उत्तम, प्रयोगशील लेखक, दिग्दर्शक आणि नट म्हणून आलोक राजवाडेची ख्याती आहे. फोर्ब्सच्या 'थर्टी अंडर थर्टी' या यादीत झळकलेल्या आलोकला 'कासव'मधल्या अभिनयासाठी ब्रिक्स आंतरराष्ट्रीय चित्रपट-महोत्सवात सर्वोत्कृष्ट अभिनयाचं पारितोषिक मिळालं.
'कासव' ६ ऑक्टोबरला प्रदर्शित होतोय. त्या निमिताने आलोक त्याच्या नाट्यसृष्टीतल्या पदार्पणाबद्दल सांगतोय.
शाळेत असताना मी केलेलं पहिलं नाटक म्हणजे ’जागर’ या संस्थेचं ’अब्राहम लिंकनचं पत्र’. मी त्या नाटकाच्या ऑडिशनसाठी गेलो कारण मी मिमिक्री करायचो, कोणाकोणाच्या नकला करायचो, आवाज काढायचो आणि मला त्यात फार मजा यायची. आमच्या घरी आमच्या कुटुंबात मी आणि माझी भावंडं पपेट-शो करायचो. आम्हां सगळ्या भावंडांनी पपेट-शोसाठी एक कंपनीही काढली होती. या कंपनीचं नाव ’मिमिआ’, म्हणजे मिहिर - मिताली - आलोक. हा पपेट-शो करण्यामागे महत्त्वाचं होतं ते गोष्ट सांगणं. गोष्ट सांगताना मला फार मजा यायची. त्यामुळे ’जागर’तर्फे नाटक करताना किंवा ’मिमिआ’चे पपेट-शो करताना मला वाटायचं की हे खूप महत्त्वाचं आहे आणि आपण हे सारखं केलं पाहिजे. माझी नाटकाशी ओळख झाली होती आणि माझ्या दृष्टीनं ती मोठ्या महत्त्वाची गोष्ट होती, कारण नाटकात खूप लोक एकत्र काम करतात आणि नाटक करताना मजा येते. त्यानंतर एक वर्षभर मी माझ्या कुटुंबाबरोबर जर्मनीला गेलो. तिथे मी फार एकटा पडलो, कारण मला तिथली भाषा कळत नव्हती. तिथे एकटं पडल्यामुळे मी लिहायला लागलो. माझ्या डायरीत मी बर्याच गोष्टींबद्दल लिहायचो. पण तरीही येणारा एकटेपणा विलक्षण होता आणि त्यातूनच पुण्यात परत आल्यावर आपण ’नाटक करायचं’ हे मी तिथे ठरवलं.
बीएमसीसी कॉलेजात आल्यावर माझं आणि नाटकाचं खरं नातं तयार होत गेलं. महाराष्ट्रात, त्यातही पुण्यात, आंतरमहाविद्यालयीन नाट्यस्पर्धांना फार महत्त्व असतं. पुण्यातल्या बहुतेक सगळ्या कॉलेजांमधले विद्यार्थी या स्पर्धांमध्ये सहभागी होतात. बीएमसीसीही याला अपवाद नव्हतं. आमच्या कॉलेजातही या स्पर्धांचा उत्साह असायचा. मात्र इतर कॉलेजांमध्ये आमच्या कॉलेजात एक मोठा फरक होता. इतर कॉलेजांत सीनियरांनी येऊन नाटक बसवण्याची मोठी परंपरा होती. कॉलेजात असताना स्पर्धा गाजवलेले, पण आता कॉलेजातून बाहेर पडलेले, अनुभवी सीनियर येऊन नाटक बसवायचे. आमच्या कॉलेजात मात्र तसं नव्हतं. नाटक कॉलेजात असणारे विद्यार्थीच बसवायचे. ही प्रक्रिया अतिशय लोकशाहीवादी होती. तिथे सीनियर-ज्युनियर हा मुद्दा नव्हता. ही माझ्या दृष्टीनं खूप महत्त्वाची बाब होती कारण नाटक आंतरमहाविद्यालयीन स्पर्धांसाठी नाटक करताना विद्यार्थ्यांनी वेगळ्या अनुभवविश्वाला सामोरं जाणं अपेक्षित असतं. पण कॉलेजातून बाहेर पडलेल्या सीनियरांनी नाटक बसवलं, तर साचेबद्धपणातून नाटकाची सुटका होत नाही, कारण ही नाटकं बसवणारे लोक हे वयानं मोठे आणि पूर्वग्रह बाळगणारे असतात. बीएमसीसीमध्ये गंमत अशी झाली होती की, सारंग साठ्ये आणि ओंकार गोवर्धन यांनी त्यांच्या वेळेला अशी भूमिका घेतली होती की, नाटक विद्यार्थ्यांनीच बसवायचं. हीच पद्धत मग पुढे पाळली गेली. मी बीएमसीसीमध्ये प्रवेश घेतला तेव्हा निपुण (धर्माधिकारी), अमेय (वाघ) हे माझे सीनियर होते. कॉलेजमधल्या प्रत्येक नाट्यविषयक उपक्रमांमध्ये या दोघांचा सहभाग असायचाच. यावेळीही विद्यार्थ्यांनीच नाटक बसवायचं होतं आणि त्यासाठी अतिशय पोषक आणि मोकळं असं वातावरण कॉलेजात होतं. ही फार महत्त्वाची गोष्ट होती. आपण नाटक नेमकं करायचं कसं, या विचारानं आम्ही सगळेच खूप एक्साईट झालो होतो. नाटकं करायचं कुठलं? तर जे बघताना आपल्याला मजा येईल ते, असं आम्ही ठरवलं होतं.
त्याचवेळी ’समन्वय’ या संस्थेचं काम पुण्यात जोरात सुरू होतं. संदेश (कुलकर्णी), किरणदादा (यज्ञोपवीत), शशांक (शेंड्ये) या संस्थेचा भाग होते. आमच्या कॉलेजच्या पित्ती हॉलला त्यांच्या तालमी चालत. तिथेच त्यांच्या सेटचं सगळं सामान असे. पित्ती हॉललाच शशांकची एक मोठ्ठी कार्यशाळा झाली होती. अजूनही त्या कार्यशाळेतला प्रत्येक क्षण माझ्या डोक्यात जिवंत आहे. त्या कार्यशाळेत एकही नाटक बसवलं गेलं नाही, किंबहुना नाटक बसवण्यासाठी ही कार्यशाळा नव्हतीच. आम्ही पंचवीस दिवस रोज या कार्यशाळेसाठी भेटत असू, आणि रोज फक्त इम्प्रोवाईज करत असू. खूप वेगवेगळ्या प्रकारच्या विषयांवर हे इम्प्रोवायजेशन असे. कुठलीही कृत्रिमता त्यात नव्हती. आपल्याला अमूक एक नाटक बसवायचं आहे, म्हणून आपण अमूक एक इम्प्रोवायजेशन करू, असं त्यात काही नव्हतं. कोणालाही तिथे यायला परवानगी होती. याला समांतर अशी एक वाचनाची अॅक्टिव्हिटि शशांकनंच सुरू केली होती. रोज सकाळी आठ वाजता लोक पित्ती हॉलला भेटून दोन तास वाचन करत. त्यावर साहजिकच चर्चाही व्हायची. त्या वर्षभरात पित्ती हॉलला हे जे उपक्रम झाले (ज्यांत शशांकचा सगळ्यांत महत्त्वाचा सहभाग होता), त्यांमुळे आम्हां सगळ्यांच्याच मनांवर फार मोठा प्रभाव पडला. जोडीला मोहितच्या (टाकळकर) ’आसक्त’ या संस्थेबरोबरही काम सुरूच होतं. तिथे एका वेगळ्याच प्रकारचा सौंदर्यानुभव मिळत होता. ’समन्वय’, ’आसक्त’च्या नाटकांमधून आम्हांला जे मिळत होतं, ते आम्ही आंतरमहाविद्यालयीन स्पर्धांमध्ये वापरत होतो. त्याच सुमारास कॉलेजमध्ये अशी एक गंमत झाली, की वर्षभरातल्या स्पर्धांव्यतिरिक्त नाट्यविषयक उपक्रमांसाठी एक व्यवस्था तयार केली गेली. ’आयपीएल’, म्हणजे ’इंटर-पित्ती लीग’ असं म्हणायचो आम्ही त्याला. या उपक्रमामध्ये आम्ही किमान पाच-सहा नाटकं केली असतील. या उपक्रमांबरोबरच आंतरमहाविद्यालयीन नाट्यस्पर्धांमध्येही आम्ही भाग घेत होतो. कॉलेजच्या त्या पाच वर्षांत आम्ही महाराष्ट्रातल्या बहुतेक सगळ्या प्रमुख स्पर्धांमध्ये भाग घेतला असू.
कॉलेजमधून बाहेर पडल्यावर ’आपण कॉलेजात जसं नाटक करत होतो, ते बंद पडायला नको’ असं तीव्रतेनं मला वाटलं. अमेय आणि निपुण माझ्या आधी कॉलजबाहेर गेले होते, आणि त्यांचीही तीच भावना होती. ’नाटक’ नामक गोष्टीनं आम्हां सगळ्यांनाच पछाडलं होतं. नाटक ही एक समूहकला आहे. नाटकात तुम्हांला एकट्यानं काम करताच येत नाही, त्यामुळे घर्षणाला पर्याय नाही. तुम्हांला एकमेकांना धडकावंच लागतं. तुम्हांला एकमेकांना सामोरं जावं लागतं, एकमेकांना प्रश्न विचारावे लागतात. त्या अर्थानं नाटक हे एक अतिशय लोकशाहीवादी माध्यम आहे. या माध्यमापासून आपण दूर जायला नको, आपल्या आयुष्यात आलेलं नाटक सुरूच राहावं, या अतीव इच्छेतून आमच्या कॉलेजमधून बाहेर पडलेल्या ग्रूपचं ’नाटक कंपनी’ हे प्रकरण सुरू झालं.
’नाटक कंपनी’ स्थापन केल्यानंतर आम्ही कुणीच कधीच कुठल्याही स्पर्धेत सहभागी झालो नाही. स्पर्धेच्या पलीकडे जाऊन आम्हांला नाटक करायचं होतं. कला ही मुळात सापेक्ष आहे. कलेचं मूळ काम काय? तर, ’अमूक एक गोष्ट अशीच असते’ हे नाकारणं. एखाद्या गोष्टीला हजारो बाजू असू शकतात, एकच गोष्ट हजारो परींनी साकारता येते, हे दाखवून देणं हे कलेचं काम आहे. त्यामुळे कलेच्या बाबतीत स्पर्धा असणं, हे मूलत: कलेच्या उद्देशाशी विसंगत आहे. स्पर्धेत न उतरल्यानं आमच्या गटाचा प्रवास ’आपल्या जगण्याचा शोध घेणं’ इथपर्यंत येऊन पोहोचला. नाटक का करायचं? तर आपण आपलं जगणं समजून घेतलं पाहिजे म्हणून. मध्यंतरी मी जे. कृष्णमूर्तींचं एक पुस्तक वाचत होतो. त्यात एक वाक्य होतं - ’आपल्याला उत्तर सापडत नाही, कारण आपल्याला प्रश्नच माहीत नसतो’. आपण आयुष्यभर उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करतो, पण मुळात आपल्याला प्रश्न पडलेले असतात का? कृष्णमूर्ती म्हणतात की, उत्तरं शोधण्याचा ताण मनावर घेऊ नका, प्रश्न शोधा; तेच तुमचं काम आहे, उत्तरं आपोआप सापडतील. मला अंतर्दृष्टी देणारा हा क्षण होता. उत्तर शोधणं हा मुद्दा नव्हता, प्रश्न महत्त्वाचे होते. आपण नेमकं काय जगत आहोत, आपलं जगणं येतंय कुठून, आपल्या प्रेरणा कुठून येतायेत, आपल्या भवतालचा समाज काय आहे, त्या समाजाचा इतिहास काय आहे, आपलं जगणं हे अनेक गोष्टींवर आधारित आहे, तर ते कसं आधारित आहे, या प्रश्नांच्या दिशेनं माझं पुढचं काम सुरू झालं, आजवर सुरू आहे. नाटक करणं हा माझ्यासाठी एक जिवंत अनुभव असतो. रंगमंचावरचा नट एकाच वेळी अनेक पातळ्यांवर काम करत असतो. एकीकडे लेखकानं लिहिलेली वाक्यं लक्षात ठेवायची असतात, त्याला दिग्दर्शकानं दिलेल्या सूचना लक्षात ठेवायच्या असतात, प्रकाशयोजनेबरहुकूम हालचाली करायच्या असतात, विंगेत कोणीतरी पुढचा कॉश्च्यूम घेऊन उभं असतं, समोर प्रेक्षक असतात, त्यांच्यापर्यंत आवाज व्यवस्थित पोहोचवायचा असतो. या सगळ्या गोष्टींचं भान सांभाळत रंगमंचावर उभं राहिलं की लख्खं जिवंत असल्याची भावना येते. नाटकातून मिळणारा हा ’जिवंत असण्याचा’ अनुभव मला आकर्षित करतो.
कॉलेजात असताना आंतरमहाविद्यालयीन स्पर्धांसाठी मी बसवलेली नाटकं ही अतिशय कथारूप होती. उदाहरणार्थ, ’दोन शूर’मध्ये एक बैलगाडी आहे आणि दोन मित्र त्यातून चालले आहेत. ही गोष्ट साधी असली तरी या कथानकाचा आपल्या जगण्याशी नातं जोडता येतंय का, हा शोध सुरू होताच. आपल्या जगण्याशी संबंध नसलेली, परकी नाटकं करावीशी मला वाटली नाहीत. ’गेली एकवीस वर्षं’ हा मी दिग्दर्शन केलेला पहिला दीर्घांक. मला, आमच्या संपूर्ण गटाला, हे नाटक महत्त्वाचं वाटतं. ’नाटक कंपनी’चं सरासरी वय तेव्हा एकवीस वर्षं होतं. हे वय असं की, शिक्षण नुकतंच संपलेलं असतं, म्हटलं तर जबाबदारी खांद्यावर असते आणि नसतेही. धर्मकीर्ती सुमंतनं लिहिलेल्या या नाटकाची गंमत अशी होती की, नाटकातल्या मुलाच्या आईवडिलांचा एकीकडे फुले, आंबेडकर, शाहू, गांधी, रॉय असा जप सुरू असतो, दुसरीकडे त्याला या आदर्शवादाची त्याच्या रोजच्या जगण्याशी सांगड घालता येत नाही. खरं सांगायचं तर ही माझी आणि आमच्या गटाचीही आजची स्थिती आहे. मला आदर्शवादी जगण्याची आस आहे, पण आत्ताची सामाजिक स्थिती मला तशी परवानगी देत नाही. त्यामुळे आम्ही ’नैतिकते’च्या कुठल्याही चौकटीत अडकून पडायची नाही. आदर्शवाद म्हणजे काय, जे समजून घेण्यापेक्षा आपण आज जगतो आहोत, त्याचा अर्थ काय, हे जाणून घेण्यात आम्हांला अधिक रस आहे. हाच ’गेली एकवीस वर्षं’चा मुद्दा होता. पण या नाटकाचे विसेक प्रयोग झाल्यावर मला लक्षात आलं की, या नाटकाच्या विषयाचं आपल्याला फार वरवरचं आणि उपरं आकलन झालं आहे. म्हणून मग मी समाजशास्त्रात एम. ए. करायचं ठरवलं.
त्यानंतर मी दिग्दर्शन केलेलं नाटक म्हणजे ’मी गालिब’. ओम भूतकरनं हे नाटक लिहिलं आहे. तो गालिब आणि ओशो यांचं लिखाण कोळून प्यायला होता. त्याच काळात मीही विपश्यनेसाठी गेलो होतो. त्यामुळे असेल कदाचित, पण आमच्या मनांत अस्तित्ववादाबद्दल आकर्षण असल्यामुळे गालिबचं काव्य आल्यानंतर एक मजा सुरू झाली. प्रत्येक नाटकाची प्रक्रिया सुरू झाली की, आम्हांला वाटतं की हे नाटक आपल्यापेक्षा परकं राहू नये. ते नाटक आपल्यामधून येणं फार गरजेचं आहे. नाटक बसवताना मी किंवा निपूण किंवा आमच्यापैकी कोणीच ’आता इथून तिथे चालत जा’ अशासारखं काही कधीच सांगत नाही. प्रत्येक प्रसंग हा इम्प्रोव्हाईज केला जातो आणि नटांकडून आणि उपलब्ध सामग्रीतूनच मग नाटक आकार घेत जातं. गालिबच्या वेळी एक गंमत अशी झाली की, आम्ही ठरवलं रोज मुशायरा करायचा. आम्ही एकत्र गोलात बसून रोज एक कविता करायचो. सगळेजण स्वाभाविकपणे सुरुवातीला ’मी कवी नाही, मला कुठे कविता करता येते?’ असंच म्हणाले. पण मला आनंद याचा वाटतो, की त्या दोन-अडीच महिन्यांत प्रत्येकानं अप्रतिम कविता लिहिल्या. आमच्या टीममधला प्रत्येकजण, मग तो नेपथ्याची बाजू सांभाळणारा असो, किंवा रंगभूषा करणारा असो, किंवा प्रकाशयोजना करणारा असो, किंवा नट असो, कविता लिहायचा. त्यामुळे ओमनं लिहिलेलं नाटक मी बसवणं, यापेक्षा मला जास्त महत्त्वाचं या सगळ्यांनी कविता लिहिणं वाटतं. प्रत्येक नाटकाच्या वेळी असं एखादं नवं दालन आमच्यासाठी उघडलं आहे.
’नाटक नको’ हे नाटक धर्मकीर्तीनंच लिहिलं होतं. प्रायोगिक नाटक करणार्या एका गटाविषयीचं हे नाटक होतं. प्रायोगिक नाटक म्हणजेच काहीतरी तरल, बुद्धिमान अशा विचारसरणीला खोडून काढणारं, त्यामागच्या खोटारडेपणाबद्दल, दांभिकतेबद्दल, राजकारणाबद्दल बोलणारं हे नाटक होतं. त्याच दरम्यान कधीतरी मी सम्यक् साहित्य संमेलनाला गेलो होतो. त्यावेळी मला असं लक्षात आलं की, माझा जो काही अनुभव आहे या समाजाचा, तो अतिशय तोकडा आहे. पुण्याच्या एका मध्यमवर्गीय, ब्राह्मण कुटुंबातून आलेला, ’अक्षरनंदन’सारख्या तशा एका अर्थी समाजवादी शाळेत शिकलेला मी एका संपूर्ण वास्तवाशी पूर्णपणे अनभिज्ञ होतो. आपलं शहर नेमकं कसं आहे, तिथे राहणारे लोक कसे आहेत, हेही मला पुरतं ठाऊक नव्हतं. सम्यक् साहित्य संमेलनातला चर्चा ऐकून माझे डोळेच विस्फारले. मग मी पुन्हा त्या दिशेनं वाचन सुरू केलं, लोकांना भेटलो, लोकांशी बोललो. त्याचा परिणाम असा झाला की मी जमिनीवर आलो. अस्तित्ववादानं भारावलेला मी सामाजिक वास्तवाकडे अधिक लक्ष द्यायला लागलो. एका अर्थानं मला ही दोन टोकं वाटतात. एका बाजूला मेटाफिजिकल तत्त्व आणि दुसरीकडे सामाजिक वास्तव, आणि या दोहोंच्या मधून जाणारं काही काम आपल्या हातून व्हावं, अशी माझी इच्छा होती. ’शिवचरित्र आणि एक’ हे नाटक करण्यामागची ही प्रेरणा होती. या नाटकाच्या निमित्तानं मला डॉ. सदानंद मोरे भेटले. मग धर्मकीर्तीनं या नाटकाला जोडून येणारा एक भाग लिहिला. या नाटकाच्या प्रक्रियेदरम्यान ’कुठल्याही घटनेचा केवळ अन्यवार्थ लावता येतो, ही एक महत्त्वाची गोष्ट लक्षात आली, जी इतिहास आणि कला, या दोहोंसाठी लागू आहे. त्यामुळे ’संपूर्ण सत्य’ ही भानगडच अस्तित्वात नाही. आपल्याला त्या त्या वेळच्या परिस्थितीनुसार त्या त्या घटनेचं आकलन होणार आहे. ’तिची सतरा प्रकरणं’ या नावाचं नाटक वरुण नार्वेकर, सारंग साठ्ये, निपुण आणि मी अशा चार दिग्दर्शकांनी बसवलं होतं. ’अटेम्प्ट्स् ऑन हर लाईफ’ या इंग्रजी नाटकाचं हे मराठी रूपांतर होतं. एका तरुणीवर होणारे सतरा आघात, ही या नाटकाची कथावस्तू होती. एका नाटकाला चार दिग्दर्शक आणि प्रत्येक प्रसंग वेगळ्या दिग्दर्शकानं बसवलेला, असं असल्यानं आम्हांला हे नाटक करताना खूप मजा आली. एकाच प्रसंगाकडे वेगवेगळ्या दृष्टींनी मला बघता आलं. त्यावेळी आणि ’शिवचरित्र आणि एक’ करतानाही एकच गोष्ट सातत्यानं लक्षात येत होती की, माझं म्हणणं हेच अंतिम सत्य, माझाच दृष्टिकोन खरा, हा हेका फार धोकादायक आणि आपल्याला खड्ड्यात घालणारा आहे. जैन तत्त्वद्न्यानात ’नय’ असा शब्द आहे. म्हणजे एकाच गोष्टीकडे वेगवेगळ्या दृष्टींनी बघणं. हे जर मला जमलं तर मला अधिक जिवंत वाटेल आणि कलाकार म्हणून हेच माझं काम आहे, असं मला वाटतं.
समाजात वावरताना अगोदर आपण स्वत: कोण आहोत, कसे आहोत, हे मान्य करता येणं हे अधिक महत्त्वाचं आहे. नाटकांच्या निमित्तानं स्वत:चा शोध घेताना आता मला असं लक्षात आलं आहे की, माझ्यातले न्यूनगंड किंवा अहंगड आता मला तितकेसे त्रासदायक वाटत नाहीत. त्यामुळे समाजातल्या वेगवेगळ्या घटकांनाही मी कदाचित अधिक चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकतो. उदाहरणार्थ, मागे एका संघटनेनं प्रकाशित केलेली काही पुस्तकं वाचून मी प्रचंड अस्वस्थ झालो आहोत. पण आता मी त्या पुस्तकांकडे अधिक निकोप दृष्टीनं पाहू शकतो. आता मला फक्त परिस्थिती, त्या परिस्थितीमागची कारणं जाणून घेण्यातच रस उरला आहे. स्वत:ला ओळखणं, स्वत:शी कम्फर्टेबल होणं, ही महत्त्वाची गोष्ट नाटक नावाच्या गमतीमुळे घडते. ’असं करायचं असतं’ या भानगडीपासून मुक्त व्हायला नाटक मदत करतं. मला समाजासमोर असलेल्या समस्या दिसतात. पण प्रश्न न विचारण्याची, प्रश्नच न पडण्याची जी प्रवृत्ती समाजात सातत्यानं विस्तारते आहे, प्रश्न न विचारता ’हे असंच करायचं असतं’ हे अंगी बाणवून घेण्याची झापडबंदी सवय रुजते आहे, त्यानं मला त्रास होतो. मीही या समाजाचाच एक भाग आहे. माझ्यातही ही प्रवृत्ती आहे.
नाटकामुळे मला ’हे असंच करायचं असतं’ या समजुतीला धडका मारण्याची शक्ती मिळते. माझ्या जिवंत असण्याचा तो महत्त्वाचा भाग आहे, असं मी समजतो.
सुरेख प्रगल्भ मनोगत!
सुरेख प्रगल्भ मनोगत!
फार आवडलं!
फार छान लिहिलंय! आलोककडे
फार छान लिहिलंय! आलोककडे पाहून (फोटो आणि चित्रपटात केलेलं काम) तो इतका गंभीर विचार करत असेल असं वाटलं नव्हतं सुखद धक्का!
सुरेख आणि मच्युअर्ड. खूप सार्
सुरेख आणि मच्युअर्ड. खूप सार्या शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी.
जिज्ञासा +१.
आवडला लेख. मस्त लिहीलं आहे.
आवडला लेख. मस्त लिहीलं आहे.
नाटक ही कला/विषय
नाटक ही कला/विषय सामान्यांच्या कक्षेबाहेरचा (उरला) आहे असं वाटलं किंवा तो पहिल्यापासूनच तसाच होता आणि कमर्शियलायझेशन करण्याच्या प्रयत्नांत त्याचं डायल्युटेड रूप च सामान्यांनां दिसतं असं वाटलं मनोगत वाचून.
जिज्ञासा, मला उलट तो जसा दिसतो त्यावरून बर्यापैकी "आर्टी" टाईप चा वाटतो. व्हेरी मच इन लाईन विथ हिज थिंकींग
छान आहे मुलाखत .
छान आहे मुलाखत .
नाटकाच्या विषयाचं आकलन व्हावं म्हणून समाज शास्त्रात एम ए करणं हे मला फारच आवडलं. आता पर्यत भूमिकेची गरज म्हणून एखादी भाषा शिकणं , शरीरयष्टीकडे लक्ष देणं वगैरे ऐकलं होतं .पण अश्या एखाद्या विषयाचा अकॅडेमीकली विचार करून त्याच शिक्षण घेणे हे फारच कौतुकास्पद .
बाकीची मुलाखतही मनस्वी आहे .
फारच छान.
फारच छान.
'विहीर'मधला आलोक राजवाडे समोर उभा राहून बोलतोय असा भास झाला.
आवडलं स्वगत, आलोक बद्दल
आवडलं स्वगत, आलोक बद्दल काहीही माहित नव्हते, आता आलोकला बुकमार्क केलंय
छान मुलाखत. आलोक इंटरेस्टिंग
छान मुलाखत. आलोक इंटरेस्टिंग आहे.
मला उलट तो जसा दिसतो त्यावरून बर्यापैकी "आर्टी" टाईप चा वाटतो. व्हेरी मच इन लाईन विथ हिज थिंकींग Happy>> +१
कमालीचे परिपक्व विचार आहेत!
कमालीचे परिपक्व विचार आहेत! मस्त मुलाखत!
छान लेख. धर्मकीर्ती माझ्या
छान लेख. धर्मकीर्ती माझ्या मैत्रीणीचा मुलगा. कै. प्रो. यशवंत सुमंत ह्यांचा मोठा मुलगा. त्याचा उल्लेख वाचून छान वाटले. दिस्ण्या वरून एखाद्याची वैचारिक लेव्हल नाही ठरवता येत. असे माझे विनम्रता के साथ मत आहे. एखाद्याला व्यक्त होउ दिले तर आतली विचार धारा दिसू शकेल मग कधीतरी समजेल. आलोकला शुभेच्छा. सिनेमाला पण. ते कासवाला हग करायचे पोस्टर छान आहे.
छान लिहिलंय.
छान लिहिलंय.
मस्तं झालय आलोकचं मनोगत !
मस्तं झालय आलोकचं मनोगत !
मस्त बोललाय आलोक!
मस्त बोललाय आलोक!
मला लहानपणीचा नकला करणारा, मिश्किल आलोकच जास्त माहीतीय! त्यामुळे दरवेळेस असं प्रगल्भतेने बोलणारा किंवा अभिनयात नवी उंची गाठणारा आलोक पाहिला की प्राउड फिलिंग येतं!
कासव एलएमध्ये येणार आहे का?
बस्के,
बस्के,
'कासव' अमेरिकेत सर्वत्र नक्की येईल. डॉ. आगाशे स्वतः कासवाबरोबर अमेरिकेचा दौरा करणार आहेत. तारखा ठरल्या की मायबोलीवर लिहीनच.
chhan
chhan