वलय (कादंबरी) - प्रकरण ३

Submitted by निमिष_सोनार on 14 January, 2018 - 23:06

प्रकरण २ ची लिंक:
https://www.maayboli.com/node/64965

---
प्रकरण 3

सुप्रिया राजेशला ड्रॉप करून सिद्धिविनायकनगरला “लीएरा विमेन्स हॉस्टेल” वर पोहोचली. ते एक “सेल्फ कुकिंगची” सोय असलेले वर्किंग विमेन्स होस्टेल होते. तिच्या दोन रूममेट्स होत्या. सोनी बनकर आणि रागिणी राठोड. सुप्रियाने चावीने रूम उघडली. कॉमन किचन, हॉल आणि तीन स्वतंत्र बेडरूम, बाथरूम अशी रचना होती त्यांच्या रूमची! तिने आपली पर्स ड्रेसिंग टेबलवर ठेवली आणि आरशात पाहिले. चेहरा बराच काळवंडलेला वाटत होता. सोनी आली असेल असा विचार करून तिने सोनीच्या बेडरूमवर टकटक केले. आतून स्त्रीचा एक अवखळ आवाज आला, "कम ऑन इन सूप्री! डोअर इज ओपन!"

सुप्रियाने दरवाजा ढकलला तेव्हा सोनी बनकर तिच्या बेडवर अस्ताव्यस्त पाय फैलावून पहुडलेली होती. तिच्या कानात हेडफोन होता आणि अंगावर फक्त एक बारीक सफेद टी शर्ट आणि पँटी होती. सोनी बोलण्यात, वागण्यात आणि कपडे घालण्यात खूप अघळपघळ आणि मोकळी होती! सोनीचा चेहरा लांबूळका होता. तिची अंगकाठी भरीव आणि गोलसर होती. तिच्या चेहेऱ्यावर नेहमी एक बेपर्वाईची आणि उच्छृंखलतेची छटा असायची. डोळे चमकदार आणि बोलके होते. नाक सरळ आणि उठावदार होते.

“सोनी मॅडम, आराम चाल्लाय? जेवणाचं काय ठरवलंय आज रात्रीचं?”

“साकेत सोबत जाणार आहे मी बाहेर जेवायला.”

“वा! मज्जा चाल्लीये मस्त. बाॅयफ्रेंड सोबत! अगं, रागिणी आली नाही अजून?”

सोनी हसायला लागली, “ती? आजपर्यंत आलीय का कधी वेळेवर ती परत? भटकत असते ती इकडे तिकडे रात्री बेरात्री! पण आज रात्री कसलीतरी शूटिंग आहे म्हणाली होती ती, त्यामुळे उशिरा घरी येईल ती!”

“शूटिंग आहे तेही खरंच आहे म्हणा! पण एरवी शूटिंग नसली तरी ही पोरगी रात्रीची बाहेर फिरतच असते. काय करत असते देव जाणे! एनिवे! मी राईस बनवते आहे. मग फक्त माझ्या एकटीसाठीच बनवते!”

“बिंदास बनव आणि खा! आपलंच हॉस्टेल आहे. आपलीच रूम आहे. आपलंच राज्य आहे! एंजाॅय!”

तेवढ्यात सोनीचा मोबाईल वाजला. ती बोलू लागली, “हां रे साकेत. आ रही हूँ! .. तैय्यार तो होने दे मुझे!...हां बाबा हां, तेरी पसंद का पिंक कलर पहन के आती हूँ … क्या? खाना खाने के बाद पब मे भी चलना है? ठिक है...सेक्सी कपडे पहनके आती हूँ….हां रे! कम कपडे पहनने है, तो तैय्यार होने में ज्यादा समय लगता है! तुम साले जेन्ट्स लोग इस बात को नही समझोगे!”, एक डोळा मिचकावत स्वतःच्या जोकवर ती हसली.

तीच्या बेडरूम मधून बाहेर निघत सुप्रिया मनात म्हणाली, “त्या रागिणीला नावे ठेवते आणि स्वतः सुद्धा हुंदडते ही रात्री बेरात्री! पण ही सोनी भलती डान्स वेडी आहे. नाचण्याचा कोणताच चान्स, कोणतीच संधी ती सोडत नाही. डान्सबद्दल एवढं क्रेझी आजपर्यंत मी कुणाला पाहीलं नाही. ओह गॉड! आता सुद्धा चालली आहे ती पबमध्ये मनसोक्त डान्स करायला!”

फक्त एकदाच ती सोनी बरोबर पब मध्ये गेली होती तेव्हा तिने सोनीचा नाचण्याचा अजब फॉर्म आणि धिंगाणा बघितला होता! तिच्यासारखे खचितच कुणी नाचू शकत असेल! काय ती जबरदस्त एनर्जी होती आणि काय मस्त सॉलिड चार्म तिच्या नाचण्यातून ओसंडून वाहात होता की विचारता सोय नाही! फक्त एकच प्रोब्लेम होता- सोनी थोडीशी अल्लड होती!

सोनी महाराष्ट्रातल्या छोट्या शहरातून मुंबईत आली होती. तिला नृत्याची आणि संगीताची खूप आवड! अगदी स्वतः पेक्षा जास्त ती डान्सवर प्रेम करत असे. तिच्या मते डान्स म्हणजे एक प्रकारचा उत्कट अभिनयच आहे. नृत्य आपले शरिर आणि मन खर्या अर्थाने एकत्र आणते. त्यामुळे एखादा अभिनय रस नृत्याद्वारे आपण अधिक परिणामकारक पद्धतीने प्रेक्षकांसमोर पेश करू शकतो. करियरची सुरूवात म्हणून तिने टीव्हीवरच्या अनेक रियालिटी डान्स शो मध्ये भाग घेतला होता. अजून पुढे बरीच मजल गाठायची होती. मेकप करून, कपडे बदलून सुप्रियाला बाय करून सोनी निघून गेली. जेवण झाल्यावर सुप्रिया रूम मध्ये एकटीच होती. रात्री दहा वाजता थोडे फिरून आल्यावर ती परत आली. सुप्रिया झोपल्यावर रात्री एक वाजता सोनी परतली.

सकाळी चार वाजता रागिणी राठोड परतली. तीच्या बेडरूममध्ये गेली. मग आंघोळ करुन पाच वाजता झोपली. सकाळी 9 वाजता सुप्रिया आणि सोनी निघून गेल्या तेव्हा रागिणी झोपलेलीच होती. सकाळी साडेअकराला तिला जाग आली. काल रात्री तिचे हॉरर सीरियलचे शूटिंग होते. गोराई बीचवर एका भीतिदायक वाटणाऱ्या एका जागेत डायरेक्टरने शूटिंग ठेवली होती. शूटिंग उशिरा रात्रीपर्यंत चालली होती. सध्या ती दोन हिंदी हॉरर सीरियल्स आणि दोन रियालिटी शोज मध्ये काम करत होती. सध्याचा काळ असा होता की टीव्हीचे प्रेक्षक वाढले होते आणि चित्रपटांसाठी वापरण्यात येणाऱ्या जवळपास सर्व आधुनिक टेक्नॉलॉजी सीरियलसाठी सुद्धा वापरायला सुरुवात झाली होती. सीरियलचे प्रोड्युसर आणि डायरेक्टरसुद्धा सीरियल चित्रपटाइतकीच भव्यदिव्य झाली पाहिजे असे पाहत आणि नंतर त्यातून बक्कळ पैसा कमावत!

सोनी, रागिणी आणि सुप्रिया तिन्ही माटुंगा येथे असलेल्या “मुंबई अॅकॅडमी ऑफ डान्स, ॲक्टींग अँड म्युझिक (MADAM)” येथे शिकत होत्या. जुन्या जमान्यातील प्रसिद्ध सुपरस्टार “स्वर्गीय धर्मेश कपूर” यांनी या कॉलेजची स्थापना केली होती. या कॉलेजला सगळेजण शाॅर्ट नावाने MADAM (मॅडम) कॉलेज किंवा "मॅडम अॅकॅडमी" म्हणत असत. तिघींचे या कॉलेजातले हे शेवटचे वर्ष होते. शेवटच्या वर्षी रोज काॅलेजला येणे बंधनकारक नव्हते. मात्र ठराविक दिवशी त्यांना हजर रहावे लागे. हे वर्ष संपले की त्यानंतर मग खऱ्या अर्थाने सुरुवात होणार होती त्यांच्या फिल्मी करियरची! शेवटच्या वर्षी काही असाईनमेंट मिळायच्या त्या आपल्या वेळेनुसार कम्प्लीट केल्या की कोर्सचे सर्टिफिकेट मिळत असे म्हणजे मग कुठेही अभिनय क्षेत्रात करियर करायला मोकळे!

शिकता शिकता पार्ट टाइम जॉब त्यांनी स्वीकारला होता. मुंबई सारख्या शहरात रहायचे म्हणजे अफाट खर्च आलाच! मग मिळेल ते आणि मिळेल तेव्हा पार्ट टाईम काम करण्याशिवाय पर्याय नाही, हे सत्य आहे. मग तो याच क्षेत्रातला छोटा मोठा पार्ट टाईम जॉब असेल तर त्याहून चांगली गोष्ट कोणती? एक मात्र खरे की तिघींना फिल्म इंडस्ट्री मध्ये नाव, पैसा आणि प्रसिद्धी कमावायची होती. या कॉलेजमध्ये मनोरंजन क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्या अनेक युवक युवतींसाठी साठी विविध प्रकारचे शाॅर्ट आणि फुल टाइम कोर्सेस होते.

अभिनय, नृत्य किंवा कोणतीही कला ही काहींना उपजतच प्राप्त झालेली असते. गरज असते ती फक्त ती कला आपल्यात आहे हे ओळखण्याची आणि "मॅडम अॅकॅडमी" सारख्या संस्था या उपजत कलागुणांना आणखी वाढवण्यासाठी मदत करतात! जंगली प्राण्याला आपण पाळीव बनवतो तसे त्या उपजत कलेला पाळीव बनवण्यासाठी असे कॉलेजेस आणि कोर्सेस कामी येतात. तसेच आज मनोरंजन क्षेत्रात काय चाललंय हे माहित करून घ्यायला असे रीतसर शिक्षण घेतलेले बरे असते पण घेतलेच पाहिजे असे काही नाही. तसेच उपजत अभिनय कलेसोबत जर देखणं आणि उठावदार व्यक्तिमत्व लाभलं असेल तर तो दुग्धशर्करा योगच म्हणायला हवा!

लवकरच “मॅडम अॅकॅडमी” मध्ये एक ऑडिशन होणार होते ज्याची त्या अॅकॅडमी मधील सर्वजण आतुरतेने वाट बघत होते. हॉलीवूड आणि बॉलीवूड यांच्या एकत्र प्रयत्नातून एक भव्यदिव्य चित्रपट तयार होणार होता. त्याची भारतीय पातळीवरील एकमेव भव्य ऑडिशन “मॅडम” मध्ये टप्प्याटप्प्याने होणार होती. त्यांना त्यासाठी जास्त प्रसिद्ध नसलेले पण चांगले जातीचे अॅक्टर हवे होते जे त्यांना भरपूर वेळ देऊ शकतील. हा चित्रपट एक अतिशय अभूतपूर्व आणि मोठा असणार होता ज्याची कथा काय असेल हे अजूनपर्यंत गुप्त ठेवण्यात आले होते. अॅकॅडमी मधले जवळपास सगळेजण त्यासाठी उत्सुक होते. अजून ऑडिशनची तारीख जाहीर झालेली नव्हती.
(क्रमशः)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त,....... तिन्ही भाग एकदम वाचुन काढले, मी तुमच्या लिखाणाची पंखा आहेच. Esahitya वर आधीही तुमच्या कादंबर्या वाचल्या आहेत.