बरेली की बर्फी - गोड तरीही चटकदार!

Submitted by भास्कराचार्य on 23 August, 2017 - 07:34

इतकी निखळ रॉमकॉम हिंदीतच काय पण इंग्लिशमध्येही बर्‍याच दिवसांत पाहिली नव्हती! 'बरेली की बर्फी' सर्वात आधी काही असेल, तर एंटरटेनिंग आहे. निखळ धमाल करमणूक. बॉलीवूडमध्ये 'कॅरॅक्टर डेव्हलपमेंट' हा प्रकार इतक्या सुंदर रीतीने फार कमी वेळा पाहिला आहे, आणि कॉमेडीमध्ये तर जवळपास नाहीच. ह्या चित्रपटातल्या व्यक्तिरेखा ह्या 'अ' पासून 'ज्ञ' पर्यंत खर्‍या आहेत. लोभसवाण्या आहेत. आणि प्रत्येक अभिनेत्याने त्या अ श क्य तोलल्या आहेत. कृती सनोनला अभिनय येत असावा अशी पुसट शंका आधीपासून होती, पण 'दिलवाले' आणि 'राबता'सारख्या सिनेमांमुळे ती आशा मावळत चालली होती. पण चांगली दिग्दर्शिका मिळाल्यावर काय नाही होऊ शकत महाराजा! दिल खुश कर देता तुस्सी!

स्त्री-दिग्दर्शक असलेल्या सिनेमांमधून आजकाल वेळोवेळी मला जाणवायला लागलेलं आहे, की 'रेप्रेझेंटेशन मॅटर्स'! स्त्री-दिग्दर्शक असलेले २-३ चांगले सिनेमे पाहिल्यावर जाणवतं, की स्त्री व्यक्तिरेखा चांगली उभी करण्यामागे त्यांच्या मनात अंतर्भूत स्वारस्य असतं, तसं फार कमी पुरूषांच्या मनात असतं. अश्विनी अय्यर-तिवारीने आधी 'निल बटे सन्नाटा'मध्ये सुंदर दिग्दर्शन केलंच होतं. आणि आता 'बरेली की बर्फी'मधून ती कृती सनोनच्या 'बिट्टी'ला योग्य न्याय देते. ही बिट्टी रूढार्थाने थोडीशी बिघडलेली, थोडीशी चढेल वाटते, पण मनाने अत्यंत निर्मळ आणि स्वतःला काय हवंय ह्याबद्दल क्लीअर असलेली आहे. तिला जास्त लाऊड न करता ठाम दाखवायची भट्टी कृती सनोनला चांगली लावता आली आहे. तिचा अभिनय बघून खरंच छान प्रसन्न वाटलं.

ह्या बिट्टीचं लग्न काही जुळत नाहीये. तिच्या घरचेही थोडे तिच्यासारखेच पण कमी अतरंगी आहेत. पण त्यांनाही मुलीची काळजी लागून राहतेच. घरचं मिठाईचं दुकान आहे, त्यामुळे तशी पैशाची फार काळजी नाही. बिट्टी स्वतः विद्युतविभागामध्ये तक्रारी (न) नोंदविण्याचं काम करते. पण असं सगळं असूनही तिच्या पुढारलेपणामुळे म्हणा, की आणखी कशाने म्हणा, योग काही येत नाही. अश्या ह्या बिट्टीच्या हातात एकदा 'बरेली की बर्फी' येते, आणि त्या बर्फीच्या हलवायाचा शोध घ्यायला ती आयुष्मान खुरानाचा 'चिराग' हाती घेऊन बाहेर पडते, आणि राजकुमार रावच्या 'विद्रोही'पणाकडे जाते. मग पुढे काय होतं, सगळा घोळ एकदाचा कसा मिटतो, काय काय कसं कसं होतं, हा खूप उत्कंठावर्धक प्रवास आहे. 'दंगल'चाच लेखक नितेश तिवारी इथे आहे, त्याचं आणि श्रेयस जैनचं हे लेखक म्हणून पुरेपूर यश आहे. चित्रपट अजिबात कंटाळवाणा न होता अगदी मजा करत करत शेवटाकडे येतो.

राजकुमार राव. राजकुमार राव. राजकुमार राव. काही दिवसांनी ह्या माणसाची असंच पाच अक्षरी नाव आणि दोन अक्षरी आडनाव असलेल्या हिंदी चित्रपटसृष्टीतील एका 'व्हेटेरन' अभिनेत्याशी तुलना व्हावी अशी परिस्थिती येईल, असं त्या अभिनेत्याचा आब राखूनही भाकित करायची इच्छा होते आहे. ह्याची 'नशा'च तशी आहे. Wink ज्या ज्या सीनमध्ये राजकुमार राव आहे, तो तो सीन त्याने अक्षरशः 'खाल्ला' आहे. साडी नेसण्याचे सीन असो, की ट्रॅफिक थांबवायचे सीन असो, हसून हसून पुरेवाट होते! दोन वेगवेगळ्या व्यक्तिरेखा एकाच चालू सीनमध्ये सलग वठवायच्या, म्हणजे खायचं काम नाही. आपल्या रोजच्या जगण्यामध्ये आपण हसणं गमावत चाललो आहोत का, असं मला कधीकधी वाटतं. ह्या माणसाने ते रोजच्या जगण्यातलं हसणं साध्यासाध्या सीनमधून पुन्हा अधोरेखित केलं माझ्यासाठी. क्या बात! क्या बात! आयुष्मान खुरानाचा इतका चांगला वठवलेला 'चिराग'सुद्धा झाकोळून जातो. पण आयुष्मानचंही काम खरंच सुंदर. 'व्हाईट नाईट इन शायनिंग आर्मर' ते 'ग्रे शेड्स' हा प्रवास इतक्या सहजतेने त्याने उभा केला आहे, की बोलायची सोय नाही. कृती सनोनचा परफॉर्मन्सही वर म्हटल्याप्रमाणे लाजवाब. त्या व्यक्तिरेखेत मला आता आलिया भटलाही बघता येणार नाही. तिच्या चेहर्‍यावरचे भावही फार झरझर बदलतात, त्यामुळे ती फार लोभसवाणी आणि आपलीशी वाटते. त्या बर्फीसारखीच गोड. तिचे आईबाबा आणि आयुष्मानचा मित्रसुद्धा छोट्याछोट्या गोष्टींत भाव खाऊन जातात.

तुमच्याकडे चांगली गोष्ट सांगायला असेल, तर बाकी उणीवा थोड्याफार झाकल्या जातात, ह्याचं हा चित्रपट म्हणजे चांगलं उदाहरण आहे. शेवट थोडा बॉलीवूडी आहे, पण ते अपेक्षित आहे. शेवटी पिक्चरला स्टार पॉवर अशी नाही, त्यामुळे त्यांना बर्फीचा शेवट तसा चांगला करणं भाग आहे, पण तरी तो कुठे खोटा वाटत नाही, त्यामुळे त्रास होत नाही. मुख्य म्हणजे ह्यातली कुठलीच पात्रं कटकटी नाहीत, त्यामुळे मेलोड्रामा नाही. पुलंनी कुठल्याशा कीर्तनकार बुवांबद्दल म्हटलं होतं, की खारं बिस्कीट आपण चहात पूर्ण न बुडवता थोडीशी डूब देऊन ओलावा मिळवतो, तसं ते कीर्तन करतात. ह्या चित्रपटाचंही तसंच आहे. सगळेच अभिनेते आणि लेखक-दिग्दर्शक हे कुठेही 'अती' न करता भावनांचा एक छानसा ओलावा देऊन आपल्यासमोर हा चित्रपट सादर करतात. छान करमणूक होते. तेव्हा तुम्हाला शक्य असेल, तर हा चित्रपट चुकवू नका. बॉलीवूडमध्ये असे चित्रपट येत आहेत, ही मला खूप आश्वासक बाब वाटते.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एकदम आठवलं, त्या लग्न पत्रिकांमधले टायपो जे आयुष्मान दर वेळी दुरुस्त करत असतो ते भारी दाखवले आहेत Happy

'नज्म नज्म सा' गाण्यात त्याची फ्रेंड रिक्वेस्ट अ‍ॅक्सेप्ट करताना बिट्टीला अजून १०६५ का काही फ्रेंड रिक्वेस्ट असतात, तो आकडाही मुद्दाम क्लीअरली दाखवला आहे बहुधा. Lol

>>एकदम आठवलं, त्या लग्न पत्रिकांमधले टायपो जे आयुष्मान दर वेळी दुरुस्त करत असतो ते भारी दाखवले आहेत >> Lol हो.

भा, ते इतक्या बारकाईने नाही बघितलं.

सायो, ते पहिल्यांदा मलाही दिसलं नव्हतं, पण युट्यूबवर गाणं पुन्हा ऐकताना एकदम जाणवलं तसं. Happy

भाचा, मस्त परिक्षण.
काल पाहिला. मस्त जमलाय.
राजकुमार राव खतरनाक परफॉर्मन्स ! कार विकणार्‍या सेल्समन वरुन साडीवाला, भर रस्त्यात पान खाऊन जीप वाल्याला टशन देणे.. असे बरेच सीन्स पाहून फुटायला झालं..
त्या व्यक्तिरेखेत मला आता आलिया भटलाही बघता येणार नाही>> बेग टू डिफर.. आलिया पण छान वाटली असती या रोल मधे हेमावैम. Happy
ती बरेली-लखनवी लहेजातली बोली पण फार आवडली. ... तो डिंपल वाला डायलॉग भारी मारलाय..
कमरीया ट्विस्ट आणि स्वीटी तेरा ड्रामा (आबरा का डाबरा) सध्या प्लेलीस्टवर !

Pages