कासव : एकटेपणाची सामूहिक गोष्ट

Submitted by अगो on 6 October, 2017 - 07:10

माणूस ह्या जगात एकटा येतो आणि एकटाच जातो वगैरे वाक्यं आपण वर्षानुवर्षं वाचत आलेलो असतो किंवा प्रसंगोपात बोलून दाखवत असतो. अशी वाक्यं दुसर्‍यांची उदाहरणं देऊन बोलायला बरी वाटली तरी आपल्यावर हे उमजण्याची वेळ येऊ नये असंही आपल्याला कुठेतरी वाटत असतंच. तरीही जवळजवळ प्रत्येकाला आयुष्यात एखाद्या साक्षात्कारी क्षणी एकटेपणाच्या ह्या आदिम अनुभूतीचा प्रत्यय येतच असतो. आपले कुणी नाही, आपण एकटे पडलोय ही ती जाणीव ! भितीदायक असते ही जाणीव फार. एखाद्या चुकार क्षणी नुसती विजेसारखी लखलखून ती येत जात राहिली तर फारसे बिघडत नाही. उलट आपले पाय जमिनीवर ठेवायला त्या लख्ख जाणीवेची मदतच होते. पण एकदा त्या जाणीवेचं बीज मनाच्या मातीत रुजलं तर त्याची मशागत आपण कशा प्रकारे करणार आहोत ह्याची फार काळजी घ्यावी लागते. मनावर अनुल्लेखाचा, बेपर्वाईचा दगड ठेवून ते मरत नसतं, उलट वेडंवाकडं फोफावतं आणि आपल्याही नकळत नैराश्याचा वेडावाकडा वृक्ष बनतो. त्याच्या विषारी फांद्या आपल्याच मुळावर उठतात. त्यापेक्षा त्या बीजाला समजूतदार स्वीकाराचं खतपाणी मिळालं तर एकटेपणाचा शांत औदुंबर मनात वागवत आपण समाधानी आणि आनंदी आयुष्य जगू शकतो.

पण मुळात हे मनाचे सगळे फाजील चोचले पुरवायची, ह्या भावनेला महत्त्व द्यायची गरज काय असा प्रश्न मनात येणं स्वाभाविक आहे. रिकामपणचे उद्योग अशी तर नैराश्याची जाहीर हेटाळणी होतेच. 'कासव' मध्येही हा प्रश्न उपस्थित होतो आणि त्याचं उत्तरही आपलं आपल्यालाच मिळत जातं. माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे. समानशील लोकांबरोबर राहणं त्याला आवडतं, एकमेकांना आधार देणं सुखावून जातं मग ह्या दोन्ही परस्परविरोधी वृत्तींचा तोल कसा सांभाळायचा ? एकटेपणाचे वेगवेगळे पैलू दाखवणारी माणसं, सजीव-निर्जीव पात्रं ह्या चित्रपटात आहेत. पण त्यांच्यातून वाहणारं समान सूत्र आपल्याला ह्या चिरंतन भावनेकडे बघण्याचा एक सक्षम दृष्टिकोन देऊन जातं. व्यावहारिक आयुष्य जगता जगता सह्रदय बंधांनी जोडली गेलेली ही माणसं, अतिशय मोजक्या शब्दांतून उलगडत जाणार्‍या त्यांच्या विचारप्रक्रिया, भोवतालचा अलिप्त तरीही सुंदर निसर्ग, अमर्याद समुद्र आणि शांत, स्थितप्रज्ञ, एका विलक्षण जैविक चक्रातून जाणारी कासवं ह्या सर्वांचा मिळून जो एक हार्मोनियस कॅन्व्हास तयार होतो तो आपल्यापुढे एकटेपणाची ही सामूहिक गोष्ट चितारतो.

ह्या पटावर कुटुंबात असताना कदाचित जास्त एकटी असलेली आणि आता आयुष्याचे ध्येय गवसलेली मध्यमवयीन जानकी आहे. कधीकाळी नैराश्याचा विषवृक्ष तिच्या मनात फोफावला होता. त्याच्या खुणा अजून तिच्या मनावर आहेत पण आपलं मन वेळीच ओळखल्याने आणि योग्य मदत मिळाल्याने आता त्या विषाचा बर्‍यापैकी निचरा झालाय. ह्या आघातामुळे तिच्यासारख्याच मनस्थितीतून जात असलेल्या कुणा अनोळखी व्यक्तीला समजून घेण्याची ताकदही तिने कमावलीय. मानव हा दु:खी- निराश झालेला, जगावर कावलेला कोवळा तरुण आहे. नैराश्य कशाशी खातात बुवा असा रोखठोक प्रश्न पडणारा जानकीचा मदतनीस यदु आहे, यदु मनाने एकटा नसला तरी त्याला बायकोपासून दूर राहावे लागतेय. खर्‍या अर्थाने एकटा असलेला, परक्यांनाही जीव लावू पाहणारा अनाथ परशू आहे, दशावतारी नाटकात काम करणारा बाबल्या आहे, काळातील स्थित्यंतरं पाहून त्यामागची कारणं आणि परिणाम समजून घेणारे, कासव संवर्धनाचे काम करणारे सूज्ञ दत्ताभाऊ आहेत.

आणि अर्थातच, ह्या सगळ्या पात्रांना ( आणि आपल्यालाही ) आयुष्याचं प्रयोजन मूकपणे सांगून जाणारी कासवं आहेत. ह्या समुद्री कासवांच्या आयुष्यात फार विस्मयकारक वाटतील अशा गोष्टी घडतात. आयुष्य पाण्यात काढलेली कासवीण अंडी घालण्यासाठी मात्र किनार्‍यावर वाळूत येते आणि अंड्यांमधून पिल्लं बाहेर यायच्या आत परत पाण्यात निघूनही जाते. नुकतीच जन्माला आलेली ती अनेक पिल्लं मग लडबडत, पाय मारत एकमेकांबरोबर तरीही एकेकटीच समुद्राच्या दिशेने प्रवास करतात. अखंड,अव्याहत चाललेलं हे जीवनचक्र; पण हल्ली मानवाने निसर्गावर केलेल्या आक्रमणामुळे त्यांना कृत्रिम संरक्षण द्यायची गरज पडतेय.
आपलंही तसंच नाही का ? त्या कासवांसारखेच आपण सगळेजण एकमेकांसोबत आणि एकेकटे आयुष्याला भिडू पाहतो. युगानुयुगे ! असुरक्षित वाटले की कवचात शिरतो, आकसून घेतो स्वतःला आणि किनार्‍यावरुन मुकाट बघत राहतो समोर पसरलेल्या अथांग समुद्राकडे. माहीत असतं की इथे फार काळ राहणं हितावह नाही. आपल्याला त्या पाण्यात उतरावंच लागणार. तो प्रवास सुरु करण्याइतकं बळ येईपर्यंत कधी संरक्षक हात भेटतात, कधी नाही...

शिवाय अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काळाच्या ओघात माणसाच्या जगण्याच्या व्याख्या बदलत गेल्या आहेत. पूर्वीची साधी जीवनशैली बदलली. आपण अधिकाधिक तंत्रज्ञानाच्या आहारी गेलो. निसर्गावर आक्रमण केलं तसं स्वतःवरही केलं आणि मग पूर्वी वाटत नव्हती तितकी 'मानसिक स्पेस' आवश्यक वाटू लागली. एका क्लिकवर शेकडोंचा गोतावळा उपलब्ध असताना एका क्षणी सगळ्याचा वीट येऊ लागला. पण हा चित्रपट आपल्याला जाणीव करुन देतो की यंत्रवत जगताजगता आपला रिचार्जर हरवून चालणार नाही. निराश, हताश माणूस स्वतःला रिचार्ज करायला विसरलेला तरी असतो किंवा करु इच्छित नसतो. त्याची बॅटरी डाऊन व्हायच्या आत त्याला सावरायला हवं.

आलोक राजवाडे आणि इरावती हर्षे अनुक्रमे मानव आणि जानकीची भूमिका अक्षरशः जगले आहेत. बाकी सगळेही आपापल्या भूमिकेत चपखल. लाघवी, निरागस परशू विशेष लक्षात राहतो. सिनेमातील दोन गाण्यांचे शब्द, जराशी खडबडीत अशी चाल, गायकांच्या आवाजाचा पोत, वेशभूषेत वापरलेले चित्रपटाच्या कॅनव्हासला एकजिनसीपणा देणारे रंग, कपडेपट, कॅमेरावर्क हे सगळे सुरेख जुळून आलेय.

सुमित्रा भावे-सुनील सुखथनकर द्वयीच्या इतर चित्रपटांप्रमाणेच हा एक अनुभवण्याचा चित्रपट आहे. हा चित्रपट नैराश्य गोंजारतही नाही आणि त्याला नाकारतही नाही पण ह्या अतिशय गुंतागुंतीच्या विषयाला समजून घेण्याची एक बहुपेडी दृष्टी मात्र नक्की देऊ करतो.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे परीक्षण (!) मला फार आवडल .आतापर्यत वाचलेल्यापैकी .शेवटचे दोन पॅरा वाचेपर्यत खरंतर परीक्षण नसून ललित वाचते आहे असेच वाटलं.

आधी काहीच वाचणार न्हवतो, पण स्टोरी न उलगडता लिहिलंय असं कळलं म्हणून वाचलं.
मस्त लिहिलयस अगो. जाई सारखंच वाटलं. पहिलं लिहिलेलं इतकं मनात गेलं की डोक्यात त्याचेच विचार चालू आहेत. शेवटचे दोन पॅरा वाचले... पण ते नक्की काय होते ते ही आठवत नाहीयेत आता..इतकं तरल आणि संवेदना जाग्रुत करणारं लिहिलं आहेस.

अगोनी इतकं जबरदस्त लिहीलं आहे की वेगळा धागा काढण्यापेक्षा (माझे चार पैसे ) इथेच सांगते.
जानकीला वाटतं की जेव्हा कासवीण पाण्यात छोटी छोटी पिल्लं एकेकटी पोहताना बघत असेल तेव्हा तिला वाटत असेल का हे माझं तर पिल्लू नाही?
"घार हिंडते आकाशी तिचे चित्त पिलांपाशी" ही भावना, कासवीणीची पण अणि अगदी मानवच्या पालकांची पण .

विचारांत गुंतवून ठेवणारे सीन / संवाद या सिनेमात खूप आहेत. त्याला जोड आहे कोकणाच्या नितांत सुंदर पार्श्वभूमीची.
अगोच्या सर्व पोस्टला "मम".

>>>>एका क्लिकवर शेकडोंचा गोतावळा उपलब्ध असताना एका क्षणी सगळ्याचा वीट येऊ लागला.<<

हे अगदी खरय... वॉट्स अ‍ॅप, फेसबूक, वगैरे वगैरेचा मारा इतका नकोसा आहे ना...

फारच सुंदर लिहीलयस अगो !!
चित्रपट बघायला मिळेल कि नाही माहीत नाही पण हे नुसत वाचायलाही फार छान वाटलं.

------/\------
पहिले दोन पॅरा अतिशस सुंदर लिहले आहेत. Happy

वाह. फारच सुरेख लिहिलंय... काय वाक्य आहेत एकेक... खूप दिवसांनी अस समृध्द लेखन वाचलं...
केवढि बोलकी विशेषणं वापरली आहेत.. साक्षात्कारी क्षण,
आदिम अनुभूती,चुकार क्षण,चिरंतन भावना,सक्षम दृष्टिकोन,व्यावहारिक आयुष्य,सह्रदय बंध,अमर्याद समुद्र ,विषवृक्ष ,खडबडीत चाल,बहुपेडी दृष्टी...
आणि शेवटचं वाक्य तर "नैराश्य गोंजारतही नाही आणि त्याला नाकारतही नाही" सोने पे सुहागा...

छान लिहिलंय Happy

हा पहिलाच कासव लेख वाचला, आता बाकीचेही चाळतो जमल्यास... मला स्टोरी हवी आहे Happy

लेख वाचला, आवडला. छान लिहिले आहेस. सिनेमाचा विषय तुला आवडलाय, भिडलाय आणि पटला देखील आहे. माझेही तसेच झाले.
पण सिनेमातील त्याची मांडणी मला आवडली नाही. जानकी तर अजिबातच नाही. सिनेमा म्हणून घडवलेला असला तरीही त्यात सहजता नाही. ओढाताण करून बनवलेला वाटतो.
त्याला सुवर्णकमळ मिळालं आहे ते ठीक आहे. पण म्हणून आपल्याला आवडले पाहिजे असे नाहीच ना!
एक ज्येष्ठ नाटककार चं.प्र.देशपांडे यांच्या ‘कासव’वरील लेखाची लिंक पाठवत आहे.
http://www.bigul.co.in/bigul/1643/sec/17/kasav

काल सहकुटुंब पाहिला!
अतिशय सुंदर आणि ह्यद्य चित्रपट! भावला!
'न्युटन' पेक्षा ह्याची निर्मितिमुल्ये अधिक असल्याचे पदोपदी जाणवते व मग प्रश्न पडतो...हाही चित्रपट 'ऑस्करसाठी' का नाही?
रिकाम्या खुर्च्यांचे पहिले जाणवले पण ....
कासवीण किनर्‍याला येउन अंडी घालून चालली जाते....आणि कितिही संकटे आली तरी ह्या कासवांची वंशावळ (अतिभव्य डायनोसोरही जिथे टिकू शकले नाही तिथे) समर्थपणे टिकून राहते...ह्यातच एक वेगळा संदेश मिळाला....!
सर्व परिचितांन्ना बघण्यास सांगितले....

फारच सुरेख लिहिलंय . सिनेमाच्या दर्जाला साजेसं उच्च प्रतीचं परीक्षण !
एखाद्याला सुख दुखतंय असं आपण म्हणतो , तेव्हा प्रत्येकाची सुखाची व्याख्या वेगळी असते हे आपल्या लक्षात येत नाही !
हे किती खरं आहे !!

Pages