मन्यु

Submitted by सेन्साय on 20 November, 2017 - 03:37

.

.


श्री.कर्णिकांच्या घरी इनमिन दोनच माणसं, व्हीआरएस घेवून आपली तब्येत सांभाळत चित्रकलेचा छंद जोपासणारे सुरेशकाका आणि सकाळ संध्याकाळ हरि स्मरणात तल्लीन असूनही सर्व घर सुंदर रित्या सांभाळणाऱ्या रमाकाकू. विनापत्य असलेल्या कर्णिक दांपत्याला शेजारच्या दीक्षित काकुंनी आपल्याकड़े नविनच घरकामास लागलेल्या कमलताईच्या चिमुरडीस खरं तर आपल्या घरात लुड़बुड नको म्हणून शेजारी पाठवण्यास सुरुवात केली होती. पण त्या सकाळच्या दोन तासासाठी येणारी ही चिमुरडी स्वाती थोड्याच दिवसात एवढी सहजपणे त्यांच्यात मिसळून गेली की जणु त्यांची नात असल्यागत स्वाती कर्णिकच्या थाटात व आपुलकीने घरभर प्रेमाने वावरु लागली. चुणचुणीत स्वाती भलेही वयाने कमी असली तरी रमा काकूंना घरकामात हातभार लावायला एकदम तत्पर असायची. तिच्या निमित्ताने घरही भरल्यासारखे वाटायचे म्हणून कर्णिक दांपत्य खुश असे तर छान छान खायला मिळे म्हणून स्वातीसुद्धा खुश; असा सगळा त्यांचा रोजचा मामला सुरु होता.

सुरेश काका प्रेमाने तिला नवीन नवीन गोष्टी वाचून दाखवत अभ्यासाची गोडी लावण्यासाठी प्रयत्न करत तर स्वातीसुद्धा तेवढ्याच उत्साहाने सर्व काही आत्मसात करत स्वत:ची प्रगती साधून घेत होती. फुकट कोणाकडून काही घ्यायचे नाही हे आपल्या आईचे बोल स्वाती अगदी कुठेही गेली तरी आवर्जून लक्षात ठेवून त्याचप्रमाणे वागत असे. जुनाच विटलेला एकच एक स्कर्ट आणि त्यावर मळकट टीशर्ट अश्या अवतारातील असली म्हणून कर्णिकांकडे काहीही फुकट खाणे तिच्या स्वभावात बसूच शकत नव्हते आणि ह्यासाठी ही स्वाभिमानी चिमुरडी रमाकाकुंना थोडीफार मदत करायची. कधी भाजी चिरून दे तर कधी भांडी घासून दे असे पडेल ते आणि दिसेल ते काम ती नेहमीच आवडीने करे. हिचा वाढदिवस सुद्धा नेमका १४ नोव्हेंबरला ... त्यामुळे तर त्यादिवशी तिचे कर्णिकांच्या घरी डबल लाड सुरु होते. खूप छान छान गिफ्ट्स सोबत टीव्हीवर सिरियलमध्ये पाहून तिला आवडलेला आणि मनात भरलेला नारिंगी फ्रॉकसुद्धा रमाकाकुंनी भेट दिल्यामुळे तर तिच्या आनंदाला पारावर उरला नव्हता. लगेचच ती तो झगमगीत फ्रॉक घालून अख्ख्या गल्लीत मिरवून आली होती. मात्र दुसऱ्या दिवशी पुन्हा आपल्या जुन्याच साध्या अवतारात आलेली पाहून रमाकाकाकुंना जरा आश्चर्यच वाटले. त्यांच्या कल्पनेप्रमाणे हि छोटी परी आता किमान आठवडाभर तरी तो नवीन ड्रेस उतरवणार नव्हती. पण ह्या कल्पनेला धक्का बसला आणि तिचे भांडी घासतानाचे हसतमुख गुणगुणणे ऐकून तर त्याहून जास्त धक्का बसला.

ती टीव्ही सिरीयल पाहताना जे गाणे गात त्यातील चिमुकली त्या नारिंगी फ्रॉकवर छान गिरक्या घेत नाचत असे तेच ह्या स्वातीचे आवडीचे गाणे ती भांडी घासण्यात तल्लीन होवून छान पैकी मोठ्यानेच गुणगुणत होती. ही तिची बडबड ऐकूनच रमा काकूंनी तिला तसाच फ्रॉक गिफ्ट द्यायचा बेत आखला होता. पण लगेचच दुसऱ्या दिवशी तो ड्रेस साठवणीत ठेवून आधीचाच फाटका ड्रेस घालून आलेली स्वाती तेवढ्याच उत्साहाने आणि कौतुकाने ते गाणे म्हणत होती. ज्या आनंदाने ती काल प्रत्यक्ष नव्या ड्रेस मध्ये नाचली गायली तो आज अंगावर नसला तरी जुन्या फाटक्या कपड्यात वावरतानाही तिच्या चेहऱ्यावर तोच निर्भेळ आनंद ओसंडून वाहत होता.

असमर्थपणे फाटके लेणे | समर्थपणेही तैसेच करणे |
या नाव दैन्य संपन्नपणे मिरवणे | भावनेगुणे सुख दु:ख ||

हे पाहून सुरेश काकांना पटकन आजच पहाटे वाचलेली श्रीसाईंसच्चरितातील दासगणू महाराजांची ईशावास्य संबधी एक कथा आठवली आणि ते कौतुकाने आपल्या पत्नीकडे पाहत श्री साईचरित्रातील ओव्या म्हणत त्या दृश्याची एकरूपता सांगू लागले. दुसऱ्यांचा नारिंगी फ्रॉक पाहून आनंदाने नाचणारी ही मुलगी त्याच प्रकारचा स्वत:चा ड्रेस मिळाल्यावर तेवढ्याच आनंदाने नाचते, हे तिच्याकडे असणारे चैतन्य आहे. चैतन्य म्हणजे काय ? तर रसरशीतपणा... प्रेममय जीवन.... जो परमेश्वराला सर्वात आवडणारा गुण आहे.

परमेश्वराला आवडणारे चैतन्यमय जीवन म्हणजेच शरीर, मन व बुद्धी ह्यांची अभिव्यक्ती करायला मनुष्य स्वतंत्र असायला पाहिजे. असे जीवन मी जेव्हा भगवंतास अर्पण करतो तेव्हा ते त्यास जास्त आवडते. जीवनाच्या प्रत्येक आनंदाच्या क्षणी आपण कोणाशीतरी तुलना करत घालवत असल्याने रुक्षता येते. स्वातीकडे तुलना करणे हा प्रकारच तिच्या जीवनात तिने अस्तित्वात ठेवलेला नाही म्हणूनच तिच्या जीवनात रुक्षता नाही; तर तिचे जीवन कायम स्निग्धता, रसरशीतपणा, प्रेममयता, आनंद ह्यांनीच भरलेले आहे.

१)
दुसऱ्याचा नारिंगी फ्रॉक पाहून झालेला आनंद
+
माझ्याकडे तसा फ्रॉक नाही म्हणून झालेले दु:ख

= लोभ, मोह, मत्सर
आणि म्हणूनच अंतिमत: दु:खच !

२)
दुसऱ्याचा नारिंगी फ्रॉक पाहून झालेला आनंद

माझ्याकडे तसा फ्रॉक नाही म्हणून झालेले दु:ख

= रुक्षता (अभाव)
आणि म्हणूनच अंतिमत: दु:खच !

३)
दुसऱ्याचा नारिंगी फ्रॉक पाहून झालेला आनंद
+
माझ्याकडे तसाच फ्रॉक आहे म्हणून झालेला आनंद

= तुलना
आणि म्हणूनच अंतिमत: दु:खच !

४)
दुसऱ्याचा नारिंगी फ्रॉक पाहून झालेला आनंद

माझ्याकडे तसाच फ्रॉक आहे म्हणून झालेला आनंद

= अहंकार
आणि म्हणूनच अंतिमत: दु:खच !

येथे कोठेही एका गोष्टीतून दुसरीला पूर्णत्व येवूच शकत नाही त्यामुळे आपल्या जगात अनेकवेळा दु:खच जास्त प्रमाणात दिसून येते. म्हणूनच येथे माझ्याकडे नवीन फ्रॉक आहे ह्याचाही आनंद आणि माझ्याकडे तसा फ्रॉक नाहीये तरीही तिला असलेला आनंद हा स्वातीचा गुण म्हणजेच आपल्याला अंतिमत: सुख देणारा निर्भेळ आनंद ! दोन्ही दिवशी ह्या स्वातीचा कामातील उत्साह तसेच जीवन जगण्यातील उत्साह सारखाच आहे. आणि तो सकारात्मकच आहे. उत्साहाला संस्कृत शब्द आहे “मन्यु” म्हणजेच जिवंत रसरशीत स्निग्ध उत्साह ! उत्साह म्हणजेच आपल्या शरीरातील पंचप्राणांच्या प्रत्येक क्रियेला मनाची आणि बुद्धीची उचित साथ मिळवून देवून कार्य संपन्न करणारी शक्ति. भगवंतावरील पूर्ण विश्वासातूनच आपल्याला हि शक्ति मिळू शकते.

नामरूपात्मक हे विश्व | सबाह्य आच्छादि हा ईश |
तो मीच भरलो अशेष | निर्विशेष रुपत्वे ||

एकदम साधे सोपे सिम्पल लॉजिक आपल्याला मार्गदर्शक ठरणाऱ्या संतांच्या आचरणातून, निरीक्षणातून अनुभवता येते. सच्चीदानंद स्वरूप असणारा परमात्मा आपल्या भाव विश्वात अंतर्बाह्य व्यापून राहिला तर आपलेही जीवन त्रिविध पातळीवर सुंदर आणि आनंदमयी होऊ शकते हे संत सावता माळी आपल्याला कृतीनेच दाखवून देतात. कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझी म्हणताना पंढरपूरच्या ह्या विठ्ठलास संतांनी फक्त त्या देवळातच न ठेवता आपल्या दैनंदिन आचरणात आणला, प्रत्येक क्षणाला स्वीकारला आणि समग्र जीवनच विठ्ठलमय करून ठेवले. कोणी म्हटले कि मी तर देवाला मानतच नाही तरी माझ्यासाठी माझे ऑफिसचे प्रोजेक्ट, माझे किचनमधील काम, माझा अभ्यास हे सर्व आपल्याला यश देणाऱ्या कृती असतील तर त्या सुद्धा आपल्यासाठी देवाचीच आकृती बनू शकतात नं ! प्रत्येकाचा देव वेगवेगळा असला तरी त्यावरचा संपूर्ण विश्वास हा महत्वाचा..

जैसी भावना तैसे फळ | विश्वास तैसे बळ | अंत:करण जैसे प्रेमळ | बोधही निर्मळ तैसाच ||
(श्री साईसच्चरित)

― अंबज्ञ

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान ललित

एक सुधारणा कराल का?
>>>मानभावी चिमुरडी >>>> चे मानी /स्वाभिमानी चिमुरडी असे कराल का?
मानभावी ला निगेटिव्ह अर्थ आहे साळसूद वगैरे च्या जवळ जाणारा.

छान