कॉलेजच्या जमान्यातील गोष्ट आहे!
आम्हा मुंबईकरांसाठी मुंबई जिथे माहीमला संपते तिथे पश्चिम उपनगरांमध्ये अंधेरी जोगेश्वरीच्या पुढचे आम्ही हिशोबात धरत नाही. तसे गेल्या काही वर्षांपासून मालाड कांदिवलीही जमेस धरू लागलो आहोत, पण बोरीवली त्याची हद्द झाली. अश्यात वसईबद्दल आम्हाला तितकीच माहीती असते जितकी गडचिरोलीबद्दल.. म्हणजेच शून्य !
पुढे एका पावसाळी मोसमात तृगांरेश्वरचा आणि तेथील धबधबारुपी नदीचा शोध लागला आणि त्यानंतर मात्र वसई देखील लोणावळ्यासारखेच आपुलकीचे ठिकाण वाटू लागले ती गोष्ट वेगळी. पण तेव्हाही तृंगारेश्वर वसईला आहे हे जेव्हा पहिल्यांदा ऐकले होते तेव्हा छातीत धडकीच भरली होती. कारण तोपर्यंत आयुष्याने दिलेला वसईचा एकमेव असा अनुभव अंगावर काटा आणनाराच होता.
झालेले असे, फुल्ल टाईम कॉलेज शिकता शिकता आमचा एक मित्र पार्ट टाईम जॉब करायचा. एका कन्स्ट्रक्शन कंपनीत तो साईट ईंजिनीअरची भुमिका निभवायचा. त्या डिसेंबरच्या महिन्यात तो एका चर्चच्या साईटवर कामाला होता. ग्रीष्माचे आगमन होत होते, झाडांना नवी पालवी फुटली होती, आणि नवे कोरे चर्च नुकतेच बांधून पुर्ण झाले होते. या खुशीमध्ये तेथील फादरने आमच्या मित्राच्या कामावर खुश होत त्याला २५ डिसेंबर ख्रिसमस पार्टीचे आमंत्रण दिले होते. ईथे तुम्ही एक ऑबजर्व्ह केले आहे का? फादर म्हटले की एकतर मला अमिताभचा अॅंथनी आठवतो, नाहीतर शाहरूखच्या ‘कभी हा कभी ना’ मधील नसरुद्दीन शहा. तर अश्या सुपर्रस्टार व्यक्तीमत्वाला भेटायला आम्ही सारेच उत्सुक झालो. असे वर वर दाखवत असलो तरी आतले कारण वेगळेच होते. ते जाणून घेण्यासाठी थोडे फ्लॅश बॅक मध्ये माझ्या बालपणात जाऊया..
तर माझे बालपण जुन्या दक्षिण मुंबईत गेले असल्याने तिथे लहानपणी खोर्याने पोर्तुगीज आणि ख्रिश्चन पाहिले आहेत. आमच्या समोरच तेव्हा एक गोवनगल्ली होती. म्हटलं तर बिनसमुद्राचा गोवाच तिथे वसला होता. पोर्तुगीजकालीन पण तितकीच आधुनिक बैठी आणि एकमजली घरे, आणि त्यात राहणारी वस्ती पुर्णत: ख्रिश्चन. तोकड्या स्कर्टातल्या सायकल चालवणार्या अन बॅडमिंटन खेळणार्या पोरी या तेथील खासियत. तेथील पोरंही व्हॉलीबॉल खेळायची पण त्यांच्यात आम्हाला रस नव्हता. रोज सकाळी शाळेला निघताना आमचा स्टेशनचा रस्ता तिथूनच जायचा. खरे तर तो लांबच पडायचा, पण आम्ही सोयीने त्याला शॉर्टकट म्हणायचो. त्या प्रात:काली तेथील दर दुसर्या घरातून मंद ईंग्लिशाचे धुंद सूर बाहेर पडायचे. ते कुठून येताहेत हे बघायच्या बहाण्याने आम्ही एकेका खिडकीत डोकावतच पुढे जायचो. आणि मग पटायचे की गाऊन घालावेत ते कॅथलिक पोरींनीच. कारण त्यांचे गाऊन सुद्धा आमच्या विचारांईतकेच छोटे असायचे. आम्हा मिडलक्लास चाळकरी लोकांसारखे गॅलरीत उभे राहून ब्रश करायची त्यांच्यात पद्धत नसावी. त्यामुळे वॉशबेसिन समोर उभ्या त्या आम्हाला नेहमी पाठमोर्याच दिसायच्या. पण तश्याही छानच वाटायच्या....
ईथे आम्ही म्हणजे मी, बबन आणि रबाडा !
बबन हे नाव किंचित जुनाट वाटते ना. पण ते बबनचे खरे नाव नव्हतेच. ते त्याच्या बाबांचे नाव होते. बबनचे खरे नाव आत्माराम होते. हे नाव बबनपेक्षाही जुनाट वाटते ना. कारण ते त्याला त्याच्या आजोबांच्या नावावरून ठेवले होते. लोकं काय श्रद्धा पाळतील याचा नेम नाही. तरी त्याची नुकसानभरपाई म्हणून लाडाने घरी त्याला सोनू सोनू म्हटले जायचे. पण हे झाले घरचे नाव. आम्ही मित्र सोनूऐवजी बबन नावाने हाक मारणे सोयीस्कर समजायचो. तसेही त्या काळी आमच्यात तीर्थरुपांच्या नावावरून हाक मारायची पद्धतच होती. बबनचे बाबा म्हणजे मूळ बबन निर्वतल्यानंतर बबनला ‘बबन’ हे नाव कायमचेच पडले. कारण आता या जगात फक्त एकच बबन शिल्लक राहिला होता.
रबाडा या नावामागे मात्र अशी काही कहाणी नाही. ते साऊथ आफ्रिकन खेळाडूसोबत त्याच्या दिसण्यातील साम्यावरून ठेवले होते. लहान मुलांच्या निष्पाप मनात वर्णभेदासारखे हलके प्रकार कधीच घर करत नसल्याने असे दिसण्यावरून चिडवायची नावे तेव्हा सर्रास ठेवली जायची.
असो, तर वयात येतानाच्या आठवणी त्या.. वयात येता येता आठवणीच बनून राहिल्या. साहेबांच्या वस्तीवर बुलडोझर फिरला आणि गोवनगल्ली कायमची गोव्याला शिफ्ट झाली. पण आजही स्वप्नात काही ओळखीचे, काही लक्षात राहिलेले चेहरे डोकावत राहतात. त्यांना काहीच नाव नसते, असते ती फक्त एक ओळख. ती म्हणजे ख्रिश्चन. ईतकीच..
तर मी, बबन, आणि रबाडा. आम्ही तिघेही आमचा तो साईट ईंजिनीअर मित्र धवल मकरंदसोबत या एकाच आशेवर वसईच्या चर्चेत सहभागी होण्यास तयार झालो, की आता ते बालपणीचे दिवस आणि त्या स्वप्नात दिसणार्या ज्युलिया, मारीया वास्तवात पुन्हा बघता येतील. पण प्रत्यक्षात आम्हाला ज्वाला आणि मयम्मा बघणे नशीबात येणार होते याची तेव्हा आम्हाला कल्पना नव्हती ......
क्रमश:
पुढचे उद्यापरवा सवड मिळताच ईथेच लिहितो ....
तोपर्यंत प्रतिसादांत तुमच्या काही ख्रिसमसच्या आठवणी असतील तर जरूर लिहा.
जर कधी ख्रिसमस साजराच केला नसेल तर राहू द्या 
---------------------
अजूनपर्यंत कोणीच आपले ख्रिसमसचे अनुभव लिहिले नाही यावरून "से नो टू २५ डिसेंबर" ईथे जोरदार पाळता जात असावा असा निष्कर्ष काढू शकतो. 
असो, पुढील लिखाणात जातीयवाद, धर्मवाद वा प्रांतवाद आढळला तर माझी लेखणी तिथेच थांबवा, कोणाच्या भावना दुखवायचा हेतू नाही. जर कोणी मराठी ख्रिश्चन तसेच वसईकर मायबोलीचे वाचक असतील तर त्यांची आगाऊ क्षमा मागतो.
---------------------
आता पुढे,
तर न आलेली दाढी घासून गुळगुळीत करून आम्ही मिसरूड फुटलेली पोरे वसईच्या चर्चवर स्वारी करायला सज्ज झालो. धवल मुकुंद आम्हाला मुंबई सेंट्रल स्टेशनवर भेटला. तिथून ट्रेनने वसईला जाता येते हे आम्हाला आयुष्यात पहिल्यांदाच समजत होते. संध्याकाळचे सहा वाजले होते, पण फारच लांबवरचा प्रवास करायचा आहे या अविर्भावात आम्ही सुका खाऊ सोबत घेतला होता. पण वसई अंदाजापेक्षा लवकरच आले. म्हणजे तो महाराष्ट्राचा ईतकाही दुर्गम कोपरा नव्हता जितके आम्ही समजत होतो. असे काही झाले की आपण स्वत:च्याच कोषात राहणारे मुंबईकर बनत चाललो आहोत याची लाज वाटते. पण ती लाज झटकून आम्ही चर्चच्या दिशेने चालू लागलो. विद्यार्थीदशेत असताना पाऊण तासापर्यंतच्या चालण्याला गाडीघोड्याचा खर्च केला जायचा नाही. चर्च त्यामानाने अर्ध्या तासातच येणार होते. असे धवल गिरीकंद म्हणाला होता. पण त्याने आम्हाला गंडवले होते. प्रत्यक्षात आमची सव्वा तासाची पायपीट झाली. तरी देखील तो म्हणत होता की हे वसईच आहे, हे वसईच आहे. मुंबईत रेल्वे ट्रॅकच्या कडेकडेने तासभर चाललो तर किमान दहाबारा स्टेशने बघून होतात. त्यामुळे पुन्हा एकदा आपण मुंबईकर किती छोट्या छोट्या खुराड्यात राहतो याची लाज वाटली. पण पुन्हा एकदा ती लाज झटकून आम्ही चर्चमध्ये प्रवेश केला.
ईथे तुम्ही एक ऑबजर्व्ह केले आहे का? चर्च म्हटले की आपल्यला नेहमीच डिडिएलजेचा चर्चमध्ये फुर्रर करत गोंधळ घालणारा शाहरूख खान आठवतो. मलाही तो आठवला. आणि तसेच करायची ईच्छा झाली. कारण हे चर्च सुद्धा तितकेच शांत आणि अंधारात होते. ते पाहून आम्हाला पार्टी नक्की ईथेच आहे ना असा प्रश्न पडला. ईतक्यात एक काळाधिप्पाड माणूस येऊन अगम्य भाषेत काहीतरी म्हणाला. माझे ईंग्रजी कच्चे असले तरी ती भाषा ईंग्रजी नक्कीच नव्हती. म्हणजे तो ख्रिश्चन नसावा. पण त्याने आपल्या बोलण्यात फंक्शन हा एक ईंग्लिश शब्द वापरला आणि बोटाने वर ईशारा केला. आधी वाटले आकाशातल्या बाप्पाकडे बोट दाखवतोय की काय? पण वर डोकावून पाहताच समजले वरच्या गच्चीवर फंक्शन होते. हो, चर्चला गच्चीही होती. तिथे हॅलोजन बल्बचा भगभगीत प्रकाश पडला होता. जे खालच्या अंधारात समजले नव्हते ते तिथे पोहोचल्यावर समजले, की चर्चचे केवळ बांधकाम पुर्ण झाले होते. पण प्लास्टरींग आणि फिनिशिंग बाकी होते. तो एखाद्या कन्स्ट्रक्शन साईटला शोभेलसा लूक, आणि पिवळा उजेड. एखाद्या चर्चमध्ये ख्रिसमस पार्टीला आलो आहोत की मित्राच्या लग्नाच्या हळदीला आलो आहोत हेच समजत नव्हते. कोणीतरी आता पटकन स्पीकर लावेल आणि झिंगाटची गाणी सुरू होतील अशी भिती सतत वाटत होती. पण तसे काही झाले नाही.
तासभर झाला त्या काळ्या धिप्पाड माणसाव्यतिरीक्त आम्हाला तिथे कोणीच दिसले नव्हते. तो सुद्धा गेले तासभर दिसला नव्हता. मनात नको नको ते विचार येत होते. आम्ही तिघेही वैतागलो होतो. धवल आनंद मात्र निवांत होता. त्याने मधल्या काळात चार सिगारेटी शिलगावल्या होत्या. हो, चर्चमध्ये सिगारेट. ईतरांसाठी ते चर्च असले तरी त्याच्यासाठी ती फक्त एक कन्स्ट्रक्शन साईट होती.
अकरा वाजले तरीही कोणी आले नाही तेव्हा आम्हाला फ्रस्ट्रेशन येऊ लागले. संध्याकाळी केलेले गुळगुळीत गाल आता खरखरीत होऊ लागले होते. घड्याळ्याच्या काट्याला बाराकडे नेणारा प्रत्येक क्षण असह्य होत होता. आमच्या दोनच ईच्छा होत्या. छान छान मुली दिसाव्यात, आणि तितकेच छान जेवण मिळावे. यापैकी दुसर्या ईच्छेशी कॉम्प्रोमाईज करायला आम्ही तयार होतो. पण आकाशातला चंद्र जसजसे उगवत चालला होता तसतसे दोन्ही ईच्छा मावळत चालल्या होत्या. आम्हा चौघांव्यतिरीक्त पाचव्या व्यक्तीच्या शोधात आम्ही गच्चीवरून खाली उतरलो आणि चर्चचा परीसर पिंजून काढू लागलो. अश्यातच उकळत्या चहाचा वास आमच्या नाकात शिरला.
क्रमश:
या विकेंडला ईथेच संपवतो !
--------------------------------------
- अंतिम भाग -
चहाचा वास एका नाकपुडीतून आत शिरला आणि तितक्याच वेगाने दुसर्या नाकपुडीतून बाहेर पडला. कारण तो चहा मगासचाच काळाकुट्ट दाक्षिणात्य माणूस बनवत होता. चहाचा रंग देखील त्याच्याच रंगाला मॅचिंग होता. हो, तो बिनदुधाचा चहा होता. चौकशी करता समजले की आजच्या कार्यक्रमाला येणार्या पाहुण्यांसाठीच तो चहा होता. ही चौकशी आम्ही त्याच्याशी कश्या खाणाखुणा करत केली हे ईथे लिहिणे निव्वळ अशक्य आहे. खाणाखुणा करताना त्याच्या खुनाचा विचारही आमच्या मनात आला होता ईतके ते असह्य होते. पण नाईलाज होता, कारण तो एकच आमच्या माहितीच सोर्स होता.
असो, सरतेशेवटी आम्हाला हा चहा झेपणार नाही, तर आमच्या वाटणीचा चहा कमी बनव असे आम्ही त्याला सांगितले. हे मात्र त्याला लगेच समजले. त्याने पटकन शेजारचे वाडगे त्या चहात बुचकळून चार कप चहा काढून घेतला आणि "सुंदरी" म्हणून हाक मारली. तसे शेजारील पत्र्याच्या शेडमधून त्याची सुंदरी बाहेर आली आणि ते वाडगे घेऊन आत गेली. त्या बुचकळलेल्या वाडग्याची हायजेनिक स्थिती पाहता आमचा चहा न घेण्याचा निर्णय योग्यच होता हे पटले. पण काही का असेना, त्यामुळे आम्हाला सुंदरी नामक आणखी एका मनुष्यप्राण्याचे दर्शन घडले होते. अन्यथा आपण चर्चच्या समारंभाला आलो आहोत का ख्रिस्ती दफनभूमीच्या उद्घाटनाला? याबाबत आमच्या मनात संभ्रम निर्माण होऊ लागला होता.
आम्ही थोडावेळ तिथेच रात्रीचा सन्नाटलेला थंडगार वारा खाऊन परत फिरलो. पाहतो तर काय, अचानक शून्यातून वर्दळ तयार झाली होती. आम्ही घड्याळाकडे नजर टाकली. पावणेबारा वाजले होते. साडेअकराला जिथे पशूपाखरेही नव्हते तिथे आता टेंपररी मनुष्यवस्ती गजबजून आली होती. पण ती सारी वस्ती दक्षिण भारतीय होती. कदाचित तामीळपट्टीतील असावी. त्यांचा विशिष्ट पट्टीतील आवाज ऐकून आम्ही हा अंदाज बांधला होता.
थोडक्यात या चर्चमध्ये येणारी पब्लिक आपली बालपणीच्या आठवणीतील, साहेबांच्या देशातील, ओरिजिनल ख्रिश्चन कम्युनिटी नाहीये हे एव्हाना आम्ही समजून चुकलो होतो. बहुतेक बाराच्या मुहुर्तावर त्यांचा नाताळच्या निमित्ताने काहीतरी कार्यक्रम असावा. कदाचित एखादी प्रार्थना, एखादी प्रेयर, एखादी आरती. त्यानंतर तो कोर्या चहाचा तीर्थप्रसाद, जो आम्ही आधीच नाकारला होता. आणि मग एकमेकांना मेरी क्रिसमस तेरी क्रिसमस करत सव्वाबारापर्यंत सारे आपापल्या घरी जाणार. आमची गैरसमजातून फार मोठी फसगत झाली होती. छान छान मुली आता फक्त स्वप्नातच दिसणार होत्या. आणि त्या तरी वेळेवर दिसाव्यात म्हणून आम्ही घरी झोपायला जायचा निर्णय घेतला.
पण .............
हा "पण" अश्यावेळी वाट लावायला येतोच. ईतके लांब आलो असल्याने परत जाण्यास असे सहज पाय उचलत नव्हते. तरीही त्या जड पावलांनी परत जात असताना गेटवर काही लोकं टेंपोतून केकचे खोके आणि बिर्याणीचे टोप उतरवून चर्चमध्ये नेताना दिसले. ते पाहताच आम्ही पुन्हा चप्पल काढून चर्चमध्ये रिटर्न परतलो...
सारी गर्दी गच्चीवर जमली होती. बाराला दोनच मिनिटे असताना फादर अवतरले. त्यांनी टिपिकल पांढराशुभ्र फादर स्टाईल युनिफॉर्म परीधान केला होता. पण पायात मात्र तीस रुपयांची रबरी चप्पल होती. कोणी कितीही ‘सिंपल लिविंग हाई थिंकींग’ म्हटले तरी आमच्या डोळ्यात ती खुपलीच. फादर म्हटले की जी सुपर्रस्टार प्रतिमा आजवर मनात यायची ती एका क्षणात खळ्ळ खट्याक झाली.
बाराच्या ठोक्याला फादरनी भाषण सुरू केले. जवळपास अर्धा तास चालू होते. ईंग्लिशची बोंब असल्याने आणि माईकची व्यवस्स्था नसल्याने काही काही समजले नाही. उगाच कायच्या काय समजण्यापेक्षा काहीच न समजलेले केव्हाही चांगले. साडेबाराला टाळ्या वाजल्या तेव्हाच समजले की भाषण संपले. मग फादर एकेकाकडे जाऊन हस्तालोंदन करू लागले. दुसरीकडे केकवाटपाचा कार्यक्रम चालू झाला. केक जवळ आला तसे समजले की केकचे नेहमीसारखे तुकडे केले नसून त्याचा अक्षरश: चुरा केला होता. ते पाहून आमचे केक हादडायचे प्लानही चूर चूर झाले. आणखी जवळ येताच समजले की त्या चुर्यात थोडेफार नूडल्स शेव वगैरे मिसळले होते. ते पाहून उरल्यासुरल्या आशाही धुळीत मिसळल्या. केकची ताटली आमच्यापर्यंत पोहोचायला आणि फादरनी आमच्याशी हस्तालोंदन करायला एकच गाठ पडली. फादरनी प्रसादाची एक मोठी मूठ भरली. आणि ती आम्हा चौघांमध्ये समसमाव वाटून रिकामी केली. त्यात केक कमी आणि शेवफरसाणच जास्त आली. बहुधा केक फादरच्या हातालाच चिकटून राहिला असावा. पण हे लक्षात येईपर्यंत फार उशीर झाला होता. फादर आम्हाला आशीर्वाद देऊन पुढे निघून गेले होते.
जे होते ते चांगल्यासाठीच होते. केकने पोट भरण्यापेक्षा बिर्याणीने पोट भरणे केव्हाही चांगलेच. पण चाणाक्ष वाचकांच्या लक्षात आले असेलच की ती देखील आमच्या नशीबात नव्हती.
एक एक करत सारे पाहुणे निघून गेले. सुरुवातीला आम्हाला बरे वाटत होते, चला तेवढेच आपल्या वाट्याला बिर्याणी जास्त येईल. केकसारखा हाडामासाचा चुरा खावा लागणार नाही. पण जसे जास्तीत जास्त लोकं बाहेर पडू लागले तसे मन चलबिचल होऊ लागले. शेवटी आमचा अंदाज खराच ठरला. आम्ही तब्बल दिड वाजेपर्यंत तिथेच थांबून होतो. शेवटी फादर देखील आम्हाला गूडनाईट न म्हणताच पसार झाले तेव्हा आम्ही समजून चुकलो. ती बिर्याणी कुठे नाहीशी झाली पत्ताच लागला नाही. चमचमीत जेवणाची पार्टी तर केवळ आमचाच कल्पनाविलास होता. पण त्या पार्टीच्या नादात दुपारी घरी थोडे कमीच जेवलो होतो, आणि ट्रेनच्या प्रवासात थोडासा सुका खाऊ काय तो खाल्ला होता. गेले चार तास चर्चच्या परीसरात पोटात भूक साठवून उभे होतो. पोटासोबत पायांनाही तड लागली होती. त्यानंतर मिळाला होता तो चौघात एक मूठ केक फरसाणचा चुरा.
कोरी चहा नाकारल्याचा पश्चाताप व्हावा ईतकी दयनीय अवस्था झाली होती. हॅलोजनचे गरम पिवळे बल्ब बंद झाले तेव्हा वातावरणातील थंडीही अचानक जाणवून आली. सोबत मच्छर चावायला होतेच. आता त्यांच्या पार्टीचे सामान बनत तिथे थांबण्यात अर्थ नव्हता. आता परतीचा रस्ता धरण्यावाचून पर्याय नव्हता. पण आता उशीर झाला होता. रिक्षा मिळणे असंभव होते. शेवटची ट्रेन केव्हा होती याची कल्पना नव्हती. पायीपायीच वेगावेगात आम्ही वसई स्टेशनचा रस्ता धरला.
वसई स्टेशनवर मच्छर मारत मारत सकाळच्या पहिल्या ट्रेनची वाट पाहताना आम्ही तीन गोष्टी ठरवल्या. एक म्हणजे यापुढे पुन्हा कधी धवल गिरीकंदच्या भरवश्यावर कुठे जायचे नाही. दुसरे म्हणजे आयुष्यात पुन्हा कधी वसईला पाय ठेवायचा नाही. आणि तिसरे पण सर्वात महत्वाचे म्हणजे म्हणजे आयुष्यात एकदातरी एखाद्यातरी ख्रिश्चन मित्राला महाप्रसादाचे आमंत्रण द्यायचे आणि हातात फक्त प्रसादाचे केळं ठेवून त्याची बोळवण करायची.
प्रत्यक्षात तसे केलेही... पण तो किस्सा पुन्हा कधीतरी, तूर्तास ईथेच थांबतो 
धन्यवाद,
ऋन्मेष
कल्पना कधीच सत्याच्या पुढे
कल्पना कधीच सत्याच्या पुढे जाऊ शकत नाही. >> असच काही नाही, आमच्या शाळेत कल्पना कंवर नावाची मुलगी होती नि तीचा बसायचा बेंच सत्या च्या पुढे असायचा नेहमी. (सत्या हे रबाडा सारखे काल्पनिक नाव नाहि तर सत्यनारायणन मनिकंदन चा short form आहे.) हा प्रघात (प्रतिघात - हे ऋ साठी) चैत्रापासून फाल्गूनपर्यंत (जानेवारी पासून डिसेंबर पर्यंत - हे परत ऋ साठी) नि वसंतापासून ग्रीष्मापर्यंत (समर पासून स्प्रिंगपर्यंत - - हे परत ऋ साठी ) उंचीप्रमाणे मुलांना बसवले गेल्यामूळे सुरू झाला होता.
आमच्या शाळेत कल्पना कंवर
आमच्या शाळेत कल्पना कंवर नावाची मुलगी होती नि तीचा बसायचा बेंच सत्या च्या पुढे असायचा नेहमी.
उंचीप्रमाणे मुलांना बसवले गेल्यामूळे
>>>>>>
यूह सेड ईट असामी !
सत्याची उंची कल्पनेपेक्षा जास्त होती
घाईघाईत निष्कर्ष काढू नकोस
घाईघाईत निष्कर्ष काढू नकोस मुला. मुलांमधे सत्या उंच होता म्हणून मुलांमधे तो पाठी बसत होता. कल्पना सत्यापेक्षा उंच होती पण मुली मुलांच्या पुढे बसत असल्यामूळे ती सत्याच्या पुढे येत असे. तेंव्हा "कल्पना कधीच सत्याच्या पुढे जाऊ शकत नाही." वगैरे कल्पना इतरांच्या सत्याने शाबीत करायचे टाळ बरं.
असामी, सुटलायस!!
असामी,

ण मुली मुलांच्या पुढे बसत
ण मुली मुलांच्या पुढे बसत असल्यामूळे
>>>>
अरे यू शुअर?
ऊंचीप्रमाणे बसवताना ऊंच मुली बुटक्या मुलांच्या पुढे??
मुलींची वेगळी रांग समजू शकतो पण एकाच रांगेत जर तुमच्यापुढे उंच मुली असतील तर मागच्या पोराने काय तिच्या वेण्या बघायच्या का?
मूळात ऊंचीप्रमाणे बसवायच्या मागे जे लॉजिक असते तेच यात पाळले जात नसेल तर ऊंचीप्रमाणे बसवायची ही ढोंग कश्याला?
बरं असे खरेच होत असेल तर तुम्हाला एक मुलगा म्हणून त्याविरुद्ध आवाज उठवावासा वाटला नाही का?
शी यार मी हवा होतो आपल्या शाळेत सारी शाळा डोक्यावर घेतली असती. अश्या बंडखोरीचे मला चिक्कार शालेय अनुभव आहेत. त्याचा तर वेगळा धागाच बनेल. धन्यवाद असामी
लेख आणि प्रतिसाद दोन्ही
लेख आणि प्रतिसाद दोन्ही मनोरंजक.
>>अरे यू शुअर?
>>अरे यू शुअर?
दोन शक्यता असू शकतात.
१) असामी खरं बोलताहेत, म्हणजे कल्पना खरंच सत्याच्या पुढे होती
२) असामी यांनी जे लिहिलंय ते काल्पनिक आहे आणि खरं असूच शकत नाही. तरीही असामी यांची कल्पना सत्याच्या पुढेच गेली.
मी तर म्हणेन कल्पना नेहमीच सत्याच्या पुढे राहणार. ज्यावेळी कोणी १०० पैकी १०० मार्क मिळवेल त्यावेळी मी कल्पना करेन की कोणालातरी १०० पैकी १०१ मार्क मिळावेत, जेव्हा कोणी १०० पैकी १०१ मिळवेल तेव्हा मी +१ मार्कांची कल्पना करेन आणि कल्पनेला नेहमीच सत्याच्या पुढे ठेवीन
बरं असे खरेच होत असेल तर
बरं असे खरेच होत असेल तर तुम्हाला एक मुलगा म्हणून त्याविरुद्ध आवाज उठवावासा वाटला नाही का? >> नाहि रे. आम्ही तेंव्हा इंग्लिश भाषा, मराठी शब्दांचे अर्थ, हिंदू कॅलेंडरचे महिने ( तुझ्या माहितीसाठी चैत्र ते फाल्गून), भारतामधली ऋतूंची नावे ( तुझ्या माहितीसाठी वसंत ते ग्रीष्म) वगैरे ङोश्टी शिकण्यामधे व्यग्र होतो.
अरे यू शुअर? >> तुझ्या ग.फ्रे नि मुंबईमधल्या तीन घरांएव्हढा शुअर आहे मी ह्याबाबत
व्यत्यय,
व्यत्यय,
२) असामी यांनी जे लिहिलंय ते काल्पनिक आहे आणि खरं असूच शकत नाही.
>>>>
असामी किस्सा रचतील असे वाटत नाही. तो आरोप नेहमी माझ्यावर होत आला आहे. तो माझा हक्क आहे.
ज्यावेळी कोणी १०० पैकी १०० मार्क मिळवेल त्यावेळी मी कल्पना करेन की कोणालातरी १०० पैकी १०१ मार्क मिळावेत, जेव्हा कोणी १०० पैकी १०१ मिळवेल तेव्हा मी +१ मार्कांची कल्पना करेन आणि कल्पनेला नेहमीच सत्याच्या पुढे ठेवीन.
>>>
म्हणजे सत्य नेहमी तुमच्या कल्पनेला गाठून त्याच्या पुढे जाईल हे तुम्ही मान्य करता.
पण तुमची कल्पना नेहमीच सत्याला गाठेल याची शाश्वती नसते. कारण सत्य कल्पनेपलीकडले असू शकते. नव्हे असते. या विश्वात तुमच्या कल्पनेपलीकडली कित्येक सत्ये दडली आहेत. तुम्ही ज्याची कल्पना करू शकला तीच सत्ये शोधण्यात यशस्वी ठरला आहात. जिथे तुमची कल्पना अजून पोहोचलीच नाही ती सत्ये अजूनही तुमच्यासाठी अज्ञातच आहेत
काय शब्दांचे खेळ करत बसलेत
काय शब्दांचे खेळ करत बसलेत
काही नाही जरा प्रतिसाद
काही नाही जरा प्रतिसाद वाढवायच्या चक्करमध्ये...... येनीवेज ओके, पुढचा अंतिम भाग लिहायला घेतो.. तर कुठे होतो आपण.. हं.. चहाचा वास एका नाकपुडीतून आत शिरला आणि...................... उद्या लिहितो, आज जरा लवकर झोप येतेय
ओके गुड नाईट ऋ.
ओके गुड नाईट ऋ.
चांगली झोप झाली की थोडे बरे सुचेल लिहायला. आम्हाला पण पचेल असे.
धवल नेमका कोण आहे? की
धवल नेमका कोण आहे? की त्याचीही आयडेन्टीटी प्रत्येक पॅरेग्राफ ला लपवाची आहे?
लिहील छान आहे पण पट्कण खर्या वाटणार नाहीत अश्या थापा टाळल्या असत्या तर बर झाल असत...
धवल हा मी माझ्या आयुष्यात
धवल हा मी माझ्या आयुष्यात पाहिलेल्या महान झोलर लोकांपैकी एक होता. त्याचे नाव मी काय बदलणार. त्यानेच कित्येकदा बदलले आहे. त्याचा डिप्लोमा सुद्धा झाला नाहीये पण आज तो एका मोठ्या कन्स्ट्रंक्शन कंपनीत चीफ साईट ईंजिनिअर म्हणून कामाला आहे. डिप्लोमाचे खोटे मार्कशीट बनवून तो कुठे कुठे छोट्या मोठ्या साईटवर कामाला लागला आणि अनुभव मिळवत पुढे गेला. आता जिथे कामाला आहे तिथे त्याच्या मालकाला माहीत आहे की डिग्री तर दूर त्याने डिप्लोमाही अर्धवट सोडला आहे. पण तरी त्या मालकाला काही फरक पडत नाही कारण याचा प्रत्यक्ष कामाचा अनुभव, आणि त्यातून मिळवलेले ज्ञान, तसेच झोलझपाटे दुनियादारी करायची अंगची कला.. आपल्या पुस्तकी शिक्षणव्यवस्थेच्या थोबाडीत मारली आहे त्याने असे म्ह्टल्यास वावगे नाही.
बाकी त्याचे मूळ नाव धवल असून पुढे मकरंद, गिरीकंद, मुकुंद काहीतरी तो स्वत:च लावत असतो. ते का लावतो माहीत नाही.. झोलर मुलगा आहे, काहीतरी कारण नक्कीच असणार जे आपण सामान्य नाकासमोर जगणारे ओळखू शकत नाही
पण पट्कण खर्या वाटणार नाहीत
पण पट्कण खर्या वाटणार नाहीत अश्या ..........
>>>
मला यावर खरे तर एक धागा काढायचा आहे. तेव्हा या विषयावर त्या धाग्यावरच बोलूया
असामी प्रतिसाद मस्तच!
असामी प्रतिसाद मस्तच!
भावांनो आणि मैत्रीणींनो,
भावांनो आणि मैत्रीणींनो, विकेंडचे वचन पुर्ण केले..
एंजेलिका, धन्यवाद
ते लोकं प्रसादाला नम्रपणे
ते लोकं प्रसादाला नम्रपणे नकार देतात.
"तिसरे पण सर्वात महत्वाचे
"तिसरे पण सर्वात महत्वाचे म्हणजे म्हणजे आयुष्यात एकदातरी एखाद्यातरी ख्रिश्चन मित्राला महाप्रसादाचे आमंत्रण द्यायचे आणि हातात फक्त प्रसादाचे केळं ठेवून त्याची बोळवण करायची. प्रत्यक्षात तसे केलेही... पण तो किस्सा पुन्हा कधीतरी" ........
ऋन्मेऽऽष हे वाचायला लय मजा येईल...
लवकर लेख टाक
-प्रसन्न
छान कथा
छान कथा
छान अनुभवकथन
छान अनुभवकथन
आदू धन्यवाद,
प्रसन्न, म्हणजे अगदीच तसे केले नव्हते.
पहिले म्हणजे हा किस्सा जेव्हा घडला तेव्हा रात्री सव्वादिड वाजता आम्ही आमच्या कॉलेजमधील आमच्या ग्रूपमधील दाक्षिणात्य ख्रिश्चन मित्राला फोन लावला. तो नुकताच त्याच्या आईवडिलांसोबत असाच चर्चमधून परतला होता. त्याला वाटलेले की आम्ही त्याच्या चार हिंदू मित्रांनी त्याला मेरी क्रिसमस करायला फोन केला असेल, पण प्रत्यक्षात आम्ही त्याच्या कानातून रक्त येईल अश्या आणि ईतक्या शिव्या हासडल्या. मैत्रीत चालतात. आणि त्या बिचार्याला त्या ऐकूनही घ्याव्या लागल्या, त्या देखील निमूटपणे कारण त्याचे मॉम डॅड बाजूलाच उभे होते. आणि त्यांच्यामते हा शुभेच्छांचा फोन होता.
एवढेच नव्हे तर दुसर्या तिसर्या चौथ्या दिवशी अगदी आजवर त्याला अधूनमधून हा किस्सा सुनावून छळतोच.
वर जे म्हटलेय ते त्याला एकदा आमच्या बिल्डींगच्या महाप्रसादाला नेलेले. जो माघी गणेशजन्माला असतो. तेव्हाही त्याला सर्वांनी जाम पिडलेले. हातात शब्दश: केळं नाही दिले. पण जे खाल्ले ते त्याला सुखासुखी पचू दिले नाही.
मराठीही बर्यापैकी कळते त्याला. या लेखाची लिंक पाठवायला हवी.
ते लोकं प्रसादाला नम्रपणे
ते लोकं प्रसादाला नम्रपणे नकार देतात.
>>>>>
हे समजले नाही.
नम्रपणे देतात ठिक आहे. पण नकार का देतात? त्यांच्यात दुसर्या धर्माचा प्रसाद चालत नाही का?
म्हणजे माझे जे थोडेथोडके ख्रिस्ती मित्र होते त्यात असा अनुभव कधीच नाही.
हस्तालोंदन
हस्तालोंदन
माझ्या ऑफिसमधला किस्सा..
माझ्या ऑफिसमधला किस्सा..
माझ्या ऑफिसात एक उत्तरभारतीय मनोज नावाचा कलिग आहे...खुपच पापभिरू.. देवधर्माच खुप करतो तो ..त्याच्या नेहमीच्या डेस्कवर त्याने शंकराचा फोटो खोचला आहे....तर एकदा आमच्याच ऑफिसमधला जॅसेन (हे कार्टपण वसईलाच राहतं) कधीच प्रसाद घेत नाही कि कंपनीत बसवल्या जाणार्या गणपतीत आरतीलाही येत नाही ..तर एकदा त्याचा पीसीचा किबोर्ड खराब झाल्यामुळे त्याला त्या मनोजच्या पीसीवर बसायला सांगितल कारण मनोज सुट्टीवर गेल्यामुळे तोच एक पीसी रिकामा होता...
तर हा तिथे बसायला टाळाटाळ करत होता...
तर मी विचारल काय झालं? तर त्याने फोटोकडे बोट दाखवलं..
मी समजुन गेलो..मी पटकन फोटो काढून घेतला आणि बोललो अब तुम बैठ सकते हो...हमारा भगवान बुरा नही मानता ...तेव्हा त्याचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता..
तिथे असा अनुभव आला म्हणून आपण
तिथे असा अनुभव आला म्हणून आपण असं वागायचं का ऋ. खरं आहे का हे का कल्पनाविलास. मी तर ऐकलंय की वसईतले फादर मराठीत संवाद साधतात.
मी मिक्सड बघितलं ख्रिश्चन कल्चर, नालासोपारा इथे राहिले पण सोसायटीतले ख्रिश्चन मंगलोर, तमिळ असे होते. ते घ्यायचे प्रसाद, हळदीकुंकू एन्जॉय करायचे. डोंबिवलीत आईच्या बिल्डिंगमध्ये केरळी ख्रिश्चन होते ते सहभागी व्ह्यायचे सर्वात पण प्रसादाला नम्रपणे नकार द्यायचे, बाकी सर्व खायचे.
इथे डोंबिवलीत आमच्या सोसायटीत मंगलोर, केरळ ख्रिश्चन आहेत, ते होतात सहभागी सर्व कार्यक्रमात, प्रसाद खातात. त्यांची मुलं आपल्या सर्व सणात सहभागी होतात, मदत करतात. एन्जॉय करतात.
अजय चव्हाण भारी अनुभव आहे.
अजय चव्हाण भारी अनुभव आहे. लोकांच्या काय एकेक धार्मिक कल्पना असतात. आपलं बरंय, मी नास्तिक आहे पण मंदीर, मस्जिद, चर्चची पार्टी, लंगर ए गुरुद्वारा, बुद्धविहार, शिर्डी के साईबाबा, साईभंडारा, दत्तजयंती, सत्यनारायणाची महापूजा सारे काही फिरून झालेय, आणि मिळेल तिथे हादडून झालेय.
अंजू, अहो आपण असे का वागायचे का म्हणजे आम्ही फर दूष्ट वा सुडबुद्धीने वागलो असे नाही, मित्रांमध्ये अशी खेचाखेची चालतेच. आणि आमच्याशी देखील चर्चच्या समारंभात कोणी वाईट वागले नव्हते, तर आम्हीच जास्त कल्पनाविलास केलेले त्याचा पोपट झाला होता ईतकेच
Pages