भोज्या :- भाग ४

Submitted by अतरंगी on 12 November, 2017 - 01:22

"च्यायला, तिसरा दिवस संपायला आला, हे रेस्क्यू वाले कुठं कडमडले आहेत ?"

" येतील रे. आत्ता कुठं तिसरा दिवस आहे. यासीनशी कॉन्टॅक्ट झाला की येतील शोधत"

" आणि तो नाही झाला तर ?"

" अरे त्याने जाताना इंस्पेक्शन रिक्वेस्ट पाठवली असेल, ती बघून बार्टची ट्यूब पेटेल की"

"अरे पण तो यासिन किती वेंधळा आहे, इथे आपल्याला बोलला की रिक्वेस्ट टाकतो आणि ऑफिस ला गेल्यावर विसरला असेल तर ?"

" असं पण होऊ शकतं. एक काम करता येईल 67 चा नवीन रूट जास्त लांब नाही, त्या रूट वर जाऊन एक साइन बोर्ड लावला तर? रेस्क्यू टीम ला येवो न येवो, येणाऱ्या जाणाऱ्या कोणत्या तरी गाडीला दिसू शकेल की"

"Not a bad idea bro. चल मॅप काढ. नवीन रूट अंदाजे मॅप वर मार्क करू आणि पहाटे पहाटे जाऊन तिथे गाडी बंद पडल्यावर रेडियमचा ट्रँगल लावतात तो लावून येऊ. गाडीत एखादा कागद असेलच त्याच्यावर नोट लिहून ती त्याच्यावर अडकवून ठेऊ. पण तो कागद उडून गेला तर ? "

"दोन कागद करू, एक त्या रेडियम खाली ठेऊ , एक त्यात अडकवून ठेऊ"

" पण आज रात्री आपण गाडीतलं इंजिन ऑइल काढणार होतो. "

"एक काम करू पहाटे साडे तीन ला सुरुवात करू आधी ऑइल काढू मग जाऊन बोर्ड लावून येऊ. चल जरा डोळे बंद करून पडू या. तेवढीच एक डुलकी होईल"

"कसली डोंबलाची डुलकी काढतोय, पेट्रोल संपलंय. बसल्या जागी काही न करता घामाच्या धारा वाहत आहेत. तहान आणि भुकेने वैताग आलाय. च्यायला त्या चक आणि विल्सनचं बरं होतं. मस्त पैकी बेटावर अडकले होते, भरपूर नारळपाणी, खायला फळं, मासे, खोबरं. आपण इथं वाळवंटात, मोजून अडीच लिटर पाणी, एक स्निकर्स आणि थोडे ड्राय फ्रुट शिल्लक आहेत. त्यात किती वेळ तग धरणार? युरिन मधून डिस्टीलेशन होऊन थोडे फार पाणी मिळेल"

" तुला इथे दोन चार दिवसात सोडवायला कोणीतरी येईल नाहीतर हिट स्ट्रोकने तरी मरशील. त्या बिचाऱ्या चकला ना सोडवायला कोणी पोचलं ना त्याला आत्महत्या करता आली. चार का पाच वर्षे भुतासारखा त्या बेटावर एकटा राहिला तो! रडत बसण्यापेक्षा काय करायचे ते विचार कर.

"Hmmm ते पण खरंय म्हणा. रात्री कम्प्रेसर डायरेक्ट बॅटरी ला जोडून चालतोय का बघू या. हवेचा वापर करून डिस्टीलेशन करता येतंय का बघू या. अरे यार, जर कम्प्रेसर चालला तर एक Y शेप जॉईंट बनवून कॉम्प्रेसरला आणि युरिन बॉटल कनेक्शन कंबाईन केली तर कंडेंसेशन लवकर होईल का ? का सगळी वाफ नुसता बाहेर ढकलली जाईल ?"

"बहुतेक नुसताच वाफ उडून जाईल. पण कम्प्रेसर ने गाडीतली हवा खेळती राहू शकते"

"ह्या अरे केवढास जीव त्या कम्प्रेसरचा. तो का इंडस्ट्रीयल कम्प्रेसर आहे का इतकी मोठी गाडी गार करायला ?"

डोकं जरी अजून टकाटक चालत असलं तरी एनर्जी लेव्हल खूपच ड्रॉप झाली आहे. मागच्या अठ्ठेचाळीस तासात फक्त दोन लिटर पाणी, एक स्निकर्स आणि थोडे ड्राय फ्रुट पोटात गेले आहेत. काल पेक्षा घाम येण्याचे प्रमाण खूपच कमी झाले आहे. ते शरीरात पाणी कमी झाल्याने की, शरीराने उन्हाशी ऍडजस्ट केल्याने, हे नक्की माहीत नाही. ओठ आणि तोंड भयानक कोरडे पडले आहे. लघवीला जाताना जळजळ व्हायला सुरुवात झाली आहे. डिहायड्रेशनची सगळी लक्षणं दिसायला लागली आहेत.

आज रात्री शेवटचं गाडीतुन बाहेर पडायचंय. रूट 67 वर जाऊन रिफ्लेक्टर लावून यायला पाहिजे. त्यासाठी एक मोठा डोंगर पार करून जायचं आणि परत येऊन टूलकिटच्या बॉक्समध्ये गाडीतले ऑइल काढायचं, या सगळ्यात चांगलीच एनर्जी आणि पाणी खर्च होणार आहे. गाडीच्या AC मुळे सकाळी डिस्टीलेशन जमलंय, पण बिना AC होणे अवघड दिसतंय. सकाळपासून डिस्टीलेशन केलेली युरिन, गाडीतून काढलेलं पाणी आणि मिनरल वॉटर याचे मिक्सिंग करून पितोय.

आज रात्रभर जरा उकाडा कमी असेल असं दिसतंय, छान वारं सुटलंय.

रात्री गाडीच्या टपावर जाऊन काढलेली झोपमोड झाली ती पोटात होणाऱ्या गुडगुडीमुळे. पोट रिकामं करायला गेलो तेव्हा काळजाचा ठोका चुकला.

जुलाब !

गाडी अडकल्यापासून पहिल्यांदाच जाम भीती वाटली. जुलाब एकदा झाले असतील तर ठीक आहे, पण चालूच राहिले तर माझा सर्व्हायव्हल टाइम दिवसांवरून तासांवर येणार आहे.

पण जुलाब व्हायचं कारण काय? घरून निघताना जेऊन निघालो, एका एअरपोर्ट वर सँडविच, दुसऱ्यावर बर्गर, इथे आल्यापासून स्निकर्स आणि ड्राय फ्रुट. याशिवाय काही खाल्लेलंच नाही. गाडीतून काढलेलं पाणी ? डिस्टीलेशन केलेली युरिन ? नक्की काय ? आपलं पोट इतकं काय कमजोर नाहीये. पण प्रवासाची दगदग, भारतातल्या आणि इकडच्या वातावरणातला बदल, गाडी अडकल्या पासून पाण्याचे आणि जेवणाचे रेशनिंग, त्यात डोक्यावर आग ओकणारा सूर्य..... या सगळ्याचा जॉईंट इफेक्ट असावा का ? गाडीतून काढलेल्या पाण्याने किंवा डिस्टील्ड युरिन मुळे आधीच कमजोर झालेल्या पोटाने साथ सोडली असावी का?

पहाटे साडेचार पर्यंत मी 67 च्या रूट वर ट्रँगल आणि नोट लावून परत आलो होतो. गाडीच्या खालून ऑइल काढायला फारच त्रास झाला, एक तर खालची वाळू बाजूला करून टूल बॉक्स साठी जागा बनवावी लागली, त्यात तो प्लग लवकर निघला नाही. हे सगळं करता करता तीन तासात परत दोन वेळा जुलाब झाले. वैतागवाडी नुसती. सगळं झाल्यावर कसाबसा गाडीत येऊन परत आडवा झालो.

इतक्या डिप वाळवंटात गाडी अडकली तरी मी आत्तापर्यंत काही प्रमाणात निर्धास्त होतो. माझ्याकडे वाळवंटात सहा ते सात दिवस जिवंत राहण्यापूरते रिसोर्सेस होते. सर्च आणि रेस्क्यू मध्ये कितीही प्रॉब्लेम आले तरी मॅक्सीमम चार ते पाच दिवसात त्यांनी मला शोधलंच असतं. त्यामुळे त्यांनी मला शोधे पर्यंत होणारे हाल दिसत असले तरी मरण्याची भीती वाटत नव्हती. पण आता मात्र माझी खरंच जाम फाटली आहे. जुलाब माझ्या शरीरातलं असलेली नसलेली सगळी स्ट्रेंथ शोषून घेणार आणि मोजून दीड लिटर चांगलं पाणी शिल्लक आहे. जुलाब बंद करायला काही औषध नाही, प्यायला दीडच लिटर पाणी आणि वरून आग ओकणारा सूर्य ! रेस्क्यू लवकर आला नाही तर अवघड आहे.

ऑइल जाळायला योग्य वेळ शोधायला हवी. रेस्क्यू टीमची मॉर्निंग शिफ्ट 7 ला पंच करते, त्यानंतर सगळ्या प्रोसिजर पूर्ण करून बाहेर पडायला त्यांना 7.15 ते 7.30 तरी होत असतील. तिथून ते इथे नॉर्थ फिल्ड मध्ये पोचायला सव्वा तास. म्हणजे साधारण 8.30 ते 9 वाजता. त्यांनी शोधाशोध करायला एक तर काल सुरुवात केली असेल, नाहीतर आज करतील. ते सबखा 87 जवळ शोधत असतील किंवा यासीनशी कॉन्टॅक्ट झाला असेल तर 67 ला येतील. 67 च्या रूट वर आलेच तर आपण लावलेलं साइन त्यांना दिसेलच. 67 च्या रूट वर जर नाही आले तर त्यांना 87 च्या जवळून साधारण 12 किमी वरचा ऑईलचा धूर दिसेल का ? काल संध्याकाळी चालू झालेली हवा अजून थांबली नाही, म्हणजे आज दिवसभर पण थांबणार नाही. हवा थांबली नाही तर ऑईलच्या धुराचा काळा ढग होणे जे आपल्याला अपेक्षित आहे तो होणार नाही. शिवाय वाळूचे बारीक पार्टीकल हवेत उडून व्हिजिबिलिटी कमी होणार.

माझे जगण्याचे मेजर चान्सेस फक्त पुढच्या 24 ते 36 तासात असावेत बहुतेक. काहीतरी हालचाल करायला हवी. आजच्या आज काहीतरी करून या वाळवंटातून बाहेर पडायला हवेच. आयचा घो, त्या यासीनच्या आणि त्या ट्रकच्या ! कशाला याच रोड वर कडमडला होता देव जाणे. पण मुळात वॉटर टँकर इकडे आलाच कशाला? खरंच कशाला आला असावा ????? वॉटर टँकर दोन वेळेसच वापरतात. एक तर एखाद्या नवीन ठिकाणी ड्रीलिंग करायच्या आधी क्रेन आणि इक्विपमेंट न्यायला रोड करायचा असतो तेव्हा नाहीतर ड्रीलिंग साईटवर प्यायचे पाणी सप्लाय करायला ! म्हणजे बहुतेक कुठं तरी नवीन ठिकाणी ड्रीलिंग चालू होणार आहे किंवा चालू झालं आहे. पण कुठं ? 72 किंवा 81 असणार ! ह्याच दोन सबखा आहेत ज्याची डॉक्युमेंट रिव्ह्यू होऊन 7 ते 8 महिने झाले आहेत. 72 ला जाणारी कोणतीही गाडी या रूट वरून येणार नाही. लॉंगकट पडेल. म्हणजे सबखा 81 मध्येच काम चालू आहे. 81 इथून जास्तीत जास्त 7 ते 8 किमी असेल.....

"चल, जाऊ या का ?"

"कुठं? "

"सबखा 81 !"

" अरे पण तिथे ड्रीलिंग चालू आहे का फक्त रोड बनवायची तयारी हे कसं कळणार?"

"रोड जरी बनवत असतील तरी माणसं असणार, पाणी असणार, AC असणार"

"असं काही नाही, कॉन्ट्रॅक्टर स्वतःच्या सोयीने कामं करतात. दुसऱ्या एखादया लोकेशन वर काम चालू केलं की इकडची माणसं तिकडं नेऊन टाकतात"

"ते रेग्युलर मेंटेनन्स कामामध्ये. ड्रीलिंग साईट रिलेटेड प्रत्येक कामाला प्रायोरिटी असते. आज रात्री चालायला सुरुवात केली की सकाळ पर्यंत पोहचू शकू"

"शरीरात इतकी कमी एनर्जी असताना एवढं चालणं अवघड आहे."

" च्यायला लोकं वाळवंटात पाच पाच सहा सहा दिवस चालून जगले आहेत. तुला फक्त इथून सात आठ किमी जायचं आहे"

" हो पण त्यांना जुलाब होत नव्हते."

"मग काय इथे फक्त बसून मरायची वाट बघत बसणार आहेस ? "

" डेस्परेट होऊन उगाच स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घ्यायची नाहीये मला. आपले सर्व्हायव्हल चान्सेस अजून पण गाडी जवळ राहण्यातच आहेत. ट्रेनिंग मधलं स्टॅट्स आठवतंय ना ? खूप कमी लोकं वाळवंटातुन चालून जिवंत बाहेर पडले आहेत"

" फट्टू, तु आयुष्यभर कम्फर्ट झोन मधेच रहा, जरा डेअरिंग करायला, हातपाय मारायला नको तुला. जायचं नाही म्हणून कारणं काढू नकोस, ते सगळे लोक कोणत्याही मनुष्यवस्ती पासून भरपूर लांब होते. तुला मोजून सात आठ किमी जायचं आहे. "

" एक तर आजचा दिवस पूर्ण जायचाय, त्यात शरीराची काय अवस्था होईल माहीत नाही. पाणी संपत आलंय. रात्री ह्युमीडिटी आणि टेम्परेचर किती असेल देव जाणे. त्यात इतकं चालत जायचं, ते पण तिथे मदत मिळायची गॅरंटी नसताना? मुळात तिथे पहाटे पर्यंत पोहचू की नाही देव जाणे. सकाळी 5 पर्यंत पोचलो नाही तर वरून सूर्य आणि खालून जुलाब. बॉडी सुद्धा घरी पाठवायच्या लायकीची राहणार नाही.
आणि जर समजा तेवढ्या वेळात रेस्क्यू टीम आली तर त्यांना कास कळणार की आपण सबखा 81ला गेलोय?"

"गाडीत नोट लिहून ठेऊ या."

"त्या नवीन रूट वर इथे आहे म्हणून लिहिलंय, नंतर ते इथे आले की 81 ला गेलोय म्हणून नोट ठेवायची. ते म्हणतील हा काय या वाळवंटात आपल्यासोबत लपाछपी खेळतो आहे का ?"

एक मन मला इतकंसं अंतर आहे चालून जाता येईल म्हणत होतं तर दुसरं आहे तिथेच थांबायला सांगत होतं. काय करावं नक्की कळत नव्हतं, परत एकदा मी चालत जाण्याची रिस्क घेण्यापेक्षा गाडीसोबतच थांबायचं ठरवलं.

विचार करता करता मी कधी झोप लागली माझं मलाच कळलं नाही. पोटात परत गुडगुड व्हायला लागली तेव्हा डोळे उघडले तर माझी भीती खरी ठरली. हवा कमी झाली तरी थांबली नाहीये. व्हिजिबिलिटी पण थोडी कमी झाली आहे. आज ऑइल जाळून काही फायदा होणार नाही.

मी जेवढे पाणी पीतोय त्यापेक्षा कितीतरी जास्तच लघवी आणि शौचावाटे शरीराच्या बाहेर पडतय. लघवी करताना भयानक जळजळ व्हायला लागली आहे आणि जुलाब आतडे पिळवटून टाकतायत. शौचाकडे जायला म्हणून गाडीपासून जास्त लांब जायची पण एनर्जी शिल्लक नाही. कसाबसा शरीरधर्म उरकून गाडीच्या सीट वर येऊन पडून राहणं याशिवाय काही करता येत नाहीये. कालच्या आणि आजच्या शरीराच्या अवस्थेत जमीन अस्मानाचा फरक पडलाय. संध्याकाळी तर गाडीबाहेर पडलो की गाडीचा आधार घेऊनच चालत गाडीच्या मागे जात होतो. पॅन्ट कधीच काढून फेकून दिलीय. ती काढणे आणि घालणे यात सुद्धा एनर्जी वाया घालवायची इच्छा होत नाहीये.

खरं तर आज रात्री गाडीतून काहीतरी फाडून मागच्या मोठ्या डोंगरावर जाऊन काहीतरी जाळायला हवं. ती आग लांबून दिसू शकेल. पण माझ्या शरीरात तेवढं त्राण नाहीये. साला या बारा ते सोळा तासात माझ्या नशिबाने पलटी खाल्ली.

बसल्या जागी माझ्या सुकलेल्या गालांवर दोन थेंब ओघळले. बायकोचा आणि मुलाचा चेहरा राहून राहून डोळ्यासमोर येत आहे. स्वतःच्याच मुर्खपणावर चिडचिड करण्याशिवाय काही पर्याय नाही. क्षणाक्षणाला स्वतःचा जीव जाताना पाहत बसण्याशिवाय काही आता हातात काही नाही. एनर्जी लेव्हल खूपच लो आहे. अशक्तपणाने ग्लानी येत आहे.

खरंच जाऊ या का चालत? इस पार या उस पार! नशिबात मरायचंच लिहिलं असेल तर इथे बसून वाट बघण्यापेक्षा प्रयत्न करता करता मेलेलं काय वाईट ?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लिहिलेय अतरंगी, उत्कंठा वाढेल असे;
भीती पण वाटली थोडी. ओळखीतले / नात्यातले काहीजण असेच भर समुद्रात / वाळवंटात असतात कामानिमीत्ताने, त्यांची आठवण झाली..

@ च्रप्स : 3 दिवसात या रूट वर एकपण गाडी गेली नाही? >>>>>>
.... सबखा 87 वरून 67 ला जायला दोन रूट होते. जुन्या रूट वर सारखी वाळू येऊन गाड्या अडकायच्या म्हणून तो जुना रूट बंद करून मागच्याच वर्षी नवीन रूट चालू केला होता. आम्ही बऱ्याचदा जुुुनाच रूट वापरायचो कारण नवीन रूट जरा लॉंगकट होता. तिकडून जायला जास्तच वेळ लागला असता आणि मग घरी जाऊन झोपायला अजूनच उशीर झाला असता म्हणून मी जुन्याच रूट कडे गाडी वळवली. ....
------ संदर्भ -- भोज्या भाग 1

....... असू द्या, एक ना अनेक... या सगळ्या चुका करून मी अजून भरीत भर म्हणजे वापरात नसलेल्या रोड वर गाडी घातली........
------ संदर्भ -- भोज्या भाग ३

आताच सगळे सलग वाचले, म्हणून चिकटवतेय....

हे वाचल्यावर आय शुडन्ट बी अलाइव चा शेली आणि फॅमिलीचा डेझर्ट चा भाग पाहिला. भयंकर.
जीवाचा थरकाप होतो बघुन आणि विचार करुनच.

बापरे....
पुढचा भाग लव्कर टाका प्लिज..