नवे वर्ष - नवा संकल्प

Submitted by parashuram mali on 14 August, 2017 - 10:55

नवे वर्ष नवा संकल्प
आज नव्या वर्षाच्या उंबरठ्यावर आपण येऊन पोहचलेलो आहोत. नवा जोश, नवा उत्साह, नवे स्वप्न घेऊन मार्गक्रमण करत असताना आठवणींची शिदोरी सोबत घेऊन उत्साहाने आपण सर्वजण आनंदाने नव्या वर्षाचे स्वागत करूया.
आपापसातील मतभेदांना तिलांजली देऊन पुन्हा नवे अतूट नाते निर्माण करूया. भले बुरे जे घडून गेले विसरून जाऊ सारे क्षणभर जरा विसावू या वळणावर या गीतातील शब्दाप्रमाणे नव्या सकारात्मक विचारांना घेऊन पुढे जाऊया.
नक्कीच जगण्याची परिभाषा बदलत चालली असली तरी माणसातली माणुसकी काही अंशी टिकून आहे. याचे आत्ताचे ताजे उदाहरण म्हणजे जळगावमधील युवाशक्ती फौंडेशन नवीन वर्षानिमित्त कोणताही अनावश्यक खर्च न करता ही युवाशक्ती अनाथ आश्रमातील मुलांसोबत नवे वर्ष साजरे करणार आहे. आजच्या आधुनिक आणि तंत्रज्ञानाच्या युगामध्ये नात्यांची वीण ढिली होत असताना इतरांबरोबर आनंद वाटून घेण्याच्या घटना दुर्मिळ होत आहेत. या युवाशक्तीच्या स्तुत्य उपक्रमाचं सर्वानीच कौतुक केले पाहिजे.
एका बाजूला दोन वेळच्या जेवणाची भ्रांत पडलेली असताना दुसऱ्या बाजूला ३१ फर्स्ट कसा साजरा करायचा या नियोजनात महिनाभरापासून गुंतलेली तरुणाई दिसत आहे. आपुलकी, आपलेपणाने ओतप्रोत भरलेली माणसे आज अंधारातील उजेड बनून दाही दिशा उजळवून टाकण्याचं काम करत आहेत.सकारात्मक विचार घेऊन नव्यानं जगण्याची सुरुवात करायची असा विचार करून निश्चयाची मुहूर्तमेढ रोवून पुढे चालणाऱ्या तरुणाईला आमचा सलाम, खचलेल्या मनामध्ये उभारी आणून पुन्हा झेप घेण्याचे स्वप्न उराशी बाळगून पुढे चालणाऱ्या ध्येयवेढ्या माणसांना सलाम, सलाम पावलोपावली संघर्ष झेलत जिद्दीने उभे राहणाऱ्या जिद्दी लोकांना सलाम.
खचलेल्या, नाउमेद झालेल्या प्रत्येकाने आज नव्या वर्षाच्या नव्या क्षणाला सूर्यकिरणांच्या साक्षीने आणि नव्या वर्षाचे स्वागत मधुर स्वरांनी करणाऱ्या पक्षांच्या साक्षीने प्रतिज्ञा करायची आहे नव्याने जगण्याची आणि नव्याने बहरण्याची.
कोण म्हणते? मनावरल्या जखमा कधी पुसल्या जात नाहीत आणि काळजावरचे व्रण कधी मिटत नाहीत. आम्ही सांगतो जखमाही मिटतात आणि व्रणही पुसले जातात फक्त मनाची तयारी आणि सकारात्मक विचारांची दिशा असेल तर सगळ्या अश्यक्य गोष्टी शक्य आहेत आणि आज या नव्या वर्ष्याच्या आगमनाला आपणाला हाच निश्चय आणि संकल्प करायचा आहे.
आजकाल अपयशाची कारणे सांगणारे अनेकजण आहे. कुणी परिस्थितीच कारण सांगत तर कुणी शिक्षणच चांगलं नव्हतं असे सांगत असतात पण मोलकरणीची पोरगी अधिकारी झाली आणि रिक्षा ड्रायव्हरचा मुलगा सी.ए. झाला हे कारणे सांगणाऱयांना दिसत नाही. किंवा त्या गोष्टीचा ते विचार करत नाहीत पण त्यांच्या यशाचं कारण होते त्यांचा स्वतावर असलेला विश्वास आणि उराशी बाळगलेले स्वप्न.
तोच विश्वास आणि हेच स्वप्न आज अपयशयाची कारणे सांगणाऱ्या तरुणाईने उराशी बाळगून नववर्षाच्या साक्षीने ते सत्यात उतरविण्यासाठी संकल्प करायचा आहे.
मनामध्ये आशेची पालवी जागवून जो यश्याचा ध्यास घेतो तो नक्की यशस्वी होतो. फक्त जिंकण्याची आणि परिस्थितीशी लढण्याची भूक असायला हवी. ती भूक पुन्हा नव्याने सर्वाना जागवायची आहे. आपले हिरो हे सलमान खान आणि शाहरुख खान नसून रणांगणावर लढणारे जवान आहेत हे लक्षात ठेवून देशप्रेम जागृत ठेवण्याचे स्वप्नही आजपासून बघायला शिकायचे आहे.
टी. व्ही. मोबाईल, आणि कॉम्प्युटरच्या आहारी न जात वाचन संस्कृती वाढविण्यासाठी, जतन आणि संवर्धन करण्याचा आपल्याला संकल्प करायचा आहे. ढासळलेली नीतिमूल्ये आणि व्यसनाधीनता नष्ट करण्यासाठी तरुणांनी पुढे येण्याचा संकल्प करायचा आहे. कुरघोडी आणि सत्तेचं राजकारण न करता सर्वसामान्य गरीबाच्या हिताचं राजकारण करण्याचा संकल्प करायचा आहे. वडीलधाऱ्या माणसांचा, थोरामोठ्यांचा, आई , वडिलांचा, शिक्षकांचा मान सन्मान आणि आदर करण्याचा आज आपल्याला संकल्प करायचा आहे.
परीक्षा पास होणे, नोकरी- व्यवसाय करणे आणि पैसा कमावून श्रीमंत बनणे हे स्वप्न बाळगण्याबरोबर एक चांगला माणूस बनण्याचा संकल्प आज नवीन वर्ष्याच्या संध्येला करायचा आहे.
वाढती जीवघेणी स्पर्धा आणि जागतिकीकरणामध्ये प्रत्येक माणूस पैश्याच्या पाठीमागे धावत चाललेला आहे त्यामुळे स्वताच्या सुखासोबतच तो मर्यादित राहिलेला आहे. दुसऱ्याच्या सुखदुःखाशी त्याचा संबंध उरलेला नाही. घरातील संवादाबरोबर समाजातील लोकांचाही एकमेकांशी संवाद हरवत चाललेला आहे त्यामुळे भविष्यातील विघातक परिस्थितीकडे आपण आपोआपच ओढले जात आहोत हे रोखण्यासाठीच चला टी. व्ही. ला आणि मोबाईलला बाजूला ठेवून आपापसातील संवाद वाढविण्याचा संकल्प करूया. गोर- गरिबांच्या डोळ्यातील अश्रू पुसून त्यांच्या चेहऱ्यावर हसू खुलवण्याचा संकल्प करूया, संकल्प करूया दिन - दुबळ्या जनतेला नवी प्रेरणा देण्याचा अंध- अपंग, रंजल्या गांजल्यांमध्ये स्फुरण चेतवण्याचा संकल्प करूया, संकल्प करूया माणुसकीची मशाल धगधगत ठेवण्याचा अन प्रेमाची बरसात करण्याचा
नव्या दिशा
तरुण मनाच्या
उंच झोक्याच्या
कोण आडवेल आम्हाला
आमच्या कर्तुत्वाला
दिलाय आव्हान आम्ही
आमच्या सामर्थ्याला

घेतलिया शपथ आम्ही
उंच भरारी घेण्याची
क्षितीज्याला पार करण्याची
जागविलाय आता आम्ही
आमच्यातल्या नव्या शक्तीला

लेखतील तुच्छ जे लेखू देत आम्हाला
कुणाचं भय नाही आमच्या मनाला
पाऊल पुढं टाकलय आता जग सार बदलण्याला

चला तर मग नवे विचार आणि नवे संकल्प घेऊन नव्या वर्षाचं स्वागत करूया.

विषय: 
प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users