व्हॅली :
(फोटो श्रेय: ऐशू https://www.instagram.com/cally_ash/)
अजून एक झलक:
(फोटो श्रेय: ऐशू https://www.instagram.com/cally_ash/)
फ़ुलोंकी घाटीबद्दल खूप काही ऐकून होते, खूप काही वर्षांपासून. काही वर्षांपासून आपणही जावे वाटायला लागले. काही स्वप्ने स्वप्नेच राहणार हे माहीत असते पण काही स्वप्ने प्रत्यक्षात उतरु शकतात हेही माहीत असते. हिमालयात फिरावे हे असेच एक स्वप्न आहे. पण बर्फ़ाळ थंडी अजून कधीच अनुभवली नाहीये. जिथे उभा जन्म जातोय त्या मुंबईत 20 डिग्री तापमान झाले की लगेच स्वेटर घालून त्या 'थंडी'ला मी पळवून लावते. तिथे 2 आणि 3 डिग्रीमध्ये काय निभाव लागणार? म्हणून आता हळूहळू सुरवात करून थंडीचा अनुभव घ्यायचा ठरवलंय. अंतिम लक्ष्य कैलास मानसरोवर यात्रा आहे.
गेल्या वर्षी नोव्हेंबरात नेटवर युथ हॉस्टेलचे कार्यक्रम पाहत होते, मनालीला एक सुंदर ट्रेक होता जानेवारी-फेब्रुवारीच्या दरम्यान. त्या काळात तिथे बर्फ पण पडते म्हणे. पडणारे हिम बघणे हेही एक स्वप्न आहेच. म्हणून बुकिंग करायचे ठरवले पण जीएसटीची हाफीसात इतकी हवा सुरू झाली आणि कोणीही सुट्टी घ्यायची नाही याचीही इतकी चर्चा व्हायला लागली की शेवटी मनातले बुकिंग मनातल्या मनात रद्द केले. हा निर्णय चुकीचा ठरला हे नंतरचे...
त्याचवेळी युथ हॉस्टेलचा फुलोनकी घाटीचा ट्रेक नजरेला पडला. ऑगस्टचा शेवटचा पंधरवडा म्हणजे जीएसटीचे काम तोवर संपलेले असेल असा अंदाज बांधून बुकिंग केले.
हा अंदाज चुकीचा ठरला हे नंतरचे...
तर असो.
प्रवास कसा करायचा याची चर्चा सुरू झाल्यावर ऐशूने ट्रेनने प्रवास करायचा म्हणून ओरड करायला सुरू केली. तिने 4 वेळा झेलम एक्सप्रेसने प्रवास केलाय. ती मजा तिला परत अनुभवायची होती. 29 तासांचा प्रवास म्हणजे मला अगदी जीवावर आलेले. एवढा ट्रेन प्रवास मी केलाच नाहीये आजवर. माझा प्रवास म्हणजे मुंबई ते आंबोली एवढाच. पण शेवटी तिच्या हट्टापुढे माघार घेऊन एकदाची जातानाची रेल्वे तिकिटे बुक केली. येताना मात्र विमानाने यायचे निश्चित होते. येतानाही परत 30 तास प्रवासात घालवणे मला झेपणारे नव्हते. शामलीला, भावाच्या मुलीला, विचारले तर तीही आनंदाने यायला तयार झाली.
जुलै, ऑगस्ट ऑफिसात खूप गडबडीचे गेले. दररोज रात्री घरी यायला उशीर व्हायला लागला. त्या गडबडीत मेडिकल सर्टिफिकेट, बॅग भरणे, शूज खरेदी वगैरे सगळ्या गोष्टी शेवटच्या मिनिटाला केल्या गेल्या. बॅग भरती, मेडिकल सर्टिफिकेट वगैरे शनिवारी तर शूज रविवारी रात्री खरेदी केले गेले. ट्रेकच्या आदल्या दिवशी शूज खरेदी करणे यासारखा गाढवपणा दुसरा कुठला नसेल पण सुदैवाने त्याचा पुढे काहीही त्रास झाला नाही. सगळे काही व्यवस्थित होऊन सोमवारी सकाळी 7.55 च्या हरिद्वार सुपर फास्टने निघालो.
गाडी एकदम मस्त आहे, स्वच्छ आहे, गर्दीही खूप कमी आहे. भुसावळ येईतो आजूबाजूचे खूप बर्थ रिकामे होते. भुसावळपासून लोक चढत गेले ते दिल्लीला जाऊन उतरले. त्यापुढे गाडी परत रिकामीच धावत होती. आम्ही आपले उगीच टाईमपास म्हणून आजूबाजूचे डब्बे फिरलो, फर्स्ट क्लास कधी पाहिला नव्हता, तोही पाहुन घेतला. गाडी कुठे अधे मध्ये थांबली की उगीच फलाटावर उतरून काहीबाही विकत घेतले. भोपाळ स्टेशनवर ऐशूचे मित्र भेटायला आले होते. तिथे मस्त रबडी विकत घेऊन खाल्ली. एकूण जीवाची ट्रेन करून घेतली
प्रवासात पावसाने इगतपुरीपर्यंत साथ दिली. त्यानंतर पाऊस नाही तो नाहीच. मुंबई-नाशिक-मध्य प्रदेश करत रात्री कधितरी राजस्थान ओलांडून गाडी सकाळी 7 वाजता दिल्लीला पोचली. राजस्थानमध्ये स्टॉप नव्हता त्यामुळे कळले नाही. गाडी आतापर्यंत वेळेत नॉन स्टॉप धावत होती पण उत्तर प्रदेश येताच रखडायला लागली. आता पर्यंत फक्त 15-20 मिनिटेच लेट होती पण ज्या प्रकारे स्टेशनवर दुसऱ्या गाड्यांच्या पासिंगसाठी थांबतेय त्यावरून किती वेळ लागेल देव जाणे असे वाटायला लागलेय.
बाहेरचा निसर्ग मात्र अगदी बघण्यासारखा आहे. महाराष्ट्रात प्रवास करताना नजरेला सतत डोंगर पडत असतात. थोडी मोकळी जागा दिसली की लगेच डोंगर मध्ये येऊन आपले उभे. महाराष्ट्र सोडला की नुसती सपाट जमीन. मध्य प्रदेशात झाडे दिसली नाहीत एवढी. लांबवर नजर फेकावी तितकी दूरवर पसरलेली शेते. शेतांना कुंपणे नाहीत. मध्ये मध्ये गाई, म्हशी, शेळ्या घेऊन गुराखी उभे. पण मोकळी सोडलेली जनावरे नाहीत त्यामुळे कुंपणे नाहीत. उत्तर प्रदेशात मात्र प्रत्येक शेताभोवती ताठ उभे सालवृक्ष कुंपणाचे काम करताहेत. उसाची शेती मात्र सर्वत्र आहे. एवढी साखर आपण पोटात घालतो? उगीच नाही आपण मधुमेहाची राजधानी झालोत....
धावत्या ट्रेन मधून काढलेले काही फोटो:
आपला डोंगरदऱ्यांचा महाराष्ट्र:
महाराष्ट्राच्या बाहेर:
असेच उगीच काहीतरी:
उत्तर प्रदेशातले साल वृक्ष:
रुडकी स्टेशनात भेटलेला बहावा:
धावत्या ट्रेनच्या खिडकीला नाक लावून बाहेरचे जग बघत मी तासनतास घालवू शकते. बाहेरचे लोक, शेते, जंगले आणि एकूण सृष्टी बघण्यात मस्त वेळ जातो. लोकांचे कपडे, कपड्यांचे रंग या सगळ्यात फरक पडत जातो थोडा थोडा. पाहता पाहता ऋषिकेश स्टेशन आले देखील.
क्रमशः.
अजून काही फोटो:
(फोटो श्रेय: ऐशू https://www.instagram.com/cally_ash/)
(फोटो श्रेय: ऐशू https://www.instagram.com/cally_ash/)
पुढचा भाग: https://www.maayboli.com/node/64171
सुंदर सुरुवात..फोटोही छान.
सुंदर सुरुवात..फोटोही छान.
पुलेशु!
वाह, मस्त सुरूवात.... प्रचिही
वाह, मस्त सुरूवात.... प्रचिही सुंदरच...
मस्त फोटोज आणि त्याहून मस्त
मस्त फोटोज आणि त्याहून मस्त लिखाण..
मस्तच.
मस्तच.
मलाही मनावर घ्यायला हवंय आता ह्या ट्रेकचे
मस्त सफर होतेय..!!
मस्त सफर होतेय..!!
Pages