गाभुळल्या रानबिया

Submitted by santosh watpade on 10 August, 2017 - 01:19

गाभुळल्या रानबिया गेले कटीवर हात
पाय मारतो आतुन कोंभ हिरवा पोटात..

रानबिया लाजभिऊ त्यांचे गोरे गोरे गाल
घरधन्याचा सांगावा आला वार्‍यासवे काल ..

खाटा विणून लाकडी माय दारात बसली
कळशीत लेकींसाठी उन्हे कोवळी भरली..

बाप वेडा येताजाता नाडी लेकींची बघतो
येते ढगांची आरोळी पुन्हा कामावर जातो..

घालू डोहाळे जेवण माय सांगते कानात
रानबिया गोर्‍यामोर्‍या पदरात लपतात...

म्हणे तळला आषाढ आली जवळ तारिख
याच काळजीत माय झाली अजून बारिक

झाली शिवून झबली झाली टाचून टोपडी
कधी भरेल पिलांनी तिची इवली झोपडी....

-- संतोष वाटपाडे

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदर!
"म्हणे तळला आषाढ" च्या जागी ""म्हणे टळला आषाढ" असे हवे होते ना?

नाही कविवर्य ....आषाढ तळला जातो इकडे... जशा कुरडया भजी पापड तळतात ...आषाढाचे काही विशिष्ट वाण असतात