रसायनांचा धुमाकूळ आणि कर्करोगाचा भस्मासुर

Submitted by हेमंतकुमार on 2 December, 2017 - 01:39

ज्याला जन्म आहे त्याला मृत्यू असतोच हे तर मूलभूत सत्य. पण हा मृत्यू निरोगी अवस्थेत शांत झोपेत किती जणांच्या वाट्याला येतो? फारच थोड्या. आयुष्यात मानवी शरीर हे कुठल्या ना कुठल्या रोगाची शिकार बनतेच. मग हा रोग शरीर पोखरत रुग्णास मृत्यूस नेतो. आज विविध रोगांमुळे होणाऱ्या मृत्युंमध्ये हृदयविकार हे आघाडीवर आहेत आणि त्याखालोखाल स्थान आहे ते कर्करोगाचे. सध्या जगभरात कर्करोगाने जवळपास ८० लाख लोक दरवर्षी मरण पावतात. हा आकडा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. चालू शतक संपेपर्यंत बहुधा कर्करोग हा हृदयविकाराला मागे टाकून ते अव्वल स्थान पटकावेल अशी चिन्हे दिसताहेत.

आपल्याला कर्करोग का होतो? ढोबळ मानाने त्याची तीन कारणे आहेत:
१. विविध किरणोत्सर्ग (रेडीएशन)
२. अनेक प्रकारची रसायने, आणि
३. काही विषाणूंचा संसर्ग

आपल्याला होणाऱ्या एकूण कर्करोगांपैकी सुमारे ८०% हे रसायनांमुळे होतात. हादरलात ना हा आकडा ऐकून? पण ते वास्तव आहे. आज माणसाने विविध कारणांसाठी बनवलेल्या रसायनांची संख्या एक लाखाच्या आसपास आहे! या रसायनांशी आपला अनेक प्रकारे संपर्क येतो. त्याचे अनेक दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागतात आणि कर्करोग हा त्यापैकीच एक. रसायनांचे विविध स्त्रोत, त्यांच्यामुळे कर्करोग का होतो, कोणती रसायने जास्त घातक आहेत आणि त्यापासून वाचण्यासाठी आपण कोणते प्रतिबंधात्मक उपाय करू शकतो यांचा आढावा या लेखात घेत आहे.

या विषयाची व्याप्ती मोठी असल्याने पुढील मुद्द्यांच्या आधारे विवेचन करतो:
१. रसायनांशी आपल्या संपर्काचे मार्ग
२. रसायने आणि कर्करोगाची कारणमीमांसा
३. कर्करोगकारक रसायनांची उदाहरणे आणि
४. प्रतिबंधात्मक उपाय

रसायनांशी आपल्या संपर्काचे मार्ग
रसायने आपल्या शरीरात हवा, पाणी, अन्न अथवा त्वचेमार्फत शिरू शकतात. त्यांचे स्त्रोत हे खालीलप्रमाणे असू शकतात:
१. अन्नातील नैसर्गिक घटक : उदा. Aflatoxin हे दाणे, मका व सोयाबीन यांच्यात असते.
२. रासायनिक शेतीतील पिके : या विषयावर गेल्या दहा वर्षात अनेक माध्यमांतून भरपूर दळण दळले गेले आहे. अधिक लिहिणे नलगे.
३. अन्न-प्रक्रिया : एखादे उकळलेले खाद्यतेल तळणासाठी वारंवार वापरुन त्यात aromatic hydrocarbons तयार होतात. हा प्रकार कनिष्ठ दर्जाच्या खानावळीत हमखास होतो.
४. व्यसने : उदा. तंबाकूतील अनेक रसायने आणि अल्कोहोल
५. हवा व पाण्याचे प्रदूषण : कारखान्यांतून सोडली जाणारी अनेक रसायने.
६. विशिष्ट उद्योगधंदे : उदा. Asbestos हे वाहन आणि बांधकाम उद्योगात वापरले जाते, तर aromatic amines ही रबर उद्योगात वापरतात.
७. रोगोपचारासाठी वापरलेली औषधे : उदा. cyclophosphamide हे काही कर्करोगांच्या उपचारासाठी वापरलेले औषध अन्य काही कर्करोग निर्माण करू शकते! आहे की नाही हा विरोधाभास?

रसायने आणि कर्करोगाची कारणमीमांसा
कर्करोगकारक रसायने ही आपल्या पेशींमध्ये शिरून थेट DNA वर हल्ला चढवतात. परिणामी काही जनुकीय बदल होतात. मग विशिष्ट प्रथिनांची मोठ्या प्रमाणात निर्मिती होते आणि त्यांच्या प्रभावाखाली पेशींची अनियंत्रित वाढ होते. हाच तो कर्करोग. अर्थात अशा प्रकारे होऊ शकणारा कर्करोग खालील घटकांवर अवलंबून असतो:

१. रसायनाचे शरीरात जाणारे प्रमाण
२. रसायन-संपर्काचा दीर्घ कालावधी
३. कर्करोग होण्यासाठीची जनुकीय अनुकुलता आणि
४. शरीराची कमकुवत प्रतिकारशक्ती

ह्या सर्व घटकांच्या एकत्रित परिणामातून कर्करोग होतो (multifactorial disease). काही वेळेस गप्पांच्या अड्ड्यात आपल्याला “अहो, आमचे ते काका रोज पन्नासेक तरी सिगारेटी फुंकायचे, तरी वयाच्या ८०व्या वर्षापर्यंत कसे ठणठणीत होते” अशा छापाची विधाने कधीमधी ऐकायला मिळतात. याचे स्पष्टीकरण वरील चार कारणांमध्ये दडलेले असते. अर्थात अशी उदाहरणे ही अपवाद म्हणून सोडून द्यायची असतात. एखादे रसायन जर ९५% लोकांना घातक ठरले असेल तर त्याकडे गांभीर्याने बघितले पाहिजे.

कर्करोगकारक रसायनांची उदाहरणे
या संदर्भात अनेक रसायनांकडे ‘संशयित’ म्हणून बघितले गेले आहे. साधारणपणे त्यांचे दोन गटात वर्गीकरण करता येईल:
१. कर्करोगकारक (carcinogenic)
२. कर्करोगपूरक (co-carcinogenic)
त्यापैकी सुमारे १०० रसायने ही आतापर्यंत माणसासाठी ‘कर्करोगकारक’ म्हणून सिद्ध झालेली आहेत. यातील एकेक रसायन हे स्वतंत्र प्रबंधाचा विषय होऊ शकेल. काही रसायनांचा संपर्क हा विशिष्ट व्यावसायिकांपुरता मर्यादित असतो. याउलट धूम्रपान आणि मद्यपान हे समाजातील खूप मोठ्या समूहांशी संबंधित विषय आहेत. त्यामुळे या लेखाच्या मर्यादेत या दोनच स्त्रोतांमधील रसायनांचा विचार आपण करणार आहोत.

तंबाकूचे धूम्रपान
जागतिक स्तरावर फुफ्फुसाचा कर्करोग हा कर्करोगांच्या यादीत प्रथम क्रमांकावर आहे. त्याचे सर्वात महत्वाचे कारण आहे अर्थातच धूम्रपान. या रोगाने जे मृत्यू होतात त्यापैकी ८०% लोक हे दीर्घकाळ धूम्रपान करणारे असतात. धूर ओढणे हे स्वतःसाठी आणि धूर सोडणे हे आजूबाजूला असणाऱ्यांना घातक असते!
या धुरातील रसायनांचा तपशील असा आहे :
• एकूण रसायने ७०००
• त्यापैकी घातक २५० आणि
• कर्करोगकारक ६९
• कर्करोगकारक रसायनांमध्ये Acetaldehyde, Aromatic amines, Benzo[α]pyrene ही काही उदाहरणे.

तंबाकूतील निकोटीन हे एक बहुचर्चित रसायन आहे. ते जबरदस्त व्यसनकारी आहे पण ते माणसात कर्करोगकारक असल्याचे अद्याप निर्विवाद सिद्ध झालेले नाही. तूर्तास त्याला कर्करोगपूरक म्हणता येईल.
तंबाकू खाणे हा प्रकार आपल्याकडे भरपूर आहे. त्यातील nitrosamines हे तोंडाच्या कर्करोगास कारण ठरतात. भारतात हा कर्करोग पुरुषांमधील कर्करोगांच्या यादीत प्रथम क्रमांकावर आहे.

अल्कोहोलचे सेवन अर्थात मद्यपान
हे शीर्षक वाचताक्षणीच अनेकांच्या भुवया उंचावतील कारण हा अतिशय संवेदनशील विषय आहे ! जगभरातील सुशिक्षित समाजावर नजर टाकता एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. अनेकांनी धूम्रपानाला आयुष्यातून हद्दपार केलेले आहे पण त्यांना मद्यपानाची संगत मात्र सोडवत नाही. संशोधकांचाही हा लाडका विषय! त्यामुळे बहुसंशोधित आणि बहुचर्चित. फक्त कर्करोगच नव्हे तर इतर अनेक आजारांशीही त्याचा कार्यकारणभाव जोडलेला आहे. त्यावरील भरपूर उलटसुलट माहिती माध्यमांतून उपलब्ध आहे.
एक दशकापूर्वी अल्कोहोलला ‘कर्करोगपूरक’ इतपत लेबल लावलेले होते. आता मात्र ते ‘कर्करोगकारक’ च्या यादीत जाऊन बसले आहे. काही संशोधक त्याला ‘risk factor’ असे सुरक्षित लेबल लावणे पसंत करतात.

तर आता जाणून घेऊयात याबाबतीतली ताजी घडामोड. ६ नोव्हेंबर २०१७ रोजी American Society of Clinical Oncology (ASCO) ने अल्कोहोल आणि कर्करोग याबाबत नियतकालिकात जाहीर निवेदन दिलेले आहे. ‘First-time Statement’ अशा विशेषणासह त्याला ठळक प्रसिद्धी दिलेली आहे. त्यातील महत्वाचे मुद्दे असे आहेत:
१. अल्कोहोल हे पुढील सात अवयवांच्या कर्करोगास कारणीभूत ठरते (causal relationship) : तोंड, घसा, स्वरयंत्र, अन्ननलिका, यकृत, स्तन आणि मोठे आतडे.
२. तर जठर आणि स्वादुपिंडाच्या बाबतीत मात्र ते ‘कर्करोगपूरक’ आहे.
३. दीर्घकाळ अतिरिक्त मद्यपानाने कर्करोगाचा खूप धोका संभवतो आणि प्रमाणात (moderate) पिणे सुद्धा सुरक्षित नाही.
४. वैधानिक इशारा : “ तुम्हाला जर कर्करोगाचा धोका कमी करायचा असेल, तर खूप कमी ‘प्या’ आणि जर तुम्ही ‘पित’च नसाल तर अल्कोहोलच्या नादीच लागू नका !”

तर हे होते धूम्रपान आणि मद्यपानाशी संबंधित रसायनांचे विवेचन. अन्य रसायनांचा विचार विस्तारभयास्तव करीत नाही.

प्रतिबंधात्मक उपाय
संशोधनातील प्रगतीमुळे कर्करोगाच्या नवनव्या उपचारपद्धती विकसित होत आहेत. त्यामुळे जरी बऱ्याच कर्करोगांवर नियंत्रण मिळवणे शक्य झाले असले तरीही रोगप्रतिबंध हा कधीही श्रेष्ठ उपाय ठरतो. याबाबतीत जागतिक आरोग्य संघटनेने काही मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. या लेखाच्या विषयालाही ती लागू आहेत. त्यानुसार काही कर्करोग-प्रतिबंधक उपाय असे आहेत :
१. तंबाकूसेवन वर्ज्य
२. अल्कोहोलसेवन अत्यल्प
३. आहारात ‘अ’, ‘इ’ व ‘क’ जीवनसत्वांचा भरपूर वापर. तेव्हा गाजर, पालेभाज्या आणि लिंबू दणकून खात रहा.
४. शरीराच्या वजनावर नियंत्रण, कारण अतिरिक्त चरबी ही पेशींमध्ये कर्करोगपूरक परिस्थिती निर्माण करते. आणि,
५. विविध वैद्यकिय ‘चाळणी परीक्षा’ (screening tests) नियमित करून घेणे.

समारोप
एकूण मानवी कर्करोगांपैकी सुमारे ८०% हे रसायनांमुळे होतात हे कटू सत्य आहे. आपण निर्माण केलेल्या रसायनांच्या बेलगाम वापरामुळे तीच आता आपल्यावर बूमरॅंग झाली आहेत. त्यांचा वापर आणि संपर्क शक्य तेवढा कमी केला पाहिजे. अन्नातून शरीरात जाणारी रसायने कमी करण्यासाठी सेंद्रिय शेतीचा प्रसार वेगाने झाला पाहिजे. व्यसनांपासून दूर राहणे हे तर सर्वस्वी आपल्याच हातात आहे. औद्योगिक-प्रदूषण नियंत्रण कठोरपणे झाले पाहिजे. रसायनांमुळे होणारा कर्करोग हा गंभीर सामाजिक आरोग्यविषय विषय आहे. तो रोखण्यासाठी विविध स्तरांवर युद्धपातळीवर अंमलबजावणी व्हायला हवी. अन्यथा कर्करोगाचा भस्मासुर हळूहळू मानवजातीला गिळंकृत करण्यासाठी टपून बसलेला आहे.
******************************************

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

** आपले आजी आजोबा छान घरचे जेवण करून,
>>>> त्यांच्या काळात स्वयंपाकघरातील बहुतेक सर्व पूरक पदार्थ देखील घरीच बनवले जात - विशेषतः हळद, तिखट, मसाले, पापड, लोणची, इ. इ. . . .
हा एक मोठा फरक जाणवतो.

भारतात झपाट्याने वाढतोय कर्करोग
भारतीय बहुराष्ट्रीय आरोग्य सेवा समूह अपोलो हॉस्पिटल्सने गेल्या महिन्यात प्रसिद्ध केलेला अहवाल :
https://www.apollohospitals.com/apollo-in-the-news/on-world-health-day-a...
..
पब्लिक हेल्थ फाऊंडेशन ऑफ इंडियाचे माजी अध्यक्ष के. श्रीनाथ रेड्डी यांनी ‘डीडब्ल्यू’ला सांगितले, “कर्करोगाची प्रकरणे व मृत्यू वाढत आहेत आणि पुढील दोन दशकांत यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.”
“याला वाढते वय, जळजळ वाढविणारे अल्ट्रा-प्रोसेस्ड खाद्यपदार्थ, कार्सिनोजेनने भरलेले वायुप्रदूषण आणि हवामानातील बदल कारणीभूत आहे.”

https://www.loksatta.com/explained/cancer-cases-soaring-in-india-rac-97-...

<< आपले आजी आजोबा छान घरचे जेवण करून, वृत्तपत्र वाचून हेलदी जगत होते. >>
पण आजी आजोबांच्या पिढीत सरासरी आयुर्मान किती होते आणि आता किती आहे?

अन्नातील भेसळ हा गंभीर गुन्हा आहेच आणि त्याला अतिशय कडक शिक्षा झालीच पाहिजे, मग त्याने कर्करोगाचे प्रमाण वाढो अथवा न वाढो.

अल्ट्रा-प्रोसेस्ड खाद्यपदार्थ, >>> भेसळ म्हटले की आपले कान टवकारतात पण प्रोसेस्ड खाद्यपदार्थांमुळे आपलेही श्रम वाचत असल्यामुळे आपण त्याकडे कानाडोळा करतो जे जास्त घातक आहे.

हवा, पाणी आणि अन्न या आपल्या मुलभूत गरजा आहेत हे आजही शाळेत शिकवले जाते, पण आता आपण आपले श्रम आणि निसर्गाचे रिसोर्स इतरच गोष्टींकरता वापरू लागलो आहोत.

खरं आहे. या निमित्ताने एक महत्त्वाचा विरोधाभास लक्षात घ्यावा. जागतिक पातळीवरील 50- 60 वर्षांपूर्वीचे आणि आताचे आयुर्मान आणि निरोगी- आयुर्मान जर लक्षात घेतले तर एक विरोधाभासी (paradox) चित्र स्पष्ट होते.

सुबत्ता आणि आधुनिक आरोग्य सुविधांमुळे आयुर्मान जरी वाढताना दिसले तरी वयस्कर माणसे त्यांच्या आयुष्याचा बराच मोठा भाग विविध आजारांसह (आणि उपचारांसह) जगत असतात. अशा आजारांमधले प्रमुख म्हणजे मधुमेह, हृदयविकार आणि कर्करोग. या संदर्भात काही मोठे जागतिक अभ्यास झालेले आहेत : https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC8489742/

विषय खूप गुंतागुंतीचा असून त्यावर कधीतरी स्वतंत्र लिहावे लागेल. तूर्त वरील संदर्भातील भरतवाक्य फक्त लिहितो :
However, in most countries, life expectancy increased but healthy life expectancy decreased.

माहितीपूर्ण लेख व प्रतिसाद.
< प्रोसेस्ड खाद्यपदार्थांमुळे आपलेही श्रम वाचत असल्यामुळे आपण त्याकडे कानाडोळा करतो जे जास्त घातक आहे.> +१

हे एक नवीनच . . .
कारच्या सीट-फोम मधून बाहेर येणारी घातक रसायने उन्हाळ्यात खूप वाढतात :
https://pubs.acs.org/doi/full/10.1021/acs.est.3c10440

Flame retardants ( Organophosphate esters : TCIPP) : प्राणी-प्रयोगांमध्ये कर्करोगकारक.
या स्वरूपाचा हा पाहिला अभ्यास असल्याचे म्हटले आहे.

टीप : निव्वळ नवी माहिती म्हणून American Chemical Society च्या या शोधनिबंधाची इथे नोंद केलेली आहे. मानवी शरीरासंदर्भात कोणताही निष्कर्ष किंवा दावा नाही. भविष्यातील अशा संशोधनावर लक्ष ठेवता येईल.

However, in most countries, life expectancy increased but healthy life expectancy decreased.>>> हे दिसुन येतंय. मागे कुठल्याशा धाग्यावर याबद्दल चर्चा झाली होती.

ethylene oxide चा मसाल्यांमध्ये वापर योग्य असून अमेरिकेत त्याला परवानगी आहे असे अमेरिकी संघटनेचे निवेदन :>>>
ध्रुव राठीचा विडिओ, राजकारणाचे विषय दुर्लक्षित करून बाकी माहिती अधिक खोलात जाऊन विचार करण्यास उपयुक्त वाटते आहे.

असून अमेरिकेत त्याला परवानगी आहे >>> वर चर्चा झालेला मुद्दा हा वापर योग्य आहे कि नाही त्यापेक्षा रेसिड्युअल किती आहे / ठरवून दिलेल्या प्रमाणापेक्षा जास्त आहे आणि त्यासाठी त्यावर कारवाई झालीय, हा आहे.

यात बरेच कॉम्प्लिकेटेड केसेस पण आहेत. उदा . सोडियम बेन्झोएट हे प्रिझर्व्हटिव्ह म्हणून वापरायला परवानगी आहे. आपण खात असलेल्या कित्येक खाद्य पदार्थामध्ये हे वापरले जाते. पण हे प्रिजर्वेटिव्ह जर व्हिटॅमिन सी च्या संपर्कात आले तर बेन्झीन तयार होऊ शकते आणि ते कार्सिनोजेनिक आहे. आता लिंबू च्या लोणच्या मध्ये पण हेच प्रिजर्वेटिव्ह वापरले जाते आणि त्यात बऱ्यापैकी व्हिटॅमिन सी असते. पण त्यात बेन्झीन तयार होते काय ? / त्याचे प्रमाण किती आहे ? / ते लिमिट मध्ये आहे कि त्याच्या किती पट जास्त आहे यावर काही डेटा उपलब्ध नाहीय.

“कर्करोगाची प्रकरणे व मृत्यू वाढत आहेत आणि पुढील दोन दशकांत यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.” >> १०० %.

यावर्षी एका मुलीने होमी भाभा परीक्षेसाठी या विषयावर प्रोजेक्ट केला होता. विषय होता बायोइंडिकेटर्स .... त्या मुलीने या विषयाला अनुसरून वातावरणात होणारा बदल / बदलणारी जीवनशैली आणि मानवामध्ये वाढणारा कॅन्सर यावर प्रोजेक्ट केला होता.

<< वयस्कर माणसे त्यांच्या आयुष्याचा बराच मोठा भाग विविध आजारांसह (आणि उपचारांसह) जगत असतात. >>
<< life expectancy increased but healthy life expectancy decreased >>
What would a person prefer? Living longer (but taking medicines) Vs. Living healthier (but dying young)? I know my own answer.

विविध केमिकल्सनी मानवी जीवन कमालीचे सोईस्कर केले आहे, हे नाकारण्याजोगे नाही.

<< भविष्यातील अशा संशोधनावर लक्ष ठेवता येईल. >> सहमत आहे.

उबो, What would a person prefer? Living longer (but taking medicines) Vs. Living healthier (but dying young)? >> we need not be restricted to these 2 choices! We can have long and healthy lives without medication. Rather that should be the objective of health authorities. But unfortunately today's field of medicine is driven by capitalism than science. Hence the disaster!

<< We can have long and healthy lives without medication. >>
हे एक दिवास्वप्न आहे. जन्मापासून मृत्यूपर्यंत औषधे लागतातच आणि लागणारच. भूल देण्याचे साधे औषध यासारखी औषधेसुद्धा केमिकल्सच असतात. फरक इतकाच की ते केमिकल उपयुक्त असले की औषध बनते आणि उपयुक्त नसले की विष ठरते. त्यामुळे सरसकट केमिकल्सना नावे ठेवणे मला पटतच नाही.

पान ५ वर लिहिलेली डॉक्टर कुमार यांच्याबरोबर झालेली माझी चर्चा कुणी बहुधा वाचली नाही, म्हणून परत एकदा लिहितो.
....
हा लेख FUD (fear, uncertainty and doubt) प्रकारचा आहे. लेखाच्या आशयाशी सहमत आहे, पण "एकूण मानवी कर्करोगांपैकी सुमारे ८०% हे रसायनांमुळे होतात हे कटू सत्य आहे." याबद्दल मला खरोखर शंका आहे. याबद्दल कुठे तसा अभ्यास झाला आहे का? याची लिंक लेखक देऊ शकेल का? नॉनस्टिक भांड्यात जेवण करू नका, ऑर्गॅनिक खा असे अनेक विचार पसरले आहेत, पण त्याचा वैज्ञानिक अभ्यास झाला आहे का? हा संबंध १००% खात्रीलायक रित्या सिद्ध झाला आहे का? असे विचारले की उत्तर मिळत नाही.

संदर्भ यावरून:

Missing content here, see original reply on Misalpav
....
@ उपाशी बोका, हा संदर्भ:
Harper 30 ed, 2015, p 724 says.....
80% of human Ca are caused by environmental factors, principally CHEMICALS
या आंतरराष्ट्रीय पाठ्यपुस्तक पुढे जालावरचे फुकटचे अनेक संदर्भ फिजुल आहेत
पुस्तक जरूर बघावे ही वि.
.....
<< या आंतरराष्ट्रीय पाठ्यपुस्तक पुढे जालावरचे फुकटचे अनेक संदर्भ फिजुल आहेत. >>
धन्यवाद. केवळ वरील वाक्यामुळे उत्सुकता वाढली. माझ्याकडे ते पाठ्यपुस्तक नाही आणि मिळायची शक्यता नाही.
80% of human Ca are caused by environmental factors, principally CHEMICALS हे वाक्य नक्कीच पुस्तकात असेल, याबद्दल दुमत नाही. पण ते कुठल्या आधाराने लिहिले आहे, याचा कृपया संदर्भ द्यावा. (म्हणजे तळटीप, मूळ वैज्ञानिक पेपर वगैरे). ते केवळ पुस्तकात आहे म्हणून खरे/खोटे मानत नाही पण या वाक्याचा बेसिस काय ते जाणून घ्यायला आवडेल.
....
There are several Federal agencies that are charged with establishing permissible levels of exposure to chemical substances in the general environment, home, and workplace, and in food, water, and pharmaceuticals. These include the Consumer Product Safety Commission (CPSC), Environmental Protection Agency (EPA), the Food and Drug Administration (FDA), the Occupational Safety and Health Administration (OSHA), and the U.S. Department of Agriculture (USDA), Agency for Toxic Substances and Disease Registry (ATSDR) etc.

इतक्या एजन्सी कार्यरत असताना ८०% कॅन्सर मुख्यतः केमिकल्समुळे होतात असा निष्कर्ष केवळ एका पुस्तकावर आधरून काढले, हे बघून आश्चर्य वाटले, इतकेच म्हणणे आहे.
...
भस्मासुर' शब्द अतिशयोक्ती वाटू शकेल. पण तो का वापरला ते सांगतो.
या रोगाच्या जागतिक मृत्युंची आकडेवारी मी एका आंतरराष्ट्रीय पाठय पुस्तकातून घेतली आहे. याची दर अडीच वर्षांनी आवृत्ती निघते. गेल्या दोनमधील फरक बघा:
2013 : ६५ लाख मृ.
2015 : ८० लाख
आता 2018 मध्ये ...?
....
मान्य आहे की कर्करोग वाईट रोग आहे, पण जगातील सर्वात वाईट १० प्रकारच्या रोगांमध्ये त्याचा नंबर ५ वा आहे.
कमी उत्पन्न असलेल्या देशात तर कर्करोग पहिल्या १० त पण नाही. अधिक उत्पन्न असलेल्या देशात त्याचा नंबर ४ आहे.
हृदयाच्या विकाराने मरण्याची शक्यता कर्करोगाने मरण येण्यापेक्षा बरीच जास्त आहे. खरा धोका कुठून आहे?
जागतिक मृत्युंची आकडेवारी अशी आहे:
1. Ischemic heart disease, or coronary artery disease - ८८ लाख
2. Stroke - ६२ लाख
3. Lower respiratory infections - ३२ लाख
4. Chronic obstructive pulmonary disease - ३१ लाख
5. Trachea, bronchus, and lung cancers - १७ लाख
6. Diabetes mellitus - १६ लाख
7. Alzheimer’s disease and other dementias - १५ लाख
8. Dehydration due to diarrheal diseases - १४ लाख
9. Tuberculosis - १३.७ लाख
रस्त्यावरील अपघाती मृत्यू - १३.४ लाख
10. Cirrhosis - १२ लाख

संदर्भः
मूळ स्रोत:
....
उबो, माझी आकडेवारी Harper या पाठयपुस्तकातील आहे.त्यात कर्करोगाला क्र. 2 चे स्थान दिलेले आहे.
तो संदर्भ मी सर्वोत्तम मानतो.
त्यामुळे तुमच्या 4 या क्र. शी पूर्ण असहमत.
आपण पुस्तक बघाच ही पुन्हा वि.
....
अहो, पण तो माझ्या मनाचा रिपोर्ट नाहीये, World Health Organization चा रिपोर्ट बरोबर नाही, तुमचे पुस्तकच बरोबर आहे असे म्हणणे असेल तर प्रश्नच मिटला.
...

Medicine has become more capitalistic I have few observations from my own treatment.

Every disposable needle iv set biopsy needle onward every supporting medical equipment material needs to be produced as per global standard. Patient safety depends on that. This needs production plants that follow gmp .

Same with high end medicine for cancer treatment. Big pharma itself is aware of the cost and offer many discount schemes to patients. You cannot compromise on the production process and standard. Patients are already imuno compromised and may get infection otherwise. This can be fatal.

Places like Mumbai oncocare have easily accessible branches in major Mumbai suburbs. Easy access to patients. All these need to be properly staffed. And each place needs hr and it support. Chemo charges are reasonable. Plus medicine cost. But you get a comfortable suite where you can relax and get your injection.

Diagnostic like pet scan is expensive because of the nuclear dyes and basic machine cost. But it does give a correct picture. I feel scan day is more important than even Dr visit.

Highly trained oncologists are available with appointment. Their training and experience counts a lot. All this costs money. Still it is cheaper than in the US.

Add to this insurance and other support services. This is a more comfortable way to get cancer treatment than going to Tata sleeping under the bridge mode. For patients who can afford it.

Also the centre has charity wing for poor patients.

डेटा हा कसा पहिला जातो ( परस्पेक्टिव्ह काय आहे ) त्यावर अनुमान काय निघते हे अवलंबून असते. अनबायस्ड डेटा रीड करणे खरोखर अवघड असते. ह्रदय विकाराने होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण अजूनही खूप जास्त आहे कारण , त्याबद्दल चा अवेअरनेस यायला कित्येक वर्षे जावी लागली. हा संसर्गजन्य आजार नाहीय, जीवनशैली वर अवलंबून असणारा आजार आहे. आणि एका दिवसात जीवनशैली बदलून तो लगेच आटोक्यात पण येणार नाहीय. हा एक टेक्निकल लैग आहे. गेल्या काही दशकात ह्रदय विकारावर अतिशय सोप्या ( १९८० च्या दशकाबरोबर तुलना करता ) आणि सुलभ शस्त्रक्रिया विकसित झाल्या आहेत आणि आता हळूहळू त्याचे परीणाम पुढच्या काही दशकात दिसू लागतील. कॅन्सर चे मात्र नक्की तसे नाही आहे. शेकडो केमिकल्स च्या एक्सपोजर मुले कॅन्सर होत नाही असे कुणी म्हणत असेल तर ते नक्की हास्यास्पद आहे. अगोदर चर्चा झाल्याप्रमाणे त्यासाठी काही घटक हे स्टिम्युलेशन चे काम करतात. फिअर पेक्षा अवेअरनेस जागृत करणे ह्या ऎगलने याकडे पहिले तर सोपे होईल.

गेल्या दशकात कॅन्सर चे प्रमाण वाढले आहे , त्यावर पूर्णपणे इलाज नाहीय , आहे तो इलाज पण खूप त्रासदायक आहे , खर्चिक आहे , त्यातून त्याचा रिकरन्स व्हायचे चांसेस पहिले तर तो होऊ नये या साठी काळजी घेणे, लोकांच्यात जन जागृती करणे हे महत्वाचे आहे , एवढे पटले तरी खूप झाले.

जाता जाता पंजाब च्या एका ठराविक भागात कॅन्सर चा उद्रेक झालेला लोकांनी पहिला आहे आणि त्याचे कारण अतिप्रमाणात वापरले गेलेले पेस्टी साईड्स आहेत हे सामान्य लोकांच्या लक्षात आलेले आहे, आपल्याकडे शिरोळ तालुका याच उंबरठ्यावर आहे. शेतकऱ्याचे पेस्टी साईड्स ना असणारे एक्सपोजर हे आपल्यापेक्षा कैक पटीने जास्त आहे, बाकी ते तयार करणाऱ्या / नफा कमावणाऱ्या कंपन्या त्यांचे असणारे लागेबांधे आणि होणारा रिसर्च आणि त्यातून लोकांपर्यंत पोहोचणारे सत्य ...... याबद्धल काही लिहायची इच्छाच नाहीय. Sad

अजून एक अवांतर ,
भारतातील रेस्पिरेटरी डेथ डेटा पहिला तर तो पण वाढत चालला आहे, याचे कारण काय असू शकेल?

वाहतूक खोळंबा, ट्राफीक.. तासंतास प्रत्येक दिवशी..रिक्शांतून जाताना, स्कूटर वर, कार खिडकीतून, ट्रक , बस वगैरे वगैरे.
म्हणजेच प्रदूषण कारण असू शकते.

हे एक दिवास्वप्न आहे. जन्मापासून मृत्यूपर्यंत औषधे लागतातच आणि लागणारच. भूल देण्याचे साधे औषध यासारखी औषधेसुद्धा केमिकल्सच असतात. फरक इतकाच की ते केमिकल उपयुक्त असले की औषध बनते आणि उपयुक्त नसले की विष ठरते. त्यामुळे सरसकट केमिकल्सना नावे ठेवणे मला पटतच नाही. >> medication (prescription/OTC) आणि रसायने यात गल्लत होते आहे असे वाटते. अन्न देखील रसायनांनीच बनलेले असते! Life without medication हे दिवास्वप्न नाही. पूर्वी होणारे अकाली मृत्यू हे साथीच्या रोगांनी, जंतूसंसर्गाने, vitamins च्या कमतरतेमुळे, किंवा शस्त्रक्रिया न करता आल्यामुळे होत होते. या सर्व गोष्टी आता विज्ञानाने सुकर झाल्या आहेत. आता खरंतर आपण सगळे आरोग्यपूर्ण आयुष्य जगत असलो पाहिजे होतो! ते तसे न होण्यामागे रसायनांचा अतिरिक्त भडिमार हे एक मुख्य कारण आहे.

हल्ली एअर फ्रायर हा डीप फ्रायिंग ला चांगला पर्याय म्हणून वापरला जातो. त्यामुळे सॅच्युरेटेड फॅट्स / टोटल फॅट्स / ट्रान्स फॅट याचे प्रमाण खूप कमी होते आणि हा एक चांगला हेल्दी पर्याय आहे. पण यामध्ये काही शुगर्स ( विशेषतः बटाट्यामधील ) चे खूप जास्त तापमानाला अक्रालडमाइड मध्ये रूपांतर होते. हे केमिकल कार्सिनोजेन मध्ये येते पण , डाएटरी अक्रालडमाइड याचा अजून मानवास होणाऱ्या कँसर शी संबंध पुराव्यानिशी सिद्ध झालेला नाहीय. (तरीही आपण काळजी घेऊन कमीत कमी अक्रालडमाइड आपल्या पोटात जाईल याची काळजी घेउत. )

हे तयार होणारे अक्रालडमाइड प्रोसेस कंट्रोल करून लक्षणीयरित्या कमी करता येते. उदा. बटाटे पाण्यामध्ये भिजत ठेवणे इत्यादी.

खालच्या चार्ट मध्ये ३ पद्धतीने प्रोसेस करताना तयार झालेले अक्रालडमाइड प्रमाण दिले आहे.

acraldmide.jpeg

चांगली माहिती. धन्यवाद !

acrylamide >>>
यापासून केलेले polyacrylamide gel वैद्यकीय प्रयोगशाळेत शिक्षणादरम्यान इलेक्ट्रोफोरेसिससाठी वापरले होते. त्याची आठवण झाली.

बनावट घातक लसुणाची अकोल्यात विक्री
हा लसूण सिमेंटचा आहे. निवृत्त पोलीस अधिकाऱ्यांनीच ही तक्रार नोंदवली आहे

https://indianexpress.com/article/lifestyle/food-wine/fake-garlic-cement...

वाचली बातमी.
या घटकांवर प्रशासनाने हरकत घेतली आहे :
Allura Red, Sunset Yellow FCF, Ponceau 4R, Tartrazine, and Carmoisine

2024 चे वैद्यकीय नोबेल microRNA या विषयावरील संशोधनासाठी देण्यात आलेले आहे. पेशींमधलया आरएनएचा हा एक अनोखा प्रकार आहे. शरीराच्या वाढ आणि विकासामध्ये त्याचा सहभाग आहे.

microRNAमधील बिघाडामुळे विविध मानवी आजार होऊ शकतात. त्यामध्ये खालील आजारांचा समावेश आहे :

  • फुफ्फुस आणि यकृताचा कर्करोग</li>
  • विविध हृदयविकार
  • काही मेंदू विकार व मनोविकार
  • ऑटोइम्युन विकार

भविष्यात या संशोधनाचा उपयोग वरील रोगांची कारणे समजण्यासाठी, त्यांच्या आधुनिक निदान चाचण्या शोधण्यासाठी आणि उपचारांची दिशा ठरवण्यासाठी सुद्धा होऊ शकतो.

Pages