देव भेटला नाही....

Submitted by मीनल कुलकर्णी on 5 January, 2018 - 00:11

देव भेटला नाही

मी आजन्म केले पूजापाठ
म्हटली स्तोत्रे , श्लोक साठ
मी राहिलो उपाशी अख्खा दिवस
श्रध्देने फेडले सारे नवस
दिन ऐसा शोधावा जेंव्हा
मी सूर्यास अर्घ्य वाहिले नाही
पण आजतागायत एकदाही
मी देवाला पाहिले नाही

माझी कठोर होती उपासना
मनोभावे देवाची आराधना
नित्य केली पंढरीची वारी
ध्यानधारणा गंगेकिनारी
मी पूजेशिवाय पाण्याच्या
थेंबाला शिवलो नाही
तरी कसा अजून मी कधी
देवाला दिसलो नाही

मी सारी देवळे फिरलो
जपता माळ स्वत:स विसरलो
मी मुक्तहस्ते केले दान
अर्पिले सारे देहभान
मी घडा पापाचा
कधीच रेटला नाही
अजूनही मला
देव भेटला नाही

ती कोण जी होती
देवळाबाहेर बसली
मुलांना घेऊन सोबत
मनसोक्त होती हसली
तिने म्हणे भुकेल्यांना
प्रेमाने घास भरवला होता
अन् त्यांच्या मधेच तिला
श्रीहरी दिसला होता

*******मीनल

प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Use group defaults

जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुलें
तोचि साधु ओळखावा, देव तेथेंची जाणावा
Happy
तिने म्हणे भुकेल्यांना
प्रेमाने घास भरवला होता
अन् त्यांच्या मधेच तिला
श्रीहरी दिसला होता

खुप छान लिहिलंय