तचाचण्या : आढावा
ट्रोपोनिन : स्नायूंमधले एक प्रथिन
आपल्या शरीरात तीन प्रकारचे स्नायू असतात. त्यांच्या अधिकृत नावांना आपण थोडी लाडिक मराठी नावे देऊ:
• skeletal muscle = हाडस्नायू ( म्हणजे biceps वगैरे)
• cardiac muscle = हृदयस्नायू आणि
• smooth muscle = मऊस्नायू ( म्हणजे ‘आतड्याचे’ वगैरे)
यापैकी हाड- व हृदयस्नायूंमध्ये ट्रोपोनिन हे प्रथिन असते आणि ते त्यांच्या आकुंचनात मदत करते. त्या दोन्ही ठिकाणच्या ट्रोपोनिनमध्ये थोडाफार फरक असतो. इथे आपण फक्त हृदयस्नायूंमधील ट्रोपोनिनचाच (cardiac Tn) विचार करणार आहोत.
या ट्रोपोनिनचे तीन प्रकार असतात: T, I व C. त्यापैकी T व I हेच फक्त MI च्या निदानामध्ये उपयुक्त असतात. निरोगी अवस्थेत ट्रोपोनिन हे स्नायूंच्या पेशींमध्ये भरपूर असते तर रक्तात अत्यल्प प्रमाणात. जेव्हा रुग्णास MI होतो तेव्हा ठराविक हृदयपेशी मरतात आणि त्यांच्यातले ट्रोपोनिन रक्तात सोडले जाते. म्हणून अशा वेळी आपल्याला त्याची रक्तपातळी वाढलेली दिसते. ही वाढीव पातळी ठराविक दिवस टिकून मग कमी होत जाते.
ट्रोपोनिनची रक्तपातळी आणि MI चे निदान
करोनरी हृदयविकाराची लक्षणे असणारा रुग्ण जेव्हा दाखल होतो तेव्हा तातडीने त्याचे रक्त घेतले जाते आणि त्यातील हृदय-ट्रोपोनिनची पातळी मोजली जाते. त्यासाठी ट्रोपोनिनच्या T किंवा I या दोन प्रकारांपैकी कुठलेही एक निवडता येते. संबंधित प्रयोगशाळेचा तो निर्णय असतो. याच्या जोडीला रुग्णाचा इसीजी पण काढला जातो. या दोन्ही तपासण्या महत्वाच्या आहेत. तरीही ट्रोपोनिनची चाचणी ही इसीजीला काहीशी वरचढ मानली जाते. किंबहुना एवढे महत्वाचे निदान हे एकाच चाचणीवर करायचे नाही असा दंडक आहे.
MI चे निदान करण्यासाठी त्याची सार्वत्रिक व्याख्या करण्यात आली आहे ती अशी:
MI चे शिक्कामोर्तब करण्यासाठी खालील गोष्टींची पूर्तता व्हायला हवी:
१. रक्तातील पुरेसे वाढलेले ट्रोपोनिन
आणि
२. खालीलपैकी किमान एक घटना :
अ) करोनरी-विकाराची विशिष्ट लक्षणे रुग्णात दिसणे
आ) इसीजीतील विशिष्ट बदल किंवा
इ) हृदयाच्या ‘इमेजिंग’ तंत्राने मिळालेला पुरावा
वरील व्याख्येतून ट्रोपोनिनच्या चाचणीला सर्वोच्च महत्व दिले आहे हे लक्षात येते. या लेखाची व्याप्ती ट्रोपोनिनपुरती मर्यादित आहे.
सध्या प्रयोगशाळेत हृदय-ट्रोपोनिन मोजण्याचे अतिसंवेदनक्षम तंत्रज्ञान उपलब्ध आहे. त्यामुळे रुग्णास त्रास झाल्यापासून तीन तासांच्या आतच ट्रोपोनिनचे वाढलेले प्रमाण दिसून येते. या अद्ययावत तंत्राने MI चे निदान लवकर करणे शक्य झाले आहे.
ट्रोपोनिनची रक्तचाचणी दोन प्रकारे करता येते:
१. रुग्णाचे रक्त काढून ते प्रयोगशाळेत पाठवणे. तिथे रीतसर ट्रोपोनिनचे प्रत्यक्ष प्रमाण मोजले जाते. ते विशिष्ट ‘कट-ऑफ’ च्यावर असले की मग MI चे निदान पक्के होते.
२. थोड्याशा रक्तावर रुग्णाच्या वार्डातच छोट्या स्ट्रिपवर झटपट चाचणी करणे. यात ते वाढलेले आहे किंवा नाही आणि असल्यास त्याच्या प्रमाणाची अंदाजे माहिती मिळते.
वरील दोन्हींमध्ये अर्थातच पहिला प्रकार श्रेष्ठ आहे.
ट्रोपोनिनच्या मर्यादा
एखाद्या रोगनिदानाची निर्णायक चाचणी कोणती असते? तर अशा रक्तघटकाची चाचणी की जो फक्त एकाच रोगात वाढतो आणि अन्य कुठल्याही रोगात नाही. पण बऱ्याच चाचण्या या निकषाला १००% उतरत नाहीत. ट्रोपोनिनही त्याला अपवाद नाही. MI व्यतिरिक्त हृदयस्नायूला अन्य मार्गाने इजा झाल्यासही ते वाढते.
तसेच पूर्णपणे वेगळ्या रोगांतही ते वाढते, उदा.: फुफ्फुस-रक्तप्रवाहाचा आजार, दीर्घकालीन मूत्रपिंड विकार, काही केमोथेरपीचे दुष्परिणाम, इ. म्हणूनच MIचे निदान करताना नुसते ‘वाढलेले ट्रोपोनिन’ एवढा निकष पुरेसा नसतो तर, विशिष्ट ‘कट-ऑफ’ च्यावर ते वाढलेले लागते.
MI च्या रक्तचाचण्या : आढावा
१९६०पासून MIच्या निदानासाठी विविध रक्तचाचण्या प्रचलित आहेत. सुरवातीस रक्तातील काही एन्झाईम्स मोजली जात. प्रथम खूप उपयुक्त वाटलेल्या एखाद्या एन्झाइमच्या मर्यादा नंतर स्पष्ट होत. मग एकेक एन्झाइम मागे पडे व नवे त्याची जागा घेई. आता ती जागा ट्रोपोनिनने पटकावली आहे. गेली सुमारे २५ वर्षे ही चाचणी वापरात आहे. त्यात अनेक सुधारणा होत आज हृदय-ट्रोपोनिन मोजण्याचे अतिसंवेदनक्षम तंत्रज्ञान उपलब्ध झाले आहे. आजच्या घडीला तरी ही सुयोग्य चाचणी आहे. अर्थात विज्ञानात ‘अंतिम’ असे काहीच नसते. त्यामुळे १००% ‘स्पेसिफिक’ चाचणीचा शोध अजूनही चालू आहे. त्यासाठी काही नव्या रक्तघटकांवर संशोधन चालू आहे. भविष्यात त्यातून काही निष्पन्न होईल अशी आशा आहे.
************************************************************************************************************
नेहेमीप्रमाणे छान लेख.
नेहेमीप्रमाणे छान लेख. धन्यवाद.
हे कदाचित थोडे अवांतर वाटेल पण डायबेटीक पेशंटची रक्तातील साखरेची पातळी खूप वाढलेली असल्यास त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे सुद्धा कळत नाही असे होऊ शकते (जवळच्या नात्यात झाले आहे). तर यांचा एकमेकांशी काय संबंध आहे?
उत्तम लेख.
उत्तम लेख.
बुकमार्क मारुन ठेवते.
छान माहिती.
छान माहिती.
छान लेख. एक अभिनेत्री काल
छान लेख. एक अभिनेत्री काल परवात हार्ट अॅटेक ने वारल्या. त्या आधी त्या रात्री तीन परेन्त शूटिन्ग मध्ये बिझी होत्या. अति कामाने अॅटॅक आला. बायकांमध्ये ट्रोपोनीन किती वाढते? अॅटेक आल्यावर?
वरील सर्वांचे आभार!डायबेटीक
वरील सर्वांचे आभार!
डायबेटीक पेशंटची रक्तातील साखरेची पातळी खूप वाढलेली असल्यास त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे सुद्धा कळत नाही >>>
बरोबर आहे. त्याला silent MI म्हणतात. या रुग्णांच्या nerves वर परिणाम झालेला असतो (neuropathy). म्हणून त्यांना ते कळत नाही
अमा, ट्रोपोनिन किती वाढणार ते
अमा, ट्रोपोनिन किती वाढणार ते मृत पेशींच्या आकारावर अवलंबून असते.
त्यात लिंगभेद नसतो
छान माहिती दिलीय. लेख आवडला.
छान माहिती दिलीय. लेख आवडला.
नेहमीप्रमाणेच डिटेलवार लेख!
नेहमीप्रमाणेच डिटेलवार लेख! छान समजतय सगळ!
सचिन व मी आर्या,
सचिन व मी आर्या, नेहमीप्रमाणेच उत्साहवर्धनाबद्दल आभार !
माबोवर डॉ सुरेश शिन्दे हे
माबोवर डॉ सुरेश शिन्दे हे उत्तम मराठीत वैद्यकीय बाबी समजावून देत. आताशा ते लिहीत नाहीत. पण त्याच दर्जाचे लेखन . अत्युत्तम.
बाबा कामदेव, आभारी आहे.
बाबा कामदेव, आभारी आहे.
डॉ शिंदे हे मला गुरुस्थानी आहेत.
वाचकांना लेखन आवडल्याचे समाधान आहे
डॉक, नेहमीप्रमाणेच उत्कृष्ट
डॉक, नेहमीप्रमाणेच उत्कृष्ट लेख. MI मुळे माझ्या घरातील दोघांचा मृत्यू झाला असल्याने मला तुमचा लेख फार फील झाला. तुम्ही वर्णन केलेला सुरवातीचा प्रसंग मी शब्दशः अनुभवला आहे. किंबहुना त्या सगळ्या चरकातून मी पिळून निघालेलो आहे.
असो. लेखातून चांगली माहिती मिळाली. धन्यवाद
खूप चांगली माहिती. हल्लीच
खूप चांगली माहिती. हल्लीच जवळचा एक नातलग या विकाराने गमावलाय, त्यामुळे खूप टची झालेय या विषयात.
साद व साधना, आभार. तुमच्या
साद व साधना, आभार. तुमच्या भावनांशी सहमत आहे
डॉक्टर, कोरोनरीत रक्ताची
डॉक्टर, कोरोनरीत रक्ताची गुठळी न होता सुद्धा हार्ट attack येऊ शकतो का? कुठेतरी वाचल्यासारखे वाटते.
डॉक्टर
डॉक्टर
या निमीत्ताने अगदी हेल्दी रनर्स (स्टॅमिना, वॉर्म अप, कूल डाऊन्,डायट नीट पाळणार्या) ना आलेल्या हार्ट अॅटॅक बद्दलही सांगू शकाल का?
पुण्यात एक डॉक्टर तसे गेले होते.
आणि कॉग्निझंट चा एक माणूस.
साद, बरोबर आहे तुमचे. त्याला
साद, बरोबर आहे तुमचे. त्याला MI - प्रकार 2 म्हणतात. हृदय स्नायूंना जेवढ्या रक्तपुरवठ्या ची गरज आहे तेवढा न झाल्यास असे होते. उदा तीव्र ऍनिमियात.
अनु, तुमच्या प्रश्नाचे उत्तर गुंतागुंतीचे आहे. त्याचे एक कारण कोरोनरी आकुंचन पावणे (spasm) हे असू शकते
मी_अनु, तुमच्या प्रश्नांचे
मी_अनु, तुमच्या प्रश्नांचे उत्तर इथे कदाचित मिळु शकेल.
एका हृदयरोग तज्ञाचे टॉक आहे हे, बराच मोठा व्हिडिओ आहे.
https://www.youtube.com/watch?v=Z6eXAvVReNI
वा, मानव चर्चेत स्वागत.
वा, मानव चर्चेत स्वागत. सवडीने बघावा म्हणतो
वा, मानव चर्चेत स्वागत.
वा, मानव चर्चेत स्वागत. सवडीने बघावा म्हणतो
धन्यावाद डॉ. कुमार. तीन
धन्यावाद डॉ. कुमार. तीन महिन्यांपूर्वीच माझी ट्रोपोनीन टेस्ट झाली, निगेटिव्ह आली. माझ्या ECG मध्ये ST segment elevation पूर्वी पासून आहे.
माझी TMT पण positive येते. तेव्हा या वेळेला ट्रोपोनीन निगेटिव्ह आली तरी angiography करण्याचा सल्ला मिळाला. ती पण निगेटिव्ह आली. १५ ते २०% ब्लॉकेज असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.
निदान करायला अथवा रुल आउट करायला विविध चाचण्या आवश्यक असतात याची प्रचिती आली. माझ्याबाबतीत angiography केल्याविना हृदयरोगाची शंका सतत भेडसावत राहिली असती.
मानव, हे तुम्ही चांगले केले.
मानव, हे तुम्ही चांगले केले. तब्बेतीची काळजी घ्या.
तंदुरुस्त राहण्यासाठी शुभेच्छा!
माहितीपूर्ण लेख आणि चर्चा..
माहितीपूर्ण लेख आणि चर्चा..
पुलेशु
माहितीपूर्ण लेखन !
माहितीपूर्ण लेखन !
मित आणि जाई, आभारी आहे
मित आणि जाई, आभारी आहे
खूप छान माहिती डॉक्टर !!!
खूप छान माहिती डॉक्टर !!!
माहिती पूर्ण लेख व चर्चा डॉ..
माहिती पूर्ण लेख व चर्चा डॉ.. दोन तीन दिवसा पूर्वी वडिलांची
rotrblation angioplasty झाली डॉ अश्विन मेहतां कडे जसलोक ला पण त्यामागच शास्त्र तुमचा लेख वाचून कळल ...असे पुढे अजुन माहितीपूर्ण लेख वाचायला आवडेल
सुषमा व महेशकुमार, आभार!
सुषमा व महेशकुमार, आभार! तुम्हाला लेख उपयुक्त वाटल्याचे समाधान आहे
माहितीपूर्ण लेख.. वाचत आहे.
माहितीपूर्ण लेख.. वाचत आहे. ३-४ दिवसांपूर्वीच उच्च रकत्दाब अन पालपिटेशन मुळे अॅडमिट होते. बघूया काय होतेय ते आता..
अनघा, तुमच्या तब्बेतीस लवकर
अनघा, तुमच्या तब्बेतीस लवकर आराम पडो ही सदिच्छा!
Pages