मी व वैद्यकीय पेशा - डॉ. हिंमतराव बावस्कर

Posted
6 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
6 वर्ष ago

मराठवाडयातील एका पाचशे वस्तीच्या खेडयामध्ये माझा जन्म झाला. १९७० सालापर्यंत माझ्या गावात दळणवळण, वीज आणि शिक्षण यांची काहीही सुविधा नव्हती. आजारी पडल्यास दवाखाना पंधरा कोसांवर होता. तिथे खूप गर्दी असायची, कारण त्या काळात खाजगी दवाखाने नव्हते आणि पैसे देऊन डॉक्टरकडून उपचार करून घेता येतात, ही कल्पनाही रूढ नव्हती. या ग्रामीण भागात प्रसूति सुइणी करत असत. क्षयरोग, मलेरिया व इतर आजार यांमुळे रुग्ण महिनोन्‌महिने आजारी असत. त्यामुळे ते अतिशय अशक्त, कुपोषित असत. अनेकांचा नुसता हाडाचा सांगाडा होत असे. अशा रुग्णास ’मानगी’ झाली असं समजत आणि त्याला गावाबाहेर कडुलिंबाच्या झाडाखाली झोपडीत ठेवत. त्याच्या सुदैवानं तो जगला तर जगला. एक्स-रे काढण्यास लोक घाबरत, कारण हमखास क्षयरोगाचं निदान होईल ही भीती. क्षयरोग, कुष्ठरोग हे पूर्वजन्माचं पाप म्हणून या जन्मी देवानं दिलेली शिक्षा, असा समज होता. गावंच्या गावं देवी, मानमोडी, प्लेग या रोगांमुळे उद्ध्वस्त होणं हे त्या काळी फार नवलाचं नव्हतं. एवढे मोठेमोठे आजार या देशात पसरूनही एकाही बुद्धिवान शास्त्रज्ञानं या संधीचा फायदा घेऊन त्यावर संशोधन केलं नाही, ही आपल्या देशाची शोकांतिका आहे. अलेक्झांडर फ्लेमिंगनं पेनिसिलीन शोधलं. रॉबर्ट कॉकनं क्षयरोगावर संशोधन केलं आणि रोनॉल्ड रॉसनं मलेरियावर संशोधन करून नोबेल पुरस्कार मिळवला. गरज ही संशोधनाची जननी आहे, हे त्यांच्या रक्तातच होतं आणि ही संधी आपल्या वैद्यकीय शास्त्रज्ञांनी दवडली, हे भारताचं दुर्देव.

इंटर-सायन्सला मला ७४ टक्के मार्क मिळाले आणि १९७० साली मी नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेतला. तोपर्यंत मला सरकारी दवाखान्याशिवाय दुसरा दवाखाना माहीत नव्हता. नागपूरलाही त्याकाळात खूपच कमी लोक खाजगी दवाखान्यात जात. एम.बी.बी.एस.ला शिकत असताना एकदाही चुकूनसुद्धा आमच्या प्राध्यापकांच्या तोंडी खाजगी प्रॅक्टिसचा उल्लेख आला नाही. रुग्ण हा आपलं दैवत आहे, रुग्णसेवा हीच इश्‍वरसेवा, रुग्ण तपासल्यामुळे आपलं ज्ञान वाढतं आणि त्याचं दु:ख निवारण्यासाठी इश्‍वरानं उपलब्ध करून दिलेली एक संधी समजावी, असंच ते आम्हांला सांगायचे. जनमानसातही वैद्याबद्दल खूप सन्मान असायचा. साठ जन्माच्या फेर्‍या मारल्यानंतर एका जन्मी देव डॉक्टर होण्याची संधी देतो, असा पूर्वजांचा समज रूढ होता. मला डॉक्टर होण्याची संधी मिळाल्यामुळे मी खरोखर भाग्यवान आहे आणि या संधीचं सोनं करायचं, हा दृढनिश्‍चय कॉलेजात शिकत असतानाच मी केला.

शिक्षण हे फक्त सरकारी नोकरी मिळण्यासाठी व नोकरीमध्येही पगारावरच फक्त आपला अधिकार, हे माझ्या आईवडिलांनी मी शिक्षण घेत असतानाच बजावलं होतं. शिवाय खाजगी प्रॅक्टिस आणि पगार यांशिवाय इतरही मार्गांनी डॉक्टर पैसा कमावू शकतो, याची मला तेव्हा कल्पनाही नव्हती. एम.बी.बी.एस.ची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर वैद्यकीय अधिकारी म्हणून बिरवाडीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात मी हजर झालो. आईनं मला बजावलं होतं, सरकारी दवाखान्यात गरीब, खेडयांतले शेतकरी येतात, त्यांना सेवा देणं हे तुझं आद्य कर्तव्य आहे, त्यामुळे नियमानुसार आणि इमानदारीनं सरकारी नोकरी करायची. या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये वैद्यकीय अधिकार्‍यांना खाजगी प्रॅक्टिस करण्यास परवानगी नव्हती. खाजगी प्रॅक्टिस न करण्यासाठी सरकार या डॉक्टरांना जास्त पैसे देत असे. तरीही या प्राथमिक आरोग्य केंद्रातले माझे वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी सरकारी क्वार्टरमध्ये राहून तिथेच सकाळ-संध्याकाळ खाजगी रुग्णांना बोलावत आणि त्यांच्याकडून पैसे घेत असत. दवाखान्यातही इंजेक्शनचे, प्रसूतिचे व गर्भपाताचे पैसे ते रुग्णांकडून वसूल करत. मी अशी प्रॅक्टिस करणार नाही आणि त्याला सरकारी परवानगी नाही, असं मी त्यांना सांगितलं, तर हे महाशय म्हणाले, ’अरे, सगळं चालतं, तुझ्या शिक्षणाला किती खर्च आला! तो तू वसूल कसा करणार? वेडा का खुळा तू?’ यावर मी त्यांना म्हटलं की, ’आपलं सर्व शिक्षण झालं, तेव्हा खाजगी वैद्यकीय महाविद्यालयाचा जन्मही झाला नव्हता. सरकारनं आपल्यावर डॉक्टर होण्यासाठी जनतेचे लाखो रुपये खर्च केले आहेत आणि इमानदारीनं नोकरी करून त्याची परतफेड करणं, हे आपलं आद्यकर्तव्य ठरतं.’ ’वा रे वा तुकाराम महाराज!’ असं म्हणून त्यांनी विषय बदलला. शेवटी मी माझ्या खोलीबाहेर 'येथे खाजगी रुग्ण तपासले जाणार नाहीत’ अशी पाटी लावली आणि रात्रंदिवस दवाखान्यात सेवा देऊ लागलो. महाड आणि पोलादपूर या दोन्ही तालुक्यांत येणार्‍या साथीच्या आजारांवर उपचारांसाठी प्रत्येक खेड्याला आणि वाडीला मी भेट दिली.

मी रुग्णसेवा करत असताना महाडमधले खाजगी डॉक्टरही मला वेडयात काढत. त्या काळातही महाडमध्ये खाजगी डॉक्टर सरकारी व इतर ग्रामीण भागातील डॉक्टरांना बोलावून त्यांना जेवण देत, जेणेकरून त्यांनी रुग्ण खाजगी डॉक्टरांकडे पाठवावे. त्या काळी बिरवाडीमध्ये रोज एक-दोन रुग्ण विंचूदंशानं दगावत असत. ’सागर’ या स्थानिक वर्तमानपत्रात विंचूदंशामुळे झालेल्या मृत्यूंची बातमी रोज असे. विंचूदंश झालेला रुग्ण चोवीस तासांत नक्की मरण पावणार, हा समज लोकांमध्ये रूढ झाला होता. अशावेळी सर्व नातेवाइकांना बोलावून रुग्ण जिवंत असतानाच त्याची प्रेतयात्रा काढण्याची तयार केली जायची. या घटनांमुळे मी खूप अस्वस्थ होई. विंचूदंश आणि त्यामुळे होणारे मृत्यू यांबद्दल महाराष्ट्रात मी वैद्यकीयक्षेत्राशी संबंधित अनेकांकडे विचारणा केली, पण सापाच्या दंशासाठी जशी प्रतिलस आहे, तशी प्रतिलस विंचवाच्या दंशासाठी उपलब्ध नाही, आणि जोपर्यंत अशी प्रतिलस उपलब्ध होत नाही, तोपर्यत हे मृत्यू टाळता येणार नाहीत, असं मला सगळीकडून सांगण्यात येत होतं. म्हणून मग मी स्वत: रात्रंदिवस रूग्णाच्या शेजारी बसून विंचवाच्या विषाचा हृदयावर व इतर शरीरव्यवस्थेवर होणार्‍या परिणामांची लक्षणं नोंदवून ठेवू लागलो. हे रुग्ण हृदयक्रिया बंद पडल्यावर केल्या जाणार्‍या रूढ उपाययोजनांस दाद देत नाहीत आणि हृदय बंद पडल्यानं रुग्ण दगावतो, हे माझ्या निरीक्षणांतून सिद्ध झालं. माझं हे संशोधन १९७८ साली ’लॅन्सेट’ या जगप्रसिद्ध शोधपत्रिकेत प्रसिद्ध झालं.

अन्न, वस्त्र व निवारा या मूलभूत गरजांबरोबरच विंचूदंशावर खात्रिशीर इलाज या भागासाठी गरजेचा होता. गरज ही संशोधनाची जननी आहे, या ब्रीदानं माझ्या मनात घर केलं होतं. त्यामुळे विंचूदंशावर आपण इलाज शोधायचा, ही जिद्द माझ्या मनात होती. या संशोधनास माझं एम.बी.बी.एस.चं ज्ञान कमी पडत होतं, म्हणून मी स्वत:हून बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे, इथे एम.डी. करण्यासाठी अ‍ॅडमिशन घेतली. तिथे विंचूदंश, त्यामुळे होणारे मृत्यू आणि त्यावर उपचार हा संशोधनाचा प्रश्‍न घेऊनच मी अभ्यास करत असे. दरम्यान मी अभ्यासलेल्या विंचूदंशाच्या केसेसवर प्रबंध लिहीत असतानाच बी.जे.मधले नावाजलेले मेडिसिनचे प्राध्यापक त्यांचं स्वत:चं नाव माझ्या प्रबंधास द्यावं, यासाठी माझ्याशी भांडले, पण मी त्याला दाद दिली नाही. वैद्यकीय पेशात बोकाळलेल्या कमिशन आणि कट प्रॅक्टिस या राक्षसांपेक्षाही आपण न केलेल्या संशोधनात आपलं नाव सामील करून स्वत:ची वाहवा करून घेणं, हा एक महाभयंकर रोग त्याकाळात वैद्यकीय पेशात रूढ झाला होता. त्यानंतर वैद्यकीय नियतकालिकात प्रत्येक लेखकानं त्या संशोधनात नक्की काय काम केलं आहे, हे लेखी स्वरूपात देणं संपादकांनी अनिवार्य केलं.

१९८२ साली एम. डी. झाल्यावर ग्रामीण रूग्णालय, पोलादपूर, इथे मी रूजू झालो. तिथे परत रात्रंदिवस विंचूदंशावर संशोधन करून प्राझोसीन हा रामबाण इलाज मी शोधला आणि विंचूदंशामुळे होणार्‍या मृत्यूचं प्रमाण ४ टक्क्यांवर घसरलं. याशिवाय ठाणे, रायगड व रत्नागिरी या जिल्ह्यांतल्या ग्रामीण भागांत दर शनिवारी व रविवारी स्वखर्चानं जाऊन तिथल्या डॉक्टरांना विंचूदंशाच्या रुग्णावर कसा इलाज करायचा याबद्दल मी माहिती दिली. हे करत असतानाच निरनिराळया वैद्यकीय नियतकालिकांत शोधनिबंध प्रसिद्ध केले. जगभरात या संशोधनाची वाहवा झाली. लंडनहून बोलावणं आलं. भारतातल्या अनेक भागांतून रात्रीअपरात्री फोन करून डॉक्टरमंडळी मार्गदर्शन घेऊ लागली. त्यांचाही रुग्ण जगला हे ऐकल्यावर मला धन्य वाटायचं. हीच उपाययोजना ब्राझील, इस्रायल, सौदी अरेबिया या देशांतही अवलंबली गेली आणि या देशांतूनही प्राझोसिनबद्दल शोधनिबंध प्रसिद्ध झाले. हे घडत असताना भारतातल्या ग्रामीण भागात सरकारी यंत्रणा संशोधनाच्या बाबतीत कमकुवत होत होती. इमानदारीनं नोकरी करत असल्यामुळे मला वरिष्ठांचा रोष पत्करावा लागला आणि पुढील संशोधनात अडथळे येऊ लागले. शेवटी नाइलाजानं नोकरीचा राजीनामा देऊन याच भागात मी खाजगी व्यवसाय करून संशोधन करण्याचं ठरवलं. त्यानुसार अगदी मूलभूत साहित्य घेऊन मी व्यवसाय सुरू केला. व्यवसाय सुरू करताना उदघाटन नाही की जेवण आणि पार्टी नाही. कोणाच्याही भेटीगाठी न घेता सर्वपित्री अमावास्येला मी व्यवसाय सुरू केला. कित्येक डॉक्टर पार्टी मागायचे, दारूचा आग्रह धरायचे. परंतु स्पष्ट शब्दांत नकार देऊन मी माझा व्यवसाय सरळ मार्गानं आजतागायत सुरू ठेवला आहे.

मी कोणतीही लबाडी न करता माझ्या सदसद्‌विवेकबुद्धीला स्मरून व्यवसाय करत असलो, तरी वैद्यकीय व्यवसायातल्या वाममार्गांची कल्पना मला फार लवकर आली. १९८४ साली महाडमध्ये एका खाजगी वैद्यकीय व्यवसायिकानं एक इसीजी मशीन विकत घेतलं. माझ्याकडून तो रुग्णांचे इसीजी रिपोर्ट वाचून घेत असे. मी स्वखुशीनं हे काम करत असताना एके दिवशी त्यांनी वीस रूपये पाकिटात घालून पाठवले. ते मी नाकारले, आणि ’आपण कितीही इसीजी रिपोर्ट पाठवा, मी विनामूल्य वाचून देईन’, असं त्यांना कळवलं. रुग्ण तपासल्याशिवाय मोबदला नाही, हे माझं तत्त्व होतं. ते मी आजही पाळतो. पण त्यामुळे झालं काय की, मी डॉक्टरांना पार्टी देत नाही, दारू पाजत नाही, त्यांची खुशामत करत नाही, म्हणून ही मंडळी गावात मी असतानाही रुग्णांना मुंबई-पुण्याला किंवा इतर जिल्ह्याच्या ठिकाणी पाठवू लागली. फक्त विंचूदंशाचे रुग्ण, ज्यांच्यावर इतर कोणीही उपचार करत नव्हते, ते माझ्याकडे येऊ लागले. दरम्यान विंचूदंशावर प्रतिलस उपलब्ध झाली होती. प्रतिलस आणि प्राझोसीन यांची कसोटी मी स्वखर्चानं सुरू केली. विंचूदंश झालेल्या पस्तीस रुग्णांना प्राझोसीन व प्रतिलस दिली आणि इतर पस्तीस रुग्णांना फक्त प्राझोसीन दिले. प्रतिलस व प्राझोसीन दिलेले रुग्ण आठ तासांच्या आत बरे झाले, तर फक्त प्राझोसीन दिलेल्या रूग्णांना बरं व्हायला बारा तासांपेक्षा जास्त वेळ लागला. ही निरीक्षणं ’ब्रिटिश मेडिकल जर्नल’मध्ये प्रकाशित झाली. त्यावर याच शोधपत्रिकेत संपादकीयही लिहिलं गेलं. तब्बल दोन शतकांचा इतिहास असलेल्या या शोधपत्रिकेच्या मुखपृष्ठावर विंचवाचं चित्र झळकलं.

विंचूदंश झालेल्या रुग्णांवर कमीत कमी तीन दिवस उपचार चालत. त्यावेळी एक हजार रुपयांचं बिल झालं, तर रुग्णांचे नातेवाईक नाराज होत. डॉक्टरलोकही ’फक्त विंचूदंशाच्या उपचारांसाठी’ एवढं बिल मान्य करत नसत. एका रुग्णाच्या नातेवाइकाकडे पैसे नव्हते. त्यानं उपचारांचा खर्च भागवण्यासाठी ’मंगळसूत्र विकतो’, असं मला सांगितलं. मी त्याला म्हटलं, असं करू नका, पैसे दोनतीन महिन्यांनी दिले तरी चालेल. ते पैसे आजतागायत मला मिळाले नाहीत. अशा घटना वारंवार घडू लागल्यावर मी सरकारी रुग्णालयातल्या डॉक्टरांना प्रशिक्षण दिलं, आणि सांगितलं की, विंचूदंशाच्या रुग्णांना दाखल करून घेत चला, मी इथे त्यांच्या उपचारांसाठी विनामूल्य येत जाईन. गेली पंचवीस वर्षं एका रुपयाचंही मानधन न घेता मी हे रुग्ण तपासतो आहे.

मी खाजगी प्रॅक्टिस सुरू केल्यावर काही बंधनं स्वत:वर घालून घेतली. औषध कंपन्यांकडून आलेले प्रायोजक कटाक्षानं टाळले. कंपनीनं पाठवलेली विमानाची तिकिटं परत केली. ज्या ठिकाणी वैद्यकीय परिषदांनंतर जेवणानंतर कॉकटेल पार्टी आहे, अशा बैठका मी टाळू लागलो. कंपन्यांकडून आलेल्या भेटवस्तू कधीही स्वीकारल्या नाहीत. ’मला का देत आहात या वस्तू?’ या प्रश्नावर त्यांच्याकडे उत्तर नसे. या कंपन्यांकडून शर्टपीस-पॅंटपीस मी का स्वीकारावेत? ’कंपनीच्या लग्नाप्रीत्यर्थ ही भेट आणली का?’ या माझ्या प्रश्नावर उत्तर मिळणार नाही, हे मला ठाऊक असे. या कंपन्या डॉक्टरांसाठी, त्यांच्या कुटुंबियांसाठी परदेशदौरे आयोजित करतात. महागड्या हॉटेलांमध्ये त्यांच्या राहण्याजेवण्याची व्यवस्था करतात. आमच्या भागातले रुग्णच मला सांगतात की, आमचे डॉक्टर परदेशी गेले आहेत आणि मोठ्ठा अभ्यास करून परत येणार आहेत. हे दौरेसुद्धा मोठ्या खुबीनं योजले असतात. एका तासाचं एक भाषण आणि मग इतर दिवस साईटसीईंग. हा सर्व खर्च कंपन्या करतात. निदान या डॉक्टरांनी टॅक्सतरी भरला आहे का, याचा शोध घेणं आवश्यक आहे. एका राष्ट्रीय परिषदेत त्यांच्या स्मरणिकेमध्ये ’ज्या डॉक्टरांना प्रायोजक आवडत नाहीत, अशांनी मला भेटावे’ ही जाहिरात छापण्यासाठी मला बाराशे रुपये भरावे लागले. परिषदेमधून उरलेल्या पैशात परदेशदौरा करावा, असा प्रस्ताव आल्यावर मी वगळता इतर सर्वांनी हा दौरा केला. हा पैसा ग्रामीण भागातल्या एखाद्या सरकारी दवाखान्यात व्हेंटिलेटरसारखं आधुनिक उपकरण विकत घेण्यासाठी खर्च करू, ही माझी मागणी कोणीही मान्य केली नाही. गंमत अशी की, योग्य रुग्णसेवा कशी करावी, हे सांगणारे शहाणे समव्यवसायिक एकही प्रायोजित परदेशदौरा सोडत नाहीत. ते याबाबत माझ्याशी बोलत नाहीत कारण त्यांना माझे विचार माहीत असतात. ते औषधकंपन्यांना माझं नाव सुचवण्याच्या फंदातही पडत नाहीत. ’हा बावस्कर कधीच सुधारणार नाही’, असं उलट तिरस्कारानं बोलतात. हा तिरस्कार मी डॉक्टर झाल्यापासून अनुभवतो आहे.

हल्ली डॉक्टरांनी कमिशन घेणं किंवा कट प्रॅक्टीस मोठ्या प्रमाणात वाढली आहे. शहरामध्ये डॉक्टर, महागडी उपकरणं यांची संख्या खूप वाढली आहे आणि रुग्ण आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी जीवघेणी स्पर्धा सुरू आहे, हे यामागचं मुख्य कारण. खाजगी दवाखान्याचे मालक व स्पेशालिस्ट दर महिन्याच्या एक-दोन तारखेला महिनाभरात कोणकोणत्या डॉक्टरांनी रूग्ण पाठवले याची नोंद बघतात आणि रुग्णाच्या नकळत त्याच्या बिलामध्ये २०-७५% जास्त रक्कम लावून रोख रक्कम पाकिटात भरून रुग्ण पाठवलेल्या डॉक्टरांकडे पोहोचवतात. काही डॉक्टरांचे जनसंपर्क अधिकारी तर निरनिराळया डॉक्टरांना भेटतात व वेगवेगळ्या प्रकारे लालूच दाखवून व नको त्या व्यवहारांचं आमीष दाखवून रुग्ण आपल्याकडे खेचून घेण्याची व्यवस्था करतात. काही ठिकाणी ही कट प्रॅक्टिस चेकद्वारेही चालते. दोन डॉक्टरांमधला हा व्यवहार असल्यामुळे रुग्णाच्या आणि समाजाच्या समोर तो येत नाही. ही बाब अगदी कोणाच्या लक्षात आली, तरी तक्रार करण्याची कोणाची हिंमत नसते, कारण रुग्णाचं आयुष्य डॉक्टरच्या हाती असतं आणि तक्रारीचा पाठपुरावा करण्यास वेळ कोणाकडे आहे? तक्रार केली तरी भिंतीवर डोकं आपटून आपलंच डोकं फुटावं अशी वेळ आल्याची तक्रारकर्त्याची भावना होते. सत्य क्वचितच उघडकीस येतं आणि आपला पैसा खर्च होतो. मनस्ताप पदरी पडतो तो वेगळाच.

एके दिवशी माझ्या नावानं एका पाकिटात बाराशे रुपयांचा चेक आला. एका नामवंत रेडिओलॉजी कंपनीकडून तो आला होता. हा चेक कशासाठी, हे सविस्तर वाचलं असता कळलं की ती ’प्रोफेशनल फी’ होती. सदरहू कंपनीला मी या चेकबद्दल विचारलं, तर उत्तर मिळालं की, एका महिन्यापूर्वी एका रुग्णास छातीचा एमआरआय काढण्यासाठी मी चिट्ठी दिली होती आणि तो कुठे काढायचा, हेही सांगितलं होतं. या रुग्णानं चार हजार रुपये भरून एमआरआय काढला. घरची परिस्थिती चांगली असल्यामुळे व बँकेत नोकरी असल्यामुळे ’पैसे कमी करा’ असं काहीही त्यानं एमआरआय काढताना सांगितलं नाही. मी तो चेक परत पाठविला व ’अशा अनैतिक धंद्यात मला ओढू नका व हा चेक सदरहू रुग्णाच्या नावावर परत करावा’ असं कंपनीला लिहिलं. या सर्व प्रकरणाची तक्रार मी महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलीकडे केली. तिथे वर्षभर तारखांमागून तारखा झाल्या. कंपनीनं ’हे चुकून घडलं, रुग्णानं सवलत मागितली’ अशी खोटी बाजू मांडली. विशेष गोष्ट म्हणजे कंपनीच्या या अनैतिक व्यवहाराच्या बाजूनं एमएमसीविरुद्ध (महाराष्ट्र मेडिकल काऊन्सिल) बाजू मांडण्यात एक तज्ज्ञ डॉक्टर सहभागी झाला होता. नंतर एमएमसीनं सदरहू कंपनीस चार्जशीट दिली. ही कंपनी पुढे हायकोर्टात गेली आणि एमएमसीचे कायदे आपल्यास बांधील नाहीत, अशी उलट फिर्याद दाखल केली. आरोग्याशी निगडित असलेल्या कुठल्याही उद्योगात डॉक्टर असतातच आणि हे डॉक्टर एमएमसीच्या अखत्यारित येतात. त्यामुळे एमएमसीचे नियम त्यांना लागू आहेत, हे नाकारून कसं चालेल? या केसमध्ये स्वत:हून मला पाठिंबा देणार्‍या डॉ. नाडकर्णी, डॉ. वाणी, डॉ. श्याम अष्टेकर, डॉ.नागराल व लंडन येथील डॉ. मंगेश थोरात यांनी खूप सहकार्य केलं. विशेष म्हणजे हायकोर्टात वकील असलेल्या सौ. सांगलीकर यांनी काहीही मोबदला न घेता निरपेक्ष मदत केली. या केसचा निकाल अजून लागलेला नाही. पण माझ्या लढ्याबद्दल कळल्यावर काही भागांतल्या रेडिओलॉजी संघटनांनी ’आम्ही डॉक्टरांना कमिशन देणार नाही आणि रुग्णांकडून योग्य तेवढेच पैसे घेऊ’ हे वर्तमानपत्रांमधून जाहीर केलं. कायद्यानं कमिशन किंवा कट प्रॅक्टिस बंद होणं शक्य नाही. त्यामुळे आपण समाजाचं काही देणं लागतो हे जाणणार्‍या मंडळींची एक मोठी फळी या प्रथेविरुद्ध उभी राहणं आवश्यक आहे.

महाड, माणगाव, पोलादपूर या भागासाठी गेल्या दोन वर्षांपासून सिटि-स्कॅन सेंटर सुरू झालं आहे. या भागातलं ते एकमेव सेंटर आहे. सुरुवातीला या सेंटरला मी एक रुग्ण पाठवला. त्याबद्दल कमिशन म्हणून त्यांनी मला पाचशे रुपये पाठवले. हे पैसे मी ताबडतोब परत केले आणि ’या भागात सिटि-स्कॅनची सेवा उपलब्ध करून दिल्याबद्दल मी आपले आभार मानतो, पण कृपया कट प्रॅक्टिसची प्रथा इथे आणू नका, या भागात तुमचं एकमेव सेंटर असल्यानं तुम्हांला रुग्णांच्या संख्येची काळजी करण्याचं कारण नाही, त्यामुळे तुम्हांला कमिशन देण्याचीही गरज नाही’ असं पत्रात लिहून कळवलं. ’तुमचं म्हणणं ठीक आहे, पण इतर डॉक्टरांचं काय? त्यांना कमिशन हवंच असतं’, असं या सेंटरच्या संचालकांनी मला नंतर सांगितलं. आता मी पाठवलेल्या प्रत्येक रुग्णाकडून या सेंटरमध्ये कटाक्षानं कमी पैसे घेतले जातात, पण इतर डॉक्टरांनी पाठवलेल्या रुग्णांकडून पाचशे-सातशे रुपये जास्त घेऊन ते त्या डॉक्टराला कमिशन म्हणून दिले जातात. एकदा एका डॉक्टरानं रुग्णाच्या थुंकीमध्ये क्षयरोगाचे जंतू असूनही व छातीच्या एक्स-रेमध्ये क्षयरोग दिसत असूनही या रुग्णाला छातीचा सिटि-स्कॅन काढून घेण्यासाठी पाठवलं आणि कमिशन पदरात पाडून घेतलं.

वैद्यकीय व्यवस्थेतली अनैतिकता केवळ कमिशनपुरती मर्यादित नाही. औषधांच्या किंमतींतही खूप अनागोंदी आहे. औषधांच्या वेष्टनांवर छापलेल्या एमआरपीनं विकणार्‍यांना भरपूर फायदा मिळतो. औषधांच्या विक्रीतून मिळणारा फायदा आपल्याला मिळावा म्हणून दवाखान्याशेजारी औषधाचं दुकान आणि पॅथॉलॉजी लॅब असूनदेखील अनेक दवाखान्यांमधली डॉक्टरमंडळी स्वत:चं औषधाचं दुकान आणि पॅथॉलॉजी लॅब काढतात व भरमसाठ पैसा मिळवितात. महागडी औषधं रुग्णाला घ्यायला लावतात आणि अनावश्यक तपासण्या करायला लावतात. जेनेरिक औषधांची दुकानं मात्र कोणीही काढायला तयार नाही. उद्या मी जेनेरिक औषधांचं दुकान काढलं, तरी या औषधांवर रुग्णांचा विश्वास बसायला अनेक वर्षं लागतील. ही औषधं रुग्णाला लिहून द्यायलाही इतर डॉक्टर नाराज असतील.

एका जिल्हयाच्या ठिकाणी नर्सिंग होममध्ये औषधाचं दुकान काढण्यासाठी वीस ते पंचवीस लाख डिपॉझिट देण्यास दुकान चालवू इच्छिणारे तयार होतात, यावरून या व्यवसायात किती फायदा आहे, हे सहज लक्षात येईल. उदाहरणच द्यायचं झालं, तर हृदयाचा तीव्र झटका आल्यास टिनेक्टिप्लेज हे औषध दिलं जातं. ३० मिग्रॅ टिनेक्टिप्लेजची एमआरपी आहे रु. २७३६५. हेच औषध डॉक्टरांनी स्वत:च्या नावावर विकत घेतल्यास ते २१,००० रुपयांना मिळतं. म्हणजे डॉक्टरांना ६००० रुपयांचा फायदा होतो. रुग्णाच्या नावावरच कंपनीनं बिल द्यावं आणि हे औषध त्याला २१,००० रुपयांनाच मिळावं, यासाठी गेली काही वर्षं मी हे औषध बनवणार्‍या कंपनीशी भांडत आहे. पण कंपनीनं अजून मला दाद दिलेली नाही. रुग्ण मेडिक्लेमअंतर्गत पूर्ण पैसे वसूल करू शकतो, असं कंपनी मला सांगते. मजा म्हणजे, एकदा कमी रकमेचं बिल मेडिक्लेमसाठी सादर केलं म्हणून एमआरपीपेक्षा कमी बिल कसं मिळालं, या सबबीखाली विमा कंपनीकडून रुग्णाची चौकशी केली गेली. माझ्या दवाखान्यात एकदा हे औषध संपलं म्हणून दुसर्‍या एका डॉक्टराकडून मी ते मागवलं, तर या डॉक्टरानं पूर्ण एमआरपीचे पैसे घेतले. हाच प्रकार इतर अनेक औषधांच्या बाबतीत होतो. शिवाय एखाद्या विशिष्ट कंपनीचं औषध रुग्णाला वारंवार लिहून दिलं, तर ती कंपनी डॉक्टरला घड्याळ, प्रिंटर्स, परदेश दौरे, इसीजी मशिन, संगणक अशी बक्षिसं देते. काही डॉक्टरतर इसीजी मशिनसाठी लागणारे पेपर-रोल, जेली दर महिन्याला औषधकंपनीकडूनच मागवतात. काही डॉक्टरांच्या मुलांची शिक्षणंही कंपनीनं प्रायोजित केल्याचं मी ऐकून आहे. हे टाळण्यासाठी शासनानं कडक कायदा करणं, औषधांच्या किमतींवर मर्यादा घालणं आवश्यक आहे.

डॉक्टरांच्या अक्षराबद्दल जसा नियम केला गेला, तसेच नियम शासनानं रुग्णांच्या संरक्षणासाठी, वैद्यकीय व्यवसायात शिरलेल्या अपप्रवृत्तींचा नायनाट करण्यासाठी करणं आवश्यक आहे, असं अनेकजण सांगत असतात. अशा नियमांबद्दल, कायद्यांबद्दल गेली काही वर्षं सतत चर्चा सुरू आहे. मात्र या नियमांच्या अंमलबजावणीमुळे छोटे दवाखाने अडचणीत येऊन बंद केले जातील आणि पंचतारांकित दवाखाने तगतील अशी परिस्थिती निर्माण केली जात आहे. जितके अधिक कडक नियम, तितक्या अधिक पळवाटा आणि महागडे वैद्यकीय उपचार असं समीकरण रूढ होत चाललं आहे. एक कबूल केलं पाहिजे की, आजच्यासारखे कायदे १९७६ ते १९९०च्या दरम्यान नव्हते आणि पूर्ण स्वातंत्र्य असल्यामुळे, मनावर तणाव नसल्यामुळे मी विंचूदंशावर मूलभूत संशोधन करू शकलो. आता तसं संशोधन करता येईल, असं मला वाटत नाही. महत्त्वाचा प्रश्न हा आहे की, नियम करून वैद्यकीय व्यवसायातली अनैतिकता दूर होणार आहे का? नियमांमुळे मनुष्यप्राणी नीतिवान झाला असता, तर पोलिसांची गरजच भासली नसती. आजही अतिशय नैतिकतेनं, तत्त्वनिष्ठ वृत्तीनं व्यवसाय करणारे अनेक डॉक्टर आहेत. परंतु ही मंडळी प्रवाहाविरूद्ध जाण्यास, अपप्रवृत्तींविरुद्ध भांडण्यास तयार नाहीत, कारण वेळेचा, पैशाचा अपव्यय होतो आणि मानसिक त्रास सहन करावा लागतो तो वेगळाच. आजच्या महागड्या, जीवघेण्या स्पर्धेत आदर्श प्रॅक्टिस करणारा डॉक्टर महामूर्ख ठरतो, कारण फक्त डॉक्टरनंच आदर्श वागणूक ठेवावी, असं समाजाला वाटतं. लाच मागणारे, पैसे घेऊनही काम न करणारे प्रत्येकच व्यवसायात आहेत. ते मागतील ते पैसे त्यांना द्यावेच लागतात. अनेकजण आगाऊ रक्कम दिल्याशिवाय काम करत नाहीत. पण आदर्श वागणुकीची अपेक्षा एका डॉक्टरकडूनच केली जाते. डॉक्टर हा समाजाचाच एक भाग आहे. तोही या समाजात जगत असतो. समाजातल्या बर्‍यावाईट गोष्टींचा त्याच्यावर परिणाम होत असतो. फक्त डॉक्टरांसाठी कायदे केले, त्यांना शिक्षेची भीती दाखवली, तर ते सेवाभावी वृत्तीपासून अजूनच दूर जातील, ही भीतीही आहेच आणि ती मुळीच अनाठायी नाही.

मी इथे लिहिले ते माझे अनुभव आहेत, निरीक्षणं आहेत. आपण हेही मान्य केलं पाहिजे की, डॉक्टरांच्या काही विशिष्ट वागणुकीमागे काही कारण आहेत. डॉक्टरांना होणार्‍या मारहाणीबद्दल आपण अनेकदा ऐकतो-वाचतो. बिलासाठी तगादा लावला, अनावश्यक तपासण्या केल्या, रुग्णाकडे दुर्लक्ष केलं असे आरोप करून रुग्णाचे नातेवाईक डॉक्टरला मारहाण करतात, दवाखान्याचं नुकसान करतात. अनेकदा यात डॉक्टरची चूक नसते. त्या चाचण्या खरंच गरजेच्या असतात. बिलाचे पैसे दिले नाहीत, म्हणून रुग्णालयानं प्रेत नातेवाइकांच्या ताब्यात न दिल्याच्या बातम्या वर्तमानपत्रांत छापून येतात. पण अनेकदा रूग्णाचे नातेवाईक प्रेत ताब्यात घेण्याची खूप घाई करतात. जोरजोरात रडतात आणि ’आम्ही पैसे द्यायला परत येतो, आत्ता जाऊ द्या’ अशी हमी देतात. ’मयताचे दिवस झाले की पैसे द्यायला येतो’ असेही निरोप येतात. पण अनेक नातेवाईक पैसे द्यायला परत येत नाहीत. काहीजण बिल देणं टाळण्यासाठी खोटी तक्रार नोंदवतात किंवा डॉक्टरवर, रुग्णालयावर केस दाखल करतात. अतिगंभीर रुग्णावर करावी लागणारी योजना अनेकदा खर्चिक असते. औषधं, उपकरणं, ऑक्सिजन यांची किंमततरी मिळायला हवी, असं डॉक्टरांना वाटतं यात चूक नाही. उष्ण-कटिबंधीय प्रदेशात देह लवकर कुजतो, म्हणून त्याचा अंत्यविधी लवकर आटोपण्याची प्रथा आहे. परंतु ज्या ठिकाणी मृतदेह चांगल्या स्थितीत काही काळ ठेवण्याची व्यवस्था आहे, तिथे नातेवाइकांना बिल देण्यास योग्य तो वेळ मिळतो. अशा परिस्थितीत बिल देण्यास टाळाटाळ करणं अयोग्य ठरतं. बिलाची मागणी केल्यावर उलट डॉक्टरला मार खावा लागतो. या विषयावर नुकतंच मी ’लॅन्सेट’मध्ये पत्र लिहून प्रकाशित केलं आहे.

हल्ली रुग्ण आणि त्याचे नातेवाईक इंटरनेटवर आणि इतरत्र मिळणार्‍या माहितीवर अधिक विसंबतात आणि स्वत:च्या पायावर धोंडा पाडून घेतात. पिशवीभरून वेगवेगळ्या चाचण्यांचे रिपोर्ट, औषधांची अनेक प्रिस्क्रीप्शन्स घेऊन ते येतात. अनावश्यक चाचण्या करण्यास डॉक्टरला भाग पाडतात. रुग्ण जगेलच, हे डॉक्टरकडून वदवून घेतात. यामुळे डॉक्टरचं धैर्य कमी होतं. परिणामी गंभीर रुग्ण दाखल करून घेण्यास डॉक्टर टाळाटाळ करतात. तरुण डॉक्टर ग्रामीण भागात जाण्यास तयार नसतात, अशीही एक तक्रार असते. तरुण डॉक्टरांना हल्ली मिळणार्‍या वैद्यकीय शिक्षणामध्ये अमूलाग्र बदल झाला आहे. रुग्णाच्या क्लिनिकल तपासणीवर जास्त अवलंबून न राहता आजचा डॉक्टर प्रयोगशाळांमध्ये होणार्‍या तपासण्यांवर जास्त अवलंबून आहे. अशा तपासण्या ग्रामीण भागात होत नाहीत, म्हणून तरुण डॉक्टर ग्रामीण भागात जाण्यास तयार होत नाहीत. शिवाय हल्लीच्या तरूण डॉक्टरांकडून त्यांच्या पालकांच्या असलेल्या अपेक्षा गगनाला जाऊन भिडल्या आहेत. डॉक्टरकीच्या शिक्षणावर झालेला भरमसाठ खर्च आपल्या मुलांनी दोनतीन वर्षांत भरून काढावा, त्यांच्या स्वत:चा दवाखाना असावा, त्यांनी मोठा बंगला बांधावा, दाराशी दोन गाड्या असाव्यात अशी पालकांची इच्छा असते. मी अनेकदा वैद्यकीय कॉलेजांमध्ये मुलाखतींसाठी जातो, तेव्हा तरुण डॉक्टरांशी संवाद साधतो. त्यांच्याबरोबर त्यांच्या वसतिगृहांमध्ये राहतो. हे डॉक्टर मला अनेकदा सांगतात की, ’तुम्ही म्हणता तशी वैद्यकीय सेवा देण्याची आमची इच्छा आहे, पण आम्ही थोड्या वेळेत भरपूर पैसे कमवावेत, अशी आमच्या पालकांची इच्छा आहे. त्यांची इच्छा पूर्ण करायची असेल, तर आम्हांला नैतिक मार्गानं काम करणं शक्य नाही.’ हे ऐकल्यावर संपूर्ण दोष डॉक्टरांना द्यावा, असं मला वाटत नाही.

आज गरज आहे ती रुग्ण, रुग्णाचे नातेवाईक आणि डॉक्टर या घटकांमध्ये सुसंवाद असण्याची. आदर्श प्रॅक्टिसची तत्त्वं प्रस्थापित होण्यासाठी हा सुसंवाद फार महत्त्वाचा आहे. पण आदर्श प्रॅक्टिस म्हणजे नेमकं काय? कमीत कमी मोबदल्यात अत्याधुनिक ज्ञानाच्या मदतीनं रुग्णाची पीडा कशी दूर करता येईल, याचा विचार सतत करणं, रुग्णसेवा हीच ईशसेवा, ही भावना चेतवत ठेवणं म्हणजेच आदर्श प्रॅक्टिस होय. समाजात अशी आदर्श प्रॅक्टिस करणारे डॉक्टर अजूनही आहेत. गरज आहे ती त्यांचा आदर्श समोर ठेवून वाटचाल करण्याची.

***

इमेल - himmatbawaskar@rediffmail.com

***

पूर्वप्रसिद्धी - 'माहेर' (दिवाळी - २०१४)

***

हा लेख मायबोली.कॉमवर पुनर्मुद्रित करण्यास परवानगी दिल्याबद्दल डॉ. हिंमतराव बावस्कर व सुजाता देशमुख (संपादिका, 'माहेर') यांचे मनःपूर्वक आभार.

***
विषय: 
प्रकार: 

लेख पूर्ण वाचला. खूप प्रांजळ पणे लिहीलेला आणि अंतर्मुख करणारा वाटला.
सर्व गोष्टिंचे रेकॉर्ड ठेवणे, डिजीटायझेशन यामुळे हे सर्व कमी करता येईल का?

हे डॉक्टर मायबोलीवर सदस्य आहेत का?

बापरे! डॉ. हिंमतराव बावस्कर यांना कितीही दंडवत घातले तरी कमीच आहेत आणी कौतुकाला शब्दही अपुरे आहेत.

या मुलाखतीबद्दल खूप खूप धन्यवाद चिनुक्स. खरे आहे. नाण्याच्या दोन्ही बाजू प्रकाशात यायलाच हव्यात.

<<<<<<<मी इथे लिहिले ते माझे अनुभव आहेत, निरीक्षणं आहेत. आपण हेही मान्य केलं पाहिजे की, डॉक्टरांच्या काही विशिष्ट वागणुकीमागे काही कारण आहेत. डॉक्टरांना होणार्‍या मारहाणीबद्दल आपण अनेकदा ऐकतो-वाचतो. बिलासाठी तगादा लावला, अनावश्यक तपासण्या केल्या, रुग्णाकडे दुर्लक्ष केलं असे आरोप करून रुग्णाचे नातेवाईक डॉक्टरला मारहाण करतात, दवाखान्याचं नुकसान करतात. अनेकदा यात डॉक्टरची चूक नसते. त्या चाचण्या खरंच गरजेच्या असतात. बिलाचे पैसे दिले नाहीत, म्हणून रुग्णालयानं प्रेत नातेवाइकांच्या ताब्यात न दिल्याच्या बातम्या वर्तमानपत्रांत छापून येतात. पण अनेकदा रूग्णाचे नातेवाईक प्रेत ताब्यात घेण्याची खूप घाई करतात. जोरजोरात रडतात आणि ’आम्ही पैसे द्यायला परत येतो, आत्ता जाऊ द्या’ अशी हमी देतात. ’मयताचे दिवस झाले की पैसे द्यायला येतो’ असेही निरोप येतात. पण अनेक नातेवाईक पैसे द्यायला परत येत नाहीत. काहीजण बिल देणं टाळण्यासाठी खोटी तक्रार नोंदवतात किंवा डॉक्टरवर, रुग्णालयावर केस दाखल करतात. अतिगंभीर रुग्णावर करावी लागणारी योजना अनेकदा खर्चिक असते. औषधं, उपकरणं, ऑक्सिजन यांची किंमततरी मिळायला हवी, असं डॉक्टरांना वाटतं यात चूक नाही. उष्ण-कटिबंधीय प्रदेशात देह लवकर कुजतो, म्हणून त्याचा अंत्यविधी लवकर आटोपण्याची प्रथा आहे. परंतु ज्या ठिकाणी मृतदेह चांगल्या स्थितीत काही काळ ठेवण्याची व्यवस्था आहे, तिथे नातेवाइकांना बिल देण्यास योग्य तो वेळ मिळतो. अशा परिस्थितीत बिल देण्यास टाळाटाळ करणं अयोग्य ठरतं.>>>>>>>> हेही प्रत्यक्ष एका डॉक कडुन ऐकले होते. डॉ. परीचयाचे असल्याने हे सर्व ऐकल्यावर डोके खरच भणाणले.

भारी! मी अनिल अवचटांच्या 'कार्यरत' या पुस्तकात हिम्मतरावांविषयी लेख वाचला होता. तेव्हाच प्रभावित झालो होतो.

फ्रॅंक लेखन,
डॉक्टरांची पहिली ओळख dr शिंदे यांच्या लेखातून मायबोलीवरच झाली होती.

अतिशय प्रामाणिक कथन.
चिनुक्स इथे टाकल्याबद्दल धन्यवाद.
शेवटचे २ परिच्छेद अगदी पटले.

भारी! मी अनिल अवचटांच्या 'कार्यरत' या पुस्तकात हिम्मतरावांविषयी लेख वाचला होता. तेव्हाच प्रभावित झालो होतो. >>> +१२३

चिनुक्स हा लेख इथे टाकल्याबद्दल धन्यवाद.

डॉक्टरांची पहिली ओळख dr शिंदे यांच्या लेखातून मायबोलीवरच झाली होती. >> +१२३

लेख खूपच प्रांजळ आणि वाचनीय..
चिनुक्स हा लेख इथे आणल्याबद्दल धन्यवाद.

छान लेख आहे चिनूक्स. डॉक्टरपेशाबद्दल दोन्ही बाजू ऐकल्यामुळे एकांगी चित्र निर्माण होणार नाही. डॉ. बावस्कर ह्यांचे व्यक्तिमत्व अभ्यासनीय वाटते आहे. त्यांचे आत्मचरित्र नक्की वाचणार.

ग्रेट आहेत डॉ बावस्कर! इतके विनासायस कमिशन मिळते म्हटल्यावर खूप लोकांना त्यातला गिल्ट पण वाटेनासा होत असेल, पण तरीही पदरचे पैसे खर्च करून चेक, पैसे परत पाठवने त्याबद्दल जाब विचारणे हे महान आहे!!
दुसरी बाजू ही चिंतनीय आहे.

चिनूक्स,
इथे लेख दिल्याबद्दल अनेक धन्यवाद. अंर्तमुख करायला लावणारा लेख आहे. To be frank, it is scary...
वैद्यकिय अभ्यासक्रमात (परत) क्लिनीकल डायग्नॉसिसवर भर देणे (अत्या)आवशक झाले आहे का?

चिनूक्स,
इथे लेख दिल्याबद्दल अनेक धन्यवाद.>>+१११