एका बाजूला सह्याद्रीच्या रांगा आणि दुसऱ्या बाजूला अरबी समुद्र यांच्या मध्ये असलेल्या चिंचोळ्या भूप्रदेशावर म्हणजेच कोकणावर निसर्गाने मुक्त हस्ताने उधळण केली आहे. त्यातल्या त्यात तळकोकण म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा तर निसर्ग सौंदर्याची खाणच आहे. या जिल्ह्यातील देवगड तालुक्यात ... हो हो तोच.. हापूस साठी प्रसिद्ध असलेल्या देवगड तालुक्यात नाडण हे अगदी रुक्ष नाव असलेलं एक छोटसं गाव आहे . जगाचा नकाशा बघितला तर हे गाव म्हणजे एक अति सूक्ष्म टिंब . कोणाच्या खिजगणतीतही नसलेलं. अर्थात ते जगासाठी, आमच्या साठी ते सर्वस्व आहे . कारण ते आमचं गाव आहे . " जननी जन्मभूमीश्च स्वर्गात अपि गरियसी" हे अगदी खरं आहे.
आता कोकण रेल्वे ने आरामात झोपून किंवा स्वतःच्या मोटारीने ही नऊ दहा तासात गावाला पोचता येते. पण साठ सत्तर वर्षांपूर्वी कोकणात जाणे म्हणजे दिव्य असे. माझे सासरे मुंबईहून गावाला पोचत दुसऱ्या दिवशी दिवेलागणीला . ते नेहमी पावसाळ्यातच गावाला जात असत. संध्याकाळची वेळ, दुशीकडे कमरे एवढ वाढलेलं गवत , लाईट नाही, मुंबईहून घरी न्यायला म्हणून कौतुकाने घेतलेल्या अनेक वस्तूमुळे वाढलेलं सामान अशा स्थितीत घर गाठणे म्हणजे कठीणच असे. बस स्टॉप वर दोन गडी कंदिल घेऊन हजर असत . तिथून पुढे दोन मैल चालत जावं लागे तेव्हा घर दिसत असे. माझ्या तिकडे राहणाऱ्या सासऱ्यांनी पूर्ण वाटभर कोणी रस्ता चुकू नये म्हणून खुणेचे दगड रचून ठेवले होते. त्यांच्या आधाराने गेलं तरच चकवा न लागता घरी पोचता येत असे.
मुंबई गोवा हायवे तळेऱ्याला सोडून मग पाटगाव फणसगव गाव मार्गे पन्नास एक किलोमीटर अंतरावर नाडण गाव आहे . किंवा कोकण रेल्वे ने वैभववाडी स्टेशन ला उतरून ही नाडणला जाता येतं. गाडीने गोवा हाय वे सोडला की लगेच ती प्राणवायूने पुरेपूर भरलेली ताजी हवा आपलं मन प्रसन्न करते. मे महिना असेल तर वाटेतल्या आंब्याच्या बागा, काजूची झाडं, करवंदाच्या जाळ्या, बहरलेली उक्षी, फुललेला पळस पांगारा, मंजुळ शीळ घालून आपलं स्वागत करणारे पण क्षणार्धातच दृष्टी आड होणारे अनेक प्रकारचे चिमुकले पक्षी , दोन बागांमध्ये आणि रस्त्याच्या कडेला एका सरळ रेषेत घातलेले गडगे , आसमंतात भरून राहिलेला रानाचा म्हणून असतो तो खास वास हे सगळ आपल्याला आपण आता थोड्याच वेळात घरी पोचणार हे सारखं सांगत असतात तरी ही मन अधीर झाल्याने तो शेवटचा टप्पा संपता संपत नाहीये अस वाटत राहतं. पडेल, वाडा ही गाव मागे टाकत आपण अखेर नाडणात येउन पोचतो.
रस्ता गावातला
घाटी
गडगा
करवंद
अंजन
गाडी थोडी उंचावर थांबते पण त्यामुळे उतरल्या उतरल्या आपल्याला परिसराचा एरियल व्ह्यू घेता येतो. आजूबाजूच्या हिरवाईत लपलेलं ते आमचं कौलारू घर कौतुकाने बघताना प्रवासाचा सगळा शिणवटा क्षणात नाहीसा होतो. “ काकू आली …… काकू आली” म्हणत मुलं घाटी चढून बॅग घ्यायला येतात. त्यांच्याबरोबर नवीन माणसाचं स्वागत करायला जॉनी असतोच. तो एकदा आपल्याला हुंगतो आणि मग आपल्या मागेपुढे करत राहतो ... आपलं स्वागत म्हणून. गोठ्यातून गाईचं हंबरण ऐकू येत. तिथे धार काढणारा गडी " वैनीनू , इलासा " म्हणून आपलं स्वागत करतो. अंगणात आलं की सैपाकघरात रटरटणाऱ्या कुळथाच्या पिठल्याचा घमघमाट आपल्या नाकात शिरतो तेंव्हा मात्र खरचं आलो आपण घरी ही भावना मनाच्या तळापर्यंत झिरपत जाते.
आमचं नाडण हे एक अगदी लहान जेमतेम दोन अडीच हजार वस्ती असलेलं खेडं आहे. गावात दुकान म्हणाल तर चहा पावडर, साखर ,तेल अशाच गोष्टी मिळतील एवढच मोठं. शाळा आहे फक्त सातवी पर्यंत . परंतु अलीकडे झालेल्या वाडातर पुलामुळे ते देवगडशी जोडलं गेलं आहे. डॉक्टर, शाळा कॉलेज, दुकान, खरेदी सगळ्यासाठी देवगड.
दोन टेकड्यांच्या उतारावर ते वसलं आहे. आणि मधून वहातो एक व्हाळ म्हणजे ओढा. घरं सगळी व्हाळाच्या जवळ पासच आहेत .याचे कारण व्हाळाच्या जवळच्या विहिरीनाच पाणी लागतं . जस जसे वर जाल तसं पाणी दुर्मिळ होत जातं आणि त्यामुळे साहजिकच तिथे मनुष्य वस्ती ही नाही . त्यातल्या त्यात सधन लोकांची घरं नॅचरली व्हाळापासून थोडी वर पण फार वर ही नाही अशा लोकेशन ला आहेत. गरीब वस्ती सहाजिकच व्हाळापासून अगदी जवळ आहे. पावसाळ्यात अशा घरांना कायमच पुराचा धोका असतो.
गाव टेकडीच्या उतारावर असल्याने गावात सगळीकडेच खाली गेलं की व्हाळ आणि वर गेलं की टेकडी माथा असं चित्र आहे. खालती व्हाळाजवळ माड पोफळी आणि वरती आंब्या फणसाची झाडं असं प्रत्येकाच्याच आवारात असल्याने चारी बाजूने फक्त हिरवाईच दिसते आम्हाला. कोकणात टेकड्या चढण्यासाठी दगडाच्या पायऱ्यांचा जिना केलेला असतो. ह्याच त्या कोकणातल्या घाट्या. एकदा खाली किंवा वर जाणं ही आपल्या फिटनेस ची टेस्टच असते. मे महिन्यात कामवाल्या बायका आंब्यांची भली मोठी ओझी एक घाटी चढून आणि एक उतरून रस्त्यापर्यंत आणतात तेव्हा त्यांच्या बद्दल खूप वाईट वाटत. श्रमपरिहर म्हणून त्यांना ताक, सरबत, गूळ - पाणी असं दिलं जात . पण आमच्या काही बागा इतक्या आडनीड्या ठिकाणी आहेत की तिथे गाडी जाणं अशक्य कोटीतली गोष्ट आहे. बाजारात आपण तयार आंबे विकत घेतो तेव्हा अशा गोष्टींची कल्पना ही नसते आपल्याला.
माझे आजे सासरे नाडणालाच माती विकण्याचा व्यवसाय करीत असत. तिथे त्या काळी तो कितीसा चालत असेल ही शंकाच आहे . पण त्यांच्याकडे दूरदृष्टी होती आणि ते प्रयोगशील ही होते. आमच्याच पडीक असलेल्या जमिनीत त्यांनी काबाडकष्ट करून आंब्याची कलमं लावली . त्यांच्या हयातीत त्यांना जरी फळ चाखायला मिळाली नाहीत तरी आज त्यांची पंतवंड त्याची फळ चाखत आहेत. शंभर सव्वाशे वर्षापूर्वी लावलेली ती कलम आज ही भरपूर धरतात. काही कलमं इतकी विस्तारली आहेत की मूळ झाड शोधावं लागतं आणि काही इतकी उंच झाली आहेत की उंच शिडी लावल्या शिवाय त्यावर चढताच येत नाही.
आमच्या वठारात म्हणजे वाडीत चार पाच घरं जवळ जवळ आहेत. त्यामुळे शेजाऱ्यांची सोबत आम्हाला सगळ्यानाच मिळते जी गावाकडे आवश्यकच असते. पूर्वेकडे ज्यांचं घर आहे ते उगवते म्हणून आणि आमचं घर पश्चिमेला असल्याने सहाजिकच आम्ही मावळते म्हणून ओळखले जातो. आमचं हे घर ही माझ्या आजे सासऱ्यांनी स्वतःच्या हातानी बांधलं आहे, कोणा ही गवंड्याची किंवा सुताराची मदत न घेता. आमच्या घराजवळची घाटी ही त्यांनी स्वतःच बांधली आहे . त्यामुळे त्या घाटीचं आम्हाला जरा जास्तच कौतुक. आज शंभर सव्व्वाशे वर्ष झाली तरी तशीच मजबूत आहे . एक दगड हलला नाहीये. असो. घराची रचना ओटी, पडवी, माजघर, सैपाकघर आणि परसदार अशी आहे. आता मातीच्या भिंती जाऊन सिमेंटच्या आल्या आहेत, जमिनीला ही फरशा बसवल्या गेल्या आहेत . घराचं पाखं थोडं अधिक उंच केलं गेलं आहे . नळीची कौलं जाऊन मंगलोरी कौलं घातली गेली आहेत. कालानुरूप गरजेचे असणारे इतर ही अनेक बदल झाले आहेत. पण ते सगळे मूळ घर आहे तसेच ठेऊन .
वाढणाऱ्या कुटुंबाला रहातं मूळ घर कमी पडत होतं म्हणून मूळ घराच्या खालच्या लेव्हलला एक माडी बांधली आहे . मूळ घराची लेव्हल आणि खालच्या माडीची लेव्हल एकच असल्याने मूळ घर आणि माडी याना जोडणारा एक छोटासा पूल बांधला आहे. त्यामुळे माडी मूळ घरा पासून वेगळी न राहता मूळ घराचाच एक भाग बनली आहे.
घर किती ही चांगलं असलं तरी घराला शोभा येते ती माणसांमुळे. आज त्या घरात पंधरा माणसं अगदी गुण्या गोविंदाने राहत आहेत. कोकणात खरं तर घरांना नावं बिव नसतात शहरात बंगल्याना असतात तशी. परंतु मध्यंतरी आमच्याच घरातल्या एक शाळकरी मुलाने शाळेतल्या हस्तव्यवसायाचा भाग म्हणून घराची पाटी तयार केली होती. आमच्या घराचं " गोकुळ " हे नाव सर्वार्थाने सार्थ करणारी ती पाटी आम्ही अभिमानाने घरावर लावली आहे.
मोहना गावाचं नाव मस्तच मोसम.
मोहना गावाचं नाव मस्तच मोसम.
खरं म्हणजे संपूर्ण कोकण निसर्गाने नटलेलं आणि त्यातील प्रत्येक खेडेगाव आपली स्वतःची स्वतंत्र ओळख सांगणारे आहे.
खूप छान... दुशीकडे म्हणजे काय
खूप छान... दुशीकडे म्हणजे काय?
आमचो तालुको कणकवली पण
आमचो तालुको कणकवली पण कासारड्यातसून विजयदुर्ग रोड घेवचो लागता. कोणी पै पावणे इले की तेंका घेवून देवगड, कुणकेश्वर ची ट्रिप करतंत.
म्मो, एवढे लिखाण मोबाईलवौन
ममो, एवढे लिखाण मोबाईलवरून केलेत! बापरे
ममो,खूप छान शैली आहे तुझी
ममो,खूप छान शैली आहे तुझी.प्रकाशचित्रे नसूनही केवळ शब्द सामर्थ्याने तुझ्या बरोबर प्रवास करतो आहोत व गोकुळच्या उंबरठ्यावर ऊभे आहोतअसेच वाटते.आता घरात जाऊन तुझ्या कुटुंबाला ,तुझ्या जिवंत शब्दमाध्यमातून भेटण्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.लवकरच पुस्तक येऊ दे महणजे सलगपणे तुझ्या घरात मनसोक्त केंव्हाही फिरता येईल.वाट बघतोय पुस्तकाची!
ममो,तझी लेखन शैली खूपच छान
ममो,तझी लेखन शैली खूपच छान आहे.प्रकाशचित्रे नसूनही तुझ्याबरोबर प्रवास करत तुमच्या गोकुळाच्या उंबरठ्यावर आणून उभं केलस.पण आता केंव्हा एकदा तुझ्या घरात येऊन तुझ्या कुटुंबाला ,तुझ्या शब्दमाध्यमातून भेटतोय असं झालंय.पण आता पुस्तक येऊ दे म्हणजे तुझ्या गावात, घरात,व मनात केव्हाही शिरून ताजंतवानं होता य़ेईल.नाडणच्या हवेइतकाच तुझ्या लिहीण्यातही पुरेपूर प्राणवायु आहे.पुस्तकाचं मनावर घेच.
प्रतिसाद दोनवेळा झाला.
सुंदर वर्णन.. वाचल्यानंतर
सुंदर वर्णन.. वाचल्यानंतर वाटले की प्रचि असते तर लेख अजून छान वाटला असता; पण वाचून जे चित्र मनात उभे राहीले तेच मस्त वाटते आहे.
बहुतेक? मधु मंगेश कर्णिक यांच्या कोकणातील /? गोव्यातील घराबद्दलच्या मराठी पाठ्यपुस्तकातील धड्याची आठवण झाली.
छान.. फोटहो पाहिजेत
छान.. फोटहो पाहिजेत
ममो, छान लिहिलंय. खुप मस्त
ममो, छान लिहिलंय. खुप मस्त वाटतं तुमच्या गावचं वर्णन वाचुन. फोटो हवे होते.
दुशीकडुन म्हणजे दोन्हीकडुन, दोन्ही बाजुनी.
मलाही माझं गाव खुप आवडतं.
वरणतूपभात,
ममो, मस्त ग! आपलं कोकण आहेच
ममो, मस्त ग! आपलं कोकण आहेच सुंदर!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
तळेरे,वैभववाडी वगैरे नावे ऐकूनच तिथ फ़िरतेय असं वाटलं. ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
त्यातल्या त्यात तळकोकण म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा तर निसर्ग सौंदर्याची खाणच आहे. >>>>>>हो हो आहेच.
दुशीकडे कमरे एवढ वाढलेलं गवत ,>>>>>>>>>>अगदी हे वाचताना आमचं रात्री घरी येणं आठ्वलं . आम्ही तर बुडून जायचो त्या गवतात.
दुशीकडुन >>>>>>>हा शब्द अजूनही मी वापरते.
मे महिना असेल तर वाटेतल्या आंब्याच्या बागा, काजूची झाडं, करवंदाच्या जाळ्या, बहरलेली उक्षी, फुललेला पळस पांगारा, मंजुळ शीळ घालून आपलं स्वागत करणारे पण क्षणार्धातच दृष्टी आड होणारे अनेक प्रकारचे चिमुकले पक्षी , दोन बागांमध्ये आणि रस्त्याच्या कडेला एका सरळ रेषेत घातलेले गडगे , आसमंतात भरून राहिलेला रानाचा म्हणून असतो तो खास वास >>>>>>>>>>>मस्त वर्णन. मोहोराचा वासही आसमंतात भरलेला असतो. सुंदर!
लिहीत रहा ! लिहीत रहा !![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
खरं म्हणजे देवगड तालुक्याचा
खरं म्हणजे देवगड तालुक्याचा आपला एक बाज वेगळाच आहे कारण तो रत्नागिरी जिल्हा संपल्यावर आणि सिंधुदुर्ग जिल्हा सुरू झाल्यावर लगेच आहे.
खरं म्हणजे संपूर्ण कोकण निसर्गाने नटलेलं आणि त्यातील प्रत्येक खेडेगाव आपली स्वतःची स्वतंत्र ओळख सांगणारे आहे. >> अंजू, बरोबर आहे , मस्त निरीक्षण , पटलं पूर्णपणे.
मीरा, किती सुंदर लिहिलं आहेस. तुझं निरीक्षण अचूक आहे. कोकण, गाव, घर, गोकुळ ... खरच पुस्तक काढायचा विचार आहे. बघू कसं आणि कधी जमत ते.
सस्मित, प्रत्येकालाच आपलं गाव आवडत, प्रत्येक गाव वेगळं असलं तरी. तू पण सांग ना काही तुमच्या गावाबद्दल . मजा येईल वाचताना .
शोभा किती सुंदर लिहितेस तू. खूप आवडला प्रतिसाद.
मधु मंगेश कर्णिक यांच्या कोकणातील /? गोव्यातील घराबद्दलच्या मराठी पाठ्यपुस्तकातील धड्याची आठवण झाली. >> काय बोलू विवेक , त्यांची आणि माझी तुलना पण होणार नाहीये मला माहितेय, पण तुम्ही तसं लिहिलंत खूप खूप आभार.
फोटो हवे असतील तर मी माझ्या बऱ्याच लेखात खूप फोटो दाखवलेत आमच्या घराचे, अंगणाचे, आगराचे, घाटीचे... रिपीटेशन होईल म्हणून इथे नाही दिलेत .
इतक्या उत्साह वाढवणाऱ्या प्रतिसादा साठी पुन्हा एकदा धन्यवाद सर्वाना.
घाटीचे.>>>>>>>>>घाटीचा तरी
घाटीचे.>>>>>>>>>घाटीचा तरी देच. खूप वर्षात दर्शन नाही घाटीच.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
@ ममो आम्ही ते फोटो बघत आलोय
@ ममो आम्ही ते फोटो बघत आलोय. किंबहुना हे सारे आमच्या ओळखीचे आहे अगदी कालच जाऊन आल्याचे फिलींग असते हा Unique Seling Point आहे तुमच्या लिखाणशैलीचा . पण तुमचे लिखाण आणि सोबत प्रचि ने लज्जत वाढते लेखाची म्हणून आग्रह .
नेहमीप्रमाणेच ओघवत आणि सुंदर
नेहमीप्रमाणेच ओघवत आणि सुंदर ममो..
हेमा ताई, फार म्हणजे फारच
हेमा ताई, फार म्हणजे फारच आवडला लेख!!!
खुप छान.
अगदी सगळं चीत्र डोळ्यापुढे उभ केलत..
खुपच छान लिहिलय...
खुपच छान लिहिलय...
खूप मस्त!
खूप मस्त!![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
दुशीकडे... खूप दिवसांनी हा शब्द इतक्या सहजपणे वाचायला मिळाला, भयंकर आनंद झालेला आहे!
गरम पातेलं उचलायची गावी, दुशीकडे, आगरा-परसात साप आला तर 'जनावर निघालं!' हा खास उल्लेख, केलंनी-घेतलंनी हे खास शब्द मी फार्फार मिस करते!
ममो, फोटो का नाहीत?
गरम पातेलं उचलायची गावी >>>
गरम पातेलं उचलायची गावी >>> येसस्स्स. मी म्हणते कधीतरी अजूनही मुलांना नवऱ्याला माहीती होण्यासाठी![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
ममो आम्ही ते फोटो बघत आलोय.
ममो आम्ही ते फोटो बघत आलोय. किंबहुना हे सारे आमच्या ओळखीचे आहे अगदी कालच जाऊन आल्याचे फिलींग असते हा Unique Seling Point आहे तुमच्या लिखाणशैलीचा . >> पाथफाइण्डर, खूप खूप धन्यवाद।
सायु, टीना, प्रज्ञा, धन्स.
प्रज्ञा आमच्याकडे कडे मी ही गावी च म्हणते पकडीला .
चिमटा म्हणजे कोळश्याचा . अर्थात आता कोळसे नाही कोणी वापरत पण तरी ही. एकदा एक बाई पाव्हण्या आल्या होत्या आमच्याकडे ठाण्याला, म्हणून मी गावी हा शब्द मुद्दाम टाळून " पकड द्या" असं म्हटलं तर त्या म्हणतात " ही घ्या गावी . त्या ही कोकणातल्याच होत्या आणि पकडीला गावीच म्हणत होत्या.
गावाहून आलं की काही दिवस आमच्या ही तोंडात केलेनी गेलेनी... अशीच भाषा येते. मग थोडे दिवसानी कमी होतं तसं बोलणं. आज मस्त आठवण करून दिलीस तू.
फोटो दाखवते. मोबाईल वर आहे सध्या म्हणून थोडा वेळ लागेल.
मोबाईलवरुन एवढा लेख लिहीणं,
मोबाईलवरुन एवढा लेख लिहीणं, ग्रेटंच. मला चार वाक्य लिहीताना धाप लागते.
कोकणात गावीच म्हणतात, मी
कोकणात गावीच म्हणतात, मी मात्र चिमटा म्हणते. बाबा कोकणातले, आई कोकणातली असून बडोद्याला वाढलेली त्यामुळे आम्ही मुलं काही शब्द आईचे, काही बाबांचे वापरतो.
गरम पातेलं उचलायची गावी ..
गरम पातेलं उचलायची गावी .. आजी म्हणायची पकडीला.
मस्त लिहिलंय !!
मस्त लिहिलंय !!
अंजू, google indic key board
अंजू, google indic key board आहे मोबाईल मध्ये . त्यात मराठी टाईप करणे खूप सोपं आणि फास्ट होतं.
गावी वरून मस्त रंगल्या गप्पा .
Anjut प्रतिसादाबद्दल धन्यवाद .
काही फोटो अपलोड केलेत . शोभा, घाटीचा फोटो खास तुझ्यासाठी.
धन्यवाद ममो .
धन्यवाद ममो .
गावातला रस्ता, गडगा...अहाहा,
गावातला रस्ता, गडगा...अहाहा, एकदम नॉस्टलजिया
सुन्दर वर्णन.
सुन्दर वर्णन.
कोकण आहेच सुन्दर.
तुमचे लिखाण ही छान!!
आवडले.
अन्जन च्या झाडाची जाम्भळी
अन्जन च्या झाडाची जाम्भळी फुले मस्तच.
ओघवत लिखाण . छान लिहिलं आहे.
ओघवत लिखाण . छान लिहिलं आहे.
वाह, खूपच सुंदर लिहिलय....
वाह, खूपच सुंदर लिहिलय.... अगदी चित्रदर्शी आणि जिव्हाळ्यानं ओथंबलेलं ..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आवडलंच अगदी...
Pages