रसायनांचा धुमाकूळ आणि कर्करोगाचा भस्मासुर

Submitted by कुमार१ on 2 December, 2017 - 01:39

ज्याला जन्म आहे त्याला मृत्यू असतोच हे तर मूलभूत सत्य. पण हा मृत्यू निरोगी अवस्थेत शांत झोपेत किती जणांच्या वाट्याला येतो? फारच थोड्या. आयुष्यात मानवी शरीर हे कुठल्या ना कुठल्या रोगाची शिकार बनतेच. मग हा रोग शरीर पोखरत रुग्णास मृत्यूस नेतो. आज विविध रोगांमुळे होणाऱ्या मृत्युंमध्ये हृदयविकार हे आघाडीवर आहेत आणि त्याखालोखाल स्थान आहे ते कर्करोगाचे. सध्या जगभरात कर्करोगाने जवळपास ८० लाख लोक दरवर्षी मरण पावतात. हा आकडा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. चालू शतक संपेपर्यंत बहुधा कर्करोग हा हृदयविकाराला मागे टाकून ते अव्वल स्थान पटकावेल अशी चिन्हे दिसताहेत.

आपल्याला कर्करोग का होतो? ढोबळ मानाने त्याची तीन कारणे आहेत:
१. विविध किरणोत्सर्ग (रेडीएशन)
२. अनेक प्रकारची रसायने, आणि
३. काही विषाणूंचा संसर्ग

आपल्याला होणाऱ्या एकूण कर्करोगांपैकी सुमारे ८०% हे रसायनांमुळे होतात. हादरलात ना हा आकडा ऐकून? पण ते वास्तव आहे. आज माणसाने विविध कारणांसाठी बनवलेल्या रसायनांची संख्या एक लाखाच्या आसपास आहे! या रसायनांशी आपला अनेक प्रकारे संपर्क येतो. त्याचे अनेक दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागतात आणि कर्करोग हा त्यापैकीच एक. रसायनांचे विविध स्त्रोत, त्यांच्यामुळे कर्करोग का होतो, कोणती रसायने जास्त घातक आहेत आणि त्यापासून वाचण्यासाठी आपण कोणते प्रतिबंधात्मक उपाय करू शकतो यांचा आढावा या लेखात घेत आहे.

या विषयाची व्याप्ती मोठी असल्याने पुढील मुद्द्यांच्या आधारे विवेचन करतो:
१. रसायनांशी आपल्या संपर्काचे मार्ग
२. रसायने आणि कर्करोगाची कारणमीमांसा
३. कर्करोगकारक रसायनांची उदाहरणे आणि
४. प्रतिबंधात्मक उपाय

रसायनांशी आपल्या संपर्काचे मार्ग
रसायने आपल्या शरीरात हवा, पाणी, अन्न अथवा त्वचेमार्फत शिरू शकतात. त्यांचे स्त्रोत हे खालीलप्रमाणे असू शकतात:
१. अन्नातील नैसर्गिक घटक : उदा. Aflatoxin हे दाणे, मका व सोयाबीन यांच्यात असते.
२. रासायनिक शेतीतील पिके : या विषयावर गेल्या दहा वर्षात अनेक माध्यमांतून भरपूर दळण दळले गेले आहे. अधिक लिहिणे नलगे.
३. अन्न-प्रक्रिया : एखादे उकळलेले खाद्यतेल तळणासाठी वारंवार वापरुन त्यात aromatic hydrocarbons तयार होतात. हा प्रकार कनिष्ठ दर्जाच्या खानावळीत हमखास होतो.
४. व्यसने : उदा. तंबाकूतील अनेक रसायने आणि अल्कोहोल
५. हवा व पाण्याचे प्रदूषण : कारखान्यांतून सोडली जाणारी अनेक रसायने.
६. विशिष्ट उद्योगधंदे : उदा. Asbestos हे वाहन आणि बांधकाम उद्योगात वापरले जाते, तर aromatic amines ही रबर उद्योगात वापरतात.
७. रोगोपचारासाठी वापरलेली औषधे : उदा. cyclophosphamide हे काही कर्करोगांच्या उपचारासाठी वापरलेले औषध अन्य काही कर्करोग निर्माण करू शकते! आहे की नाही हा विरोधाभास?

रसायने आणि कर्करोगाची कारणमीमांसा
कर्करोगकारक रसायने ही आपल्या पेशींमध्ये शिरून थेट DNA वर हल्ला चढवतात. परिणामी काही जनुकीय बदल होतात. मग विशिष्ट प्रथिनांची मोठ्या प्रमाणात निर्मिती होते आणि त्यांच्या प्रभावाखाली पेशींची अनियंत्रित वाढ होते. हाच तो कर्करोग. अर्थात अशा प्रकारे होऊ शकणारा कर्करोग खालील घटकांवर अवलंबून असतो:

१. रसायनाचे शरीरात जाणारे प्रमाण
२. रसायन-संपर्काचा दीर्घ कालावधी
३. कर्करोग होण्यासाठीची जनुकीय अनुकुलता आणि
४. शरीराची कमकुवत प्रतिकारशक्ती

ह्या सर्व घटकांच्या एकत्रित परिणामातून कर्करोग होतो (multifactorial disease). काही वेळेस गप्पांच्या अड्ड्यात आपल्याला “अहो, आमचे ते काका रोज पन्नासेक तरी सिगारेटी फुंकायचे, तरी वयाच्या ८०व्या वर्षापर्यंत कसे ठणठणीत होते” अशा छापाची विधाने कधीमधी ऐकायला मिळतात. याचे स्पष्टीकरण वरील चार कारणांमध्ये दडलेले असते. अर्थात अशी उदाहरणे ही अपवाद म्हणून सोडून द्यायची असतात. एखादे रसायन जर ९५% लोकांना घातक ठरले असेल तर त्याकडे गांभीर्याने बघितले पाहिजे.

कर्करोगकारक रसायनांची उदाहरणे
या संदर्भात अनेक रसायनांकडे ‘संशयित’ म्हणून बघितले गेले आहे. साधारणपणे त्यांचे दोन गटात वर्गीकरण करता येईल:
१. कर्करोगकारक (carcinogenic)
२. कर्करोगपूरक (co-carcinogenic)
त्यापैकी सुमारे १०० रसायने ही आतापर्यंत माणसासाठी ‘कर्करोगकारक’ म्हणून सिद्ध झालेली आहेत. यातील एकेक रसायन हे स्वतंत्र प्रबंधाचा विषय होऊ शकेल. काही रसायनांचा संपर्क हा विशिष्ट व्यावसायिकांपुरता मर्यादित असतो. याउलट धूम्रपान आणि मद्यपान हे समाजातील खूप मोठ्या समूहांशी संबंधित विषय आहेत. त्यामुळे या लेखाच्या मर्यादेत या दोनच स्त्रोतांमधील रसायनांचा विचार आपण करणार आहोत.

तंबाकूचे धूम्रपान
जागतिक स्तरावर फुफ्फुसाचा कर्करोग हा कर्करोगांच्या यादीत प्रथम क्रमांकावर आहे. त्याचे सर्वात महत्वाचे कारण आहे अर्थातच धूम्रपान. या रोगाने जे मृत्यू होतात त्यापैकी ८०% लोक हे दीर्घकाळ धूम्रपान करणारे असतात. धूर ओढणे हे स्वतःसाठी आणि धूर सोडणे हे आजूबाजूला असणाऱ्यांना घातक असते!
या धुरातील रसायनांचा तपशील असा आहे :
• एकूण रसायने ७०००
• त्यापैकी घातक २५० आणि
• कर्करोगकारक ६९
• कर्करोगकारक रसायनांमध्ये Acetaldehyde, Aromatic amines, Benzo[α]pyrene ही काही उदाहरणे.

तंबाकूतील निकोटीन हे एक बहुचर्चित रसायन आहे. ते जबरदस्त व्यसनकारी आहे पण ते माणसात कर्करोगकारक असल्याचे अद्याप निर्विवाद सिद्ध झालेले नाही. तूर्तास त्याला कर्करोगपूरक म्हणता येईल.
तंबाकू खाणे हा प्रकार आपल्याकडे भरपूर आहे. त्यातील nitrosamines हे तोंडाच्या कर्करोगास कारण ठरतात. भारतात हा कर्करोग पुरुषांमधील कर्करोगांच्या यादीत प्रथम क्रमांकावर आहे.

अल्कोहोलचे सेवन अर्थात मद्यपान
हे शीर्षक वाचताक्षणीच अनेकांच्या भुवया उंचावतील कारण हा अतिशय संवेदनशील विषय आहे ! जगभरातील सुशिक्षित समाजावर नजर टाकता एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. अनेकांनी धूम्रपानाला आयुष्यातून हद्दपार केलेले आहे पण त्यांना मद्यपानाची संगत मात्र सोडवत नाही. संशोधकांचाही हा लाडका विषय! त्यामुळे बहुसंशोधित आणि बहुचर्चित. फक्त कर्करोगच नव्हे तर इतर अनेक आजारांशीही त्याचा कार्यकारणभाव जोडलेला आहे. त्यावरील भरपूर उलटसुलट माहिती माध्यमांतून उपलब्ध आहे.
एक दशकापूर्वी अल्कोहोलला ‘कर्करोगपूरक’ इतपत लेबल लावलेले होते. आता मात्र ते ‘कर्करोगकारक’ च्या यादीत जाऊन बसले आहे. काही संशोधक त्याला ‘risk factor’ असे सुरक्षित लेबल लावणे पसंत करतात.

तर आता जाणून घेऊयात याबाबतीतली ताजी घडामोड. ६ नोव्हेंबर २०१७ रोजी American Society of Clinical Oncology (ASCO) ने अल्कोहोल आणि कर्करोग याबाबत नियतकालिकात जाहीर निवेदन दिलेले आहे. ‘First-time Statement’ अशा विशेषणासह त्याला ठळक प्रसिद्धी दिलेली आहे. त्यातील महत्वाचे मुद्दे असे आहेत:
१. अल्कोहोल हे पुढील सात अवयवांच्या कर्करोगास कारणीभूत ठरते (causal relationship) : तोंड, घसा, स्वरयंत्र, अन्ननलिका, यकृत, स्तन आणि मोठे आतडे.
२. तर जठर आणि स्वादुपिंडाच्या बाबतीत मात्र ते ‘कर्करोगपूरक’ आहे.
३. दीर्घकाळ अतिरिक्त मद्यपानाने कर्करोगाचा खूप धोका संभवतो आणि प्रमाणात (moderate) पिणे सुद्धा सुरक्षित नाही.
४. वैधानिक इशारा : “ तुम्हाला जर कर्करोगाचा धोका कमी करायचा असेल, तर खूप कमी ‘प्या’ आणि जर तुम्ही ‘पित’च नसाल तर अल्कोहोलच्या नादीच लागू नका !”

तर हे होते धूम्रपान आणि मद्यपानाशी संबंधित रसायनांचे विवेचन. अन्य रसायनांचा विचार विस्तारभयास्तव करीत नाही.

प्रतिबंधात्मक उपाय
संशोधनातील प्रगतीमुळे कर्करोगाच्या नवनव्या उपचारपद्धती विकसित होत आहेत. त्यामुळे जरी बऱ्याच कर्करोगांवर नियंत्रण मिळवणे शक्य झाले असले तरीही रोगप्रतिबंध हा कधीही श्रेष्ठ उपाय ठरतो. याबाबतीत जागतिक आरोग्य संघटनेने काही मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. या लेखाच्या विषयालाही ती लागू आहेत. त्यानुसार काही कर्करोग-प्रतिबंधक उपाय असे आहेत :
१. तंबाकूसेवन वर्ज्य
२. अल्कोहोलसेवन अत्यल्प
३. आहारात ‘अ’, ‘इ’ व ‘क’ जीवनसत्वांचा भरपूर वापर. तेव्हा गाजर, पालेभाज्या आणि लिंबू दणकून खात रहा.
४. शरीराच्या वजनावर नियंत्रण, कारण अतिरिक्त चरबी ही पेशींमध्ये कर्करोगपूरक परिस्थिती निर्माण करते. आणि,
५. विविध वैद्यकिय ‘चाळणी परीक्षा’ (screening tests) नियमित करून घेणे.

समारोप
एकूण मानवी कर्करोगांपैकी सुमारे ८०% हे रसायनांमुळे होतात हे कटू सत्य आहे. आपण निर्माण केलेल्या रसायनांच्या बेलगाम वापरामुळे तीच आता आपल्यावर बूमरॅंग झाली आहेत. त्यांचा वापर आणि संपर्क शक्य तेवढा कमी केला पाहिजे. अन्नातून शरीरात जाणारी रसायने कमी करण्यासाठी सेंद्रिय शेतीचा प्रसार वेगाने झाला पाहिजे. व्यसनांपासून दूर राहणे हे तर सर्वस्वी आपल्याच हातात आहे. औद्योगिक-प्रदूषण नियंत्रण कठोरपणे झाले पाहिजे. रसायनांमुळे होणारा कर्करोग हा गंभीर सामाजिक आरोग्यविषय विषय आहे. तो रोखण्यासाठी विविध स्तरांवर युद्धपातळीवर अंमलबजावणी व्हायला हवी. अन्यथा कर्करोगाचा भस्मासुर हळूहळू मानवजातीला गिळंकृत करण्यासाठी टपून बसलेला आहे.
******************************************

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अल्कोहोल आणि कर्करोग हा गेल्या सुमारे 30 वर्षांमध्ये जोरदार संशोधन झालेला विषय आहे. या संदर्भातील एक ताजे दीर्घ माहितीपत्र वाचायचे असल्यास येथे उपलब्ध आहे :
https://www.hhs.gov/sites/default/files/oash-alcohol-cancer-risk.pdf

सध्या तरी मला ते संपूर्ण वाचण्याइतका वेळ नाही पण भविष्यात कधीतरी या विषयावर स्वतंत्र धाग्यातून लिहायचा विचार करता येईल.

तूर्त सारांश म्हणून या विषयातील एका पाश्चात्य प्राध्यापकांचे मत लिहून थांबतो :

"There's no question that alcohol is a group 1 carcinogen. Alcohol can cause cancer.

-इति Timothy Rebbeck, PhD, professor of cancer prevention, Harvard T.H. Chan School of Public Health, Boston

आयर्लंडमध्ये मे 2026 पासून सर्व प्रकारच्या मद्याच्या बाटल्यांवर खालील मजकूर लाल रंगातील कॅपिटल लेटर्समध्ये छापणे बंधनकारक केले जाईल :
“THERE IS A DIRECT LINK BETWEEN ALCOHOL AND FATAL CANCERS”
आणि
“DRINKING ALCOHOL CAUSES LIVER CANCER.”

असे करणारा आयर्लंड हा जगातील पहिला देश ठरेल.
https://easl.eu/news/press-release-ireland-alcohol/

Pages